Total Pageviews

Saturday, September 15, 2018

मार्क इंग्लिस : पायांचे ज्याच्या पंख झाले




मनुष्याच्या आयुष्यात एखादा क्षण/टप्पा असा येतोच ज्यावेळी त्याला आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय असा प्रश्न पडत असतो. असा प्रश्न पडण्यामागे कारणीभूत असते ती म्हणजे तो अनुभवत असलेली परिस्थिती. एकतर त्याचं गरजेपेक्षा उपभोगून झालेलं तरी असतं किंवा तो खूप काहीतरी भयानक भोगत तरी असतो. पहिल्या परिस्थितीतला मनुष्य अतिरिक्त उपभोगातून आलेल्या साचलेपणामुळे आपल्या अस्तित्वाच्या प्रयोजनाकडे काहीशा आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघतो. यातून काही सकारात्मक गोष्ट घडण्याची शक्यता असते. परंतु दुसऱ्या परिस्थितीत असणारा आपल्या अस्तित्वाकडे सकारात्मक किंवा नकारात्मक यांपैकी कुठल्या नजरेने बघेल हे त्याच्या मानसिक कणखरतेवर अवलंबून असतं. निराशावादी मनुष्य परमोच्च नैराश्याच्या क्षणी 'आपल्या अस्तित्वाला काही अर्थ नाही’ असं समजून आपलं आयुष्यही संपवून टाकतो. पण सकारात्मक दृष्टिकोनातून बघत असणारा मनुष्य मात्र आपल्या जिवंत राहण्यामागे काही चांगले प्रयोजन आहे अशी धारणा बाळगून असतो. त्याला तात्कालिक खाचखळग्यांच्या मार्गापलीकडची शिखरं खुणावत असतात.... मार्क इंग्लिसलादेखील ती शिखरं (शब्दशः!) खुणावत होती, म्हणूनच तो एक अफाट आयुष्य जगून दाखवू शकला. जीवावर बेतू शकणाऱ्या संकटापासून ते एव्हरेस्ट चढाईची एकमेवाद्वितीय कामगिरी करून दाखवण्यापर्यंतचा हा सारा प्रवास प्रचंड थक्क करणारा आहे.


संकट आणि मात

न्यूझीलंडचा मार्क इंग्लिस कुमारवयात असल्यापासूनच गिर्यारोहणाचा भोक्ता होता. कडे वेंघून जाणे आणि दऱ्या लांघून जाणे या छंदाला पुरेपूर वाव देणारा व्यवसायच त्याने निवडला आणि माऊंट कुक नॅशनल पार्कमध्ये सुरक्षारक्षक आणि मार्गदर्शक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. तिथे येणाऱ्या साहसी गिर्यारोहकांची कठीण परिस्थितीतून सुटका करण्याचं त्याचं काम होतं. १९८२ मध्ये त्याने त्याच्या सहकाऱ्यासह माऊंट शिखरावर चढाई करण्याचं ठरवलं आणि तो त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. त्या चढाई दरम्यान शतकातल्या सर्वात भयानक हिमवादळाने त्यांना गाठलं. एका गुहेत कसाबसा जीव मुठीत धरून तब्बल चौदा दिवस काढले. तिथून त्यांची सुटका तर करण्यात आली पण तोपर्यंत अतिथंडीचा फटका बसून त्याचे दोन्ही पाय काळेनिळे पडून निकामी झाले होते. शस्त्रक्रिया करून ते गुडघ्यांखाली कापून टाकावे लागले. जीवावर बेतलेलं पायावर निभावलं खरं पण त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला.


कुणाहीपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारा हा क्षण. 'कुढायचं की उडायचं' या प्रश्नाला त्याने ठामपणे उत्तर दिलं, 'उडायचं'.... अस्तित्व नष्ट झालेले पाय पंख होऊन त्याला पुन्हा चिकटले आणि त्याने पुन्हा एकदा भरारी घेतली ती एव्हरेस्ट शिखराकडे! कृत्रिम पायांनिशी एव्हरेस्ट सर करणारा तो जगातला पहिला गिर्यारोहक ठरला. हा प्रवास कसा घडला, कृत्रिम पायांवर उभं राह्तानाच्या वेदनादायी अनुभवांपासून ते एव्हरेस्ट उतरताना पुन्हा ओढवलेल्या दुर्धर प्रसंगांदरम्यान त्याने स्वतःला सतत प्रेरित कसं केलं हे सगळं या पुस्तकाच्या माध्यमातून जाणून घेत असताना थक्क व्हायला होतं. दैनंदिन आयुष्य जगताना अपंग व्यक्तींना धडधाकट व्यक्तींपेक्षा खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. अनेक गोष्टींत दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. पण त्यातून येऊ शकणारं मिंधेपण मार्कने कायमच नाकारलं आणि अनेक बारीकसारीक गोष्टी स्वतः शिकून घेतल्या म्हणूनच त्याची ही चित्तरकथा हातीपायी धडधाकट असलेल्यांसाठीही तितकीच प्रेरणादायी आहे.


...देणाऱ्याचे हात घ्यावे


एखाद्या मनुष्याच्या यशोशिखरापर्यंत जातानाच्या प्रवासाइतकंच त्याने शिखरावर पोचल्यावर काय केलं हेही महत्वाचं असतं. याच बाबतीत मार्कचं वेगळेपण उठून दिसतं. आपण ज्या समस्यांना सामोरे गेलो त्यांना तो विसरला नाही. आपल्यासारख्याच अपंग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करण्यात त्याने मोठा वाटा उचलला. आपले मानसन्मान, पुरस्कार, प्रसिद्धी यातून मिळालेल्या पैशांमधून त्याने मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य सुरू केलं. व्हिएतनाम युध्दाच्या वेळी अमेरिकन सैन्याने कंबोडियात पेरून ठेवलेल्या भूसुरुंगांच्या स्फोटात ज्या हजारो कंबोडियन माणसांना कायमचं पंगुत्व आलं होतं त्यांच्यासाठी कृत्रिम अवयवांचा पुरवठा सुरू करणे, एव्हरेस्ट मोहिमेत जायबंदी झालेल्या शेर्पा मंडळींच्या पुनर्वसनासाठी मदत असा दातृत्वाचा नवा अध्याय त्याने सुरू केला आणि एक आदर्श सर्वांसमोर ठेवला.


.... गोष्टी युक्तीच्या चार

हे पुस्तक एकदा हातात घेतलं की खाली ठेववत नाही याचं कारण मार्कची अनोखी जिद्द हे तर आहेच पण त्याचं श्रेय लेखक डॉ. संदीप श्रोत्री यांच्या ओघवत्या शैलीलाही द्यायला हवं. गिर्यारोहणाशी संबंधित अनेक संकल्पना त्यांनी अत्यंत नेमक्या शब्दात मांडलेल्या असल्याने या क्षेत्राचा परिचय नसणाऱ्या वाचकांनाही त्यात रस निर्माण होतो. गिर्यारोहकांची मनस्थिती, उंची आणि थंडी या चिरपरिचित धोक्यांच्या तुलनेत अल्पज्ञात असणाऱ्या परंतु महत्वाच्या अन्य धोक्यांचा परिचय, छोट्या छोट्या सवयींचे गिर्यारोहणातले महत्व या सगळ्याबद्दलची माहिती मार्कच्या साहसांच्या निवेदनाच्या ओघात त्यांनी तपशीलाने सांगितली आहे. अत्यंत प्रतिकूल स्थितीत असताना मार्कने मनः चक्षूंसमोर उभी केलेली सकारात्मक चित्रं त्याचे मानसिक संतुलन ढळण्यापासून कशी वाचवायची याचं वर्णन करून लेखकाने फारच महत्वाचं काम केलं आहे कारण अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उपयोगाला येऊ शकणारी ती एक ‘थेरपी’च आहे आणि तिचा उपयोग शारीरिक कसोटीच्या क्षणी सर्वांनाच होऊ शकतो. पुस्तकातल्या या गोष्टींसोबतच पुस्तकाच्या शेवटी असणारी पर्वतीय संज्ञा, एव्हरेस्ट मोहिमेचे नकाशे इत्यादी परिशिष्टं गिर्यारोहणासंबंधी शंकानिरसन करण्यास उपयुक्त आहेत.


'पंगुं लंघयते गिरिम्'चं चालतंबोलतं उदाहरण असणारा अव्वल गिर्यारोहक, गिर्यारोहकांच्या आहारात क्रांती करणारे पेय निर्माण करणारा संशोधक, पॅरालिम्पिकमध्ये पदकं पटकावणारा विक्रमवीर असे मार्कचे अनेक पैलू कसे विकसित होत गेले हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच नाही तर संग्रहीदेखील ठेवायला हवं.


पुस्तक : मार्क इंग्लिस

लेखक : डॉ. संदीप श्रोत्री

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठसंख्या : १६४

किंमत : १५०

आवृत्ती : तिसरी (सप्टेंबर २०११)


- प्रसाद फाटक

No comments:

Post a Comment