रोलबॉल खेळाचे जनक हे 'राजू दाभाडे' या नावाचे मराठमोळे शिलेदार असून ते चक्क पुणेकर आहेत हे मित्राकडून जेव्हापासून कळलं होतं, तेव्हाच ठरवलं होतं की त्यांची थेटभेट घ्यायचीच. पण ठरवणं आणि प्रत्यक्षात आणणं यामध्ये तीन महिन्यांचा अवधी गेला ! याचं मुख्य कारण म्हणजे दाभाडे सरांची प्रचंड व्यस्तता.... आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेचे ते सचिव असल्याने संघटनात्मक काम भरपूर, देशात आणि देशाबाहेरही होणाऱ्या सामन्यांकडे त्यांचे लक्ष आणि त्यात सहभागही... शिवाय खेळाच्या प्रसारासाठीची धावपळ.... अखेर बालेवाडी येथे छत्रपती शिवाजी क्रीडासंकुलात चालू असलेल्या 'महा रोलबॉल लीग' निमित्ताने मी त्यांना गाठलेच. या भेटीनिमित्ताने एका अपरिचित खेळाबद्दल, त्याच्या प्रसारासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल जवळून जाणून घेता आलं.
आपण जन्माला घातलेला खेळ आता लीग स्वरुपात आल्यामुळे लोकमान्यता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे याचं खूप समाधान वाटतअसेल ना ?
हो, नक्कीच. पण अजूनही अधिकाधिक लोकांनी या खेळाकडे वळावं यासाठी प्रयत्न चालू आहेत.
तुम्ही स्वतः राष्ट्रीय स्तरावर स्केटिंग खेळलेले आहात. शिवाय शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम केले आहे. या गोष्टी रोलबॉलच्या जन्मामागेकारणीभूत आहेत का ? या खेळाची कल्पना कशी सुचली ?
मी काम करत असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) च्या बालशिक्षण शाळेमधील बास्केटबॉल, हॉकी वगैरे खेळांच्या संघांना झेड.पी. च्या स्पर्धेत तसेच शालेय स्तरांवरील अन्य स्पर्धांसाठी घेऊन जायचो. त्यादरम्यान कुतूहल म्हणून मी त्या त्या खेळांच्या जन्मकथांबद्दल माहिती मिळवायला लागलो आणि एकेक रंजक गोष्ट समजू लागली. अमेरिकेत एक माणूस एक चेंडू टप्पा-टप्पा खेळत असताना त्या चेंडूने उसळी घेतली आणि उंचावरच्या एका रिंग मधून खाली पडला. हे पाहून त्याचं डोकं चालू लागलं. त्याने काही जणांना बोलावून त्या रिंग मधून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच बास्केटबॉल हा खेळ उगम पावला. बॅडमिंटनचाही असाच किस्सा. पुण्यामध्ये ड्युटीवर असणारे काही इंग्रज अधिकारी असाच विरंगुळा म्हणून शॅम्पेनच्या बाटलीचे बूच (cork) इकडून तिकडे उडवत होते, मग त्यात अधिकाधिक सुधारणा होत होत त्याचे आज ज्ञात असलेले badminton खेळात रुपांतर झाले. हे सगळं वाचत असताना माझ्याही डोक्यात एक चक्र सुरू होतंच. मी स्वतः स्केटिंगचा खेळाडू असल्यामुळे त्या अनुषंगाने मला हा खेळ सुचला.
बऱ्याचदा गल्लीत/मैदानात खेळता खेळता एकापेक्षा अधिक खेळांचं मिश्रण होऊन त्याला आपल्या पदरचे नियम लावून ते नवे खेळ खेळले जातात(उदा. आम्ही खेळायच्या रिंगने ‘रिंग गोल’ हा खेळ खेळायचो). पण तो खेळ अजून मोठ्या स्तरावर घेऊन जावा असं काही कुणाला सुचत नाही. मग तुम्हाला हा नवा खेळ अधिक गांभीर्याने पुढे घेऊन जावासा का वाटला ?
नवनव्या कल्पना लढवणं, नवा खेळ जन्माला घालणं ही दरवेळी इतर परदेशातल्याच कुणाची मक्तेदारी का असावी ? आपण दरवेळेस त्यांचे खेळ खेळतोच, मग आपण आपला स्वतःचा खेळ पुढे का आणू नये, असं मला वाटायला लागलं आणि आपण रोलबॉल पुढे आणायचा असा विचार करून मी त्याला खतपाणी घालायला सुरुवात केली.
नवीन खेळ इतरांच्या गळी उतरवणे, त्यांना खेळात सहभागी व्हायला उद्युक्त करणे हे कसं केलंत ? त्याची सुरुवात कशी होती ?
आधी आमच्या बालशिक्षण शाळेमध्ये मी ही कल्पना फुलवली. तिथे मुलांचा सराव घेतला. अन्य शाळांच्या क्रीडा शिक्षकांना संपर्क करून त्यांच्यापर्यंत रोलबॉल पोचवायला सुरुवात केली. हळूहळू आंतरशालेय मैत्रीपूर्ण सामने खेळवले. यातूनच रोलबॉचा प्रवास सुरु झाला.
विविध स्केटिंग संघटना आणि प्रशिक्षक यांच्याशी तुम्ही संपर्क केलात का ? त्यांच्याकडून तुम्हाला स्केटिंगचे कौशल्य आत्मसात केले खेळाडूअगदी ‘रेडीमेड’च मिळाले असतील ना ?
नाही. उलट अशा प्रशिक्षकांचा प्रतिसाद अतिशय थंड होता. मी अनेकांना वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे काही स्केटिंगपटू या खेळासाठी मिळावेत अशी विनंती केली. एखाद्या प्रशिक्षकाकडे असलेल्या खेळाडूंपैकी सर्वचजण स्पीड स्केटिंग (स्केटिंगची शर्यत) मध्ये प्रवीण असतील असे नाही. पण असे खेळाडू रोलबॉलसारख्या वेगवेगळ्या प्रकारची कौशल्यं आवश्यक असणाऱ्या खेळात चुणूक दाखवू शकतात. “तुमच्याकडे असणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांपैकी २० मुलं आम्हाला रोलबॉलसाठी द्या” अशा अर्थाच्या विनंतीतही फार कमी जणांनी रस दाखवला. त्यापेक्षा त्यांना पैशात जास्त रस ! आपल्या विद्यार्थ्याला आपल्याच परिचयातील क्रीडा साहित्य बनवणाऱ्या व्यावसायिकाकडे पाठवायचे, तो विद्यार्थी चढ्या भावाने ते विकत घेणार, आणि त्यातला एक हिस्सा त्याच्या प्रशिक्षकाला मिळणार असला प्रकार ....
म्हणजे ही एक प्रकारची ‘कट प्रॅक्टिस’च झाली, वैद्यकीय व्यवसायात चालते तशी ...
हो... माझा पैसा कमावण्याला विरोध विरोध नाही. तुमच्यात खरोखरच एवढे नैपुण्य आहे ना ? मग स्वतःची फी वाजवून घ्या. भले ती इतर प्रशिक्षकांपेक्षा जास्त असेल.... पण तो तुमच्या कौशल्याचा पैसा आहे. कट प्रॅक्टिससारखा छोटा विचार करण्यापेक्षा खेळाचा विचार करावा... असो, यामध्ये मी जास्त लक्ष घालू इच्छित नाही. पैसा हे माझे प्राधान्य नसून रोलबॉल हे आहे... त्याचा प्रसार हाच माझा ध्यास आहे. आपण मूळ विषयाकडे येऊ.
रोलबॉलची प्राथमिक तयारी किती काळ चालली ? तो सर्वांसमोर अधिकृतरित्या कधी आला ?
२००० ते २००२ दरम्यान प्राथमिक तयारी, नियम निश्चिती आणि अन्य तांत्रिक बाबी या गोष्टी पार पाडल्या. फेब्रुवारी २००३ मध्ये तो इथे बालेवाडीतच ‘launch’ करण्यात आला.
रोलबॉलच्या Rollball.org या वेबसाईटवर ‘Collected and compiled technical data and made ready for publication’ असा उल्लेख आहे. हा डेटा नक्की कशा स्वरूपाचा असतो ?
खेळाचे नियम ठरवणे उदा. गोलपोस्ट, ‘D’ची, मैदानाची मापं निश्चित करणे इ. शिवाय हे निश्चित करताना फक्त भारतीय खेळाडूंच्या शारीरिक ठेवणीचा विचार न करता विविध देशांमधील खेळाडूंच्या चणींचाही विचार करून त्याचाही डेटा तयार करावा लागला होता.
नव्या खेळाची नोंदणी करावी लागते का ? ती प्रक्रिया कशी असते याबद्दल कुतूहल आहे
एकदा खेळाचे नियम निश्चित झाल्यावर ती सर्व माहिती Sports Authority of India (SAI) यांना कळवण्यात आली. त्यांच्यासाठी खेळाचे प्रात्यक्षिक आयोजित केले. त्यांचे संचालक आणि निरीक्षक स्वतः ते पाहण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचे समाधान झाल्यावर मग रोलबॉलला स्वतंत्र खेळ म्हणून मान्यता मिळाली.
भारतातून हा खेळ परदेशात कसा पोहोचवलात ?
आधी खेळाची वेबसाईट बनवून त्यावर खेळाची माहिती, नियम व व्हिडीओज टाकले. विविध देशांच्या क्रीडासंघटनांना email द्वारे संपर्क करून खेळाबद्दल सांगितले आणि वेबसाईट बघायला सांगितले. त्यांना सतत संपर्क करून खेळासाठी उद्युक्त करत राहिलो.
हे प्रयत्न करताना पाश्चिमात्य देशांकडून “हा भारताचा माणूस आम्हाला काय शिकवणार” असा सूर कधी जाणवला का ?
काही युरोपियन देशांकडून सुरुवातीला असा अनुभव आला. कारण त्यांचा आशियाई देशांकडे बघण्याचा, त्यातही भारतीय उपखंडातील देशांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. सुदैवाने पाकिस्तान, श्रीलंका वगैरे देशांच्या तुलनेत भारताची प्रतिमा खूपच चांगली असल्याने त्या देशांना थोडं ‘push’ केल्यावर तेही तयार झाले. आज चाळीस देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. या निमित्ताने विविध देशांशी चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत.
दक्षिण अमेरिकेसारख्या दूरच्या खंडातही हा खेळ पोचला आहे का ?
हो. गयाना देशाचा प्रतिसाद खूपच चांगला आहे. इतका, की आता तिथल्या संघटकांशी आता मैत्रीच झाली आहे असं म्हणू शकतो. आठवड्यातून दोन वेळा तरी रोलबॉलच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी फोनवरून संभाषण होते.
या सर्व देशांमध्ये तुम्ही प्रवास केलात का ?
हो. त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना भेटणे, त्यांनी गठित केलेल्या संघाला प्राथमिक प्रशिक्षण, त्यांचे निरीक्षण, त्यात सुधारणा सुचवणे ही कामे मी केली.
एवढ्या व्यस्त वेळापत्रकामधून कुटुंबियांना वेळ द्यायला जमते का ? त्यांची तक्रार नसते का ?
मी गेल्या चौदा वर्षात एकाही घरगुती समारंभाला उपस्थित राहिलेलो नाहीये. आजही माझ्या भाच्याचा एक समारंभ आहे आणि मी इथे आहे. सुरुवातीला कुटुंबियांची तक्रार असायची पण आता माझी तळमळ त्यांच्या लक्षात आली आहे.
तुम्ही त्यांना तुमच्याबरोबर कधी दौऱ्यावर वगैरे घेऊन जाता का ?
माझं शेड्युल इतकं पॅक असतं की ते शक्यच होत नाही. शिवाय मी एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा मी कुठल्या वेळेस नक्की कुठे असेन हे सांगता येत नाही. ज्याची भेट घ्यायची ते भेटले नाहीत तरी मी संबंधित इतर मंडळींना गाठल्याशिवाय परत येत नाही. माझ्या सॅकमध्ये पाणी आणि फरसाण किंवा तत्सम स्नॅक्स बाळगतोच. मग मला जेवण नाही मिळालं तरी चालतं. माझं तेवढ्यावर भागतं.
अहो, अशाने तब्येतीवर परिणाम होईल तुमच्या ...
(हसत) आता काहीच वाटत नाही. सवय झाली त्याची.
या सगळ्या प्रवासात सरकार आणि क्रीडा संघटना यांचा प्रतिसाद कसा होता. ?
खूपच चांगला.... भारतीय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, सरकार यांचे खूप चांगले प्रोत्साहन मिळाले. वाजपेयी सरकारच्या काळात क्रीडामंत्री विक्रम वर्मा यांचं खूप चांगलं पाठबळ लाभलं.
अजूनही बालशिक्षण शाळेशी मध्ये क्रीडाशिक्षकाचे काम करता का ?
हो. अजूनही माझ्या शाळेतल्या नोकरीची ७ वर्षे शिल्लक आहेत. शाळेने मला केलेलं सहकार्य अनमोल आहे. माझं शाळेशी गहिरं नातं निर्माण झालं आहे. मी शाळा सोडणं शक्य नाही. (हसत....) उद्या शाळा ‘येऊ नका’ म्हणाली तरी मी जात राहीन.
एवढा व्याप, जबाबदाऱ्या आणि खर्च कसं सांभाळता ?
या सर्व कामात मला वसंत राठी, सतीश घारपुरे, सुर्यकांत काकडे, विनीत कुबेर आदींचा खूपच आधार आहे. माझा मी खर्च करण्याचाच प्रयत्न करतो परंतु त्यापुढेही गरज पडल्यास मी यांच्याकडे आर्थिक मदतीची विचारणा करतो. ती तशी करण्याचा अवकाश, मला मदत उपलब्ध करून दिली जाते. शिवाय आता आदेश बांदेकर हे रोलबॉल संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष झाल्यापासून त्यांचीही खूपच मदत होते आहे. फक्त शोभेपुरते अध्यक्ष न राहता ते जातीने सर्व गोष्टीत लक्ष घालतात. आता रोलबॉल लीगच्या चारही दिवसात त्यांची रोज भेट असते. प्रेक्षकांमधून सामना कसा दिसतो इथपासून ते सहभागी संघातील खेळाडूंशी संवाद साधण्यापर्यंत सर्व प्रकारे सहभाग घेतात.
आतापर्यत मानसन्मान, पुरस्कार कोणकोणते मिळाले आहेत ?
मान भरपूर मिळाला. अमिताभ बच्चंन यांनी एका चॅनेलवरच्या कार्यक्रमात माझी मुलाखत घेतली, बांग्लादेशमधल्या रोलबॉल वर्ल्डकपच्या वेळी बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान झाला.... पुरस्कारांच्या बाबतीत बोलायचं तर क्रीडापुरस्कारांच्या यादीत रोलबॉल खेळाचं नावच समाविष्ट झालेलं नाहीये अजूनपर्यंत, त्यामुळे पुरस्कार मिळालेला नाही.
शेवटचा प्रश्न, रोलबॉल १४ वर्षात ४९० देशांपर्यंत पोचला. इतर देशी खेळांच्या तुलनेत ही खूप मोठी झेप आहे. यामागे काय कारण असावं ?
सतत पाठपुरावा ... काळाला अनुसरून प्रसार व्हायला हवा..... हरिभाऊ सानेंसारख्या महर्षींनी फार आधी सांगितलं होतं की कबड्डी मॅटवर न्यायला हवी, पण ती नेली गेली नाही.. शेवटी जपानने ती मॅटवर नेली तेव्हा आपण जागे झालो. अशा गोष्टींमुळे भारतीय खेळ जास्त दूर पोचू शकले नाहीत. आता एक कबड्डीचे लीग आले आहे, बाकीच्या खेळाचंही येईल ही अपेक्षा.
सरांना अजूनही प्रश्न विचारायचे होते पण ते किती व्यस्त आहेत हे मुलाखती दरम्यानही चालू असणारी कामं, रोलबॉल लीगच्या ठिकाणी ये जा करणारे स्वयंसेवक, संघटक, खेळाडू यांच्याशी चालू असणारा संवाद यातून लक्षात येत होतं. शेवटी त्यांची एक महत्वाची मीटींग सुरु होणार असल्यामुळे मी मुलाखत आवरती घेतली. मुलाखत संपली तेव्हा एका अतिशय जिद्दी आणि समर्पित व्यक्तीला आपण भेटलो आहोत याची पूर्ण जाणीव झाली होती. एका खेळाचा जनक आणि यशस्वी प्रसारक असणारा हा मनुष्य इतका साधासुधा असल्याचं पाहून माझा त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला होता....
mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2017/7/1/roll-ball-king-raju-dabhade-.html
No comments:
Post a Comment