आफ्रिकेच्या किर्रर्र जंगलात एकीकडे निधड्या छातीने हिंस्त्र श्वापदांना भिडणारा, आपल्या गगनभेदी आरोळीने त्यांच्यावर दरारा निर्माण करणारा आणि दुसरीकडे प्राण्यांचे मूड अचूक ओळखून त्यांच्या सुख दु:खात सामील होणारा - म्हणजे एका अर्थाने त्यांची भाषा समजून घेणारा टारझन तमाम जगाचा लाडका आहे. आणखी एक टारझन असाही होऊन गेला जो कल्पनेच्या विश्वातला नसून, अगदी खराखुरा निधड्या छातीचा वीर होता. आता अगदी तो टारझन सारखा जंगलात लहानाचा मोठा झाला नसेल पण थरकाप उडवणाऱ्या जनावरांना काबूत आणायला तो तितकाच समर्थ होता... त्याचंही आख्खचं आयुष्य प्राण्यांच्या संगतीत गेलं, त्यांचे राग लोभ दुखणी खुपणी सारं काही त्याने अनुभलं... गोष्टीतल्या टारझन सारखाच हाही जगप्रसिद्ध झाला. होता तरी कोण हा गडी ?
त्याचं नाव होतं 'दामू धोत्रे'. होय, एक मराठमोळा गडी ! आणि तोही पुण्याच्या कसबा पेठेतील !!
जगप्रसिद्ध पशुशिक्षक दामू धोत्रेंच्या पराक्रमांचं तोंडात बोटं घालायला लावणारं पुस्तक म्हणजे 'वाघ सिंह माझे सखे सोबती'.
दामू धोंत्रेंचा बालपणाचा काळ म्हणजे शंभर वर्षांपूर्वीचा काळ. त्या काळात त्यांच्या मामांची 'शेलार्स रॉयल सर्कस' नावाची प्रचंड सर्कस होती. कुठल्याही मुलाला सर्कसचे जसे वेड असते तसे छोट्या दामूलाही होते. पण त्यांचे वेड सर्कस पाहण्याइतकेच मर्यादित नव्हते. त्यांना सर्कशीत स्वतः काहीतरी करून दाखवायचीही खूप खुमखुमी होती. म्हणूनच मामांची सर्कस पुणे मुक्कामी आली असताना दामूने थेट मामांनाच भेटून त्यांच्यामागे लकडा लावला. वडिलांचे छत्र हरपलेल्या दामूचे अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते, उनाडक्या करण्यातच सगळं वेळ जातोय अशा परिस्थितीत सर्कसमध्ये तो निदान काहीतरी काम करेल म्हणून आईने दामूला मामांच्या सर्कशीत सामील व्हायला परवानगी दिली आणि सर्कससोबत त्याचे नाते कायमचे जोडले गेले. ही घटना १९१२ सालची. त्यानंतर दामू धोत्रेंचा सर्कसशी संबंध पुढची तब्बल चाळीस वर्षं चालू राहिला. हा सर्व काळ चित्तथरारक झुंजी, जीवावर बेतलेले प्रसंग, संकटात अनुभवास आलेली माणुसकी आणि संधीसाधूपणा, पराकोटीचं प्रेम आणि द्वेष अशा नानाविध अनुभवांनी समृद्ध होऊन गेलेला आहे.
दहा बारा वर्षांच्या लहान मुलाला सर्कशीत ठेऊन घेणे एवढेच नव्हे तर त्याला जो जो साहस प्रकार शिकावासा वाटला त्याला प्रोत्साहनच देणे याबद्द्ल मामांना खूप मोठे श्रेय जाते. अतिशय लहान वयातच दामूने सर्कशीतल्या हिंस्त्र प्राण्यांना शिकवण्याची सुरुवात केली. सर्कसमधले अत्यंत निष्णात पशुशिक्षक धोंडीराम चव्हाण यांच्या तालमीत ते तयार झाले. कुठल्या वेळी प्राण्यांना धाक दाखवायचा, कुठल्याक्षणी थोडी ढील द्यायची याचे अनेक बारकावे धोत्रेंना उमगत गेले. प्राण्यांचे मूड त्यांना अचूक कळू लागले, प्राण्यांची बदमाषी आणि खोड्या यातल्या सूक्ष्म छटा त्यांच्या लक्षात येऊ लागल्या. म्हणूनच सिंह, वाघ, बिबळे, जग्वार, हिमबिबळ्या अशा क्रूर जनावरांपासून ते हत्ती, घोडा, मेंढा अशा प्राण्यांकडूनही ते नवनवे खेळ विविध युक्त्या योजून बसवत राहिले. प्राण्यांच्या इतक्या निकटच्या परिचयातूनच प्राण्यांच्या दुखण्याखुपण्यात ते पशुवैद्यकापेक्षाही अधिक कौशल्याने औषधोपचार करायला शिकले. त्यांचे पशुविषयक कौशल्य इतके तावून सुलाखून निघत गेले की त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. त्यांच्या नावावर तिकिटे खपू लागली. कामातून काम मिळत गेले आणि मग मामांच्या सर्कशीनंतर इझाको या रशियन गृहस्थांची सर्कस, कार्सन सर्कस, ग्रेट ओलीम्पिया सर्कस आदि भारतातील सर्कशींसह त्यांनी जगविख्यात पशुशिक्षक आल्फ्रेड कोर्ट यांच्यासोबत युरोपमधल्या सर्कशीत काम केले, एवढेच नव्हे तर जगातली सर्वात भव्य सर्कस असणाऱ्या अमेरिकेतल्या रिंगलिंग सर्कसमध्ये तब्बल १० वर्षे काम केले. ते घेत असणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांच्या थरारक कसरतींची कीर्ती अमाप होती. उघड्या अंगाने प्राण्यांना सामोरे जाणे, वाघाला खांद्यावर घेऊन फिरणे, सिंहाच्या तोंडात मान देणे वगैरे प्रकार पाहताना प्रेक्षक खुर्चीला खिळून राहत, खेळ संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट करत. प्राण्यांसोबतच्या झुंजीचे प्रसंग चित्रित करण्यासाठी त्यांना हॉलीवूडच्या चित्रपटातही काम करायची संधी मिळाली. सत्तरेक वर्षांपूर्वी अमेरिकेत लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या मराठमोळ्या गड्याची अफाट कहाणी वाचून आपली छाती अभिमानाने फुलून आल्याशिवाय राहत नाही. अमेरिकेत राहात असताना सर्कसच्या जाहिरातीत आवर्जून करत असलेला ‘इंडियाज प्रिन्स दामू धोत्रे’ असा उल्लेख असेल, चर्चच्या प्रार्थनासभेत एक ख्रिश्चन मिशनऱ्याने भारताची आणि हिंदू धर्माची नालस्ती केल्यावर त्याला तिथेच सडेतोडपणे उत्तर देणे असेल किंवा दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अमेरिकेत असणाऱ्या सर्वांना सैन्यात दाखल व्हायचा आदेश आल्यानंतर सैन्याधिकाऱ्यांच्या समोर अमेरिकेचे दोस्त राष्ट्र असणाऱ्या ब्रिटनकडून भारतीय स्वातंत्र्य नाकारले जाण्याच्या भूमिकेवर टीका करणे असेल, अशा सर्वच प्रसंगातून दामू धोत्रे यांच्यातला सजग देशप्रेमी या पुस्तकातून जाणवत राहतो.
पुस्तक वाचताना पानोपानी लक्षात येत राहते ती त्यांची प्रचंड निडर वृत्ती आणि डोकं शांत ठेवण्याची क्षमता. कोल्हापूरच्या मैदानातल्या खेळात आपापसात झुंजणाऱ्या वाघ-सिंहाच्या पिंजऱ्यात एकाकी पडलेले असतानाचा किस्सा असो वा अन्य थरारक प्रसंग, आपला जीव वाचवण्यासाठी प्राण्यांना आपापसात तसंच झुंजत ठेवून दामू धोत्रे निघून गेले नाहीत. कारण आपला जीव वाचवणं जसं आवश्यक होतं तसं त्या प्राण्यांनी एकमेकांचा जीव घेऊ नये यासाठी हालचाल करणंही तेवढंच गरजेचं होतं. डोकं शांत ठेवल्यामुळेच स्वतःचा आणि प्राण्यांचाही जीव वाचवणं त्यांना वेळोवेळी शक्य झालं. दामू धोत्रेंचा प्रांजळपणा असा की ते केवळ स्वतःच्या नीडरपणाच्या आठवणी सांगत नाहीत तर कुठल्या क्षणी ते घाबरले, गळाठून जाण्याच्या प्रसंगांबद्दलही सांगतात. पिंजऱ्यात प्राण्यांच्या गराड्यात लीलया वावरणाऱ्या या गड्याला यःकश्चित बेडकाच्या भीतीने झालेल्या फजितीचे वर्णन करतानाही त्यांना संकोच वाटत नाही हे विशेष.
हिंस्त्र पशूंच्या प्रशिक्षणासोबतच दामू धोत्रेंना झुल्यावरच्या थरारक कसरतीही करून पहाव्याश्या वाटल्या (पारंब्यांवर लीलया लोंबकळणाऱ्या टारझनशी हे आणखी एक साम्य !) मग त्यापेक्षा आणखी काहीतरी करून दाखवायची खुमखुमी असल्याने मग एकचाकी सायकल शिकले. श्वास रोखून तब्बल १२०० पौंडांची शिळा छातीवर घेऊन त्यावर ८ माणसे उभी करण्याचे अचाट प्रयोगही त्यांनी केले (पुस्तकात पुढे एका बिकट क्षणी एक संतप्त हत्ती त्यांच्या छातीवर जोर टाकत असताना केवळ या श्वास रोखून धरण्यामुळे त्यांनी कसाबसा जीव वाचवल्याचा किस्सा जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपणच श्वास रोखून धरलेला असतो !!). Jack Carson या मोटारउड्डाणपटूच्या साहसाने प्रेरित होऊन सायकलउड्डाणाचा अचाट कार्यक्रम दामू धोत्रेंनी कसबा पेठेतल्या गुंडाच्या गणपतीच्या बोळात सर्वांसमक्ष केला होता. या उडीत त्यांनी १६ फुटांपेक्षा जास्त अंतर पार केले आणि तिथे हजर असणाऱ्या खुद्द Jack carson ला देखील बेहद्द खुश करून सोडले.
भारतात एक काळ असा होता की छत्रे, शेलार, वालावलकर, माळी, पटवर्धन, कार्लेकर एवढ्या मराठी माणसांच्या सर्कशी होत्या. त्यातले अनेक कलाकार, प्रशिक्षक मराठी होते. या पुस्तकातून सर्कस नावाच्या एका जगड्व्याळ कुटुंबाची जी अनोखी माहिती मिळते ती वाचताना ‘मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही’ ही समजूत चुकीची वाटायला लागते. पशुपक्षी, तंबू, पिंजरे, कसरतपटू, कारागीर, व्यवस्थापक असा प्रचंड कबिला घेऊन मजल दरमजल करणाऱ्या १०० शंभर वर्षांपूर्वीच्या भारतीय सर्कशी, मुसळधार पाऊस, तंबूला लागणाऱ्या आगी, प्राण्यांना होणारे आजार, फुकट पास न मिळाल्यामुळे गुंडांकडून होणारा उपद्रव या सगळ्यामुळे अतिशय जिकिरीचा असणारा हा व्यवसाय, त्यात असणारी अनिश्चितता, तरीही सगळे निभावून नेण्याची जिगर या सगळ्या गोष्टी यापुस्तकात तपशिलाने आल्याने ते या मोठ्या व्यवसायाचे documenation ठरते. पुस्तकाच्या शेवटी असणाऱ्या परिशिष्टात दामू धोत्रेंच्या सर्कससंबंधीच्या वस्तूंनी भरलेल्या पुण्यातल्या ‘सर्कस व्हिला’ या अचाट आणि अफाट घराविषयी वाचताना धोत्रेंच्या कल्पकतेला दाद दिल्याशिवाय रहावतच नाही.
एकापेक्षा एक सरस आणि उत्कंठावर्धक प्रसंगांनी, दामू धोत्रेंच्या देश-विदेशातल्या पराक्रमांनी हे पुस्तक शिगोशिग भरलेले आहे. पुस्तकाच्या वाचनीयतेत भानू शिरधनकर यांच्या अनलंकृत तरीही प्रवाही शब्दांकनाचाही मोठा वाटा आहे. आजकालच्या बेस्ट सेलर्सच्या भाषेत बोलायचे तर हे पुस्तक ‘Unputdownable’ आहे.
मग कधी घेताय हे पुस्तक वाचायला ?
हे पुस्तक नक्की वाचा, आणि अभिप्रायही जरूर कळवा.
पुस्तक : वाघ सिंह माझे सखेसोबती – दामू धोत्रे
शब्दांकन : भानू शिरधनकर
पृष्ठे : ३०६, किंमत : ३०० रू.
प्रकाशन : मॅजेस्टिक प्रकाशन,
आवृत्ती : तिसरी.
- प्रसाद फाटक
No comments:
Post a Comment