त्याचं एका खूप खोल, न संपणाऱ्या खड्ड्यातलं खाली खाली जाणं.. अंधार चोंदत चाललेला... श्वास कोंडत चाललेला ... वर बघावं तर कुणी हात देणारं नाही, हाक देणारं नाही. खरंतर ही परिस्थिती कुणा दुसऱ्याने लादलेली नाही. ही स्वतःनेच ओढवून घेतलेली आहे . एका क्षणाला त्याला जाणवतंय की आपण हे बरोबर केलेलं नाहीये, तरी पुढच्या क्षणाला एक मोहाचं फूल खेचून घेतंय. धुंद करून टाकतं. गर्तेत चुंबकाच्या तीव्रतेने ओढून घेतंय.. इतक्यात अचानक एक कवडसा वरून आत येतो. आधारासाठी कुणीतरी सोडलेली शिडीच जणू. खालच्या मोहमयी कृष्णविवरातच विरघळून जायचं की वरून आलेलं अनाकर्षक पण शाश्वत आमंत्रण स्वीकारायचं हे ठरवण्याचा हा क्षण. ज्याने त्या कवडश्याच्या धाग्याचं महत्व जाणलं त्याला आपली फाटकी झोळी पुन्हा शिवता आली आणि तो पुन्हा चालू लागला आपल्या झोळीतले अमृताचे कण, क्षण दुसऱ्यांसोबत वाटण्यासाठी...
आणि ज्यांनी प्रकाशाची तिरीप आत सोडली होती ते ?
ते तर भरून पावले आहेत, आणखी एक पाऊल आश्वासक पडताना पाहून... आणखी एक श्वास मोकळा होताना पाहून. आपण निमित्तमात्र ठरलो याबद्दल त्यांना समाधान वाटते, पण तिथेच रेंगाळून चालणार नाहीये. आपल्या हातातली पणती घेऊन आणखी त्यांना पुढे जायचंय आणखी काही आयुष्यांतल्या अंधार दूर करायला ...
हे आहे मुक्तांगण. हजारो व्यसनांध माणसांचे आयुष्य रुळावर आणणारी संस्था. आपल्या नानाविध प्रयोगांमधून व्यसनमुक्तीचे काम अधिकाधिक प्रभावीपणे करत जाणाऱ्या या संस्थेचा प्रवास जाणून घेणं म्हणजे जगाच्या चांगुलपणावर आपला विश्वास अधिक दृढ करणं.
भारलेली माणसं, समृद्ध करणारे अनुभव
अनिल अवचट यांनी अंमली पदार्थांच्या विश्वाचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्याचं भीषण वास्तव त्यांना माहित होतं. परंतु अशा मंडळींचं पुनर्वसन करावं असा आधीपासून काही विचार नसतानाही अवचट कुटुंबीय त्या कामात उतरलं. याला कारणीभूत ठरले पु.ल. आणि सुनीताबाई देशपांडे. अनिल अवचट यांचा नशेच्या आहारी माणसांवरचा लेख वाचून ते खूप अस्वस्थ झाले होते. त्यांनी अवचट कुटुंबियांशी बोलताना सांगितलं "आम्ही व्यसनमुक्तीच्या कामासाठी एक लाख रुपयांची योजना केली आहे. तुम्ही हे काम हाती घ्यावं" आणि तिथूनच या सेवायज्ञाची सुरुवात झाली. डॉ. सुनंदा अवचट या येरवडा मनोरुग्णालयात काम करत असताना व्यसनाधीन झाल्याने मानसिक संतुलन ढळलेल्या व्यक्ती त्यांच्या पाहण्यातला होत्याच. रुग्ण, त्यांचे कुटुंबीय यांच्या काऊन्सिलिंगची जबाबदारीही पार पाडली होती. हा अनुभव गाठीशी असल्याने त्यांची मदत झाली. येरवडा मनोरुग्णालयाच्या परिसरात सुरू आलेल्या 'मुक्तांगण'ने आपल्या यथावकाश अधिक मोठी झेप घेतली आणि स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित होऊन अधिक जोमाने कार्य करून दाखवलं. अनिल अवचटांनी या कार्याचा मांडलेला जमा-खर्च म्हणजे हे पुस्तक.
इथे भेटतात व्यसनाधीनतेने कुटुंबियांसह सगळ्या जगाला नकोसे झालेलं परंतु व्यसनातून बाहेर पडून आपल्या पायांवर पुन्हा राहणारे रुग्ण. काय एकेकाची विलक्षण कथा ! एक सराईत गुन्हेगार जो मुक्तांगणमध्ये दाखल होऊन बरा झाल्यावरही तिथेच चोरी करून पळ काढतो आणि नंतर पोलिसांनी पकडून आणल्यावर पुन्हा केंद्रात भरती होऊन अमूलाग्र बदलतो.... एक मोठ्या हुद्द्यावर असणारा माणूस नशेच्या दुष्टचक्रात अडकून अखेर मुक्तांगणमध्ये येऊन सर्वांमधलाच एक होऊन धुणीभांडी करतो, बरा झाल्यावरही मुक्तांगणच्याच कामाला वाहून घेतो. एक व्यसनाधीन पोलीस हवालदार मुक्तांगणमध्ये येऊन बरा होतो आणि स्वतः पुढाकार घेऊन अनेक आपल्या पोलीसमित्रांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढतो, एवढंच नाही तर अनेक ठिकाणी व्यसनांबाबत जनगजागृती करणारी व्याख्यानं देतो. सारंच थक्क करणारं !
इथे भेटतात वयापेक्षा खूप जास्त समंजस असणारी मुलं. एका दारुड्या वडिलांना सोडून आई निघाली तर त्यांच्या लहान मुलाने ठामपणाने सांगितलं की "या क्षणी बाबांना आपली सर्वाधिक गरज आहे, मी त्यांना सोडून येणार नाही" आणि तो स्वतः मुक्तांगणची माहिती मिळवून वडिलांना तिथे सोडतो. एका मुलीने जाहीर कार्यक्रमात सांगितलं "तुमच्या व्यसनावरून सगळं जग दुःस्वास करतं पण सगळ्या काकांनो तुम्ही आम्हाला खरंच हवे आहात". इथे भेटतात नवऱ्याच्या व्यसनापायी उध्वस्त झालेल्या तरीही नवऱ्याच्या भल्यासाठी काहीही करायची तयारी असणाऱ्या भाबड्या बायका. अशी असंख्य बदलती माणसं, असंख्य बदलते नमुने. चिरस्थायी एकच गोष्ट 'मुक्तांगण'कर्त्यांचा मनुष्याच्या चांगुलपणावरचा विश्वास. रुग्णाला फक्त बरं करून थांबून ते थांबले नाहीत. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली, त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी चर्चा करून व्यसनमुक्त व्यक्तीच्या वागणुकीची हमी दिली. बाहेर पडलेल्या सर्वांचा फॉलोअप घेतला. बाहेर गेल्यावर पुन्हा व्यसनाकडे वळणाऱ्यांवर चिकाटीने उपचार करत राहिले. व्यसनी माणूस म्हणजे समाजाचा विश्वास गमावलेला माणूस. त्यांच्या घरच्यांसोबत ‘सहजीवन सभा’ घेतल्या आणि नवरा-बायको मधलं ताणलेलं नातं पुन्हा सैल केलं. ठिकठिकाणी स्वमदत गट स्थापन केले.
सुनंदाताईंचे हृद्य चित्रण हा पुस्तकातला लक्षात राहणारा भाग. फक्त अनिल अवचटच नाही तर मुक्तांगणमधले रुग्ण, त्यांचे नातेवाईक, कर्मचारी यांनाही सुनंदाताईंविषयी वाटणाऱ्या आपुलकी आणि आदराने ओथंबलेले अनेक क्षण पुस्तकभर चांदण्यासारखे पसरलेले आहेत. रुग्णांवर आईची माया करणाऱ्या, कुठे ठाम व्हायचं आणि कुठे आपल्यातला काऊन्सेलर बाजूला ठेवून पेशंटमधलाच एक माणूस व्हायचं हे बरोबर उमगलेल्या सुनंदाताई म्हणजे मुक्तांगणचा आधारवड. त्या अतिशय सकारात्मक होत्या. पुलंचा प्रस्ताव आल्यावर अनिल अवचट सुरुवातीला हे जमेल की नाही याबद्दल साशंक होते. पण सुनंदाताई म्हणाल्या "आपण करू शकतो, आपण काम करता करता रुग्णांकडून शिकू शकतो" आणि खरोखरच हे दोघेही असंच शिकत शिकत व्यसनमुक्तीचं काम पुढे नेत गेले.
सकारात्मक सूर
अनिल अवचटांची शैली मुळातच अत्यंत अकृत्रिम आहे. संवेदनशील विषयांबद्दलची आत्मीय अलिप्तता हा त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या ‘रिपोर्ताज’ स्वरूपाच्या लिखाणाचा स्थायीभाव आहे. समस्येबद्दल सहृदय असणं परंतु त्यात कुठेही वाहवत न जाणं, कढ काढत न बसणं यामुळे त्यांचं लिखाण खूप नेमकं होतं. या पुस्तकात त्यांची भावनिक गुंतवणूक अधिक जाणवते. स्वाभाविकच आहे, कारण मुक्तांगणचा एका बीजापासून ते आधारवड होईपर्यंतचा प्रवास त्यांनी स्वतः खतपाणी घालून केलेला आहे. त्यांनी इथे लिहिलेले अनुभव हेलाऊन टाकणारे आहेत. वाचताना काही ठिकाणी तर भावनांना आवर घालणं कठीण होतं, परंतु ते स्वतः ते दुःख चिवडत न बसता पुढे गेले आहेत. हे लिखाण मुक्तछंदातले आहे. त्याला ना कालानुक्रमाची मर्यादा आहे, ना प्रकरणांच्या विषयवार वर्गवारीची. एक आठवण, मग त्या अनुषंगाने सांगता सांगता आपसूक होणारे विषयांतर, मग त्यातून निघणारी दुसरी आठवण. गप्पा माराव्या तसं अवचट आपल्याशी बोलत जातात. अर्थात पुस्तक वाचताना जाणवते की तशी गरजही नाही. या कार्यामागचा भाव, त्यातले खाचखळगे, त्याचे महत्व हे समोर येणं जास्त गरजेचं आहे आणि ती कामगिरी हे पुस्तक पुरेपूर पार पाडतं.
पुस्तकातून कामात अडथळे आणणाऱ्या हितशत्रूंच्या उद्विग्न करणाऱ्या कहाण्या आपल्याला कळतात पण त्याचबरोबर पहिल्यापासून ठामपणे पाठीशी उभे असणारे, मुक्तांगणसाठी खूप धावपळ करणारे डॉ. आनंद नाडकर्णी, मुक्तांगणची सरकार दरबारीची कामं सुरळीत पार पाडावीत म्हणून सतत मदत करणारे सरकारी अधिकारी यांचे आवर्जून उल्लेख केल्यामुळे पुस्तकाला एक सकारात्मक सूर आहे. रुग्णांच्या सुधारणेच्या असंख्य कथा त्यात उत्तरोत्तर भर घालत जातात.
अखेरच्या छोट्या प्रकरणात अनिल अवचट अलीकडच्या काळातल्या बदलांबद्दल टिप्पणी करताना म्हणतात "मुक्तांगणच्या माध्यमातून लवकरात लवकर व्यसनमुक्ती होऊन या केंद्राची गरज संपावी" अशी अपेक्षा उदघाटन प्रसंगी पुलंनी व्यक्त केली होती, परंतु प्रत्यक्षात मात्र दिवसेंदिवस नवनव्या व्यसनाधीन लोकांची भरच पडत आहे. महिलांसाठी वेगळा विभाग सुरू करावा लागला आहे. पिणे-पाजणे हा शिष्टाचार झाला आहे" पुस्तकाच्या शेवटी असणाऱ्या परिशिष्टामध्ये मुक्तांगणसाठी अनिल अवचट यांनी लिहिलेल्या आणि तिथे नियमिपणे म्हटल्या जाणाऱ्या सुंदर प्रार्थना, कविता, पोवाडे, फटके, दोहे दिले आहेत. पुस्तक वाचून संपल्यानंतरही मुक्तांगणच्या या आमोदगीतांचे सूर आणि सोबतच दारूला मिळणाऱ्या प्रतिष्ठेबाबतची धोक्याची घंटा हे दोन्ही एकाच वेळी ऐकू येत राहतात.
पुस्तक : मुक्तांगणची गोष्ट
लेखक : अनिल अवचट
प्रकाशक : समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या : १७१
किंमत : २०० रू.
आवृत्ती : दुसरी (१७ ऑक्टोबर २०१०)
- प्रसाद फाटक
No comments:
Post a Comment