१८६५ साल. अमेरिकन गृहयुद्ध गेली चार वर्षं चालू आहे. दक्षिणेकडच्या राज्यांनी (ज्यांना कॉन्फेडरेशन स्टेट्स असं संबोधलं जातं, आणि जे गुलामगिरीचे पाठीराखे आहेत) अमेरिकेन संघराज्यातून फुटून निघून उत्तरेकडच्या राज्यांविरुद्ध आरंभलं आहे. हे युद्ध निग्रोंची गुलामगिरी कायम राहावी की नाही मुद्द्यावरच केंद्रित आहे.. युद्धाचा शेवट जवळ आलेला आहे असं वाटतंय, आणि कॉन्फेडरेशन स्टेट्स पराभूत होतील अशी लक्षणं आहेत, पण अजून युद्धाचा शेवट झालेला नाही. तसं पाहता लिंकननी युद्धाच्या धामधुमीत दीड वर्षांपूर्वीच Emancipation Proclamation (म्हणजेच (गुलामांच्या) मुक्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर ते दुसऱ्यांदा निवडणूक अध्यक्षपदी निवडूनही आलेले आहेत, याअर्थी त्यांच्या या भूमिकेला अनेकांचा पाठिंबाही आहे. पण...
पण गुलामांच्या मुक्तीच्या मार्गात अनेक अडथळे आहेत, ज्यांबद्दल लिंकनना काळजी वाटते.
मुक्तीची घोषणा एकप्रकारे अध्यादेशासारखी आहे. ती न्यायालयाकडून रद्द होऊ शकते. त्यामुळे तसा कायदा करणे आवश्यक आहे. त्यासाठी थेट घटनादुरुस्तीच व्हायला हवी. त्यासाठी २/३ संख्याबळ असणे तर आवश्यक आहेच, पण वेळ हाही मोठा फॅक्टर आहे. आज ना उद्या युद्ध संपले की कॉन्फेडरेशन स्टेट्सना पुन्हा संघराज्यात सामावून घेण्याबाबतही लिंकनच्या मनात स्पष्टता आहे. पण ती राज्यं आल्यावर ती हमखास विधेयकाला संसदेत विरोध करणार आणि २/३ बहुमत हे मृगळजळच ठरणार. त्यामुळे आहे संसदेची जी स्थिती आहे त्यातच विधेयक पारित करून घेण्याची घाई करावी लागणार आहे.
संसदेत डेमोक्रॅट्सचे गुलामगिरीला उन्मत्त समर्थन आहे आहेत. तर दुसरीकडे रिपब्लिकन्समध्ये दोन गट आहेत. सगळे रिपब्लिकन्स गुलामगिरीच्या विरोधात भूमिका घेण्याप्रत अजून आलेले नाहीत, विशेषतः दक्षिणेकडच्या राज्यातील रिपब्लिकन्सचा पाठिंबा मिळेल याची आज शाश्वती नाहीये. पण रॅडिकल रिपब्लिकन्स मात्र आज आत्ता ताबडतोब कायदा होऊन गुलामगिरी नष्ट व्हायला हवी या मानसिकतेचे आहेत आणि त्यांचा युद्ध लवकर संपवण्यासाठी कॉन्फेडरेशन स्टेट्सशी वाटाघाटी करण्यास प्रखर विरोध आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचा संस्थापक ब्लेअर याची मदत लिंकनना हवी आहे, पण ब्लेअरची दोन मुले युद्धात लढत असल्याने त्यांचा जीव जाण्याआधी त्याला युद्ध संपवणे आणि त्याच्यासाठी महत्वाचे आहे. त्यासाठी कॉन्फेडरेशन स्टेट्सशी वाटाघाटी करण्याची आवश्यकता आहे, हे तो लिंकनच्या गळी उतवरतो आहे.
वैयक्तिक पातळीवरही लिंकन पेचात आहेत. त्यांचा धाकटा मुलगा स्वतःची वेगळी ओळख शोधू पाहतो आहे, म्हणून त्याला सैन्यात भरती होऊन मानाने मिरवायचं आहे, पण वडील तसे होऊ देत नसल्याने पित्याबद्दल त्याच्या मनात कडवटपणा आला आहे आणि दोघांचे संबंध मधुर राहिलेले नाहीत. त्याउलट लिंकनची बायको "या जीवघेण्या युद्धात मुलाचा मृत्यू होईल" या भीतीने लिंकनना मुलाला सैन्यात भरती कारण्याबाबत कडाक्याचा विरोध करते आहे आणि तो सैन्यात जाणारच हे कळल्यावर तिने "काहीही करून युद्ध लवकर संपुष्टात यायला हवं" अशी लिंकनना जवळपास धमकीच दिली आहे...
एवढ्या सगळ्या पेचप्रसंगातून लिंकननी कुशलतेने मार्ग कसा काढला याचे चित्रण हा चित्रपट करतो. लिंकनचे हळवे मन, गुलामांप्रति असणारी त्यांची सहृदयता याबद्दल कुठेही फार मोठी डायलॉगबाजी चित्रपटात नाही. पण वेळ आल्यानंतर अगदी मोजके संवाद आणि ठाम स्वर यातून लिंकनची हा प्रश्न सोडवण्यासाठी असणारी कटिबद्धता स्पष्टपणे दिसून येते.
संसदेतले काही सदस्य पुन्हा निवडून येऊ न शकल्याने संसदेबाहेर पडणार आहेत (आपल्यासारखं निवडणुकीचे निकाल लागले की की जुने बाहेर आणि नवे आत अशी एकदमच प्रक्रिया होत नाही बहुतेक इकडे. याबद्दल अधिक वाचायला हवं). अशांचा पाठिंबा मिळवणं तसं कठीणच (आपल्या इथे नोटीस पिरियडमध्ये असणाऱ्या नोकरदाराकडून मॅनेजरने हवं ते काम करवून घेण्याइतकंच अवघड काम होतं हे... ). मग अशावेळी लिंकन त्यांच्या भविष्याची काळजी घेण्याचा मार्ग अवलंबतात. हा तसा ग्रे एरिया होता. म्हणजे मतांसाठी लाच देणे, इतका हा थेट भ्रष्टाचार नाही. पण संसदेबाहेर जाणाऱ्यांना (ज्यांना 'लेम डक' अशी संज्ञा वापरतात) भविष्यात नोकरीधंद्याची गरज पडणार, हे ओळखून आपल्या राजवटीत नव्याने निर्माण होऊ घेतलेल्या नोकरीच्या संधी त्यांना मिळू शकतील याबद्दल आश्वस्त करण्याचं लिंकन (अप्रत्यक्षपणे) करतात. पण हे सगळं ते करतात ते 'ग्रेटर गुड'साठीच.. मोठ्या माणसाच्या शुभ्र नसणाऱ्या अशा बाजूचे चित्रीकरण आपल्या इथे कधी होऊ शकेल? चित्रपट पाहताना आणखी एक विचार मनात आला. अमेरिकेत आफ्रिकन्सना निग्रो म्हणणं आता निषिद्ध आहे. पण याचे चित्रीकरण दीडशे वर्ष जुन्या काळाचं असल्याने तेव्हा प्रचलित असलेला 'निग्रो' हा शब्द त्यांनी जसाच्या तसा चित्रपटात वापरला आहे. आपल्या इथे असं त्या काळाशी प्रामाणिक राहणारं काही चित्रित झालं तर ते ज्ञातीसंघटना, त्यांना पाठीशी घालणारे राजकीय पक्ष ते समजून घेतील?
विधेयक संसदेत मांडल्यावर संसदेतली वादळी भाषणं पाहताना थरारून जायला होतं. वाईट आणि चांगल्या, दोन्ही अर्थाने. गुलाम बाळगणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे अशा तोऱ्यात गुलामगिरीचे नि:संकोचपणे समर्थन करणारे सिनेटर, "आज हे केलं तर उद्या तुम्ही निग्रोंना मतदानाचा अधिकारही द्याल!" असं म्हणतात तेव्हा हतबुद्ध व्हायला होतं. दुसरीकडे गुलामगिरीचा प्रखर विरोधक असणारे सिनेटर स्टीव्हन्स असतात. गोरे आणि काळे यांच्यात वांशिक समानताही आहे अशी टोकाची वाटेलशी भूमिका जपलेले स्टीव्हन्स संसदेत बोलायला उभे राहतात तेव्हा मात्र आपल्या भूमिकेमुळे अधिक गोंधळ उडून विधेयकाच्या भवितव्यावर गदा येईल हे जाणून आपली भूमिका मवाळ करत, "काळे आणि गोरे वांशिक समानता नसून ए असं मी मानत नाही, पण त्यांच्यातली कायदेशीर समानतेचा मी पुरस्कर्ता आहे" असं सांगतात, तेव्हा त्यांचं आपल्याला कौतुक वाटतं. अगदी विधेयकावरच्या मतदानाच्या क्षणापर्यंत चलबिचल होणारे सिनेटर्स पाहून आज ऑब्व्हिअसली मानवतावादी वाटणारी भूमिका त्या काळी घेणं किती अवघड होतं हे जाणवतं.
लिंकन आपल्या हजरजबाबी स्वभावाबद्दल प्रसिद्ध होते. चित्रपटातही त्यांचा मिश्किल स्वभाव दाखवणारे प्रसंग खुबीने पेरले आहेत. तणावाच्या वेळी एखादा किस्सा सांगण्याची त्यांची हातोटी त्यांच्या संवादपटुत्वाची चुणूक दाखवून जाते. चित्रपट पाहताना आवश्यक त्या सर्व ठिकाणी लिंकननी संवादाचे दरवाजे मोकळे ठेवल्याचं दिसून येतं. अगदी घटनादुरुस्ती नंतरही कॉन्फेडरेशन स्टेट्सशी लढत राहण्यापेक्षा त्यांना संघराज्यात यायची आणि त्याबद्दल चर्चेची ऑफरही लिंकन देतात आणि तशी चर्चाही करतात. यातून आणि मृत्यूदंडाच्या दयेच्या अर्जावर विचार करण्याच्या प्रसंगातून आणखी कुणाला तरी धडा शिकवावा म्हणून मुडदे पाडण्यात लिंकनना अजिबात रस नसल्याचंही आपल्या मनावर ठसत जातं. लोकशाहीवर असणारी त्यांची निष्ठा लोभसवाणी वाटते. शक्य तितकं सामोपचाराने घेणं, आपले सहकारी उगाच फार फाटे फोडत आहेत असं वाटल्यावर त्यांना एक राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वतःच्या हाती असलेल्या प्रचंड अधिकारांची आठवण करून देणं, या गोष्टींमुळे या लिंकन पात्राचं चित्रपटातलं संतुलन व्यवस्थित राखलं गेलं आहे.
डॅनियल डे-लुईसला मेकप कमाल भारी केलाय. खुद्द लिंकनच पडद्यावर अवतरलेत असं वाटतं. फक्त या भूमिकेसाठी दमदार आवाजाच्या अपेक्षेत मी होतो आणि प्रत्यक्षात त्याचा एकदम पातळ आवाज ऐकून नाही म्हटलं तरी निराशा झाली. पण त्याने काम मात्र छानच केलं आहे. वि. ग. कानिटकर यांनी 'फाळणी टाळणारा महापुरुष' असे ज्यांचे वर्णन केले आहे त्या लिंकन यांच्या शेवटच्या काळावरचा हा चित्रपट नक्की पहा (आणि हो, चित्रपट सुरु करण्याआधी गृहपाठ जरूर करा, नाहीतर अनेक गोष्टींचे संदर्भ लागणं कठीण जातं!)
टीप : चित्रपट 'सोनी लिव्ह'वर उपलब्ध आहे.
(छायाचित्र सौजन्य : https://wallpapercave.com)