'The grass is always greener on the other
side of the fence' असा इंग्रजीमध्ये वाक्प्रचार आहे. लोकांना दुसऱ्याचं आयुष्य आपल्यापेक्षा सुखाचं आणि सोपं आहे असं नेहमी वाटत असतं. स्वतःसमोर छोट्याछोट्या समस्या असल्या तरी 'नेमकं आपल्याच वाट्याला हे का आलं' याबद्दल उसासे टाकले जात असतात. पण यातल्या असंख्य लोकांना खरंतर टोकाचं दुःख, वेदना कधीही अनुभवाला आलेलं नसतं. पण आपल्या नजरेपलीकडेही पराकोटीचं यातनामय जग आहे याची कल्पनाच नसल्याने आपल्या अडचणींचा राईचा पर्वत केला जात असतो. कधीतरी या जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर प्रकाश पडतो आणि त्यांच्या दर्शनाने आपल्याला आपली दु:खं, अडचणी य:कश्चित वाटू लागतात. A River In Darkness हे पुस्तक उत्तर
कोरियन हुकूमशाहीच्या वरवंट्याखाली सापडलेल्या अशा भयप्रद जीवनावर प्रकाश टाकतं आणि विलक्षण अस्वस्थ करून जातं.
जपानमधला कठीण काळ
पुस्तकाचा लेखक मसाजी इशिकावाचे वडील मूळचे कोरियन. जपानी शासनाने मजूर म्हणून अनेक कोरियन लोकांना जबरदस्तीने जपानमध्ये आणलं त्यांपैकीच तेही एक होते.
आधीच कुटुंबाचं आयुष्य कष्टप्रद. त्यात वडिलांचं दारू पिऊन बायकोला मारझोड करणं, कुटुंबाच्या स्थैर्यासाठी कोणतेही प्रयत्न न करणं, गुंडगिरी आणि काळाबाजार यांमध्ये गुंतणं यामुळे कुटुंबाची परिस्थिती बिकट होत गेली. मसाजीची आई चांगली पत असणाऱ्या जपानी कुटुंबातून आलेली. पण आश्चर्य म्हणजे मसाजीच्या वडिलांसारख्या सर्वार्थाने विसंगत असणाऱ्या बेजबाबदार माणसाशी तिचं सूत जमलं. पण तिचा हा निर्णय तिला आयुष्यभर भोगावा लागला. एके दिवशी वडिलांच्या मारहाणीचा एवढा अतिरेक झाला की आई कसाबसा जीव वाचवून पळाली. लहानपणापासून हे सगळं बघत असणाऱ्या मसाजीच्या मनात वडिलांविषयी घृणा निर्माण झाली नसती तरच नवल.
पण
पुढे अचानक नवल घडलं. आई घरी परतली. एकेकाळचे कर्दनकाळ वडील आईला हात लावेनासे झाले. अचानक एके दिवशी वडिलांनी "आपल्याला उत्तर कोरियामध्ये परत जायचं आहे" असं सांगून मसाजीच्या आईचंही मन वळवायला सुरुवात केली. वडील वगळता सर्वजण जन्माने जपानीच होते. जपानमधलं आयुष्य कितीही कष्टाचं असलं तरी जपान हेच त्यांचं सर्वस्व होतं. सुरुवातीच्या अनिच्छेनंतर मसाजीची आईसुद्धा उत्तर कोरियात जायला तयार झाली आणि मग कुटुंबातल्या लहानग्यांच्या इच्छेला काही किंमत उरली नाही. हजारोंच्या संख्येने जपानमधले कोरियन एक नवी उमेद घेऊन उत्तर कोरियाकडे निघाले होते. 'किम इल संग' हा नव्याने जन्माला आलेल्या उत्तर कोरियाचा राष्ट्रप्रमुख त्यांना 'पृथ्वीवरच्या स्वर्गा'च्या उभारणीसाठी भावनिक साद घालत होता. उत्तर कोरियाची राजवट साम्यवादी होती. जपानमधल्या कोरियन लोकांची कामगार संघटना पूर्वीपासून कोरियातल्या साम्यवादी नेत्यांशी जोडलेली होती. याच संघटनेच्या लोकांनी जपानमध्ये राहणाऱ्या कोरियन लोकांना गुलाबी स्वप्नं दाखवून उत्तर कोरियात जाण्यासाठी राजी करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मसाजीचे वडील या संघटनेचे सदस्य पूर्वीपासून होतेच, त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांना राजी करायला फार कष्ट पडले नाहीत.
आगीतून फुफाट्यात
साम्यवादाची
कागदावरची
तत्त्वं कुणालाही भुरळ पाडतील अशीच असली तरी त्यांची अंमलबजावणी होताना जगभर हुकूमशहा कसे प्रस्थापित झाले हे आता सर्वज्ञात आहे. जपानमधलं आयुष्य चैनीचं वाटावं इतकी भयावह परिस्थिती उत्तर कोरियामध्ये होती. तिथे पाय ठेवल्यापासूनच मसाजीच्या कुटुंबाच्या इच्छा-आकांक्षांचा चुराडा व्हायला सुरुवात झाली. राष्ट्रप्रमुख किम इल-संग प्रचंड निष्ठुर असल्याचं दिसू लागलं. साम्यवादी तत्वं माणसाच्या जीवापेक्षा महत्वाच्या ठरू लागली. प्रत्येक गावाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत गुप्तपोलिसांचा पहारा सुरु झाला. सरकारने आखून दिलेल्या मार्गावरून
थोडंही ढळलं तरी जीव गमवावे लागू लागले. त्याचवेळी समाजजीवनाच्या प्रत्येक अंगातून किम इल-संग ओसंडून वाहात राहिल अशी योजना झाली. अभ्यासक्रमातल्या प्रत्येक धड्यातून, त्याचा पक्ष असणाऱ्या 'वर्कर्स पार्टी'च्या प्रत्येक बैठक आणि सभेतून, प्रत्येक सरकारी योजनेमधून तो जणू देवदूतच आहे असं भासवायला सुरुवात झाली. शेतीसह सर्व महत्वाच्या उद्योगांचं सरकारीकरण झालं. प्रत्येकाची नोकरी सरकारी देखरेखीखाली होऊ लागली. राबराब राबूनही तुटपुंजे पैसे मिळत राहिले. 'संपत्तीचे समान वाटप' या कम्युनिस्टांच्या लाडक्या योजनेची परिणती 'सर्वजण समान गरीब' या वास्तवात झाली.
वातावरण,
जमिनीचा पोत यांपैकी कशाचाही अभ्यास न करता देशभर सर्वत्र भात पिकवण्याची फर्मानं निघाली. ही अत्यंत अशास्त्रीय शेती 'अत्याधुनिक उत्तर कोरियन शेती' आहे असं सांगितलं जाऊ लागलं. वर्षानुवर्षं लोटली तरी कृषिउत्पादन वाढले नाही. खाऊनपिऊन सुखी राहणं दूरच, एकवेळ पोट भरेल एवढंही अन्न रेशनवर कुणाला मिळालं नाही. नव्वदच्या दशकात या सगळ्याचा कडेलोट झाला. रस्तोरस्ती माणसं मरून पडू लागली. उत्तर कोरियातली भीषण टंचाई संपूर्ण जगात चर्चिली गेली. पन्नासच्या दशकात दाखवल्या गेलेल्या एका उज्ज्वल स्वप्नाची राखरांगोळी झाली होती. मिळतील ती कंदमुळं आणि बिया खाल्ल्याने अन्नान्नदशा झालेल्या मसाजीला कळून चुकलं होतं की आत्ता उत्तर कोरियातून पळालो नाही तर नाहीतर मरण अटळ आहे. आपण देशाबाहेर पळून जायचं आणि जपानमधून काहीतरी करून प्रयत्न करून आपल्या बायकामुलांनाही सोडवायचं अशी आशा उराशी बाळगून त्याने एका अंधाऱ्या रात्री रोरावत वाहणाऱ्या ‘यालू’ नदीमध्ये स्वतःला झोकून दिलं. एक अगतिक साहस करून तो बाहेर निसटला खरा पण पुढे तो त्याच्या कुटुंबाला सोडवू शकला का, हे जाणण्यासाठी पुस्तकच वाचायला हवं.
चटका लावणारे
अनुभव
उण्यापुऱ्या
दीडशे पानांचं हे पुस्तक अक्षरशः हादरवून सोडतं. आपल्या कचकड्याच्या दुःखांचंही आपण भांडवल करतो ते किती व्यर्थ आहे याची पुस्तकाच्या पानापानावरचे सुकलेले अश्रू बघताना बोचरी जाणीव होत राहते. असं म्हणतात की एका दुःखी माणसालाच दुसऱ्या दुःखी माणसाचं दुःख कळतं. पण मसाजीने लिहिलेले आपले विदारक अनुभव या गृहितकाला तडा देतात. खरंतर संपूर्ण उत्तर कोरियात मूठभर उच्चपदस्थ आणि त्यांची हुजरेगिरी करून आपलं उखळ पांढरं करून घेणारे मोजके लोक वगळता सगळ्यांची परिस्थिती सारखीच हलाखीची होती. पण समदुःखी लोकांसोबत आपलं दुःख वाटून आपले कष्ट सुसह्य करण्याची वृत्ती कुणीही दाखवली नाही. उत्तर कोरियात नवख्या असणाऱ्या कुटुंबाला ना कुणी धीर द्यायला पुढे आलं ना मदत करायला. सगळी वाताहत होत असताना, माणसं माणसाला पारखी होत असताना मसाजीच्या कुटुंबात मात्र शेवटपर्यंत टिकून राहिलेल्या बंधांबद्दल त्याने अतिशय ओलाव्याने लिहिलं आहे. जपानमध्ये असल्यापासून उत्तर कोरियामध्ये खंगून मरेपर्यंत मुलांसाठी अपरिमित हाल सोसणाऱ्या आईचं मसाजीशी असणारं नातं आणि पूर्वीच्या पशुत्वाकडून हळूहळू मवाळ होत गेलेल्या पश्चात्तापदग्ध वडिलांचं मसाजीसोबत उत्तरोत्तर बदलत गेलेलं नातं अशी वेगवेगळ्या आलेखांवरची नाती हृद्यपणे रेखाटली आहेत..
वैयक्तिक
अनुभवांबरोबरच
हालअपेष्टांना
कारणीभूत
असणारी उत्तर कोरियन नेतृत्वशैली आणि त्यांनी राबवलेल्या अव्यावहारिक योजना व त्यांचे परिणाम यांबद्दल डोळस निरीक्षणं मांडली आहेत. मसाजी केवळ उत्तर कोरियन नेतृत्वाचं पशुत्व दाखवून थांबत नाही. स्वतः जन्माने जपानी असूनही तो असंवेदशील जपानच्या पापाचं माप जपानच्या झोळीत टाकतो. एकेकाळी कोरियावर राज्य करणाऱ्या, तिथून कोरियन लोकांना बळजबरीने मजुरीसाठी आणूनही सापत्नभावाने वागणाऱ्या आणि कालांतराने त्यांचा असंतोष वाढत जात असल्याची जाणीव झाल्याने 'ही ब्याद परत कोरियात गेलेली बरी' या भावनेने घाईघाईने त्या सर्व कोरियन लोकांना नव्याने उभ्या राहणाऱ्या उत्तर कोरियामध्ये धाडून देण्यासाठी त्या देशाच्या नेतृत्वाशी सोयीची हातमिळवणी करणाऱ्या जपानच्या स्वार्थी वृत्तीवर मसाजी परखड भाष्य करतो. या सर्व गोष्टींमुळे हे पुस्तक म्हणजे केवळ दुःखांचा पाढा नसून हे एक प्रगल्भ अनुभवकथन आहे याची जाणीव होते.
जागतिक
साहित्यामध्ये
साहसकथा/पलायनकथा स्वतःचं छोटंसं स्थान राखून आहेत. पण या पुस्तकातलं पलायन त्या कथांच्या साच्यात मोडत नाही. यातलं पलायन हा एका विदीर्ण चित्राचा अगदी छोटा भाग आहे. एका मोठ्ठ्या बंदिशाळेचं हे हेलावून टाकणारं शब्दचित्र, नकळतपणे आपलाही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लावतं, आयुष्यालाच गृहित धरण्याच्या सवयीकडे पुन्हा एकदा वळून बघायला लावतं.
टीप : २९ मे २०२१ रोजी 'साप्ताहिक सकाळ'मध्ये प्रकाशित झालेल्या संपादित लेखाचे हे मूळ विस्तृत रूप आहे.
साप्ताहिक सकाळमधला संपादित लेख इथे वाचता येईल :
http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-%C2%A0prasad-phatak-marathi-article-5460
No comments:
Post a Comment