Total Pageviews

Saturday, June 12, 2021

डिव्हाईन जस्टिस : एका कार्यकर्त्याच्या जडणघडणीचा प्रवास



शिक्षण, नोकरी, लग्न, निवृत्ती हे सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यातले ढोबळ टप्पे असतात. काही जणांना मात्र चाकोरीबाहेर पडून वेगळ्या वाटेने जाण्याची प्रेरणा मिळते आणि वाटेत कितीही अडचणी आल्या तरीही त्यांचा प्रवास ते थांबवत नाहीत. अशाच वेगळ्या वाटेने जाणाऱ्या उमाकांत मिटकर या मुशाफिराचे आत्मकथन 'डिव्हाईन जस्टिस' वाचकाला आपल्या जवळ असूनही आपले लक्ष जाणाऱ्या भवतालाची ओळख करून देते.

उमाकांत मूळचे मराठवाड्यातल्या एका शिक्षकाच्या कुटुंबातले कुटुंबातले आणि त्याला अनुसरूनच त्यांचे बालपण होते. महाविद्यालयात मात्र संभाजी ब्रिगेडशी संबंध आला आणि ब्राह्मणद्वेष, हिंदुधर्मद्वेष मनामध्ये भरला जाऊन घरातले देवसुद्धा काढण्यापर्यंत मजल गेली. सुदैवाने काही काळाने महाविद्यालयातच एन. सी. सी. शी संबंध आल्यामुळे ब्रिगेडचा विखार मागे सरून राष्ट्रीय विचार अंकुरित व्हायला मदत झाली. परंतु आईचा विरोध असल्याने सैन्यात जाण्याचा विचार सोडून द्यावा लागला. पदवीधर झाल्यानंतर काही कारणाने एम. . पूर्ण झाले नाही. पुढे काय करावे हे निश्चित नव्हते, अशा परिस्थितीत एक चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे संघविचारांच्या कार्यकर्त्यांचा परिचय झाला. त्यातूनच हळूहळू ब्रिगेडी विचारांना कायमची तिलांजली मिळायला मदत झाली.

यमगरवाडीच्या भटके विमुक्त प्रकल्पाच्या एकलव्य विद्यालयात शिकवणारे अनिल घुगे उमाकांत यांच्या भावाच्या भेटीसाठी घरी येत असत. संघ स्वयंसेवकाच्या सहज स्वभावाला अनुसरून अनिल घुगे उमाकांत यांच्याशी सहज संपर्क ठेवत राहिले, विचारपूस करत राहिले आणि परिचयाचे रूपांतर आपोआप मैत्रीमध्ये झाले. त्यांच्यासोबत आणखीही कार्यकर्त्यांचा घरी राबता सुरु झाला, चर्चा झडू लागल्या. यमगरवाडी प्रकल्पाबद्दल माहिती मिळू लागली.  उमाकांत यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचे कुतूहलही वाढू लागले. एके दिवशी अनिल घुगे यांनी "यमगरवाडीतल्या आठवी ते दहावीच्या वर्गांवर शिक्षकाची आवश्यकता आहे.” असे सांगितले. 'सध्या सरकारी मान्यता मिळालेल्या या इयत्तांना कालांतराने मान्यता मिळेल आणि शिक्षकाची जागा नियमित होऊन नोकरीचा प्रश्न सुटेल' अशी उमाकांत यांची माफक अपेक्षा  होती, परंतु  जेव्हा अधिक तपशील कळले तेव्हा मात्र ही नोकरी सध्या बिनपगारी नोकरी असल्याचे कळले. असे असूनही हा वेगळा अनुभव घेऊन बघावा असे उमाकांतना वाटले हे विशेष. इथूनच त्यांच्या आयुष्यातले एक नवे पर्व सुरु झाले.

यमगरवाडीमध्ये भटक्या विमुक्त मुलांच्या सवयी, आहार आणि एकूणच जगणे जेव्हा दृष्टीस पडले तेव्हा उमाकांत हादरून गेले. आपण त्यांच्या आयुष्याबद्दल किती अनभिज्ञ आहोत याची जाणीव झाली. उमाकांत कामात गुंतत गेले तसतश्या भटके विमुक्तांच्या समस्या त्यांच्या ध्यानात येऊ लागल्या. उदरनिर्वाहाच्या अडचणी, स्वतःचे घर नसणे, कुठलीही कागदपत्रे नसणे, व्यसनाधीनता, शिक्षणाचा अभाव, पोलिसी अत्याचार अशी समस्यांची संपणारी यादी होती. यावर उत्तर शोधायचं तर काठावरून पाहता प्रवाहात उडी मारायला हवी होती. याच विचारातून यमगरवाडी प्रकल्पातून काही कार्यकर्ते 'पालावरची शाळा' ही संकल्पना घेऊन निघाले. इमारत, गणवेश, वह्या-पुस्तके यातले काहीच नसणारी ही शाळा असणार होती. एकेकाला एकेका समाजाच्या पालांवर जाऊन त्यांच्यात मिसळून काम करायचे होते.

उमाकांत उमरग्याजवळच्या मसणजोगी समाजाच्या पालावर पोहोचले. प्रचंड घाण, डुकरांचा मुक्त वावर, भीक मागून पोटापुरते अन्न मिळवून गुजराण करणारे लोक असे प्रगतीच्या कुठल्याही पाऊलखुणा नसणारे त्या वस्तीचे स्वरूप होते. अशा ठिकाणी तिथल्या एका व्यक्तीची ओळख काढून गेले तरीही संपूर्ण वस्तीशी संपर्क कसा करावा, संबंध वाढवावेत कसे हा प्रश्नच होता. वस्तीतल्या पत्र्याच्या शेडमधला उकिरडा साफ करून तिथेच मुक्काम ठोकला. लोक व्यवस्थित बोलायचे पण कार्य उभे करण्याच्या दृष्टीने प्रतिसाद शून्यविचित्र अवघडलेपण आलेवाट दिसेना खिशात पैसे नसल्याने जेवणही दुरापास्त होते. तशात दिवाळी आली. पण पालावर दिवाळी वगैरे काहीच नसायचे. मन घरच्यांच्या आठवणीने व्याकुळ होते. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. उमाकांतबद्दल आपुलकी असणाऱ्या वस्तीवरच्या एकाने भीक मागून आणलेल्या भाकरीचे तुकडे आणि घरात बनवलेले डुकराचे मटण आणून दिले. आता समोर दुसरा काहीही पर्याय नव्हता. माळकरी कुटुंबातल्या उमाकांतनी त्या दिवशी थेट डुक्कर खाल्ले. खाताना ब्रह्मांड आठवले खरे, पण भूक शांत झाली. त्या दिवशीपासून मात्र संपूर्ण वस्तीचा त्यांच्याकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला. उमाकांत आणि मसणजोगी यांच्यातली अदृश्य भिंत ढासळू लागली. त्यानंतर उमाकांत यांनी अनेक बदलांची सुरुवात करून दिली. मुलांसाठी शाखा लावून संस्कार रुजवायला सुरुवात केली. स्वच्छतेचे महत्व रुजवले. जन्मदाखला, रहिवास प्रमाणपत्र अशी कागदपत्रे मिळवून द्यायला सुरुवात केली. वीज, बोअरवेल यांची सोय होण्यासाठी खटपट केली. पावसाळ्यानंतर रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या पालांसोबत उमाकांतसुद्धा जात राहिले आणि पालावरच्या शाळेचे कार्य वृद्धिंगत केले.

 

संघ परिवारातल्या संस्थेचा अनुभव घेतल्यानंतर उमाकांत यांच्याकडे संघाचा प्रचारक म्हणूनही जबाबदारी सोपवली गेली. या सगळ्यांमधून त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला पैलू पडत गेले. समाजाचे आकलन अधिकाधिक विस्तारत गेले. संघकामावरची निष्ठा अधिक दृढ झाली. दरम्यानच्या काळात पुण्याच्या स्पायसर कॉलेजमधून बी. एड. केल्यानंतर तिथेच चालून आलेली उत्तम पगाराची नोकरी सोडतानाही मनाची चलबिचल झाली नाही.  त्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा एकदा यमगरवाडीमधलीच शिक्षण समन्वयाची जबाबदारी आली. त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम प्रयोग करता आले. समाजातल्या मोठ्या वर्गामध्ये यमगरवाडी, संघ यांच्याबद्दल आपुलकी आणि अनुकूलता निर्माण झाली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग यमगरवाडीची सर्व माहिती अद्ययावत करण्यासाठी उपयोग झाला. उमाकांत यांच्या कामाचा आवाका वाढत वाढत एके दिवशी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या पोलिस न्याय प्राधिकरणाचा सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली!

 

उमाकांत मिटकर यांचा भटक्यांच्या बकाल पालापासून मुंबईच्या चकाचक कार्यालयात रुजू होईपर्यंतचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. सोपवलेली जबाबदारी कुठलीही असली तरी ती मनापासून पार पाडणे, कामामधली कल्पकता, संघावरची निष्ठा हे उमाकांत यांचे गुण पुस्तकामधून जसे जाणवतात, तसेच त्यांना योग्य वेळी आधार देणाऱ्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणाऱ्या संघकार्यकर्त्यांची वैशिष्ट्येही दिसून येतात. कुठलीही विशेष पार्श्वभूमी नसतानाही उत्तम कार्यकर्ता घडण्यासाठी 'आहे तसा मिळवा आणि हवा तसा घडवा' हा संघमंत्र कारणीभूत ठरला. मनोबल टिकून ठेवण्यासाठी, मनातल्या शंका दूर होण्यासाठी उमाकांत यांच्याशी यमगरवाडीतले अनिल घुगे, गिरीश प्रभुणे आणि इतर अनुभवी कार्यकर्ते आवर्जून चर्चा, संवाद करत राहिले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सहवासातून आणि त्यांच्या वागण्याबोलण्याच्या निरीक्षणातूनही संघसंस्कार नकळतपणे कसे रुजत जातात हे उमाकांत यांनी आवर्जून नमूद केले आहे.

 

पुस्तकातले काही प्रसंग विशेष उल्लेखनीय आहेत. धर्माबाद तालुका प्रचारक म्हणून काम करत असताना उमाकांत यांनी अन्य संघ यंत्रणेच्या सहकार्याने तिथल्या दलितांना मंदिर प्रवेश मिळवून देण्याच्या घटनेबद्दल पुस्तकातच तपशीलाने वाचायला हवे.  कुठलाही भडकपणा करता काढता सर्वांना विश्वासात घेऊन सामोपचाराने एका गंभीर सामाजिक समस्येची उकल करून समरसता कशी साधली जाऊ शकते केली याचे हे उत्तम उदाहरण आहे.  शुद्ध सात्विक प्रेमामधून किती शाश्वत कार्य उभं राहू शकतं याची प्रचिती देणारे उमाकांत याचे अनेक अनुभव हृद्य आहेत. ॲट्रॉसिटीच्या खोट्या खटल्यात अडकवले गेले असताना छळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याशी काही वर्षांनी अगदी वेगळ्या परिस्थितीत झालेली भेट हा प्रसंग तर चित्रपटात शोभावा असा आहे. उण्यापुऱ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात उमाकांत यांनी घेतलेल्या अनुभवांचा पट खूपच विस्तृत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे अनुभव शब्दबद्ध करण्याची वाट पाहता कमी वयातच आपले अनुभव शब्दबद्ध करण्याचा त्यांचा निर्णय योग्य आहे. त्यातून तरुण वयातल्या व्यक्तींना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. पत्रकार दत्ता जोशी यांनी उमाकांत मिटकर यांच्या अनुभवांचे शब्दांकन संपादन नेमकेपणाने केल्यामुळे एक नेटके स्फूर्तिदायी पुस्तक वाचल्याचा अनुभव वाचकांना निश्चितपणे येईल.

 

               

डिव्हाईन जस्टिस

लेखक : दत्ता जोशी

प्रकाशक : कॅटालिस्ट

पृष्ठसंख्या : २२४

किंमत : ३०० रु.

पुस्तकासाठी संपर्क : मनोजकुमार जाधव - ९४२३७ ०३४३४

(या पुस्तकाच्या विक्रीतून आलेली रक्कम वात्सल्य सामाजिक संस्थेस निधी म्हणून समर्पित केली जाईल)


पूर्वप्रसिद्धी : 'मुंबई तरुण भारत', २९ मे २०२१ 
https://www.mahamtb.com//Encyc/2021/5/29/Book-Review-of-Divine-Justice.html


No comments:

Post a Comment