Total Pageviews

Sunday, January 30, 2022

नाते रक्ताचे, रक्तापलीकडले ....

छायाचित्र सौजन्य : bhavisa.org



तीन तरुणांच्या शरीरामधून निघणारे रक्त एका बाटलीमध्ये जमा होऊन ते लगेच दुसऱ्या बाजूने त्यांच्या वृद्ध आईच्या शरीरात जात आहे, हा 'अमर अकबर अँथनी' चित्रपटामधला अत्यंत गाजलेला प्रसंग. अलीकडच्या काळात तो चेष्टेचा विषय ठरला असला तरीही, हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा तो पडद्यावर बघताना प्रेक्षकांच्या भावनांना हात घालणारा ठरला होता. तांत्रिक चुका बाजूला सारून त्याकडे पाहिले तर रक्तदानामुळे एका व्यक्तीचा जीव तर वाचतोच, पण त्याचबरोबर नातेही जोडले जाते, हे त्या प्रसंगामध्ये प्रभावीपणे अधोरेखित केले गेले होते. आज रक्तदानाशी संबंधित तंत्रज्ञानाने खूप मोठा पल्ला गाठला आहे, रक्तदानाबद्दल समाजामध्ये मोठी जागरूकता घडून आली आहे. पण रक्तदानाच्या माध्यमातून रक्तदाता आणि गरजू या दोघांचे नाते जोडणाऱ्या रक्तपेढीचे महत्व मात्र आजही समाजापर्यंत म्हणावे तितके पोहोचलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये महेंद्र वाघ यांच्या ‘ऋणानुबंध रक्ताचे’ या पुस्तकाने ‘रक्तदान’ या विषयाचे असंख्य पैलू लोकांसमोर आणण्याचे महत्वाचे काम केले आहे. 

रक्तदात्याने रक्तदान केल्यापासून रुग्णाला रक्त चढवले जाईपर्यंतची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि जोखमीची असते. रक्तदान – रक्तसाठवण – रक्तजुळवणी – रक्तसंक्रमण अशी ही मोठी साखळी असते. एखाद्या टप्प्यात झालेली थोडीशी हलगर्जीही रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. ही जबाबदारी कशी पार पाडली जाते, याची शास्त्रीय माहिती या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला “रक्ताची गरज आहे” असे म्हटले जाते तेव्हा प्रत्यक्षात त्या व्यक्तीला रक्तामधल्या लाल रक्तपेशी, रक्तबिंबिका (प्लेटलेट्स), रक्तरस (प्लाझ्मा) आणि क्रायो प्रेसिपिटेट यापैकी एखाद्या घटकाची गरज असते. या घटकांचे महत्व, रक्तगटांचे प्रकार, रक्तपेढीमध्ये वापरली जाणारी आधुनिक उपकरणे यांची माहिती महेंद्र वाघ यांनी सर्वसामान्य वाचकांना कळेल अशा सोप्या शब्दांमध्ये उलगडून सांगितली आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेतून १९८३ साली पुण्यामध्ये ‘जनकल्याण रक्तपेढी’ची स्थापना झाली. डॉ. शरद जोशी, वैद्य दादा खडीवाले, डॉ. दिलीप वाणी आप्पासाहेब वज्रम, डॉ. अविनाश वाचासुंदर हे सर्वजण काया-वाचा-मनाने रक्तपेढीचे कार्य वृद्धिंगत केले. सामाजिक भान आणि व्यावसायिक शिस्त यांचा उत्तम मिलाफ साधत रक्तपेढीने रुजवलेल्या कार्यसंस्कृतीची पुस्तकाच्या पानापानामधून प्रचिती येते. प्रशिक्षण, प्रबोधन, समुपदेशन या आघाड्यांवर जनकल्याण रक्तपेढीचे कार्य अतिशय काटेकोर नियोजनबद्ध आहे. 

रक्तसाठवणुकीसाठी, पृथक्करणासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे हे तर रक्तपेढीचे प्राथमिक कर्तव्य असतेच. पण त्याच बरोबर वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असूनही रक्तपेढीच्या कार्याची पुरेशी कल्पना नसणाऱ्यांना प्रशिक्षण देणे, स्वेच्छा रक्तदानाचे महत्वच माहित नसणाऱ्या समाजासाठी विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन करणे, रक्तदाते आणि रक्ताची गरज असणारे रुग्ण व त्यांचे आप्त यांचे समुपदेशन करणे असे व्यापक कार्य रक्तपेढी करत असते. यातूनच कुठल्याही रक्तदान शिबिराशिवाय रक्तपेढीमध्ये येऊन नियमितपणे रक्तदान करणारे रक्तपेढीला मिळाले आहेत. त्यामुळे आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये रक्ताच्या अनुपलब्धतेचा सामना करण्याची वेळ येत नाही. 

आपल्या बहुपेडी कामामधून जनकल्याण रक्तपेढीने जी परिसंस्था उभी केली, तिचे लोभसवाणे दर्शन महेंद्र वाघ यांनी घडवले आहे. चौफेर नजर ठेवून असणाऱ्या रक्तपेढी संचालकांपासून रक्तपेढीमध्ये स्वच्छतेचे, स्वयंपाकाचे करणाऱ्या प्रेमळ मावशींपर्यंत आणि स्वागत कक्षामध्ये आल्यागेल्याला कुशलतेने हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून  ते रुग्णालयांमध्ये रक्तपिशव्या तत्परतेने नेऊन पोचवण्याचे काम करणाऱ्या कुशल ‘रक्तदूतां’पर्यंत सर्वांची इथे जिव्हाळ्याने दखल घेतली आहे. यातील प्रत्येकाचे काम प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एखाद्याच्या अस्तित्वाची जोडले गेलेले असते, याची सतत जागी असणारी जाणीव हा ‘जनकल्याण रक्तपेढी’ या परिसंस्थेचा संस्कार आहे. 

गरजूंना व्यावसायिक रुपात रक्त विकले जाण्याचा काळ जाऊन ‘विनामोबदला रक्तदान’ ही संकल्पना समाजात रुजली आहे. ‘रक्तदान ही स्वेच्छेने आणि निरपेक्ष भावनेने करण्याची गोष्ट आहे’, हा संस्कार समाजामध्ये रुजवण्यामध्ये जनकल्याण रक्तपेढीचाही मोठा वाटा आहे. आज आर्थिक फायद्यासाठी रक्त विकण्यावर बंदी आलेली आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या साखळीमुळे असंख्य गरजूंचे प्राण वाचले आहेत. 

व्यावसायिक गणिताच्या पुढे जाऊन एक व्रत म्हणून कार्य करण्याचा उद्देश असल्याने जनकल्याण रक्तपेढी वेगळी ठरते. रक्तपेढीची कार्यसंस्कृती, पारदर्शकता पाहून तिथल्या कार्याशी स्वतःला जोडून घेणारी माणसे ही रक्तपेढीची खरी कमाई आहे. निवृत्तीनंतर कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तिथे येऊन काम करणारे मराठेकाका, कुलकर्णीकाका, खाडेकरकाका यांच्या कार्यमग्नेतेचे एकीकडे  आपल्याला प्रेरणा देते; तर दुसरीकडे शारीरिक कमरता असूनही आपल्या मर्यादेत शंभर टक्के समर्पणवृत्तीने काम करणाऱ्या राजेशची कहाणी आपल्याला चटका लावून जाते. 

‘ऋणानुबंध रक्ताचे’ या पुस्तकाचा मोठा भाग जनकल्याण रक्तपेढीच्या कार्याने व्यापलेला असला असला, तरीही हे केवळ त्या रक्तपेढीची गौरवगाथा सांगणारे पुस्तक नाही. सतत धावपळीच्या क्षेत्रात कार्यरत राहूनही जगाकडे डोळसपणे पाहणाऱ्या कार्यकर्त्या लेखकाने केलेल्या या नोंदी आहेत. त्यांना चिंतनाची जोड आहे. रक्तदानाच्या विश्वामधली भावनिक स्पंदने त्यामध्ये अतिशय संवेदनशीलतेने टिपलेली आहेत. चांगल्या कामासाठी निरपेक्ष भावनेने समाजाबद्दल त्यामध्ये जशी कृतज्ञता दर्शवली आहे, तशी रक्तदान चळवळीमध्ये शिरलेल्या कुप्रथा आणि स्वार्थी वृत्ती यांच्याबद्दल वाचकांना सावधही केले आहे. 

रक्तपेढीतल्या विज्ञान-तंत्रज्ञानापासून रक्तपेढी क्षेत्रातल्या रोजगार संधींपर्यंत, रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेपासून रक्तपेढीच्या कार्याशी जोडल्या गेलेल्या करणाऱ्या कवी, लेखक, कलाकारांच्या संवेदनशीलतेपर्यंत अनेक गोष्टींची पुस्तकामध्ये आवर्जून दाखल घेतली आहे. रक्तदान जागृतीसाठी लिहिलेले गीत आणि जनकल्याण रक्तपेढीला पुलंनी दिलेल्या काल्पनिक भेटीमधले त्यांचे (अर्थातच काल्पनिक) खुसखुशीत भाषण, हे दोन्ही खास जमून आले आहे. सागर नेने यांच्या अत्यंत अर्थपूर्ण मुखपृष्ठामुळे पुस्तकाच्या श्रीमंतीमध्ये भर पडली आहे. अनेक हृद्य अनुभवांची पखरण, निवेदनाच्या ओघामध्ये सहजतेने येणाऱ्या काव्यपंक्ती, संपूर्ण निवेदनामध्ये असलेला भावनिक ओलावा यामुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे.


ऋणानुबंध रक्ताचे

लेखक : महेंद्र वाघ

प्रकाशक : भारतीय विचार साधना

पृष्ठसंख्या : २६३

किमत : २५०


***

ब्लॉगवर टाकलेला हा लेख या पुस्तकावर लिहिलेला मूळचा संपूर्ण लेख आहे. हा लेख 'सामना'च्या उत्सव पुरवणीमध्ये ३० जानेवारी २०२२ रोजी संक्षिप्त स्वरुपात प्रसिद्ध झाला.

लेखाची लिंक : https://www.saamana.com/book-review-by-prasad-phatak/ 

ई-पेपर कात्रण : 



No comments:

Post a Comment