Total Pageviews

Sunday, June 26, 2022

‘रामकथामाला’ : रामायणाचा दिग्विजय

 


भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीनतम आणि आजपर्यंत टिकून राहिली संस्कृती आहे. ही संस्कृती रुजवण्यात, तिला दिशा देण्यात वेद, उपनिषदे, पुराणे यांचे स्थान महत्वाचे आहे. या साहित्यप्रवाहात निर्माण झालेल्या एका महाकाव्याने कर्तव्यदक्षता, नीतिमत्ता, प्रजाहितदक्षता इत्यादी अनेक गुणांचा आदर्श घालून दिला आणि भारतीय जीवनमूल्ये सर्वदूर पोचवत संस्कृतीचा प्रवाह जिवंत, खळाळता ठेवला. हे महाकाव्य म्हणजे रामायण! त्याच्या वाचन आणि श्रवणाने पिता, पुत्र, राजा म्हणून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणाऱ्या, सद्गुणांचा समुच्चय असणाऱ्या श्रीरामाविषयी लोकांच्या मनात अपार श्रद्धा दाटली नसती तरच नवल. गेली शेकडो वर्षे रामायणाची मोहिनी संपूर्ण जगाला पडलेली दिसून येते. रामायणाच्या या व्याप्तीला कवेत घेण्याचा प्रयत्न भारतीय कला-संस्कृतीच्या अभ्यासक दीपाली पाटवदकर यांनी आपल्या ‘रामकथामाला’ या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.

 

कवींना खुणावणारे रामायण

श्रीराम हे असंख्य कवींचे, संतांचे श्रद्धास्थान. रामकथेमुळे त्यांच्या काव्यप्रतिभेला सतत प्रेरणा मिळत राहिली. वाल्मिकींपासून ते ग. दि. माडगुळकरांपर्यंतच्या अनेक कवींच्या रामकाव्याचा वेध पुस्तकात घेतला गेला आहे.  भारतातल्या प्रत्येक भाषेतल्या कवींनी रामकथा शब्दबद्ध करताना केलेले प्रयोग अनोखे आहेत. उदा. वाल्मिकी रामायणाच्या दर हजाराव्या श्लोकाचे पहिले अक्षर घेतले तर गायत्री मंत्र तयार होतो. रामरक्षास्तोत्रात रामासाठी वापरलेल्या विविध नावांचा आणि विशेषणांचा क्रम पाहिला तर तो रामाच्या जीवनाचा प्रवास सांगतो. म्हणजे, पहिल्या श्लोकात त्याला राघव (रघुकुलात जन्म झालेला) म्हटले आहे; तर शेवटच्या श्लोकात दशमुखान्तक (दशानन रावणाला संपवणारा) म्हटले आहे. कवी मोरोपंतांनी अनेक शब्दचमत्कृती करून १०८ रामायणं लिहिली. त्यातल्या ‘निरोष्ठ रामायणा’त एकही औष्ठ्य शब्द नाही, तर ‘मात्रा रामायणा’त ‘अ’ ते ‘ज्ञ’ अक्षरांपासून सुरु होणारे श्लोक आहेत!  

 

सीमा ओलांडणारे रामायण

रामायणातला भाव, तत्व, सत्व यांचे जनमानसाशी इतके जवळचे नाते आहे की, त्याचे प्रकटीकरण केवळ काव्य या एका कलेपुरते मर्यादित राहिले नाही. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, कठपुतली, गायन अशा पारंपरिक कलांपासून छायाचित्रण, ॲनिमेशनसारख्या आधुनिक तंत्रकलाप्रकारांमधून श्रीरामाची कथा प्रभावीपणे कशी सादर केली गेली याचीही पुस्तकात दखल घेतलेली आहे.

रामायण हिंदू धर्म अथवा भारत एवढ्याच चौकटीपुरते मर्यादित राहिले नाही. त्यातल्या संदेशाला भारतात जन्मलेल्या सर्व पंथ, धर्म, भाषांनी आत्मसात केले आहे. जैन, बौद्ध, शीख साहित्यामध्ये रामकथेला आदराचे स्थान आहे. गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मांसंबंधीच्या जातक कथांमध्ये रामकथेतील पात्रांचे संदर्भ आलेले आहेत. प्राकृत तसेच कन्नड भाषेमध्ये जैन मुनींनी रामकथा लिहिलेल्या आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे अहिंसा तत्वज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या या जैन आणि बौद्ध रामकथांमधला राम अहिंसक आहे आणि तो वध करत नाही. शिखांच्या गुरु ग्रंथसाहिबमध्येही ‘राम अवतार’ या नावाने रामकथा आली आहे.

एखादे प्रतीक दैवत म्हणून विशिष्ट भूभागावर पूजिले जाते, पण राम आणि रामायणाने सर्व स्थलमर्यादा ओलांडल्या. अफगाणिस्तान ते इंडोनेशिया, जपानपर्यंतच्या मोठ्या जनसमुदायाने रामायण नुसते स्वीकारलेच नाही तर श्रद्धापूर्वक जपले आहे. अनेक देशांनी स्थानिक कलाप्रकारांमध्ये आणि नाणी, पोस्टाची तिकीटे यांवरही रामायणातील प्रसंगांना मानाचे स्थान दिले आहे. रामायणाने किती मोठ्या जनसमुदायाच्या अंत:करणाशी नातं जोडलं याचंच हे द्योतक आहे.


रामायणातून मिळणारे बळ

काळ पुढे सरकत राहिला असला तरीही रामायण नव्याने सादर होत राहिले. त्यामागच्या प्रेरणा कोणत्या होत्या यावरही पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे. विविध बादशाह्यांच्या वरवंट्याखाली भरडलल्या गेलेल्या, निराश झालेल्या समाजाला मानसिक आधार देण्यासाठी श्रीरामाची कथा पुन्हा सांगितली गेली पाहिजे या जाणीवेतून उत्तरेत संत तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’ आणि महाराष्ट्रात संत एकनाथांनी ‘भावार्थ रामायण’ लिहिले. पुत्रधर्म, राजधर्म यांचे सुयोग्य पालन करणाऱ्या श्रीरामाची कथा ऐकून लोकांची धर्मावरची श्रद्धा पुन्हा बळकट व्हायला मदत झालीच, पण वेळ आल्यास दुर्जनांच्या नाशासाठी शस्त्र हाती घ्यावेच लागते हाही संदेश समाजात गेला. समर्थ रामदासांनी हाच विचार पुढे नेत देशभर हिंडून राम आणि हनुमान यांच्या माध्यमातून बलसामर्थ्याचे महत्वही पटवून दिले. पुढे अठराव्या शतकात भारतातून वेस्ट इंडिज, फिजी, गयाना इत्यादी देशांमध्ये मजूर म्हणून नेल्यावर ज्यांचे इंग्रजांकडून अपरिमित शोषण झाले, अशा लोकांना त्या कठीण काळात रामायणाने कसे  तारले याबद्दल तर पुस्तकात स्वतंत्र प्रकरणच आहे.

 

लक्षवेधी मांडणी

रामायणाच्या पोथीसारखी आडवी पाने, भरपूर चित्रे, छायाचित्रे, संपूर्ण रंगीत छपाई यांमुळे ‘रामकथामाला’ अतिशय देखणे झाले आहे. इ. स. पूर्व काळापासून ते एकविसाव्या शतकापर्यंतच्या प्रत्येक शतकात लिहिल्या गेलेल्या रामायणांची सूचीही पुस्तकाच्या शेवटी दिल्यामुळे पुस्तकाचे मूल्य वृद्धिंगत झाले आहे.

पुस्तकात रामायणाचा विचार फक्त एक श्रद्धास्थान, एक उत्तुंग कलाकृती एवढ्याच दृष्टिकोनातून केलेला नाही. ‘रामायणाचा इतिहास-वर्तमान आणि भविष्य’ या दृष्टीनेही लेखिकेने चिंतन केलेले आहे. रामायणातील स्थळांचा एकत्र विचार करून ‘वारसा पर्यटन’ सुरु करण्याची कल्पना, रामायणातील प्रसंगांचा मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशनासाठी उपयोग करण्याविषयी मांडलेली ‘रामायण थेरपी’ची कल्पना यांवर अवश्य विचार व्हायला हवा.

पुस्तक वाचताना रामायणाची मोहिनी किती व्यापक आहे याची प्रचिती येत राहते. रामायणाचा हा दिग्विजय तलवारीच्या बळावर न होता फक्त शांततामय मार्गाने झालेला आहे ही गोष्ट भारतीय संस्कृतीविषयी खूप काही सांगून जाते. भाषा-पंथ-स्थानानुसार रामकथेत बदल होत गेले असले तरी त्याचा गाभा बदलला नाही. रामायणाची अनेक रूपं असूनही ‘सत्शील राम’ आणि ‘दुर्जन रावण’ हे सूत्र त्यांच्यात समान आहे. खुद्द श्रीलंकेतही राम आणि बिभीषण पूज्य आहेत. आपल्या देशात मात्र अलीकडे रावणाला नायक म्हणून प्रस्थापित करून वातावरण  कलुषित करण्याचा डाव खेळला जात आहे. अशा परिस्थितीत रामायणाचा जगावरचा प्रभाव पुन्हा पुन्हा सांगत राहणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने पुस्तकाचे मोल अनन्यसाधारण आहे.

 

‘रामकथामाला’

लेखिका : दीपाली पाटवदकर

प्रकाशक : विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग

पृष्ठसंख्या : ११२

किंमत : २००


('साप्ताहिक सकाळ'मध्ये ९ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित)

No comments:

Post a Comment