रोजच्या
कामाच्या धकाधकीमध्ये आपण एवढे गुंतून पडतो की, निसर्गाची बदलती रूपे, पशुपक्ष्यांचे
व्यवहार न्याहाळण्यातला आनंद जणू विसरूनच जातो. डॉ. पराग नलावडे यांच्या बाबतीतही
काहीसे असेच घडले होते. आपल्या वैद्यकीय व्यवसायामध्ये अनेक वर्षे काढल्यानंतर त्यांना कामाच्या
नादात आपल्या आवडीच्या गोष्टी करण्याचे राहूनच गेल्याची जाणीव झाली. मूळचा
निसर्गप्रेमी स्वभाव डोके वर काढू लागला. त्यांनी ओडिशामधील पक्षी अभयारण्याचा
दौरा केला आणि त्यातूनच त्यांचे पक्ष्यांशी मैत्र जुळले. पक्षीनिरीक्षणाला छायाचित्रणाची
जोड मिळाली.
नव्याने
गोडी लागलेल्या या छंदासाठी देशभर फिरताना किंगफिशर या पक्ष्याने - ज्याला
मराठीमध्ये खंड्या अथवा धीवर म्हणतात - डॉ. नलावडे यांचे लक्ष वेधून घेतले.
त्यांनी किंगफिशरचे निरीक्षण करण्याचा ध्यास घेतला आणि आवडीचे रूपांतर अभ्यासात
झाले. भारतातील आढळणाऱ्या किंगफिशरच्या सर्व प्रजातींचे निरीक्षण करण्याचा आणि
त्यांना कॅमेऱ्यात टिपण्याचा निर्धार डॉ. नलावडे यांनी केला. त्यांनी अरुणाचल
प्रदेश, आसाम, सुंदरबन, ओडीसा, पश्चिम घाट, हिमालय या
प्रदेशांमध्ये जाऊन घेतलेले किंगफिशर निरीक्षणाचे अनुभव आणि टिपलेली सुंदर
छायाचित्रे यातूनच ‘जावे किंगफिशर्सच्या गावा’ हे पुस्तक
साकारले आहे
किंगफिशर हा
मांसाहारी पक्षी आहे. ‘किंगफिशर’ हे नाव
पडण्याचे कारण, हा पाण्यात
सूर मारून मासा पकडण्यात अतिशय तरबेज असतो. अर्थात सर्व प्रजातींचे खाद्य मासे हे
नसते अथवा सर्व प्रजाती पाण्याच्या स्रोतांजवळ राहतात असे नाही. जगभरामध्ये
किंगफिशरच्या ११४ प्रजाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये १२ प्रजाती आढळतात.
सुंदरबनसारखे पाणथळ प्रदेश, पश्चिम घाटातील जंगलांपासून ते
हिमालयाच्या पायथ्यापर्यंत सर्वत्र या पक्ष्यांचे अस्तित्व आहे.
भारतात
आढळणाऱ्या किंगफिशरच्या १२ प्रजाती पुढीलप्रमाणे :
१) तीबोटी
धीवर (Oriental Dwarf Kingfisher)
२) निळ्या
कानाचा धीवर (Blue Eared Kingfisher)
३) तपकिरी
पंखांचा धीवर (Browne Winged Kingfisher)
४) काळ्या
टोपीचा धीवर (Black Capped Kingfisher)
५) कंठेरी धीवर
(Collared Kingfisher)
६) पांढऱ्या
छातीचा धीवर (White Throated Kingfisher)
७) कवड्या
धीवर (Pied Kingfisher)
८) सामान्य
धीवर (Common Kingfisher)
९) तुरेवाला
धीवर (Crested Kingfisher)
१०) Blyth धीवर (Blyth’s Kingfisher)
११) बलकचोच
धीवर (Stork Billed Kingfisher)
१२) लालसर
धीवर (Ruddy Kingfisher)
डॉ.
नलावडेंना आपल्या निरीक्षणांमधून या प्रत्येक प्रजातीचा स्वभाव, हालचाली, वीण, खाद्य
यांच्याबद्दल विस्तृत माहिती मिळवता आली. किंगफिशरच्या जोडीने नवीन पिढी जगात
आणण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी केलेली धडपड, त्यांच्यामधील नाजूक भावभावना त्यांना
कॅमेऱ्यात टिपता आल्या.
डॉ. नलावडे
यांनी मांडलेले पक्षीनिरीक्षणाचे काही अनुभव अतिशय हृद्य आहेत. निळ्या कानांच्या
धीवर पक्ष्याच्या मादीने पिल्लांना जन्म दिल्यानंतर सुरुवातीचा काही काळ ती रोज
त्यांच्या अन्नाची सोय करत असे. परंतु एके दिवशी दिवशी मादी निघून गेली.
सर्वसाधारणपणे जा प्रजातीमध्ये पिल्लांचे आईबाबा संगोपनाची जबाबदारी एकत्र पार
पाडतात. परंतु फक्त एकट्याने हे काम करणे खूप कठीण असते. ही पिल्ले नशीबवान होती.
मादी निघून गेल्यानंतर पिल्लांच्या वडिलांनी रोजच्यापेक्षा दुप्पट फेऱ्या आपल्या
पिल्लांना पुरेसे अन्न भरवले आणि एके दिवशी घरट्यामधून ती पिल्ले आपल्या बळावर
उडाली! तीबोटी धीवराच्या जोडीचा अनुभवही अनोखा आहे. सर्वसाधारणपणे आई-वडील
पिल्लांना अन्न भरवतात आपल्याला माहित आहे. तीबोटी धीवराच्या नराने प्रणयाराधनाचा
भाग म्हणून मादीला घास भरवल्या चे दृश्यदेखील डॉ. नलावडेंनी अनुभवले!
निरीक्षणासाठी
एखाद्या ठिकाणी जायचे नियोजन करत असताना चांगला स्थानिक माहितगार/गाईड मिळणे किती
आवश्यक आहे हेही पुस्तक वाचताना लक्षात येते. असा माहितगार आपण त्या ठिकाणी
जाण्यापूर्वीच एखाद्या भागामध्ये असलेल्या पक्ष्यांचे अस्तित्व टिपून ठेवतो आणि
आपल्याला त्याच्या सवयी अथवा वेळा यांच्या बद्दल माहिती पुरवतो. डॉ. नलावडे यांना अशा
माहितगारांची बरीच मदत झाली.
पक्षीनिरीक्षण
करत असताना नुसती पर्यटकाची मानसिकता असून भागत भागत नाही तर अभ्यासकाची मानसिकता
जोपासावी लागते. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम! तासन् तास एका
ठिकाणी हालचाल न करता थांबणे, अतिशय खडतर ठिकाणी जाण्यासाठी मनाची
तयारी ठेवणे, घड्याळच नाहीतर कॅलेंडरदेखील विसरून मुक्काम ठोकणे या गोष्टी आवश्यक असतात.
कधीकधी घोर निराशेचे प्रसंगदेखील येतात. बंगालमधील सुंदरबन येथे जाऊन लालसर
धीवराचा वेध येण्याचा प्रयत्न फसला, पण त्यामुळे नाऊमेद न होता, त्यांनी थेट
अंदमान येथील ‘रंगत’ बेटाचा दौरा
केला आणि त्याला कॅमेऱ्यात बंदिस्त केले.
टेनिसमध्ये
एकाच खेळाडूने चारही देशांमधल्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्या की ‘करिअर स्लॅम’ पूर्ण केले
असे म्हटले जाते. त्याच धर्तीवर भारतातील बाराच्या बारा प्रजातींच्या किंगफिशरना
कॅमेराबद्ध करण्याचे ‘किंगफिशर स्लॅम’ डॉ. नलावडेंनी पूर्ण केले आहे असे म्हणता येईल. त्यांच्या या देखण्या
छायाचित्रांनी जावे किंगफिशर्सच्या गावा’ हे पुस्तक सजलेले आहे आणि तोच या
पुस्तकाचा ‘यू. एस. पी’ आहे.
संपूर्ण आर्टपेपरवर उत्तम छपाई केल्याने पुस्तकाच्या सौंदर्यात भर पडली आहे.
पुस्तकाच्या शेवटी किंगफिशरच्या भारतातील बाराच्या बारा प्रजातींची इंग्रजी आणि
शास्त्रीय नावे, पोटजाती, अधिवास, आकार अशी
शास्त्रीय माहिती दिली आहे. पक्षीनिरीक्षणाचे विलोभनीय परंतु कसोटी पाहणारे विश्व
उलगडून दाखवणारे हे पुस्तक लक्षवेधी झाले आहे
जावे किंगफिशर्सच्या
गावा
लेखक : डॉ. पराग नलावडे
प्रकाशक :
भरारी प्रकाशन
किंमत : ३५०
रु.
पृष्ठसंख्या
: १५२
('मुंबई तरुण भारत'मध्ये ४ जून २०२२ रोजी प्रकाशित लेख)
No comments:
Post a Comment