छायाचित्र सौजन्य : अमेझॉन |
इतिहासाबद्दल पूर्वी कधीही होत नसतील एवढ्या
चर्चा अलीकडे झडू लागल्या आहेत, त्यामागे समाजमाध्यमांचे वाढलेले प्रस्थ कारणीभूत असल्याचे
लक्षात येते. स्वतःचा अभ्यास असो वा नसो, पण इतिहासावर हिरिरीने मतप्रदर्शन करायला
मात्र सर्वजण पुढे येताना दिसतात. सांगोवांगीच्या कथाच ‘इतिहास’ म्हणून सांगितल्या
जातात तेव्हा वस्तुनिष्ठतेला मात्र तिलांजलीच मिळताना दिसते. अनेक स्वयंघोषित
‘इतिहासतज्ज्ञ’ इतिहासातील ठराविक घटना, लढायांमधील जय-पराजय यातच अडकून पडलेले
दिसतात. या सगळ्या धामधुमीतही स्वतः परिश्रम घेऊन मूळ साधनांच्या आधारे संशोधन
करणारे अभ्यासक मात्र शांतपणे आपले काम करत राहतात आणि त्यातूनच मळलेल्या वाटांच्या
पलीकडच्या इतिहासाचे पैलू उजेडात येतात. इतिहास अभ्यासक महेश तेंडुलकर यांना भटकंतीदरम्यान
त्यांना अनेक मंदिरांमधल्या घंटांमध्ये एक समान सूत्र आढळले. कुतूहल चाळवले जाऊन
त्यांनी खोलात जाऊन अभ्यास करायला सुरुवात केली. या अभ्यासाचे तपशील आणि त्यातून
काढलेले निष्कर्ष त्यांनी आपल्या ‘पोर्तुगीज बेल्स इन हिंदू टेंपल्स’ या पुस्तकात
मांडले आहेत.
महेश तेंडुलकर यांनी अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध
मंदिरांना भेट देत असताना तिथल्या घंटांकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. अनेक ठिकाणी
घंटेवर अभारतीय लिपीमधील अक्षरे आणि चिन्हे आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी
त्याबद्दल अभ्यास सुरू केला. या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की, त्या पोर्तुगीज
बनावटीच्या घंटा आहेत आणि त्या चर्चमधूनच आणल्या गेल्या आहेत. ही आहेत विजयचिन्हे,
मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत करून मिळवलेली! मराठ्यांच्या इतिहासातले
सुवर्णपान असणाऱ्या वसईच्या मोहिमेनंतर ही विजयचिन्हे स्वराज्यात आणली गेली. या लढाईमध्ये
मिळालेला विजय राजकीय दृष्टीने दूरगामी परिणाम करणारा ठरलाच, परंतु अनपेक्षितपणे
आपल्या मंदिरांना हे सांस्कृतिक ठेवाही देऊन गेला.
प्रस्तुत पुस्तकात ढोबळमानाने तीन बाबींचा
उहापोह केला आहे.
१) हिंदू आणि ख्रिश्चन धर्मामध्ये असलेलं
घंटेचे महत्त्व : दुर्जनशक्तीला पळवून लावणारी, मंगलध्वनी निर्माण करणारी गोष्ट
अशा दृष्टिकोनातून मंदिरांमधील अथवा पूजेतील घंटेचे प्रयोजन असते. तर ख्रिश्चन
धर्मामध्ये घंटा ही चर्चच्या आवारामध्ये सूचक वस्तू म्हणून वापरली जाते. उदा. रविवारच्या
सामूहिक प्रार्थनेसाठीची वेळ झाल्याची सूचना देण्यासाठी, दिवसातील कोणता तास चालू
आहे हे म्हणून किंवा परकीय आक्रमण अथवा नैसर्गिक आपत्तीवेळी लोकांना सावध
करण्यासाठी घंटा वेगवेगळ्या प्रकारे वाजवली जात असे.
२) चिमाजी आप्पांची वसईची स्वारी : पोर्तुगीजांच्या
धर्मांध राजवटीचा धोका खरेतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
यांनी ओळखून पोर्तुगीजांविरुद्ध मोहीमाही काढल्या होत्या, परंतु अन्य
व्यवधानांमुळे त्या पूर्णत्वास नेता आल्या नाहीत. पुढे स्वराज्याचे पेशवे म्हणून
सूत्रे हाती घेतलेल्या थोरल्या बाजीरावांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांविरुद्धच्या
मोहिमेचा बेत आखून तो चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली तडीस नेण्यात आला. पोर्तुगीजांनी
शिवाजी महाराजांच्या काळापासून चौथाई दिली नव्हती, छत्रपती शाहू महाराजांना पोर्तुगीज
किंमत देत नव्हते अशा राजकीय कारणांसोबतच पोर्तुगीज राजवटीमध्ये हिंदू जनतेवर होणारे
अत्याचार हे धार्मिक कारणही होते.
३) मंदिरांमध्ये असणाऱ्या पोर्तुगीज घंटांची माहिती
: पोर्तुगीज घंटा कोणत्या मंदिरांमध्ये आहेत, त्यांची परिमाणे काय आहेत या
माहितीचे तपशीलवार दस्तावेजीकरण पुस्तकात करण्यात आले आहे. तसेच विशिष्ट घंटा विशिष्ट
मंदिरामध्ये कशी आली याबद्दलची माहिती जिथे जिथे उपलब्ध झाली तिथे तिथे नोंदवली
आहे.
वर उल्लेखल्याप्रमाणे चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेला
धार्मिक किनार होतीच. या मोहिमेमध्ये मराठ्यांना पोर्तुगीजांनी उभारलेल्या चर्चेसमधून
मोठ्या प्रमाणावर सशस्त्र प्रतिकार झाला. प्रत्युत्तरादाखल मराठ्यांकडून अनेक चर्चेस
उद्ध्वस्त करण्यात आली. विजय मिळाल्यानंतर चर्चेसबाहेरील टॉवरवरच्या घंटा मराठ्यांनी विजयचिन्हे
– ज्याला इंग्रजीमध्ये ‘वॉर ट्रॉफी’ म्हणतात –
म्हणून आणल्या. त्यांचा मोठा आकार आणि मधुर नाद यांमुळे या घंटांचे अनेक सरदारांना
आकर्षण होते. ‘फिरंगी घंटा’ घेऊन येण्यासंबंधीचे तत्कालीन पत्रांमाधले उल्लेख महेश
तेंडुलकर यांनी चिकाटीने शोधून काढले. अशा काही पत्रांचे दाखलेही पुस्तकामध्ये
दिले गेले आहेत. अनेक सरदारांनी आपल्या प्रांतातील मंदिरांना ही विजयचिन्हे दान म्हणून दिली असण्याची शक्यता आहे. पुस्तकातली उल्लेखनीय
गोष्ट म्हणजे जिथे दोन बिंदू जोडणारे तपशील उपलब्ध नाहीत तिथे ‘काय घडले असू शकेल’
असा तर्क करून ‘यासंबंधी निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत’ असे तेंडुलकरांनी
प्रांजळपणे नमूद केले आहे.
पुस्तकामध्ये अशा ४३ घंटांची माहिती दिलेली
आहे. अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये असलेल्या घंटा या पोर्तुगीज आहेत हे वाचून
आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. उदा. पाली, मोरगाव, थेऊर, जेजुरी, बनेश्वर,
तुळजापूर इ. काळाच्या ओघात त्यांचे महत्व विस्मृतीत गेले आहे. बहुतांश ठिकाणी
घंटेचा मूळ टोल गायब आहे, तर काही ठिकाणी घंटा रंगवल्यामुळे त्यावरच्या मूळ खुणा व
अक्षरे ओळखणे दुरापास्त झाले आहे. एके ठिकाणी तर जुनी घंटा वितळवून टाकल्याचेही
तेंडुलकरांच्या निदर्शनास आले. ऐतिहासिक महत्वाच्या या वस्तूंची निगा राखली जावी
आहे, त्यांची माहिती देणारा फलक मंदिरांमध्ये असावा अशी रास्त अपेक्षाही ते व्यक्त
करतात.
पुस्तकाच्या निमित्ताने दोन भिन्न धर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये
सामायिक असणाऱ्या गोष्टीच्या इतिहासावर प्रकाश पडला आहे. आपल्या श्रद्धा ज्या प्रतीकांशी
जोडलेल्या असतात त्या प्रतीकांचा उगम किंवा त्या प्रतीकांशी संबंधित वस्तू यांचे
मूळ कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न सर्वसामान्य माणूस करत नाही. परंतु एखादा जेव्हा
जाणकार याचा अभ्यास करतो तेव्हा त्या प्रतीकांचा प्रवास, त्याच्याशी जोडल्या
गेलेल्या अर्थांमध्ये झालेले बदल हेसुद्धा उजेडात येतात. या पुस्तकाच्या
निमित्ताने परिचित वस्तूंचा अपरिचित इतिहास शोधून काढण्याची प्रेरणा वाचकांना मिळाली
तर अशा प्रकारच्या अभ्यासाचा उद्देश सफल व्हायला मदत होईल.
Portuguese
Bells in Hindu Temple
Writer:
Mahesh Tendulkar
Translator:
Soniya Khare
Publisher:
Merven Technologies
Pages:
127
Price:
Rs. 200
('महाराष्ट्र टाईम्स'मध्ये ९ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित)
No comments:
Post a Comment