Total Pageviews

Sunday, June 26, 2022

(WH)Y

ट्रेलर लिंक


मनुष्य रानटी अवस्थेतून जसजसा समाजव्यवस्था स्वीकारत गेला तसतसं त्याच्यातलं पशुत्व कमी होत गेलं. समाजाचा भाग असल्याने माणसामध्ये हा मानवता स्वाभाविक गुण असण्याची अपेक्षा बाळगली जाऊ लागली. पण व्यथित करणारी गोष्ट ही आहे की, विशिष्ट सामाजिक धारणेचा भाग झाल्यानेच मनुष्याचं पशुत्व पुन्हा एकदा उफाळून आलं. त्या पशुत्वाला बळ मिळालं ते त्यानेच निर्माण केलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाचं. एकवीसाव्या शतकाच्या बावीसाव्या वर्षात माणसाच्या रानटीपणावर चित्रपट बनवावा लागतोय हे दुर्दैवी असलं तरी आवश्यक आहे. 


दिग्दर्शक अजित वाडीकर यांचा 'वाय' हा जबरदस्त चित्रपट आहे . मराठवाड्यामधल्या एका शहरातल्या ‘पुरूषात्तम हॉस्पिटल’मध्ये घडणारं क्रौर्य आणि त्याचा आपल्या टीमच्या सहाय्याने छडा लावणारी वैद्यकीय अधिकारी असं ‘वाय’चं एका ओळीतलं वर्णन करता येईल. यामध्ये सामाजिक समस्या थ्रिलर स्वरुपात मांडली आहे. थंड रक्ताची क्रूर माणसं कोण आहेत हे आधीपासूनच दाखवूनही आपली उत्कंठा अजिबात कमी होत नाही, याचं कारण म्हणजे याची मांडणी. मराठीतला पहिलाच ‘हायपर लिंक चित्रपट’ अशी याची जाहिरात केलेली आहे. म्हणजे काय हे मलाही नीट माहित नव्हतं, पण ‘वाय’ पाहिल्यावर ते कळलं. अशा प्रकारच्या चित्रपटातली पात्र अथवा प्रसंग हे सुरुवातीला सुट्टे वाटतात, पण ते कुठल्या न कुठल्या टप्प्यावर एकमेकांना भेटून/छेदून जातात एवढेच नाही तर एकमेकांच्या आयुष्यावर परिणामही करतात. यासाठी कथानक थोडं पुढेमागे न्यावं लागतं. आधी घडून गेलेल्या प्रसंगातला एखादा शॉट त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रसंगात पुन्हा एकदा येतो आणि दोन्ही प्रसंग/पात्रांमधला दुवा सांधतो. हा अशा स्वरूपाचा पहिला आहे चित्रपट का माहिती नाही, पण असा प्रयोग मराठीत फार दुर्मीळ आहे एवढं नक्की (मला वाटतं ‘चेकमेट’ हा सुद्धा अशाच प्रकारात मोडतो. खात्री नाही. जाणकारांनी सांगावे)


‘वाय’ने मला पहिल्या प्रसंगापासूनच खिळवून ठेवलं याचं कारण विषयाच्या गांभीर्याला पातळ करणारा एकही प्रसंग अथवा संवादही न घुसवल्यामुळे तो आपल्या मार्गावरून अजिबात हलत नाही. प्रेमप्रसंग, गाणी, आयटम सोंग वगैरे बाष्कळपणा यांचा तर दूरदूरपर्यंत संबंध नाहीये. ताण हलका करणाऱ्या काही जागा आहेत, पण त्या अगदी मोजक्या आणि नेमक्या ठेवण्याचं भान दिग्दर्शकाने राखलं आहे. सततच्या तणावपूर्ण वातावरणात छोट्या मुलीचे स्कूलबसच्या अनुषंगाने येणारे प्रसंग सुखद झुळूक आणतात. जगात काहीतरी चांगलं शिल्लक आहे, असा धीर देतात. संकलन, कथानकातले काही चकवे यांमुळे थ्रिल शेवटपर्यंत टिकून राहतं. हा थिएटरमध्येच पाहण्याचा चित्रपट आहे


वातावरणात भरून राहिलेला विलक्षण ताण चित्रपटाला गडद करतो. रुग्णालयाच्या तळमजल्यावरचं थंड वातावरण, तिथे कार्यरत असणारे त्याहून थंड रक्ताचे पशू, त्यांची उपकरणं यांच्या सहाय्याने अस्वस्थ करून टाकण्याची ताकद त्यामध्ये आहे. अजिबात लाऊड न होणारं प्रभावी पार्श्वसंगीतदेखील या मूडला साजेसेच. सगळी काळी कृत्यं घडत असताना ध्वनीचा जो वापर केला आहे तो हादरवून टाकणारा आहे. त्यामुळेच डोळ्यांना दिसणाऱ्या रक्तापेक्षा कानांना ‘ऐकू’ येणारं रक्त जास्तच सुन्न करतं. रूग्णालयासारखी एक गुंतागुंतीची यंत्रणा जेव्हा गैरकृत्यासाठी जुंपली जाते तेव्हा त्यामध्ये गुन्हा लपवण्यासाठी अनेक युक्त्या लढवलेल्या इथे दिसतात  उदा. तळमजल्यावरच्या ऑपरेशन थियेटरबाहेर झोपून राहिलेली म्हातारी अनेकदा दिसते, पण तिचे प्रयोजन काय हे शेवटाकडे कळतं. ते पाहिल्यावर हतबुद्ध व्हायला होतं.


चित्रपटाच्या पूर्वार्धामध्ये फक्त दोन डॉक्टर आणि त्यांची रुग्णालयं यांच्यावर असणारा फोकस, उत्तरार्धामध्ये गैरप्रकारांचा उलगडा करण्यासाठी सामान्य लोकांच्या भेटीगाठी घेतल्या जातात तेव्हा आणखी रुंदावतो. त्या लोकांच्या उत्तरांमुळे आता हा सामाजिक प्रश्न एकदोन डॉक्टर आणि त्यांच्याकडचे ‘पेशंट’ यांच्यापुरता न उरता अधिक गहिरा असल्याचं अधिरेखित होतं. फक्त कथानकाचा हा भाग अतिशय वेगाने दाखवलेला असल्यामुळे त्यातली समाजाची शिळी वृत्ती दाखवणारी काही महत्त्वाची वाक्यं नंतर लक्षात राहत नाहीत. हा भाग थोडा निगुतीने घेतला असता तर बरं झालं असतं. 


वैद्यकीय व्यवसायावर आधारित चित्रपट मराठीत फार कमी आहेत. ‘वाय’ बघताना साधारण दशकभरापूर्वी आलेल्या ‘आघात’ या विक्रम गोखले दिग्दर्शित उत्कृष्ट चित्रपटाची आठवण आली. ‘वैद्यकीय गैरव्यवहार’ हे दोन्हीतलं समान सूत्र आणि दोन्हीकडे मुक्ता बर्वे असणे हा सुखद योगायोग. मुक्ता बर्वेमुळेच ‘वाय’कडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. स्वत:चा असा ब्रँड निर्माण करणे ही फार भारी गोष्ट वाटते मला. खरं म्हणजे चित्रपटाच्या चमूमध्ये एफटीआयमधले शिक्षण गाठीशी असणारे तंत्रज्ञ आहेत, पण मुक्ता बर्वेच्या समावेशामुळे चित्रपटाकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं हे नक्की. तिची अभिनयक्षमता आपल्याला माहित आहेच. त्यामुळे तिने ही भूमिका चोख पार पडली यात काही आश्चर्य नाही. मला दोन जणांची काम फार आवडली. 

१) नंदू माधव : काय क्लास अभिनेता आहे! अनेक वर्षं ‘उद्योग’ करून आलेलं निर्ढावलपण आणि शेवटी पायाखालची जमीन सरकायला लागल्यावर आलेला उद्विग्न संताप ही रेंज त्याने फार मस्त दाखवली आहे. 

२) सुहास शिरसाट : डॉ. पुरूषोत्तमच्या हाताखाली सगळी कृत्यं करणारा रुग्णालय हा कर्मचारी, आपली थंड नजर, स्वरचित  ओव्या आणि मध्येच फॅक्कन हसणं यातून शिरशिरी आणतो. 

सुहास शिरसाठचा सहकारी झालेल्या अभिनेत्यानेही मस्त काम केले आहे. त्याच्या ‘पुरुषी’ नजरेचा चित्रपटातून केलं गेलेलं भाष्य अधोरेखित करण्यासाठी चपखल वापर केला गेला आहे.  


अनेकदा सामाजिक चित्रपट हा प्रचारकी थाटाचाच असायला हवा अशी अनेक चित्रकर्त्यांची समजूत झालेली दिसते. परंतु ‘वाय’ सारखा चित्रपट बघितला की, उपदेशाचे डोस न पाजताही सामाजिक प्रश्नाची जाणीव किती भेदकपणे करून देता येते हे लक्षात येतं. जे समाजात घडतंय ते यात फक्त वरचे पापुद्रे सोलून दाखवून दिलं आहे. प्रेक्षकांच्या शहाणपणावर विश्वास ठेवला आहे. त्यांना चमच्याने न भरवण्याचा दिग्दर्शकाचा आग्रह अगदी शेवटच्या प्रसंगाच्या शेवटच्या शॉटपर्यंत कायम राहिला आहे. मुद्दा मांडायला चित्रकर्त्यांनी उगाच अनावश्यक डायलॉगबाजी आणि उपदेशांच्या कुबड्या वापरलेल्या नाहीत. संपूर्ण चित्रपटामध्ये डॉक्टरच्या समोर बसलेल्या फोटोग्राफरच्या पात्राच्या तोंडून येणारी दोन-तीन वाक्यं आणि त्याच ठिकाणी बसलेल्या मुक्ताच्या तोंडून येणारी दोन-तीन वाक्यं एवढीच काय ते मनुष्यरुपी लांडग्यांवर थेट भाष्य करणारी आहेत. 


'चांगलं साहित्य अस्वस्थ करतं’ हे वाक्य चित्रपटालाही लागू होतं. चित्रपटाचं शीर्षक, लोगोमधलं स्काल्पेल, चित्रपटातलं लायटिंग, उत्कृष्ट साउंड डिझाईन, कुत्र्यांचा या चित्रपटांमध्ये (कथानकाचा भाग म्हणून आणि रूपक म्हणूनही) केलेला वापर या सगळ्या गोष्टी ‘वाय’चा ‘अस्वस्थता Quotient’ वाढवतात. ‘वाय’ बघत असताना डोक्यात उठलेलं मोहोळ शेवटाकडे येत असताना एकाच प्रश्नाभोवती फेर धरतं :  “का????”



No comments:

Post a Comment