मनुष्य
प्रगतीच्या पायऱ्या जसजशा चढत गेला तसतसा पर्यावरण संतुलनाला सुरुंग लागत गेला हे
दुर्दैवी सत्य आहे. आदिमानवाने शेती सुरू केली, तीच मुळी वृक्षतोड करून मोकळ्या
केलेल्या जागेवर! सुरुवातीला मूलभूत गरजांसाठी मानवाकडून होत असलेले निसर्गावरचे
अतिक्रमण पुढे सर्व प्रकारच्या भौतिक सुखांसाठीही होऊ लागले. यातून पर्यावरणावर
प्रतिकूल परिणाम तर झालेच, परंतु वनक्षेत्राचे दिवसेंदिवस आकुंचन होत असल्याने
आपल्या अधिवासावर गदा आलेले वन्यप्राणी, त्यातही विशेषतः बिबटे, भक्ष्याच्या शोधार्थ
मानवी वस्त्यांमध्ये शिरू लागले. पूर्वी ग्रामीण भागामध्ये घडणाऱ्या या घटना आता
अनेकदा शहरांमध्येही घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘भारतातील एका गावामध्ये मनुष्य
आणि बिबटे यांनी एकमेकांचे अस्तित्व स्वीकारले असून, ते एकमेकांच्या सान्निध्यातच राहतात’ असे
सांगितले तर आपल्याला आश्चर्य वाटेल. ‘द बेरा बॉंड’ या पुस्तकामधून संदीप भुतोरिया यांनी राजस्थानातील मनुष्य आणि बिबट्या
यांच्यातले बंध जपणाऱ्या ‘बेरा’ नावाच्या गावाची ओळख करून दिली आहे.
बेरा हे राजस्थानातील उदयपूर पासून १४० किलोमीटर वसलेले गाव आहे. अरवली पर्वतरांगेच्या सान्निध्यात असलेल्या या गावामध्ये ५५ पेक्षा अधिक बिबट्यांचे अस्तित्व आहे. रबारी ही येथील प्रमुख पशुपालक जमात निसर्गाशी सूर जुळवून जगताना दिसते. शेळ्यामेंढ्या, उंट, कोंबड्या, बदके अशा अनेक प्रकारचे पशुपक्षी ही जमात पाळते. या प्रचंड पशुधनाकडे बिबटे आकर्षित होतात, कारण त्यांना इथे खाद्य सहजपणे उपलब्ध होते. अधूनमधून बिबटे आपल्या कळपातील काही जनावरे घेऊन जाणार याची रबारी लोकांना कल्पना असते, परंतु तरीही हे लोक त्या बिबट्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करत नाहीत. यामुळे येथील बिबटेही निर्धास्त झाले आहेत. तेदेखील मनुष्य प्राण्यावर हल्ला करत नाहीत. कित्येक वेळा तर या समाजाचा सामूहिक कार्यक्रम चालू असताना काही अंतरावर बिबट्याचा वावर असतो.
‘कॉफीटेबल बुक’ प्रकारचे हे पुस्तक म्हणजे वन्यजीव अभ्यासकाने केलेले विश्लेषण नसून निसर्गावर प्रेम असलेल्या लेखकाने केलेली निरीक्षणे आहेत. पुस्तकाचे सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे यातील छायाचित्रे. बेरापासून जवळच असलेल्या जवाई धरणाच्या परिसरातले लँडस्केप्स, तिथले पशुपक्षी, बेरा गावाचा परिसर आणि जवळच्या टेकड्यांवर असलेला बिबट्यांचा मुक्त संचार यांच्या अप्रतिम छायाचित्रांनी हे पुस्तक सजले आहे. ही छायाचित्रे प्रामुख्याने शत्रुंजय प्रताप सिंह यांनी काढलेली आहेत. ते स्वतः शहरी जीवन सोडून आपल्या कुटुंबासह बेरा येथे येऊन राहिले आहेत. कुंभळगड आणि माउंट अबू या अभयारण्यांदरम्यान असलेल्या या निसर्गसमृद्ध परिसरामध्ये शत्रुंजय सिंह आपला लॉजचा व्यवसाय सांभाळून आपल्या आवडीचे वनसंवर्धनाचे कार्य करतात आणि छायाचित्रणाचा छंदही जोपासतात. शेळी, बिबट्या आणि छोटेसे मंदिर यांना एकाच फ्रेममध्ये सामावणारे त्यांचे पुरस्कारप्राप्त छायाचित्र आपल्याला या पुस्तकामध्ये बघायला मिळते. ‘जीवन, मृत्यू आणि मुक्ती एकाच छायाचित्रात’ असे लेखकाने याचे सार्थ वर्णन केले आहे. बेरा परिसरामध्ये येऊ घातलेल्या खाणींचा पर्यावरणाला असलेला धोका ओळखून शत्रुंजय यांनी येथील गावकऱ्यांना संघटित केले आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे २०१६ साली खाणींवर बंदी आली आणि मूळच्या २० चौरस किलोमीटर असलेल्या संरक्षित वनक्षेत्रामध्ये वाढ होऊन येथील जंगलाचा आणखी ६२ चौरस किलोमीटर भाग संरक्षित म्हणून घोषित झाला.
शत्रुंजय यांच्यासोबतच सी.पी.सिंह राठोड, गोपाल सिंह आणि उमेश गोगना यांच्या छायाचित्रांनीही पुस्तकाच्या देखणेपणामध्ये भर घातली आहे. मनुष्य आणि बिबटे यांच्या संघर्षाच्या कहाण्यांमुळे अस्वस्थ झालेल्या मनाला शांततामय सहजीवनाची ही कथा नक्कीच दिलासा देते.
‘द बेरा
बॉंड ‘
लेखक :
संदीप भुतोरिया
प्रकाशक :
मॅकमिलन
पृष्ठसंख्या
: १६३
किंमत : ७५० रु.
No comments:
Post a Comment