Total Pageviews

Sunday, June 26, 2022

ज्ञानगंगोत्रीचा इतिहास

 




 

सरस्वती नमस्तुभ्यं, वरदे कामरूपिणी ।

विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा ॥

 

 

भारताला विद्याभ्यासाची मोठी परंपरा लाभली आहे. सरस्वतीला विद्येची देवता मानले गेले असल्याने वर दिलेल्या श्लोकाप्रमाणे सरस्वतीला वंदन करून शिक्षणाची सुरुवात केली जाते. ज्ञान आणि विद्या या गोष्टी देवतेशी जोडल्या गेल्याने शिक्षणाविषयी उदात्त भावना आपल्या संस्कृतीमध्ये आपोआपच रुजली. ज्ञानदानाविषयीच्या उदार भावनेतूनच प्राचीन भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला. गुरुकुल परंपरेतून विकसित होत गेलेल्या शिक्षणपद्धतीतून पुढच्या टप्प्यामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणारी अनेक विद्यापीठे निर्माण झाली. प्राचीन काळातील अशा जगप्रसिद्ध भारतीय विद्यापीठांचा इतिहास श्वेता काजळे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला आहे.

 

प्राचीन भारतीय विद्यापीठांची काही वैशिष्ट्ये

१) प्राचीन भारतीय विद्यापीठांमधील शिक्षणाचा भर केवळ पुस्तकी ज्ञानावर नसे, तर शिक्षणाचे उपयोजन कसे करावे हेही शिकवले जात असे. सर्व प्रकारच्या बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची क्षमता येथील शिक्षणामध्ये होती. विद्यापीठांमध्ये औषधशास्त्र, कायदा, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, साहित्य, भाषाशास्त्र, पशुसंवर्धन, विविध कला असे वैविध्यपूर्ण शिक्षण मिळत असे. येथील शिक्षणाची कीर्ती पश्चिमेला ग्रीसपासून पूर्वेला जपानपर्यंत पसरली होती.
२) शिक्षणाच्या आशेने अतिशय मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यापीठांमध्ये येत असल्याने प्रथम त्यांची प्रवेशपरीक्षा घेतली जात असे. उदा. विक्रमशिला विद्यापीठाच्या प्रत्येक दरवाजावर प्रवेश चाचणी घेण्यासाठी एकेक द्वारपंडित नेमलेला असे.

३) एका वर्गामध्ये पंधरा अथवा वीसच विद्यार्थी असत. त्यामुळे प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणे शक्य होई.


शिक्षणाला मिळालेला राजाश्रय

समाजाची ज्ञानोन्नती करणे ही राजे स्वतःची जबाबदारी समजत. म्हणूनच विद्यापीठांना भक्कम राजाश्रय होता. ज्ञानदान हे पवित्र कार्य समजले जात असल्यामुळे गुरू-शिष्याचे नाते व्यावहारिक नाते नव्हते. विद्यार्थ्यांकडून शिक्षणाचे शुल्क घेतले जात नसे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना गुरुदक्षिणा दिली जात असे. आठव्या वर्षी शिक्षणास प्रारंभ करण्यापूर्वी उपनयन म्हणजेच मुंजीचा विधी होत असे. उपनयन विधी केवळ ब्राह्मणांपुरताच मर्यादित नव्हता, तर शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक जातीमध्ये हा विधी होत असे. स्त्रियादेखील यज्ञोपवीत घालत असत. गुणशिला विद्यापीठामध्ये पुरुषांसोबतच स्त्रियांच्या शिक्षणाचीही व्यवस्था होती.

 

प्राचीन विद्यापीठांचा अस्त

अशा समृद्ध ज्ञानपरंपरेवर आक्रमकांची वक्रदृष्टी पडली. मध्य आशियामधून आलेल्या हुणांच्या टोळ्यांनी तक्षशिला विद्यापीठ उद्ध्वस्त केले. तक्षशिलेच्या जे नशिबी आले तेच काही काळानंतर नालंदाच्या नशिबी आले. इस्लामी आक्रमकांच्या टोळधाडीमध्ये सध्याच्या बिहार आणि बंगाल येथील नालंदा, विक्रमशिला, तेलहरा, जागद्दल इ. विद्यापीठे उद्ध्वस्त झाली. बख्तियार खिलजीने केलेल्या नालंदाच्या विध्वंसात असंख्य ग्रंथ नष्ट झाले. अनेक बौद्ध पंडितांच्या हत्या झाल्या.

 

विध्वंसामुळे अथवा उपेक्षेमुळे कालांतराने अनेक प्राचीन भारतीय विद्यापीठे विस्मृतीच्या गर्तेत गेली. अशा परिस्थितीमध्ये या विद्यापीठांबद्दल माहिती देणारे महत्त्वाचे स्रोत म्हणजे भारतामध्ये येऊन गेलेल्या परदेशी प्रवाशांच्या नोंदी. ग्रीसचा मेगॅस्थेनीस, चीनचे ह्युएन सांग, आयत्सिंग, फाहियान, मोरोक्कोचा इब्न बतुता या प्रवाशांनी विद्यापीठांबद्दल भरभरून लिहिले आहे. तिबेट, चीन येथील अभ्यासकांनी अनेक ग्रंथ तिबेटी, चिनी भाषांमध्ये भाषांतरित केले. पुढे भारतातील विद्यापीठांच्या विनाशामध्ये भारतीय भाषांमधील मूळ ग्रंथ नष्ट झाले, तरीही त्यांची भारताबाहेरील भाषांमधील भाषांतरे टिकून असल्याने कालांतराने पुन्हा एकदा हे प्राचीन भारतीय ग्रंथ उपलब्ध झाले. या ग्रंथांमधील नोंदी तसेच परदेशी प्रवाशांच्या लेखनातले संदर्भ प्रस्तुत पुस्तकांमध्ये विपुल प्रमाणात दिलेले आहेत.

 

 

सहिष्णु शिक्षणपरंपरा

रूढ अर्थाने विद्यापीठ नसलेल्या, परंतु ज्या ठिकाणी ज्ञानाच्या आदान प्रदानाचे कार्य होत असे, चर्चा घडत असत अशा मठमंदिरादि स्थानांचीही पुस्तकामध्ये दखल घेतली आहे. बौद्धधर्माच्या भरभराटीच्या काळामध्ये अनेक बौद्ध मठांमध्ये शिक्षण दिले जात असे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल्या ‘चौसष्ट योगिनी मंदिर’ या वास्तूमध्ये गणित आणि ज्योतिष हे विषयांचे शिक्षण मिळत असे. मलकापुरम, तिरुमुक्कुडल ही ‘मंदिर विद्यापीठे’ प्रसिद्ध होती. काशी हे संपूर्ण शहरच ज्ञानाचे माहेरघर होते. अनेक धर्म, पंथ आणि विचारांच्या मांडणीचे, प्रसाराचे आणि अध्ययनाचे ते केंद्र होते.

 

"प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीत धर्माचा विशेष प्रभाव असला तरीही शिक्षणपद्धती धर्मनिरपेक्ष होती. विद्यार्थ्याला वैदिक, बौद्ध, जैन अशा कुठल्याही धर्माचे शिक्षण घेण्याची मुभा होती. विद्यापीठातून धार्मिक शिक्षण देणाऱ्या आचार्यांना सर्व धार्मिक तत्वज्ञानाचे सखोल ज्ञान असायचे" असे लेखिका नमूद करते. बौद्धमताचा पगडा असणाऱ्या विद्यापीठांमध्ये वैदिक परंपरांचे शिक्षण वर्ज्य नव्हते. वैदिक धर्माचे अनुसरण करणाऱ्या गुप्त राजांनी बौद्धमताचा प्रभाव असलेल्या नालंदा विद्यापीठाला राजाश्रय दिला होता. अनेक विद्यापीठांच्या उत्खननामध्ये बुद्धमंदिरे, स्तूप यांच्यासोबतच वैदिक हिंदू देवदेवतांच्या मूर्तीदेखील सापडल्या आहेत, ही गोष्ट भारतामध्ये प्राचीन काळापासून असणाऱ्या धार्मिक, वैचारिक सहअस्तित्वाची साक्ष देते. मध्ययुगामध्ये इस्लामिक राजवटीमध्ये मात्र भारतीय शिक्षण पद्धतीत बदल घडले. त्याचे विवेचन करणारे स्वतंत्र प्रकरण पुस्तकामध्ये आहे. याप्रमाणेच इंग्रजी राजवटीमध्ये भारतीय शिक्षण परंपरा कशी उध्वस्त केली गेली, याबद्दलही पुस्तकामध्ये भाष्य असायला हवे होते असे वाटते.

 

माहितीचा खजिना

प्रत्येक विद्यापीठासाठी स्वतंत्र प्रकरण आणि शेवटी एका प्रकरणामध्ये दक्षिणेतील काही विद्यापीठांचा एकत्रित मागोवा असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये त्या त्या विद्यापीठाचे भौगोलिक स्थान, तिथे शिकवले जाणारे विषय, तेथे असणारे शिक्षक, परदेशी प्रवाशांच्या त्या विद्यापीठाबद्दलच्या नोंदी, आधुनिक काळामध्ये कोणत्या उत्खननामुळे ते विद्यापीठ पुन्हा प्रकाशात आले याची माहिती दिली आहे. उत्खननात मिळालेले वास्तूचे अवशेष, मूर्ती, नाणी, शिक्के यांची छायाचित्रेही पुस्तकामध्ये आहेत. अभ्यासकांचे शोधग्रंथ, भारतीय पुरातत्व खात्याच्या उत्खननांचे अहवाल, समकालीन ग्रंथांमधील नोंदी, जातककथांसारखे धार्मिक साहित्य यांच्या संदर्भांतून हे पुस्तक साकारले आहे. प्राचीन भारतीय विद्यापीठांचे स्थान भारतामध्ये कुठे होते याचा एक नकाशा पुस्तकाच्या प्रारंभी दिलेला आहे, तो पाहता जवळपास संपूर्ण देशभर विस्तारलेली ‘विद्यापीठ परंपरा’ दिसून येते.

 

हे पुस्तक म्हणजे माहितीचा खजिना आहे यात शंकाच नाही, परंतु यामध्ये मुद्रितशोधनाच्या चुका राहून गेल्या आहेत. तसेच काही ठिकाणी इंग्रजी शब्दांचे मराठीमधले उच्चार योग्यप्रकारे आलेले नाहीत. मराठीमध्ये या विषयावर कमी साहित्य उपलब्ध आहे, हे लक्षात घेता या पुस्तकाचे मोल मोठे आहे. म्हणूनच अशा चुका टाळून अधिक लक्षपूर्वक केलेल्या संपादनासह या पुस्तकाची पुढची आवृत्ती निर्दोष स्वरुपात वाचकांसमोर येईल अशी आशा आहे.

 

प्राचीन भारतीय विद्यापीठे

लेखक : श्वेता काजळे

प्रकाशक : मर्वेन टेक्नॉलॉजीज्
पृष्ठसंख्या : २३६

किंमत : ३५० रु.   


('मुंबई तरुण भारत'मध्ये ११ जून २०२२ रोजी प्रकाशित लेख)


No comments:

Post a Comment