ऑगस्टमधली एक सकाळ. कार्यक्रमाची वेळ गाठायची होती. मी धावतपळतच बस पकडली. बसमधले बहुतेक सर्वजण एकाच ठिकाणी जायला निघाले आहेत हे लक्षात आले. बस इच्छित स्थळी पोहोचली. तो शेवटचा थांबा नसूनही जवळपास संपूर्ण बस याच ठिकाणी रिकामी झाली. दुतर्फा गर्द झाडीच्या रस्त्यावर सगळ्यांची पावले एकाच दिशेने पडू लागली आणि काही मिनिटांत सर्वजण एका मोठ्या निवासस्थानाच्या आवारात पोहोचले.
ठिकाण अपरिचित असले तरी वातावरणातली उत्सुकता
चिरपरिचित होती. उत्सुकता असणारच, कारण दिवस १५ ऑगस्टचा
होता आणि जमलेले सर्वजण तिरंग्याला वंदन करण्याची वाट पाहत होते. हे होते नेदरलँड्स देशातील हेग शहरातले ‘वासेनार’ या
उपनगरात असणारे भारताच्या राजदूतांचे निवासस्थान.
ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत झाल्यावर लक्षात आले की,
इथे भारताविषयी आत्मीयता असणारे डच (म्हणजेच नेदरलँड्सचे) नागरिक, भारतीय दूतावासाकडून विशेष आमंत्रण असलेले डच अतिथीही उपस्थित होते. अशा
प्रसंगी दोन्ही देशांचे अधिकारी आणि नागरिकांच्या होणाऱ्या अनौपचारिक गप्पा
परस्परांबद्दल सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत करत असतात.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने तिथे जमलेल्या डच
पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून दिली. त्यांपैकी एका व्यक्तीची ओळख खूपच विशेष
वाटली. सुरुवातीचे शिष्टाचार झाल्यावर नेदरलँड्समधील उत्साही भारतीय मंडळींचा
विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला आणि एकीकडे तो बघता बघता जमलेल्यांच्या
लोकांच्या एकमेकांशी भेटीगाठी, गप्पाटप्पा सुरू झाल्या.
मला उत्सुकता होती ती मगाशी ज्यांचा विशेष उल्लेख केला होता त्यांना भेटण्याची.
गर्दीतून वाट काढत मी त्यांच्यापाशी पोहोचलो. त्यांना आवर्जून भेटण्याचे कारणही
तसेच होते. त्यांनी कविकुलगुरू कालिदास विरचित 'मेघदूत'
या अजरामर संस्कृत काव्याचा डच भाषेमध्ये अनुवाद केला आहे! त्यांचे
नाव एव्हर्ट श्नायडर. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेली, पण
तब्येतीने खुटखुटीत. अतिशय नम्रपणे आणि आत्मीयतेचे बोलणे. वयाने आणि ज्ञानाने मोठे
असल्याचा कुठेही आव नाही.
भारतापासून कितीतरी दूरवर असणारी ही व्यक्ती संस्कृत
भाषेच्या, कालिदासाच्या प्रेमात कशी बरे पडली
असेल? कुतुहलापोटी मी त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात
केली. बोलताना आणि त्यांनी सोबत आणलेले त्यांचे पुस्तक पाहताना लक्षात आले की,
त्यांच्यासोबत केवळ दहा-पंधरा मिनिटांचा संवाद पुरेसा नाही. त्यांच्या
संस्कृतप्रेमाबद्दल, कालिदासप्रेमाबद्दल अधिक खोलात जाऊन
जाणून घ्यायला हवे. म्हणून मग कालांतराने पुन्हा एकदा त्यांच्याशी सविस्तर संवाद
साधला. या संवादामधून आणि मेघदूताचा अनुवाद असलेल्या पुस्तकामधून संस्कृत आणि
कालिदासाविषयी एव्हर्ट यांना असणाऱ्या जिव्हाळ्याचे अनेक पदर उलगडत गेले. एव्हर्ट
यांचा व्यासंग, त्यांच्या पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया आणि
त्यांचा एकूणच प्रवास याबद्दल सांगण्यासाठीच हा लेखनप्रपंच.
एव्हर्ट यांच्याकडे वळण्यापूर्वी कालिदास आणि
मेघदूताबद्दल थोडेसे. संस्कृत भाषेमधील अद्वितीय कवी कालिदास इसवी सनाच्या पाचव्या
शतकात होऊन गेला आणि सम्राट चंद्रगुप्त (दुसरा) - जो विक्रमादित्य नावानेही ओळखला
जातो – याच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी तो एक होता असे म्हटले जाते. परंतु तो
इसवीसनापूर्वीच्या पहिल्या शतकात होऊन गेला असेही काही विद्वानांचे म्हणणे आहे.
कालिदासाच्या व्यक्तिगत जीवनाविषयी फारसे तपशील मिळत नाहीत. तो कालिमातेचा उपासक
होता, म्हणूच त्याला 'कालिदास' हे नाव मिळाले अशी आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे
कालिदास शिवभक्तही होता. विक्रमोर्वशीयम्, मालविकाग्निमित्रम्
आणि अभिज्ञानशाकुंतलम् (जे नुसत्या 'शाकुंतल' या नावाने ओळखले जाते) अशी तीन नाटके,
कुमारसंभव आणि रघुवंश ही महाकाव्ये, ऋतुसंहार
आणि मेघदूत ही खंडकाव्ये आणि श्यामला दंडकम् हे स्तोत्र अशी कालिदासाची साहित्यिक
श्रीमंती आहे.
अनेक अभ्यासक आणि आस्वादकांच्या मते मेघदूत ही
कालिदासाची सर्वोत्तम निर्मिती आहे. कैलास पर्वताच्या सान्निध्यातल्या अलका नगरीचा
रहिवासी असलेल्या एका यक्षाला कुठल्याश्या कृत्याबद्दल शिक्षा म्हणून वर्षभरासाठी
दूरवर, मध्य भारतातल्या रामगिरी (आजचे
रामटेक) येथे पाठवले गेले आहे. तिथे हा यक्ष पत्नीविरहाने व्याकुळ झाला आहे. अशातच
आषाढाची चाहूल लागते आणि पर्वताच्या शिखरावर विसावलेल्या काळ्या मेघाकडे पाहून
त्याच्या मनात आशा पल्लवित होतात. हाच मेघ पर्जन्य घेऊन उत्तरेकडे प्रवास करणार
आहे हे जाणून यक्ष मेघाला हिमालयातल्या अलकानगरीमध्ये आपली वाट पाहणाऱ्या
पत्नीसाठी संदेश घेऊन जायची विनंती करतो. रामगिरी ते अलकानगरी या प्रवासात मेघाला
खाली जमिनीवर, पर्वतांवर आणि आकाशात काय काय बघायला मिळेल,
याचे वर्णन यक्ष करतो. हे काव्य म्हणजे कालिदासाचे ज्ञान, निरीक्षणशक्ती
आणि तरल काव्यप्रतिभा यांचा अद्वितीय संगम आहे.
मनुष्यस्वभाव आणि सवयी, स्त्रियांची आभूषणे
यांबद्दलची कालिदासाची निरीक्षणे मार्मिक आहेत. वनस्पती आणि प्राणिसृष्टी, भूगोल यांबद्दल
कालिदासाला असणारे ज्ञान स्तिमित करणारे आहे आणि तरीही त्या ज्ञानाच्या भाराने त्याची
कवितेला माहितीपुस्तिकेचे स्वरूप येत नाही, तर ती तपशिलांनी संपृक्त असलेल्या
सुंदर चित्रासारखी वाटते. यामागचे कारण आहे कालिदासाची अजोड प्रतिभा! संस्कृतमधल्या
प्रसिद्ध कवींची वैशिष्ट्ये सांगणारे एक सुभाषित आहे.
उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम्।
दण्डिन: पदलालित्यम् माघे सन्ति त्रयो गुणा:।।
यामध्ये 'उपमा' ही कालिदासाचे गुणवैशिष्ट्य असल्याचे सांगितले आहे. ते तसे का म्हटले आहे
याची मेघदूत वाचताना सतत प्रचिती येत राहते. एकाहून एक सरस, चित्रदर्शी
उपमा आपल्याला वाचायला मिळतात.
मेघाच्या प्रवासाचा मार्ग म्हणजे आधुनिक
तंत्रज्ञानाने निश्चित केलेल्या मान्सूनच्या प्रवासाशी बहुतांशी मिळता जुळता आहे. मेघदूतामध्ये
उल्लेखलेली भौगोलिक वैशिष्ट्ये, जीवसृष्टी यांच्याबद्दलचे तपशील काल्पनिक नाहीत.
ते आजही पडताळून पाहता येऊ शकतात. किमान सोळा शतकांपूर्वीच्या साहित्यकृतीमध्ये
एवढे अचूक ज्ञान कसे मांडले आहे, हा प्रश्न अभ्यासकांना अचंबित करतो.
मेघदूत दोन भागांमध्ये विभागलेले आहे. पूर्वार्ध 'पूर्वमेघ' या नावाने तर उत्तरार्ध 'उत्तरमेघ' या नावाने ओळखला जातो. पूर्वमेघामध्ये
एकूण ६६ श्लोक आहेत. यामध्ये रामगिरी ते अलका नगरी या प्रवासात दिसणारा निसर्ग,
मनुष्य यांचे वर्णन आहे. उत्तरमेघामध्ये एकूण ५५ श्लोक आहेत.
यामध्ये संपन्न, समृद्ध अलकानगरी, तिथे
असणारे प्रासाद, उद्याने, प्रेमिक,
यक्षजीवन आणि अर्थातच यक्षपत्नीचे वर्णन आहे.
कालिदास आणि त्याचे मेघदूत या दोहोंनी भाषा, प्रांत आणि देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून जगभरच्या रसिकांच्या हृदयात घर
केले आहे. केवळ मराठीतच मेघदूताचे वीसहून अधिक अनुवाद झाले आहेत. कुसुमाग्रज,
वसंत बापट, शांता शेळके अशा दिग्गजांना
मेघदूताचा अनुवाद करण्याचा मोह झाला आहे. भारताबाहेरही मेघदूताची अनेक
भाषांतरे/अनुवाद झाले आहेत. त्यामुळे एव्हर्ट यांनाही अनुवादाचा मोह झाला, हेही स्वाभाविकच म्हणायला हवे.
***
एव्हर्ट यांनी 'मेघदूता'चा आजच्या काळातल्या डच भाषेमध्ये केलेल्या अनुवादाची पुस्तकरूपात केलेली
मांडणी बघितल्यावर लक्षात येते की, हे पुस्तक एक काव्य एका
भाषेतून दुसऱ्या भाषेत नेण्यापुरते मर्यादित नाही. एव्हर्ट यांच्या भारतीय
संस्कृतीवरच्या प्रेमाचे हे लोभस प्रतिबिंब आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये
एव्हर्ट म्हणतात "संस्कृत भाषा इतकी अर्थपूर्ण आणि
नेमकी आहे की, त्यामधील शब्दांचा जसाच्या तसा अर्थ डच भाषेत आणणे शक्य नाही. 'मेघदूत' हा शब्द सार्थपणे डच भाषेमध्ये आणणे शक्यच
नाही, इतका तो शब्द अर्थसंपृक्त आहे" बहुदा म्हणूनच त्यांनी पुस्तकाला शीर्षक देताना 'मेघदूत'
या शब्दासाठी जसाच्या तसा डच प्रतिशब्द वापरलेला नाही. 'मेघदूत' हे काव्य आहे याचे भान ठेवून त्याच्या डच अनुवादाचे
शीर्षकही त्यांनी ‘एन वोल्क वोर्ट वोर्ड' (Een Wolk Wordt Woord) असे
काव्यात्म ठेवले आहे, ज्याचा अर्थ होतो ‘मेघच होतो शब्द’. मेघदूताचा मोठा प्रभाव असणारा डच
कवी मार्टिनुस नायहॉफ याने आपल्या ‘द वोल्केन’ (De Wolken - ‘मेघ’) या
कवितेमध्ये 'आश्चर्यच शब्दरूप घेते' अशा
अर्थाची ओळ आहे. त्यापासून एव्हर्ट यांना पुस्तकाचे शीर्षक स्फुरले आहे. एव्हर्ट
यांच्या अनुवाद कौशल्यासोबतच त्यांची काव्याची जाणही किती उत्तम आहे याची यातून
कल्पना येते.
एव्हर्ट यांनी आपल्या पुस्तकात संपूर्ण पूर्वमेघाचा
अनुवाद केला आहे (प्रक्षिप्त मानले जाणाऱ्या पाच श्लोकांचा अनुवाद त्यात समाविष्ट
नाही). उत्तरमेघातील मात्र एव्हर्ट यांना आवडलेल्या निवडक अकरा कडव्यांचाच अनुवाद
एव्हर्ट यांनी केला आहे. “संपूर्ण मेघदूताचा स्पष्टीकरणासह अनुवाद केल्याने
पुस्तकाचा आकार खूप मोठा झाला असता. शिवाय पूर्वमेघ आणि उत्तरमेघ
काव्यसौंदर्याच्या दृष्टीने सारखेच सकस असले तरी पूर्वमेघाला वास्तवाची भक्कम चौकट
आहे आणि उत्तरमेघ मात्र कल्पनाविश्वावर आधारित आहे, म्हणून उत्तरमेघाचा
पूर्ण अनुवाद आपण केला नाही” असे एव्हर्ट नमूद करतात.
****
एव्हर्ट यांनी लिहिलेली पुस्तकाची प्रस्तावना
त्यांच्या अभ्यासू वृत्तीची प्रचिती देते. प्रस्तावनेमध्ये त्यांनी मेघदूताची
वैशिष्ट्ये, कालिदासाचा इतिहास आणि त्याची
साहित्यसंपदा याचे विवेचन केले आहे. कालिदासाबद्दलचे एव्हर्ट यांचे प्रेम पुस्तक
वाचताना आणि त्यांच्याशी गप्पा मारतानाही जाणवत राहते. कालिदासाला ते सर्वश्रेष्ठ
अभिजात लेखक मानतात. कालिदासाचे साहित्य ज्या संस्कृत भाषेचे लेणे आहे त्या
संस्कृत भाषेचे सौंदर्य, वैशिष्ट्ये यांच्याबद्दल एव्हर्ट
यांनी प्रस्तावनेमध्ये समरसून लिहिले आहे. एव्हर्ट यांनी पूर्वी लॅटिन आणि ग्रीक
भाषांचा अभ्यास केलेला आहे. पुढील काळात त्यांनी संस्कृतचे अध्ययन केल्यावर
त्यांना या भाषेची व्याप्ती आणि प्रभाव लक्षात आला. ते संस्कृतला लॅटिन आणि ग्रीक
भाषांची 'थोरली बहीण' म्हणतात.
"संस्कृत ही प्राचीनतम भाषा असून, असून
ती एक दैवी देणगीच आहे. ती रहस्यमय, आहे, चित्रदर्शी/चित्रमय आहे, सांस्कृतिक धारणा करणारी
आहे" असे ते प्रस्तावनेत लिहितात.
पाश्चात्यांना झालेले संस्कृतचे दर्शन, त्यांचा संस्कृतकडे पाहण्याचा दृष्टिकोन, संस्कृत भाषेचा
पाश्चिमात्य भाषांवर आणि तेथील लेखक, कवी, नाटककारांवर असणारा प्रभाव याचे सविस्तर विवेचन हा एव्हर्ट यांच्या
प्रस्तावनेचा सर्वात लक्षवेधी भाग आहे. पुस्तकाचा अपेक्षित वाचक डच भाषिक (म्हणजेच
युरोपीय वातावरणाच्या प्रभावाखालचा) असला तरीही ही प्रस्तावना आपणा
भारतीयांसाठीही अतिशय महत्वाची आणि जिव्हाळ्याची ठरावी.
इसवीसनपूर्व काळात भारतावर स्वारी केलेला अलेक्झांडर, तसेच भारतामध्ये आलेले प्रवासी यांच्यानंतर (साधारण पाचव्या-सहाव्या
शतकानंतर) संस्कृत भाषेचा पाश्चात्य जगाशी असलेला थेट संपर्क कमी होत गेला. काही शतकांचा
खंड पडल्यानंतर पाश्चात्य वसाहतवादी लोक व्यापाराच्या बहाण्याने भारतामध्ये आले,
तेव्हा त्यांना संस्कृत ही काय चीज आहे याची कल्पनाच नव्हती. त्यात सुरुवातीला आले
पोर्तुगीज. अतिशय धूर्त असणाऱ्या पोर्तुगीजांनी 'व्यापार'
हा उघड उद्देश आणि 'स्थानिक भारतीयांचे
धर्मांतर' हा छुपा उद्देश या दोन्ही हेतूंनी भारतातील भाषा,
धर्म, संस्कृती यांचा अभ्यास करण्यास सुरुवात
केली. आपल्या सोबत त्यांनी आणलेल्या अभ्यासू परंतु धर्मांध जेझुईट मिशनऱ्यांनी या
अनुषंगाने सखोल अभ्यास केला. संस्कृतचे अध्ययन याच अभ्यासाचा भाग होता.
त्यानंतर नेदरलँड्स (हॉलंड) या देशातून 'डच ईस्ट इंडिया कंपनी'तर्फे व्यापारी म्हणून आलेल्या
आलेल्या डचांनी जेझुईट मिशनऱ्यांची सद्दी संपवली, परंतु
संस्कृत आणि संस्कृतीच्या अभ्यासाची परंपरा चालूच ठेवली. काही काळाने चिवट इंग्रज
आले आणि त्यांनी डचांची जागा घेतली आणि त्यांनी हा अभ्यास वेगळ्याच उंचीवर नेला.
१७८४ साली मुख्य न्यायाधीश सर विल्यम जोन्स याने भारत
आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. युरोपीय भाषांच्या मोठ्या गटाची मुळे एकाच समान
भाषेत असल्याचा सिद्धांत सर्वप्रथम मांडणारा हा अभ्यासक होता. परंतु अशी सामायिक
मूळ भाषा असण्याची शक्यता ज्याने जोन्सच्याही आधी वर्तवली होती, तो होता नेदरलँड्समधील लायडन विद्यापीठातील प्राध्यापक मार्कुस झ्वेरियुस
(१६१२-१६५३). त्याच्या अभ्यासाचा विल्यम जोन्सला उपयोग झाला. जोन्सने २ फेब्रुवारी
१७८६ मध्ये एशियाटिक सोसायटीच्या सभेमध्ये ग्रीक, पर्शियन,
लॅटिन अशा जुन्या भाषांची जननी संस्कृत असल्याचा सिद्धांत मांडला.
"स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या
आणि त्यामुळे भारताकडे तुच्छतावादी दृष्टिकोनातून पाहणाऱ्या इंग्रज
वसाहतवाद्यांच्या दृष्टीने हा सिद्धांत म्हणजे मोठाच धक्का होता. आपल्याहून
श्रेष्ठ कुणी असू शकते हे पचवणेच त्यांच्यासाठी कठीण होते” अशी टिप्पणी एव्हर्ट
करतात. संस्कृत भाषेबद्दलचे हे तथ्य इंग्रजांच्या ध्यानात आल्यावर त्यांची संस्कृतबद्दलची
उत्सुकता आटलीच. ती इतकी की नजीकच्या भविष्यात त्यांनी इंग्लंडमधील प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये
संस्कृतच्या अध्ययन-अध्यापनासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही. युरोपमधील संस्कृत
भाषेचे पहिले अध्यासन इ.स. १८१४ मध्ये पॅरिसमधील सॉबॉन विद्यापीठातील ‘कॉलेज द फ्रान्स’ या महाविद्यालयामध्ये सुरू झाले. या
महाविद्यालयातला आंत्वान-लिओनार्द द शेजी याला युरोपमधील पहिला संस्कृत प्राध्यापक
बनण्याचा मान मिळाला. युरोपातील दुसरे संस्कृत अध्यासन इ. स. १८१८ मध्ये जर्मनीमध्ये
सुरू झाले. ऑगस्ट विलहेल्म श्लेगेल हा या तिथला संस्कृतचा पहिला प्राध्यापक होता. त्यानंतर
१४ वर्षांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठात संस्कृत अध्यासन सुरू झाले. म्हणजेच विल्यम
जोन्सच्या संस्कृत-सिद्धांताच्या सादरीकरणानंतर इंग्रजांना त्या सांस्कृतिक
धक्क्यातून बाहेर येऊन संस्कृत भाषेचे व्यापक स्तरावर शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन-अध्यापन
आवश्यक आहे हे पटायला ४६ वर्षे जावी लागली.
विल्यम जोन्स याने संस्कृत भाषेबाबत सैद्धांतिक
मांडणीसोबतच संस्कृतमधील साहित्याचे इंग्रजीत भाषांतर करण्याचेही महत्वाचे कार्य
केले. त्याने इ. स. १७८९ कालिदासाच्या शाकुंतल नाटकाचे इंग्रजीत भाषांतर केले. या
निमित्ताने कालिदासाच्या साहित्याचा पाश्चात्य भाषेत प्रथमच प्रवेश झाला. या
भाषांतरावरून शाकुंतलाचे इ.स. १७९१ मध्ये प्रथम जर्मन भाषेत आणि नंतर त्यावरून डच
भाषेमध्ये भाषांतर झाले. संस्कृतचा इंग्रज प्राध्यापक होरास विल्सन याने इ. स.
१८१३ मध्ये मेघदूत इंग्रजीत नेले आणि युरोपला सर्वप्रथम या काव्याची ओळख झाली आणि
मेघदूताची मोहिनी युरोपला पडत गेली. या सुमारास युरोपमध्ये 'रोमँटिक ओरिएंटलिझम' म्हणून ओळखले जाणारे जे साहित्य
निर्माण झाले त्यामध्ये मेघदूताच्या युरोपावरच्या प्रभावाचा मोठा वाटा होता.
युरोपातील अनेक कवी, लेखक, नाटककारांवर कालिदासाचा प्रभाव कसा पडला होता याची उदाहरणे एव्हर्ट यांनी
दिली आहेत. इंग्लंडमध्ये लॉर्ड बायरॉन (१७७२ - १८३४),
टेलर कॉलेरीज (१८८२-१९३४), सुप्रसिद्ध कवी
पर्सी शेली (१७९२ - १८२२) यांनीही कालिदासाकडून
प्रेरणा घेतली होती. मेघदूताच्या उत्तरमेघामध्ये यक्ष कालिदासाला आपली पत्नी ज्या
खोलीमध्ये झोपली आहे, त्या खोलीच्या गवाक्षापाशी तिला जाग येणार नाही अशा बेताने
जायला सांगतो. शेलीच्या ‘द इंडियन सेरनेड’ या कवितेमध्ये या संकल्पनेचे स्पष्ट प्रतिबिंब
दिसते, असे एव्हर्ट मानतात. कालिदासाची असामान्य प्रतिभा पाहून "कालिदास हा पूर्वेकडचा शेक्सपियर आहे" असे
इंग्रज म्हणू लागले. यावर "शेक्सपियर हा पश्चिमेकडचा
कालिदास आहे, हे विधानही तितकेच योग्य आहे" अशी टिप्पणी एव्हर्ट करतात.
जर्मन साहित्यिकांनाही कालिदासाचे मोहित केले होते.
नाटककार, कवी फ्रिडरिश शिलर (१७५९ - १८०५)
याच्या 'मारिया स्टुअर्ट' या
कवितेमागची प्रेरणा मेघदूत हीच होती. प्रसिद्ध कवी, नाटककार,
शास्त्रज्ञ योहान वुल्फगॅंग व्हॉन गोएथे (१७४९ - १८३२) याने इ. स.
१८१३ मध्ये मेघदूताचे जर्मन भाषेमध्ये भाषांतर केले. गॉथे कालिदासाच्या शाकुंतलम्
नाटकानेही भारावला होता. शाकुंतलाच्या सुरुवातीला
शंकराची आराधना करून त्याचे आशीर्वाद घेतले आहेत. त्यानंतर
सूत्रधार व नटी प्रेक्षकांसमोर येऊन त्यांच्यासमोर सुंदर, अर्थपूर्ण
रचना सादर होईल याबद्दल आश्वस्त करतात. या रचनेचा गोएथेच्या 'फॉस्ट' या नाटकाच्या प्रारंभावर प्रभाव आहे. शाकुंतल नाटकाचा ऑस्ट्रियन कवी फ्रान्झ शूबर्ट याच्यावर एवढा प्रभाव पडला
की, त्याने १८२० साली चक्क 'शाकुंतल' याच
नावाचा ऑपेरा लिहिला!
नेदरलँड्समधल्या लेयडन विद्यापीठातील अरेबिक भाषेचे
अभ्यासक प्राध्यापक एच. ए. हमाकर यांचा संस्कृतचाही अभ्यास होता. कवी विलेम
बिल्डरडाइक (१७५६ - १८३१) याने १८१८ साली लिहिलेल्या ‘फादरलाईक झुख्त’ (Vaderlijke
Zucht - पित्याचा उसासा) या कवितेमध्ये पिता
दूरवरच्या आपल्या मुलाला संदेश पाठवण्यासाठी ढगाचे सहाय्य्य घेण्याचा विचार करतो,
परंतु ढग म्हणजे सजीव गोष्ट नाही हे त्याच्या ध्यानात येऊन तो
भानावर येतो. या कवितेत बिल्डरडाइकने कालिदासाचाही उल्लेख केला आहे.
हेन्ड्रिक कास्पर केर्न (१८३३ - १९१७) हा इ. स. १८६५ मध्ये नेदरलँड्समधील लेयडन विद्यापीठातला संस्कृतचा पहिला
प्राध्यापक बनला. लेयडन विद्यापीठात संस्कृत अध्यापनाची एवढी जुनी परंपरा असतानाही
मेघदूताचे भाषांतर डच भाषेत व्हायला अजून एक शतक जावे लागले. ॲमस्टरडॅम
विद्यापीठातील जे. आर. ए. लोमन या प्राध्यापकाने १९५४ मध्ये मेघदूताचे प्रथम डच
भाषेत भाषांतर केले. हे मूळ काव्याशी प्रामाणिक राहून केलेले भाषांतर होते,
परंतु ते शब्दश: केले गेल्याने मूळ काव्यातली प्रसन्नता हरवली,
असे एव्हर्ट यांचे मत आहे. "मुळात हे
भाषांतर १९५४ सालातले आणि त्यातही लोमनच्या भाषेची धाटणी तर १९३५ सालातली वाटावी
अशी. त्यामुळेच मला मेघदूत पुन्हा एकदा आजच्या डच भाषेत आणावेसे वाटू लागले"
असे एव्हर्ट सांगतात.
अशा प्रकारे संस्कृत-कालिदास-युरोप असा विस्तृत पटच
एव्हर्ट यांनी आपल्या प्रस्तावनेतून मांडला आहे. कालिदासाच्या प्रतिभावेलीवर
उमललेल्या साहित्यपुष्पांचे परागकण किती दूरवर विखुरले होते याची या प्रस्तावनेतून
प्रचिती येते. कालिदासाची युरोपीय साहित्यावर असणाऱ्या मोहिनीबद्दल वाचत असताना
अचंबा, अप्रूप आणि अभिमान यांनी मन भरून
आल्याशिवाय राहत नाही. सौंदर्यदृष्टी, टवटवीतपणा, उदात्तता हे कालिदासाच्या साहित्यातले गुण कळत-नकळतपणे या साहित्यिकांच्या
कलाकृतींमध्ये कुठे ना कुठे उतरले. कालिदासाच्या अनुषंगाने युरोपीय कवी आणि
नाटकारांचा वेध घेत असतानाच एव्हर्ट यांनी एका आधुनिक भारतीय महाकवीची आवर्जून
दाखल घेतलेली आहे. हा महाकवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर! रवींद्रनाथांनी 'मेघदूत' या नावानेच लिहिलेली संपूर्ण कविता एव्हर्ट
यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये देत त्यातल्या सौंदर्याचेही विवेचन केले आहे.
एव्हर्ट यांच्या अभ्यासाची खोली किती आहे याची या
चुणूक प्रस्तावनेतच मिळते. त्यापुढचे संपूर्ण पुस्तक म्हणजे एव्हर्ट यांच्या
व्यासंगाची व्याप्ती दाखवून देणारा अनुभव आहे. इतिहास, कला यांच्याविषयी असणारा त्यांचा अभ्यास, स्थलकालाचे
भान यामुळे हे पुस्तक म्हणजे बौद्धिक मेजवानीच बनले आहे. युरोपीय वाचकाला मेघदूत आणि
कालिदासासोबतच भारतीय परंपरा, संस्कृती, भूगोल यांचा परिचय
व्हावा या तळमळीतून हे पुस्तक साकारले आहे, पण एक भारतीय वाचक म्हणून वाचन करत
असताना आपल्या ज्ञानाचा परीघही निश्चितपणे रुंदावतो. विवेचनाच्या ओघामध्ये एव्हर्ट
आपल्याला युरोपीय कलाकृती, विद्वानांचे अभ्यासविषय यांमधूनही
फेरफटका मारून आणतात.
***
टेनिसपटू असणारे एव्हर्ट कालिदासरंगी कसे रंगले आणि कालिदासाच्या
काव्याचा अनुवाद करता करता त्यांच्या पुस्तकाचे रूपांतर भारताचे सांस्कृतिक दर्शन
घडवणाऱ्या गवाक्षामध्ये कसे झाले, याबद्दल मला कुतूहल
लागून राहिले होते, म्हणून या विषयावर त्यांच्याशी सविस्तर
गप्पाच मारल्या.
आयुष्याच्या पूर्वार्धात खेळाचे मैदान गाजवून
उत्तरार्धात संस्कृतचे विद्यार्थी म्हणून दुसरी इनिंग सुरु केलेले आणि त्यातही
प्रावीण्य मिळवणारे एव्हर्ट श्नायडर म्हणजे भारदस्त, तरीही विनयशील
व्यक्तिमत्व. १९४२ साली जन्मलेले एव्हर्ट हे नेदरलॅंड्सच्या उत्कृष्ट टेनिसपटूंपैकी
एक. ते १९६०च्या दशकात अमेरिकेन ओपन टेनिस आणि नेदरलॅंड्सकडून डेव्हिस चषक स्पर्धाही
खेळले आहेत, हे सांगितले तरी त्यांच्या टेनिसमधल्या
नैपुण्याची कल्पना येईल. भारताचे महान टेनिसपटू रामनाथन कृष्णन यांच्यावर मिळवलेला
विजय ही आपल्या टेनिस कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी आहे, असे
एव्हर्ट मानतात. अशी व्यक्ती टेनिस खेळण्याच्या निमित्ताने भारतात येते, इथल्या
संस्कृतीमुळे, संस्कृत भाषेमुळे प्रभावित होते, एवढेच नव्हे तर स्वतः संस्कृत भाषा शिकून त्या भाषेतील काव्याचा अनुवाद
करण्याइतके त्या भाषेवर प्रभुत्व मिळवते हे सारेच विलक्षण आहे.
१९८१ साली 'इंडियन इंटरनॅशनल लॉन
टेनिस क्लब'तर्फे आलेल्या आमंत्रणावरून एव्हर्ट दिल्लीमध्ये
आले. तिथल्या टेनिस क्लबमधल्या सोयीसुविधा पाहून त्यांना सुखद आश्चर्य वाटले.
संध्याकाळी स्वागतसमारंभात त्यांना भाषण द्यायचे होते. एव्हर्ट दिल्लीमध्ये
ज्यांच्याकडे राहत होते त्यांनी एव्हर्ट यांना काही हिंदी शब्द आणि त्यांचे उच्चार
शिकवले. भारताशी आणि भारतीय भाषेशी आलेल्या संपर्काने एव्हर्ट यांच्या मनात
लहानपणापासून सुप्तावस्थेत असलेल्या संस्कृत भाषा शिकण्याच्या इच्छने उचल खायला
सुरुवात केली. त्यानंतर पुढच्या काही वर्षांत एव्हर्ट यांनी भारतामध्ये तीन-चार
वेळा सपत्निक प्रवास केला. भारतात ते भरपूर फिरले. या देशाने त्यांच्यावर मोहिनीच
घातली. यातून आणि टेनिसच्या माध्यमातून त्यांचे भारताशी संबंध दृढ होऊ लागले.
इथल्या संस्कृतीचा त्यांना परिचय होऊ लागला. आता मात्र संस्कृत शिकण्याची ऊर्मी
दाबून ठेवणे त्यांना कठीण झाले.
अखेर एव्हर्ट यांनी ॲमस्टरडॅम विद्यापीठातून निवृत्त
झालेल्या प्राध्यापकांनी ॲमस्टरडॅम येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट’ या नावाने चालवलेल्या अभ्यासकेंद्रामध्ये इ.स. १९९० मध्ये संस्कृत
शिकण्यास सुरुवात केली. पुण्याचे संस्कृततज्ज्ञ शिवराम दत्तात्रय जोशी यांच्यासोबत
संस्कृतमध्ये संशोधनकार्य केलेले डॉ. जे. ए. एफ. रूडबर्गन हे एव्हर्ट यांचे प्रमुख
शिक्षक होते. तसे पाहता ‘इंडियन इन्स्टिट्यूट’ ही अधिकृत शिक्षणसंस्था अथवा विद्यापीठ नाही. पण तरीही एव्हर्ट यांचे
विचार, अनुभव ऐकताना त्यांना या ‘इंडियन इन्स्टिट्यूट’मध्ये किती उत्तम दर्जाचे,
शिस्तबद्ध शिक्षण मिळाले असेल याची कल्पना येते.
युरोपीय व्यक्तीसाठी संस्कृत शिकणे सोपे नाही याची
जाणीव असल्याने मी एव्हर्ट यांना विचारले, "संस्कृत भाषा अतिशय
काटेकोर आहे. त्यामध्ये शब्दांची रूपे, गण वगैरे तोंडपाठच
करावी लागतात. डच भाषा इतकी नियमांनी काटेकोर बांधली गेली आहे का? संस्कृत शिकताना तुम्हाला काय अडचणी आल्या?" त्यावर
एव्हर्ट यांनी संस्कृत शिकणे अत्यंत अवघड गेल्याचे सांगितले. ते म्हणाले
"डच भाषेचे व्याकरण संस्कृतपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
संस्कृतमध्ये मूळ शब्दाला विविध प्रत्यय लागून शब्दाची वेगवेगळी रूपे होतात. परंतु
डच अथवा इंग्रजीमध्ये असे होत नाही. उदा. ‘शिव’ हा मूळ शब्द असेल तर त्याचा संस्कृत वाक्यात उपयोग करताना ‘शिवाय’ असे त्याचे रूप होऊ शकते (उदा. ‘ओम नमः
शिवाय’), पण इंग्रजी मध्ये Shiva या मूळ शब्दात बदल न होता
शब्दापूर्वी ‘to’ लागून ‘to Shiva’ असा
त्याचा वाक्यात उपयोग होतो. तुम्हाला शब्दांच्या संधीचे नियम कळले तरच तुम्ही
संस्कृत भाषा व्यवस्थित शिकू शकता.. समास ही देखील अशीच कठीण गोष्ट आहे.” संधी आणि समासांच्या गुंफणीमुळे होणारी सलग आणि लांब ओळ हे संस्कृत
शिकणाऱ्या भारतीयांपुढेही आव्हानच असते, मग एव्हर्ट
यांच्यासारख्या युरोपीय व्यक्तीला ते समजून घेणे किती कठीण गेले याची आपण कल्पना
करू शकतो. “कालिदासाच्या काव्यपंक्ती तर अर्धा मैल लांब
असतात" असे एव्हर्ट हसतहसत म्हणतात.
संस्कृतची मुळाक्षरे गिरवण्यापासून सुरू झालेला एव्हर्ट
यांचा अभ्यास भगवद्गीता आणि उपनिषदांपर्यंत गेला. कठोपनिषद हे त्यांना सर्वोत्तम उपनिषद
वाटते. श्लोकसंख्या कमी असणारे परंतु व्यापक विचार मांडणारे ईशोपनिषद त्यांना
विशेष भावते. संस्कृत अध्ययनासोबतच एव्हर्ट यांनी भारतीयांशी संवाद साधून धर्म, संस्कृती, इतिहास यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून
घेतले. या सर्व गोष्टींचे ज्ञान असणे संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी आणि या भाषेतील
साहित्याचा अनुवाद करण्यासाठी आवश्यक आहे, असे ते मानतात.
आजही एव्हर्ट भारतातल्या घडामोडींकडे लक्ष ठेवून असतात.
संस्कृतसोबतच्या या प्रवासात स्वाभाविकपणे त्यांनी
अभिजात संस्कृत साहित्याचाही अभ्यास केला. जयदेवाचे गीतगोविंद आणि अन्य कवींची काव्येही
वाचली. संस्कृत भाषा खोलात जाऊन शिकणाऱ्या प्रत्येकाच्या प्रवासातले मोहक वळण असते, ते म्हणजे कविकुलगुरू कालिदास! एव्हर्ट
यांच्या अध्ययनप्रवासात कालिदासाशी त्यांचा परिचय इ. स.१९९४ मध्ये आला.
मेघदूताच्या पहिल्या दहा कडव्यांनीच एव्हर्ट यांच्या मनाचा ठाव घेतला. हे
आत्तापर्यंत कधीही न अनुभवलेले, विलक्षण सखोल असे काहीतरी
आहे याची त्यांना जाणीव झाली. याचा अधिक अभ्यास करावा असे वाटू लागले आणि त्यातूनच
मेघदूताच्या सौंदर्याच्या असंख्य पाकळ्या त्यांच्यासमोर उमलू लागल्या.
"सर्व कवींमध्ये कालिदासच विशेष
का वाटतो आणि कालिदासाच्या सर्व साहित्यामध्ये मेघदूतच त्यांना सर्वात का आवडते?"
या माझ्या प्रश्नावर त्यांनी कालिदास अगदी मार्मिकपणे उलगडून
सांगितला. "कालिदासाचे 'कुमारसंभव'
हे अस्सल भारतीय काव्य आहे. परंतु सर्व प्रदेशांतील लोकांना समजेलच
असे नाही. मेघदूत मात्र एकाच वेळी भारतीय मुळांना धरून असलेले आणि तरीही वैश्विक
जाणीव असणारे काव्य आहे. यातला कालिदास मला प्रसिद्ध डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन
गॉगसारखा वाटतो. व्हॅन गॉग आकलनाच्या, जाणिवांच्या सीमा
ओलांडून जायचा सतत प्रयत्न करायचा. मेघदूतातला कालिदासही बंधनांच्या पार गेलेला,
मुक्तविहारी आहे. उंच आभाळातून विहरत जाणाऱ्या मेघाला जमिनीवर काय दिसेल, हे
सांगताना कालिदासाला उद्यानातील फुले खुडणाऱ्या स्त्रियांच्या कपाळावर साचलेल्या
घामाच्या थेंबांचेही भान आहे. एवढे सूक्ष्म-तरल कोण लिहू शकतो? कालिदासशिवाय अन्य कुणीच नाही! वाचकाला जे जे माहित असले पाहिजे ते ते
सर्व काही कालिदासाने मेघदूताच्या पहिल्याच कडव्यामध्ये सांगितले आहे. यक्ष मूळचा
कुठला आहे, तो सध्या कुठे आणि का राहतो आहे, कुणाची वाट बघतो आहे, त्याची मानसिक अवस्था काय आहे
आहे, एवढ्या सर्व
गोष्टी त्यांनी केवळ एकाच श्लोकामध्ये सांगितले आहे. कमी शब्दांमध्ये खूप काही
सांगून जाणे हा कालिदासाचा काव्यविशेष आहे."
मेघदूत ही सुखांतिका नाही, असे एव्हर्ट यांचे मत आहे. ते म्हणतात "तसे
ठामपणे सांगता येत नाही. कारण मेघ यक्षाचा निरोप घेऊन अलकानगरीत जाईल असे म्हटले
आहे. तो खरेच तिथे पोहोचला की नाही, तिथून त्याने
यक्षपत्नीचे क्षेमकुशल कळवणारा संदेश आणला की नाही, याबद्दल
कालिदासाने काहीच सांगितलेले नाही. कालिदास हे सर्व वाचकावरती सोडतो आहे. हीच
गोष्ट कालिदासाचे वेगळेपण सिद्ध करते. मला असे वाटते की, ‘मेघदूत
ही सुखांतिका नाही’ असा विचार करणारा मी एकटाच असेन. मी मेघदूतावरचे अनेकांचे
भाष्य वाचले, परंतु मला कोणीच असा विचार केलेला दिसला नाही."
एव्हर्ट यांचे मत सर्वांनाच पटेल असे नाही. पण एखादी व्यक्ती
आपल्याला भावलेल्या साहित्यकृतीबद्दल किती सखोल विचार करत असते, हेच यातून जाणवले. एकाच कलाकृतीचा अन्वयार्थ प्रत्येक व्यक्ती आपापल्या
परीने कसा वेगवेगळ्या प्रकारे लावत असते हे पाहणे अतिशय रंजक असते.
एखादी भाषा भाषा शिकणे याहूनही अधिक आव्हानात्मक गोष्ट
म्हणजे त्या भाषेतील साहित्याचा अनुवाद करणे. त्यातही ती भाषा संस्कृत असेल तर
त्या भाषेचे असंख्य बारकावे विचारात घेऊन त्यावर काम करणे अजूनच कठीण. "मेघदूताच्या अनुवादासाठी तयारी कशी केलीत?" या
प्रश्नावर एव्हर्ट म्हणाले, "अनुवादाला सुरुवात
करण्यापूर्वी मला अनेक गोष्टी माहिती नव्हत्या. उदा. मेघांचे प्रकार कोणते याचीही मला
कल्पना नव्हती. मी त्यांचा अभ्यास केला. मेघांचे विविध चित्रांमधले सादरीकरण कसे
आहे याचा अभ्यास केला. मला माझे अनुवादाचे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला कळू शकेल,
त्याला ते आकर्षक वाटेल अशा प्रकारे मांडणी करायची होती.
मेघदूतामधला मेघ प्रवास करताना ज्या गोष्टी बघणार आहे - मग ते प्राणी असतील,
वनस्पती असतील, सांस्कृतिक ठसे असतील - त्या
नक्की कशा आहेत हे वाचणाऱ्याला समजावे, हाही उद्देश
डोळ्यांसमोर होता. इथले सांस्कृतिक वैविध्य समजावे हा प्रयत्न होता. मेघदूताचे
कथानक कालातीत आहे. ते एका अर्थाने अस्सल भारतीय आहे. कसे त्याचे उदाहरण देतो.
यक्ष मेघाला म्हणतो, 'तू माझ्या पत्नीसमीप पोहोचशील तेव्हा
ती तुला दुःखी दिसेल, कारण तिथे मी नाहीये'. ही भावना अगदी अस्सल भारतीय आहे!! पण मेघदूताने साकारलेला पट लक्षात
घेतला तर तो अगदी अ-भारतीय आहे, आणि त्यामुळेच ते भारताबाहेरच्या लोकांनाही भावेल,
असा आहे. मेघदूताचा नुसता अनुवाद करणे पुरेसे होणार नाही हे याची मला कल्पना होती.
म्हणून मी विशेष प्रयत्न केले."
कालिदासाच्या काव्यातून दिसणारी स्वच्छंदी वृत्ती
दुसऱ्या भाषेत नेणे हे काम अवघड होते. पण एव्हर्ट यांनी हे शिवधनुष्य पेलले. युरोपीय
वाचकाला हे काव्य दूरवरचे, अपरिचित भवतालातले वाटणार नाही याकडे त्यांनी लक्ष
दिले. मेघदूताशी मिळतीजुळती संकल्पना, वातावरण असणाऱ्या जर्मन,
इंग्रजी, डच कविता अभ्यासल्या. मेघदूत हे
काव्य मंदाक्रांता वृत्तातले आहे. डच कवितेमध्ये वृत्त (ज्याला इंग्रजीमध्ये 'मीटर' म्हणतात) ही गोष्ट अस्तित्वात नाही. तरीही
त्यांनी संस्कृत काव्यात असलेला ओघ, लय डच भाषेमध्ये जाताना
लुप्त होणार नाही याकडे लक्ष दिले. अनुवाद करून झाल्यानंतर त्यांनी तो संस्कृत
व्याकरणाबद्दल अत्यंत काटेकोर असणाऱ्या संस्कृततज्ज्ञ मायके मुल्डर यांच्याकडून
तपासून घेतला. "अनुवाद कसा झाला आहे हे जाणून
घेण्यासाठी जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा तर मी अक्षरशः थरथरत होतो. पण त्यांनी
माझ्या संपूर्ण अनुवादातली फक्त एक चूक काढली, आणि तीही कितव्या
श्लोकामध्ये झाली असावी याची मला कल्पना होती. त्यांची एकूण अनुवादावरची
प्रतिक्रिया ऐकून मला अतिशय आनंद झाला. मला या अनुवादासाठी त्यांचे आशीर्वाद
मिळाले, हे मी माझे भाग्यच समजतो" असे सांगताना एव्हर्ट
यांचा चेहरा उजळलेला असतो.
****
जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादी कल्पना मनापासून
आपलीशी वाटते तेव्हा ती प्रत्यक्षात आणताना सर्वोत्तम स्वरूपातच आणण्यासाठी किती
मेहनत घेऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे एव्हर्ट यांचे हे पुस्तक. त्यांनी भाषेच्या
अनुषंगाने खूप कष्ट घेतले आहेतच, पण या पुस्तकाच्या मांडणीसाठी घेतलेली मेहनत
जाणून घेतल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर दुणावतो.
मेघदूताचा अनुवाद करायला हवा असे एव्हर्ट यांना वाटू
लागल्यावरही त्यांनी त्यासाठी त्यांनी कुठलीही घाई-गडबड केली नाही. संस्कृत भाषा, हिंदू संस्कृती यांच्या अभ्यासासोबतच हे पुस्तक कशा पद्धतीने वाचकांसमोर
आले तर अधिक प्रभावी ठरेल यावर त्यांनी सखोल विचार केला आणि तो प्रत्यक्षातही
पुरेपूर उतरल्याचे पुस्तकावर नजर टाकल्यावर दिसून
येते. पुस्तकाच्या सुरुवातीलाच भारताच्या नकाशावर
कालिदासाच्या मेघाच्या रामटेक ते कैलास-मानसरोवर भ्रमणाचा मार्ग रेखाटला आहे.
त्यानंतर मेघदूताच्या पूर्वार्धातील एकेका कडव्याचा पद्यानुवाद, त्यासोबत त्या कडव्याच्या अनुषंगाने येणारे सांस्कृतिक संदर्भ, आवश्यकतेनुसार भौगोलिक नोंदी, सोबत अधिक स्पष्टता
येण्यासाठी छायाचित्र, रेखाचित्र अथवा आकृती, त्यासंदर्भात अधिक प्रकाश टाकणारी युरोपीय साहित्य अथवा अन्य
कलाक्षेत्रातील उदाहरणे, विशेष नोंदी अशी या पुस्तकाची एकंदर मांडणी आहे. डच अथवा
युरोपीयच नव्हे तर भारतीय वाचकांसाठीही हा मोठाच खजिना आहे. एका अर्थाने हा एक
छोटासा संस्कृतिकोशच आहे म्हटले तर वावगे ठरू नये. पुस्तकाच्या व्यापकतेबद्दल
कल्पना येण्यासाठी अधिक विस्ताराने सांगायला हवे.
मेघदूत काव्यामध्ये मेघ आपल्या प्रवासाच्या विविध
टप्प्यांमध्ये विविध रूपे घेतो. कधी तो पाण्याने जड होतो, तर कधी पाऊस पाडल्याने एकदम हलका होतो. शेवटच्या टप्प्यामध्ये तो बाहेरून
बर्फाळ आणि आतमध्ये मात्र पाणी धारण केलेला बनतो. कालिदासाचा केवळ कल्पनाविलास
नाही. ते शास्त्रीय सत्य आहे. मेघांच्या भौतिक रचनेची जाण कालिदासाला होती. हे
ज्ञान त्याला विक्रमादित्याच्या नवरत्नांपैकी असणारे महान शास्त्रज्ञ वराहमिहीर
यांच्याकडून मिळाले असावे, असे एव्हर्ट यांना वाटते. आकार
बदलणाऱ्या मेघांचे आकर्षण युरोपातील साहित्यामध्येही कसे दिसते हे सांगताना
एव्हर्ट ग्रीक, रोमन संस्कृतीतली, तसेच
शेक्सपियरच्या साहित्यातली उदाहरणेही देतात. यान फॅबरे या शिल्पकाराने साकारलेले
मेघांचे मोजमाप करणाऱ्या माणसाच्या शिल्पाचे छायाचित्र, तसेच
मेघांच्या अवस्थांचे चित्रण करणारी आणि सध्या संग्रहालयांमध्ये असणारी इतिहासप्रसिद्ध
पेंटिंग्जही पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्यांपैकी ल्यूक हॉवर्ड या अभ्यासकाने इ.स.
१८०८ च्या सुमारास काढलेले मेघांचे चित्र पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणून वापरले आहे.
यक्षाचा संदेश घेऊन जाणारा मेघ ज्या मार्गाने जाणार
आहे तिथल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचा इतिहास आणि सध्याचे स्वरूप, तिथल्या वन्यजीव आणि वनस्पती यांच्याबद्दलचे सचित्र शास्त्रीय तपशील
पुस्तकामध्ये दिले आहेत. युरोपीय वाचकाला भारतातला एखादा सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट
करून सांगण्यासाठी आणि त्यामध्ये त्या वाचकाला रस वाटावा यासाठी एव्हर्ट किती
तपशिलात जाऊन अभ्यास केला आहे याचे एक उदाहरण देतो. मेघ अंतिमतः ज्या
अलकानगरीमध्ये पोहोचणार आहे, ती नगरी हिमालयातील
कैलास-मानसरोवराच्या सान्निध्यातली आहे. त्यामुळे कैलास आणि मानसरोवर यांचे भारतीय
संस्कृतीमध्ये असणारे स्थान काय आहे हे सांगणे एव्हर्ट यांना आवश्यक वाटते.
त्यातूनच ते या स्थानांचे शंकराशी असलेले नाते, एक
तीर्थक्षेत्र म्हणून असलेले त्यांचे महत्व ते उलगडून दाखवतात आणि तेवढ्यावरच न
थांबता तिथे गेलेल्या प्रवाशांच्या ऐतिहासिक नोंदीही देतात. तिबेटमध्ये
धर्मप्रसारासाठी गेलेला इटालियन जेझुइट मिशनरी इप्पोलितो देसीदेरी (इ. स. १६२४),
गुरू नीलकंठ (इ. स. १७९३), बौद्ध असल्याचे
भासवून तीर्थयात्रेला गेलेला इंग्रज डॉ. विल्यम मूरक्रॉफ्ट आणि त्याच्यासोबत
असणारा अँग्लो इंडियन हैदरजंग हरसे (इ. स. १८१२), तिबेटच्या
इतिहासाचे आणि भूगोलाचे ज्ञान गाठीशी घेऊन गेलेला स्वीडनचा स्वेन हेडिन (इ. स.
१९०७) यांनी कैलास-मानसरोवर परिसर आणि तिथली तीर्थयात्रा यांसंदर्भात घेतलेले
अनुभव आणि केलेल्या नोंदी असे सारे रंजक तपशील एव्हर्ट वाचकासमोर ठेवतात आणि
कैलास-मानसरोवराचे जनमानसातील स्थान अधोरेखित करतात (इथे उल्लेख केलेला हेडिन तर
स्वत:सोबत होरास विल्सनने केलेला मेघदूताचा अनुवाद घेऊनच गेला होता. मेघदूताने
लेखक, अभ्यासक, प्रवासी अशा सर्वांनाच
असे प्रभावित केले आहे).
मेघदूत ही काळाच्या कसोटीवर उतरलेली एक अभिजात साहित्यकृती आहे, याचे पुरेपूर्ण भान या पुस्तकाची मांडणी आणि सजावट करताना ठेवण्यात आले आहे. ही सजावट करणाऱ्या तीन व्यक्ती म्हणजे स्वत: एव्हर्ट श्नायडर, रेखाचित्रकार हानेके मेईंडर्स-ग्रूनफेल्ड आणि डिझायनर गॉडफ्रेड वोन्क.
अलीकडच्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने पुस्तक अधिक आकर्षक करण्याच्या नादात भरपूर छायाचित्रे वापरण्याचा सोपा मार्ग अवलंबला जातो. परंतु ऐतिहासिक महत्वाच्या कलाकृतीवर असलेल्या पुस्तकामध्ये ऐतिहासिक महत्व असलेल्या चित्रांना, नकाशांना महत्वाचे स्थान आहे. वर उल्लेखलेली मेघांचे स्वरूप दाखवणारी चित्रे युरोपातील संग्रहालयातील आहेत. एव्हर्ट यांना स्वतःला नकाशांमध्ये विशेष रस आहे. मेघाच्या भ्रमणाचा मार्ग दाखवण्यासाठी भारताचा आधुनिक काळातला कुठलाही नकाशा त्यांना पुस्तकात दाखवता आला असता. पण त्यांनी आवर्जून डच ईस्ट इंडिया कंपनीच्या कागदपत्रांमधला इ.स. १६३६ मधला कलात्मक मूल्य असलेला चित्रमय नकाशा पुस्तकामध्ये समाविष्ट केला आहे. यामुळे पुस्तकाच्या सौंदर्यात भर पडतेच, परंतु पुस्तकाचा मुख्य विषय असलेल्या ऐतिहासिक महत्वाच्या कलाकृतीशी डच वाचक या डच दस्तावेजाच्या माध्यमातून अधिक सहजतेने जोडला जातो. ही कल्पकता वाखाणण्याजोगी आहे.
या पुस्तकासंदर्भात एव्हर्ट यांच्यासोबतच हानेके
यांच्याशीही मला संवाद साधायला मिळाला. एव्हर्ट यांच्याहूनही वयाने मोठ्या
असणाऱ्या (जन्म - १९३८) हानेके यांची आयुष्याच्या या टप्प्यावरही असणारी कार्यरतता, नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती थक्क करणारी आहे. त्या मूळच्या जीवशास्त्र
विषयातल्या तज्ज्ञ आहेत. सस्तन प्राणी हा त्यांच्या अभ्यासाचा आणि रेखाटनाचा विषय.
परंतु २०१५ साली (म्हणजेच वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यावर) त्यांनी
वनस्पतीशास्त्रातील रेखाचित्रांचा (बोटॅनिकल ड्रॉइंग) कोर्स केला आणि त्यातले
बारकावे त्या शिकल्या! एव्हर्ट यांच्याशी त्यांचा पूर्वीपासूनच परिचय होता.
एव्हर्ट यांनी आपल्या पुस्तकामधून काव्यानुवादासोबतच मेघदूतामधील वनस्पतीसृष्टी
आणि प्राणीसृष्टी यांचीही ओळख करून द्यायचे ठरवले आणि हानेके यांचा या प्रकल्पात
प्रवेश झाला. आपली कला आणि आपले ज्ञान पणाला लावून
त्यांनी पुस्तकासाठी अनेक स्केचेस काढली. अनेकदा तपशील व्यवस्थित दाखवण्यासाठी
पेंटिंगपेक्षाही स्केच अधिक प्रभावी ठरते, असे हानेके यांना
वाटते.
मेघदूतामध्ये उल्लेख असलेल्या अनेक वनस्पती अथवा वन्यजीव
नेदरलँड्स अथवा युरोपमध्ये आढळत नाहीत, त्यामुळे त्यांचे नक्की
स्वरूप कसे असते याचा अंदाज येणे कठीण होते, त्यामुळे हानेके यांना त्यांचे रेखाचित्र
कसे काढावे लक्षात येत नसे. तसेच वन्यजीव आणि वनस्पतींना असणाऱ्या संस्कृत
शब्दांना डच भाषेमध्ये प्रतिशब्द शोधणे हेही एक मोठेच काम होते. मग त्यांनी
शास्त्रीय आणि सांस्कृतिक संदर्भांची शोधाशोध सुरू केली. या शोधयात्रेमध्ये
त्यांना डच ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला प्रशासक आणि अभ्यासक हेन्रिक व्हॅन
ऱ्हीडे (१६३६ - १६९१) याचे 'हॉर्टस मलबारीकास' (मलबारचे उद्यान) हे पुस्तक
मिळाले. त्यामध्ये असणारी वनस्पतींची रेखाचित्रे, त्यांची
संस्कृत व लॅटिन नावे याची हानेके यांना खूप मदत झाली (मलबार, कर्नाटक आणि गोवा प्रांतातील तब्बल साडेसातशे वनस्पतींची रेखाचित्रांसहित
माहिती असलेले हे पुस्तक आणि त्याची निर्मिती हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे).
त्या लॅटिन नावांवरून हानेके आणि एव्हर्ट यांनी डच नावे शोधली. काही वनस्पती अशा
होत्या ज्यांना लॅटिनमध्येही नावे नव्हती. मग त्यांची शास्त्रीय ओळख पटवण्यासाठी
वेगळे प्रयत्न करावे लागले.
मेघदूतातील प्रत्येक संदर्भाचा एव्हर्ट आणि हानेके
अगदी खोलात जाऊन शोध घेतला आहे. 'राजहंस' म्हणजे नक्की कोणता पक्षी, याचा छडा लावण्यासाठी त्यांनी केलेला सूक्ष्म
विचार थक्क करणारा आहे. मेघदूतामध्ये मेघाबरोबर मानसरोवरापर्यंत प्रवास करतील,
अशा राजहंस पक्ष्याचे उल्लेख येतात. हंस म्हणजे इंग्रजी मध्ये गूज
(Goose) हे तर माहित होते, पण राजहंस म्हणजे नक्की कुठला
पक्षी हे दोघांच्या लक्षात येईना. कालिदास विनाकारण कशाचाही उल्लेख करणार नाही,
असा एव्हर्ट यांना ठाम विश्वास. मग त्यांनी वर उल्लेखलेल्या
प्रवाश्यांच्या नोंदी तपासल्या. शिवाय त्यामुळे एवढ्या उंचावरून एवढा मोठा प्रवास
करणारे, मानसरोवर परिसरात आजही दिसणारे पक्षी कुठले हे शोधले. अशा प्रकारचे दोन पक्षी
असल्याचे त्यांना कळले.
(१) बार हेडेड गूज (इंग्रजी नाव) अथवा ‘आन्सर
इंडिकस’ (शास्त्रीय नाव). मराठीत याला ‘पट्टकादंब’ असे नाव आहे.
(२) हूपर स्वान (इंग्रजी नाव) अथवा ‘सायग्नस
सायग्नस’ (शास्त्रीय नाव)
कालिदासाने यातल्या नक्की कुणाला राजहंस म्हटले आहे, हा पेच उभा राहिला. मेघदूतातील वर्णनानुसार राजहंसाची रंगछटा आषाढमेघाच्या
पार्श्वभूमीवर उठून दिसेल अशी असते, त्यामुळे हूपर स्वान याच
हाच कालिदासाने उल्लेखलेला राजहंस असणार, असा निष्कर्ष
दोघांनी काढला. एकदा हे निश्चित झाल्यानंतर मगच हानेके यांनी त्याचे स्केच काढले!
मला वाटतं, एव्हर्ट आणि हानेके यांचा व्यासंग आणि चिकाटी यांची कल्पना यायला हे
उदाहरण पुरेसे आहे (मारुती चितमपल्ली यांच्या पक्षिकोशामध्ये
‘बार हेडेड गूज’ या पक्ष्याची नोंद ‘राजहंस’ अशी आहे, तर हूपर स्वानला
‘धार्तराष्ट्र’ म्हटले आहे. परंतु राजहंसाची पारंपरिक साहित्यातली वर्णने आणि वर
म्हटल्याप्रमाणे असणारी रंगछटा यांचा विचार करता ‘हूपर स्वान म्हणजेच राजहंस’, हा एव्हर्ट
व हानेके यांचा निष्कर्ष अधिक योग्य वाटतो).
पुस्तकाच्या शेवटी एव्हर्ट यांनी रामटेक ते मानसरोवर
या मार्गावरील प्रत्येक महत्वाच्या टप्प्यांमधली अंतरे दिली आहेत. शिवाय मेघदूतामध्ये
उल्लेखलेल्या वनस्पती आणि वन्यजीवांची शास्त्रीय नावांसह थोडक्यात माहिती दिली
आहे. त्यानंतरच्या परिशिष्टामध्ये मेघदूतात उल्लेखलेल्या हिंदू देवदेवता आणि संकल्पनांची
माहिती दिली आहे उदा. राम, कृष्ण, सीता, अग्नी, कुबेर, पर्जन्य, सागर, सरस्वती,
यक्ष इ. संपूर्ण पुस्तक संपवून आपण शेवटच्या पानावर येतो तेव्हा विशेष म्हणजे
आपल्याला आणखी एक चकित करणारी गोष्ट दिसते. ती म्हणजे पुस्तकाच्या प्रकाशनाचे अस्सल
भारतीय नाव : 'चातक प्रकाशन'. ‘चातक
पक्षी फक्त पावसाचे ताजे पाणी पितो. मेघाच्या आगमनासोबतच असलेला चातक हा शुभशकुन
मानला जातो’ ही संकल्पना भावल्याने या पक्ष्याचे नावच एव्हर्ट यांनी आपल्या
प्रकाशनाला दिले आहे.
अशा विलक्षण व्यासंगातून साकारलेले हे पुस्तक २०१९
साली प्रकाशित झाले. हे पुस्तक एव्हर्ट यांनी स्वत:च प्रकाशित केले आहे. एव्हर्ट
आणि हानेके यांच्यासाठी वाचकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने मात्र हे पुस्तक
म्हणजे आंबटगोड अनुभव ठरला. ज्या सर्वसाममान्य डच वाचकासाठी एव्हर्ट यांनी हे
पुस्तक लिहिले आहे, त्यांच्याकडून या पुस्तकाला म्हणावा
तसा प्रतिसाद लाभला नाही, परंतु शिक्षण वर्तुळात मात्र या
पुस्तकाचे अत्यंत चांगले स्वागत झाले. अनेक जाणकारांनी पुस्तकाबद्दल अनुकूल
अभिप्राय दिले, कौतुकही केले. “तुम्ही यापुढेही
असे लिखाण करायला हवे” अशी अपेक्षा त्यांनी एव्हर्ट
यांच्याकडे व्यक्त केली.
हाच धागा पकडून मी एव्हर्ट यांना विचारले, “यापुढे अजून कुठल्या संस्कृत साहित्यकृतीचा डच मध्ये अनुवाद करायचा विचार
आहे का?” एव्हर्ट म्हणाले, “थेट अनुवाद
नाही, पण अनुवादाशी जवळून संबध असलेले पुस्तक मी लिहितो आहे.
‘युरोपच्या संस्कृतशोधाचा इतिहास’ हा त्याचा विषय आहे वर्षभर
लिहितो आहे. पण ते पूर्ण व्हायला अजून दोन-तीन वर्षे लागतील.” मेघदूताच्या अनुवादाच्या प्रस्तावनेमध्ये जे संक्षिप्त स्वरुपात वाचायला मिळते,
त्यावर विस्तृत ग्रंथ आकाराला येत आहे, ही शुभवार्ताच म्हणायला हवी!
“या विषयावर काही पुस्तके उपलब्ध आहेत. उदा. राजीव
मल्होत्रा यांचे ‘द बॅटल फार संस्कृत’. परंतु मला माझ्या पुस्तकामध्ये प्रामुख्याने
संस्कृतच्या प्रसारामध्ये भारतीय पंडितांनी महत्वाची भूमिका कशी निभावली, यावर प्रकाश
टाकायचा आहे.” इंग्रज ज्यांच्याकडून संस्कृत शिकले त्यापैकी काही प्रमुख पंडितांची
नावे वगळता इंग्रजांनी त्यांच्या नावांचे उल्लेखच केलेले नाहीत. माझ्या मते अठराव्या
शतकातल्या या पंडितांनीच अनेक संस्कृत ग्रंथांची भाषांतरे केली. त्यांची नावे युरोपमध्ये
कधीही ज्ञात झाली नाहीत, कारण त्यांच्याकडून जे युरोपीय अभ्यासक संस्कृत शिकले
त्यांनीदेखील त्यांचा उल्लेख फक्त ‘माझे गुरू’ एवढाच केला. अशा अल्पपरिचित संस्कृत
पंडितांचे कार्य खूप मोठे आहे. माझ्यामते युरोपीयांनी नव्हे तर या भारतीय पंडितांनी
खऱ्या अर्थाने संस्कृत जगासमोर आणले.” या पुस्तकाचे एव्हर्ट यांनी सध्यापुरते
ठरवलेले शीर्षक आहे ‘अबाऊट संस्कृत : अ हिस्ट्री ऑफ व्हालन्स, फेथ, डिसीट अँड
ग्रीड’.
हाच धागा पकडून एव्हर्ट पुढे विचारतात “कनॉट प्लेस या
ठिकाणाचे नाव तसे का आहे? ते तसे असणे हास्यास्पद
आहे. एखाद्या मोठ्या पंडिताचे त्या ठिकाणाला का दिले जाऊ शकत नाही?” भारतामध्ये
अनेक ठिकाणांची जुनी गुलामगिरी निदर्शक नावे बदलून आपल्या संस्कृतीशी नाते
सांगणारी नावे दिली जातात तेव्हा त्याला विरोध होतो, पाश्चात्त्य
जगातील एक व्यक्ती मात्र अशा स्वत्व दाखवणाऱ्या नावांचा आग्रह धरते ही गोष्ट विचार
करायला लावणारी आहे.
एव्हर्ट यांनी मेघदूतावर लिहिलेल्या पुस्तकावर
घेतलेल्या मेहनतीची दखल घेत नेदरलँड्समधील भारताच्या राजदूतांनी एव्हर्ट यांच्या ‘एन
वोल्क वोर्ट वोर्ड’ या पुस्तकाची भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या 'जागतिक संस्कृत पुरस्कारा'साठी शिफारस केली आहे. याबद्दल
विचारले असता एव्हर्ट म्हणाले, "माझ्यासाठी हा सुखद
धक्का आहे. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेल्या विद्वानांची नावे बघता माझी यासाठी
शिफारस होणे हाच मी माझा सन्मान समजतो. नेदरलँड्समध्ये संस्कृत प्रसाराच्या
दृष्टीने आमच्या परीने आम्ही प्रयत्न केले. या अनुषंगाने भारताचे राजदूत वेणू
राजमणी यांच्यासोबत काम करणे हाही मोठा सन्मान होता"
एव्हर्ट आपल्या परीने डच नागरिकांपर्यंत मेघदूत, कालिदास आणि संस्कृत हा विषय व्याख्यानांच्या माध्यमातूनही पोहोचवण्याचा
प्रयत्न करत असतात. "पण डच भाषा आणि संस्कृत यांच्यातील
थेट संबंध डच लोकांना उलगडून सांगितला तरीही त्यांच्यासाठी संस्कृत समजण्यासाठी,
शिकण्यासाठी अवघडच आहे," हे तथ्य एव्हर्ट
अधोरेखित करतात. संस्कृत भाषेतून शब्दांवरून डच भाषेमध्ये आलेल्या शब्दांची
उदाहरणे विचारली असता अशा शब्दांची यादीच एव्हर्ट यांनी दिली, ती अशी:
संस्कृत - डच
-------------------------------
काल - कॅलेंडर
शर्करा - सुकर
नेगोरी - नगरी
पद - पथ
पेपर - पिप्पली
द्री - त्रि
याशिवाय डच आणि इंग्रजीमध्ये जे जे शब्द 'ट्रान्स'पासून सुरु होतात त्या सर्वांचे मूळ ‘तृ’ या
मूळ संस्कृत धातूमध्ये आणि जे शब्द ‘क्र’ (Cr) पासून सुरू होतात (उदा. 'क्रिएटिव्ह') त्यांचे मूळ ‘कृ’ या संस्कृत धातूमध्ये
असल्याचे एव्हर्ट सांगतात.
एव्हर्ट यांनी मेघदूतप्रेमापोटी एक विलक्षण गोष्ट
केली आहे, ती म्हणजे मेघदूतातील मेघाच्या मार्गाने भ्रमण! हा प्रवास त्यांनी सलग
केला नसून चार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केला. दीड हजार वर्षांपूर्वी मेघदूतामध्ये
वर्णन केलेल्या अनेक गोष्टी आजही तशाच असल्याचे एव्हर्ट यांनी अनुभवले! फक्त प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून ते चीनच्या ताब्यात असलेल्या कैलास
पर्वतापर्यंतचा शेवटचा टप्पा मात्र ते पुरा करू शकले नाहीत. हिमालयातल्या प्रवासात
तर भूस्खलनाच्या एका घटनेतून ते नशिबानेच बचावले आणि त्यांना आपला प्रवास थांबवावा
लागला.
एकूण तीन हजार किलोमीटरचा प्रवास एव्हर्ट यांनी केला.
या संपूर्ण प्रवासाचा अनुभव विलक्षण असल्याचे ते सांगतात. त्यांच्या या
महत्वाकांक्षी प्रवासादरम्यान त्यांना भेटणारे अनेकजण अचंबित होत असत. अमरकंटक असो वा उज्जैन, मंदसौर असो वा कुरुक्षेत्र, "तुम्ही इथे काय करताय?" हीच सार्वत्रिक
प्रतिक्रिया त्यांना अनुभवायला मिळाली. याचे मुख्य कारण या भागांमध्ये परदेशी
प्रवासी अपवादानेच फिरकतात. या प्रवासातल्या मंदिरांच्या पुजाऱ्यांशी एव्हर्ट
आवर्जून बोलत असत. या मार्गावरची अनेक ठिकाणे आज पर्यटकांचे आकर्षणकेंद्रे नाहीत.
तरीही एव्हर्ट यांनी त्या ठिकाणांना भेटी देईल्या. अशा ठिकाणी स्वतः घेतलेली
छायाचित्रे एव्हर्ट यांना आपल्या पुस्तकासाठी उपयोगी ठरली आहेत.
एकीकडे पाश्चिमात्य देशांमध्ये संस्कृतविषयी कुतूहल
वाढत असताना हा ज्या देशाचा मूळ वारसा आहे, त्या भारतामध्ये मात्र
संस्कृतबद्दल उदासीनता दिसून येते. संस्कृतभारती आणि अन्य काही संस्थांचे संस्कृत
प्रसारासाठी मोठे प्रयत्न चालू आहेत, पण एकूण लोकसंख्येच्या
मानाने संस्कृत भाषा जाणाऱ्यांची संख्या खूपच नगण्य आहे. लोक संस्कृतबद्दल जागरूक
नाहीत. याबद्दल विषय छेडला असता एव्हर्ट म्हणाले, "भारतात मी
अनेक वर्षे येत आहे. मला छोटे छोटे बदल दिसत आहेत. हॉटेलच्या लॉबीमध्ये मला 'वेलकम’चे फलक दिसायचे. आता ‘सुस्वागतम’ लिहिलेले दिसते. मी महाराष्ट्रात
बराच फिरलो आहे. पूर्वी मला छोट्या छोट्या गावातली शाळेच्या नावापुढे हायस्कूल
लिहिलेले दिसायचे. आता आवर्जून 'विद्यालय' असे लिहिलेले दिसते. भारतातल्या सध्याच्या सरकारच्या हिंदुत्वाच्या धोरणाबद्दल मतांतरे असू शकतात, पण
त्यांच्याकडून गेल्या काही वर्षात संस्कृतच्या पुनरुज्जीवनासाठी मोठे प्रयत्न सुरू
आहेत. संस्कृतदिन, संस्कृत
सप्ताह असे उपक्रम राबवले जात आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत." संस्कृत भाषा शिकावी ती इथले तत्वज्ञान आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी, मात्र
ती उपजीविकेची भाषा होऊ शकत नाही, आणि भारताबाहेर या भाषेचा उपयोगही होऊ शकत नाही,
असे त्यांना वाटते.
गप्पांच्या शेवटी मी एव्हर्ट यांना विचारले, “तुमचे
आणि भारताचे नाते काय आहे?” त्यावर ते काहीसे विचारात पडले आणि म्हणाले, “याचे
उत्तर सोपे नाही. एकीकडे विचारांच्या पातळीवर या देशाने मला मोहित केले आहे. पण
संस्कृती, धर्म यांच्याबद्दलचे विचार आणि रोजचे जगणे यामध्ये खूप अंतर आहे. ते मला
आणि बहुसंख्य युरोपीयांना पचवणे कठीण जाते. आणि हे मी फक्त गरीबीबद्दल म्हणत नाही,
तर लोकांच्या एकूणच दृष्टिकोनाबद्दल म्हणतोय. विचार आणि आचार यांच्यातला विरोधाभास
प्रचंड आहे. विचार उदात्त असले तरी इथे राहणे अतिशय कठीण आहे. मला असे वाटते, की
ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते गरीबांबद्दल विचार करत नाहीत” आणि पुढे ते हसतहसत
म्हणाले “यामुळेच माझे दिल्लीचे मित्र यावरून मला सोशालिस्ट म्हणतात!”
एव्हर्ट यांनी शेवटी मांडलेले निरीक्षण विचार करायला
लावणारे आहे. ज्या भूमीला अध्यात्म, चारित्र्य, सहिष्णुता, करुणा यांचा वारसा
लाभला आहे; ज्या भूमीने एकेकाळी जगाला दिशा देण्याचे काम केले त्या भूमीवर हा
विरोधाभास का दिसावा? टोकाचा व्यक्तिवाद, अहंगंड, ढासळती नीतीमूल्ये यांतून
उद्भवणाऱ्या समस्यांनी ग्रासलेले जगातले अनेकजण भारताकडे आशेने बघत असताना, आपण
आपले अंतर्विरोध तसेच ठेवून कसे चालेल? ते दूर करण्याच्या दिशेने आपले प्रयत्नही
सुरू आहेत, पण या प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक आहे.
एव्हर्ट यांचे पुस्तक आणि त्यांच्यासोबतचा संवाद हा
साहित्य, संस्कृती, भाषा, इतिहास, वर्तमान अशी मनमुराद सफर घडवून आणणारा ठरला. एकदा
ध्येय डोळ्यासमोर ठेवले की, वय हा मुद्दा किती गौण ठरतो हे मी अनुभवले. आपण विसरत
चाललेल्या अनेक गोष्टींची – मग ती आपली संपन्न भाषा असो वा आपला विचारवारसा –
यानिमित्ताने उजळणी झाली. भारतापासून दूरवर असणारी व्यक्ती इथली संस्कृती
अभ्यासते, इथल्या भाषेच्या इतिहासाचा अभ्यास करते आणि इथली भाषा पुन्हा एकदा
प्रकाशझोतात यावी यासाठी या वयातही झटते, ही गोष्ट खूप काही शिकवून जाणारी आहे. आपल्या
संपन्न वारशाची आणि त्यासोबत येणाऱ्या
जबाबदाऱ्यांची जाणीव इतरांनी आपल्याला करून देण्यापूर्वीच ती आपल्याला होणे आवश्यक
आहे. तशी जाणीव होणे, हे भारताला विश्वगुरूपदाच्या ध्येयाकडे नेणारे महत्वाचे पाऊल
ठरेल.
संदर्भ :
१.
Een Wolk Wordt
Woord : Evert S. Schneider
२.
एव्हर्ट श्नायडर
आणि हानेके मेईंडर्स-ग्रोनेव्हेल्ड यांच्याशी
साधलेला संवाद
३.
मेघदूत :
भारतीय चराचराचा समृद्ध जीवनपट – डॉ. विजया देव (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
४.
मेघदूत (अनुवाद)
- शांता शेळके (मेहता पब्लिशिंग हाऊस)
५. पक्षिकोश - मारुती चितमपल्ली
प्रसाद फाटक