Total Pageviews

Tuesday, June 20, 2023

नवोदित लेखकांसाठी कानमंत्र


 


आपले विचार व्यक्त करण्यासाठीचा एक मार्ग म्हणजे लेखन. निरीक्षण, वाचन, चिंतन, मनन अशा साखळीच्या शेवटचा टप्पा म्हणून लेखनाविष्कार घडत असतो. अर्थात सर्वांनाच आपले विचार, भावना सहजतेने आणि प्रभावीपणे लेखनात उतरवता येतात असे नाही. नव्याने लिहू पाहणाऱ्यांसाठी रस्किन बॉंड यांनी ‘हाऊ टू बी अ रायटर’ या पुस्तकामधून खुसखुशीत शैलीमध्ये मार्गदर्शन केले आहे.

रस्किन बॉंड तब्बल ७० वर्षे लघुकथा, कादंबरी, ललितबंध, भयकथा, कविता, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारांमधून मुशाफिरी करत आहेत. त्यांच्या लेखनातला ताजेपणा आजही टिकून आहे. प्रस्तुत पुस्तकातून त्यांनी आपली लेखनप्रक्रिया उलगडून दाखवली आहे आणि आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे नवोदितांसाठी उपयुक्त ठरतील अशा टिप्सदेखील दिल्या आहेत.

लेखनसातत्य ठेवणे, निरीक्षण करणे, काळजीपूर्वक ऐकणे, शब्दांच्या रचनेकडे आणि त्यातल्या सौंदर्याकडे लक्ष देणे या गोष्टी लेखनासाठी महत्वाच्या असल्याचे बॉंड सांगतात. “कोणीही लेखक होऊ शकतो, पण प्रत्येकजण चांगला लेखक होऊ शकत नाही” हे सांगून बॉंड यांनी चांगला लेखक होण्यासाठी कोणते गुण अंगी बाणवणे गरजेचे आहे याचे विवेचन केले आहे, तसेच “का लिहावे?” या मुद्द्यावरही चर्चा केली आहे. साहित्याची आवड, भाषेची आवड, जगण्यावरचे प्रेम, उत्तम स्मृती, उत्साह, आशावाद, चिकाटी हे सगळे गुण लेखक म्हणून घडण्यासाठी हातभार लावत असतात असे बॉंड यांचे प्रतिपादन आहे.

उत्तम साहित्यवाचनामुळे एक लेखक म्हणून मनाची मशागत होत असते. म्हणूनच अनेक परदेशी साहित्यिकांच्या तसेच रवींद्रनाथ टागोर, आर. के. नारायण, प्रेमचंद अशा भारतीय साहित्यिकांच्या साहित्यकृती बॉंड यांनी वाचनासाठी सुचवल्या आहेत. 

लेखक म्हणून शिस्त अंगी बाणवणे, आपली दिनचर्या निश्चित करणे, नियमित लेखनासाठी विशिष्ट जागा ठरवणे या सगळ्या गोष्टी लेखनाचा दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. नोंदवही सोबत ठेवण्याचा लेखकाला खूप उपयोग होतो. आलेले अनुभव, सुचलेल्या कल्पना यांची वहीमध्ये केलेली नोंद पुढे संदर्भ म्हणून वापरून अधिक फुलवता येते. “एखादी कल्पना कुठल्याही वेळी सुचू शकते, त्यासाठी तयार राहायला हवे” हे सांगताना बॉंड त्यांना स्वत:ला तसेच अन्य लेखकांनाही झोपेत पाहिलेल्या स्वप्नामधून लेखनासाठी बीज कसे गवसले याची  उदाहरणे दिली आहेत. लेखकाने किती पातळ्यांवर जागरूक राहायला हवे, हे यातून अधोरेखित होते.

“स्वतःच्या लिखाणाचा कंटाळा आलेला लेखक संपतो”, “उदरनिर्वाहासाठी मी या माझ्या लेखनावर अवलंबून असलो, तरीही माझ्यासाठी ती जगातील सर्वात आनंददायी गोष्ट आहे” बॉंड यांच्या विधानांमधून लेखनप्रक्रियेत आनंद मिळत राहणे किती महत्वाचे आहे, हे लक्षात येते.

लेखनक्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्यांच्या मनामध्ये आपले लेखन पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावे अशी सुप्त इच्छा असतेच. म्हणूनच पुस्तक लिहिण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी काय करणे आवश्यक असते हे थोडक्यात सांगणारे स्वतंत्र प्रकरण बॉंड यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे शीर्षक आकर्षक असले पाहिजे, असा ते आग्रह धरतात. त्यासाठी त्यांनी ‘वॉर अॅँड पीस’ आणि अन्य काही प्रसिद्ध पुस्तकांची पूर्वीची शीर्षके आणि अंतिमत: ठेवलेली अधिक परिणामकारक शीर्षके यांची उदाहरणे दिली आहेत.

लेखकाला लेखन करत करताना काही वेळा अचानक सुचेनासे होते (याला इंग्रजीमध्ये ‘रायटर्स ब्लॉक’ असे म्हणतात). अशी वेळ आल्यास लेखकाने तो विषय काही काळासाठी बाजूला ठेवून काहीतरी वेगळे लिहिण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला बॉंड यांनी दिला आहे. त्यामुळे मूळ विषयाकडे परत वळल्यावर विचारप्रक्रियेतला अडथळा दूर होऊन प्रवाह वाहता होतो. पुस्तक प्रकाशित करण्याचे प्रयत्न करत असताना नकार पचवण्याचीही तयारी ठेवावी लागते आणि निराश न होता प्रयत्न करत राहावे लागतात; तसेच पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्यावर टीका झाल्यास त्याचीही तयारी लेखकाने ठेवायला लागते याकडे बॉंड लक्ष वेधतात.

बॉंड यांनी लेखनासाठी केलेले मार्गदर्शन मूलभूत स्वरूपाचे आहे. ते प्रामुख्याने कुमार आणि तरुण गटाला समोर ठेवून केले असले तरीही मोठ्या वयोगटातील नवोदितांसाठीही ते उपयुक्त आहे. आधुनिक काळातील माध्यमांच्या गरजा आणि त्यासाठी लेखनामध्ये करावे लागणारे बदल; अलीकडे लेखकाला आपले पुस्तक स्वत:च प्रकाशित करण्यासाठी उपलब्ध झालेले पर्याय या मुद्द्यांवर मात्र पुस्तकामध्ये भाष्य केलेले नाही. ते असते पुस्तक अधिक कालसुसंगत ठरले असते.

 

‘हाऊ टू बी अ रायटर’

लेखक : रस्किन बॉंड

प्रकाशक : हार्पर चिल्ड्रन्स

पृष्ठसंख्या : १२६

किंमत : २९९    


(महाराष्ट्र टाईम्समध्ये २१ मे २०२३ रोजी पूर्वप्रकाशित)

No comments:

Post a Comment