Total Pageviews

Tuesday, June 20, 2023

महाराष्ट्राचे कलावैभव



आज लिहिलेली गोष्ट, बोलले गेलेले शब्द, सादर केलेली कला उद्यासाठी टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. अशा गोष्टींच्या नोंदी, संकलन, वर्गीकरण डोळसपणे केल्यास येणाऱ्या पिढीसाठी इतिहासात डोकावून पाहण्यासाठी खिडकी निर्माण होऊ शकते. या दृष्टीनेच कोशवाङ्मयाचे महत्व अनन्यसाधारण आहे. असे अनेक विषय आहेत ज्यांचा कोशनिर्मितीच्या दृष्टीने अभ्यास झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये ‘दृश्यकला’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रातील कलाकारांच्या त्यातील योगदानाची दखल घेणारा ‘व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’ हा कोश प्रकाशित झाल्याने मोठी महाराष्ट्रातील दृश्यकला परंपरेच्या अपुऱ्या दस्तावेजीकरणाची उणीव दूर होण्यास मदत झाली आहे.


प्रसिद्ध चित्रकार व जे. जे. कलामहाविद्यालयाचे माजी प्राध्यापक सुहास बहुळकर आणि ज्येष्ठ समीक्षक दीपक घारे यांनी प्रस्तुत कोश संपादित केला आहे. महाराष्ट्राला समृद्ध राजकीय आणि सामाजिक वारसा आहे, परंतु कला व संस्कृतीचा वारसा नाही; इंग्रजांच्या काळात भारतीय कलेचे पुनरुज्जीवन फक्त बंगालमध्ये झाले इ. गैरसमजांचे कोशाच्या माध्यमातून निराकरण व्हावे, असा प्रयत्न असल्याचे संपादकांनी आपल्या मनोगतात नमूद केले आहे.

 

२०१३ साली बहुळकर व घारे या द्वयीने ‘साप्ताहिक विवेक’च्या कोशमालिका प्रकल्पाअंतर्गत मराठी दृश्यकला कोशाचे संपादन केले होते. एवढा महत्वाचा कोश मराठीपुरता मर्यादित न राहता इंग्रजीत जायला गेल्यास महाराष्ट्राचा कलावारसा अनेकांपर्यंत पोहचेल, या विचारांनी ‘पंडोल आर्ट गॅलरी’तर्फे हा कोश इंग्रजीमध्ये नेण्याची तयारी २०१५ मध्ये सुरू झाली. मराठीतील ग्रंथ इंग्रजीत नेताना मराठीतील नोंदींचा इंग्रजी अनुवाद केला गेला, तसेच दरम्यानच्या काळात मिळालेल्या नव्या माहितीनुसार जुन्या नोंदींमध्ये काही ठिकाणी दुरुस्त्या केल्या गेल्या, २७ नव्या नोंदींची भर घातली गेली. कोशाचे कलात्मक मूल्य अबाधित राहावे यासाठी दृश्य माध्यमाची जाण असणारे अनुवादक मिळवणे हेही एक आव्हान होते. पुणे व मुंबई अशा दोन ठिकाणच्या अनुवादकांच्या चमूने अनुवादाचे काम चोखपणे पार पाडले आहे. बहुळकर व घारे यांच्याकडे मुख्य संपादनाचे दायित्व असले तरी सुधीर पटवर्धन, दिलीप रानडे आणि अन्य ज्येष्ठ दृश्यकला तज्ज्ञांचाही संपादनकार्यात हातभार लाभला आहे (या प्रकल्पाचे शिवधनुष्य कसे पेलले याबद्दल ललित मासिकाच्या २०२१ सालच्या दिवाळी अंकातला दीपक घारे यांचा जिज्ञासूंनी लेख अवश्य वाचावा).

 

पुस्तकामध्ये तीन विभाग आहेत. ‘महाराष्ट्राचा वारसा’ या पहिल्या विभागात इतिहासपूर्व काळापासून ते पेशवेकाळापर्यंतच्या महाराष्ट्रातील दृश्यकलांचा आढावा घेतला आहे, त्याचबरोबर युरोपीय वसाहतवाद्यांच्या आगमनानंतरच्या महाराष्ट्रातील दृश्यकला प्रवाहाचीही नोंद घेतली आहे. १८५७ साली ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ची मुंबईत झालेली स्थापना हा महाराष्ट्राच्या कलाप्रवासातील अत्यंत महत्वाचा टप्पा होता. इथपासूनच ‘बॉंबे स्कूल’ या नावाने ओळखली जाणारी कलापरंपरा सुरू झाली. जे. जे. कलामहाविद्यालयाने आधुनिक काळामध्ये दृश्यकलेच्या प्रगती आणि आणि प्रसाराबाबत कशी भूमिका निभावली हे या विभागात वाचायला मिळते. कलामहाविद्यालयातर्फे  अंबरनाथच्या शिवमंदिराचे सर्वेक्षण, अजिंठा गुंफांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवणे इ. प्रकल्प हाती  जाऊन दृश्यकलांचा अभ्यास आणि दस्तावेजीकरण करण्याचे मोठे कार्य घडले.

 

या विभागात दृश्यकलेच्या ‘उपयोजित कला’ (अप्लाइड आर्ट) या शाखेची विशेष दखल घेतली आहे. रोजच्या जीवनात दिसणाऱ्या कित्येक गोष्टी (उदा. काडेपेटी, कॅलेंडर, प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारी पोस्टकार्ड) अशा अनेक उपयोजित कलेची उदाहरणे आहेत हे यातून लक्षात येते. अनेक ख्यातनाम चित्रकारांनी उपयोजित कलेमध्ये मोठे योगदान दिले आहे. एस. एम. पाटील, डी. आर. भोसले (चित्रपट पोस्टर), रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल (कॅलेंडर आर्ट, दिवाळी अंक व पुस्तकांची मुखपृष्ठे) बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण (व्यंगचित्र/अर्कचित्र) यांच्यासोबतच कॉमिक्स (अमर चित्रकथा), हास्यचित्रमालिका (चिंटू) यांचीही यामध्ये दखल घेतली आहे. ‘

 

दुसरा विभाग हा प्रत्यक्ष शिल्पकार आणि चित्रकार यांच्याबद्दलच्या नोंदींचा आहे. कलाकार महाराष्ट्रात जन्मलेला व महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर कारकीर्द असलेला असावा; अथवा महाराष्ट्राबाहेर जन्मलेला असेल तरीही कलेतील त्याच्या कारकीर्दीची पंचवीसहून अधिक वर्षे महाराष्ट्रात व्यतीत केलेली असावीत हा कोशासाठी कलाकार निवडीचा प्रमुख निकष आहे. अशा एकूण ३०७ कलाकारांच्या चरित्रात्मक नोंदी यामध्ये आहेत. आबालाल रहमान, बाबुराव पेंटर, आचरेकर, धुरंधरांपासून वासुदेव कामतांपर्यंतचे अशा ख्यातकीर्त चित्रकार; शि. द. फडणीस, वसंत सरवटे यांच्यापासून राज ठाकरेंर्यंतचे हास्यचित्रकार/व्यंगचित्रकार, रॉबी डिसिल्व्हा यांच्यासारखे डिझायनर, अच्युत पालवांसारखे सुलेखनकार अशा अनेक प्रतिभावान कलाकारांच्या कलादृष्टीचे दर्शन इथे घडते.

 

या विभागात दृश्यकलेचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या कलाकारांबरोबरच असे शिक्षण घेतले नसतानाही दृश्यकलेच्या क्षेत्रात अमीट ठसा उमटवलेल्यांचीही नोंद घेतली आहे. पद्मा सहस्रबुद्धे,  ज्योत्स्ना कदम, माधुरी पुरंदरे इ. स्त्री कलाकारांनाही आवर्जून स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक कलाकाराचा जीवनकाळ, कलाक्षेत्रातले उल्लेखनीय कार्य, त्याच्या कलाविष्काराची समीक्षा, त्याच्या प्रमुख कलाकृती आणि त्यातील काहींची छायाचित्रे असे प्रत्येक कलाकारावरच्या नोंदीचे स्वरूप आहे. शक्य तिथे कलाकाराच्या आईचे आणि पत्नीचे नावही समाविष्ट केले आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय. शिवाय कलाकाराच्या कुटुंबात जर त्याच्या कलेचा वारसा पुढे चालू ठेवणारी व्यक्ती असेल तर तिचाही उल्लेख केला आहे. अशा प्रकारच्या विस्तृत नोंदी अभ्यासकांना कलाकारांच्या वैशिष्ट्यांसोबतच त्यांनी खळाळत्या ठेवलेल्या कलाप्रवाहाचीही जाणीव करून देतात.

 

तिसऱ्या विभागात दृश्यकलेच्या क्षेत्रात पायाभूत कार्य केलेल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया इ. कलासंस्था; त्याचबरोबर महत्वाचे आर्ट स्टुडिओ आणि दृश्यकलेला वाहिलेली प्रदर्शनस्थळे यांच्याबद्दल माहिती मिळते. कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या सयाजीराव गायकवाड, भवानराव पंतप्रतिनधी यांच्या राजाश्रयाचे महत्वही या विभागात अधोरेखित केले आहे.  

 

मोठ्या आकारातला उत्कृष्ट निर्मितीमूल्ये असलेला हा कोश कलासमीक्षक, अभ्यासक यांच्यापासून सर्वसामान्य कलाप्रेमी वाचकापर्यंत सर्वांनीच अनुभवावा असा आहे. विपुल छायाचित्रांमधून रंग आणि कुंचला किंवा काष्ठ आणि मृदा यांच्या सहाय्याने कलाकार उभ्या करत असलेल्या प्रतिसृष्टीचे विलोभनीय दर्शन आपल्याला होते. एकाहून एक प्रतिभावान कलाकारांवरच्या नोंदी वाचत असताना त्यांनी घेतलेला उत्कृष्टतेचा ध्यास, प्रतिकूल परिस्थितीतून काढलेला मार्ग, कलेप्रती असणारी त्यांची निष्ठा या गोष्टी खूप काही शिकवून राहतात. विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या अनेक कलाकारांना या कोशाने ठळकपणे सर्वांसमोर आणले आहे. महाराष्ट्राच्या कलावैभवाला देखण्या रुपात सादर केल्याबद्दल संपादक, प्रकाशक आणि सर्व संबंधितांचे देशभरातील अभ्यासक आणि रसिक आभार मानतील यात शंका नाही.   


एन्सायक्लोपीडिया : व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र

संपादक : सुहास बहुळकर, दीपक घारे

प्रकाशक : पंडोल आर्ट गॅलरी

किंमत : ४००० रु.

पृष्ठसंख्या : ९६०


(या लेखाची संक्षिप्त आवृत्ती ७ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झाली)


No comments:

Post a Comment