धुरंधरच्या दोन्ही भागांनी सर्वत्र एकच धमाल उडवून दिलेली आहे. भारताच्या हेरांच्या नव्याजुन्या छुप्या कामगिऱ्यांची उजळणी पोस्ट्स आणि पॉडकास्ट्समधून उजळणी होत आहे. ते वाचून मला मी करोना काळात ऐकलेल्या एका पुस्तकाची प्रकर्षाने आठवण येत आहे.
'मैं पाकिस्तान मैं भारत का जासूस था' ही आहे एक सत्यकथा. ही कथा पाकिस्तानातली आहे, भारतीय हेराचीही आहे पण ती हेरगिरीची नाही! यात कोणतेही रहस्य नाही, छुपे कॅमेरे नाहीत, वेषांतर नाही, शत्रूला ठार करणे नाही, की जेलरच्या हातावर तुरी देऊन निसटणे नाही... ही गोष्ट आहे हेरगिरी होऊन गेल्यानंतरची. त्यानंतरच्या प्रचंड खडतर आणि अनिश्चित आयुष्याची.. निनावी राहून मातृभूमीची सेवा करणाऱ्या एका वीराची, त्याच्या आशानिराशेची, संतापाची..
ही कथा नवीनही नाही. ही आहे 1970च्या दशकातली गोष्ट. कथेचे नायक आहेत मोहनलाल भास्कर. त्यांना पाकिस्तानात केलेल्या अणुऊर्जा केंद्रातून फाईल मिळवण्याच्या आरोपाखाली अटक होते या घटनेपासूनच पुस्तकाची सुरुवात होते आणि कोणत्याही गुप्तहेरी चातुर्याची उदाहरणे नसूनही शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. मुळात मोहनलाल नक्की कोणत्या कामगिरीवर पाकिस्तानात गेले होते, त्यांनी कोणती माहिती गोळा करून भारतापर्यंत कशी पोहोचवली याबद्दल पुस्तकात अवाक्षरही नाही. मुळात 'आपण हेर होतो' याचा शीर्षक आणि काही ओझरते उल्लेख वगळता फारसा कुठे उल्लेखही नाहीये! .
अमरिकसिंह नावाच्या एका डबल क्रॉस माणसामुळे मोहनलाल पकडले गेले आणि पुढे अमरिकसिंहला सुद्धा संशयावरून तुरुंगात टाकले गेले! तुरुंगात मोहनलाल यांचा प्रचंड छळ झाला. पुस्तकात लाहोर, रावळपिंडी, कोट लखपत इथल्या तरुंगांचे, तुरुंगात भेटलेले सहृदय अधिकारी, कर्मचारी यांचे वर्णन आहे.
विशेष गोष्ट अशी की, एक तुरुंगाधिकारी मोहनलाल यांच्या पोलीस खात्यातील वडिलांचा फाळणीपूर्वीचा पोलिस खात्यातील सहकारी निघाला! त्याने माहिती काढून घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले असले तरी त्याच्यामुळे मोहनलाल यांचे हाल कमी झाले.
एका अधिकाऱ्याची आपल्या हिंदू पूर्वजांबद्दलची भावना आपल्यालाही विचार करायला भाग पाडते. आपण काही पिढ्यांपूर्वी केवळ हिंदूच नव्हे तर ब्राह्मण असल्याची त्याला जाणीव होती. मुस्लिमांमधल्या कुप्रथा, त्यांनी जबरदस्तीने केले गेलेले पूर्वजांचे धर्मांतर याचीही जाणीव. परंतु त्याचे मुसलमान झालेले पूर्वज हिंदूंकडे मदत मागायला गेले तेव्हा आणि नंतर स्वधर्मात परत येण्याची इच्छा दाखवली तेव्हा कुणीही मदत केली नाही याची चीड आता काही पिढ्या उलटून गेल्यावरही त्याच्या मनात धगघत होती... ब्राह्मणांवर विशेष राग होता.त्या अनुषंगाने मोहन यांच्याशी अनेकदा चर्चाही केली!
शत्रूराष्ट्र पाकिस्तानात हेरगिरी साठी गेलेला देशभक्त असूनही त्यांनी पाकिस्तान म्हणजे सगळेच वाईट अशी त्यानी कुठेही सूर लावलेला नाही. उलट तशा सार्वत्रिक समजुतीला तडा देणारी अनेक उदाहरणं पुस्तकात आहेत
पुस्तकात लेखकाने झुल्फिकार अली भुट्टो यांच्याबद्दल आत्मीयतेने लिहिलं आहे. याचं कारण बरंचसं वैयक्तिक आहे. याह्याखानने भुट्टो यांना तुरुंगात टाकलं होतं. तेव्हा तुरुंगातील कैद्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता होती. भुट्टो मोहन यांच्यासोबतच्या कैद्यांनाही भेटले आणि आपल्याला सत्ता मिळल्यास आपण तुमची सुटका करू असे आश्वासन दिले आणि ते खरोखरच पाळले. १९७२च्या सिमला कराराअंतर्गत दोन्ही देशांनी कैदी सोडले.
१९७१मध्ये शेर-ए-बंगाल मुजीब-उर-रहमान देखील त्या तुरुंगात कैदेत होते परंतु मुजीबची फाशी ४ वेळा टळली. मोहनलाल यांना त्यांना बघायची/भेटायची संधी मिळाली नाही.
मोहनलाल यांचा भावनिक कल्लोळ प्रकट होतो तो भाग आहे तो १९७१च्या युद्धाच्या वेळचा. याचं कारण असं आहे की, गुजरांवाला तुरुंगामागेच असणाऱ्या पाकिस्तानी वायुदलाच्या विमानतळावर १९७१च्या युद्धात भारतीय वायुदलाचने बॉम्बिंग केलं होतं.. चुकून बॉम्ब तिकडचा इकडे पडला असता तरी निभाव लागणं कठीण होतं. पण जेव्हा बॉम्बिंग व्हायचं तेव्हा पाकिस्तानी कैदी, तुरुंगाधिकारी लपून बसत आणि अगदी जीवाची तमा न बाळगता तुरुंगातले भारतीय कैदी विमानाचा आवाज आला की मोकळ्या जागेत येऊन बेभान नाचत! डोक्यावरच्या घिरट्या मृत्यूच्या असल्या तरी त्याची त्यांना फिकीर नव्हती, कारण त्याच घिरट्या त्यांच्या स्वातंत्र्याच्याही होत्या!
तुरुंगातल्या कैद्यांच्या मनस्थितीचे, आपसातल्या नात्यांचे तपशिलाने वर्णन, हा देखील भावनिक रोलर कोस्टरचं दर्शन घडवतो. पाकिस्तानातले भारतीय कैदी हा प्रकार फारच करूण असतो. त्यात कमालीची अनिश्चिती आहे. हेरगिरी, चुकून हद्दीत घुसणे, व्हिसा संपल्यावरही तिथेच राहणे, मासेमारांचे समुद्रात भरकटून हद्दीत शिरणे अशा अनेक कारणांनी अनेक भारतीय माणसं पाकिस्तानी तुरुंगात खितपत. बाहेर भारत-पाकिस्तान संबंध बिघडले (उदा. ७१चं युद्ध) की, तुरुंगात भारतीय कैद्यांचा जास्तच दुस्वास आणि छळ होऊ लागतो. इथलं जीवन किती अस्थिर असतं हे सांगणारी अनेक उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. शिक्षा संपली तरी परत कधी जाऊ याची शाश्वती नाही. मोहनलाल यांनाही सोडायचे ठरल्यावरही कोर्ट लखपत तुरुंगातून लाहोरला आणले पण तिथे पुन्हा वर्षभर वर्षभर ठेवले! आधी याद्या exchange होतात. मग भारतीय अधिकारी हे कैदी भारतीय आहेत की नाहीत याचा शोध घेतात आणि नंतरच गाडी पुढे सरकते. सुटका होणार असं कळल्यावरही सगळ्य लालफितीच्या कारभारात वर्षभर काढणे किती असह्य असेल यांची कल्पनाच केलेली बरी..
तुरुंगात एक विलक्षण घटनाही घडली.. तुरुंग फोडून जायचा प्रयत्न ऐनवेळी उघडकीला आला म्हणून तुरुंगात सैन्य घुसवून शंभरहून अधिक कैद्यांची हत्या करण्यात आली, अनेकांचे हातपाय तोडले गेले. परंतु आश्चर्य म्हणजे त्यामध्ये भारतीय कैद्यांना काही त्रास दिला गेला नाही. अधिकाऱ्याचं म्हणणं होतं "हे सगळे भारतीय कैदी चांगले आहेत. पाकिस्तानी कैदीच आगाऊ आहेत."
तुरुंगत व्यसन लागणं अपरिहार्य. सिगरेटच्या थोटकासाठीही जीव पाखडतात. अनेक गोष्टी सर्रास तुरुंगत पोचतात. कैदी त्या आयुष्यालाही सरावतात. काही इतके धीट बनतात की अधिकाऱ्यांना तोंडावर शिव्या देतात. तिथला आणखीन एक कैदीही भारतीय हेर होता. त्याने तर जवळजवळ प्राणांतिक मार खाल्लेला आणि त्यातूनच तो कोडगा झाला होता... त्याला बडवून उपयोग नाही आणि ठारही मारता येत नाही म्हणून तुरुंगाधिकारीही वैतागले होते आणि तो सरळ आईबहिणीचा उद्धार करायचा. हे वाचायला खूप विचित्र वाटतं. जणू ही एकप्रकराची निर्वाणस्थितीच आहे मनाची. नंतरनंतर तर मोहनलालही त्याच मनस्थितीत गेले होते..
शेवटचा काळ मात्र तुरुंगात मजेत गेला असं मोहनलाल म्हणतात. मुख्य कारण म्हणजे तपासादरम्यान झालेले तसे टॉर्चर परत कधी झाले नाही.
मोहनलाल परत आल्यानंतरचा पुस्तकातला कथाभाग सर्वात त्रासदायक आहे.. परतल्यावर त्यांची परिस्थिती खडतर झाली. भारतीय हेर बनून मोहनलाल पाकिस्तानात अडकले, शिक्षा भोगत राहिले तेव्हा त्यांच्या कुटुंबाची स्थिती हलाखीची झाली होती, हे वाचून क्लेश होतात. कुटुंबासाठी सरकारने काहीच का केले नसेल हा प्रश्न आपल्याला सतावतो.
भारतात परतल्यावर काही वर्षांनी मोहनलाल पंतप्रधान मोरारजींना भेटले आणि "पाकिस्तानात भारतासाठी काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची योग्य पावती मिळायला हवी" असं ते म्हणाले. खरंतर त्या दोघांचा आधीपासून परिचय होता, तरीही मोरारजी निर्दयीपणे म्हणाले "पाकिस्तानच्या कृत्याची शिक्षा आम्ही का भोगू? पाकिस्तानने वीस वर्षं तुरुंगात ठेवलं तर आम्ही तुम्हाला वीस वर्षं नुकसानभरपाई देऊ का?"
मोहनलाल कडवटपणे वाचकासमोर प्रश्न उपस्थित करतात वि "ज्या माणसाला हाजी मस्तान सारख्याचा पाहुणचार करायला वेळ आहे, त्याला देशासाठी जीव धोक्यात घातलेल्यांसाठी बोलायला वेळ का नाही? माझ्या हातात पिस्तूल असतं तर मी त्यांना तिथेच गोळ्या घातल्या असत्या.."
देशासाठी जीवावर उदार होऊन लढणाऱ्या माणसाला असं वागवलं जातं, तेव्हा आपल्या priorities किती चुकल्या आहेत याची पुन्हा एकदा जाणीव होते.
(पुस्तक स्टोरीटेलवर उपलब्ध आहे. रोहन प्रकाशनातर्फे मराठीमध्ये त्याचा अनुवादही प्रसिद्ध झाला आहे.)

No comments:
Post a Comment