Total Pageviews

Showing posts with label महाराष्ट्र टाईम्स. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र टाईम्स. Show all posts

Tuesday, June 20, 2023

नवोदित लेखकांसाठी कानमंत्र


 


आपले विचार व्यक्त करण्यासाठीचा एक मार्ग म्हणजे लेखन. निरीक्षण, वाचन, चिंतन, मनन अशा साखळीच्या शेवटचा टप्पा म्हणून लेखनाविष्कार घडत असतो. अर्थात सर्वांनाच आपले विचार, भावना सहजतेने आणि प्रभावीपणे लेखनात उतरवता येतात असे नाही. नव्याने लिहू पाहणाऱ्यांसाठी रस्किन बॉंड यांनी ‘हाऊ टू बी अ रायटर’ या पुस्तकामधून खुसखुशीत शैलीमध्ये मार्गदर्शन केले आहे.

रस्किन बॉंड तब्बल ७० वर्षे लघुकथा, कादंबरी, ललितबंध, भयकथा, कविता, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारांमधून मुशाफिरी करत आहेत. त्यांच्या लेखनातला ताजेपणा आजही टिकून आहे. प्रस्तुत पुस्तकातून त्यांनी आपली लेखनप्रक्रिया उलगडून दाखवली आहे आणि आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे नवोदितांसाठी उपयुक्त ठरतील अशा टिप्सदेखील दिल्या आहेत.

लेखनसातत्य ठेवणे, निरीक्षण करणे, काळजीपूर्वक ऐकणे, शब्दांच्या रचनेकडे आणि त्यातल्या सौंदर्याकडे लक्ष देणे या गोष्टी लेखनासाठी महत्वाच्या असल्याचे बॉंड सांगतात. “कोणीही लेखक होऊ शकतो, पण प्रत्येकजण चांगला लेखक होऊ शकत नाही” हे सांगून बॉंड यांनी चांगला लेखक होण्यासाठी कोणते गुण अंगी बाणवणे गरजेचे आहे याचे विवेचन केले आहे, तसेच “का लिहावे?” या मुद्द्यावरही चर्चा केली आहे. साहित्याची आवड, भाषेची आवड, जगण्यावरचे प्रेम, उत्तम स्मृती, उत्साह, आशावाद, चिकाटी हे सगळे गुण लेखक म्हणून घडण्यासाठी हातभार लावत असतात असे बॉंड यांचे प्रतिपादन आहे.

उत्तम साहित्यवाचनामुळे एक लेखक म्हणून मनाची मशागत होत असते. म्हणूनच अनेक परदेशी साहित्यिकांच्या तसेच रवींद्रनाथ टागोर, आर. के. नारायण, प्रेमचंद अशा भारतीय साहित्यिकांच्या साहित्यकृती बॉंड यांनी वाचनासाठी सुचवल्या आहेत. 

लेखक म्हणून शिस्त अंगी बाणवणे, आपली दिनचर्या निश्चित करणे, नियमित लेखनासाठी विशिष्ट जागा ठरवणे या सगळ्या गोष्टी लेखनाचा दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. नोंदवही सोबत ठेवण्याचा लेखकाला खूप उपयोग होतो. आलेले अनुभव, सुचलेल्या कल्पना यांची वहीमध्ये केलेली नोंद पुढे संदर्भ म्हणून वापरून अधिक फुलवता येते. “एखादी कल्पना कुठल्याही वेळी सुचू शकते, त्यासाठी तयार राहायला हवे” हे सांगताना बॉंड त्यांना स्वत:ला तसेच अन्य लेखकांनाही झोपेत पाहिलेल्या स्वप्नामधून लेखनासाठी बीज कसे गवसले याची  उदाहरणे दिली आहेत. लेखकाने किती पातळ्यांवर जागरूक राहायला हवे, हे यातून अधोरेखित होते.

“स्वतःच्या लिखाणाचा कंटाळा आलेला लेखक संपतो”, “उदरनिर्वाहासाठी मी या माझ्या लेखनावर अवलंबून असलो, तरीही माझ्यासाठी ती जगातील सर्वात आनंददायी गोष्ट आहे” बॉंड यांच्या विधानांमधून लेखनप्रक्रियेत आनंद मिळत राहणे किती महत्वाचे आहे, हे लक्षात येते.

लेखनक्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्यांच्या मनामध्ये आपले लेखन पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावे अशी सुप्त इच्छा असतेच. म्हणूनच पुस्तक लिहिण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी काय करणे आवश्यक असते हे थोडक्यात सांगणारे स्वतंत्र प्रकरण बॉंड यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे शीर्षक आकर्षक असले पाहिजे, असा ते आग्रह धरतात. त्यासाठी त्यांनी ‘वॉर अॅँड पीस’ आणि अन्य काही प्रसिद्ध पुस्तकांची पूर्वीची शीर्षके आणि अंतिमत: ठेवलेली अधिक परिणामकारक शीर्षके यांची उदाहरणे दिली आहेत.

लेखकाला लेखन करत करताना काही वेळा अचानक सुचेनासे होते (याला इंग्रजीमध्ये ‘रायटर्स ब्लॉक’ असे म्हणतात). अशी वेळ आल्यास लेखकाने तो विषय काही काळासाठी बाजूला ठेवून काहीतरी वेगळे लिहिण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला बॉंड यांनी दिला आहे. त्यामुळे मूळ विषयाकडे परत वळल्यावर विचारप्रक्रियेतला अडथळा दूर होऊन प्रवाह वाहता होतो. पुस्तक प्रकाशित करण्याचे प्रयत्न करत असताना नकार पचवण्याचीही तयारी ठेवावी लागते आणि निराश न होता प्रयत्न करत राहावे लागतात; तसेच पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्यावर टीका झाल्यास त्याचीही तयारी लेखकाने ठेवायला लागते याकडे बॉंड लक्ष वेधतात.

बॉंड यांनी लेखनासाठी केलेले मार्गदर्शन मूलभूत स्वरूपाचे आहे. ते प्रामुख्याने कुमार आणि तरुण गटाला समोर ठेवून केले असले तरीही मोठ्या वयोगटातील नवोदितांसाठीही ते उपयुक्त आहे. आधुनिक काळातील माध्यमांच्या गरजा आणि त्यासाठी लेखनामध्ये करावे लागणारे बदल; अलीकडे लेखकाला आपले पुस्तक स्वत:च प्रकाशित करण्यासाठी उपलब्ध झालेले पर्याय या मुद्द्यांवर मात्र पुस्तकामध्ये भाष्य केलेले नाही. ते असते पुस्तक अधिक कालसुसंगत ठरले असते.

 

‘हाऊ टू बी अ रायटर’

लेखक : रस्किन बॉंड

प्रकाशक : हार्पर चिल्ड्रन्स

पृष्ठसंख्या : १२६

किंमत : २९९    


(महाराष्ट्र टाईम्समध्ये २१ मे २०२३ रोजी पूर्वप्रकाशित)

महाराष्ट्राचे कलावैभव



आज लिहिलेली गोष्ट, बोलले गेलेले शब्द, सादर केलेली कला उद्यासाठी टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. अशा गोष्टींच्या नोंदी, संकलन, वर्गीकरण डोळसपणे केल्यास येणाऱ्या पिढीसाठी इतिहासात डोकावून पाहण्यासाठी खिडकी निर्माण होऊ शकते. या दृष्टीनेच कोशवाङ्मयाचे महत्व अनन्यसाधारण आहे. असे अनेक विषय आहेत ज्यांचा कोशनिर्मितीच्या दृष्टीने अभ्यास झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये ‘दृश्यकला’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रातील कलाकारांच्या त्यातील योगदानाची दखल घेणारा ‘व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’ हा कोश प्रकाशित झाल्याने मोठी महाराष्ट्रातील दृश्यकला परंपरेच्या अपुऱ्या दस्तावेजीकरणाची उणीव दूर होण्यास मदत झाली आहे.


प्रसिद्ध चित्रकार व जे. जे. कलामहाविद्यालयाचे माजी प्राध्यापक सुहास बहुळकर आणि ज्येष्ठ समीक्षक दीपक घारे यांनी प्रस्तुत कोश संपादित केला आहे. महाराष्ट्राला समृद्ध राजकीय आणि सामाजिक वारसा आहे, परंतु कला व संस्कृतीचा वारसा नाही; इंग्रजांच्या काळात भारतीय कलेचे पुनरुज्जीवन फक्त बंगालमध्ये झाले इ. गैरसमजांचे कोशाच्या माध्यमातून निराकरण व्हावे, असा प्रयत्न असल्याचे संपादकांनी आपल्या मनोगतात नमूद केले आहे.

 

२०१३ साली बहुळकर व घारे या द्वयीने ‘साप्ताहिक विवेक’च्या कोशमालिका प्रकल्पाअंतर्गत मराठी दृश्यकला कोशाचे संपादन केले होते. एवढा महत्वाचा कोश मराठीपुरता मर्यादित न राहता इंग्रजीत जायला गेल्यास महाराष्ट्राचा कलावारसा अनेकांपर्यंत पोहचेल, या विचारांनी ‘पंडोल आर्ट गॅलरी’तर्फे हा कोश इंग्रजीमध्ये नेण्याची तयारी २०१५ मध्ये सुरू झाली. मराठीतील ग्रंथ इंग्रजीत नेताना मराठीतील नोंदींचा इंग्रजी अनुवाद केला गेला, तसेच दरम्यानच्या काळात मिळालेल्या नव्या माहितीनुसार जुन्या नोंदींमध्ये काही ठिकाणी दुरुस्त्या केल्या गेल्या, २७ नव्या नोंदींची भर घातली गेली. कोशाचे कलात्मक मूल्य अबाधित राहावे यासाठी दृश्य माध्यमाची जाण असणारे अनुवादक मिळवणे हेही एक आव्हान होते. पुणे व मुंबई अशा दोन ठिकाणच्या अनुवादकांच्या चमूने अनुवादाचे काम चोखपणे पार पाडले आहे. बहुळकर व घारे यांच्याकडे मुख्य संपादनाचे दायित्व असले तरी सुधीर पटवर्धन, दिलीप रानडे आणि अन्य ज्येष्ठ दृश्यकला तज्ज्ञांचाही संपादनकार्यात हातभार लाभला आहे (या प्रकल्पाचे शिवधनुष्य कसे पेलले याबद्दल ललित मासिकाच्या २०२१ सालच्या दिवाळी अंकातला दीपक घारे यांचा जिज्ञासूंनी लेख अवश्य वाचावा).

 

पुस्तकामध्ये तीन विभाग आहेत. ‘महाराष्ट्राचा वारसा’ या पहिल्या विभागात इतिहासपूर्व काळापासून ते पेशवेकाळापर्यंतच्या महाराष्ट्रातील दृश्यकलांचा आढावा घेतला आहे, त्याचबरोबर युरोपीय वसाहतवाद्यांच्या आगमनानंतरच्या महाराष्ट्रातील दृश्यकला प्रवाहाचीही नोंद घेतली आहे. १८५७ साली ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ची मुंबईत झालेली स्थापना हा महाराष्ट्राच्या कलाप्रवासातील अत्यंत महत्वाचा टप्पा होता. इथपासूनच ‘बॉंबे स्कूल’ या नावाने ओळखली जाणारी कलापरंपरा सुरू झाली. जे. जे. कलामहाविद्यालयाने आधुनिक काळामध्ये दृश्यकलेच्या प्रगती आणि आणि प्रसाराबाबत कशी भूमिका निभावली हे या विभागात वाचायला मिळते. कलामहाविद्यालयातर्फे  अंबरनाथच्या शिवमंदिराचे सर्वेक्षण, अजिंठा गुंफांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवणे इ. प्रकल्प हाती  जाऊन दृश्यकलांचा अभ्यास आणि दस्तावेजीकरण करण्याचे मोठे कार्य घडले.

 

या विभागात दृश्यकलेच्या ‘उपयोजित कला’ (अप्लाइड आर्ट) या शाखेची विशेष दखल घेतली आहे. रोजच्या जीवनात दिसणाऱ्या कित्येक गोष्टी (उदा. काडेपेटी, कॅलेंडर, प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारी पोस्टकार्ड) अशा अनेक उपयोजित कलेची उदाहरणे आहेत हे यातून लक्षात येते. अनेक ख्यातनाम चित्रकारांनी उपयोजित कलेमध्ये मोठे योगदान दिले आहे. एस. एम. पाटील, डी. आर. भोसले (चित्रपट पोस्टर), रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल (कॅलेंडर आर्ट, दिवाळी अंक व पुस्तकांची मुखपृष्ठे) बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण (व्यंगचित्र/अर्कचित्र) यांच्यासोबतच कॉमिक्स (अमर चित्रकथा), हास्यचित्रमालिका (चिंटू) यांचीही यामध्ये दखल घेतली आहे. ‘

 

दुसरा विभाग हा प्रत्यक्ष शिल्पकार आणि चित्रकार यांच्याबद्दलच्या नोंदींचा आहे. कलाकार महाराष्ट्रात जन्मलेला व महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर कारकीर्द असलेला असावा; अथवा महाराष्ट्राबाहेर जन्मलेला असेल तरीही कलेतील त्याच्या कारकीर्दीची पंचवीसहून अधिक वर्षे महाराष्ट्रात व्यतीत केलेली असावीत हा कोशासाठी कलाकार निवडीचा प्रमुख निकष आहे. अशा एकूण ३०७ कलाकारांच्या चरित्रात्मक नोंदी यामध्ये आहेत. आबालाल रहमान, बाबुराव पेंटर, आचरेकर, धुरंधरांपासून वासुदेव कामतांपर्यंतचे अशा ख्यातकीर्त चित्रकार; शि. द. फडणीस, वसंत सरवटे यांच्यापासून राज ठाकरेंर्यंतचे हास्यचित्रकार/व्यंगचित्रकार, रॉबी डिसिल्व्हा यांच्यासारखे डिझायनर, अच्युत पालवांसारखे सुलेखनकार अशा अनेक प्रतिभावान कलाकारांच्या कलादृष्टीचे दर्शन इथे घडते.

 

या विभागात दृश्यकलेचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या कलाकारांबरोबरच असे शिक्षण घेतले नसतानाही दृश्यकलेच्या क्षेत्रात अमीट ठसा उमटवलेल्यांचीही नोंद घेतली आहे. पद्मा सहस्रबुद्धे,  ज्योत्स्ना कदम, माधुरी पुरंदरे इ. स्त्री कलाकारांनाही आवर्जून स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक कलाकाराचा जीवनकाळ, कलाक्षेत्रातले उल्लेखनीय कार्य, त्याच्या कलाविष्काराची समीक्षा, त्याच्या प्रमुख कलाकृती आणि त्यातील काहींची छायाचित्रे असे प्रत्येक कलाकारावरच्या नोंदीचे स्वरूप आहे. शक्य तिथे कलाकाराच्या आईचे आणि पत्नीचे नावही समाविष्ट केले आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय. शिवाय कलाकाराच्या कुटुंबात जर त्याच्या कलेचा वारसा पुढे चालू ठेवणारी व्यक्ती असेल तर तिचाही उल्लेख केला आहे. अशा प्रकारच्या विस्तृत नोंदी अभ्यासकांना कलाकारांच्या वैशिष्ट्यांसोबतच त्यांनी खळाळत्या ठेवलेल्या कलाप्रवाहाचीही जाणीव करून देतात.

 

तिसऱ्या विभागात दृश्यकलेच्या क्षेत्रात पायाभूत कार्य केलेल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया इ. कलासंस्था; त्याचबरोबर महत्वाचे आर्ट स्टुडिओ आणि दृश्यकलेला वाहिलेली प्रदर्शनस्थळे यांच्याबद्दल माहिती मिळते. कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या सयाजीराव गायकवाड, भवानराव पंतप्रतिनधी यांच्या राजाश्रयाचे महत्वही या विभागात अधोरेखित केले आहे.  

 

मोठ्या आकारातला उत्कृष्ट निर्मितीमूल्ये असलेला हा कोश कलासमीक्षक, अभ्यासक यांच्यापासून सर्वसामान्य कलाप्रेमी वाचकापर्यंत सर्वांनीच अनुभवावा असा आहे. विपुल छायाचित्रांमधून रंग आणि कुंचला किंवा काष्ठ आणि मृदा यांच्या सहाय्याने कलाकार उभ्या करत असलेल्या प्रतिसृष्टीचे विलोभनीय दर्शन आपल्याला होते. एकाहून एक प्रतिभावान कलाकारांवरच्या नोंदी वाचत असताना त्यांनी घेतलेला उत्कृष्टतेचा ध्यास, प्रतिकूल परिस्थितीतून काढलेला मार्ग, कलेप्रती असणारी त्यांची निष्ठा या गोष्टी खूप काही शिकवून राहतात. विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या अनेक कलाकारांना या कोशाने ठळकपणे सर्वांसमोर आणले आहे. महाराष्ट्राच्या कलावैभवाला देखण्या रुपात सादर केल्याबद्दल संपादक, प्रकाशक आणि सर्व संबंधितांचे देशभरातील अभ्यासक आणि रसिक आभार मानतील यात शंका नाही.   


एन्सायक्लोपीडिया : व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र

संपादक : सुहास बहुळकर, दीपक घारे

प्रकाशक : पंडोल आर्ट गॅलरी

किंमत : ४००० रु.

पृष्ठसंख्या : ९६०


(या लेखाची संक्षिप्त आवृत्ती ७ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झाली)


Saturday, July 9, 2022

The Bera Bond : मनुष्य आणि बिबट्याचे सहअस्तित्व



मनुष्य प्रगतीच्या पायऱ्या जसजशा चढत गेला तसतसा पर्यावरण संतुलनाला सुरुंग लागत गेला हे दुर्दैवी सत्य आहे. आदिमानवाने शेती सुरू केली, तीच मुळी वृक्षतोड करून मोकळ्या केलेल्या जागेवर! सुरुवातीला मूलभूत गरजांसाठी मानवाकडून होत असलेले निसर्गावरचे अतिक्रमण पुढे सर्व प्रकारच्या भौतिक सुखांसाठीही होऊ लागले. यातून पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम तर झालेच, परंतु वनक्षेत्राचे दिवसेंदिवस आकुंचन होत असल्याने आपल्या अधिवासावर गदा आलेले वन्यप्राणी, त्यातही विशेषतः बिबटे, भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्त्यांमध्ये शिरू लागले. पूर्वी ग्रामीण भागामध्ये घडणाऱ्या या घटना आता अनेकदा शहरांमध्येही घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘भारतातील एका गावामध्ये मनुष्य आणि बिबटे यांनी एकमेकांचे अस्तित्व स्वीकारले असून, ते एकमेकांच्या सान्निध्यातच राहतात’ असे सांगितले तर आपल्याला आश्चर्य वाटेल.द बेरा बॉंडया पुस्तकामधून संदीप भुतोरिया यांनी राजस्थानातील मनुष्य आणि बिबट्या यांच्यातले बंध जपणाऱ्या ‘बेरा’ नावाच्या गावाची ओळख करून दिली आहे. 

बेरा हे राजस्थानातील उदयपूर पासून १४० किलोमीटर वसलेले गाव आहे. अरवली पर्वतरांगेच्या सान्निध्यात असलेल्या या गावामध्ये ५५ पेक्षा अधिक बिबट्यांचे अस्तित्व आहे. रबारी ही येथील प्रमुख पशुपालक जमात निसर्गाशी सूर जुळवून जगताना दिसते. शेळ्यामेंढ्या, उंट, कोंबड्या, बदके अशा अनेक प्रकारचे पशुपक्षी ही जमात पाळते. या प्रचंड पशुधनाकडे बिबटे आकर्षित होतात, कारण त्यांना इथे  खाद्य सहजपणे उपलब्ध होते. अधूनमधून बिबटे आपल्या कळपातील काही जनावरे घेऊन जाणार याची रबारी लोकांना कल्पना असते, परंतु तरीही हे लोक त्या बिबट्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करत नाहीत. यामुळे येथील बिबटेही निर्धास्त झाले आहेत. तेदेखील मनुष्य प्राण्यावर हल्ला करत नाहीत. कित्येक वेळा तर या समाजाचा सामूहिक कार्यक्रम चालू असताना काही अंतरावर बिबट्याचा वावर असतो. 

 बेरा गावाला ‘पेरवानामक टेकड्यांचे सान्निध्य लाभले आहे. या टेकड्यांवरचे मोठे पाषाणखंड, त्यातल्या कपारी आणि नैसर्गिक गुहा यांच्या आश्रयाला बिबटे राहतात. बिबट्यांच्या हमखास दर्शनाचे हे ठिकाण आहे. या टेकड्यांवर स्थानिकांनी काही मंदिरेही उभारली आहेत. त्यातले एक शिवमंदिर म्हणजे मनुष्य आणि वन्यजीवांच्या साहचर्याचे एक उत्तम उदाहरण आहे. मंदिराच्या पायऱ्यांवरही बिबटे सहज संचार करत असतात. २००१ साली ‘महाराज अमरनाथ’ नावाचे एक संन्यासी हरियाणामधून आले आणि इथेच विसावले. मंदिरातच राहणारे हे संन्यासी मंदिराबाहेर पाणी आणि दूध ठेवत असत आणि बिबटे तिथे येऊन ते पिऊन जात असत. महाराजांनीही स्थानिकांप्रमाणेच बिबट्यांशी जुळवून घेण्याची परंपरा पाळली हे विशेष!

कॉफीटेबल बुकप्रकारचे हे पुस्तक  म्हणजे वन्यजीव अभ्यासकाने केलेले विश्लेषण नसून निसर्गावर प्रेम असलेल्या लेखकाने केलेली निरीक्षणे आहेत. पुस्तकाचे सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे यातील छायाचित्रे. बेरापासून जवळच असलेल्या जवाई धरणाच्या परिसरातले लँडस्केप्स, तिथले पशुपक्षी, बेरा गावाचा परिसर आणि जवळच्या टेकड्यांवर असलेला बिबट्यांचा मुक्त संचार यांच्या अप्रतिम छायाचित्रांनी हे पुस्तक सजले आहे. ही छायाचित्रे प्रामुख्याने शत्रुंजय प्रताप सिंह यांनी काढलेली आहेत. ते स्वतः शहरी जीवन सोडून आपल्या कुटुंबासह बेरा येथे येऊन राहिले आहेत. कुंभळगड आणि माउंट अबू या अभयारण्यांदरम्यान असलेल्या या निसर्गसमृद्ध परिसरामध्ये शत्रुंजय सिंह आपला लॉजचा व्यवसाय सांभाळून आपल्या आवडीचे वनसंवर्धनाचे कार्य करतात आणि छायाचित्रणाचा छंदही जोपासतात. शेळी, बिबट्या आणि छोटेसे मंदिर यांना एकाच फ्रेममध्ये सामावणारे त्यांचे पुरस्कारप्राप्त छायाचित्र आपल्याला या पुस्तकामध्ये बघायला मिळते. जीवन, मृत्यू आणि मुक्ती एकाच छायाचित्रातअसे लेखकाने याचे सार्थ वर्णन केले आहे. बेरा परिसरामध्ये येऊ घातलेल्या खाणींचा पर्यावरणाला असलेला धोका ओळखून शत्रुंजय यांनी येथील गावकऱ्यांना संघटित केले आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे २०१६ साली खाणींवर बंदी आली आणि मूळच्या २० चौरस किलोमीटर असलेल्या संरक्षित वनक्षेत्रामध्ये वाढ होऊन येथील जंगलाचा आणखी ६२ चौरस किलोमीटर भाग संरक्षित म्हणून घोषित झाला. 

शत्रुंजय यांच्यासोबतच सी.पी.सिंह राठोड, गोपाल सिंह आणि उमेश गोगना यांच्या छायाचित्रांनीही पुस्तकाच्या देखणेपणामध्ये भर घातली आहे. मनुष्य आणि बिबटे यांच्या संघर्षाच्या कहाण्यांमुळे अस्वस्थ झालेल्या मनाला शांततामय सहजीवनाची ही कथा नक्कीच दिलासा देते. 

 

‘द बेरा बॉंड 

लेखक : संदीप भुतोरिया 

प्रकाशक : मॅकमिलन 

पृष्ठसंख्या : १६३

किंमत :  ७५० रु.

 

('महाराष्ट्र टाईम्स'मध्ये २ जुलै २०२२ रोजी पूर्वप्रकशित)