कुकुल्या वयात असताना काही वाटा आपोआप सुरूच होतात ... म्हणजे त्या न कळत्या वयामध्ये "या वाटेवरून चालायला सुरुवात करायची की नाही" वगैरे प्रश्न पडतच नसतात आपल्याला ! चालणे असो, बोलणे, वाचणे असो - स्वतःहून या वाटांवरून पुढे जायला सुरुवात करतो. वाचन वगळता बाकीच्या मुलभूत गोष्टी आपल्या आपोआप चालूच राहतात ठेवतो. (मी 'वाचणे' असे न लिहिता मुद्दामून 'वाचन' लिहिले आहे.अगदीच नाईलाज म्हणून काही गोष्टी डोळ्याखालून घालणे - यात वाणसामानाच्या यादीपासून अभ्यासाच्या पुस्तकापर्यंत बऱ्याच अपरिहार्य गोष्टी आल्या - म्हणजे 'वाचणे' झाले, आणि मनापासून एखाद्या गोष्टीत रस वाटून ती वाचून संपवणे म्हणजे "वाचन" ). लहानपणी एखादी गोष्ट म्हणजे 'गोष्ट'च असते - 'कथा' वगैरे नसते. लहानपणी प्रत्येकजण हटकून 'गोष्टीची पुस्तकं' वाचत असतो तशी मी पण खूप वाचली आणि सुदैवाने पुढे इतकी छान छान पुस्तकं वाचायला मिळाली, की नकळत चालू लागलेल्या वाटेवर ती सावल्या देणारी झाडंच बनून गेली ..
भा. रा. भागवत असेच केव्हातरी फास्टर फेणेच्या मागून दबकत दबकत आले आणि अक्षरशः गारुड केले. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपला कोणीतरी हिरो असतो - खरा किंवा काल्पनिक - आणि बऱ्याचदा आपला हिरो काल्पनिक आहे हे मानायला मन तयारच नसते ! पाचवीत असताना पहिल्यांदा फास्टर फेणेचे पुस्तक नजरेला पडले. त्याआधी कधीतरी एका दादाने फा.फे. बद्दल पुरेशी उत्सुकता पेरून ठेवली होतीच. आईकडे हट्ट करून समोर दिसणाऱ्या सहा पुस्तकांपैकी कशीबशी दोन झोळीत पडून घेतली 'फास्टर फेणे डिटेक्टीव' आणि 'प्रतापगडावर 'फास्टर फेणे' . बास्स ! मला माझा हिरो मिळाला .... मग तो खरा आहे की काल्पनिक याच्याशी मला घेणे देणे नव्हते. तो खूप जवळचा वाटत होता. तो जे बोलत होता ते कुठेच पुस्तकी वाटत नव्हते. तो जे धावरे धाडस करत होता ते त्या वयातल्या कोणत्याही मुलाला मनापासून करावेसे वाटते तसलेच होते. आणि मुख्य म्हणजे त्याची 'कर्मभूमी' 'माझं पुणं' होती. मला आठवतंय जसा जसा फास्टर फेणेच्या गोष्टी वाचत गेलो तसा तसा त्यात वर्णन केली गेलेली पुण्यातली ठिकाणं डोळ्यासमोर उभी राहू लागली. .. मग कसब्यात गेलो की फा. फे. च्या मामांचा वाडा अमुक एका ठिकाणी असेल असे चित्र रंगवू लागलो. रेसकोर्सपाशी गेलो की डोळे विद्याभवन शाळा शोधायला लागले, बंडगार्डनपाशी गेलो की फा. फे. ने पर्णकुटीपाशी वेड्याशी केलेला सामना दिसायला लागला ... जेव्हा मी पहिल्यांदा पाताळेश्वर पाहायला गेलो तेव्हा माझे डोळे मागची अंधारी गुहा आणि त्यातल्या चीनी हेरासाठी भिरभिरत होते .... एक ना दोन ..... आणि हे वेड पुण्यापुरतेच मर्यादित राहिले नाही .... ट्रेनने खंडाळ्याचा घाट ओलांडताना 'नक्की कोणत्या बोगद्यापाशी फा. फे. ने ढाण्या वाघाला मालगाडीत अडकवले असेल' याचीसुद्धा मनाशी खूणगाठ बांधली होती मी ! 'डोळ्यांची निरांजने करून ओवाळणे' म्हणजे काय हे मला फा. फे ची पुस्तकं वाचत असतानाच्या भावना आठवल्या की कळते ( मला माहित आहे की मी लिहिलेले हे शब्द फार पुस्तकी किंवा नाटकी आहेत, पण या घडीला मला दुसरे शब्द आठवत नाहीयेत .. खरंच !).
आणि हा फास्टर फेणे जसा शब्दात आहे तसा तंतोतंत उभा केला तो राम वाईरकरांच्या अफलातून चित्रांनी. सुरुवातीच्या पुस्तकांमध्ये फा.फे. हा एका काटकुळ्या sketches च्या स्वरुपात होता. जसजशी पुस्तकं येत गेली तसतसा तो अधिक सुस्पष्ट आणि ठाशीव होत गेला.... एकुणात काय तर फास्टर फेणेचा प्रभाव फार जबरदस्त होता... इतका, की त्याची बरीच वर्षे 'out of print' पुस्तके मी कॉलेज मध्ये असताना जेव्हा नव्याने प्रकाशित झाली , तेव्हा माझ्याकडे नसणारी उरलेली सगळी पुस्तकं घेऊन अक्खा २० पुस्तकांचा सेट पूर्ण केला !!
अर्थात 'फास्टर फेणे' चे गारुड हे भा.रा. भागवतांच्या झपाट-लेखणीचे आहे हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. मुख्यत्वेकरून मराठी मुलांसाठी लिहिलेला असला तरी त्यात हलके फुलके इंग्लिश शब्द चपखलपणे पेरलेले आहेत. त्यामुले आजही ही पुस्तकं कालबाह्य वाटत नाहीत. शिवाय सगळ्या गोष्टी अक्षरशः खिळवून ठेवणाऱ्या आहेत. या सगळ्यामुळे भा. रां. चे पुस्तक दिसले की वाचायला लागलो. त्यांची अनुवादित आणि रुपांतरीत पुस्तकं सुद्धा तितकीच मंत्रमुग्ध करणारी आहेत. आपण ती वाचतो तेव्हा ती मूळची मराठीत नाहीत यावर विश्वास बसत नाही. Alice in Wonderland चे 'नवलनगरीत जाई' हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण. जगातल्या तमाम बंडखोरांचा 'हिरो' असणारा शरवूडच्या जंगलातला Robin Hood अणि त्याचे यारदोस्त त्यांनी अश्या चटकदार मराठीत रंगवलेत की Robin Hood आपल्याच गावातला कोणीतरी वाटतो ("शिंग वाजता Robin करिता शरवूड जंगल भंगेल - गडी लोटतील रंगेल" अश्या ओळीनेच पुस्तक सुरु होते ते संपेपर्यंत खली ठेववत नहीं). सर्वात अविस्मरणीय रुपांतरीत पुस्तक म्हणजे Charles Dickens च्या The Christmas Carol चा मराठी अवतार - 'भटांच्या वाड्यातील भुतावळ'. मूळच्या पुस्तकातल्या christmas ची यात दिवाळी होते. कंजूष चिटको शेठजी आणि नरकचतुर्दशीच्या आदल्या एका रात्रीत त्याला वठणीवर आणणारी धमाल भुते .... भा. रा. एका मराठमोळ्या खेड्याचे वातावरण असे काही उभे करतात की गोष्ट एकदम या मातीतली होऊन जाते ! हे पुस्तक मिळाले तर कधीही सोडू नका.
भा.रा.भागवतांनी अक्षरशः शेकड्याने पुस्तकं लिहिली आणि इंग्लिश मधून भाषांतरित, रुपांतरीत, अनुवादित केली. ज्यूल्स व्हर्न ची जवळपास २५ -३० , H G Wales ची काही, Arthur Conan Doyle चा Sherlock Holmes अशी कितीतरी. खऱ्या अर्थाने ते बालसाहित्यातले भीष्माचार्य होते. परदेशात बालसाहित्यालासुद्धा एक वलय असतं. तसं दुर्दैवाने आपल्याकडे नसल्यामुळे एवढे मोठे भा.रा. आज फारसे माहित असावेत असे वाटत नाही. नेटवर शोधल्यावर काही तुरळक forums वगळता फारसे हाती लागत नाही (ब्लॉग साठी वापरलेला फोटो नेटवर कसा काय मिळाला याचेच मला आश्चर्य वाटते आहे). Harry Potter च्या चित्तथरारक कादंबऱ्या वाचताना प्रकर्षाने जाणवते की आज भा. रा. भागवत असायला पाहिजे होते. या अफलातून कादंबऱ्या तितक्याच ताकदीने मराठी मध्ये आणायला भा. रा. भागवत यांच्या इतका समर्थ (आणि मुख्य म्हणजे मुलांचे विश्व जाणून घेऊन लिहिणारा) दुसरा अनुवादक आहे असं वाटत नाही.
खरेतर भा.रा. भागवतांनी मोठ्यांसाठीचे साहित्यसुद्धा लिहिले. विज्ञानकथा लिहिल्या. 'हाजीबाबाच्या गोष्टी' सारखे इराणच्या सुल्तानशाहीच्या पार्श्वभूमीवरचे पुस्तक लिहिले. पेरू देशातली इनका संस्कृति नष्ट करणार्या पिझारो या spanish आक्रमकावरचे 'पिझारोचे थैमान' लिहिले. भरपूर विनोदी कथा लिहिल्या. छगन नावाचे गमतीदार पात्रसुद्धा निर्माण केले (राम कोलारकर संपादित 'निवडक मराठी विनोद कथां'चे २० खंड प्रकाशित झालेत त्यातल्या जवळपास प्रत्येक खंडात भा.रा. भागवतांची एक ना एक कथा आहेच). एवढे असले तरी ते मनापासून रमले लहान मुलांमध्येच.
मुलांसाठी छान छान साहित्य सादर करावे यासाठी भा.रां.ची कायम धडपड चालायची. १९४० च्या दशकात सुमारास त्यांनी 'बालमित्र' नावाचे मासिक सुरु केले. मुलांनी केवळ जादूच्या गोष्टीमध्ये रमून न जाता चटपटीत,प्रसंगावधानी आणि आजच्या भाषेत 'dashing' बनावे अशी त्यांची खूप इच्छा असायची. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बाजाच्या गोष्टी, वैज्ञानिक कुतूहल शमवणाऱ्या गोष्टी, साहसकथा, संस्कारक्षम कथा अशा अनेक प्रकारांनी अंक सजवला. त्यावेळच्या मोठ्या लेखकांकडून लिखाण करून घेतले. बऱ्याचदा स्वतः वेगवेगळ्या टोपणनावांनी एकाच अंकात गोष्टी, लेख लिहिले. परवडत नसूनही पदराला खार लावून , नाना खटपटी करत मासिक चालू ठेवले.(सुदैवाने अलीकडेच 'निवडक बालमित्र' नावाचे ७ भाग प्रकाशित झाले आहेत. ते पाहून हे अंक किती सुंदर असायचे याची कल्पना येते.) बाल - कुमार गटातल्या मुलांची नस त्यांना बरोब्बर सापडली होती.... त्यामुळेच तुडतुडीत फास्टर फेणे, पुस्तकातला किडा असूनही वेळप्रसंगी विजू-मोना या छोट्या दोस्तांना घेऊन साहसात उडी घेणारा बिपीन बुकलवार, थापाड्या तरीही निरागस असणारा नंदू नवाथे अशी वेगवेगळ्या जातकुळीची (आणि तरीही सारखीच वाचनीय असणारी) पात्रे कायमच जवळची वाटत राहतात. भा.रा.भागवतांच्या पुस्तकांमधे साहस हे समान सूत्र असले तरी पार्श्वभूमी वेगळी असते.त्यामुळे वाचताना दरवेळेस आपण वेगळ्या विश्वात जातो. मग 'भुताळी जहाज' मध्ये आपण एका गूढ धुक्यात गुंतत जातो तर 'ब्रह्मदेशातला खजिना' मध्ये १८५० च्या आसपास च्या काळातली अनोखी शोधकथा अनुभवता येते. 'जयदीपची जंगलयात्रा' मध्ये जयदीप बरोबरच आपणसुद्धा ब्राझीलच्या जंगलात हरवतो तर 'तैमूरलंगचा भाला' मध्ये १९४२ च्या लढ्यामध्ये भगतराम या क्रांतिकारकासोबत लता आणि किरण या भावंडांनी बेभान होऊन केलेलं साहस अनुभवतो.... भा.रा.भागवतांची पुस्तके जितकी वाचावी तितकी कमीच आहेत !!! प्रत्येकाबद्दल लिहायला लागलो तर वेळ पुरायचा नाही. सुदैवाने माझ्या संग्रहात त्यांची पन्नासेक पुस्तके आहेत . अजूनही प्रदर्शनात त्यांचे पुस्तक दिसले की मी ते घेतोच.
ब्लॉग सुरु केल्यापासून ठरवले होते भा.रा. भागवतांवर नक्की लिहायचे आणि लिहायचं लिहायचं म्हणता म्हणता आजचा दिवस उजाडला तो पण एकदम perfect . बरोब्बर १०१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ३१ मे १९१० ला इंदोरला भा.रा.भागवतांचा जन्म झाला होता.....त्यांच्या लिखाणाचा काळ लक्षात घेतला तर त्यांचे बरेचसे लिखाण १९६० नंतर म्हणजे वयाच्या पन्नाशी - साठी नंतर झालेलं आहे. एवढे असूनही ते अगदी ताजे आणि चटकदार आहे. त्यांच्या मृत्यूची तारीख मला आठवत नाही. आणि मला त्याची गरज पण वाटत नाही. माझ्यासाठी ते चिरतरुण असणारे आणि आजसुद्धा पुस्तकांच्या पानापानातून मिश्किलपणे भेटत राहणारे जानी दोस्त आहेत.
मी काही पुस्तकांची नावे देतोय जी मी केव्हाची शोधतोय. सध्या यातली बरीचशी आउट ऑफ प्रिंट आहेत. ही ब्लॉग पोस्ट वाचणाऱ्या कोणाच्या पुस्तकाच्या कपाटात यातले एखादे पुस्तक असेल तर मला नक्की कळवा
१) भाराभर गवत - भा.रां.चे आत्मचरित्र
२) घड्याळाचे गुपित - बिपीन बुकलवारची साहसकथा
३) दीपमाळेचे रहस्य १) भाराभर गवत - भा.रां.चे आत्मचरित्र
२) घड्याळाचे गुपित - बिपीन बुकलवारची साहसकथा
४) जयदीपची जंगलयात्रा
५) समुद्र सैतान
६) कॅप्टन किडचा खजिना
ता.क. : इकडे तिकडे भटकताना आजूबाजूच्या लोकांच्या सतराशे साठ प्रकारच्या T - Shirts वर नेहमी परदेशी characters (Dennis, मिकी - डोनाल्ड इत्यादी ) आणि व्यक्तिमत्वं (Che Guevara, Kurt Cobain इत्यादी ) दिसत असतात. म्हटले - एवढे सगळेजण T -Shirt वर झळकत आहेत मग आपला मराठमोळा फास्टर फेणे का नाही !! त्यामुळे मी लवकरच फास्टर फेणेचे चित्र असणारा T -Shirt प्रिंट करून घेणारे - Sweat Shirt प्रिंट करून घेतो तसा.... तमाम फास्टर फेणे fans ना यामध्ये सहभागी करून घ्यायला मला आवडेल !!
Too good Parsha... evdhya limited words madhehi tu Bha Ra vyavasthit cover keles... mala maza baalpaN aathavla... tu faar chan lihitos re... ani ho, t-shirt print chya veli malahi sang.. Faster FeNe mazahi hero ahe :)
ReplyDeleteफारच अप्रतिम!
ReplyDeleteकदाचित भा.रां. वर काही लिहिले गेले तर तुझ्या या ब्लॉग चा आवर्जून उल्लेख करावा इतका सुरेख जमलाय हा....
मला एक सांगायचय... आपण पहिली ते पाचवी पर्यंतच्या मुलांसाठी काही पुस्तन्कांचे अभिवाचन करू शकतो...कदाचित तुझ्या शाळेतून सुरुवात करू...
आणि T-shirt/sweatshirt साठी count me in !!!!
जो काही अन्याय झाला असेल भा.रां. वर.... तो बऱ्याच अंशी पुसला आहेस तू... कदाचित आपल्या पिढी कडून दिले गेलेले सर्वात मोठे योगदान असेल हे.. (माफ कर... मी पण जरा मोठे मोठे लिहितोय... पण हे खरे आहे.. You deserve a standing ovation )
काजळाचा तीट: काही ठिकाणी edit कर... (पहिल्या परिच्छेदात गारुडाचे गरुड झालेय! )
Thanks अमृता ! Are these really limited words ? मला वाटले होते फार फापटपसारा होतोय की काय म्हणून !!
ReplyDelete@ आशिष : बापरे Standing Ovation म्हणजे जरा फारच होतंय रे .... आणि हो तू मोठे मोठे (पुस्तकी) लिहिले आहेस पण हरकत नाही मी पण काही ठिकाणी पुस्तकी छापाचे लिहिलेले आहेच की :P
आणि अभिवाचनाची कल्पना मस्त आहे... तसाही तो plan आपल्या केव्हापासून डोक्यात आहे ! बघू केव्हा प्रत्यक्षात येतोय....
(ता.क. एडिटिंग केले आहे .. धन्यवाद सांगितल्याबद्दल )
आणखी एका पुस्तकाबद्दल लिहायचे राहिले आहे ....
ReplyDeleteज्यूल्स व्हर्नच्या Around The World In 80 Days चा भा.रां.नी केलेला अनुवाद - "झपाटलेला प्रवासी " ..... पुस्तक वाचून आपल्यालाच झपाटून जायला होतं..... माझ्याकडे या पुस्तकाची १९६० च्या दशकातली जीर्ण झालेली आवृत्ती आहे आणि गंमत म्हणजे त्यातल्या सगळ्या चित्रांखाली 'बाळ ठाकरे' अशी सही आहे !!!
good one Prasad, as always... :-)
ReplyDeleteI guess I have seen some of those books at my aunt's place. I will check it n let you know. meanwhile keep your posts coming.
Cheers
Prasad....kay bolu mitra....todlas!!!!!
ReplyDeletehehe agadich gupte style zali ahe
Pan kharach aksharshaha zapatlyasarkhe zale ha blog wachun....ani mi tharawle ahe ki lawkarat lawkar faster fene cha akkha sanch wikat ghyaycha....
Lai bhari prasad....tula kharach sangu ka...ekhadya paper madhye ka nahi pathawat tu? i think u ll get larger readers there...so think abt it....n keep it up!!! :)
prasad, as usual khup chhan lihile aahes.aani khare saangu ka mala tujhya blogchya barobarine kinbahuna tyapeksha thodya jastch comments vachayala aavadtat.tujhe koutuk bahun kinva vachun khup mast vatate. Keep it up!! aani 1 chhansa tee tujhya balusathi suddha!!
ReplyDeletephatak kharach Bha. Ra. bhagwatancha likahan unique hota. Tu mhanalas tasa achuk nas pakadnara.
ReplyDeleteI would like to share that ki me hi books Prasad mulech vachli ahet.
मी harry potter ची जबरदस्त fan आहे..
ReplyDeletealice in wonderland, sherlock homes, around the world in 80 days अशी सारी पुस्तक माझी वाचून आणि पाहून पण झाली आहेत ( movies)
पण तुम्ही म्हणताय ती मराठी पुस्तक कधी वाचनात नाही आलीत.. कुठल्याच वाचनालयात दिसली नाहीत.. कधी शोधली नसतील म्हणूनही असेल..
पण जशी वरची पुस्तकं सहज हाताशी आली तशी ही आली नाहीत..
नाही म्हणायला 'गोटया' पुस्तकं वाचल आहे.. sorry पण आता लेखक कोण ते आठवत नाही.
तुमचा लेख वाचून खरंच वाटतंय की फास्टर फेणे चा शोध घ्यावा.. मला वाचायला आवडेल..
भा . रा. भागवतांना salute ....
@ Anagha : Thanx for commenting :)
ReplyDeleteBeing well read person it's strange u aren't heard about Faster Fene .... many books which I mentioned aren't easily available. But all Bipin Bukalwar and FaFe books are available in all major bookstores nowadays....
Do read and reply me if u like it...
Ani jata jata.... Gotyache lekhak Na.Dho.Tamhankar ahet ....
मुला, नेहमीप्रमाणेच तुझ्या अफाट वाचनाचा-शब्दसंपदेचा, सुसूत्र लिखाणाचा आणि मुख्य म्हणजे अतिशय ओघवत्या शैलीचा नमुना म्हणजे तुझा हाही अजून एक blog post! दुर्दैवाने (या शब्दाला काहीच अर्थ नसतो, खरंतर तिथे आळशीपणामुळे असं म्हणायला हवं) बालपणी वाचनापेक्षा नर्तन, खेळणे, बडबड यांत अधिक लक्ष घातल्याने आणि कधीमधी शाळेतूनच बक्षीस मिळालेल्या पुस्तकांमध्ये भा. रां. ची काही पुस्तकं मिळाली, त्यावरच आहे-नाही त्या वाचनाची भूक भागावल्याने मी तुझ्याइतकी फा. फे. ची फा. फॅ. नक्कीच नाही, पण तरीही तुझा आत्ताचा blog वाचता वाचता 'रम्य त्या बालपणी' खरोखरच एकदम फा. फे.च्या युगात गेल्यासारखं वाटलं! :) भा.रां. ना सलाम ठोकता ठोकता हेही सांगून जाते की, फा. फे. आणि मुख्य म्हणजे भा. रां.वर असं भन्नाट आणि भारी लिहिताना अज्जिबात फे फे न उडालेल्या तुझी मात्र मी कायम फा. फॅ. आहे आणि असणार आहे! ;) असंच मस्त मस्त लिहीत रहा, जगताना असा nostalgia खूप खूप समाधान देऊन जातो! :)
ReplyDeleteता.क. सारं खरंच खूप छान जमून गेलं आहे, यात वादच नाही, पण अजूनही काही व्याकरणाच्या, मुख्यत्वे वाक्यरचनेच्या चुका सुधार. (हे सांगितल्याबद्दल खरंच माफ कर, पण निदान मला तरी वाचताना एक जरी अशी चूक आढळली, तरी अक्षरश: दातात खडा लागल्यासारखं वाटतं. :( Sorry, sorry, खूप खूप sorry!)
Thanx Charuta : always good to have critical scrutinizing than having plain praises
ReplyDeleteझकास ब्लोग लिहिला आहेस पश्या, खरं तर मी पण कधीच फा फें ची पुस्तक वाचली नाहीत पण परवा वाचायला सुरु केलेला तुझं blog बघून आत्ता तरी मी तीन पुस्तके आणली आहेत ..... थोडी थोडी करून वाचेन .... पण खरच अगदी world cup च्या final सारखं everything is perfect लिहिला आहेस .
ReplyDeleteGood Luck !!!!!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteमी बिपीन बुकलवार विषयी इंटरनेट वर शोधात असताना.. तुझा हा blog सापडला........
ReplyDeleteअप्रतिम.... अगदी "ditto " भावना सापडल्या!!
तिकडे Hollywood मध्ये अगदी Spielberg , Tintin वर सिनेमा काढतो आहे
आपला फा फे देखील त्याच योग्यतेचा आहे असे मला वाटते!!!
आणि भा रा भागवतांना "आभार " भागवत म्हणावे का???
समग्र फा फे, Sherlock Holmes , बिपीन बुकलवार आणि Joules Verne , .........
@Thanx Rucha
ReplyDeleteAbhar Bhagwat chi idea awadli :)
FaFe war punha navyane serial vyala havi .. budget wadhavun !!
वा वा मित्रा .. आठवणी ताज्या केल्यास..
ReplyDeleteएकुण एक नाव वाचतांना त्याची पूर्ण कथा डोळ्या समोर उभी रहात होती :)
आता माझ्या मुली करता शोधतो आहे पण सापडत नाहीत. Looks like they are out of print.
तुला कुठे पीडीऍफ़ फॉर्म मधे डाउनलोड ला माहित असल्यास please सांगणे
वाह क्या बात है ! मस्त लेख... 'तैमूरलंगचा भाला' शोधून दमलो मी.. लहानपणी किती वेळा वाचले होते गणतीच नाही.
ReplyDeleteएक 'काका गरुड' नावाचे पात्र वाचल्याचे आठवते कुठल्यातरी पुस्तकात (विक्षिप्त संशोधक) ते भा. रां. चे होते काय पुस्तक ? काका गरुडांच्या तोंडून, मुलांना कळेल अशा सोप्या भाषेत वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगीतल्या होत्या लेखकाने.
फाफे च्या टी-शर्टची आयडीया छान आहे !
धन्यवाद Ranjya !
ReplyDeleteतुम्ही फाफेची पुस्तके कुठे मिळतात विचारले आहे . तुम्ही कुठे राहता ??
पुण्यात राहत असाल तर पुण्यात कोणत्याही चांगल्या पुस्तकाच्या दुकानात मिळतील.
उत्कर्ष प्रकाशनाने २० पुस्तकांचा संपूर्ण संच पुनः प्रकाशित केलाय. त्यामुळे माझ्या मते तो कोणत्याही शहरातील प्रमुख पुस्तकालयात मिळणे अवघड नाही.
या शिवाय दर रविवारी 'सकाळ'च्या बालमित्र पुरवणी मध्ये फाफेच्या गोष्टी कॉमिक्स स्वरुपात येतात त्या तुम्ही वाचू शकता ....
धन्यवाद राफा ....
ReplyDeleteमाझ्याकडे तैमूरलंगचा भाला आहे ... टुकटुक ;)
तू पुण्यातच असतोस ना ? मग मी तुला 'भाला' देऊ शकतो ... मी पण पुणेकरच आहे :)
आणि काका गरुड हे नाव आज पहिल्यांदाच ऐकतो आहे... त्यामुळे त्याबद्दल माहिती मिळवायला हवी !
बाकी आयशॉट नवा निबंध कधी लिहिणार ? वाट पाहून आतीचशय कंटाळलोय :P
तुझ्याकडे भाला आहे ! मस्तच !!!
ReplyDeleteटुकटुक >>> :)) किती भाव खाता रावजी ! अर्थात मेरे पास 'भाला' है अशी पंच लाईन टाकणारा भाव खाणारच ! (तुझ्या कॉमेंटवर फारच लवकर उत्तर देतोय ना मी ! ).
मला rahulphatak28 at gmail वर प्लिज टेस्ट मेल करुन ठेवशील ?(हा इ-पत्ता माझ्या ब्लॉगवरही आहे.. इथे तुझा इ-पत्ता न सापडल्याने असा पर्याय सुचवत आहे. पुढचे दोन आठवडे गडबडीत आहे मग तुला मेल करतो 'भाल्या'विषयी.. (मनातल्या कंसात : (आयला टेन्शनच आहे दुर्मिळ पुस्तक सांभाळून वापरायचे म्हणजे..)). धन्यवाद !!!
ता.क. आयशॉट....... होय आहे लक्षात :)
पश्याभाऊ,
ReplyDeleteमजा आली वाचून. (जरा उशीराच वाचला!) तुम्हाला हव्या असलेल्या पुस्तकांपैकी "घड्याळाचे गुपित" माझ्याकडे नक्कीच आहे. "समुद्र सैतान" हा "20 thousand leagues under the sea"चा अनुवाद असला तर तोही आहे! मी आपल्याला ही दोन्ही पुस्तके देऊ शकतो (पण छायाप्रत करून परत द्यावीत!)
माझ्या एका मित्राची आई - सौ. नीला धडफळे - भा रा भागवतांच्या साहित्यावर पीएच डी करत आहेत. बाकीची पुस्तके त्यांच्याकडे नक्कीच मिळतील! सरस्वती विद्यामंदिराच्या दारात (बाजीराव रस्ता) एक आठवले नामक गृहस्थ शनिवार-रविवार जुनी दुर्मिळ पुस्तके घेऊन बसतात. त्यांना सांगून ही (आणि इतर अनेक उत्तमोत्तम) पुस्तके मिळू शकतील.
फास्टर फेणेचे चित्र असलेला टी शर्ट मलाही हवा आहे!
आपला,
आदित्य पानसे
Thanx Aditya for ur response....and for offering ur books for xerox... recently I found out that घड्याळाचे गुपित has been re-published by Utkarsh Prakashan. So Immegiately grabbed it :)
ReplyDeletebtw समुद्र सैतान is not translation of "20 thousand leagues under the sea" (I guess name of the translation of "20 thousand leagues under the sea" is सातासमुद्राचा सुलतान). समुद्र सैतान is different book....
one more thing... can u give me contact no/ mail ID of सौ. नीला धडफळे ? Would be great to talk to with her about Bha Ra...
Hi,
DeleteMala N.Dho. Tamhankaran vishayi mahiti havi hoti. Kuthech sapadat nahi. Tu kahi lihile aahes ka tyanchya vishayi. Please share kar na.
Mitra, Mast lekh!
ReplyDeletebookganga.com check kar. ebook format madhye tula havi asleli out of print pustake aahet bahuda.
AaNi tula physical copy ch havi asa hatta asel tar mi ghari check karun kaLavto. Maazya kade ghadyaLache Gupit aaNi akkache Ajab Ichchhasatra hot. AaNi arthat Fa Fe chi sarvach.
आवर्जून कळवलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद शशांक,
Deleteमी लेख काही वर्षांपूर्वी लिहीला होता त्यानंतर घड्याळाचे गुपितची नवी आवृत्ती आली आहे. ती मी घेतली सुद्धा.... जयदीपची जंगलयात्रा, दीपमाळेच रहस्य मात्र अजूनही मिळालेली नाहीत 😢.. तुझ्याकडे असतील तर कळव. मी xerox काढून घेईन
आणि बुकगंगाचे माहीत नाही पण bookhungama.com वर फाफे आणि भारांची भरपूर पुस्तकं आलेली आहेत 😊
तू कुठे असतोस आणि काय करतोस. मी निगडीला राहतो आणि सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे.तुला माझ्या लेखाबद्दल माहिती कुठून मिळाली ?
कळावे,
---- प्रसाद
मस्तच. भा.रा.भागवत म्हणजे आम्हा भावंडांचं लहानपणीचं दैवत.भूताळी जहाजाचं " हुहे हुहे ह" अविस्मरणीय. मुलाला नवीन विकत घेऊन वाचायला लावलं आणि त्याला आवडतंय हे पाहून कुठेतरी मी तृप्त झालो.
ReplyDeleteधन्यवाद मिलिंद, आवर्जून कळवल्याबद्दल भुताळी जहाजसोबत ब्रह्मदेशातला खजिना मस्ट आहे.. वाचलं नसल्यास लगोलग विकत घेणे. मॅजेस्टिकने नवीन आवृत्ती काढली आहे
Deleteधन्यवाद मिलिंद, आवर्जून कळवल्याबद्दल भुताळी जहाजसोबत ब्रह्मदेशातला खजिना मस्ट आहे.. वाचलं नसल्यास लगोलग विकत घेणे. मॅजेस्टिकने नवीन आवृत्ती काढली आहे
Delete