Total Pageviews

Wednesday, June 29, 2011

बांध




त्या दिवशी मी नेहमीसारखाच माझ्या कोशात सुरवंटासारखा बसलो होतो... किंवा असे म्हणा की मी माझ्या बिळात उंदरासारखा  बसलो होतो. बाहेर दरवाज्याची बेल वाजली आणि आईने दरवाजा उघडला. बाहेर कोणीतरी नेहमीसारखेच मागणारे हात आहेत इतपत अंदाज आला होता. नेहमीचेच असते हे. सारखे कोणी ना कोणी हात पसरून दाराबाहेर उभे असते. त्यांचे कष्टी तोंड पाहून त्यांचा हिरमोड करावासा वाटत नाही म्हणून काहीतरी पाच पंचवीस रुपये हातावर टेकवून बोळवण करायची. पण सारखेच कोणीतरी आले तर देणे कसे शक्य आहे ? मग समोरच्याच्या चेहऱ्यावरच्या निर्ढावलेपणाच्या प्रमाणावरून पवित्र घ्यायचा. समोरचा उगीचच कष्टी भाव चेहऱ्यावर दाखवत नसेल तर सरळ निर्विकारपणे "नाही" सांगायचे. किंवा मग समोरचा अगदीच चेहरा कसनुसा करत असेल तर "आत्ता आम्ही काही देऊ शकत नाही... आमचेच आम्हाला भागत नाही... महागाई किती वाढलीये" वगैरे टेप वाजवायची आणि दरवाजा लावून घ्यायचा.

आज यापैकी काय करायचे याचा विचार करत असताना आईने मला बाहेर बोलावले. बाहेर एक मूळचा गोरा पण खस्ता खाल्ल्यासारखा रापलेला चेहरा असलेला एक चाळीशीचा गृहस्थ उभा होता आणि बरोबर एक मुलगा पण होता १०-१२ वर्षांचा. तो हिंदीमध्ये बोलू लागला आणि प्रकाश पडला की हा काश्मिरी आहे. त्याचे आडनाव भट्ट होते. तो सांगायला लागला "आम्ही पिंपरी जवळच्या काळेवाडी इथल्या कॅम्प मध्ये राहतो..." आणि अचानक मला प्रकरण गंभीर असल्याचे जाणवायला लागले. तो बोलतच होता.... "हम काश्मिरी पंडित है, लेकीन हमारा काश्मीरमें जीना बहोत मुश्कील हो गया है. एक एक करके हमे काश्मीर छोडना पडा". इथपर्यंत मी कसेतरी ऐकत होतो इतक्यात त्याने माझ्या घराकडे वरपासून खालपर्यंत पहिले आणि ते वाक्य टाकले "साब हमारा भी आप जैसा खुदका घर था.. वहां  पे बडे बडे बाग थे, खुदका गालीचोंका कारोबार था  .. लेकीन साब, सब कुछ छोडके हमे वहां से भागना पडा....." आणि अगदी याच क्षणाला कुठेतरी आत मध्ये एक प्रचंड घण बसला - अगदी घनघोर ! ते जे काही होते ते माझ्या सहनशक्तीच्या पार पलीकडचे होते. आनंदात स्वतःच्या बागेत बागडत असताना अचानक कोणीतरी येऊन भोसकावे तसे काहीतरी घडले होते. घाव गहिरा बसला होता आणि माझ्या गोड गोबऱ्या जगाभोवतीची भिंत क्षणार्धात जमीनदोस्त झाली होती .... त्या धुराळ्याने गुदमरून जाऊन अचानक डोळ्यातून पाणी झरू लागले.... झरू लागले कसले, चांगले फुफाटत वाहायला लागले ...     

त्या क्षणाला मी उभा असलेल्या उंबऱ्यापाठीमागे भरभक्कम भिंत उभी होती जी मला जन्मापासून या क्षणापर्यंत अगदी अंजारून गोंजारून सुरक्षित ठेवत होती आणि...आणि उंबऱ्यापलीकडच्या जगात हे दोघे वादळात तंबू उडून गेल्यासारखे असहाय्यपणे उभे होते. एके काळी माझ्यासारखेच निर्धास्त असणाऱ्या या दोघांना आणि त्यांच्यासारख्या अगणित हिंदू पंडितांना काश्मिरातल्या मुस्लीम अतिरेक्यांनी त्यांच्या कागडीच्या उबेतून हिसडून गारढोण वादळात हाकलून दिलेले होते. उद्या मी साखरझोपेत असताना कोणी मला काहीही बरोबर घेऊ न देता नेसत्या वस्त्रांनिशी घराबाहेर हाकलून दिले तर ?? मला कल्पनाही करवेना. मी त्या दोघांसमोरच रडायला लागलो .... अगदी ओक्साबोक्शी.... माझ्या रडण्याने तो माणूस पण कावराबावरा झाला आणि तोही रडू लागला.....फारच चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाली. तो रडत रडतच काहीतरी सांगत होता... मला पायातले बळच गेल्यासारखे वाटायला लागले. मी सरळ आत निघून आलो, आणि काय सांगू, रडू आवरेचना. हुंदक्यांवर हुंदके... मलाच कळत नव्हते हे काय होतंय. या आधी कधीच असं झालं नव्हतं. मला फक्त स्वतःच्या दुःखावर कढ काढणे  माहित होते. मग मी आज दुसऱ्याचे ऐकून एवढा का रडतोय ?  कदाचित असेही असेल की मी फार दिवसात-वर्षांत रडलो नव्हतो, कसलेतरी दुःख आत साचले होते आणि आज फुग्याला टाचणी लागल्यावर बांध फुटला होता. असं होतं बऱ्याचदा. आपली दुःखं आतल्या आत कुठेतरी दबून राहतात आणि मग असले काही निमित्त मिळाले की मिळेल त्या वाटेने बाहेर येतात..... पण छे ! माझी कसली आलीयेत दुःखं ? काड्यापेटीत मावतील इतपत जेमतेम माझी दुःखं... मला कुठे कोणी यांच्यासारखं सर्वस्व सोडायला लावून हाकलून दिलं होतं ? केवळ हिंदू आहे म्हणून माझ्या डोक्यावर यांच्यासारखी तलवार कुठे लटकत होती ? नाही नाही ... हे काहीतरी फार गहिरे होते... मला रडता रडता काहीच कळेनासे झाले होते... एवढा हमसून हमसून मी आधी कधी रडल्याचे आठवतसुद्धा नव्हते. त्या माणसाच्या केवळ चार-दोन वाक्यांमुळे मला पांगळा झाल्यासारखं वाटत होतं.
आई बाहेर त्या माणसाशी थोडावेळ तशीच बोलत राहिली. थोड्यावेळाने मी सावरलो आणि बाहेर येऊन त्याच्याशी बोललो, त्याला पाणी दिले. तो सांगत होता की "आम्ही भीक मागत नाही, आम्ही इकडे गालिचे विणून विकतो आणि थोडेफार पैसे मिळवतो.... आम्हाला पैसे नकोत. जुने कपडे किंवा बूट असतील तर द्याल का ?" नाही म्हणणे शक्यच नव्हते. आपणा पांढरपेशांची एक गोष्ट विशेष असते बरंका...  आपल्या वापरत नसणारे कपडे-वस्तू गरजूंना दिले की आपल्याला 'समाजसेवा' केल्याचा आनंद मिळतो. एकदा अशी समाजसेवा केली की पुढची समाजसेवा करेपर्यंतच्या काळात (म्हणजे नवे कपडे जुने आणि नव्या वस्तू निरुपयोगी होईपर्यंतच्या काळात)  आपण आपल्या डोळ्यावर कातडे ओढून घ्यायला मोकळे. मी पण अशीच समाजसेवा केली - झेपेल इतपत.  जाताना त्याने आभार मानले आणि "काळेवाडीला आमच्या कॅम्पला भेट द्या" म्हणाला आणि मुलाला घेऊन (बहुदा आणखी एका दारात उभं राहण्यासाठी) निघून गेला.

त्या काही मिनिटांमध्ये उठलेले प्रश्नाचे मोहोळ अजून शांत झालेले नाहीये.
ते लोक हिंदू म्हणून जन्माला आले हा त्यांचा दोष आहे का ? की मग काश्मीरचे लचके पडल्यानंतर ५० वर्षे होऊन गेली, तरीही ते मुसलमान झाले नाहीत हा त्यांचा गुन्हा आहे?
काश्मीर आणि पाकिस्तानात लाखो हिंदूंच्या कत्तली करून आणि एवढ्या देशोधडीला लावल्यानंतरसुद्धा तिकडच्या मुसलमानांच्या राहणीमानात काय फरक पडला ? अजूनही तिकडचे मुसलमान नागरिक शस्त्रांच्या नंग्या नाचाला बळी पडतच आहेत ना ?  
एरवी उठता बसता अल्पसंख्याकांच्या नावाने ऊर बडवणाऱ्या secular नरपुंगावांपैकी एकही माईचा लाल काश्मिरातल्या अल्पसंख्य हिंदूंबद्दल अवाक्षर का उच्चारत नाही ? 

यातल्या एकही प्रश्नाचे उत्तर मला मिळालेले नाहीये अजून.... मिळेल अशी आशाही वाटत नाहीये.... एवढे मात्र खरे त्या एका प्रसंगाने मला आतून हादरवले, ढवळून काढले. यापूर्वी कधीही ना अनुभवलेली अस्वस्थता आणि अस्थिरता जाणवून दिली.  आपण इकडे किती सुरक्षित (आणि त्यामुळेच अनभिज्ञ आणि बेफिकीर)  आहोत याचा साक्षात्कार झाला. We should not take our life for granted हे चांगलेच कळून चुकले. आणि त्याचबरोबर कुठेतरी समाधान वाटले - त्यांची वेदना मलाही तेवढीच सलली म्हणून, आपण अजूनही पूर्णपणे दगड झालेलो नाहीये याची जाणीव झाली म्हणून, खूप खूप दिवसांनी मला मोकळं होण्याचं निमित्त मिळालं म्हणून आणि त्या पाण्याने माझी नजर आणखी साफ झाली म्हणूनही !!
   



8 comments:

  1. लाजवाब साहेबा!

    ReplyDelete
  2. :) tuza lekh ek wegalach anubhav deun gela... kharach kashmir madhil visthapit zalelya hindu lokanche jivan achnak badalun gele... wait hyache watate ki apale so called 'SARKAAR' kahihi karat nai...
    Keep writting prasad..
    -Shruti Joshi-Kulkarni

    ReplyDelete
  3. prasaad... solid lihilayas.. ekdam khara khara... atun hallela distoyas... ya prashnanchi uttara nahiyet.. kinva mi evdhha vicharach karu shaklle nahiye asa mhan.. ghabrte mi.. asha prashnanvar vichar pan karayla.. khoopach mulapasun todnara ahe he.. mhanon... all da best !!!

    ReplyDelete
  4. मुला, खूप मनस्वी आणि (विदुलाला दुजोरा देत) एकदम खरं खरं लिहिलं आहेस! मला हा blog-post वाचायला सुरुवात केल्याकेल्याच तू आधी एकदा सांगितलेलं "साब हमारा भी आप जैसा खुदका घर था..." हे वाक्य आठवलं आणि मन पुन्हा एकदा सुन्न झालं! खरंच खूप मोठा घाव आहे हा, तुझ्या, माझ्या, सगळ्याच थोडाबहुत विचार करणाऱ्या लोकांच्या मनावर! आणि शेवटच्या परिच्छेदात तू जे लिहिलं आहेस, त्यातला शब्द न् शब्द खरा आहे की, यातल्या एकाही प्रश्नाला आपल्यापाशी उत्तर नाहीये, पण त्यामागची अस्वस्थता आणि वेदना न जाणवण्याइतके आपण दगडही झालो नाहीये! असंच मनस्वी लिहीत रहा, कारण कोणतेही प्रश्न सुटण्यासाठी ते मुळात उच्चारले-मांडले जाणं आवश्यक आहे!

    ReplyDelete
  5. @ Vidula : अशा प्रश्नांवर आपण विचार करत नाही किंवा करायला घाबरतो म्हणूनच असले प्रश्न अधिक गंभीर बनत जातात ... हळूहळू विचार करायला सुरुवात केली तर पुढे जाऊन आपण कधीतरी उत्तरसुद्धा शोधू शकू आपण नक्की !

    @ All : Thanx
    My only intention was that everyone should atleast be aware of this issue... and next time when u hear a thing or two for so called 'secularism' don't forget to remember this fact!

    ReplyDelete
  6. Khup gambhir vishay ahe..as already mentioned by you..ase vishay ka gambhir hotat mhanun..
    LONGRACE sarkarchya 'Secular' definition madhe HINDU dharm modatch nahi..
    Content was good obviously because of the true incident.

    ReplyDelete
  7. Amazing prasad!! It was very nicely put. keep it up...

    ReplyDelete
  8. tujhya tondun aikalela ha anubhav vachtana punha ekda kuthetari salale.aani aaplya khujepanachi jaaniv jhali. khupch manasvi lihile aahes. ase anubhav shabdabaddh karne sope naahi. pan tu te keles.

    ReplyDelete