Total Pageviews

Thursday, December 22, 2011

अभिनव(निर्माण)परीक्षा !

नुकताच मनसेच्या उमेदवार परीक्षांचा सोहळा पार पडला. त्याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती. परंतु अनेक मराठी पेपरांमधून या विषयीचे म्हणावे तसे सविस्तर 'Coverage' घेतले गेले नाही म्हणून मी थोडा नाखूषच होतो. असे असताना अचानक एके दिवशी 'बालगंधर्व'च्या मागच्या पुलावर खात असलेली भेळ संपल्यावर सहज म्हणून खालचा कागद वाचला तर त्यामध्ये या परीक्षांचे सविस्तर वृत्त दिसले. कुतूहलाने पेपरचे नाव वाचले आणि बातमीच्या विश्वासार्हते विषयीच्या सगळ्या शंका फिटल्या.   'दै. सुकाळ' (ओंकारेश्वर, मोतीबाग, रमणबाग या पट्ट्यातले सर्वाधिक खपाचे एकमेव निर्भीड दैनिक)  मधल्या मजकुरा विषयी शंका घेणे वेडेपणाच ठरला असता.  परीक्षा पार पडल्याचे वृत्त छापून आल्यापासून केवळ  एका आठवड्यात पेपर  भेळवाल्याकडे  (व्हाया रद्दीवाला) पोचला म्हणून काही नतद्रष्ट हसतीलाही, परंतु प्रत्येक पुणेकराच्या प्रबोधनाचा वसा हाती घेतलेल्या श्री. म. वि. पिंपळकर यांचाच हा पेपर असून श्री. पिंपळकर न खपलेल्या पेपरची जाणीवपूर्वक लवकरात लवकर रद्दी घालून रद्दीवाले व भेळवाले यांच्या पर्यंत सर्व बातम्या फार शिळ्या होण्याच्या आत पोचवून त्यांचे प्रबोधनच घडवत असतात हे त्या कुत्सित नतद्रष्टांना कसे कळावे.
असो. दै. सुकाळ' मधले वृत्त जसेच्या तसे देत आहे. तुमचेही प्रबोधन होईलच.

 'दै. सुकाळ'
ठिकठिकाणच्या विशेष
प्रतिनिधींकडून : ता - ४ डिसेम्बर

संपूर्ण राजकीय विश्वात उत्सुकतेचा विषय बनून राहिलेल्या 'मनसे'च्या उमेदवार परीक्षा अखेर येऊन ठेपल्या आहेत.  खरेतर राज ठाकरे यांनी परीक्षांची घोषणा केल्यापासून ठिकठिकाणच्या इच्छुकांचे दणाणलेले धाबे गेले बरेच दिवस ऐकू येत होते. पण 'आले साहेबांच्या मना तेथे कोणाचे चालेना' या उक्तीनुसार इच्छुक नाइलाजाने तयारीला लागले होते. अभ्यास, ट्रेनिंग वगैरे ला सुरुवात केली होती. ठिकठिकाणच्या मधुशालांमधील संख्या रोडावून रात्रशाळांची आणि रात्रकॉलेजेसची  उपस्थिती वाढली होती. काही ठिकाणी इच्छुकांच्या आग्रहावरून मराठी, विज्ञान, गणित अशा निरुपयोगी विषयांचे अभ्यासक्रम वगळून 'नागरिकशास्त्र' या अनुसूचित जमातीत मोडणाऱ्या विषयाचे ३-३ पेपर अभ्यासक्रमात 'लावले' गेले असल्याचे सुखद दृश्य दिसत होते. बस, लोकल मध्ये याच विषयाचा बोलबाला होता. इतकेच काय तर सक्काळी सक्काळी रेल्वेलाईनच्या कडेने देखील आम 'पब्लिक' नेहमीप्रमाणे निरीक्षणात किंवा शिळोप्याच्या गप्पांमध्ये गुंग न होता पालिकेच्या सर्वसाधारण सभा असल्यागत गंभीरपणे चर्चा करत असल्याचे दिसून येत होते.

मनसेच्या मुंबई उपनगरातील एका प्रभाग अध्यक्षाने 'कौन बनेगा उमेदवार' असा 'गेम शो' आयोजित केला होता. (पहिला येणाऱ्यास पालिका सभागृहात एक आठवडा पट्टेवाल्याचे काम (इंटर्नशिप !!!) करण्याची आणि त्यानिमित्ताने  पालिकेचा कारभार, विरोधकांचे सभात्याग, घोषणाबाजी इत्यादीचा समक्ष अनुभव घेण्याची संधी !!).  पुण्यातल्या एका पदाधिकाऱ्याने तर एक पाऊल आणखी पुढे टाकत केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण याचा अभिनव अनुभव देण्यासाठी ३ दिवसांचा 'पालिका कामकाज Crash Course ' तयार केला होता. (प्रस्तुत नगरसेवकाचे महिलांसाठी Driving , पुरुषांसाठी Cooking , म्हाताऱ्या माणसांसाठी हास्ययोग, ट्राफिक पोलिसांना शिट्ट्या फुंकण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी प्राणायाम वर्ग इ. अनेक प्रशिक्षण वर्ग विलक्षण लोकप्रिय झाल्याचे वाचकांच्या लक्षात असेलच). या  Crash Courseचा हेतू कौतुकास्पद होता. परंतु
त्या पदाधिकाऱ्याच्या प्रभागातल्या प्रशिक्षण देण्यासाठी नेमलेल्या 'कार्यकर्त्यां'नी पालिकेचे कामकाज कसे चालवावे याचा Crash Course शिकवण्या ऐवजी गैरसमजुतीने पालिकेचे कामकाज कसे Crash करावे याचाच Course शिकवला (ज्यामध्ये राजदंड पळवून कमीत कमी श्रम करून भालाफेकीसारखा जास्तीत जास्त दूरवर पोचवणे,  सभापतींचा चष्मा सफाईने पळवून मंजुरीसाठी त्यांच्यासमोर आलेल्या प्रस्तावावर सह्या करण्याची गोची करून ठेवणे, मनसे नगरसेवकाने लक्षवेधी सूचना मांडल्यास ढोल वाजवल्यागत बाके कशी वाजवावीत वगैरे महत्वाच्या प्रशिक्षणावर भर दिला गेला होता. )

जसजसा परीक्षेचा दिवस जवळ येत गेला तसेतसे अनेक विद्यमान नगरसेवक परीक्षा (आणि नंतर येणारी नामुष्की) टाळण्यासाठी प्रयत्न करत होते. एकाने तर थेट 'कृष्णकुंज'वर जाऊन राजसाहेबांना मस्का मारण्याइतके धाडसही केले. परंतु 'गरज पडल्यास मीही परीक्षा देईन' असे बाणेदार उत्तर साहेबांनी दिल्यामुळे प्रस्तुत नगरसेवकाला निराशा (आणि ' नक्की कुणाला गरज पडली तर ?' हा बाणेदार प्रश्न) मनात घेऊनच परतावे लागले होते असे त्याच्या संपर्क-प्रमुखाने नाव न छापण्याच्या अटीवर 'दै. सुकाळ' ला सांगितले.


एकुणातच संदिग्धता आणि उत्साह यांच्या संमिश्र वातावरणात अखेर आज परीक्षा येऊन ठेपल्या आहेत.

या परीक्षेचे सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात.

 मी उत्सुकतेने भेळवाल्याकडे आणखी एक भेळ मागितली आणि कशीबशी संपवून कागद वाचला तर ती 'दै. सुकाळ'ची दशक्रिया वृत्तविशेष पुरवणी ('ओंकारेश्वर प्रसन्न' ) निघाली. छ्या , मी तर निराश झालो आणि तितक्यात  मला माझा भोटपणा लक्षात आला - 'पुढची भेळ बरोबर पुढच्या दिवशीच्या पेपरमध्ये बांधून कशी काय मिळेल'  असा प्रश्न स्वतःलाच विचारला आणि निमूटपणे भेळवाल्याचे कागद चाळू लागलो.
भेळवाल्याने चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पहिले (आणि 'लगे हाथ' माझ्या कपाळावर विशिष्ट अक्षरे दिसत आहेत का, हेही पाहून घेतले ). शेवटी मी म्हणालो "दादा , पेपर हवाय एक जरा .... हा मिळाला " आणि मी लगोलग तो कागद उपसला कारण तो 'दै. सुकाळ'चा ५ तारखेचा कागद होता.  मी उत्सुकतेने स्वतःचे प्रबोधन पुढे सुरु ठेवले.

 'दै. सुकाळ'
ठिकठिकाणच्या विशेष
प्रतिनिधींकडून : ता - ५ डिसेम्बर

'मनसे'च्या बहुप्रतीक्षित उमेदवार परीक्षा आज सर्व केंद्रात विलक्षण उत्साहात पार पडल्या. दुपारी पेपर संपल्याची घंटा वाजताच शेकडो केंद्रांवरून सुटलेल्या निःश्वासांनी वातावरण भारून गेले होते. (यामध्ये निःश्वास किती आणि सुस्कारे किती याची आकडेवारी उपलब्ध नाही. पण निकालानंतर ते कळेलच) आजचा दिवस एकूणच अनेकविध घडामोडींनी आणि मोडतोडीने भरलेला पहावयास मिळाला. मुंबईच्या एका  उपनगरातील केंद्रावर देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका हिंदीत असल्याचे आढळून आल्याने एकाच खळबळ माजली.  परीक्षार्थींना आपण मनसैनिक असल्याची खडबडून जाणीव झाली आणि प्रचंड गदारोळ सुरु झाला. अनायसे परीक्षेसाठी सगळ्यांनी बॉल पेन आणलेलेच असल्याने त्याची शाई काढून पर्यवेक्षकालाच काळे फासण्यात आले आणि पेपरला पुरवण्या जोडण्यासाठी पर्यवेक्षकाने आणलेल्या Stapler चे त्याच्यावरच प्रयोग करण्यात येऊन सगळ्या प्रश्नपत्रिका त्याच्या shirt ला खालच्या बाजूला शेपटीसारख्या staple करण्यात आल्या. "या प्रकारचे महाराष्ट्र विरोधी कारस्थान आम्ही खपवून घेणार नसून यामागे उत्तर भारतीय नेत्यांचा हात आहे... ते भैय्यांना हळूच मनसे मध्ये प्रवेश करण्यासाठी पाठवून पक्ष खिळखिळा करण्याचा कट करत आहेत. म्हणूनच या हिंदी भाषिकांना मनसेत घुसण्यापासून रोखण्यासाठी ही परीक्षा आम्ही बंद पडत असून, आमच्या या जाज्ज्वल्य हिंदीविरोधी भूमिकेमुळे राज साहेबांनी आम्हाला उमेदवारी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत" असे या धुमश्चक्रीत  आघाडीवर असलेल्या एका परीक्षार्थीने दै. सुकाळच्या प्रतिनिधीस सांगितले.   

जसा अनेक ठिकाणी हा परीक्षा सोहळा उत्साहात पार पडला तसा काही ठिकाणी तो पा ssss र पडला असल्याचेही दिसून आले. एका केंद्रावर पेपर चालू असताना कॉपी चालू असल्याची कुणकुण लागताच ती रोखण्यासाठी 'राष्ट्रवादी'चे एक पथक केंद्रापाशी पोचले असता त्याअगोदरच तिथे पोचलेल्या शिवसैनिकांनी कॉपीबहाद्दरांना चौदावे रत्न दाखवले असल्याचे त्यांना दिसून आले. आपले काम परस्परच झाले म्हणून खुश व्हायचे कि आपला मुद्दा चोरला म्हणून दुःख करायचे असे बुचकळ्यातले भाव त्यांच्या राष्ट्रवादी चेहऱ्यावर दिसून येत होते.  दरम्यान या कॉपीविरोधी हिंसक आंदोलनाबाबत छेडले असता शिवसैनिकांच्या पथकाचे प्रमुख रामभाऊ ढेकळे यांनी  आवेशात सांगितले की , "कॉपी करणे बेकायदा आहे. हा कायदा मोडणाऱ्यांना शासन करण्यासाठी आम्हाला कायदा मोडावा लागला तरी .... तरी...(प्रयासाने शब्द आठवत)  बहात्तर", इतक्यात बाजूला उभ्या असलेल्या शाखाप्रमुख नाना तुरटे यांनी श्री. ढेकळेंना सावरत 'बेहत्तर' म्हणून वेळ निभावून नेली आणि आवेशात सूत्रे हातात घेतली. "हे कॉपी-कृत्य म्हणजे फसवणूक आहे याची या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना जाणीव करून देण्यासाठीच आम्ही त्यांना धडा शिकवला आहे. अर्थात जे स्वतःच शिवसेनाप्रमुखांची कॉपी करतात त्यांच्या पक्षाकडून काय अपेक्षा करणार म्हणा ! जय हिंद जय महाराष्ट्र !!"

पुण्यात सदाशिव पेठेतल्या एका केंद्रावर ३५ परीक्षार्थींची नावनोंदणी असूनही प्रत्यक्ष पेपरला कोणीही हजार न राहिल्याची आश्चर्यजनक घटना घडली. या विषयी आमच्या प्रतिनिधीने अधिक शोध घेतला असता पुढील माहिती कळली - त्या भागातल्या काही इच्छुकांनी नावनोंदणी केल्यावर 'पेपर कशा स्वरूपाचा असेल, पेपर द्यायला कुठे यावे लागेल' पृच्छा केली असता नोंदणी करणाऱ्याने बाहेरच्या लाकडी फळ्याकडे बोट दाखवले. 'परीक्षाकेंद्रावर पोचल्यावर कळेल परीक्षा काय आहे. उगाचच वायफळ चौकशा करू नयेत - हुकुमावरून' अशी सूचना होती. परंतु कुणा नतद्रष्टाने 'परीक्षाकेंद्रावर'  मधला 'प' खोडून टाकला असल्याने 'रीक्षाकेंद्रावर' असा शब्द शिल्लक राहिला होता. त्यामुळे सगळे इच्छुक परीक्षेच्या दिवशी सरळ रिक्षा stand वर गेले , (मागच्या महिन्यातले आंदोलन डोक्यात ताजेच असल्याने) रिक्षाचालकांना चोप दिला आणि हीच आपली परीक्षा (Theory ऐवजी Practical !!) होती असे समजून निर्धास्त होऊन घरी परतले. (रिक्षावाल्यांना बडवतानाचा फोटो पुरावा म्हणून स्वतःच्या मोबाईल मध्ये काढून घ्यायला ते विसरले नाहीत).


अशा रीतीने आजचा परीक्षेचा दिवस अतिशय धामधुमीचा गेला. अनेक इच्छुक महत्वाची कामे आटपून किंवा टाळून परीक्षेला हजर राहिली होती. काही जण कामावरून सुट्टी घेऊन तर काही जण आजारी असतानाही परीक्षा द्यायला आले होते  मुंबईत तर एक तरुण स्वतःचे लग्न आटोपून तसाच बायकोसह परीक्षेला आला होता ("नाते जुळण्याची संपली आज प्रतीक्षा, सीमाच्या साथीने देतो संसाराची 'मनसे' परीक्षा" - असा चतुर उखाणादेखील त्याने आमच्या प्रतिनिधीच्या आग्रहावरून घेतला). परीक्षेविषयी इच्छुकांची तळमळ पाहून खुद्द राज ठाकरे देखील भारावून गेले असून त्यांनी सर्वांना निकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


दरम्यान आजच्या पेपरमध्ये पालिकेच्या कामकाजाव्यतिरिक्त साहित्य-संस्कृती संबंधीचे प्रश्नदेखील विचारण्यात येणार होते असे कळते. परंतु पेपरमध्ये नक्की काय प्रश्न होते हे अजूनही कळलेले नसून त्याविषयी बरीच गुप्तता पाळली जात आहे.  परंतु वाचक प्रबोधनाचा वसा हाती घेतलेला 'दै. सुकाळ' हे पेपर मिळवण्यासाठी कटिबद्ध असून लवकरच ते २-३ दिवसातच उपलब्ध होतील असे आम्ही खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. 


इथे बातमी संपली . मालिका महत्वाच्या टप्प्यावर असताना अचानक एपिसोड संपतो आणि आपल्याला उत्कंठा तशीच ताणून धरावी लागते, तशी माझी गत  झाली.  आता मात्र मी इरेला पेटलो. उरले सुरले सगळे पेपर  भेळवाल्याच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत उपसले पण यापुढे मात्र एकही कामाचा चिठोरा मिळाला नाही. श्या : !!! मनसेचे पेपर कसे होते आणि निकाल लागला हे मात्र आता कधी कळेल कुणास ठाऊक .





9 comments:

  1. एक नंबर साहेब !!!!
    हा फॉर्मपण छान जमला आहे !!!

    ReplyDelete
  2. मस्त रे... "नाते जुळण्याची संपली आज प्रतीक्षा, सीमाच्या साथीने देतो संसाराची 'मनसे' परीक्षा" ...हा उखाणा फार भारी आहे

    ReplyDelete
  3. मस्त रे :).
    ओंकारेश्वर, मोतीबाग, रमणबाग या पट्ट्यातले सर्वाधिक खपाचे एकमेव निर्भीड दैनिक >>>> LOL !

    ReplyDelete
  4. लई भारी!
    Theory ऐवजी practical....
    अफलातून!

    ReplyDelete
  5. @विक्रम एक शांत वादळ :
    आपली ओळख नसतानाही आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ! (आणि प्रतिक्रिया वादळी नसून शांत आहे या बद्दल आणखी एक धन्यवाद ;) )

    ReplyDelete
  6. @ मित्रगण : परीक्षा पास झाल्यासारखे वाटते आहे :) एकंदरीत बरा जमलाय म्हणायचा blog. प्रतिक्रिया कळवल्याबद्दल मंडळ आभारी आहे... असेच मंडळाला सहकार्य करावे .....

    ReplyDelete