(छायाचित्र सौजन्य : Amazon.in) |
हे पुस्तक दीड-दोन वर्षांपूर्वी ग्रंथालयामध्ये बघितलं होतं, तेव्हा चाळताना एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट कळली होती, ती म्हणजे या पुस्तकाचे लेखक नरेंद्र सिंदकर हे पंचवीस वर्ष रशियामध्ये मॉस्को आकाशवाणीवरून मराठी कार्यक्रम सादर करायचे! हे वाचल्यावर माझं कुतूहल खूप चाळवलं.
तसं पाहता रशिया आणि मराठी हे नातं माझ्यासाठी नवीन नव्हतं. लहानपणी रशियन परीकथा, देनिसच्या गोष्टी अशी पुस्तकं मराठीमध्ये वाचली होती, ती रशियन प्रकाशन संस्थांनीच काढली होती (अर्थात हे लहानपणी नीट लक्षात आलं नव्हतं). साधारण चार वर्षांपूर्वी मी 'रेषेवरची अक्षरे' या डिजिटल दिवाळी अंकांसाठी 'किशोर' मासिकाच्या संपादिका ज्ञानदा नाईक यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी मला ज्ञानदाताईंकडून कळलं होतं की ऐंशीच्या दशकात कॉम्रेड डांगे यांची कन्या रोझा देशपांडे यांच्या पुढाकारातून (अर्थातच कम्युनिजम - रशिया या कनेक्शनमधून) मराठी लेखकांची रशियाभेट घडवून आणली गेली होती, तेव्हा त्या चमूमध्ये ज्ञानदा नाईकसुद्धा होत्या. त्यावेळेस त्यांनी रशियातील मराठी प्रकाशन विभाग बघितला होता. त्यांना स्वतःला त्या प्रकाशन विभागात काम करण्यासाठी ऑफरही आली होती, पण ती त्यांनी स्वीकारली नाही.
बहुदा 'रेषेवरची अक्षरे'च्या त्याच अंकात रशियन बालसाहित्यावरच्या लेखामध्ये मी वाचलं होतं की, रशियामध्ये मराठी पुस्तकांचं फक्त संपादकीय कामच चालायचं असं नाही, तर मराठी भाषेमधली छपाईसुद्धा रशियातच व्हायची. छापखान्यातल्या जुळाऱ्यांना मराठीचा गंधही नसे, पण ते अक्षरांना चिन्हासारखी वागणूक देऊन व्यवस्थित अक्षरांचे खिळे जुळवायचे! हे सगळं सांगायचा हेतू हा की, रशिया हा फक्त लष्करी सामर्थ्याच्या बळावर नाही, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनही जगातल्या अनेक भाषांमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करून सॉफ्ट पॉवरच्या बळावर देखील जग पादाक्रांत करू पाहात असे. अर्थात ही पार्श्वभूमी माहित असूनही नरेंद्र सिंदकर यांच्या पुस्तकामधे मॉस्को रेडिओवरून मराठी कार्यक्रम सादर होण्याबद्दल वाचलं तेव्हा मला फार अप्रूप वाटलं होतं. पुस्तक वाचण्याचा मात्र मुहूर्त अखेर या महिन्यात लागला.
लेखकाला आलेले रशियामधले अनुभव आणि किस्से प्रामुख्याने असलेलं हे पुस्तक असावं मालक आधी वाटलं होतं, पण या पुस्तकाचं साधारण स्वरूप एखाद्या पत्रकाराच्या वार्तापत्राप्रमाणे (म्हणजे बऱ्याच मराठी वर्तमानपत्रामध्ये त्यांचा दिल्लीस्थित प्रतिनिधी दर आठवड्याला तिथल्या घडामोडी लिहितो तसे) आहे. रशिया महासत्ता असण्याच्या काळातली (१९६७ पासून पुढची) तब्बल पंचवीस वर्षे नरेंद्र सिंदकर मॉस्कोमध्ये होते. त्यांना रशियाची ताकद, धोरणं अगदी जवळून अनुभवता आली. रशियामधल्या 'प्रावदा' सारख्या कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रातून होणारे मतप्रदर्शन आणि त्यामध्ये जगाच्या राजकारणाबद्दल होत असलेली चर्चा, कम्युनिस्ट असूनही चीनसोबत ताणले गेलेलं संबंध प्रसंग, रशियन राज्यक्रांतीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकाशित झालेले साहित्य याचबरोबर रशियन तंत्रज्ञांनी केलेली प्रगती, स्थापत्य, टाऊन प्लॅनिंग, शेती मधले प्रयोग, कृत्रिम अवयवरोपणाच्या शस्त्रकिया, युरी गागारीनची अंतराळात झेप यांचाही सिंदकर यांनी वेध घेतला आहे. रशियन खाद्यजीवन, रशियन साहित्य याबद्दलही आस्थेने लिहिले आहे. पुस्तकातले बहुतांशी लेख ४-५ पानी असताना रशियन नाटकं आणि रशियन बॅले यांच्यावरचे लेख मात्र दीर्घ आहेत हे विशेष. मॉस्कोत दीर्घकाळ राहिल्यामुळे त्यांनी रशियाची खोलात जाऊन ओळख करून दिलेली आहे.
पुस्तकाची भाषा अतिशय ओघवती आणि श्रीमंत आहे. तिला प्रतिभेचा स्पर्श आहे. मॉस्कोमधल्या बदलत जाणाऱ्या ऋतुचक्राचे वर्णन हा या पुस्तकामधला अतिशय लोभसवाणा भाग आहे. निसर्गाचं वर्णन करताना त्यांनी वापरलेल्या उपमा अतिशय चपखल आहेत. मी बर्याच दिवसांनी अशा स्वरूपाचं लेखन वाचलं. पूर्वी या स्वरूपाचं वाचन व्हायचं, पण अलीकडे नॉन-फिक्शनच जास्त वाचत असल्यामुळे अशा शाब्दिक बहरापासून मी बऱ्यापैकी लांब गेलो होतो. पण यानिमित्ताने पुन्हा तो सुखद घेता आला अनुभव आला (कॉमेंटमध्ये उदाहरणादाखल दोन पानांचे फोटो टाकतोय). भारतातून येणारे साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, दौऱ्यावर येणारे शिष्टमंडळ यांचे प्रस्तावनेतले आणि शेवटाकडच्या एका प्रकरणातले अनुभव रंजक आहेत. रशियाची प्रगती, त्याने जगावर टाकलेली छाप, तिथल्या समाजजीवनात दिसून येणारी मूल्यं यांनी विलक्षण प्रभावित झालेला लेखक प्रकट पुस्तकाच्या पानापानावर दिसत राहतो.
एवढं सगळं आहे, पण मी ज्या अपेक्षेने पुस्तक हातात घेतलं ती पूर्ण झाली का? तर याचं उत्तर मी 'नाही' असं देईन.
एका बाबतीत प्रचंड निराशा झाली. 'रशियन आकाशवाणीवरून मराठी कार्यक्रम' या अतिशय युनिक कामाबद्दल भरपूर काही वाचायला मिळेल अशी माझी आशा होती. पण त्याबाबतीत पुस्तकाने प्रचंड निराश केलं... रशियाचं रशियाच्या बाहेरच्या भाषांबद्दल धोरण काय आणि कसं होतं, मराठी कार्यक्रमांच्या प्रसारणाची सुरुवात कशी झाली, मुख्य म्हणजे सिंदकर यांची त्याच्यासाठी निवड कशी झाली, त्यासाठीचा इंटरव्यू कसा होता, याबद्दल पुस्तकांमध्ये चकार शब्दही नाहीये. मॉस्को आकाशवाणीवरून रोज दोन तास मराठी कार्यक्रमांचं प्रसारण व्हायचं, असं त्यांनी म्हटलं आहे. भारताबाहेरच्या रेडिओ स्टेशनवर दररोज दोन तास म्हणजे खूप मोठा कालावधी झाला. मग यासाठी तयारी काय व्हायची, त्यासाठी वाचन-लेखन कसं व्हायचं, महाराष्ट्रापासून एवढं लांब असताना तिथे सोर्स मटेरियल कसं उपलब्ध करून व्हायचं, मराठी माणसांची संख्या अवघी काही हजार असताना मराठी कार्यक्रमांसाठी माणसं कशी गोळा केली जायची, त्यांच्याकडून प्रतिसाद कसा असायचा अशा कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या असताना सिंदकर यांनी त्याबद्दल काहीच लिहिले नाही हे खेदजनक आहे. मोठी संधी दवड्ल्यासारखं आहे. रशियामधले त्यांचे स्वतःचे अनुभव, किस्से हेही फारच कमी आहेत. स्त्रियांचा सन्मान करणारा, शिस्तबद्ध, कामसू अशा औपचारिक ओळखीपलीकडे जाऊन रशियन माणसाच्या स्वभावाची ओळख पुस्तकातून होतच नाही.
अशा काही गोष्टी असल्या तरी मराठी माणसाने रशियात राहून केलेलं लिखाण ही दुर्मिळ गोष्ट आहे (अनंत काणेकर, अण्णाभाऊ साठे यांनी रशियाला भेट दिल्यानंतरचे अनुभव लिहून ठेवलेले आहेत, परंतु त्यांचे इतके दीर्घकाळ वास्तव्य नव्हते, त्यामुळे त्याला प्रवासवर्णनाचे स्वरूप आहे) त्या दृष्टीने हे पुस्तक मला महत्वाचं वाटतं. १९६७ सालापासून पुढची काही वर्षे रशियामध्ये काय काय घडत होतं याचा जर का 'आँखो देखा हाल' जाऊन घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायला हरकत नाही. नरेंद्र सिंदकर यांच्या भाषाशैलीमुळे हे पुस्तक कंटाळवाणं होत नाही.
***
'क्रेमलिनच्या बुरुजावरून'
श्रीविद्या प्रकाशन
१९५ पाने
--- प्रसाद फाटक
No comments:
Post a Comment