Total Pageviews

Saturday, July 25, 2026

प्रिय कणेकर




(भाग - १)

प्रिय कणेकर,

तुम्हाला जाऊन दोन वर्षे झाली. 

म्हणजे मी दोन वर्षे उशिराने लिहीत आहे.

हे मी तेव्हाच का लिहिलं नाही, याला माझ्याकडे उत्तर नाही. एक मात्र खरं, पुलंखालोखाल ज्या लेखकाची वाक्यंच्या वाक्यं मला पाठ आहेत असा लेखक जेव्हा हे जग सोडून जातो, तेव्हा त्याच्याबद्दल चार शब्दही न लिहिणं यासाठी कुठलीही सबब असू शकत नाही.. पण असो, आज लिहायला घेतल्यामुळे कदाचित तुम्ही गेलात तेव्हा लिहू शकलो नसतो, अशा गोष्टी आज लिहू शकेन 

तुम्ही शेवटपर्यंत लिहीत राहिलात, ही गोष्ट मला फार विशेष वाटते. आयुष्यात तुम्ही स्वतः खालोखाल बहुदा आपल्या लेखणीवरच प्रेम केलंत. अनेकांना आपली सर्वात प्रिय गोष्ट आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात करता आली नाही याचं शल्य घेऊनच हे जग सोडावं लागतं. पण तुम्ही मात्र लिहीत होतात. लेखणीने तुम्हाला शेवटपर्यंत साथ दिली हे तुमचं भाग्य. मला आठवतंय तुमच्या एका पुस्तकाची अर्पण पत्रिका तुम्ही तुमच्या लेखणीला अर्पण केली होती.  


साधारण 2013-14 पर्यंत प्रकाशित झालेलं आणि आऊट ऑफ प्रिंट न झालेलं तुमचं प्रत्येक पुस्तक मी वाचलेलं होतं. तुमचं लिखाण हसरं होतं, हळवं होतं;  दुखऱं होतं, बोचरं होतं; उत्स्फूर्त होतं, उद्धट होतं; टवाळ होतं, टोकदार होतं कुठल्या दिवशी काय वाट्याला येईल सांगता यायचं नाही, आणि हीच तर तुमच्या लिखाणाची गंमत होती. सोशल मीडियावर तुम्ही लिहिलं असतं तर धुमशान केलं असतंत. 


क्रिकेट आणि सिनेमा ही दोन्ही तुमची 'फर्स्ट लव्ह'. त्यातही मेनस्ट्रीम हिंदी चित्रपटावर तुम्ही ज्या तोडीची बॅटिंग केलीत ना, ती मी दुसऱ्या कुणाकडूनही   अनुभवली नाही. आवडो न आवडो, तुम्ही भान हरपून थेटरमध्ये सिनेमा बघत राहिलात आणि तुमच्याच भाषेत सांगायचं तर "बाहेरची दुःखं तिथल्या अंधारात विरघळवून टाकत राहिलात". 'माझी अंधारातली घरं' हा फक्त थेटर्सवरच्या अनुभवांवरचा तुमचा लेख मी कसा विसरू शकेन? 


यादोंकी बारात, पुन्हा यादोंकी बारात आणि गाये चला जा हा तुमच्या चित्रपटविषयातल्या लिखाणाचा कळसाध्याय होता. विशेषतः 'यादोंकी बारात'मध्ये दोन पानी लेखात तुम्ही एकेका कलाकाराचा असा काही वेध घेतलाय की, तुमच्या लेखणीचा हेवा वाटावा. मी तर त्यातले कितीतरी जण कधी पडद्यावर पाहिलेही नव्हते किंवा फार थोडे पाहिले होते. पण तुमचं वाचूनच माझं त्यांच्याबद्दलचं मत बनायचं/बदलायचं. उदा. मनोजकुमार, हा माझा काही टोकाचा नावडता माणूस नव्हता पण तुमचा त्याच्यावरचा 'तोतया' या शीर्षकाचा लेख वाचला आणि मलाही मनोजकुमार असह्य होऊ लागला, असा होता तुमच्या लेखणीचा प्रभाव!


सिनेमावर लिहिण्यासाठी तुम्हाला कधी कष्ट करावे लागले असतील असं वाटत नाही. सगळे संदर्भ मुखोद्गत! लिहित लिहिता  एखाद्या संदर्भातली हिंदी चित्रपट - संगीतकार- गायक यांची धडाधड पंधरा-वीस उदाहरणं द्यायचात. तुम्ही तसे 'रसग्रहण' कॅटेगरीतले; त्यामुळे समीक्षणाच्या वाटेला फार गेला नाहीत; पण 'शिणेमा डॉट कॉम' या पुस्तकातला अमिताभ आणि दिलीप कुमारच्या 'शक्ती'मधल्या जुगलबंदीचे  विश्लेषण करणारा 'उभे ठाकले झुंजाया' हा लेख निव्वळ अप्रतिम असून माझ्या मते तुमच्या चित्रपटविषयक लिखाणातला सर्वोत्तम आविष्कार आहे. हिंदी चित्रपटांच्या त्यांच्या भल्याबुऱ्या रूपात मनापासून स्वीकारणारे तुम्ही आर्ट सिनेमातल्या अंधार, स्तब्धता आणि  दुर्बोधतेवरून तुम्ही जी सालटी काढायचा ती वाचून हसून पुरेवाट व्हायची. 

तुमचे सिनेमा आणि क्रिकेटवरचे लिखाण आणि स्टॅन्डअप शो अमाप लोकप्रिय झाले, पण तुमच्या मधल्या उत्कृष्ट व्यक्तिचित्रणकाराचं कौतुक व्हायला हवं तसं झालं नाही असं मला वाटतं. कमीत कमी शब्दात कधीतरी खदाखदा हसवत तर कधी चटका लावणारी अनेक व्यक्तिचित्रं तुम्ही लिहिलीत. अरुण साधूंचा व्यासंग, सिंहासन-मुंबई दिनांक यावर अनेकांनी लिहिलं आहे, पण तुम्ही तुमचे पत्रकारितेतले सहकारी म्हणून एका आपल्यातल्याच वाटाव्या अशा माणसाचं जे चित्रण तुम्ही केलंत आणि शेवटाकडे जाताना साधू किती मोठा लेखक आहेत याची तुम्हाला जाणीव झाल्याचा क्षण तुम्ही प्रामाणिकपणे लिहितात, ते फार बहारदार होतं. अलीकडे तुमच्या विविध पुस्तकांमधल्या जुन्याच व्यक्तिचित्रणांचं संकलन होऊन 'सगेसोयरे' या नावाने पुन्हा प्रकाशित झालं तेव्हा ते मी आवर्जून घेतलं - त्यामध्ये साधूंवरचा तो लेख आहे हेही त्यामागचं महत्वाचं कारण होतंच. 


तुमच्या लिखाणातल्या मी अतिशय एन्जॉय केलेल्या गोष्टी म्हणजे तुमची प्रवासवर्णनं आणि तुमचे पत्रकारितेतले अनुभव. तुमच्या प्रवासवर्णनांमध्ये खरं म्हणजे स्थलवर्णन फारसं नव्हतंच. पण एकाहून एक भन्नाट किस्से मात्र असायचे. अमेरिकेत जाणं आजच्यासारखी कॉमन नव्हतं तेव्हापासून तुम्ही एकपात्री प्रयोगांच्या निमित्ताने तिकडे जात होतात आणि दरवेळी आमच्यासाठी तिथल्या अनुभवांचा खजिना धम्माल शैलीत रिता करायचात आणि तेव्हा वाचता वाचता हसून पुरेवाट व्हायची.  'डॉलरच्या देशा' हे या पुस्तकामध्ये तुमचे हे लेख एकत्र झाले हे बरं झालं. 


साधारणपणे पत्रकारितेकडे सामान्यजन 'वसा', 'जबाबदारी' वगैरे म्हणून पाहायचे त्या काळात तुम्ही पत्रकार होतात. पण तुमच्या लिखाणात पत्रकारितेतील एकसुरीपणा, बनेलपणा, पाट्या टाकणे वगैरे गोष्टी तुम्ही अत्यंत चुरचुरीत पणाने लिहिलंत; अगदी स्वतःच्या चुकारपणावरही! बी. एस. व्ही. राव या तुमच्या पत्रकारितेतील बॉसचं व्यक्तिचित्रण कसलं धमाल केलं आहे तुम्ही… या सगळ्यामुळे आपण समजतो तशी ही काही नेसेसरीली उदात्त वगैरे गोष्ट नाही हे कळून चुकलं.


तुमच्या पंच्याहत्तरीच्या दिवशी मी एक छोटीशी पोस्ट टाकली होती, तेव्हा एक दीर्घ पोस्ट पेंडिंग असल्याचं मी म्हटलं होतं. ती लिहिणं तुमच्या हयातीत करू शकलो नाही याची बोच आहेच. पण आता लिहायला घेतली ती इतकी दीर्घ होतीये की, आता त्यासाठी दुसरा भाग लिहिणं भाग आहे. 


आज थांबतो. पुढच्या भाग लिहायचा राहणार नाही. उशीरही करणार नाही. 

प्रॉमिस. 


तुमचा चाहता,

प्रसाद


(क्रमश:)

(पूर्वप्रसिद्धी : फेसबुक, २५ जुलै २०२५)


----------------------------------

(भाग २)


प्रिय कणेकर,


या पत्राचा पहिला भाग बरोब्बर एक वर्षापूर्वी तुमच्या स्मृतिदिनी लिहिला, तेव्हा त्याच्या शेवटी मी प्रॉमिस दिलं होतं “पुढचा भाग लिहायचा राहणार नाही. उशीरही करणार नाही.” त्यातला  ५०% भागच पाळू शकतोय. ‘दिलेलं प्रॉमिस अजिबात न पाळण्यापेक्षा हे बरं आहे म्हणायचं’ अशी स्वत:ची समजूत घालून घेतोय. असो. 


तुमच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये मी म्हटलं होतं की, तुम्ही ‘गोतावळा’ पुस्तकात लिहिलेल्या स्वत:च्याच व्यक्तिचित्रणापेक्षा वेगळं मी काही लिहू शकेन असं वाटत नाही, पण प्रत्यक्ष पत्र लिहायला बसलोय तेव्हा इतकं काही सुचतंय की, विचार थोपवायला सायास करावे लागत आहेत. 


मागच्या भागाच्या सुरुवातीला मी "तुमची वाक्यंच्या वाक्यं पाठ आहेत" असं लिहिलं होतं. एखाद्या व्यक्तीची कॅसेट ऐकून त्याची वाक्यं पाठ होणं यात काही आश्चर्य  नसतं, पण माझ्या बाबतीत आश्चर्य म्हणजे मला पाठ असलेली वाक्यं तुमच्या फिल्लमबाजी किंवा फटकेबाजीच्या कॅसेटमधली नाहीत! (आता एक रहस्योद्घाटन, ज्याबद्दल मला शिव्याही खाव्या लागतील : मी लहानपणी फिल्लमबाजी प्रथम टीव्हीवर आणि नंतर आणखी कुठेतरी थोडंसं ऐकलं तेव्हा तुमच्या बोलण्याच्या टोन मला फार इरिटेट झाला होता. त्यामुळे पुढची अनेक वर्षं मी फिल्लमबाजीच्या वाटेलाच गेलो नाही. आख्खं फिल्लमबाजी मी आयुष्यात खूप उशिरा, म्हणजे वयाची तिशी उलटून गेल्यावर ऐकलं! त्यातला कंटेंट धमाल आहे यात शंकाच नाही. ऐकताना भरपूर हसलोसुद्धा, पण त्यातला तुमचा टोन मला अजूनही काहीसा इरिटेटिंगच वाटतो :P असो !) तर मूळ मुद्दा असा की, मला पाठ असलेली तुमची वाक्यं ऐकून नव्हे तर वाचून पाठ झालेली आहेत, म्हणजेच ती तुमच्या पुस्तकांमधली / लेखांमधली आहेत. बरं, मी तुमच्या लिखाणाची पारायणं केली आहेत असंही नाही. पण तरीही इतकी वाक्यं कशी लक्षात राहिली याचं मलाही कोडंच आहे. बहुदा लिहिता लिहिता तुम्ही अचानक असं काहीतरी लिहून जायचात की, ते लक्षात राहणं अटळ असायचं. ‘एकदा मोठ्या माणसांच्या कोणत्याही लहानसहन गोष्टींचंही कौतुक होतं’ हे सांगत असताना तुम्ही लिहून गेलात "मोठ्यांचं सगळंच मोठं असतं. टमरेल सुद्धा!" :D आता हे वाक्य कसं काय विसरणार सांगा !


व्यक्तिचित्रं हा तुमचं बलस्थान होतं हे मी मागे म्हणालोच. पण त्यातले तुमचे दोन एक्सट्रीम्स बघितले की तुमची रेंज पाहून थक्क व्हायला होतं. तुमच्या लिखाणात सातत्याने भेटायला येणारी दोन पात्रं या स्पेक्ट्रमच्या दोन विरुद्ध टोकाला आहेत. एका बाजूला आहे एक धमाल - पण काल्पनिक पात्र - तुमचा 'जाड चष्मेवाला मित्र'. जगातल्या कुठल्याही फालतू समस्येला ती आपलीच समस्या असल्यागत (एखाद्या शब्दाला शेवटी 'सारखा' हा प्रत्यय जोडण्याऐवजी  'गत' हा प्रत्यय जोडणे, ही तुमचीच खास शैली वापरायचा मोह मलाही झालाय) आव आणणारा, 'होलिअर दॅन दाऊ'चा आव आणणारा पण प्रत्यक्षात अत्यंत कद्रू, स्वार्थी, पोटार्थी असणारा हा जाड चष्मेवाला मित्र तुमच्या आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्ही निर्माण केलात आणि अनेक स्फुट लेखांमधून आमच्या भेटीला आणलात. तुम्हा दोघांमधले एकमेकांना चिमटे, बोचकारे काढणारे संवाद वाचताना मी अशक्य हसलेलो आहे. हे फार्सिकल ध्यान एका टोकाला आणि दुसऱ्या टोकाला होते तुमचे वडील 'डॉक्टर कणेकर'.


तुमच्या अनेक लेखांमधून तुमच्या वडिलांचं तुकड्या तुकड्यांनी चित्र तुम्ही उभं करत गेलात. पण जिगसॉच्या तुकड्यांच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळी चित्रं होती. या बाजूने तुमच्या वडिलांचं चित्र जुळवत गेल्यावर लक्षात आलं की, थोड्यावेळाने पलीकडच्या बाजूला तुमचंही चित्र तुम्ही जुळत गेलंय. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलेला आणि वडील व आजी (आईची आई) यांच्या सान्निध्यात पोरकेपणाची भावना घेऊन मोठा झालेला, जगाबद्दल (आणि वडिलांबद्दलही) मनात निर्माण झालेला कडवटपणा विसरण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याला आंजारून गोंजारून वाढवणारा आणि पुढे मानवी आयुष्याचे ताणेबाणे समजू लागल्यावर 'अजाणत्या वयात वडिलांशी आपण किती झोंबरं वागलो' याची जाणीव होऊन उर्वरित आयुष्य पश्चात्तापात होरपळून घेत, स्वतःला टोचत-बोचकारत कुढणारा असा मुलगा तुमच्या वडिलांवरच्या असंख्य लेखांमधून नकळत आमच्यासमोर उभा राहिला. तुमचं वडिलांबद्दलचं लेखन असं काही कातर करून जातं की, एरवी टिवल्याबावल्या, शेरेबाजी करणारी तुमची ती लेखणी हीच का, असा संभ्रम निर्माण होतो.  


** 


सोशल मीडिया नसण्याच्या काळात आवडत्या कलाकार आणि लेखकाचं काम पाहूनच त्याच्याबद्दलच्या प्रतिमेचं बांधकाम मनात होतं जायचं. इतकी वर्षं तुमचं लिखाण वाचत असताना आणि कधीतरी तुमच्याबद्दल लिहिलेलं वाचत असताना तुमच्याबद्दल काही प्रतिमा मनात तयार होत असतात. इतकी वर्षं तुमचं लिखाण वाचल्यावर जेव्हा तुमचं ‘मी माझं मला’ हे आत्मचरित्र आलं आहे, हे कळलं तेव्हा तुमच्या प्रतिमेतले मिसिंग तुकडे शोधण्याच्या उत्सुकतेने ते वाचायलं घेतलं आणि पहिली भावना निर्माण झाली.. 


विश्वासघाताची! 


एका अस्सल वाचक फॅनचा त्याच्या लाडक्या लेखकाने केलेला विश्वासघात..


तुमचं अर्धंअधिक आत्मचरित्र म्हणजे पूर्वप्रकाशित लेखच जसेच्या तसे छापलेले होते. लिहिण्यासाठी कधीही हात आखडता न घेणाऱ्या माणसाने असं करणं अनाकलनीय होतं. त्यामुळे पुस्तकालाही तुकड्यातुकड्याचं स्वरूप आलं होतं. खट्टू मनानेच मी पुस्तक पूर्ण केलं. काही गोष्टी मात्र या पुस्तकाच्या निमित्ताने तुमच्या लिखाणात प्रथमच आल्या. तुमच्या दुखऱ्या बालपणातल्या तुम्ही-वडील-आजी या त्रिकोणाचा चौथा कोन तुम्ही प्रथमच उजेडात आणलात, तो म्हणजे तुमची आई गेल्यानंतर तुमची सावत्र आई म्हणून आलेल्या तुमच्या सख्ख्या मावशीचा. या पुस्तकातून या अवघडलेल्या नात्यातलं एक वेगळंच नाट्य तुम्ही समोर आणलंत. माणसाच्या आयुष्यात असेही अव्यक्त, अंधारे कोपरे असू शकतात याचं दर्शन झालं. तुमच्या प्रतिमेतले आणखी काही मिसिंग तुकडे जुळले. 


**


तुमच्या लेखणीवर मी मनस्वी प्रेम केलं, त्या अर्थाने मी तुमचा फॅनच. पण बऱ्याचदा फॅन आपल्या आवडत्या व्यक्तीचं सगळंच आवडून घेतो, तसं माझं झालं नाही. त्यामुळे सारस्वता, आज थोडा गुन्हा करणार आहे. तुमचे अनेक लेख अत्यंत टुकार आहेत आणि त्या त्या वेळी त्यावर नापसंतीचा शिक्काही उमटवला आहे. तुमच्या लिखाणात अकारण बोचकारे काढण्याचा प्रकारही काही वेळा दिसायचा. लिखाणाच्या विषयाशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीचा/व्यक्तीबद्दल कुठलातरी संदर्भ/उपमा देऊन फालतू शेरेबाजी करायची तुमची सवय मला आवडायची नाही. तुम्ही असं का करायचात हे  माहित नाही. आता अब्दुल कलामांबद्दल  तुम्हाला आदर नसेल असं मला अजिबात वाटत नाही, पण लिहिता लिहिता एकदा तुम्ही उगाचच "कलामांसारखं व्हायचं आहे. आता उद्यापासून मी त्यांच्यासारखे केस वाढवायला हवेत" अशा अर्थाची काहीतरी अनावश्यक आणि आचरट टिप्पणी करून गेलात. तुमच्यावरच्या टिप्पण्या मात्र खिलाडूवृत्तीने घेत नसावात असंही तुमच्या लिखाणातून जाणवायचं. सुरेश भटांच्या भरपूर खाण्याच्या सवयीवरून तुम्ही त्यांच्यावर केलेली टिप्पणी हा तुमच्या मते ‘रेशमी चिमटा’ होती, आणि तुमच्यावर भटांचे चाहते चिडले ते उडवून लावलंत; पण तुम्ही लोकसत्ताच्या ‘लोकरंग’ पुरवणीच्या ‘दोन फुल - एक हाफ’मध्ये एकदा तुमची टोपी उडवली गेली तेव्हा मात्र तुम्ही (मराठीतले सर्वाधिक मानधन घेणारे लेखक!) लोकसत्ताच्या कार्यालयात जाऊन सदराचा लेखक ‘तंबी दुराई’ म्हणजे नक्की कोण आहे याची फार खोदून खोदून चौकशी केली होतीत म्हणे! 


**


तुमच्याबद्दलची एक अनाकलनीय गोष्ट माझ्या मनात खूप दीर्घकाळ रुतून बसली आहे. तुम्ही आणि द्वारकानाथ संझगिरी यांचं लेखन वाचत मी मोठा झालो. तुम्ही दोघेही पत्रकार लेखक, दोघांनी चित्रपट आणि क्रिकेटवरच्या जीवापाड प्रेमामधून त्यावर भरपूर लिहिलं (अर्थात चित्रपटावर तुमच्याइतकं भारी संझगिरी लिहू शकले नाहीत आणि क्रिकेटवर तुम्ही त्यांच्याइतकं भारी लिहू शकला नाहीत, असं माझं मत आहे), दोघांच्याही विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड ओळखी आणि मुख्य म्हणजे दोघेही मुंबईकर एवढ्या सगळ्या गोष्टी कॉमन असूनही तुमच्या चविष्ट लिखाणात संझगिरींना चिमूटभर मीठाइतकीही जागा नाही, हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. 


तुम्ही दोघेही सामना, लोकसत्ता आणि लोकप्रभाचे हक्काचे लेखक होतात (काही वर्षं तर ‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीत तुमचे स्तंभ एकाच वेळी चालू होते!) यामुळे तर मला तुमच्या या मौनाबद्दल खूप आश्चर्य वाटतं. नक्की काय कारण असेल? संझगिरींनी मात्र तुमच्या साठीनिमित्त ‘उत्सव’मध्ये मस्त लेखसुद्धा लिहिला होता, ज्यात त्यांनी तुमच्या कॉलेजमधल्या दिवसांचा उल्लेख केला होता. तो तुम्ही वाचलाही असणार. दुसरा लेख मात्र तुम्ही वाचला नाहीत नव्हता, कारण तो लेखक तुमच्या निधनाच्या निमित्ताने लिहिला होता. त्यात मात्र संझगिरींनी all was not well याची ओझरती hint दिली होती. तुमच्या लेखनात त्यांना काही बोचकारे काढले असते, तरी आश्चर्य वाटलं नसतं, कारण ते तुमच्या ‘कणेकरी’ शैलीत फिट्ट बसलं असतं. पण तुमच्या लिखाणात ती व्यक्तीच संपूर्ण वजा असणं, मला कायमच कोड्यात टाकत आलं आहे.


**


तुमचं शेवटच्या काही वर्षांमधलं लिखाण मी वाचलं नव्हतं. तुमच्या लेखणीतली पूर्वीची मजा नाहीशी झाली असेल म्हणा किंवा सगळं तसंच असेल पण मी मोठा झालो असेल म्हणून म्हणा; तुमचं नवं लिखाण माझ्याकडून वाचलं जाणं माझ्याही नकळत थांबलं. एखाद्या व्यक्तीबद्दल "ती व्यक्ती अज्जिबात बात बदलली नाही अथवा तिचं लेखन अजिबात बदललं नाही" हा विषय कौतुकाचा असू शकतो. बहुदा तुम्ही बदलला नाहीत हाच माझ्यासाठी वाचन थांबवण्याचा मागची भावना असावी. पूर्वी माझी फिल्लमबाजी आणि फटकेबाजी ऐकताना एवढी  मजा आली, पण कणेकरी त्याही नंतर ऐकलं .. फक्त दहा मिनिटं .. आणि मला तेही सहन झालं नाही!


जे विनोद पंधरा-वीस किंवा अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत सहज चालून जात होते ते आता आऊटडेटेड झालेत याची तुम्हाला बहुदा जाणीव झाली नसावी आणि कोणी ती तुम्हाला करून देण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तुम्ही त्या बाबतीत कोणाचं ऐकलं असतं  असं वाटत नाही. असो. मात्र या काळात तुमचं आधीचं लिखाण कुठे दिसलो दिसलं तर मात्र मी नक्की वाचायचो, कारण तुमच्या लेखणीवरचं माझं प्रेम आटलं नव्हतं. कोणत्याही लेखकासाठी हेवा वाटावी अशी गोष्ट म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत लिहित राहिलात. मी नाही तरी अनेकजण तुमचं नक्की वाचत असणार. पण बहुदा ‘कुणी वाचतय की नाही’ या विचारापलीकडे तुम्ही गेला असावात. श्वास जितका आपसूक घेतला जातो तितके नकळत किंवा निव्वळ muscle memroy च्या जोरावर तुमचा हात लिहित असावा. एकटेपणाच्या भावना कायम तीव्र असणाऱ्या व्यक्तीला लेखणीशिवाय दुसऱ्या कुणाचाही आधार न वाटणे क्लेशकारक असले तरी पण स्वाभाविकच. 


लोकप्रभा आणि लोकसत्ता या हक्काच्या व्यासपीठांवरचं तुमचं लिखाण थांबलं, पण ‘सामना’मध्ये तुम्ही शेवटपर्यंत ‘मनमुराद’ (शब्दशः -  कारण ते तुमच्या सदराचं नाव होतं ) लिहीत राहिलात. पण ते प्रौढ वाचकांपुरतं मर्यादित राहिलं. सोशल मिडीयावर असतात, तर धुरळा उडवला असतात, तुमची शैली आजच्या सोशल मिडीयाच्या काळासाठी अगदी परफेक्ट होती : तत्पर, चुरचुरीत, नॉस्टाल्जिक आणि वादग्रस्त! केवळ एका ठिणगीची वाट पाहणाऱ्या अशांत आत्म्यांना फुलटॉस देणारी!)


** 


लता आणि दिलीपकुमार हे तुमचे हळवे कोपरे. त्यांच्याबद्दल लिहिताना जणू तुमची लेखणीवर कळ्या उमल्याचा भास व्हायचा. ते दोघेही पाठोपाठ गेल्यानंतर या जगात राम उरला नसल्याच्या भावनेने तुम्हीही इथून निघून गेला असावात, असं मला जेन्युईनली वाटतं. परवा आशाबाई गेल्या, तेव्हा त्यांची आठवण काढायला तुम्ही नव्हतात. पण त्यांची आठवण काढताना मात्र मला तुम्हीच आठवलात. तुम्ही ‘पुन्हा यादोंकी बारात’ मध्ये लिहिलंय : 


"मी कायम 'ऑलसो रॅन' राहिले हो ..." अलीकडे आशा मला विषादाने म्हणाली.

"छे, 'ऑलसो रॅन' नाही, रनर्स अप म्हणायचं" मी पुटपुटलो.


वाचकाला त्याच्या सुखदुःखाच्या वेळी तुमचं लिखाण आठवावं, यापेक्षा लेखकांचं भाग्य दुसरं कुठलं असू शकतं ?


***


ता. क : तुमच्या शिवाजी पार्कच्या अजरामर कट्टा gang ने तुमच्या निवडक लेखांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम सुरू केला आहे. संजय मोने, प्रसाद फणसे, उदय सबनीस, अजित भुरे मिळून बहारदार अनुभव देतात - आणि तुमचा कट्टा कसा असेल याचा ट्रेलर बघायला मिळतो. जूनमध्ये तुमच्या वाढदिवशी पुण्यात बहारदार प्रयोग झाला, हाऊसफुल होता! तुमच्या वडिलांवरचा एखादा लेख मात्र त्यात badly missing होता. बाय द वे, तुमच्या  वडिलांनी प्रयोग पाहिला असता तर म्हणाले असते, “मिस्टर शिरीष, तुम्ही कधी कंटाळवाणं लिहिलं नाही, आणि तुमची कट्टा gang सुद्धा ते कंटाळवाणं सादर करत नाही!”


(पूर्वप्रसिद्धी : फेसबुक, २५ जुलै २०२६)

Sunday, July 19, 2026

तेजस्वी हिंदू गणित परंपरा

 



भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.


‘पायथागोरसचे त्रिकोणविषयक प्रमेय भारतामध्ये त्याच्याही आधीपासूनच माहीत होते’ असे त्यांनी एका व्याख्यानात ऐकले तेव्हा ‘हा उजव्या विचारसरणीचा प्रोपगंडा आहे’ अशी त्यांची प्रतिक्रिया होती. परंतु कालांतराने सतराव्या शतकातील स्कॉटिश गणिती जॉन प्लेफेअर याचा लेख त्यांच्या वाचनात आला तेव्हा कांबळे यांना आपल्याच परंपरेकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन कसा असतो याची जाणीव झाली आणि त्यांनी या विषयात रस घेऊन सखोल अभ्यास सुरू केला. या अभ्यासाचाच परिपाक म्हणजे ‘इम्पेरिशेबल सीड’ हे पुस्तक. नुकतेच हे पुस्तक मराठीमध्येही ‘अविनाशी बीज’ या नावाने अनुवादित झाले आहे.


हे 'हिंदू गणित’ का आहे?

 

कांबळे यांनी प्रस्तुत पुस्तकामध्ये भारतातील गणिती परंपरेचे विवेचन करताना ‘हिंदू गणित’ही शब्दयोजना आवर्जून केली आहे.त्याबद्दल ते लिहितात, हिंदू गणित म्हणजे वेद परंपरेचे अनुसरण करणार्‍या संस्कृत विद्वानांचे तसेच बौद्ध आणि जैनांचे गणित. अशा प्रकारे ही एक भौगोलिक संकल्पना असून त्यात वेदांचे अनुयायी (ज्यांना आता पारंपरिकपणे हिंदू म्हटले जाते), बौद्ध आणि जैन यांचाही समावेश होतो. कालांतराने हिंदू धर्म वैदिक परंपरेशी जोडला गेला असला तरीही या तिन्ही धर्मात बरीच समानता आहे. या तिन्ही परंपरा हिंदू म्हणजेच भारतीय सांस्कृतिक प्रवाहाच्या भाग होत्या आणि त्यातूनच अनेक हुशार गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ तयार झाले.

हिंदू गणितींनी अंकगणित, बीजगणित, भूमिती, संख्यामालिका आणि श्रेणी, त्रिकोणमिती (ट्रिग्नोमेट्री), एवढेच नव्हे तर कलनशास्त्र (कॅल्क्युलस) या विषयांमध्येही मूलभूत कार्य कसे केले हे सविस्तरपणे सांगणारी स्वतंत्र प्रकरणे पुस्तकामध्ये आहेत. आर्यभट्ट (‘पाय’ची किंमत), भास्कराचार्य पहिले (खगोलशास्त्रीय सूत्रे) व दुसरे (क्रमचय - संयोजन म्हणजेच पर्म्युटेशन - कॉम्बिनेशन), ब्रह्मगुप्त (ऋण संख्या) अशा अनेक श्रेष्ठ गणितींनी गणिताच्या विविध अंगांमध्ये श्लोकरूपात मांडलेले सिद्धांत आणि सूत्रे आपल्याला वाचायला मिळतात. केरळमध्ये माधवापासून नारायण भट्टीहारीपर्यंत (चौदावे शतक ते सतरावे शतक) गणितींची दीर्घ आणि देदिप्यमान गणिती परंपरा होऊन गेली. आज कुणाला कल्पनाही नसणार्‍या अशा ज्ञानप्रवाहाची कांबळे यांनी विशेष दखल घेतली आहे.


गणिती समस्यांवर उपाय

 

हिंदू गणितींच्या कामगिरीमुळे अंकगणितातील अनेक समस्या दूर झाल्या. पाश्चात्य विश्वात एकेकाळी मोठी संख्या लिहिणे किती कठीण होते हे आपल्याला रोमन अक्षरांपासून तयार आकडे बघितले की लक्षात येते. शिवाय तशा अक्षररूपी मांडणीमुळे साधी बेरीज-वजाबाकीही शक्य होत नसे. परंतु हिंदू गणितींनी जन्माला घातलेल्या शून्य, दशमान पद्धती इ. संकल्पनांमध्ये अंकगणितातील अनेक समस्यांपासून सुटका झाली, किंबहुना आधुनिक अंकगणिताचा पायाच त्यामुळे घातला गेला असे म्हणावे लागते.

‘मोजण्यासाठी उपयोग नसलेल्या’ शून्य आणि ऋण संख्या संकल्पनांवरचे चिंतनही भारतामध्ये पूर्वीच झाले होते. परंतु युरोपमध्ये मात्र चर्चच्या पगड्यामुळे या संकल्पनाच अशुभ समजल्या जायच्या, हे वाचून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या संकल्पना युरोपमध्ये पूर्णपणे स्वीकारल्या जायला काही शतकांचा वेळ जावा लागला.


अन्य शास्त्रांवर प्रभाव

 

हिंदू गणिताचा प्रभाव प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे फक्त गणित विषयातच नव्हे, तर भाषाशास्त्र, संगणकशास्त्र या विषयांमध्ये काम करणार्‍या पाश्चिमात्य विद्वानांवरही पूर्वापार पडत आला आहे आणि त्यांनी अथवा त्यांच्या आप्तांनी विविध ठिकाणी हे ऋण मान्यही केले आहे. उदा. संगणक शास्त्रातले पायाभूत कार्य करणार्‍या बॅबेज, बूल आणि डी मॉर्गन यांच्या प्रेरणांबद्दल बूलची गणितज्ञ पत्नी 1901 साली लिहिलेल्या ‘इंडिअन थॉट अ‍ॅण्ड वेस्टर्न सायन्स इन नाईटीन्थ सेंच्युरी’ लेखात लिहिते, पूर्वेकडील ज्ञान-सुगंधाच्या दरवळाशिवाय युरोपीय विज्ञान त्याच्या सध्याच्या उंचीवर कधीच पोहोचू शकले नसते. पुढे ती टिप्पणी करते, त्यावरून बॅबेज, बूल आणि डी मॉर्गन या तीन गणितज्ञांवरील हिंदू ज्ञान परंपरेच्या प्रभावाचा इ.स. 1830 - 1885 या काळातल्या गणिताने भारलेल्या वातावरणावर काय परिणाम झाला असावा याचा आपण केवळ विचारच करू शकतो.


हिंदू तत्त्वज्ञानातून उमललेले गणित

 

भारताच्या गणिती परंपरेवर असलेल्या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने गणितातील तांत्रिक बाबींवरच भर दिला गेल्याचे दिसते. परंतु कांबळे यांच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये भारतातील गणिताचा विकास हा इथले तत्त्वचिंतन, आध्यात्मिक वृत्ती आणि एकूणच विचार प्रक्रियेचाच परिपाक कसा आहे, याचे विवेचन केले गेले आहे. या अनुषंगाने पुस्तकाच्या सुरुवातीलाच असणारे ‘हिंदू गणिता मागील तत्त्वज्ञान’ हे प्रकरण मुळातूनच वाचायला हवे इतके अप्रतिम आहे.

बीजगणिताला अव्यक्त गणित असेही म्हटले गेले आहे. कारण बीजगणितातील समीकरणांमध्ये वापरली जाणारी ‘क्ष’ अथवा ‘य’ सारखी अक्षरे अव्यक्त अथवा अज्ञाताचेच प्रतिनिधित्व करतात. त्यांना जेव्हा विशिष्ट किंमत दिली जाते तेव्हाच ते व्यक्त स्वरूपात येते आणि अंक गणिताचे रूप घेते.

हिंदू तत्त्वज्ञानानुसार ‘ब्रह्मन’ हे अप्रकट किंवा अव्यक्त स्वरुपात आहे. या दोन्ही अव्यक्तांबद्दल आदरभाव व्यक्त करणारा भास्कराचार्यांचा महत्त्वाचा श्लोकच कांबळे यांनी उद्धृत केले आहेत.

उत्पादकं यत् प्रवदन्ति बुद्धेरधिष्ठितं सत्पुरुषेण सांख्या: ।

व्यक्तस्य कृत्स्नस्य तदेकबीजं अव्यक्तमीशं गणितं च वन्दे ॥

अर्थ :बुद्धिमत्तेचा प्रवर्तक म्हणून संख्यातत्त्वज्ञ (गणितज्ञ) ज्या अव्यक्ताचे वर्णन करतात, ज्ञानी व्यक्तींद्वारे (गणितज्ञ) जे निर्देशित करतात आणि जे सर्व ज्ञातांचे (व्यक्ताचे) आद्य-कारण (बीज) आहे. त्या अव्यक्त परमात्म्याला आणि अव्यक्तांद्वारे गणना करण्याच्या शास्त्राला (बीजगणिताला) मी वंदन करतो.

एकेकाळी हिंदू गणितींनी मांडलेली गणिती सूत्रे आज कोणत्या कोणत्या पाश्चिमात्य गणितींच्या नावाने ओळखली जातात याची यादीच पुस्तकात दिली आहे. हे सर्व लेखन ससंदर्भ आहे. यामध्ये पारंपरिक हिंदू ग्रंथातील उदाहरणे तर आहेतच, पण त्यासोबतच अनेक पाश्चात्य लेखक, अभ्यासकांनीच स्वतःच हिंदू गणितींचे योगदान मान्य कसे केले आहे, याचीही पुष्कळ उदाहरणे आहेत.


दुर्लक्ष आणि र्‍हास

हिंदू गणिताचा प्रभाव एकेकाळी एवढा व्यापक असूनही त्याच्याकडे सहेतुक दुर्लक्ष कसे झाले आणि हळूहळू भारताच र्‍हास कसा झाला याचे विवेचन पुस्तकाच्या उत्तरार्धात अत्यंत विस्ताराने केले आहे. प्राचीन काळातील ग्रीक-भारत संबंधांपासून ग्रीक चिंतनपद्धतीवरही भारतीय चिंतनविश्वासाचा परिणाम होत आला आहे, हे कांबळे सोदाहरण यांनी मांडले आहे. दुर्दैवाने पाश्चात्यांच्या धार्मिक आणि वांशिक श्रेष्ठत्वाच्या गंडामुळे जे-जे भारतीय ते-ते नाकारण्याची प्रथाच पडत गेली. गणिताच्या पायाभरणीचे संपूर्ण श्रेय ग्रीकांकडे दिले जाऊ लागले.

‘आर्यभटीय’सारखे अनेक ग्रंथ संस्कृतमधून अरबी भाषेत अनुवाद झाले होते आणि तिथून ते पुन्हा अनुवादित होऊन युरोपमध्ये गेले. हिंदू गणिती ग्रंथांच्या आधारे अरब गणिती अल्-ख्वारीझिमी याने केलेल्या बीजगणिताच्या मांडणीचा युरोपवर एवढा पगडा बसला की, त्यालाच ‘अल्ज्रेब्रा’ अर्थात बीजगणिताचा उद्गाता मानले जाऊ लागले. युरोपात अगदी आजही गणितासाठी वापरात असणार्‍या अंकांना ‘अरेबिक नंबर्स’ म्हटले जात असल्याचे कांबळे नमूद करतात. विशेष म्हणजे स्वत: अल्-ख्वारीझिमी यानेही ‘हिंदू संख्या’असे म्हटले आहे. परंतु तरीही पाश्चात्यांकडून भारताला त्याचे श्रेय मिळत नाही. अरब आणि युरोपियन लोकांचा बीजगणिताचे प्रणेते म्हणून चुकीने नाही, तर पूर्णपणे विचारान्ती उल्लेख केला जातो, असे कांबळे परखडपणे लिहितात.

हिंदू गणितविषयक ग्रंथ आणि त्यांचे झालेले भाषांतर हा त्या गणिताचा सुरुवातीचा टप्पा कालांतराने या अरबी भाषेतील ग्रंथांचा अनुवाद लॅटिन इंग्रजीमध्ये केला गेला आणि भारतीय हिंदू गणित हे युरोपमध्ये पोहोचले. दुसरा टप्पा हा सर्वसाधारणपणे पोर्तुगीज वसाहतवाद्यांच्या मोहिमांपासून सुरू होतो, या टप्प्यात भारतामध्ये पाठवल्या गेलेल्या जेझुईट मिशनर्‍यांनी प्रामुख्याने केरळच्या गणिती परंपरेतले ज्ञान युरोपपर्यंत कसे पोहोचलेले असावे, याबद्दलचे काही ठोकताळे कांबळे यांनी मांडले आहेत.

शेवटच्या दोन प्रकरणांमध्ये भारताच्या गणिती परंपरेचा प्रवाह खंडित का झाला आणि भारतीय गणिताकडे जगाने दुर्लक्ष का केले याचे विश्लेषण कांबळे यांनी केले आहे. समारोपाच्या प्रकरणामध्ये कांबळे म्हणतात, मी गणित शिकत असताना जर मला त्यातले सिद्धांत, सूत्रेही मूळची भारतामध्येच जन्माला आलेली आहेत हे जर माहीत असते तर माझा गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा असता. भारताचा इतिहास शिकवला जाताना देशात असणार्‍या काही नकारात्मक बाबींवरच इतका जोर दिला जातो की, भारतात कधी काही चांगले घडलेच नाही अशी हळहळू धारणा होते. हे वाक्य आपल्या समाजाबद्दल खरे आहे, असेच म्हणावे लागेल. समाजाची ही धारणा बदलण्याचा मानस ते व्यक्त करतात.


उत्तम मांडणी


आपल्या गणिती परंपरेचे झळाळते दर्शन सर्व भारतीय भाषांमधून घडणे अत्यावश्यक आहे. ते ‘भारतीय विचार साधना’च्या पुढाकारामुळे अतिशय उत्तम निर्मितीमूल्यांसह मराठीत आल्याने एक चांगली सुरुवात झाली आहे. गणितातील विविध तांत्रिक बाबी, तसेच त्यांचा पाया असणार्‍या हिंदू तत्वज्ञानातील संकल्पना मूळ इंग्रजी पुस्तकातून मराठीत अतिशय आव्हानात्मक होते. परंतु डॉ. श्रीराम चौथाईवाले आणि आनंद विधाते यांनी हे अनुवादाचे आव्हान समर्थपणे पेलल्याने मराठी वाचकांसाठीही हा ज्ञानाचा खजिना उपलब्ध झाला आहे.


पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक विवेक, २२ एप्रिल २०२५


https://www.evivek.com/Encyc/2025/4/22/Avinashi-Beej-book.html

Wednesday, July 1, 2026

गणितवृक्षाचे बीजारोपण




आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांनी एका व्याख्यानात ‘पायथागोरसचे प्रमेय भारतीयांना पायथागोरसच्या पूर्वीपासूनच ज्ञात होते’ असे विधान ऐकले, तेव्हा हा काहीतरी उजव्या विचारसरणीचा ‘प्रपोगंडा’ असणार, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. परंतु या विधानाला पुष्टी देणारा स्कॉटिश गणिती जॉन प्लेफेअर याचा एक लेख पुढे त्यांच्या वाचनात आला. सतराव्या शतकातल्या या लेखाने कुतूहल जागृत होऊन कांबळे यांनी भारताच्या गणिती परंपरेचा अभ्यास सुरू केला आणि एक विलक्षण पट त्यांच्यासमोर उलगडत गेला. या अभ्यासाचाच परिपाक म्हणजे ‘इम्पेरिशेबल सीड’ हे पुस्तक.


भारतातील गणिती परंपरेचे विवेचन करताना कांबळे यांनी ‘हिंदू गणित/गणिती’ ही शब्दयोजना वापरली आहे. ‘हिंदू’ ही ओळख विशिष्ट भूभागाशी जोडली गेली असून ‘हिंदू गणित’ या व्यापक संकल्पनेमध्ये वैदिक, बौद्ध आणि जैन विचारधारांमधून आलेले गणितही समाविष्ट असल्याचे ते स्पष्ट करतात; एवढेच नव्हे तर ‘हिंदू संख्यापद्धती’सारख्या संकल्पना पाश्चात्य गणिततज्ज्ञांनीही वापरल्याची उदाहरणेही देतात. हिंदू गणितींनी अंकगणित, बीजगणित, भूमिती, संख्यामालिका, त्रिकोणमिती (ट्रिग्नोमेट्री) आणि कॅल्क्युलसमध्येही मूलभूत कार्य कसे केले, हे उलगडून दाखवणारी प्रकरणे पुस्तकात आहेत. आर्यभट्ट (‘पाय’ची किंमत), भास्कराचार्य पहिले (खगोलशास्त्रीय सूत्रे) व भास्कराचार्य दुसरे (क्रमांतरण-संयोगीकरण म्हणजेच पर्म्युटेशन- कॉम्बिनेशन), ब्रह्मगुप्त (ऋण संख्या) अशा अनेक श्रेष्ठ गणितींनी अंगांमध्ये श्लोकरूपात मांडलेले सिद्धांत/सूत्रेही आपल्याला वाचायला मिळतात.

केरळमध्ये माधवापासून नारायण भट्टीहारीपर्यंत (चौदावे ते सतरावे शतक) चालत आलेल्या देदीप्यमान गणिती परंपरेची कांबळे यांनी आवर्जून दखल घेतली आणि आज बहुतेकांना कल्पनाही नसणाऱ्या या ज्ञानपरंपरेचे तेथील भक्तिपरंपरेशी असणारे गहिरे नातेही सांगितले. हिंदू गणिताचा प्रभाव प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे फक्त गणितच नव्हे तर भाषाशास्त्र, संगणकशास्त्र या विषयांमधील अनेक पाश्चिमात्य अभ्यासकांवरही पडत आला आहे आणि त्यांनी वेळोवेळी ते ऋण मान्यही केले आहे. उदा. संगणकशास्त्रातले पायाभूत कार्य करणाऱ्या बॅबेज, बुलियन आणि डी मॉर्गन यांच्या प्रेरणांबद्दल बॅबेजची पत्नी १९०१च्या ‘इंडिअन थॉट अँड वेस्टर्न सायन्स इन नाईटिन्थ सेंच्युरी’ लेखात या तिघांवर असलेल्या हिंदू गणिताच्या प्रभावाबद्दल लिहिताना, ‘कल्पना करा, या तिघांवरील सखोल हिंदू प्रभावाचा इ.स. १८३० ते १८६५ या कालखंडातील गणिती वातावरणावर काय परिणाम झाला असेल’, असे लिहिले आहे.

गणिताचा भारतातून पश्चिमेकडे प्रसार होण्याचे तीन टप्पे आहेत. एक म्हणजे, इसवीसन पूर्व काळ : ग्रीकांशी भारतीयांचा संपर्क, दुसरा अरब साम्राज्याच्या भरभराटीच्या काळात आर्यभट्टीय, ब्रह्मस्फुटसिद्धांतासारखे ग्रंथ संस्कृतमधून अरबीतील (आणि तिथून लॅटिन-इंग्रजीमध्ये गेलेले) अनुवाद आणि तिसरा टप्पा हा पोर्तुगिजांनी जेझुईट मिशनऱ्यांच्या माध्यमातून केरळमधून गणितविषयक संस्कृत ग्रंथांचे युरोपमध्ये नेलेले अनुवाद. तिसऱ्या टप्प्यानंतर युरोपची गणितामध्ये घोडदौड सुरू झाल्याच्या ‘योगायोगा’कडेही कांबळे यांनी लक्ष वेधले आहे. काही प्रकरणांमध्ये कांबळे यांनी आपल्या गणिती परंपरेचा ऱ्हास कसा झाला आणि पाश्चात्यांनी वांशिक आणि धार्मिक श्रेष्ठतेच्या अहंगंडातून भारताच्या गणितातल्या योगदानाला कसे नाकारले याबद्दल ऊहापोह केला आहे. इंग्रजांनी भारतीय शिक्षणपद्धती मोडून काढल्याने भारतीय ज्ञानपरंपरा विस्मृतीत गेली आणि पाश्चात्यांनी सांगितले तेच मान्य करायचे, अशी भारतीयांची मानसिकता झाली, याबद्दल कांबळे खेद व्यक्त करतात आणि या पुस्तकाद्वारे ती बदलण्याचा मानस व्यक्त करतात.

भारताच्या गणिती परंपरेवर यापूर्वीही पुस्तके लिहिली गेली, परंतु या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये भारतातील गणिताचा विकास हा इथले तत्त्वचिंतन आणि अध्यात्म यांचाच परिपाक कसा आहे, याचे विस्तृत विवेचन आहे. ‘द फिलॉसॉफिकल अंडरपिनिंग्ज ऑफ हिंदू मॅथेमॅटिक्स’ हे प्रकरण उद्बोधक आहे. गीतेच्या श्लोकात (९.१८) वेगळ्या संदर्भात आलेली ‘अविनाशी बीजा’ची संकल्पना पुस्तकाच्या शीर्षकामध्ये कल्पकतेने वापरून हिंदू गणिताचे महत्त्व अधोरेखित केले आहे. पुस्तकातील आकृत्या, तक्ते, चित्रे, उद्धृते, मूळ स्रोत आणि ससंदर्भ लेखन यांमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती आल्यास कांबळे यांचे प्रयत्न अधिक खोलवर पोचण्यास मदत होईल.

इम्पेरिशेबल सीड
लेखक : भास्कर कांबळे
प्रकाशक : गरुड प्रकाशन
पृष्ठसंख्या : ४५० किंमत : ८९९ रुपये




पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, २५ नोव्हेंबर २०२३

https://maharashtratimes.com/editorial/column/dakhal/imperishable-seed-book-written-by-bhaskar-kamble-maharashtra-times-article/articleshow/105488294.cms






भारताची उज्ज्वल ज्ञानपरंपरा

भारताचा इतिहास हा ज्ञानाचा इतिहास आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुर्दैवाने काळाच्या ओघात विविध कारणांमुळे ज्ञानाचा वारसा खंडित झाला. भारतीय ज्ञानपरंपरेकडे दुर्लक्ष करून पाश्चिमात्य शिक्षणपद्धतीला आलेले अवाजवी महत्व; एकेकाळची ज्ञानभाषा असणाऱ्या संस्कृत भाषेबद्दलची उदासीनता; पाली, अर्धमागधी यांसारख्या भाषांचा झालेला ऱ्हास यामुळे अनेक विषयांमधले ज्ञानभांडार विस्मृतीच्या गर्तेत जात आहे. ‘ट्रेझर ट्रोव्ह ऑफ इंडियन नॉलेज’ या पुस्तकाच्या माध्यमातून अशा विस्मृत ज्ञानावर प्रकाश टाकला गेला आहे. 


पुस्तकामध्ये एकूण २७ प्रकरणांमधून स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, जलव्यवस्थापन, धातुशास्त्र, रसायनशास्त्र, शिल्पकला इत्यादी अनेक क्षेत्रांमधल्या भारतीयांच्या विलक्षण कामगिरीचे दाखले दिले आहेत. कुतुबमिनारजवळचा बाराशे ते पंधराशे वर्षे न गंजता उभा असलेला लोहस्तंभ, १८०० वर्षांपासून वापरात असणारे कलानाई धरण, अदृश्य होणाऱ्या शाईमध्ये लिहिलेले अग्रसेन महाराजांचे चरित्र ही त्यापैकी काही उदाहरणे. सोमनाथ मंदिराजवळच्या किमान दीडहजार वर्षे जुन्या असणाऱ्या ‘बाणस्तंभा’वर ‘या स्थानापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या सरळ रेषेला कुठेही अडथळा नाही’ अशा अर्थाची संस्कृत ओळ कोरलेली आहे. आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने याची सत्यता पडताळता येते तेव्हा इतक्या पूर्वी हे भौगोलिक ज्ञान भारतीयांकडे कसे आले याचे नवल वाटत राहते. 


सांकेतिक भाषेतमधल्या साहित्याबद्दलच्या पुस्तकातल्या माहितीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. 

१) जैन मुनी कुमुदेंदू लिखित ‘सिरी भूवलय’ ग्रंथ : हा जणू रामायण, महाभारत तसेच अन्य प्राचीन ज्ञानसाहित्याचा एनसायक्लोपिडियाच आहे. याच्या प्रत्येक पानावर ‘सुडोकू’सारख्या २७ x २७ चौकटींमध्ये १ ते ६४ दरम्यानच्या संख्या लिहिल्या आहेत. या संख्यांशी संबंधित विशिष्ट अक्षरे ठराविक क्रमाने कशी वाचायची काही संकेत आहेत. ते वापरून हा ग्रंथ एकूण १८ लिप्या आणि ७१८ भाषांमधून वाचता येतो अशी माहिती उपलब्ध आहे. त्यापैकी कन्नड, मराठी, तमिळ, तेलुगु प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून यातील काही मजकुराचे अनेक जैन संस्थांच्या प्रयत्नांमुळे ‘वाचन’ करण्यात यश आले आहे.. 

२) ‘कटपयादी संख्यापद्धती’ : अक्षरांना विशिष्ट क्रमांक देऊन त्यातून गुप्तसंदेश देण्यासाठीची ही पद्धती वापरून ‘गोपीभाग्यमधुव्रात-शृङ्गिशोदधिसन्धिग | खलजीवितखाताव गलहालारसंधर ||’ ही काव्यपंक्ती लिहिली गेली आहे.  यामध्ये कृष्णाला केंद्रस्थानी घेऊन वर्तुळाकार फेर धरणाऱ्या गोपिकांचे वर्णन असले तरी यातील एकेका अक्षराचे कटपयादी संख्यासंकेतानुसार वाचन केले असता वर्तुळाचा परीघ काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘पाय’ या स्थिरांकाची (३.१४) दशांश चिन्हाच्या पुढच्या ३१ स्थानांपर्यंतची किंमत मिळते!


एवढा विलक्षण ज्ञानवारसा खंडित होण्यामागची कारणे पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात विशद केली आहेत. बाराव्या शतकापासून भारतावर होणाऱ्या सततच्या इस्लामी आक्रमणांमध्ये इथली मठ-मंदिरे, ग्रंथसंपदा यांचे आतोनात नुकसान झाले. बख्तियार खिलजीने तब्बल तीन महिने केलेल्या नालंदा विद्यापीठाच्या विध्वंसाचे वर्णन वाचून मन विषण्ण होते. पुढे युरोपीय वसाहतवाद्यांनी आपल्या लुटीमध्ये  अनेक ग्रंथ भारतातून आपल्या देशात नेले. अशा प्रतिकूलतेतही काही ग्रंथ तग धरून राहिले. ‘सुश्रुतसंहिते’मध्ये मांडलेले ‘प्लास्टिक सर्जरी’चे तंत्र, भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथातमधले काटकोनाच्या कर्णाबद्दलचे सूत्र, नागार्जुनाच्या ‘रसरत्नाकर’ या ग्रंथातले ‘आसवन विधी’चे (distillation) वर्णन इ. उदाहरणे त्या काळातील भारतीयांच्या ज्ञानाची साक्ष देतात. प्रख्यात शास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी ‘हिंदू केमिस्ट्री’ या आपल्या ग्रंथामध्ये भारतीयांनी प्राचीन काळी केलेल्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल लिहून ठेवल्याने महत्वाची माहिती जगासमोर आली. 


प्रस्तुत पुस्तक हे ’भारतीय ज्ञानाचा खजिना’ या मराठी पुस्तकाचा देविदास देशपांडे यांनी केलेला उत्तम अनुवाद आहे. भारताच्या ज्ञानपरंपरेमध्ये विविध प्रांतांमधून मिळालेल्या योगदानाची दखल पुस्तकामध्ये घेतली गेली आहे. लेखनासाठी प्राचीन भारतीय ग्रंथ, परदेशी प्रवाशांनी भारताबद्दल लिहून ठेवलेली निरीक्षणे, भारतीय आणि विदेशी अभ्यासकांच्या नोंदी यांचा आधार घेतला गेला आहे. माहिती आणि रंजकता यांचा उत्तम मेळ असणारे हे पुस्तक भारताच्या ज्ञानवारश्याकडे पुन्हा एकदा वळण्याची आवश्यकता ठळकपणे अधोरेखित करते.  


ट्रेझर ट्रोव्ह ऑफ इंडियन नॉलेज

लेखक : प्रशांत पोळ

प्रकाशक : प्रभात प्रकाशन

पाने : २०८, किंमत : ३०० रु 





पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, ३० ऑक्टोबर २०२१

https://tinyurl.com/dymfkvp4


--- प्रसाद फाटक