Total Pageviews

Saturday, July 25, 2026

प्रिय कणेकर




(भाग - १)

प्रिय कणेकर,

तुम्हाला जाऊन दोन वर्षे झाली. 

म्हणजे मी दोन वर्षे उशिराने लिहीत आहे.

हे मी तेव्हाच का लिहिलं नाही, याला माझ्याकडे उत्तर नाही. एक मात्र खरं, पुलंखालोखाल ज्या लेखकाची वाक्यंच्या वाक्यं मला पाठ आहेत असा लेखक जेव्हा हे जग सोडून जातो, तेव्हा त्याच्याबद्दल चार शब्दही न लिहिणं यासाठी कुठलीही सबब असू शकत नाही.. पण असो, आज लिहायला घेतल्यामुळे कदाचित तुम्ही गेलात तेव्हा लिहू शकलो नसतो, अशा गोष्टी आज लिहू शकेन 

तुम्ही शेवटपर्यंत लिहीत राहिलात, ही गोष्ट मला फार विशेष वाटते. आयुष्यात तुम्ही स्वतः खालोखाल बहुदा आपल्या लेखणीवरच प्रेम केलंत. अनेकांना आपली सर्वात प्रिय गोष्ट आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात करता आली नाही याचं शल्य घेऊनच हे जग सोडावं लागतं. पण तुम्ही मात्र लिहीत होतात. लेखणीने तुम्हाला शेवटपर्यंत साथ दिली हे तुमचं भाग्य. मला आठवतंय तुमच्या एका पुस्तकाची अर्पण पत्रिका तुम्ही तुमच्या लेखणीला अर्पण केली होती.  


साधारण 2013-14 पर्यंत प्रकाशित झालेलं आणि आऊट ऑफ प्रिंट न झालेलं तुमचं प्रत्येक पुस्तक मी वाचलेलं होतं. तुमचं लिखाण हसरं होतं, हळवं होतं;  दुखऱं होतं, बोचरं होतं; उत्स्फूर्त होतं, उद्धट होतं; टवाळ होतं, टोकदार होतं कुठल्या दिवशी काय वाट्याला येईल सांगता यायचं नाही, आणि हीच तर तुमच्या लिखाणाची गंमत होती. सोशल मीडियावर तुम्ही लिहिलं असतं तर धुमशान केलं असतंत. 


क्रिकेट आणि सिनेमा ही दोन्ही तुमची 'फर्स्ट लव्ह'. त्यातही मेनस्ट्रीम हिंदी चित्रपटावर तुम्ही ज्या तोडीची बॅटिंग केलीत ना, ती मी दुसऱ्या कुणाकडूनही   अनुभवली नाही. आवडो न आवडो, तुम्ही भान हरपून थेटरमध्ये सिनेमा बघत राहिलात आणि तुमच्याच भाषेत सांगायचं तर "बाहेरची दुःखं तिथल्या अंधारात विरघळवून टाकत राहिलात". 'माझी अंधारातली घरं' हा फक्त थेटर्सवरच्या अनुभवांवरचा तुमचा लेख मी कसा विसरू शकेन? 


यादोंकी बारात, पुन्हा यादोंकी बारात आणि गाये चला जा हा तुमच्या चित्रपटविषयातल्या लिखाणाचा कळसाध्याय होता. विशेषतः 'यादोंकी बारात'मध्ये दोन पानी लेखात तुम्ही एकेका कलाकाराचा असा काही वेध घेतलाय की, तुमच्या लेखणीचा हेवा वाटावा. मी तर त्यातले कितीतरी जण कधी पडद्यावर पाहिलेही नव्हते किंवा फार थोडे पाहिले होते. पण तुमचं वाचूनच माझं त्यांच्याबद्दलचं मत बनायचं/बदलायचं. उदा. मनोजकुमार, हा माझा काही टोकाचा नावडता माणूस नव्हता पण तुमचा त्याच्यावरचा 'तोतया' या शीर्षकाचा लेख वाचला आणि मलाही मनोजकुमार असह्य होऊ लागला, असा होता तुमच्या लेखणीचा प्रभाव!


सिनेमावर लिहिण्यासाठी तुम्हाला कधी कष्ट करावे लागले असतील असं वाटत नाही. सगळे संदर्भ मुखोद्गत! लिहित लिहिता  एखाद्या संदर्भातली हिंदी चित्रपट - संगीतकार- गायक यांची धडाधड पंधरा-वीस उदाहरणं द्यायचात. तुम्ही तसे 'रसग्रहण' कॅटेगरीतले; त्यामुळे समीक्षणाच्या वाटेला फार गेला नाहीत; पण 'शिणेमा डॉट कॉम' या पुस्तकातला अमिताभ आणि दिलीप कुमारच्या 'शक्ती'मधल्या जुगलबंदीचे  विश्लेषण करणारा 'उभे ठाकले झुंजाया' हा लेख निव्वळ अप्रतिम असून माझ्या मते तुमच्या चित्रपटविषयक लिखाणातला सर्वोत्तम आविष्कार आहे. हिंदी चित्रपटांच्या त्यांच्या भल्याबुऱ्या रूपात मनापासून स्वीकारणारे तुम्ही आर्ट सिनेमातल्या अंधार, स्तब्धता आणि  दुर्बोधतेवरून तुम्ही जी सालटी काढायचा ती वाचून हसून पुरेवाट व्हायची. 

तुमचे सिनेमा आणि क्रिकेटवरचे लिखाण आणि स्टॅन्डअप शो अमाप लोकप्रिय झाले, पण तुमच्या मधल्या उत्कृष्ट व्यक्तिचित्रणकाराचं कौतुक व्हायला हवं तसं झालं नाही असं मला वाटतं. कमीत कमी शब्दात कधीतरी खदाखदा हसवत तर कधी चटका लावणारी अनेक व्यक्तिचित्रं तुम्ही लिहिलीत. अरुण साधूंचा व्यासंग, सिंहासन-मुंबई दिनांक यावर अनेकांनी लिहिलं आहे, पण तुम्ही तुमचे पत्रकारितेतले सहकारी म्हणून एका आपल्यातल्याच वाटाव्या अशा माणसाचं जे चित्रण तुम्ही केलंत आणि शेवटाकडे जाताना साधू किती मोठा लेखक आहेत याची तुम्हाला जाणीव झाल्याचा क्षण तुम्ही प्रामाणिकपणे लिहितात, ते फार बहारदार होतं. अलीकडे तुमच्या विविध पुस्तकांमधल्या जुन्याच व्यक्तिचित्रणांचं संकलन होऊन 'सगेसोयरे' या नावाने पुन्हा प्रकाशित झालं तेव्हा ते मी आवर्जून घेतलं - त्यामध्ये साधूंवरचा तो लेख आहे हेही त्यामागचं महत्वाचं कारण होतंच. 


तुमच्या लिखाणातल्या मी अतिशय एन्जॉय केलेल्या गोष्टी म्हणजे तुमची प्रवासवर्णनं आणि तुमचे पत्रकारितेतले अनुभव. तुमच्या प्रवासवर्णनांमध्ये खरं म्हणजे स्थलवर्णन फारसं नव्हतंच. पण एकाहून एक भन्नाट किस्से मात्र असायचे. अमेरिकेत जाणं आजच्यासारखी कॉमन नव्हतं तेव्हापासून तुम्ही एकपात्री प्रयोगांच्या निमित्ताने तिकडे जात होतात आणि दरवेळी आमच्यासाठी तिथल्या अनुभवांचा खजिना धम्माल शैलीत रिता करायचात आणि तेव्हा वाचता वाचता हसून पुरेवाट व्हायची.  'डॉलरच्या देशा' हे या पुस्तकामध्ये तुमचे हे लेख एकत्र झाले हे बरं झालं. 


साधारणपणे पत्रकारितेकडे सामान्यजन 'वसा', 'जबाबदारी' वगैरे म्हणून पाहायचे त्या काळात तुम्ही पत्रकार होतात. पण तुमच्या लिखाणात पत्रकारितेतील एकसुरीपणा, बनेलपणा, पाट्या टाकणे वगैरे गोष्टी तुम्ही अत्यंत चुरचुरीत पणाने लिहिलंत; अगदी स्वतःच्या चुकारपणावरही! बी. एस. व्ही. राव या तुमच्या पत्रकारितेतील बॉसचं व्यक्तिचित्रण कसलं धमाल केलं आहे तुम्ही… या सगळ्यामुळे आपण समजतो तशी ही काही नेसेसरीली उदात्त वगैरे गोष्ट नाही हे कळून चुकलं.


तुमच्या पंच्याहत्तरीच्या दिवशी मी एक छोटीशी पोस्ट टाकली होती, तेव्हा एक दीर्घ पोस्ट पेंडिंग असल्याचं मी म्हटलं होतं. ती लिहिणं तुमच्या हयातीत करू शकलो नाही याची बोच आहेच. पण आता लिहायला घेतली ती इतकी दीर्घ होतीये की, आता त्यासाठी दुसरा भाग लिहिणं भाग आहे. 


आज थांबतो. पुढच्या भाग लिहायचा राहणार नाही. उशीरही करणार नाही. 

प्रॉमिस. 


तुमचा चाहता,

प्रसाद


(क्रमश:)

(पूर्वप्रसिद्धी : फेसबुक, २५ जुलै २०२५)


----------------------------------

(भाग २)


प्रिय कणेकर,


या पत्राचा पहिला भाग बरोब्बर एक वर्षापूर्वी तुमच्या स्मृतिदिनी लिहिला, तेव्हा त्याच्या शेवटी मी प्रॉमिस दिलं होतं “पुढचा भाग लिहायचा राहणार नाही. उशीरही करणार नाही.” त्यातला  ५०% भागच पाळू शकतोय. ‘दिलेलं प्रॉमिस अजिबात न पाळण्यापेक्षा हे बरं आहे म्हणायचं’ अशी स्वत:ची समजूत घालून घेतोय. असो. 


तुमच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये मी म्हटलं होतं की, तुम्ही ‘गोतावळा’ पुस्तकात लिहिलेल्या स्वत:च्याच व्यक्तिचित्रणापेक्षा वेगळं मी काही लिहू शकेन असं वाटत नाही, पण प्रत्यक्ष पत्र लिहायला बसलोय तेव्हा इतकं काही सुचतंय की, विचार थोपवायला सायास करावे लागत आहेत. 


मागच्या भागाच्या सुरुवातीला मी "तुमची वाक्यंच्या वाक्यं पाठ आहेत" असं लिहिलं होतं. एखाद्या व्यक्तीची कॅसेट ऐकून त्याची वाक्यं पाठ होणं यात काही आश्चर्य  नसतं, पण माझ्या बाबतीत आश्चर्य म्हणजे मला पाठ असलेली वाक्यं तुमच्या फिल्लमबाजी किंवा फटकेबाजीच्या कॅसेटमधली नाहीत! (आता एक रहस्योद्घाटन, ज्याबद्दल मला शिव्याही खाव्या लागतील : मी लहानपणी फिल्लमबाजी प्रथम टीव्हीवर आणि नंतर आणखी कुठेतरी थोडंसं ऐकलं तेव्हा तुमच्या बोलण्याच्या टोन मला फार इरिटेट झाला होता. त्यामुळे पुढची अनेक वर्षं मी फिल्लमबाजीच्या वाटेलाच गेलो नाही. आख्खं फिल्लमबाजी मी आयुष्यात खूप उशिरा, म्हणजे वयाची तिशी उलटून गेल्यावर ऐकलं! त्यातला कंटेंट धमाल आहे यात शंकाच नाही. ऐकताना भरपूर हसलोसुद्धा, पण त्यातला तुमचा टोन मला अजूनही काहीसा इरिटेटिंगच वाटतो :P असो !) तर मूळ मुद्दा असा की, मला पाठ असलेली तुमची वाक्यं ऐकून नव्हे तर वाचून पाठ झालेली आहेत, म्हणजेच ती तुमच्या पुस्तकांमधली / लेखांमधली आहेत. बरं, मी तुमच्या लिखाणाची पारायणं केली आहेत असंही नाही. पण तरीही इतकी वाक्यं कशी लक्षात राहिली याचं मलाही कोडंच आहे. बहुदा लिहिता लिहिता तुम्ही अचानक असं काहीतरी लिहून जायचात की, ते लक्षात राहणं अटळ असायचं. ‘एकदा मोठ्या माणसांच्या कोणत्याही लहानसहन गोष्टींचंही कौतुक होतं’ हे सांगत असताना तुम्ही लिहून गेलात "मोठ्यांचं सगळंच मोठं असतं. टमरेल सुद्धा!" :D आता हे वाक्य कसं काय विसरणार सांगा !


व्यक्तिचित्रं हा तुमचं बलस्थान होतं हे मी मागे म्हणालोच. पण त्यातले तुमचे दोन एक्सट्रीम्स बघितले की तुमची रेंज पाहून थक्क व्हायला होतं. तुमच्या लिखाणात सातत्याने भेटायला येणारी दोन पात्रं या स्पेक्ट्रमच्या दोन विरुद्ध टोकाला आहेत. एका बाजूला आहे एक धमाल - पण काल्पनिक पात्र - तुमचा 'जाड चष्मेवाला मित्र'. जगातल्या कुठल्याही फालतू समस्येला ती आपलीच समस्या असल्यागत (एखाद्या शब्दाला शेवटी 'सारखा' हा प्रत्यय जोडण्याऐवजी  'गत' हा प्रत्यय जोडणे, ही तुमचीच खास शैली वापरायचा मोह मलाही झालाय) आव आणणारा, 'होलिअर दॅन दाऊ'चा आव आणणारा पण प्रत्यक्षात अत्यंत कद्रू, स्वार्थी, पोटार्थी असणारा हा जाड चष्मेवाला मित्र तुमच्या आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्ही निर्माण केलात आणि अनेक स्फुट लेखांमधून आमच्या भेटीला आणलात. तुम्हा दोघांमधले एकमेकांना चिमटे, बोचकारे काढणारे संवाद वाचताना मी अशक्य हसलेलो आहे. हे फार्सिकल ध्यान एका टोकाला आणि दुसऱ्या टोकाला होते तुमचे वडील 'डॉक्टर कणेकर'.


तुमच्या अनेक लेखांमधून तुमच्या वडिलांचं तुकड्या तुकड्यांनी चित्र तुम्ही उभं करत गेलात. पण जिगसॉच्या तुकड्यांच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळी चित्रं होती. या बाजूने तुमच्या वडिलांचं चित्र जुळवत गेल्यावर लक्षात आलं की, थोड्यावेळाने पलीकडच्या बाजूला तुमचंही चित्र तुम्ही जुळत गेलंय. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलेला आणि वडील व आजी (आईची आई) यांच्या सान्निध्यात पोरकेपणाची भावना घेऊन मोठा झालेला, जगाबद्दल (आणि वडिलांबद्दलही) मनात निर्माण झालेला कडवटपणा विसरण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याला आंजारून गोंजारून वाढवणारा आणि पुढे मानवी आयुष्याचे ताणेबाणे समजू लागल्यावर 'अजाणत्या वयात वडिलांशी आपण किती झोंबरं वागलो' याची जाणीव होऊन उर्वरित आयुष्य पश्चात्तापात होरपळून घेत, स्वतःला टोचत-बोचकारत कुढणारा असा मुलगा तुमच्या वडिलांवरच्या असंख्य लेखांमधून नकळत आमच्यासमोर उभा राहिला. तुमचं वडिलांबद्दलचं लेखन असं काही कातर करून जातं की, एरवी टिवल्याबावल्या, शेरेबाजी करणारी तुमची ती लेखणी हीच का, असा संभ्रम निर्माण होतो.  


** 


सोशल मीडिया नसण्याच्या काळात आवडत्या कलाकार आणि लेखकाचं काम पाहूनच त्याच्याबद्दलच्या प्रतिमेचं बांधकाम मनात होतं जायचं. इतकी वर्षं तुमचं लिखाण वाचत असताना आणि कधीतरी तुमच्याबद्दल लिहिलेलं वाचत असताना तुमच्याबद्दल काही प्रतिमा मनात तयार होत असतात. इतकी वर्षं तुमचं लिखाण वाचल्यावर जेव्हा तुमचं ‘मी माझं मला’ हे आत्मचरित्र आलं आहे, हे कळलं तेव्हा तुमच्या प्रतिमेतले मिसिंग तुकडे शोधण्याच्या उत्सुकतेने ते वाचायलं घेतलं आणि पहिली भावना निर्माण झाली.. 


विश्वासघाताची! 


एका अस्सल वाचक फॅनचा त्याच्या लाडक्या लेखकाने केलेला विश्वासघात..


तुमचं अर्धंअधिक आत्मचरित्र म्हणजे पूर्वप्रकाशित लेखच जसेच्या तसे छापलेले होते. लिहिण्यासाठी कधीही हात आखडता न घेणाऱ्या माणसाने असं करणं अनाकलनीय होतं. त्यामुळे पुस्तकालाही तुकड्यातुकड्याचं स्वरूप आलं होतं. खट्टू मनानेच मी पुस्तक पूर्ण केलं. काही गोष्टी मात्र या पुस्तकाच्या निमित्ताने तुमच्या लिखाणात प्रथमच आल्या. तुमच्या दुखऱ्या बालपणातल्या तुम्ही-वडील-आजी या त्रिकोणाचा चौथा कोन तुम्ही प्रथमच उजेडात आणलात, तो म्हणजे तुमची आई गेल्यानंतर तुमची सावत्र आई म्हणून आलेल्या तुमच्या सख्ख्या मावशीचा. या पुस्तकातून या अवघडलेल्या नात्यातलं एक वेगळंच नाट्य तुम्ही समोर आणलंत. माणसाच्या आयुष्यात असेही अव्यक्त, अंधारे कोपरे असू शकतात याचं दर्शन झालं. तुमच्या प्रतिमेतले आणखी काही मिसिंग तुकडे जुळले. 


**


तुमच्या लेखणीवर मी मनस्वी प्रेम केलं, त्या अर्थाने मी तुमचा फॅनच. पण बऱ्याचदा फॅन आपल्या आवडत्या व्यक्तीचं सगळंच आवडून घेतो, तसं माझं झालं नाही. त्यामुळे सारस्वता, आज थोडा गुन्हा करणार आहे. तुमचे अनेक लेख अत्यंत टुकार आहेत आणि त्या त्या वेळी त्यावर नापसंतीचा शिक्काही उमटवला आहे. तुमच्या लिखाणात अकारण बोचकारे काढण्याचा प्रकारही काही वेळा दिसायचा. लिखाणाच्या विषयाशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीचा/व्यक्तीबद्दल कुठलातरी संदर्भ/उपमा देऊन फालतू शेरेबाजी करायची तुमची सवय मला आवडायची नाही. तुम्ही असं का करायचात हे  माहित नाही. आता अब्दुल कलामांबद्दल  तुम्हाला आदर नसेल असं मला अजिबात वाटत नाही, पण लिहिता लिहिता एकदा तुम्ही उगाचच "कलामांसारखं व्हायचं आहे. आता उद्यापासून मी त्यांच्यासारखे केस वाढवायला हवेत" अशा अर्थाची काहीतरी अनावश्यक आणि आचरट टिप्पणी करून गेलात. तुमच्यावरच्या टिप्पण्या मात्र खिलाडूवृत्तीने घेत नसावात असंही तुमच्या लिखाणातून जाणवायचं. सुरेश भटांच्या भरपूर खाण्याच्या सवयीवरून तुम्ही त्यांच्यावर केलेली टिप्पणी हा तुमच्या मते ‘रेशमी चिमटा’ होती, आणि तुमच्यावर भटांचे चाहते चिडले ते उडवून लावलंत; पण तुम्ही लोकसत्ताच्या ‘लोकरंग’ पुरवणीच्या ‘दोन फुल - एक हाफ’मध्ये एकदा तुमची टोपी उडवली गेली तेव्हा मात्र तुम्ही (मराठीतले सर्वाधिक मानधन घेणारे लेखक!) लोकसत्ताच्या कार्यालयात जाऊन सदराचा लेखक ‘तंबी दुराई’ म्हणजे नक्की कोण आहे याची फार खोदून खोदून चौकशी केली होतीत म्हणे! 


**


तुमच्याबद्दलची एक अनाकलनीय गोष्ट माझ्या मनात खूप दीर्घकाळ रुतून बसली आहे. तुम्ही आणि द्वारकानाथ संझगिरी यांचं लेखन वाचत मी मोठा झालो. तुम्ही दोघेही पत्रकार लेखक, दोघांनी चित्रपट आणि क्रिकेटवरच्या जीवापाड प्रेमामधून त्यावर भरपूर लिहिलं (अर्थात चित्रपटावर तुमच्याइतकं भारी संझगिरी लिहू शकले नाहीत आणि क्रिकेटवर तुम्ही त्यांच्याइतकं भारी लिहू शकला नाहीत, असं माझं मत आहे), दोघांच्याही विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड ओळखी आणि मुख्य म्हणजे दोघेही मुंबईकर एवढ्या सगळ्या गोष्टी कॉमन असूनही तुमच्या चविष्ट लिखाणात संझगिरींना चिमूटभर मीठाइतकीही जागा नाही, हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. 


तुम्ही दोघेही सामना, लोकसत्ता आणि लोकप्रभाचे हक्काचे लेखक होतात (काही वर्षं तर ‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीत तुमचे स्तंभ एकाच वेळी चालू होते!) यामुळे तर मला तुमच्या या मौनाबद्दल खूप आश्चर्य वाटतं. नक्की काय कारण असेल? संझगिरींनी मात्र तुमच्या साठीनिमित्त ‘उत्सव’मध्ये मस्त लेखसुद्धा लिहिला होता, ज्यात त्यांनी तुमच्या कॉलेजमधल्या दिवसांचा उल्लेख केला होता. तो तुम्ही वाचलाही असणार. दुसरा लेख मात्र तुम्ही वाचला नाहीत नव्हता, कारण तो लेखक तुमच्या निधनाच्या निमित्ताने लिहिला होता. त्यात मात्र संझगिरींनी all was not well याची ओझरती hint दिली होती. तुमच्या लेखनात त्यांना काही बोचकारे काढले असते, तरी आश्चर्य वाटलं नसतं, कारण ते तुमच्या ‘कणेकरी’ शैलीत फिट्ट बसलं असतं. पण तुमच्या लिखाणात ती व्यक्तीच संपूर्ण वजा असणं, मला कायमच कोड्यात टाकत आलं आहे.


**


तुमचं शेवटच्या काही वर्षांमधलं लिखाण मी वाचलं नव्हतं. तुमच्या लेखणीतली पूर्वीची मजा नाहीशी झाली असेल म्हणा किंवा सगळं तसंच असेल पण मी मोठा झालो असेल म्हणून म्हणा; तुमचं नवं लिखाण माझ्याकडून वाचलं जाणं माझ्याही नकळत थांबलं. एखाद्या व्यक्तीबद्दल "ती व्यक्ती अज्जिबात बात बदलली नाही अथवा तिचं लेखन अजिबात बदललं नाही" हा विषय कौतुकाचा असू शकतो. बहुदा तुम्ही बदलला नाहीत हाच माझ्यासाठी वाचन थांबवण्याचा मागची भावना असावी. पूर्वी माझी फिल्लमबाजी आणि फटकेबाजी ऐकताना एवढी  मजा आली, पण कणेकरी त्याही नंतर ऐकलं .. फक्त दहा मिनिटं .. आणि मला तेही सहन झालं नाही!


जे विनोद पंधरा-वीस किंवा अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत सहज चालून जात होते ते आता आऊटडेटेड झालेत याची तुम्हाला बहुदा जाणीव झाली नसावी आणि कोणी ती तुम्हाला करून देण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तुम्ही त्या बाबतीत कोणाचं ऐकलं असतं  असं वाटत नाही. असो. मात्र या काळात तुमचं आधीचं लिखाण कुठे दिसलो दिसलं तर मात्र मी नक्की वाचायचो, कारण तुमच्या लेखणीवरचं माझं प्रेम आटलं नव्हतं. कोणत्याही लेखकासाठी हेवा वाटावी अशी गोष्ट म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत लिहित राहिलात. मी नाही तरी अनेकजण तुमचं नक्की वाचत असणार. पण बहुदा ‘कुणी वाचतय की नाही’ या विचारापलीकडे तुम्ही गेला असावात. श्वास जितका आपसूक घेतला जातो तितके नकळत किंवा निव्वळ muscle memroy च्या जोरावर तुमचा हात लिहित असावा. एकटेपणाच्या भावना कायम तीव्र असणाऱ्या व्यक्तीला लेखणीशिवाय दुसऱ्या कुणाचाही आधार न वाटणे क्लेशकारक असले तरी पण स्वाभाविकच. 


लोकप्रभा आणि लोकसत्ता या हक्काच्या व्यासपीठांवरचं तुमचं लिखाण थांबलं, पण ‘सामना’मध्ये तुम्ही शेवटपर्यंत ‘मनमुराद’ (शब्दशः -  कारण ते तुमच्या सदराचं नाव होतं ) लिहीत राहिलात. पण ते प्रौढ वाचकांपुरतं मर्यादित राहिलं. सोशल मिडीयावर असतात, तर धुरळा उडवला असतात, तुमची शैली आजच्या सोशल मिडीयाच्या काळासाठी अगदी परफेक्ट होती : तत्पर, चुरचुरीत, नॉस्टाल्जिक आणि वादग्रस्त! केवळ एका ठिणगीची वाट पाहणाऱ्या अशांत आत्म्यांना फुलटॉस देणारी!)


** 


लता आणि दिलीपकुमार हे तुमचे हळवे कोपरे. त्यांच्याबद्दल लिहिताना जणू तुमची लेखणीवर कळ्या उमल्याचा भास व्हायचा. ते दोघेही पाठोपाठ गेल्यानंतर या जगात राम उरला नसल्याच्या भावनेने तुम्हीही इथून निघून गेला असावात, असं मला जेन्युईनली वाटतं. परवा आशाबाई गेल्या, तेव्हा त्यांची आठवण काढायला तुम्ही नव्हतात. पण त्यांची आठवण काढताना मात्र मला तुम्हीच आठवलात. तुम्ही ‘पुन्हा यादोंकी बारात’ मध्ये लिहिलंय : 


"मी कायम 'ऑलसो रॅन' राहिले हो ..." अलीकडे आशा मला विषादाने म्हणाली.

"छे, 'ऑलसो रॅन' नाही, रनर्स अप म्हणायचं" मी पुटपुटलो.


वाचकाला त्याच्या सुखदुःखाच्या वेळी तुमचं लिखाण आठवावं, यापेक्षा लेखकांचं भाग्य दुसरं कुठलं असू शकतं ?


***


ता. क : तुमच्या शिवाजी पार्कच्या अजरामर कट्टा gang ने तुमच्या निवडक लेखांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम सुरू केला आहे. संजय मोने, प्रसाद फणसे, उदय सबनीस, अजित भुरे मिळून बहारदार अनुभव देतात - आणि तुमचा कट्टा कसा असेल याचा ट्रेलर बघायला मिळतो. जूनमध्ये तुमच्या वाढदिवशी पुण्यात बहारदार प्रयोग झाला, हाऊसफुल होता! तुमच्या वडिलांवरचा एखादा लेख मात्र त्यात badly missing होता. बाय द वे, तुमच्या  वडिलांनी प्रयोग पाहिला असता तर म्हणाले असते, “मिस्टर शिरीष, तुम्ही कधी कंटाळवाणं लिहिलं नाही, आणि तुमची कट्टा gang सुद्धा ते कंटाळवाणं सादर करत नाही!”


(पूर्वप्रसिद्धी : फेसबुक, २५ जुलै २०२६)

No comments:

Post a Comment