Total Pageviews

Thursday, June 18, 2026

ज्ञानयोगिनी स्वर्गीय कुसुमताई साठे

 


एकाहून अधिक कामांमध्ये एकाच वेळी लक्ष द्यायचं म्हटलं तरी सामान्य व्यक्तीची तारांबळ उडते. म्हणूनच एकाच वेळी अनेक क्षेत्रांवर आपली अमीट मोहोर उमटवणाऱ्या व्यक्ती समाजात दिसतात, तेव्हा अचंबित व्हायला होतं. त्यातूनही असं कर्तृत्व गाजवणारी व्यक्ती स्त्री असेल तर तिने किती आव्हांनाना तोंड दिलं याची कल्पनाच केलेली बरी. कुसुमताई साठे या अशाच कर्तृत्ववान विदुषी. विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी ठसा उमटवला असला तरी 'राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या' ही त्यांची मुख्य ओळख. 'ज्ञानयोगिनी स्वर्गीय कुसुमताई साठे' या चरित्राच्या माध्यमातून कुसुमताईंच्या कार्याच्या अनेक पैलूंची ओळख देण्याचे कार्य डॉ. छाया नाईक यांनी केले आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाने प्रभावित झालेल्या वंदनीय मावशी केळकर यांनी स्त्रियांसाठीही तशाच संघटनेची आवश्यकता असल्याचे डॉ. हेडगेवारांना पटवून देत १९३० च्या दशकामध्ये राष्ट्र सेवा समितीची स्थापना केली. एकीकडे स्वसंरक्षणाच्या दृष्टीने शारीरिक कौशल्य अंगी बाणवणे आणि दुसरीकडे बौद्धिक मशागत करणे ही संघा प्रमाणेच समितीचीदेखील कार्यपद्धती. यापैकी बौद्धिक कार्यक्षेत्राचे दायित्व कुसुमताईंनी तब्बल चाळीस वर्षं निभावले. राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी केळकर यांच्या छत्रछायेमध्ये कुसुमतांईंच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत गेले आणि पुढे त्यांच्या तेजाने राष्ट्र सेविका समिती अधिक उजळून निघाली. 


नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयात विज्ञान, हिंदी, मराठी या विषयांचे अध्यापन, समितीचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुखपद, समितीच्या केरळ प्रांताचे पालकत्व, समितीच्या 'राष्ट्रसेविका' या मुखपत्राचे संपादकपद, चार पुस्तकांचे लेखन, अनेक व्याख्यानं, रामकथा आणि भागवतकथाकथन, कथा,कविता,समीक्षा,स्फुट अशा साहित्याच्या विविध प्रांतात संचार हे सगळं कुसुमताईंनी आपल्या आयुष्यात पेललं. याशिवाय समितीसाठी असंख्य पद्यांची रचनाही केली. संघ आणि समितीमध्ये कवी अथवा कवयित्रीचं नाव व्हावं म्हणून नव्हे तर राष्ट्रभावना चेतवण्यासाठी पद्यं रचली जातात. म्हणूनच त्या काव्यामागचे रचनाकार कायमच पडद्यामागे राहतात. त्यामुळे कुसुमताईंनी रचलेल्या पद्यांची/रचनांची निश्चित संख्या आजही ज्ञात नाही. पण त्यापैकी किमान काही ज्ञात रचना डॉ. छाया नाईक यांनी या पुस्तकात समाविष्ट केल्याने एक महत्वाची नोंद झाली आहे. 


समितीसाठी कुसुमताईंची सर्वात मोठी देणगी म्हणजे समितीची संस्कृत प्रार्थना! जोवर समिती अस्तित्वात आहे, तोवर कुसुमताईंचे शब्द समितीच्या शाखास्थानावर म्हटले जाणार आहेत. प्रार्थनारूपाने कुसुमताई अमर झाल्या आहेत. याशिवाय समितीमध्ये जे प्रात:स्मरण म्हटले जाते त्याची रचनाही त्यांचीच आहे हे लक्षात घेतली की, समितीच्या कार्यामध्ये त्यांचे काय स्थान आहे याची कल्पना येईल. 


संघ आणि समितीच्या कार्यकर्त्यांचे चरित्र लिहिताना येणारी महत्वाची अडचण म्हणजे चरित्रनायक अथवा चरित्रनायिकेच्या सामाजिक आयुष्याचे तपशील गोळा करणे आणि त्यांची संगतवार मांडणी करणे. कारण हे कार्यकर्ते दुधात साखर विरघळावी तसे संघटनेशी एकरूप होऊन गेलेले असतात. त्यांनी स्वतः 'आपण हे केलं' असं ना कुठे लिहून ठेवलेलं असतं, ना कुठे त्यांचं नाव दिलं गेलेलं असतं, ना त्यांच्याबद्दल वर्तमानपात्रात काही छापून आलेलं असतं. त्यामुळे बहुतांश वेळा चरित्रलेखनाची भिस्त त्या कार्यकर्त्यांचा सहवास लाभलेल्या (आणि अनेकदा त्या कार्यकर्त्यापेक्षा वयाने लहान असलेल्या) अन्य कार्यकर्त्यांच्या आठवणींवर असते आणि त्या घटना, अनुभव हे कालानुक्रमामध्ये निश्चितपणे कुठे बसवता येतील याचा अंदाज चरित्रकाराला येणं कठीण होऊन बसतं. प्रस्तुत चरित्रामध्येही तशी अडचण आलेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच की काय, पुस्तकाच्या पूर्वार्धात कालानुक्रमानुसार येणाऱ्या घटनांमध्ये प्रामख्याने वैयक्तिक आयुष्याचे तपशील अधिक आले आहेत. परंतु पुस्तकाच्या उत्तरार्धातील प्रकरणांमधून मात्र कुसुमताईंच्या बौद्धिक प्रमुख, संपादक, लेखिका अशा एकेका पैलूची स्वतंत्रपणे दखल घेतली आहे. 


पुस्तकांच्या शेवटी कुसुमताईंचा जीवनपट दिला आहे, त्यातून बुद्धिमत्तेचा आणि एकूण आवाका यावा. 


*शिक्षण* 

१९३५ : मॅट्रिक 

कर्वे विद्यापीठात संस्कृतमध्ये प्रथम, गृहितागमा ही बीएची समकक्ष पदवी. 

१९३८ : मराठी आणि संस्कृत विषयात विद्यापीठात सर्वप्रथम 

१९४२ : संस्कृतशास्त्री ही पदवी 

१९४३ : हिंदी कोविद परीक्षा उत्तीर्ण

१९५८ : बीटी पदवी

१९६० : मराठीमध्ये एम. ए.


*अध्यापन* 

१९३८ ते १९४९ : शाळेमध्ये शिक्षिका

१९६० - १९८१ : महाविद्यालयात प्राध्यापिका 


*राष्ट्रसेविका समितीचे कार्य*

१९३७ : नागपूरला महाल भागात राष्ट्रसेविका समितीची शाखा सुरू केली. 

१९५०-१९९१ : राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय बौद्धिक कार्यवाहिका

१९७८-१९९० : राष्ट्र सेविका समितीच्या केरळ प्रांत पालक


१९५३-१९८५ : सेविका आणि राष्ट्रसेविका या अंकांचं संपादन 

१९५३-१९९१ : सेविका प्रकाशनाच्या अध्यक्षा


*साहित्य*

१९७० : कथारूप स्वामी विवेकानंद 

१९८७ : कथाकामधेनू 

१९८८ : धर्मसंस्थापनेचे नर

१९९१ : दिग्विजयी रघुवंश

१९८५-१९९१ : महिला निकेतन अध्यक्षा


हे चरित्र वाचत असताना कुसुमताईंनी वेळेचं नियोजन कसं केलं असेल असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. बरं, सामाजिक कार्य करत असतानाच संसारी स्त्री या नात्याने आला-गेला, पै-पाहुणा, सणवार, अपत्यांची दुखणीखुपणी आणि अन्य सर्व सांसारिक जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्याच. शिवाय समितीच्या कामासाठी देशभर प्रवासही ओघाने आलाच. हे सगळं सांभाळणं म्हणजे एखाद्या तपश्चर्येपेक्षा कमी नाही.

 

१९९१ साली स्वर्गस्थ झालेल्या कुसुमताईंचं चरित्र खरंतर यापूर्वीच यायला हवं होतं. श्री. राम नाईक यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेतही हीच भावना व्यक्त केली आहे. अर्थात २०२१ साली कुसुमताईंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हे चरित्र साकार झाले हेही नसे थोडके. कुसुमताईंचा दीर्घ सहवास लाभलेल्या डॉ. छाया नाईक यांनी कुसुमताईंशी वेळोवेळी झालेल्या चर्चा, कुसुमताईंचं साहित्य, बौद्धिकं आणि व्याख्यानं, कार्यकर्त्यांनी आणि कुसुमताईंच्या कुटुंबीयांनी सांगितलेल्या आठवणी इत्यादी माहितीच्या आधारे परिश्रमपूर्वक चरित्र लिहून महत्वाचं दस्तावेजीकरण केलं आहे. या चरित्राच्या निमित्ताने स्त्रियांमध्ये राष्ट्राभिमानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या एका कर्तृत्ववान स्त्रीची ओळख वाचकांना होण्यास निश्चित मदत होईल. 

पूर्वप्रसिद्धी : मुंबई तरुण भारत, ३ मे २०२६



ज्ञानयोगिनी स्वर्गीय कुसुमताई साठे

लेखिका : डॉ. छाया नाईक 

प्रकाशन : भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन

पृष्ठसंख्या : २४० 

मूल्य : २७५ रू. 


(हे पुस्तक 'स्टोरीटेल'वर ऑडिओ स्वरूपातदेखील उपलब्ध असून सविता म्हसकर यांनी अतिशय उत्तम अभिवाचन केलं आहे)


No comments:

Post a Comment