काही उत्साही तरुणांचं एक मंडळ होतं. त्याचं नाव ‘शिवराय मंडळ’. त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळी, साहसी कामगिरी कल्पना आली. त्यांनी तळेगावला जाऊन गो. नी. दांडेकरांची भेट घेतली. गोनीदा खुश झाले आणि शिवराय मंडळाच्या एका महत्वाकांक्षी मोहिमेचे नेतृत्व करण्यास होकार दिला. ही मोहीम होती अवघ्या दहा दिवसांमध्ये दहा किल्ले सर करण्याची. बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १७ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी १९६४ दरम्यान पार पडलेल्या या अनोख्या मोहिमेच्या आठवणींमधून साकार झालेले छोटेखानी पुस्तक म्हणजे ‘दहा दुर्ग दहा दिवस’
मोहिमेची कुणकुण लागल्यावर पन्नासेक जण उत्साहाने तयार झाले. परंतु आपल्या चमू मधला प्रत्येक भिडू गोनीदांनी स्वत: निवडला आणि मोहिमेसाठी २३ जणांची निश्चिती झाली. विशेष म्हणजे या मोहिमेमध्ये सामील असणारी एकमेव मुलगी कुंदा चाफेकर केवळ पंधरा वर्षांची होती. ही मोहीम पार पडल्यावर या मोहिमेतील एक सदस्य वसंत पेंढारकर यांनी ‘स्नेहसुगंध’ नावाचं हस्तलिखित काढलं होतं. या मोहिमेची तरुण भारत, नवाकाळ, मराठा, लोकसत्ता या वृत्तपत्रांनी दखल घेतली होती. त्यांची कात्रणेदेखील ‘स्नेहसुगंध’ या अंकामध्ये छापली गेली. ‘स्नेहसुगंध’ काही लेख, गोनीदांनी या मोहिमेवर अन्यत्र लिहिलेला दीर्घ लेख, दहा दुर्गांची छायाचित्रासह थोडक्यात माहिती, बाबासाहेब पुरंदरे यांचे एकेक पानी दोन लेख यांनी मिळून ‘दहा दुर्ग दहा दिवस’ तयार झालं आहे.
मोहिमेचा क्रम राजमाची, विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना, सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा आणि शेवटी दुर्गदुर्गेश्वर रायगड असा होता. सुरुवात लोणावळा स्थानकापासून झाली. तिथे मोहिमेला निरोप द्यायला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते. त्यानंतर दहा दिवस मजल दरमजल करत अंगावरचे ओझं वागवत सह्याद्रीच्या दुर्गम रानवाटा मधून माग काढत एकेक गड या मंडळाच्या सदस्याने सर केला.
२० फेब्रुवारी रोजी पाच किल्ले संपवून सर्व भटके पुणे मुक्कामी नूमवि प्रशालेमध्ये पोहोचले. तिथे त्यांची खबरबात घ्यायला बाबासाहेब पुरंदरे हजर झाले. विशेष म्हणजे रात्री आठ वाजता आणि पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार आणि काही प्रतिष्ठित मंडळी देखील तिथे उपस्थित राहिली. पोतदार यांनी तरुणांना प्रोत्साहनपर बोलणे केले आणि चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आणखीन हुरूप आलेल्या मंडळाने दुसऱ्या दिवशी सिंहगडाकडे कूच केले. त्यावेळी सिंहगडावर इतिहासकालीन नाणी आणि तोफ गोळ्यांचे अवशेष गोनीदांना मिळाले. इतक्या स्वराज्याच्या अस्तानंतर इतक्या वर्षांनी ही सिंहगडावर इतक्या सहजपणे प्राचीन दस्तावेज मिळणे ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट होती.
गोनीदांनाचे अत्यंत काटेकोर नियोजन आणि शिस्तीमुळे कोणताही अनवस्था प्रसंग न उद्भवता मोहीम अगदी सुखरूप पणे पार पडली. गोनीदा म्हणजे उभा सह्याद्रीच नव्हे तर आडवा महाराष्ट्रदेखील पायाखाली असणारा भटक्यायचं. या मोहिमेपूर्वी यातील प्रत्येक गडावर कैक वेळा कोणी त्यांची चक्कर झालेली असल्यामुळे त्यांना चढण्याउतरण्यासाठी एकूण लागणारा वेळ, त्यासाठी पडणारे कष्ट, गडांवर पोहोचण्यासाठी असलेल्या सुलभ वाटा या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे होती. त्यादहा दिवसांची ही साहसी मोहिम फत्ते झाली. ५० वर्षांपूर्वी खाण्यापिण्याच्या, दळणवळणाच्या सोयी मर्यादित असताना २३ जणांनी पार पाडलेली ही कामगिरी भन्नाटच म्हणायला हवी.
नुकतीच झालेल्या शस्त्रक्रियेमुळे तब्येत धडधाकट नसतानाही या सर्व शिलेदारांचे कौतुक करायला दहाव्या दिवशी रायगडावर बाबासाहेब पुरंदरे जातीने हजर झाले! बाबासाहेबांबरोबर रायगड फिरताना संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहण्याचं भाग्य सर्वांना लाभलं.
या पुस्तकामधून घडणारं डोंगरदऱ्या-देवळारहाळामध्ये भेटलेल्या साध्याभोळ्या, प्रेमळ, नि:स्वार्थी माणसांचं दर्शन अतिशय लोभस आहे. दोन वेगवेगळ्या गडांवर भेटलेल्या इमानी दोन कुत्र्यांचं शब्दचित्र चटका लावून जातं.. गोनीदांच्या रसाळवेल्हाळ शैलीमधला मोहिमवृत्तांत म्हणजे पुस्तकातील सर्वात हवाहवासा भाग आहे.
आपल्या चमूला बाबासाहेबांच्या ताब्यात देऊन गोनीदा एकटेच रायगडाच्या सांदीसपाटीत भटकू लागले आणि त्यामध्ये त्यांना एक अपूर्व गोष्ट गवसली... एक वृंदावन! आपल्या पुढ्यात उभ्या असलेल्या शक्यतेमुळे गोनीदा थरारून उठले. आपल्याला जे सापडले आहे त्याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांकडे धाव घेतली.
पुढे जे घडले त्याबद्दल गोनीदा लिहितात “वृंदावनाजवळ पोंचतांक्षणीं त्यांचे तेजस्वी डोळे क्षणभर विस्मयचकित होतात. मग इतिहासाने पांघुलेला पोलादी पडदा उघडून ते डोळे पल्याड शिरतात. भरून येऊन बाबासाहेब मजजवळ येतात. म्हणतात, “आप्पा हा तुमच्या दुर्गदर्शन यात्रेचा कळस! हें सर्वोत्कृष्ट यश. महाराजांच्या एक पत्नी काशीबाईसाहेब राज्याभिषेकापूर्वी दोन महिने वारल्या. महाराजांचं त्यांच्यावर उत्कट प्रेम. बहुदा हें वृंदावन त्यांचं!” शिवशाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांचे हे शब्द. याहून अधिक आगळं मिळवण्याजोगं कांहीं राहिलं नाही. ही यात्रावेली अशी फळींफुलीं वोळली आहे!”
या मोहिमेची सांगता एका अविस्मरणीय गोष्टीने झाली. त्याबद्दल अविनाश पाटील लिहितात,
“दुपार झाली. जेवून विश्रांती. अन् त्यानंतर अद्भुत घडणार होतं...! जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथल्या चौथऱ्याजवळ उभं राहून तो त्याकाळी झालेला सोहोळा बाबासाहेबांनी साकार उभा केला. आपल्या वाणीने! किती वेळ हे चाललं? तब्बल साडेतीन-चार तास! आमच्यातल्या प्रत्येकाचे जीवनातले हे चार तास म्हणजे एक सोनेरी स्वप्न आहे. अविस्मरणीय. आजही कधी आठवलं की, अंगावर काटा येतो. हळुवार!”
दुर्गमोहिम गोनीदांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोहिमेची सांगता बाबासाहेबांच्या मुखातून येणाऱ्या शिवराज्याभिषेकाच्या समालोचनाने... आयुष्यात याहून मोठं भाग्य कुठलं असू शकतं!
संपादक : विजय देव
प्रकाशक : गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ
प्रथम आवृत्ती : १४ फेब्रुवारी २००९
मूल्य : ७५ रुपये

१० दिवसांत १० किल्ल्यांना भेट देण्याचा हा नाविन्यपूर्ण आणि धाडसी प्रवास खरंच थक्क करणारा आहे.
ReplyDeleteजिद्द, नियोजन आणि साहसाचं अप्रतिम उदाहरण!