Total Pageviews

Saturday, June 12, 2021

शंभर धागे दुःखाचे...

 


'The grass is always greener on the other side of the fence' असा इंग्रजीमध्ये वाक्प्रचार आहे. लोकांना दुसऱ्याचं आयुष्य आपल्यापेक्षा सुखाचं आणि सोपं आहे असं नेहमी वाटत असतं. स्वतःसमोर छोट्याछोट्या समस्या असल्या तरी 'नेमकं आपल्याच वाट्याला हे का आलं' याबद्दल उसासे टाकले जात असतात. पण यातल्या असंख्य लोकांना खरंतर टोकाचं दुःख, वेदना कधीही अनुभवाला आलेलं नसतं. पण आपल्या नजरेपलीकडेही पराकोटीचं यातनामय जग आहे याची कल्पनाच नसल्याने आपल्या अडचणींचा राईचा पर्वत केला जात असतो. कधीतरी या जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर प्रकाश पडतो आणि त्यांच्या दर्शनाने आपल्याला आपली दु:खं, अडचणी :कश्चित वाटू लागतात. A River In Darkness हे पुस्तक उत्तर कोरियन हुकूमशाहीच्या वरवंट्याखाली सापडलेल्या अशा भयप्रद जीवनावर प्रकाश टाकतं आणि विलक्षण अस्वस्थ करून जातं. 

 

जपानमधला कठीण काळ

पुस्तकाचा लेखक मसाजी इशिकावाचे वडील मूळचे कोरियन. जपानी शासनाने मजूर म्हणून अनेक कोरियन लोकांना जबरदस्तीने जपानमध्ये आणलं त्यांपैकीच तेही एक होते. आधीच कुटुंबाचं आयुष्य कष्टप्रद. त्यात वडिलांचं दारू पिऊन बायकोला मारझोड करणं, कुटुंबाच्या स्थैर्यासाठी कोणतेही प्रयत्न करणं, गुंडगिरी आणि काळाबाजार यांमध्ये गुंतणं यामुळे कुटुंबाची परिस्थिती बिकट होत गेली. मसाजीची आई चांगली पत असणाऱ्या जपानी कुटुंबातून आलेली. पण आश्चर्य म्हणजे मसाजीच्या वडिलांसारख्या सर्वार्थाने विसंगत असणाऱ्या बेजबाबदार माणसाशी तिचं सूत जमलं. पण तिचा हा निर्णय तिला आयुष्यभर भोगावा लागला. एके दिवशी वडिलांच्या मारहाणीचा एवढा अतिरेक झाला की आई कसाबसा जीव वाचवून पळाली. लहानपणापासून हे सगळं बघत असणाऱ्या मसाजीच्या मनात वडिलांविषयी घृणा निर्माण झाली नसती तरच नवल.

पण पुढे अचानक नवल घडलं. आई घरी परतली. एकेकाळचे कर्दनकाळ वडील आईला हात लावेनासे झाले. अचानक एके दिवशी वडिलांनी "आपल्याला उत्तर कोरियामध्ये परत जायचं आहे" असं सांगून मसाजीच्या आईचंही मन वळवायला सुरुवात केली. वडील वगळता सर्वजण जन्माने जपानीच होते. जपानमधलं आयुष्य कितीही कष्टाचं असलं तरी जपान हेच त्यांचं सर्वस्व होतं. सुरुवातीच्या अनिच्छेनंतर मसाजीची आईसुद्धा उत्तर कोरियात जायला तयार झाली आणि मग कुटुंबातल्या लहानग्यांच्या इच्छेला काही किंमत उरली नाही. हजारोंच्या संख्येने जपानमधले कोरियन एक नवी उमेद घेऊन उत्तर कोरियाकडे निघाले होते. 'किम इल संग' हा नव्याने जन्माला आलेल्या उत्तर कोरियाचा राष्ट्रप्रमुख त्यांना 'पृथ्वीवरच्या स्वर्गा'च्या उभारणीसाठी भावनिक साद घालत होता. उत्तर कोरियाची राजवट साम्यवादी होती. जपानमधल्या कोरियन लोकांची कामगार संघटना पूर्वीपासून कोरियातल्या साम्यवादी नेत्यांशी जोडलेली होती. याच संघटनेच्या लोकांनी जपानमध्ये राहणाऱ्या कोरियन लोकांना गुलाबी स्वप्नं दाखवून उत्तर कोरियात जाण्यासाठी राजी करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मसाजीचे वडील या संघटनेचे सदस्य पूर्वीपासून होतेच, त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांना राजी करायला फार कष्ट पडले नाहीत.

 

आगीतून फुफाट्यात

साम्यवादाची कागदावरची तत्त्वं कुणालाही भुरळ पाडतील अशीच असली तरी त्यांची अंमलबजावणी होताना जगभर हुकूमशहा कसे प्रस्थापित झाले हे आता सर्वज्ञात आहे. जपानमधलं आयुष्य चैनीचं वाटावं इतकी भयावह परिस्थिती उत्तर कोरियामध्ये होती. तिथे पाय ठेवल्यापासूनच मसाजीच्या कुटुंबाच्या इच्छा-आकांक्षांचा चुराडा व्हायला सुरुवात झाली. राष्ट्रप्रमुख किम इल-संग प्रचंड निष्ठुर असल्याचं दिसू लागलं. साम्यवादी तत्वं माणसाच्या जीवापेक्षा महत्वाच्या ठरू लागली. प्रत्येक गावाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत गुप्तपोलिसांचा पहारा सुरु झाला. सरकारने आखून दिलेल्या  मार्गावरून थोडंही ढळलं तरी जीव गमवावे लागू लागले. त्याचवेळी समाजजीवनाच्या प्रत्येक अंगातून किम इल-संग ओसंडून वाहात राहिल अशी योजना झाली. अभ्यासक्रमातल्या प्रत्येक धड्यातून, त्याचा पक्ष असणाऱ्या 'वर्कर्स पार्टी'च्या प्रत्येक बैठक आणि सभेतून, प्रत्येक सरकारी योजनेमधून तो जणू देवदूतच आहे असं भासवायला सुरुवात झाली. शेतीसह सर्व महत्वाच्या उद्योगांचं सरकारीकरण झालं. प्रत्येकाची नोकरी सरकारी देखरेखीखाली होऊ लागली. राबराब राबूनही तुटपुंजे पैसे मिळत राहिले. 'संपत्तीचे समान वाटप' या कम्युनिस्टांच्या लाडक्या योजनेची परिणती 'सर्वजण समान गरीब' या वास्तवात झाली.

 

वातावरण, जमिनीचा पोत यांपैकी कशाचाही अभ्यास करता देशभर सर्वत्र भात पिकवण्याची फर्मानं निघाली. ही अत्यंत अशास्त्रीय शेती 'अत्याधुनिक उत्तर कोरियन शेती' आहे असं सांगितलं जाऊ लागलं. वर्षानुवर्षं लोटली तरी कृषिउत्पादन वाढले नाही. खाऊनपिऊन सुखी राहणं दूरच, एकवेळ पोट भरेल एवढंही अन्न रेशनवर कुणाला मिळालं नाही. नव्वदच्या दशकात या सगळ्याचा कडेलोट झाला. रस्तोरस्ती माणसं मरून पडू लागली. उत्तर कोरियातली भीषण टंचाई संपूर्ण जगात चर्चिली गेली. पन्नासच्या दशकात दाखवल्या गेलेल्या एका उज्ज्वल स्वप्नाची राखरांगोळी झाली होती. मिळतील ती कंदमुळं आणि बिया खाल्ल्याने अन्नान्नदशा झालेल्या मसाजीला कळून चुकलं होतं की आत्ता उत्तर कोरियातून पळालो नाही तर नाहीतर मरण अटळ आहे. आपण देशाबाहेर पळून जायचं आणि जपानमधून काहीतरी करून प्रयत्न करून आपल्या बायकामुलांनाही सोडवायचं अशी आशा उराशी बाळगून त्याने एका अंधाऱ्या रात्री रोरावत वाहणाऱ्यायालूनदीमध्ये स्वतःला झोकून दिलं. एक अगतिक साहस करून तो बाहेर निसटला खरा पण पुढे तो त्याच्या कुटुंबाला सोडवू शकला का, हे जाणण्यासाठी पुस्तकच वाचायला हवं.

 

चटका लावणारे अनुभव

उण्यापुऱ्या दीडशे पानांचं हे पुस्तक अक्षरशः हादरवून सोडतं. आपल्या कचकड्याच्या दुःखांचंही आपण भांडवल करतो ते किती व्यर्थ आहे याची पुस्तकाच्या पानापानावरचे सुकलेले अश्रू बघताना बोचरी जाणीव होत राहते. असं म्हणतात की एका दुःखी माणसालाच दुसऱ्या दुःखी माणसाचं दुःख कळतं. पण मसाजीने लिहिलेले आपले विदारक अनुभव या गृहितकाला तडा देतात. खरंतर संपूर्ण उत्तर कोरियात मूठभर उच्चपदस्थ आणि त्यांची हुजरेगिरी करून आपलं उखळ पांढरं करून घेणारे मोजके लोक वगळता सगळ्यांची परिस्थिती सारखीच हलाखीची होती. पण समदुःखी लोकांसोबत आपलं दुःख वाटून आपले कष्ट सुसह्य करण्याची वृत्ती कुणीही दाखवली नाही. उत्तर कोरियात नवख्या असणाऱ्या कुटुंबाला ना कुणी धीर द्यायला पुढे आलं ना मदत करायला. सगळी वाताहत होत असताना, माणसं माणसाला पारखी होत असताना मसाजीच्या कुटुंबात मात्र शेवटपर्यंत टिकून राहिलेल्या बंधांबद्दल त्याने अतिशय ओलाव्याने लिहिलं आहे. जपानमध्ये असल्यापासून उत्तर कोरियामध्ये खंगून मरेपर्यंत मुलांसाठी अपरिमित हाल सोसणाऱ्या आईचं मसाजीशी असणारं नातं आणि पूर्वीच्या पशुत्वाकडून हळूहळू मवाळ होत गेलेल्या पश्चात्तापदग्ध वडिलांचं मसाजीसोबत उत्तरोत्तर बदलत गेलेलं नातं अशी वेगवेगळ्या आलेखांवरची नाती हृद्यपणे रेखाटली आहेत.. 

 

वैयक्तिक अनुभवांबरोबरच हालअपेष्टांना कारणीभूत असणारी उत्तर कोरियन नेतृत्वशैली आणि त्यांनी राबवलेल्या अव्यावहारिक योजना त्यांचे परिणाम यांबद्दल डोळस निरीक्षणं मांडली आहेत. मसाजी केवळ उत्तर कोरियन नेतृत्वाचं पशुत्व दाखवून थांबत नाही. स्वतः जन्माने जपानी असूनही तो असंवेदशील जपानच्या पापाचं माप जपानच्या झोळीत टाकतो. एकेकाळी कोरियावर राज्य करणाऱ्या, तिथून कोरियन लोकांना बळजबरीने मजुरीसाठी आणूनही सापत्नभावाने वागणाऱ्या आणि कालांतराने त्यांचा असंतोष वाढत जात असल्याची जाणीव झाल्याने 'ही ब्याद परत कोरियात गेलेली बरी' या भावनेने घाईघाईने त्या सर्व कोरियन लोकांना नव्याने उभ्या राहणाऱ्या उत्तर कोरियामध्ये धाडून देण्यासाठी त्या देशाच्या नेतृत्वाशी सोयीची हातमिळवणी करणाऱ्या जपानच्या स्वार्थी वृत्तीवर मसाजी परखड भाष्य करतो. या सर्व गोष्टींमुळे हे पुस्तक म्हणजे केवळ दुःखांचा पाढा नसून हे एक प्रगल्भ अनुभवकथन आहे याची जाणीव होते.

 

जागतिक साहित्यामध्ये साहसकथा/पलायनकथा स्वतःचं छोटंसं स्थान राखून आहेत. पण या पुस्तकातलं पलायन त्या कथांच्या साच्यात मोडत नाही. यातलं पलायन हा एका विदीर्ण चित्राचा अगदी छोटा भाग आहे. एका मोठ्ठ्या बंदिशाळेचं हे हेलावून टाकणारं शब्दचित्र, नकळतपणे आपलाही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लावतं, आयुष्यालाच गृहित धरण्याच्या सवयीकडे पुन्हा एकदा वळून बघायला लावतं.


टीप  : २९ मे २०२१ रोजी 'साप्ताहिक सकाळ'मध्ये प्रकाशित झालेल्या संपादित लेखाचे हे मूळ विस्तृत रूप आहे.

साप्ताहिक सकाळमधला संपादित लेख इथे वाचता येईल : 

http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-%C2%A0prasad-phatak-marathi-article-5460


Thursday, April 29, 2021

'The First Indian' : पहिली पृथ्वीप्रदक्षिणा!


सागरप्रवास हा माणसाच्या स्थलांतराच्या इतिहासातला खूप महत्वाचा टप्पा. मध्ययुगीन कालखंडात सत्तेच्या, पैशाच्या महत्वाकांक्षेतून आणि साहसाच्या खुमखुमीतून युरोपियन देशांमध्ये आरमार उभे करून सातासमुद्रापार जायची आणि नवनवे प्रदेश पादाक्रांत करायची स्पर्धाच लागली होती. शिडाची नाव/जहाज हा अशा प्रवासांचा कणा असे. वेळ, दिवस, ऋतू यानुसार रंग बदलणाऱ्या वाऱ्यांच्या साहाय्याने प्रतिकूल हवामानाला तोंड देत या दर्यावर्द्यांनी अत्यंत बेभरवशाचे सागरप्रवास पार पाडले. पुढे दळणवळणाची, संपर्काची साधनं प्रगत होत गेली आणि सागरप्रवास सुकर होत गेला, तरीही शिडाच्या नावेतून सागरप्रवास करण्याचं आकर्षण काही कमी झालं नाही. अशा नावेतून थेट पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचं धाडस ही त्याचीच परिणती. फर्डिनांड मॅगेलन आणि ख्रिस्तोफर कोलंबसच्या काळच्या आणि आजच्या शिडाच्या नावांमध्ये प्रचंड फरक असला तरी आजही समुद्र तोच आहे, हवामान तितकंच बेभरवशाचं आहे. तुमच्या हाताशी नानाविध साधनं असली तरी उधाणलेल्या समुद्रावर स्वार होऊन पुढे जाण्यासाठी आजही तितकंच कौशल्य आवश्यक आहे. यामुळेच एकविसाव्या शतकातही असं धाडस कुणी करायला गेलं तर त्याचं जगाला अप्रूप वाटतंच. दिलीप दोंदे यांनी हे धाडस केलं आणि शिडाच्या नावेतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिलेच भारतीय ठरले! त्यांच्या कामगिरीची रोचक कहाणी म्हणजे म्हणजेच त्यांनी लिहिलेलं पुस्तक 'The First Indian'.

या विलक्षण कामगिरीची सुरुवात होण्यामागे प्रेरणा होती ती व्हाईस ॲडमिरल मनोहर आवटी यांची. 'भारतीय व्यक्तीची शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा' हे त्यांनी उराशी बाळगलेलं स्वप्न होतं, ते भारतीय नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे यांनी साकार केलं. दिलीप दोंदे यांना आपल्या कामाचा भाग म्हणून नौदलाच्या बोटीवर काम करण्याचा अनुभव होता, परंतु याट (Yacht) मधून नौकाविहार करण्याचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता, तरीही त्यांनी आव्हान स्वीकारलं.

मोहिमेचे तीन टप्पे

या प्रकल्पासाठी दोंदे यांना नौदलाच्या परवानगीपासून अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागली आणि भारतीय नोकरशाही काय चीज आहे याची खऱ्या अर्थाने जाणीव होऊ लागली. समुद्रातल्या दिव्यातून पार पडण्यापूर्वी लालफितीच्या दिव्यातून पार पाडण्यासाठी काय काय करावे लागले याचे तपशील पुस्तकाच्या पूर्वार्धात विस्ताराने मांडले आहेत. पुस्तकाचा हा भाग अतिशय उत्तम प्रकारे जमून आलेला आहे.

'आपल्या देशातच बनलेली नौका या प्रवासासाठी वापरली जावी' असा नौदलाचा आग्रह होता. पृथ्वीप्रदक्षिणेच्या या मोहिमेत एक खूप मोठं आव्हान होतं ते म्हणजे नौकाबांधणीचं. भारतात हौशी नौकानयन हा प्रकार मुळातच इतका कमी आहे, की स्वाभाविकपणे त्यासाठी लागणाऱ्या नौकेच्या बांधणीबद्दलही अतिशय थोडी माहिती भारतातल्या कंपन्यांना आहे. अशा परिस्थितीत गोव्याच्या नौकाबांधणी कंपनीचे प्रमुख श्री. रत्नाकर यांनी स्वतःदेखील नौकाबांधणीच्या या संधीकडे एक आव्हान म्हणून पाहिलं. देशविदेशांतून कच्चा माल मिळवणं, त्यामध्ये ऐनवेळी काही समस्या असल्याचे निदर्शनास आल्यावर आपले संपूर्ण व्यावसायिक ज्ञान, अनुभव यांचा वापर करून चट्कन दुसरे पर्याय शोधणं, 'डेडलाईन्स'चे संपूर्ण भान राखत सर्व अडचणींवर मात करत दिलीप दोंदे आणि रत्नाकर यांच्या समन्वयातून आकाराला येत जाणारी बोट आणि अखेर ती बोट सज्ज होऊन समुद्रात उतरणं हा प्रवास मुख्य सागरप्रवासाइतकाच खिळवून ठेवणारा आहे.

Sailing म्हणजेच नौकानयन ही अशी गोष्ट आहे की 'थियरी' कितीही व्यवस्थित असली तरी प्रत्यक्ष 'प्रॅक्टिकल' कसं पार पडेल, कुठली आव्हानं उभी राहतील याबद्दल खात्रीशीरपणे काही सांगणं अशक्य असतं. दिलीप दोंदे यांना समुद्रप्रवासातही अकल्पित संकटांचा सामना करावा लागला. कधी शिडाच्या डोलकाठीला तडा जाणे, कधी शीड फाटणे, कधी जनरेटर बंद पडणे, कधी महत्वाचा भाग तुटणे अशा गोष्टींचा त्यांना भर समुद्रात सामना करावा लागला. कधी आपल्या पूर्वानुभवांच्या, आपल्या अंतर्मनाच्या कौलाच्या जोरावर त्यांनी पटापट निर्णय घेत त्या समस्यांवर ज्या प्रकारे मात केली ते वाचून दिलीप दोंदे यांच्या कौशल्याला आणि समयसूचकतेला दाद द्यावीशी वाटते.

खुसखुशीत निवेदनशैली

दिलीप दोंदे यांचे अनुभव अनोखे असले तरी पुस्तक अतिशय वाचनीय बनवण्यास कारणीभूत ठरली आहे ती त्यांची निवेदनशैली! उपहास, कोपरखळ्या, मिश्किलपणा यांचे मिश्रण असलेली दोंदे यांची लेखनशैली पुस्तकाला कमालीचे प्रवाही बनवते. त्यांच्या सागरपरिक्रमेचे अनुभव वाचण्यासाठी उत्सुक असलेल्या वाचकाला मोहिमेच्या पूर्वतयारीला वाहिलेल्या पुस्तकाच्या पूर्वार्धात कुठेही कंटाळा येऊ न देणे हे लेखक म्हणून दोंदेंचे यश आहे. भारतासाठी पहिल्यावाहिल्या असणाऱ्या या मोहिमेसाठी परवानग्या मिळवण्यासाठी, फाईल्स पुढे सरकवण्यासाठी नौदलाचे protocol पाळत, कोरड्या आणि अज्ञानमूलक सरकारी प्रश्नांना उत्तरं देत एकट्याने धावपळ करणं; त्याचवेळी एकीकडे शिडाच्या बोटीच्या निर्मितीवर जातीने लक्ष ठेवणं आणि या सगळ्यांतून वेळ काढून शिडाची बोट चालवण्याचा सराव करणं या सगळ्या गोष्टी मोहीम सुरु होण्याआधीच थकवणाऱ्या ठरल्या. पण त्या सगळ्या रगाड्याततही दोंदे यांची विनोदबुद्धी शाबूत राहिली आणि त्यांनी आपल्या बोचऱ्या अनुभवांना खुसखुशीतपणाचे वेष्टन चढवलं ही गोष्ट विशेष म्हटली पाहिजे.

दिलीप दोंदे यांचं अनुभवकथन हसरं, खेळकर असलं तरी त्याला भावनेचं अस्तरही आहे. सागरपरिक्रमेत अचानक एक सागरी पक्षी काही दिवसांपुरता बोटीवरचा वास्तव्याला येतो तेव्हा दोंदे यांच्या बोटीवरच्या वावरामध्ये नकळत झालेले बदल, समुद्रावरच्या त्या अफाट एकांतात एका छोट्या पक्ष्याची सोबतही हवीहवीशी वाटणं,  त्या पक्ष्याची काळजी घेणं हा आपल्यासाठीही हृद्य अनुभव ठरतो. दोंदे यांचं आपल्या 'म्हादेई' या बोटीशी असणारं नातं पुस्तकात मोजक्याच शब्दांत फार छान उलगडलं आहे. दोंदे यांचं मोहिमेवर निघण्यापूर्वीपासून एकांतात 'म्हादेई'शी संवाद करणं, स्वतः मोहिमेवर एकटेच निघालेले असूनही "We entered the port", "We sailed safely" अशा उल्लेखांमधून 'म्हादेई'ला जणू एक सजीव व्यक्तिमत्व बहाल करणं या गोष्टी 'म्हादेई'चं त्यांच्या मोहिमेतलंच नव्हे तर आयुष्यातलं स्थानही अकृत्रिमपणे अधोरेखित करतं. मोहिमेतला एक महत्वाचा टप्पा ओलांडल्यामुळे अफाट कष्टांचे चीज झाल्याच्या जाणीवेने भावनांचा बांध फुटण्याच्या प्रसंगाचं दोंदे मोजक्या शब्दांत केलेलं वर्णन आपल्यालाही भावूक करून जातं.

पहिले सागरपरिक्रमावासी भारतीय म्हणून दिलीप दोंदे यांच्या अनुभवकथनाला महत्व आहेच, पण त्यांचा एकूण दृष्टिकोन आणि निवदेनशैली या पुस्तकाला  अधिक उंचीवर नेऊन ठेवतात.

*******

पुस्तक : The First Indian

लेखक : दिलीप दोंदे

प्रकाशक : Fernhurst Books Limited

पृष्ठसंख्या : ३०४

किंमत : ४९९ 

'साप्ताहिक सकाळ'च्या १ मे २०२१ अंकात प्रकाशित :

http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-prasad-phatak-marathi-article-5330