Total Pageviews

Sunday, June 26, 2022

(WH)Y

ट्रेलर लिंक


मनुष्य रानटी अवस्थेतून जसजसा समाजव्यवस्था स्वीकारत गेला तसतसं त्याच्यातलं पशुत्व कमी होत गेलं. समाजाचा भाग असल्याने माणसामध्ये हा मानवता स्वाभाविक गुण असण्याची अपेक्षा बाळगली जाऊ लागली. पण व्यथित करणारी गोष्ट ही आहे की, विशिष्ट सामाजिक धारणेचा भाग झाल्यानेच मनुष्याचं पशुत्व पुन्हा एकदा उफाळून आलं. त्या पशुत्वाला बळ मिळालं ते त्यानेच निर्माण केलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाचं. एकवीसाव्या शतकाच्या बावीसाव्या वर्षात माणसाच्या रानटीपणावर चित्रपट बनवावा लागतोय हे दुर्दैवी असलं तरी आवश्यक आहे. 


दिग्दर्शक अजित वाडीकर यांचा 'वाय' हा जबरदस्त चित्रपट आहे . मराठवाड्यामधल्या एका शहरातल्या ‘पुरूषात्तम हॉस्पिटल’मध्ये घडणारं क्रौर्य आणि त्याचा आपल्या टीमच्या सहाय्याने छडा लावणारी वैद्यकीय अधिकारी असं ‘वाय’चं एका ओळीतलं वर्णन करता येईल. यामध्ये सामाजिक समस्या थ्रिलर स्वरुपात मांडली आहे. थंड रक्ताची क्रूर माणसं कोण आहेत हे आधीपासूनच दाखवूनही आपली उत्कंठा अजिबात कमी होत नाही, याचं कारण म्हणजे याची मांडणी. मराठीतला पहिलाच ‘हायपर लिंक चित्रपट’ अशी याची जाहिरात केलेली आहे. म्हणजे काय हे मलाही नीट माहित नव्हतं, पण ‘वाय’ पाहिल्यावर ते कळलं. अशा प्रकारच्या चित्रपटातली पात्र अथवा प्रसंग हे सुरुवातीला सुट्टे वाटतात, पण ते कुठल्या न कुठल्या टप्प्यावर एकमेकांना भेटून/छेदून जातात एवढेच नाही तर एकमेकांच्या आयुष्यावर परिणामही करतात. यासाठी कथानक थोडं पुढेमागे न्यावं लागतं. आधी घडून गेलेल्या प्रसंगातला एखादा शॉट त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रसंगात पुन्हा एकदा येतो आणि दोन्ही प्रसंग/पात्रांमधला दुवा सांधतो. हा अशा स्वरूपाचा पहिला आहे चित्रपट का माहिती नाही, पण असा प्रयोग मराठीत फार दुर्मीळ आहे एवढं नक्की (मला वाटतं ‘चेकमेट’ हा सुद्धा अशाच प्रकारात मोडतो. खात्री नाही. जाणकारांनी सांगावे)


‘वाय’ने मला पहिल्या प्रसंगापासूनच खिळवून ठेवलं याचं कारण विषयाच्या गांभीर्याला पातळ करणारा एकही प्रसंग अथवा संवादही न घुसवल्यामुळे तो आपल्या मार्गावरून अजिबात हलत नाही. प्रेमप्रसंग, गाणी, आयटम सोंग वगैरे बाष्कळपणा यांचा तर दूरदूरपर्यंत संबंध नाहीये. ताण हलका करणाऱ्या काही जागा आहेत, पण त्या अगदी मोजक्या आणि नेमक्या ठेवण्याचं भान दिग्दर्शकाने राखलं आहे. सततच्या तणावपूर्ण वातावरणात छोट्या मुलीचे स्कूलबसच्या अनुषंगाने येणारे प्रसंग सुखद झुळूक आणतात. जगात काहीतरी चांगलं शिल्लक आहे, असा धीर देतात. संकलन, कथानकातले काही चकवे यांमुळे थ्रिल शेवटपर्यंत टिकून राहतं. हा थिएटरमध्येच पाहण्याचा चित्रपट आहे


वातावरणात भरून राहिलेला विलक्षण ताण चित्रपटाला गडद करतो. रुग्णालयाच्या तळमजल्यावरचं थंड वातावरण, तिथे कार्यरत असणारे त्याहून थंड रक्ताचे पशू, त्यांची उपकरणं यांच्या सहाय्याने अस्वस्थ करून टाकण्याची ताकद त्यामध्ये आहे. अजिबात लाऊड न होणारं प्रभावी पार्श्वसंगीतदेखील या मूडला साजेसेच. सगळी काळी कृत्यं घडत असताना ध्वनीचा जो वापर केला आहे तो हादरवून टाकणारा आहे. त्यामुळेच डोळ्यांना दिसणाऱ्या रक्तापेक्षा कानांना ‘ऐकू’ येणारं रक्त जास्तच सुन्न करतं. रूग्णालयासारखी एक गुंतागुंतीची यंत्रणा जेव्हा गैरकृत्यासाठी जुंपली जाते तेव्हा त्यामध्ये गुन्हा लपवण्यासाठी अनेक युक्त्या लढवलेल्या इथे दिसतात  उदा. तळमजल्यावरच्या ऑपरेशन थियेटरबाहेर झोपून राहिलेली म्हातारी अनेकदा दिसते, पण तिचे प्रयोजन काय हे शेवटाकडे कळतं. ते पाहिल्यावर हतबुद्ध व्हायला होतं.


चित्रपटाच्या पूर्वार्धामध्ये फक्त दोन डॉक्टर आणि त्यांची रुग्णालयं यांच्यावर असणारा फोकस, उत्तरार्धामध्ये गैरप्रकारांचा उलगडा करण्यासाठी सामान्य लोकांच्या भेटीगाठी घेतल्या जातात तेव्हा आणखी रुंदावतो. त्या लोकांच्या उत्तरांमुळे आता हा सामाजिक प्रश्न एकदोन डॉक्टर आणि त्यांच्याकडचे ‘पेशंट’ यांच्यापुरता न उरता अधिक गहिरा असल्याचं अधिरेखित होतं. फक्त कथानकाचा हा भाग अतिशय वेगाने दाखवलेला असल्यामुळे त्यातली समाजाची शिळी वृत्ती दाखवणारी काही महत्त्वाची वाक्यं नंतर लक्षात राहत नाहीत. हा भाग थोडा निगुतीने घेतला असता तर बरं झालं असतं. 


वैद्यकीय व्यवसायावर आधारित चित्रपट मराठीत फार कमी आहेत. ‘वाय’ बघताना साधारण दशकभरापूर्वी आलेल्या ‘आघात’ या विक्रम गोखले दिग्दर्शित उत्कृष्ट चित्रपटाची आठवण आली. ‘वैद्यकीय गैरव्यवहार’ हे दोन्हीतलं समान सूत्र आणि दोन्हीकडे मुक्ता बर्वे असणे हा सुखद योगायोग. मुक्ता बर्वेमुळेच ‘वाय’कडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. स्वत:चा असा ब्रँड निर्माण करणे ही फार भारी गोष्ट वाटते मला. खरं म्हणजे चित्रपटाच्या चमूमध्ये एफटीआयमधले शिक्षण गाठीशी असणारे तंत्रज्ञ आहेत, पण मुक्ता बर्वेच्या समावेशामुळे चित्रपटाकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं हे नक्की. तिची अभिनयक्षमता आपल्याला माहित आहेच. त्यामुळे तिने ही भूमिका चोख पार पडली यात काही आश्चर्य नाही. मला दोन जणांची काम फार आवडली. 

१) नंदू माधव : काय क्लास अभिनेता आहे! अनेक वर्षं ‘उद्योग’ करून आलेलं निर्ढावलपण आणि शेवटी पायाखालची जमीन सरकायला लागल्यावर आलेला उद्विग्न संताप ही रेंज त्याने फार मस्त दाखवली आहे. 

२) सुहास शिरसाट : डॉ. पुरूषोत्तमच्या हाताखाली सगळी कृत्यं करणारा रुग्णालय हा कर्मचारी, आपली थंड नजर, स्वरचित  ओव्या आणि मध्येच फॅक्कन हसणं यातून शिरशिरी आणतो. 

सुहास शिरसाठचा सहकारी झालेल्या अभिनेत्यानेही मस्त काम केले आहे. त्याच्या ‘पुरुषी’ नजरेचा चित्रपटातून केलं गेलेलं भाष्य अधोरेखित करण्यासाठी चपखल वापर केला गेला आहे.  


अनेकदा सामाजिक चित्रपट हा प्रचारकी थाटाचाच असायला हवा अशी अनेक चित्रकर्त्यांची समजूत झालेली दिसते. परंतु ‘वाय’ सारखा चित्रपट बघितला की, उपदेशाचे डोस न पाजताही सामाजिक प्रश्नाची जाणीव किती भेदकपणे करून देता येते हे लक्षात येतं. जे समाजात घडतंय ते यात फक्त वरचे पापुद्रे सोलून दाखवून दिलं आहे. प्रेक्षकांच्या शहाणपणावर विश्वास ठेवला आहे. त्यांना चमच्याने न भरवण्याचा दिग्दर्शकाचा आग्रह अगदी शेवटच्या प्रसंगाच्या शेवटच्या शॉटपर्यंत कायम राहिला आहे. मुद्दा मांडायला चित्रकर्त्यांनी उगाच अनावश्यक डायलॉगबाजी आणि उपदेशांच्या कुबड्या वापरलेल्या नाहीत. संपूर्ण चित्रपटामध्ये डॉक्टरच्या समोर बसलेल्या फोटोग्राफरच्या पात्राच्या तोंडून येणारी दोन-तीन वाक्यं आणि त्याच ठिकाणी बसलेल्या मुक्ताच्या तोंडून येणारी दोन-तीन वाक्यं एवढीच काय ते मनुष्यरुपी लांडग्यांवर थेट भाष्य करणारी आहेत. 


'चांगलं साहित्य अस्वस्थ करतं’ हे वाक्य चित्रपटालाही लागू होतं. चित्रपटाचं शीर्षक, लोगोमधलं स्काल्पेल, चित्रपटातलं लायटिंग, उत्कृष्ट साउंड डिझाईन, कुत्र्यांचा या चित्रपटांमध्ये (कथानकाचा भाग म्हणून आणि रूपक म्हणूनही) केलेला वापर या सगळ्या गोष्टी ‘वाय’चा ‘अस्वस्थता Quotient’ वाढवतात. ‘वाय’ बघत असताना डोक्यात उठलेलं मोहोळ शेवटाकडे येत असताना एकाच प्रश्नाभोवती फेर धरतं :  “का????”



ज्ञानगंगोत्रीचा इतिहास

 




 

सरस्वती नमस्तुभ्यं, वरदे कामरूपिणी ।

विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा ॥

 

 

भारताला विद्याभ्यासाची मोठी परंपरा लाभली आहे. सरस्वतीला विद्येची देवता मानले गेले असल्याने वर दिलेल्या श्लोकाप्रमाणे सरस्वतीला वंदन करून शिक्षणाची सुरुवात केली जाते. ज्ञान आणि विद्या या गोष्टी देवतेशी जोडल्या गेल्याने शिक्षणाविषयी उदात्त भावना आपल्या संस्कृतीमध्ये आपोआपच रुजली. ज्ञानदानाविषयीच्या उदार भावनेतूनच प्राचीन भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला. गुरुकुल परंपरेतून विकसित होत गेलेल्या शिक्षणपद्धतीतून पुढच्या टप्प्यामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणारी अनेक विद्यापीठे निर्माण झाली. प्राचीन काळातील अशा जगप्रसिद्ध भारतीय विद्यापीठांचा इतिहास श्वेता काजळे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला आहे.

 

प्राचीन भारतीय विद्यापीठांची काही वैशिष्ट्ये

१) प्राचीन भारतीय विद्यापीठांमधील शिक्षणाचा भर केवळ पुस्तकी ज्ञानावर नसे, तर शिक्षणाचे उपयोजन कसे करावे हेही शिकवले जात असे. सर्व प्रकारच्या बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची क्षमता येथील शिक्षणामध्ये होती. विद्यापीठांमध्ये औषधशास्त्र, कायदा, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, साहित्य, भाषाशास्त्र, पशुसंवर्धन, विविध कला असे वैविध्यपूर्ण शिक्षण मिळत असे. येथील शिक्षणाची कीर्ती पश्चिमेला ग्रीसपासून पूर्वेला जपानपर्यंत पसरली होती.
२) शिक्षणाच्या आशेने अतिशय मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यापीठांमध्ये येत असल्याने प्रथम त्यांची प्रवेशपरीक्षा घेतली जात असे. उदा. विक्रमशिला विद्यापीठाच्या प्रत्येक दरवाजावर प्रवेश चाचणी घेण्यासाठी एकेक द्वारपंडित नेमलेला असे.

३) एका वर्गामध्ये पंधरा अथवा वीसच विद्यार्थी असत. त्यामुळे प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणे शक्य होई.


शिक्षणाला मिळालेला राजाश्रय

समाजाची ज्ञानोन्नती करणे ही राजे स्वतःची जबाबदारी समजत. म्हणूनच विद्यापीठांना भक्कम राजाश्रय होता. ज्ञानदान हे पवित्र कार्य समजले जात असल्यामुळे गुरू-शिष्याचे नाते व्यावहारिक नाते नव्हते. विद्यार्थ्यांकडून शिक्षणाचे शुल्क घेतले जात नसे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना गुरुदक्षिणा दिली जात असे. आठव्या वर्षी शिक्षणास प्रारंभ करण्यापूर्वी उपनयन म्हणजेच मुंजीचा विधी होत असे. उपनयन विधी केवळ ब्राह्मणांपुरताच मर्यादित नव्हता, तर शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक जातीमध्ये हा विधी होत असे. स्त्रियादेखील यज्ञोपवीत घालत असत. गुणशिला विद्यापीठामध्ये पुरुषांसोबतच स्त्रियांच्या शिक्षणाचीही व्यवस्था होती.

 

प्राचीन विद्यापीठांचा अस्त

अशा समृद्ध ज्ञानपरंपरेवर आक्रमकांची वक्रदृष्टी पडली. मध्य आशियामधून आलेल्या हुणांच्या टोळ्यांनी तक्षशिला विद्यापीठ उद्ध्वस्त केले. तक्षशिलेच्या जे नशिबी आले तेच काही काळानंतर नालंदाच्या नशिबी आले. इस्लामी आक्रमकांच्या टोळधाडीमध्ये सध्याच्या बिहार आणि बंगाल येथील नालंदा, विक्रमशिला, तेलहरा, जागद्दल इ. विद्यापीठे उद्ध्वस्त झाली. बख्तियार खिलजीने केलेल्या नालंदाच्या विध्वंसात असंख्य ग्रंथ नष्ट झाले. अनेक बौद्ध पंडितांच्या हत्या झाल्या.

 

विध्वंसामुळे अथवा उपेक्षेमुळे कालांतराने अनेक प्राचीन भारतीय विद्यापीठे विस्मृतीच्या गर्तेत गेली. अशा परिस्थितीमध्ये या विद्यापीठांबद्दल माहिती देणारे महत्त्वाचे स्रोत म्हणजे भारतामध्ये येऊन गेलेल्या परदेशी प्रवाशांच्या नोंदी. ग्रीसचा मेगॅस्थेनीस, चीनचे ह्युएन सांग, आयत्सिंग, फाहियान, मोरोक्कोचा इब्न बतुता या प्रवाशांनी विद्यापीठांबद्दल भरभरून लिहिले आहे. तिबेट, चीन येथील अभ्यासकांनी अनेक ग्रंथ तिबेटी, चिनी भाषांमध्ये भाषांतरित केले. पुढे भारतातील विद्यापीठांच्या विनाशामध्ये भारतीय भाषांमधील मूळ ग्रंथ नष्ट झाले, तरीही त्यांची भारताबाहेरील भाषांमधील भाषांतरे टिकून असल्याने कालांतराने पुन्हा एकदा हे प्राचीन भारतीय ग्रंथ उपलब्ध झाले. या ग्रंथांमधील नोंदी तसेच परदेशी प्रवाशांच्या लेखनातले संदर्भ प्रस्तुत पुस्तकांमध्ये विपुल प्रमाणात दिलेले आहेत.

 

 

सहिष्णु शिक्षणपरंपरा

रूढ अर्थाने विद्यापीठ नसलेल्या, परंतु ज्या ठिकाणी ज्ञानाच्या आदान प्रदानाचे कार्य होत असे, चर्चा घडत असत अशा मठमंदिरादि स्थानांचीही पुस्तकामध्ये दखल घेतली आहे. बौद्धधर्माच्या भरभराटीच्या काळामध्ये अनेक बौद्ध मठांमध्ये शिक्षण दिले जात असे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल्या ‘चौसष्ट योगिनी मंदिर’ या वास्तूमध्ये गणित आणि ज्योतिष हे विषयांचे शिक्षण मिळत असे. मलकापुरम, तिरुमुक्कुडल ही ‘मंदिर विद्यापीठे’ प्रसिद्ध होती. काशी हे संपूर्ण शहरच ज्ञानाचे माहेरघर होते. अनेक धर्म, पंथ आणि विचारांच्या मांडणीचे, प्रसाराचे आणि अध्ययनाचे ते केंद्र होते.

 

"प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीत धर्माचा विशेष प्रभाव असला तरीही शिक्षणपद्धती धर्मनिरपेक्ष होती. विद्यार्थ्याला वैदिक, बौद्ध, जैन अशा कुठल्याही धर्माचे शिक्षण घेण्याची मुभा होती. विद्यापीठातून धार्मिक शिक्षण देणाऱ्या आचार्यांना सर्व धार्मिक तत्वज्ञानाचे सखोल ज्ञान असायचे" असे लेखिका नमूद करते. बौद्धमताचा पगडा असणाऱ्या विद्यापीठांमध्ये वैदिक परंपरांचे शिक्षण वर्ज्य नव्हते. वैदिक धर्माचे अनुसरण करणाऱ्या गुप्त राजांनी बौद्धमताचा प्रभाव असलेल्या नालंदा विद्यापीठाला राजाश्रय दिला होता. अनेक विद्यापीठांच्या उत्खननामध्ये बुद्धमंदिरे, स्तूप यांच्यासोबतच वैदिक हिंदू देवदेवतांच्या मूर्तीदेखील सापडल्या आहेत, ही गोष्ट भारतामध्ये प्राचीन काळापासून असणाऱ्या धार्मिक, वैचारिक सहअस्तित्वाची साक्ष देते. मध्ययुगामध्ये इस्लामिक राजवटीमध्ये मात्र भारतीय शिक्षण पद्धतीत बदल घडले. त्याचे विवेचन करणारे स्वतंत्र प्रकरण पुस्तकामध्ये आहे. याप्रमाणेच इंग्रजी राजवटीमध्ये भारतीय शिक्षण परंपरा कशी उध्वस्त केली गेली, याबद्दलही पुस्तकामध्ये भाष्य असायला हवे होते असे वाटते.

 

माहितीचा खजिना

प्रत्येक विद्यापीठासाठी स्वतंत्र प्रकरण आणि शेवटी एका प्रकरणामध्ये दक्षिणेतील काही विद्यापीठांचा एकत्रित मागोवा असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये त्या त्या विद्यापीठाचे भौगोलिक स्थान, तिथे शिकवले जाणारे विषय, तेथे असणारे शिक्षक, परदेशी प्रवाशांच्या त्या विद्यापीठाबद्दलच्या नोंदी, आधुनिक काळामध्ये कोणत्या उत्खननामुळे ते विद्यापीठ पुन्हा प्रकाशात आले याची माहिती दिली आहे. उत्खननात मिळालेले वास्तूचे अवशेष, मूर्ती, नाणी, शिक्के यांची छायाचित्रेही पुस्तकामध्ये आहेत. अभ्यासकांचे शोधग्रंथ, भारतीय पुरातत्व खात्याच्या उत्खननांचे अहवाल, समकालीन ग्रंथांमधील नोंदी, जातककथांसारखे धार्मिक साहित्य यांच्या संदर्भांतून हे पुस्तक साकारले आहे. प्राचीन भारतीय विद्यापीठांचे स्थान भारतामध्ये कुठे होते याचा एक नकाशा पुस्तकाच्या प्रारंभी दिलेला आहे, तो पाहता जवळपास संपूर्ण देशभर विस्तारलेली ‘विद्यापीठ परंपरा’ दिसून येते.

 

हे पुस्तक म्हणजे माहितीचा खजिना आहे यात शंकाच नाही, परंतु यामध्ये मुद्रितशोधनाच्या चुका राहून गेल्या आहेत. तसेच काही ठिकाणी इंग्रजी शब्दांचे मराठीमधले उच्चार योग्यप्रकारे आलेले नाहीत. मराठीमध्ये या विषयावर कमी साहित्य उपलब्ध आहे, हे लक्षात घेता या पुस्तकाचे मोल मोठे आहे. म्हणूनच अशा चुका टाळून अधिक लक्षपूर्वक केलेल्या संपादनासह या पुस्तकाची पुढची आवृत्ती निर्दोष स्वरुपात वाचकांसमोर येईल अशी आशा आहे.

 

प्राचीन भारतीय विद्यापीठे

लेखक : श्वेता काजळे

प्रकाशक : मर्वेन टेक्नॉलॉजीज्
पृष्ठसंख्या : २३६

किंमत : ३५० रु.   


('मुंबई तरुण भारत'मध्ये ११ जून २०२२ रोजी प्रकाशित लेख)


किंगफिशरचे विलोभनीय दर्शन


रोजच्या कामाच्या धकाधकीमध्ये आपण एवढे गुंतून पडतो की, निसर्गाची बदलती रूपे, पशुपक्ष्यांचे व्यवहार न्याहाळण्यातला आनंद जणू विसरूनच जातो. डॉ. पराग नलावडे यांच्या बाबतीतही काहीसे असेच घडले होते.  आपल्या वैद्यकीय व्यवसायामध्ये अनेक वर्षे काढल्यानंतर त्यांना कामाच्या नादात आपल्या आवडीच्या गोष्टी करण्याचे राहूनच गेल्याची जाणीव झाली. मूळचा निसर्गप्रेमी स्वभाव डोके वर काढू लागला. त्यांनी ओडिशामधील पक्षी अभयारण्याचा दौरा केला आणि त्यातूनच त्यांचे पक्ष्यांशी मैत्र जुळले. पक्षीनिरीक्षणाला छायाचित्रणाची जोड मिळाली. 

 

नव्याने गोडी लागलेल्या या छंदासाठी देशभर फिरताना किंगफिशर या पक्ष्याने - ज्याला मराठीमध्ये खंड्या अथवा धीवर म्हणतात - डॉ. नलावडे यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी किंगफिशरचे निरीक्षण करण्याचा ध्यास घेतला आणि आवडीचे रूपांतर अभ्यासात झाले. भारतातील आढळणाऱ्या किंगफिशरच्या सर्व प्रजातींचे निरीक्षण करण्याचा आणि त्यांना कॅमेऱ्यात टिपण्याचा निर्धार डॉ. नलावडे यांनी केला. त्यांनी अरुणाचल प्रदेश, आसाम, सुंदरबनओडीसा, पश्चिम घाट, हिमालय या प्रदेशांमध्ये जाऊन घेतलेले किंगफिशर निरीक्षणाचे अनुभव आणि टिपलेली सुंदर छायाचित्रे यातूनचजावे किंगफिशर्सच्या गावाहे  पुस्तक साकारले आहे

 

किंगफिशर हा मांसाहारी पक्षी आहे.किंगफिशरहे नाव पडण्याचे कारण, हा पाण्यात सूर मारून मासा पकडण्यात अतिशय तरबेज असतो. अर्थात सर्व प्रजातींचे खाद्य मासे हे नसते अथवा सर्व प्रजाती पाण्याच्या स्रोतांजवळ राहतात असे नाही. जगभरामध्ये किंगफिशरच्या ११४ प्रजाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये १२ प्रजाती आढळतात. सुंदरबनसारखे पाणथळ प्रदेश, पश्चिम घाटातील जंगलांपासून ते हिमालयाच्या पायथ्यापर्यंत सर्वत्र या पक्ष्यांचे अस्तित्व आहे. 

 

भारतात आढळणाऱ्या किंगफिशरच्या १२ प्रजाती पुढीलप्रमाणे : 

 

१) तीबोटी धीवर (Oriental Dwarf Kingfisher)

२) निळ्या कानाचा धीवर (Blue Eared Kingfisher)

३) तपकिरी पंखांचा धीवर (Browne Winged Kingfisher)

४) काळ्या टोपीचा धीवर (Black Capped Kingfisher)

५) कंठेरी धीवर (Collared Kingfisher)

६) पांढऱ्या छातीचा धीवर (White Throated Kingfisher)

७) कवड्या धीवर (Pied Kingfisher)

८) सामान्य धीवर (Common Kingfisher)

९) तुरेवाला धीवर (Crested Kingfisher) 

१०) Blyth धीवर (Blyth’s Kingfisher)

११) बलकचोच धीवर (Stork Billed Kingfisher)

१२) लालसर धीवर (Ruddy Kingfisher)

 

डॉ. नलावडेंना आपल्या निरीक्षणांमधून या प्रत्येक प्रजातीचा स्वभाव, हालचाली, वीण, खाद्य यांच्याबद्दल विस्तृत माहिती मिळवता आली. किंगफिशरच्या जोडीने नवीन पिढी जगात आणण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी केलेली धडपड, त्यांच्यामधील नाजूक भावभावना त्यांना कॅमेऱ्यात टिपता आल्या. 

 

डॉ. नलावडे यांनी मांडलेले पक्षीनिरीक्षणाचे काही अनुभव अतिशय हृद्य आहेत. निळ्या कानांच्या धीवर पक्ष्याच्या मादीने पिल्लांना जन्म दिल्यानंतर सुरुवातीचा काही काळ ती रोज त्यांच्या अन्नाची सोय करत असे. परंतु एके दिवशी दिवशी मादी निघून गेली. सर्वसाधारणपणे जा प्रजातीमध्ये पिल्लांचे आईबाबा संगोपनाची जबाबदारी एकत्र पार पाडतात. परंतु फक्त एकट्याने हे काम करणे खूप कठीण असते. ही पिल्ले नशीबवान होती. मादी निघून गेल्यानंतर पिल्लांच्या वडिलांनी रोजच्यापेक्षा दुप्पट फेऱ्या आपल्या पिल्लांना पुरेसे अन्न भरवले आणि एके दिवशी घरट्यामधून ती पिल्ले आपल्या बळावर उडाली! तीबोटी धीवराच्या जोडीचा अनुभवही अनोखा आहे. सर्वसाधारणपणे आई-वडील पिल्लांना अन्न भरवतात आपल्याला माहित आहे. तीबोटी धीवराच्या नराने प्रणयाराधनाचा भाग म्हणून मादीला घास भरवल्या चे दृश्यदेखील डॉ. नलावडेंनी अनुभवले!

 

निरीक्षणासाठी एखाद्या ठिकाणी जायचे नियोजन करत असताना चांगला स्थानिक माहितगार/गाईड मिळणे किती आवश्यक आहे हेही पुस्तक वाचताना लक्षात येते. असा माहितगार आपण त्या ठिकाणी जाण्यापूर्वीच एखाद्या भागामध्ये असलेल्या पक्ष्यांचे अस्तित्व टिपून ठेवतो आणि आपल्याला त्याच्या सवयी अथवा वेळा यांच्या बद्दल माहिती पुरवतो. डॉ. नलावडे यांना अशा माहितगारांची बरीच मदत झाली. 

 

पक्षीनिरीक्षण करत असताना नुसती पर्यटकाची मानसिकता असून भागत भागत नाही तर अभ्यासकाची मानसिकता जोपासावी लागते. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम! तासन् तास एका ठिकाणी हालचाल न करता थांबणे, अतिशय खडतर ठिकाणी जाण्यासाठी मनाची तयारी ठेवणेघड्याळच नाहीतर कॅलेंडरदेखील विसरून मुक्काम ठोकणे या गोष्टी आवश्यक असतात. कधीकधी घोर निराशेचे प्रसंगदेखील येतात. बंगालमधील सुंदरबन येथे जाऊन लालसर धीवराचा वेध येण्याचा प्रयत्न फसला, पण त्यामुळे नाऊमेद न होता, त्यांनी थेट अंदमान येथीलरंगतबेटाचा दौरा केला आणि त्याला कॅमेऱ्यात बंदिस्त केले. 

 

टेनिसमध्ये एकाच खेळाडूने चारही देशांमधल्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्या कीकरिअर स्लॅमपूर्ण केले असे म्हटले जाते. त्याच धर्तीवर भारतातील बाराच्या बारा प्रजातींच्या किंगफिशरना कॅमेराबद्ध करण्याचेकिंगफिशर स्लॅमडॉ. नलावडेंनी पूर्ण केले आहे असे म्हणता येईल. त्यांच्या या देखण्या छायाचित्रांनी जावे किंगफिशर्सच्या गावाहे पुस्तक सजलेले आहे आणि तोच या पुस्तकाचायू. एस. पीआहे. संपूर्ण आर्टपेपरवर उत्तम छपाई केल्याने पुस्तकाच्या सौंदर्यात भर पडली आहे. पुस्तकाच्या शेवटी किंगफिशरच्या भारतातील बाराच्या बारा प्रजातींची इंग्रजी आणि शास्त्रीय नावे, पोटजाती, अधिवास, आकार अशी शास्त्रीय माहिती दिली आहे. पक्षीनिरीक्षणाचे विलोभनीय परंतु कसोटी पाहणारे विश्व उलगडून दाखवणारे हे पुस्तक लक्षवेधी झाले आहे

 

जावे किंगफिशर्सच्या गावा

लेखक : डॉ.  पराग नलावडे 

प्रकाशक : भरारी प्रकाशन

किंमत : ३५० रु.

पृष्ठसंख्या : १५२


('मुंबई तरुण भारत'मध्ये ४ जून २०२२ रोजी प्रकाशित लेख)

 

कोरेगाव भीमाच्या लढाईच्या इतिहासाचे विश्लेषण

 



गेली काही वर्षे १ जानेवारी हा दिवस मोठ्या जनसमुदायातर्फे 'कोरेगाव भीमा शौर्यदिन'म्हणून साजरा केला जातो. १८१८ साली याच दिवशी ‘कोरेगाव भीमा’ या गावी जी लढाई झाली होती, तिचा संदर्भ या 'शौर्यदिना'ला आहे. काही वर्षे १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील जयस्तंभाजवळ कुठलीही अप्रिय घटना न घडता शौर्यदिन साजरा होत होता परंतु २०१८ साली मात्र या दिवशी याठिकाणी सुनियोजित दंगल घडवली गेली.

कोरेगाव भीमा येथील लढाईला गेली काही वर्षे ‘पेशवे विरुद्ध महार’ (म्हणजेच ‘ब्राह्मण विरुद्ध दलित’) असा रंग देण्यात येत होता, त्याचा कळस पुण्यामध्ये झालेल्या चिथावणीखोर एल्गार परिषदेच्या निमित्ताने गाठला गेला आणि दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. विचारवंत म्हणवल्या जाणाऱ्यांना अटकही झाली. माध्यमांमधून कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या लढाईला उजाळा दिला जाऊ लागला, परंतु अस्सल साधनांच्या सहाय्याने केलेले विवेचन मात्र अभावानेच समोर आले. ही उणीव रोहन जमादार (माळवदकर) लिखित ‘१ जानेवारी १८१८ – कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ या पुस्तकामुळे दूर झाली आहे.

कोरेगाव भीमाची लढाई ही आकस्मिक परिस्थितीतून घडलेली घटना होती. मराठेशाही उतरणीला लागली होती.  छत्रपतींच्या वतीने पुण्याहून पेशवे राज्य चालवत होते. म्हणजेच ‘पेशवाई’ ही वेगळी सत्ता नसून ती मराठ्यांच्या सत्तेचेच रूप होती. इंग्रज मराठी सत्तेवरचा फास आवळत चालले होते. त्याच धामधुमीत दुसरे बाजीराव साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांच्यासह इंग्रजांना हूल देत पुण्यामध्ये येण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी त्यांच्याकडून आपण कोकणच्या दिशेने जात असल्याची आवई उठवली गेल्याने इंग्रजांना ते पुण्याकडे जातील याची कल्पनाच नव्हती. मराठ्यांचे सैन्य पुण्याच्या ईशान्येला असणाऱ्या फुलगाव येथे (भीमा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर) आल्याची कुणकुण लागताच पुण्यात असणाऱ्या कर्नल बर्र या इंग्रज अधिकाऱ्याकने शिरूर येथे असणाऱ्या कॅप्टन स्टाँटन याच्याकडून मदत मागितली. स्टाँटन शिरूरकडून फुलगावच्या दिशेने निघाला आणि त्याने फुलगावच्या लगतच्या भीमा नदीच्या पूर्वेला असणाऱ्या कोरेगाव येथे मोर्चेबांधणी केली. तिथेच १ जानेवारी १८१८ रोजी ‘इंग्रज विरुद्ध मराठे’ अशी लढाई झाली. दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होत असताना, दुपारनंतर चित्र पालटले आणि इंग्रजाकडून तिखट प्रतिकार झाल्याने मराठ्यांना निर्णायक विजय मिळू शकला नाही.

लेखक रोहन जमादार यांनी ‘ही लढाई अनिर्णित होती’ असा निष्कर्ष मांडला आहे. हेतू साध्य झाला की नाही, यावर लढाईची निर्णायकता ठरवता येते, असे ते नमूद करतात. छत्रपती प्रतापसिंह आणि दुसरे बाजीराव यांना स्टाँटनकडे इंग्रजांची आणखी कुमक येण्यापूर्वी पुढच्या मुक्कामी जाणे आवश्यक होते, त्यामुळे त्यांना कोरेगावचा मुक्काम आणि तिथली लढाई लांबवण्यात रस नव्हता. त्यामुळे १ जानेवारी रोजी संध्याकाळी इंग्रजांमध्ये लढण्याचे त्राण शिल्लक नाहीत, हे लक्षात आलेले मराठ्यांचे सैन्य (तिथे थांबून राहणे असा मूळ हेतूच नसल्याने) तिथून निघून गेले आणि ही लढाई अनिर्णित राहिली. असे असताना ‘ही लढाई म्हणजे पेशव्यांचा पराभव होता’ म्हणता येत नाही. (इ. स. १८२२ मध्ये इंग्रजांनी आपल्या शौर्याची आठवण सांगणाऱ्या स्तंभाची स्थापना भीमा नदीकाठच्या कोरेगाव येथे करून त्याला ‘जयस्तंभ’ असे नाव दिले.

लढाईनंतर पुढची शंभर वर्षे जयस्तंभापाशी कुठल्याही प्रकारचा उत्सव झाला नाही. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जयस्तंभाला भेट दिली. इंग्रजांनी महार समाजातील लोकांची सैन्यात भरती करणे बंद केले होते. उत्पन्नाचे अन्य साधन उपलब्ध नसलेल्या या समाजाच्या अर्थार्जनाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी त्यांची लष्करभरती पुन्हा सुरू व्हावी म्हणून बाबासाहेब प्रयत्नशील होते. त्या अनुषंगाने महार समाजातील सैनिकांनी कोरेगावच्या लढाईत गाजवलेल्या शौर्याची आठवण जागवणे आणि इंग्रजांच्या सैन्यात महारांनी दिलेल्या योगदानाची जाणीव इंग्रजांना करून देणे, हा या भेटीमागचा प्रमुख उद्देश होता. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी या लढाईला ‘जातीअंतासाठी झालेली लढाई’ असे संबोधले नाही. “निर्णायक यश टप्प्यात येत असताना पेशव्यांच्या सैन्याने हल्ला थांबवत माघार का घेतली हे सांगणे अवघड आहे” असे उद्गार बाबासाहेबांनी काढले असल्याच्या संदर्भाकडे (‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पीचेस अँड रायटिंग्ज’, खंड १७, भाग ३) रोहन जमादार लक्ष वेधतात. अलीकडे पसरवल्या जात असलेल्या ‘पेशव्यांचा पराभव झाला’ या दाव्यातला फोलपणाच यातून उघड होतो. बाबासाहेबांच्या भेटीचा संदर्भ हवा तसा वाकवून आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळ केला जात आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.

कोरेगाव भीमाच्या लढाईचे इंग्रजांच्या समकालीन अस्सल कागदपत्रांमधले संदर्भ हे या पुस्तकाचे सगळ्यात मोठे बलस्थान आहे. स्टाँटनने वरिष्ठांना पाठवलेले लढाईचे वृत्त, स्तंभ उभा करण्यासंबंधी झालेला पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष जयस्तंभावर असलेला मजकूर आणि कोरलेली नावे यांचा रोहन जमादार यांनी बारकाईने अभ्यास केला आहे. इंग्रज असोत वा मराठे, दोन्ही बाजूच्या सैन्याकडून एकाच जातीचे अथवा एकाच धर्माचे सैनिक लढले नाहीत, हेही ते अधोरेखित करतात. सैनिकांच्या जातींवरून त्यांचे नेतृत्व करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या जातीविषयी जी विधाने केली जातात तो ठरवून केलेला बुद्धिभेद असतो, हे निश्चित. विविध आक्षेपांचे खंडन करणारे पुस्तकामधले शेवटचे प्रकरणही अतिशय महत्वाचे आहे.

या लढाईमध्ये इंग्रजांतर्फे सैनिक खंडोजी माळवदकर यांनीही मोठे शौर्य गाजवले होते आणि त्याबद्दल बक्षीस म्हणून जयस्तंभाची निगराणी राखण्याची जबाबदारी इंग्रजांनी त्यांच्याकडे दिली. लेखक रोहन जमादार हे त्यांचे वंशज आहेत. त्यांच्या या पुस्तकाला हितशत्रूंकडून प्रचंड विरोध झाला, धमक्या दिल्या गेल्या. तसे असतानाही रोहन यांनी मोठी जोखीम पत्करून हे पुस्तक सर्वांसमोर आणले आहे. वास्तविक या पुस्तकामध्ये कुणाही व्यक्ती अथवा समजाविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य नाही. डॉ. बाबासाहेब, त्याचप्रमाणे इंग्रजांकडून शौर्य गाजवलेल्या महार सैनिकांचाही यामध्ये गौरवच केला आहे. लेखक रोहन आणि लेखन सहाय्यक सौरभ वीरकर यांनी नेटक्या स्वरुपात आणि नेमक्या शब्दांमध्ये नकाशांच्या सहाय्याने हा इतिहास आपल्यासमोर आणला आहे. इतिहासात रस असलेल्यांनी तर हे पुस्तक वाचावेच, परंतु या जयस्तंभाशी भावना जोडलेल्या गेलेल्या सर्वांनीही ते वाचणे आणि डोकी भडकवण्यासाठी आतुर असलेल्या हितशत्रूंचा शांतपणे प्रतिवाद करणे आवश्यक आहे.

 

‘१ जानेवारी १८१८ – कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’

लेखक : रोहन जमादार (माळवदकर)

प्रकाशक : भूमिका प्रकाशन

पृष्ठसंख्या : ९२

किंमत : ५०

('मुंबई तरुण भारत'मध्ये ५ मार्च २०२२ रोजी प्रकाशित लेख)

‘इंका’ची देवदरी : हरवलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा

 


जगाच्या विविध भागांमध्ये विविध कालखंडांमध्ये सुमेरियन, बॅबिलोनियन, ग्रीक, रोमन, माया इत्यादी अनेक संस्कृती विकसित झाल्या आणि बघता बघता काळाच्या उदरात गडपदेखील होऊन गेल्या. रोगराई, नैसर्गिक आपत्ती यांच्यासोबतच परकीय आक्रमणे हेही अनेक संस्कृतींच्या ऱ्हासाचे कारण ठरले. स्पेनच्या ख्रिस्ती आक्रमकांमुळे पूर्णपणे नष्ट झालेली अशीच एक दुर्दैवी संस्कृती म्हणजे ‘इंका संस्कृती’. इसवी सनाच्या पंधराव्या शतकापर्यंत वैभवाच्या शिखरावर असलेल्या या संस्कृतीविषयी ठोस म्हणावी अशी माहिती आज फार कमी उपलब्ध आहे. ‘इंकाची देवदरी’ या पुस्तकामधून या संस्कृतीच्या अवशेषांवर आणि त्यांच्याभोवतीच्या गूढतेच्या आवरणावर डॉ. संदीप श्रोत्री यांनी प्रकाश टाकला आहे.

डॉ. श्रोत्री यांनी आपल्या दक्षिण अमेरिकेच्या भटकंतीदरम्यान ‘पेरू’देशात असणाऱ्या इंका संस्कृतीशी संबंधित शहरे आणि गावांना भेट दिली. त्या प्रवासाचा सविस्तर वृत्तांत प्रस्तुत पुस्तकामध्ये दिला आहे. पुस्तकाचे तीन विभाग आहेत. पहिल्या विभागामध्ये इंका साम्राज्याची राजधानी कुझ्को शहर, दुसऱ्या विभागामध्ये इंका संस्कृतीतील तीर्थक्षेत्र असणारे माचूपिच्चू शहर आणि तिसऱ्या विभागामध्ये इंकाकालीन कला आणि जीवनशैली जपणारी काही गावे अशा ठिकाणच्या भ्रमंतीचे वर्णन आहे.

इंका संस्कृती ही दक्षिण अमेरिका खंडाच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर पसरलेली एक अतिशय प्रगत, वैभवशाली संस्कृती होती. इथले राज्यकर्तेच नव्हे तर सामान्यजनही अक्षरशः सोन्यामध्ये लोळणारे होते, इतके मुबलक सोने इथे होते. शिल्पकला, शेती, सिंचन, स्थापत्यशास्त्र अशा विषयांमध्ये त्यांनी विलक्षण प्रगती केली होती. परंतु त्यांना चाकाचा शोध आणि लोखंडाचा शोध लागलेलाच नव्हता ही गोष्ट विलक्षण आश्चर्यकारक आहे. या दोन्ही गोष्टी नसूनही इंका लोकांनी केलेली प्रगती तोंडात बोटे घालायला लावणारी तर आहेच, पण या संस्कृतीबद्दल गूढ निर्माण करणारीही आहे.

एकेश्वरवादी संस्कृतींनी जग पादाक्रांत करण्याअगोदर जगभरच्या संस्कृती प्रामुख्याने निसर्गपूजक होत्या. आपल्या दृष्टीला दिसणाऱ्या, परंतु त्यांच्या अस्तित्वाचा कार्यकारण भाव समजू न शकणाऱ्या निसर्गातल्या अनेक गोष्टींचे त्या त्या संस्कृतींमधल्या लोकांनी लावलेले अर्थ जाणून घेणे रंजक असते. चंद्रसूर्य असोत वा आजूबाजूचे प्राणी पक्षी असोत, त्यांचे अस्तित्व लोकांच्या सुखदु:खांशी, शकुन-अपशकुनांशी जोडले जाते. इंका संस्कृतीवरही निसर्गातल्या अनेक गोष्टींचा प्रभाव आहे. राजधानी असणाऱ्या कुझ्को शहराची रचना बसलेल्या अवस्थेत असलेल्या ‘प्युमा’ या मार्जारकुळातील प्राण्याच्या आकारात केली गेली आणि त्याच्या विविध अवयवांपाशी त्या शहरातल्या प्रमुख वास्तू/जागा साकारल्या गेल्या आहेत (उदा. हृदयाच्या ठिकाणी असलेला ‘विजय चौक’). कॉंडोर हा जटायू सारखा पक्षी, लामा आणि अल्पाका मेंढ्या यांचाही या संस्कृतीवर खोल प्रभाव आहे हे इथल्या वास्तूंवर कोरलेली चित्रे आणि त्या वास्तूंच्या रचना यांमधून दिसते.

डॉ. श्रोत्री यांच्या लेखनातून सातत्याने येणारी गोष्ट म्हणजे इंका संस्कृतीतल्या वास्तूंचे ग्रहताऱ्यांच्या स्थितीशी असणारे नाते. पाषाणांमध्ये घडवलेली इथली सूर्यमंदिरे, निवासस्थाने, एवढेच काय तळघरेही विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी आकाशातल्या सूर्याचा प्रकाश कसा पडतो याचा अचूक अभ्यास करून साकारली गेलेली आहेत. त्यावरून इंका लोकांचा ग्रहताऱ्यांच्या स्थितीशी असणारा हा अभ्यास त्यांच्या ज्ञानपरंपरेबद्दलही सांगून जातो.

दक्षिण अमेरिकेतल्या आधीच्या उज्ज्वल संस्कृतींचे संचित घेऊन उभ्या राहिलेल्या इंका संस्कृतीने वैभवाचे सर्वोच्च शिखर गाठलेले असतानाच स्पॅनिश आक्रमकांची टोळधाड तिथे येऊन थडकली. इ.स. १५३२ मध्ये क्रूरकर्मा स्पॅनिश सरदार फ्रान्सिस्को पिझारो याने कपटाने इंका राजाचा पराभव केला. बंदुका, घोडे यापैकी काहीही आधी न पाहिलेले इंका सैनिक भयचकित होऊन अतिशय तुरळक स्पॅनिश सैनिकांसमोर फिके पडले. बघता बघता इंका साम्राज्य कोसळले. कोलमडलेल्या इंका जनतेचे सक्तीने धर्मांतर केले गेले आणि ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही त्यांच्या हत्या केल्या गेल्या. सर्वत्र नासधूस केली गेली, सोन्याची प्रचंड लूट झाली, अगदी थडगीही या तडाख्यातून सुटली नाहीत.

इंका संस्कृतीला लेखनकला अवगत नसल्याने त्यांचे कोणतेही लिखित साहित्य नव्हते, त्यामुळे इंका साम्राज्याचा पाडाव झाल्यावर त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा प्रसारच खुंटला. इंका संस्कृती जपणारे लोकच राहिले नाहीत. स्पॅनिश बखरकारांनी त्यांच्या आकलनानुसार इंका संस्कृतीबद्दल जे काही लिहून ठेवले आहे त्यातूनच इंका संस्कृतीचा थोडाफार अभ्यास होऊ शकतो. अकल्पित वेगाने झालेल्या एवढ्या प्रगत संस्कृतीच्या पतनाबाद्दल वाचताना एकीकडे वाईट वाटत असताना अशा अनेक आक्रमणांना चिवटपणे तोंड देत टिकून राहिलेल्या हिंदू संस्कृतीबद्दल आदरही वाटत राहतो.

लेखनकला अवगत नसली तरीही दोऱ्यांना त्यांना विशिष्ट प्रकारे गाठी मारून त्यामार्फत संदेशवहन करण्याची कला इंकांना अवगत होती. ही एक प्रकारची लिपीच होती, हे कळल्यावर इंका संस्कृतीविषयीचे कुतूहल द्विगुणित होते. दुर्दैवाने या गाठींच्या लिपीची आजही फारशी उकल होऊ शकलेली नाही. त्यामुळे इंका संस्कृतीचे गूढ उलगडणे अवघड झाले आहे. उत्खननात मिळालेल्या या गाठीच्या दोऱ्यांचे छायाचित्र आणि आकृत्याही पुस्तकात पाहायला मिळतात.

पुस्तकामध्ये डॉ. श्रोत्री यांनी विविध ठिकाणांची जी वर्णने केली आहेत, त्यामध्ये अतिप्रचंड शिलाखंड वापरून केलेली बांधकामे सातत्याने डोकावतात. विशिष्ट आकारात घडवलेले पाषाणखंड एकमेकांमध्ये अडकवून केलेले हे बांधकाम अनेक शक्तिशाली भूकंपांना पुरून उरले आहे.  हे प्रचंड दगड उंच डोंगरकुशीत वसलेल्या माचूपिच्चूसारख्या ठिकाणी कसे नेले असतील हे कोडेच आहे. स्पॅनिश लोकांच्या तावडीतून हे माचूपिच्चू इंकांचे पवित्र शहर आश्चर्यकारकरित्या वाचल्याने आज तिथे इंकांनी केलेली बांधकामे सुस्थितीत बघता येतात. परंतु बहुतांश बांधकामांचे उद्देशच आज सांगता येऊ शकत नाहीत, त्यामुळे इंका संस्कृतीवरचा गूढतेचा पडदा अधिकच गडद होतो.

डॉ. श्रोत्री यांच्या मनामध्ये जाग्या असलेल्या कुतुहलामुळे इंका संस्कृतीतील अनेक गोष्टींबाबत त्यांनी टूर गाईडला विचारून, तसेच स्वतः अभ्यास करून माहिती गोळा केली आहे. आपल्या अनुभवांना स्वतः काढलेल्या उत्तम छायाचित्रांची जोड दिल्याने इंका संस्कृतीची भव्यता, गूढता वाचकांपर्यंत उत्तम रीतीने पोचण्यास मदत झाली आहे. पुस्तकाची मांडणीही आकर्षक आहे. एका हरवलेल्या वारश्याकडे वाचकाला आकर्षित करण्यामध्ये पुस्तक यशस्वी ठरले आहे.

(डॉ. श्रोत्री यांनी दक्षिण अमेरिका भ्रमंतीवर लिहिलेल्या ‘कासवांचे बेट’ आणि ‘मनूचे अरण्य’ या पुस्तकांवर मी लिहिलेले लेख ‘मुंबई तरुण भारत’च्या mahamtb.com या वेबसाईटवर ‘पुस्तकपरिचय’ सदरात वाचता येतील.)

 

‘इंका’ची देवदरी

लेखकाचे नाव : डॉ. संदीप श्रोत्री

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठसंख्या : १५६

किंमत : २८० रुपये

('मुंबई तरुण भारत'मध्ये २७ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशित लेख)

मराठ्यांच्या विजयचिन्हांचा अपरिचित इतिहास

 

छायाचित्र सौजन्य : अमेझॉन

इतिहासाबद्दल पूर्वी कधीही होत नसतील एवढ्या चर्चा अलीकडे झडू लागल्या आहेत, त्यामागे समाजमाध्यमांचे वाढलेले प्रस्थ कारणीभूत असल्याचे लक्षात येते. स्वतःचा अभ्यास असो वा नसो, पण इतिहासावर हिरिरीने मतप्रदर्शन करायला मात्र सर्वजण पुढे येताना दिसतात. सांगोवांगीच्या कथाच ‘इतिहास’ म्हणून सांगितल्या जातात तेव्हा वस्तुनिष्ठतेला मात्र तिलांजलीच मिळताना दिसते. अनेक स्वयंघोषित ‘इतिहासतज्ज्ञ’ इतिहासातील ठराविक घटना, लढायांमधील जय-पराजय यातच अडकून पडलेले दिसतात. या सगळ्या धामधुमीतही स्वतः परिश्रम घेऊन मूळ साधनांच्या आधारे संशोधन करणारे अभ्यासक मात्र शांतपणे आपले काम करत राहतात आणि त्यातूनच मळलेल्या वाटांच्या पलीकडच्या इतिहासाचे पैलू उजेडात येतात. इतिहास अभ्यासक महेश तेंडुलकर यांना भटकंतीदरम्यान त्यांना अनेक मंदिरांमधल्या घंटांमध्ये एक समान सूत्र आढळले. कुतूहल चाळवले जाऊन त्यांनी खोलात जाऊन अभ्यास करायला सुरुवात केली. या अभ्यासाचे तपशील आणि त्यातून काढलेले निष्कर्ष त्यांनी आपल्या ‘पोर्तुगीज बेल्स इन हिंदू टेंपल्स’ या पुस्तकात मांडले आहेत.

महेश तेंडुलकर यांनी अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध मंदिरांना भेट देत असताना तिथल्या घंटांकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. अनेक ठिकाणी घंटेवर अभारतीय लिपीमधील अक्षरे आणि चिन्हे आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याबद्दल अभ्यास सुरू केला. या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की, त्या पोर्तुगीज बनावटीच्या घंटा आहेत आणि त्या चर्चमधूनच आणल्या गेल्या आहेत. ही आहेत विजयचिन्हे, मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत करून मिळवलेली! मराठ्यांच्या इतिहासातले सुवर्णपान असणाऱ्या वसईच्या मोहिमेनंतर ही विजयचिन्हे स्वराज्यात आणली गेली. या लढाईमध्ये मिळालेला विजय राजकीय दृष्टीने दूरगामी परिणाम करणारा ठरलाच, परंतु अनपेक्षितपणे आपल्या मंदिरांना हे सांस्कृतिक ठेवाही देऊन गेला.   

प्रस्तुत पुस्तकात ढोबळमानाने तीन बाबींचा उहापोह केला आहे.

१) हिंदू आणि ख्रिश्चन धर्मामध्ये असलेलं घंटेचे महत्त्व : दुर्जनशक्तीला पळवून लावणारी, मंगलध्वनी निर्माण करणारी गोष्ट अशा दृष्टिकोनातून मंदिरांमधील अथवा पूजेतील घंटेचे प्रयोजन असते. तर ख्रिश्चन धर्मामध्ये घंटा ही चर्चच्या आवारामध्ये सूचक वस्तू म्हणून वापरली जाते. उदा. रविवारच्या सामूहिक प्रार्थनेसाठीची वेळ झाल्याची सूचना देण्यासाठी, दिवसातील कोणता तास चालू आहे हे म्हणून किंवा परकीय आक्रमण अथवा नैसर्गिक आपत्तीवेळी लोकांना सावध करण्यासाठी घंटा वेगवेगळ्या प्रकारे वाजवली जात असे.

२) चिमाजी आप्पांची वसईची स्वारी : पोर्तुगीजांच्या धर्मांध राजवटीचा धोका खरेतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी ओळखून पोर्तुगीजांविरुद्ध मोहीमाही काढल्या होत्या, परंतु अन्य व्यवधानांमुळे त्या पूर्णत्वास नेता आल्या नाहीत. पुढे स्वराज्याचे पेशवे म्हणून सूत्रे हाती घेतलेल्या थोरल्या बाजीरावांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांविरुद्धच्या मोहिमेचा बेत आखून तो चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली तडीस नेण्यात आला. पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांच्या काळापासून चौथाई दिली नव्हती, छत्रपती शाहू महाराजांना पोर्तुगीज किंमत देत नव्हते अशा राजकीय कारणांसोबतच पोर्तुगीज राजवटीमध्ये हिंदू जनतेवर होणारे अत्याचार हे धार्मिक कारणही होते.

३) मंदिरांमध्ये असणाऱ्या पोर्तुगीज घंटांची माहिती : पोर्तुगीज घंटा कोणत्या मंदिरांमध्ये आहेत, त्यांची परिमाणे काय आहेत या माहितीचे तपशीलवार दस्तावेजीकरण पुस्तकात करण्यात आले आहे. तसेच विशिष्ट घंटा विशिष्ट मंदिरामध्ये कशी आली याबद्दलची माहिती जिथे जिथे उपलब्ध झाली तिथे तिथे नोंदवली आहे.

वर उल्लेखल्याप्रमाणे चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेला धार्मिक किनार होतीच. या मोहिमेमध्ये मराठ्यांना पोर्तुगीजांनी उभारलेल्या चर्चेसमधून मोठ्या प्रमाणावर सशस्त्र प्रतिकार झाला. प्रत्युत्तरादाखल मराठ्यांकडून अनेक चर्चेस उद्ध्वस्त करण्यात आली. विजय मिळाल्यानंतर चर्चेसबाहेरील टॉवरवरच्या घंटा मराठ्यांनी विजयचिन्हे – ज्याला इंग्रजीमध्ये ‘वॉर ट्रॉफी’ म्हणतात – म्हणून आणल्या. त्यांचा मोठा आकार आणि मधुर नाद यांमुळे या घंटांचे अनेक सरदारांना आकर्षण होते. ‘फिरंगी घंटा’ घेऊन येण्यासंबंधीचे तत्कालीन पत्रांमाधले उल्लेख महेश तेंडुलकर यांनी चिकाटीने शोधून काढले. अशा काही पत्रांचे दाखलेही पुस्तकामध्ये दिले गेले आहेत. अनेक सरदारांनी आपल्या प्रांतातील मंदिरांना ही विजयचिन्हे दान म्हणून दिली असण्याची शक्यता आहे. पुस्तकातली उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जिथे दोन बिंदू जोडणारे तपशील उपलब्ध नाहीत तिथे ‘काय घडले असू शकेल’ असा तर्क करून ‘यासंबंधी निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत’ असे तेंडुलकरांनी प्रांजळपणे नमूद केले आहे.

पुस्तकामध्ये अशा ४३ घंटांची माहिती दिलेली आहे. अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये असलेल्या घंटा या पोर्तुगीज आहेत हे वाचून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. उदा. पाली, मोरगाव, थेऊर, जेजुरी, बनेश्वर, तुळजापूर इ. काळाच्या ओघात त्यांचे महत्व विस्मृतीत गेले आहे. बहुतांश ठिकाणी घंटेचा मूळ टोल गायब आहे, तर काही ठिकाणी घंटा रंगवल्यामुळे त्यावरच्या मूळ खुणा व अक्षरे ओळखणे दुरापास्त झाले आहे. एके ठिकाणी तर जुनी घंटा वितळवून टाकल्याचेही तेंडुलकरांच्या निदर्शनास आले. ऐतिहासिक महत्वाच्या या वस्तूंची निगा राखली जावी आहे, त्यांची माहिती देणारा फलक मंदिरांमध्ये असावा अशी रास्त अपेक्षाही ते व्यक्त करतात.

पुस्तकाच्या निमित्ताने दोन भिन्न धर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये सामायिक असणाऱ्या गोष्टीच्या इतिहासावर प्रकाश पडला आहे. आपल्या श्रद्धा ज्या प्रतीकांशी जोडलेल्या असतात त्या प्रतीकांचा उगम किंवा त्या प्रतीकांशी संबंधित वस्तू यांचे मूळ कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न सर्वसामान्य माणूस करत नाही. परंतु एखादा जेव्हा जाणकार याचा अभ्यास करतो तेव्हा त्या प्रतीकांचा प्रवास, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या अर्थांमध्ये झालेले बदल हेसुद्धा उजेडात येतात. या पुस्तकाच्या निमित्ताने परिचित वस्तूंचा अपरिचित इतिहास शोधून काढण्याची प्रेरणा वाचकांना मिळाली तर अशा प्रकारच्या अभ्यासाचा उद्देश सफल व्हायला मदत होईल.

 

Portuguese Bells in Hindu Temple

Writer: Mahesh Tendulkar

Translator: Soniya Khare

Publisher: Merven Technologies

Pages: 127

Price: Rs. 200


('महाराष्ट्र टाईम्स'मध्ये ९ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित)