Total Pageviews

Saturday, September 15, 2018

रोलबॉल खेळाचे जनक "राजू दाभाडे" यांच्या प्रवासाची गाथा..



रोलबॉल खेळाचे जनक हे 'राजू दाभाडे' या नावाचे मराठमोळे शिलेदार असून ते चक्क पुणेकर आहेत हे मित्राकडून जेव्हापासून कळलं होतं, तेव्हाच ठरवलं होतं की त्यांची थेटभेट घ्यायचीच. पण ठरवणं आणि प्रत्यक्षात आणणं यामध्ये तीन महिन्यांचा अवधी गेला ! याचं मुख्य कारण म्हणजे दाभाडे सरांची प्रचंड व्यस्तता.... आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेचे ते सचिव असल्याने संघटनात्मक काम भरपूर, देशात आणि देशाबाहेरही होणाऱ्या सामन्यांकडे त्यांचे लक्ष आणि त्यात सहभागही... शिवाय खेळाच्या प्रसारासाठीची धावपळ.... अखेर बालेवाडी येथे छत्रपती शिवाजी क्रीडासंकुलात चालू असलेल्या 'महा रोलबॉल लीग' निमित्ताने मी त्यांना गाठलेच. या भेटीनिमित्ताने एका अपरिचित खेळाबद्दल, त्याच्या प्रसारासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल जवळून जाणून घेता आलं.


आपण जन्माला घातलेला खेळ आता लीग स्वरुपात आल्यामुळे लोकमान्यता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे याचं खूप समाधान वाटतअसेल ना ?

हो, नक्कीच. पण अजूनही अधिकाधिक लोकांनी या खेळाकडे वळावं यासाठी प्रयत्न चालू आहेत.


तुम्ही स्वतः राष्ट्रीय स्तरावर स्केटिंग खेळलेले आहात. शिवाय शाळेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम केले आहे. या गोष्टी रोलबॉलच्या जन्मामागेकारणीभूत आहेत का ? या खेळाची कल्पना कशी सुचली ?

मी काम करत असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) च्या बालशिक्षण शाळेमधील बास्केटबॉल, हॉकी वगैरे खेळांच्या संघांना झेड.पी. च्या स्पर्धेत तसेच शालेय स्तरांवरील अन्य स्पर्धांसाठी घेऊन जायचो. त्यादरम्यान कुतूहल म्हणून मी त्या त्या खेळांच्या जन्मकथांबद्दल माहिती मिळवायला लागलो आणि एकेक रंजक गोष्ट समजू लागली. अमेरिकेत एक माणूस एक चेंडू टप्पा-टप्पा खेळत असताना त्या चेंडूने उसळी घेतली आणि उंचावरच्या एका रिंग मधून खाली पडला. हे पाहून त्याचं डोकं चालू लागलं. त्याने काही जणांना बोलावून त्या रिंग मधून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच बास्केटबॉल हा खेळ उगम पावला. बॅडमिंटनचाही असाच किस्सा. पुण्यामध्ये ड्युटीवर असणारे काही इंग्रज अधिकारी असाच विरंगुळा म्हणून शॅम्पेनच्या बाटलीचे बूच (cork) इकडून तिकडे उडवत होते, मग त्यात अधिकाधिक सुधारणा होत होत त्याचे आज ज्ञात असलेले badminton खेळात रुपांतर झाले. हे सगळं वाचत असताना माझ्याही डोक्यात एक चक्र सुरू होतंच. मी स्वतः स्केटिंगचा खेळाडू असल्यामुळे त्या अनुषंगाने मला हा खेळ सुचला.


बऱ्याचदा गल्लीत/मैदानात खेळता खेळता एकापेक्षा अधिक खेळांचं मिश्रण होऊन त्याला आपल्या पदरचे नियम लावून ते नवे खेळ खेळले जातात(उदा. आम्ही खेळायच्या रिंगने ‘रिंग गोल’ हा खेळ खेळायचो). पण तो खेळ अजून मोठ्या स्तरावर घेऊन जावा असं काही कुणाला सुचत नाही. मग तुम्हाला हा नवा खेळ अधिक गांभीर्याने पुढे घेऊन जावासा का वाटला ?

नवनव्या कल्पना लढवणं, नवा खेळ जन्माला घालणं ही दरवेळी इतर परदेशातल्याच कुणाची मक्तेदारी का असावी ? आपण दरवेळेस त्यांचे खेळ खेळतोच, मग आपण आपला स्वतःचा खेळ पुढे का आणू नये, असं मला वाटायला लागलं आणि आपण रोलबॉल पुढे आणायचा असा विचार करून मी त्याला खतपाणी घालायला सुरुवात केली.


नवीन खेळ इतरांच्या गळी उतरवणे, त्यांना खेळात सहभागी व्हायला उद्युक्त करणे हे कसं केलंत ? त्याची सुरुवात कशी होती ?

आधी आमच्या बालशिक्षण शाळेमध्ये मी ही कल्पना फुलवली. तिथे मुलांचा सराव घेतला. अन्य शाळांच्या क्रीडा शिक्षकांना संपर्क करून त्यांच्यापर्यंत रोलबॉल पोचवायला सुरुवात केली. हळूहळू आंतरशालेय मैत्रीपूर्ण सामने खेळवले. यातूनच रोलबॉचा प्रवास सुरु झाला.


विविध स्केटिंग संघटना आणि प्रशिक्षक यांच्याशी तुम्ही संपर्क केलात का ? त्यांच्याकडून तुम्हाला स्केटिंगचे कौशल्य आत्मसात केले खेळाडूअगदी ‘रेडीमेड’च मिळाले असतील ना ?

नाही. उलट अशा प्रशिक्षकांचा प्रतिसाद अतिशय थंड होता. मी अनेकांना वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे काही स्केटिंगपटू या खेळासाठी मिळावेत अशी विनंती केली. एखाद्या प्रशिक्षकाकडे असलेल्या खेळाडूंपैकी सर्वचजण स्पीड स्केटिंग (स्केटिंगची शर्यत) मध्ये प्रवीण असतील असे नाही. पण असे खेळाडू रोलबॉलसारख्या वेगवेगळ्या प्रकारची कौशल्यं आवश्यक असणाऱ्या खेळात चुणूक दाखवू शकतात. “तुमच्याकडे असणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांपैकी २० मुलं आम्हाला रोलबॉलसाठी द्या” अशा अर्थाच्या विनंतीतही फार कमी जणांनी रस दाखवला. त्यापेक्षा त्यांना पैशात जास्त रस ! आपल्या विद्यार्थ्याला आपल्याच परिचयातील क्रीडा साहित्य बनवणाऱ्या व्यावसायिकाकडे पाठवायचे, तो विद्यार्थी चढ्या भावाने ते विकत घेणार, आणि त्यातला एक हिस्सा त्याच्या प्रशिक्षकाला मिळणार असला प्रकार ....


म्हणजे ही एक प्रकारची ‘कट प्रॅक्टिस’च झाली, वैद्यकीय व्यवसायात चालते तशी ...

हो... माझा पैसा कमावण्याला विरोध विरोध नाही. तुमच्यात खरोखरच एवढे नैपुण्य आहे ना ? मग स्वतःची फी वाजवून घ्या. भले ती इतर प्रशिक्षकांपेक्षा जास्त असेल.... पण तो तुमच्या कौशल्याचा पैसा आहे. कट प्रॅक्टिससारखा छोटा विचार करण्यापेक्षा खेळाचा विचार करावा... असो, यामध्ये मी जास्त लक्ष घालू इच्छित नाही. पैसा हे माझे प्राधान्य नसून रोलबॉल हे आहे... त्याचा प्रसार हाच माझा ध्यास आहे. आपण मूळ विषयाकडे येऊ.


रोलबॉलची प्राथमिक तयारी किती काळ चालली ? तो सर्वांसमोर अधिकृतरित्या कधी आला ?

२००० ते २००२ दरम्यान प्राथमिक तयारी, नियम निश्चिती आणि अन्य तांत्रिक बाबी या गोष्टी पार पाडल्या. फेब्रुवारी २००३ मध्ये तो इथे बालेवाडीतच ‘launch’ करण्यात आला.


रोलबॉलच्या Rollball.org या वेबसाईटवर ‘Collected and compiled technical data and made ready for publication’ असा उल्लेख आहे. हा डेटा नक्की कशा स्वरूपाचा असतो ?

खेळाचे नियम ठरवणे उदा. गोलपोस्ट, ‘D’ची, मैदानाची मापं निश्चित करणे इ. शिवाय हे निश्चित करताना फक्त भारतीय खेळाडूंच्या शारीरिक ठेवणीचा विचार न करता विविध देशांमधील खेळाडूंच्या चणींचाही विचार करून त्याचाही डेटा तयार करावा लागला होता.


नव्या खेळाची नोंदणी करावी लागते का ? ती प्रक्रिया कशी असते याबद्दल कुतूहल आहे

एकदा खेळाचे नियम निश्चित झाल्यावर ती सर्व माहिती Sports Authority of India (SAI) यांना कळवण्यात आली. त्यांच्यासाठी खेळाचे प्रात्यक्षिक आयोजित केले. त्यांचे संचालक आणि निरीक्षक स्वतः ते पाहण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचे समाधान झाल्यावर मग रोलबॉलला स्वतंत्र खेळ म्हणून मान्यता मिळाली.


भारतातून हा खेळ परदेशात कसा पोहोचवलात ?

आधी खेळाची वेबसाईट बनवून त्यावर खेळाची माहिती, नियम व व्हिडीओज टाकले. विविध देशांच्या क्रीडासंघटनांना email द्वारे संपर्क करून खेळाबद्दल सांगितले आणि वेबसाईट बघायला सांगितले.  त्यांना सतत संपर्क करून खेळासाठी उद्युक्त करत राहिलो.


हे प्रयत्न करताना पाश्चिमात्य देशांकडून “हा भारताचा माणूस आम्हाला काय शिकवणार” असा सूर कधी जाणवला का ?

काही युरोपियन देशांकडून सुरुवातीला असा अनुभव आला. कारण त्यांचा आशियाई देशांकडे बघण्याचा, त्यातही भारतीय उपखंडातील देशांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. सुदैवाने पाकिस्तान, श्रीलंका वगैरे  देशांच्या तुलनेत भारताची प्रतिमा खूपच चांगली असल्याने त्या देशांना थोडं ‘push’ केल्यावर तेही तयार झाले. आज चाळीस देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. या निमित्ताने विविध देशांशी चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत.


दक्षिण अमेरिकेसारख्या दूरच्या खंडातही हा खेळ पोचला आहे का ?

हो. गयाना देशाचा प्रतिसाद खूपच चांगला आहे. इतका, की आता तिथल्या संघटकांशी आता मैत्रीच झाली आहे असं म्हणू शकतो. आठवड्यातून दोन वेळा तरी रोलबॉलच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी फोनवरून संभाषण होते.


या सर्व देशांमध्ये तुम्ही प्रवास केलात का ?

हो. त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना भेटणे, त्यांनी गठित केलेल्या संघाला प्राथमिक प्रशिक्षण, त्यांचे निरीक्षण, त्यात सुधारणा सुचवणे ही कामे मी केली.


एवढ्या व्यस्त वेळापत्रकामधून कुटुंबियांना वेळ द्यायला जमते का ? त्यांची तक्रार नसते का ?

मी गेल्या चौदा वर्षात एकाही घरगुती समारंभाला उपस्थित राहिलेलो नाहीये. आजही माझ्या भाच्याचा एक समारंभ आहे आणि मी इथे आहे. सुरुवातीला कुटुंबियांची तक्रार असायची पण आता माझी तळमळ त्यांच्या लक्षात आली आहे.


तुम्ही त्यांना तुमच्याबरोबर कधी दौऱ्यावर वगैरे घेऊन जाता का ?

माझं शेड्युल इतकं पॅक असतं की ते शक्यच होत नाही. शिवाय मी एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा मी कुठल्या वेळेस नक्की कुठे असेन हे सांगता येत नाही. ज्याची भेट घ्यायची ते भेटले नाहीत तरी मी संबंधित इतर मंडळींना गाठल्याशिवाय परत येत नाही. माझ्या सॅकमध्ये पाणी आणि फरसाण किंवा तत्सम स्नॅक्स बाळगतोच. मग मला जेवण नाही मिळालं तरी चालतं. माझं तेवढ्यावर भागतं.


अहो, अशाने तब्येतीवर परिणाम होईल तुमच्या ...

(हसत) आता काहीच वाटत नाही. सवय झाली त्याची.


या सगळ्या प्रवासात सरकार आणि क्रीडा संघटना यांचा प्रतिसाद कसा होता. ?

खूपच चांगला.... भारतीय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, सरकार यांचे खूप चांगले प्रोत्साहन मिळाले. वाजपेयी सरकारच्या काळात क्रीडामंत्री विक्रम वर्मा यांचं खूप चांगलं पाठबळ लाभलं.


अजूनही बालशिक्षण शाळेशी मध्ये क्रीडाशिक्षकाचे काम करता का ?

हो. अजूनही माझ्या शाळेतल्या नोकरीची ७ वर्षे शिल्लक आहेत. शाळेने मला केलेलं सहकार्य अनमोल आहे. माझं शाळेशी गहिरं नातं निर्माण झालं आहे. मी शाळा सोडणं शक्य नाही. (हसत....) उद्या शाळा ‘येऊ नका’ म्हणाली तरी मी जात राहीन.


एवढा व्याप, जबाबदाऱ्या आणि खर्च कसं सांभाळता ?

या सर्व कामात मला वसंत राठी, सतीश घारपुरे, सुर्यकांत काकडे, विनीत कुबेर आदींचा खूपच आधार आहे. माझा मी खर्च करण्याचाच प्रयत्न करतो परंतु त्यापुढेही गरज पडल्यास मी यांच्याकडे आर्थिक मदतीची विचारणा करतो. ती तशी करण्याचा अवकाश, मला मदत उपलब्ध करून दिली जाते. शिवाय आता आदेश बांदेकर हे रोलबॉल संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष झाल्यापासून त्यांचीही खूपच मदत होते आहे. फक्त शोभेपुरते अध्यक्ष न राहता ते जातीने सर्व गोष्टीत लक्ष घालतात. आता रोलबॉल लीगच्या चारही दिवसात त्यांची रोज भेट असते. प्रेक्षकांमधून सामना कसा दिसतो इथपासून ते सहभागी संघातील खेळाडूंशी संवाद साधण्यापर्यंत सर्व प्रकारे सहभाग घेतात.


आतापर्यत मानसन्मान, पुरस्कार कोणकोणते मिळाले आहेत ?

मान भरपूर मिळाला. अमिताभ बच्चंन यांनी एका चॅनेलवरच्या कार्यक्रमात माझी मुलाखत घेतली, बांग्लादेशमधल्या रोलबॉल वर्ल्डकपच्या वेळी बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान झाला....  पुरस्कारांच्या बाबतीत बोलायचं तर क्रीडापुरस्कारांच्या यादीत रोलबॉल खेळाचं नावच समाविष्ट झालेलं नाहीये अजूनपर्यंत, त्यामुळे पुरस्कार मिळालेला नाही.


शेवटचा प्रश्न, रोलबॉल १४ वर्षात ४९० देशांपर्यंत पोचला. इतर देशी खेळांच्या तुलनेत ही खूप मोठी झेप आहे. यामागे काय कारण असावं ?

सतत पाठपुरावा ... काळाला अनुसरून प्रसार व्हायला हवा..... हरिभाऊ सानेंसारख्या महर्षींनी फार आधी सांगितलं होतं की कबड्डी मॅटवर न्यायला हवी, पण ती नेली गेली नाही.. शेवटी जपानने ती मॅटवर नेली तेव्हा आपण जागे झालो. अशा गोष्टींमुळे भारतीय खेळ जास्त दूर पोचू शकले नाहीत. आता एक कबड्डीचे लीग आले आहे, बाकीच्या खेळाचंही येईल ही अपेक्षा.


सरांना अजूनही प्रश्न विचारायचे होते पण ते किती व्यस्त आहेत हे मुलाखती दरम्यानही चालू असणारी कामं, रोलबॉल लीगच्या ठिकाणी ये जा करणारे स्वयंसेवक, संघटक, खेळाडू यांच्याशी चालू असणारा संवाद यातून लक्षात येत होतं. शेवटी त्यांची एक महत्वाची मीटींग सुरु होणार असल्यामुळे मी मुलाखत आवरती घेतली. मुलाखत संपली तेव्हा एका अतिशय जिद्दी आणि समर्पित व्यक्तीला आपण भेटलो आहोत याची पूर्ण जाणीव झाली होती. एका खेळाचा जनक आणि यशस्वी प्रसारक असणारा हा मनुष्य इतका साधासुधा असल्याचं पाहून माझा त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला होता....



mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2017/7/1/roll-ball-king-raju-dabhade-.html

प्रोत्साहन आणि प्रतिसादाच्या प्रतीक्षेत रोलबॉल



बालेवाडीच्या छत्रपती शिवाजी क्रिडा संकुलातली पहिलीच इमारत....  आतल्या कोर्टवर अटीतटीचा सामना सुरू....  एकीकडे सामन्याचं धावतं समालोचन चालू आहे....  दुसरीकडे फोटोग्राफर खेळातले अद्वितीय क्षण टिपण्याच्या गडबडीत.... रविवारचा दिवस असूनही गर्दी  मात्र मोजकीच आहे....  खरंतर समोरचा खेळ इतका वेगवान आहे की, डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळाडू इकडचे तिकडे गेलेले असतात. वेगाच्या बाबतीत Ice Hockey सोबत तुलना होऊ शकते असा हा सुसाट खेळ म्हणजे रोलबॉल. सोप्या शब्दात सांगायचं तर स्केटिंग, हँडबॉल आणि बास्केटबॉल यांचा संगम असणारा खेळ. पायाखालच्या फिरत्या चाकांमुळे त्याचा तोंडवळा परदेशी खेळासारखा वाटत असला तरी या खेळाचा जन्म आहे या महाराष्ट्राच्या भूमीतला..... तोही खुद्द पुण्यातलाच ! राजू दाभाडे या मराठमोळ्या व्यक्तीच्या कल्पकतेचा आणि ध्यासाचा अविष्कार ! रोलबॉल हा क्रीडाजगतातला सर्वात तरुण (आणि २१ व्या शतकात जन्मलेला एकमेव !) खेळ. अधिकृतरित्या २००३ साली जगासमोर आलेला हा खेळ फक्त १४ वर्षात जगातल्या चाळीस देशात पोचला असून एक लाखाहूनही अधिक खेळाडू या  खेळाशी संबंधित आहे. रोलबॉलचे ४ विश्वचषक सुध्दा झालेले असून ३ वेळा तो भारताने जिंकला आहे. यावर्षी  ढाक्याला झालेल्या विश्वचषक स्पर्धेत  १६ देशांच्या चुरशीच्या सामन्यांमधून भारत विजेता ठरला. परंतु अंटार्क्टिका वगळता सर्व खंडामध्ये पोहचलेल्या आणि खेळत असलेल्या या खेळाला अजूनही प्रतीक्षा आहे ती प्रेक्षकांच्या, मान्यवरांच्या आणि प्रायोजकांच्या भरघोस प्रतिसादाची. तस पहायला गेलं तर एक चांगली गोष्ट म्हणजे अन्य खेळाप्रमाणेच रोलबॉलचे ही लीग सुरू झाले असून 'महारोल बॉल लीग' असे त्याचे नाव आहे. यंदा हे लीगचे दुसरे वर्ष असून २३ ते २६ जून असा त्याचा कालावधी आहे. महाराष्ट्रातील ८ शहरांच्या नावांचे प्रत्येकी मुलांचे तसेच मुलींचे संघ यात भाग घेत आहेत. शहरांची नावं जरी महाराष्ट्रातील असली तरी यामध्ये भारतभराच्या खेळाडूंचा समावेश आहे.  (जम्मू काशीरचे खेळाडू या खेळामध्ये विशेष प्रवीण असून ते भारताच्या टीमचेही प्रतिनिधित्व करतात ही एक उल्लेखनीय बाब !)

स्पर्धेला व एकूणच रोलबॉल या खेळाला मिळणाऱ्या प्रतिसाद व प्रसिध्दी बाबत विस्ताराने माहिती घेतली असता एक धक्कादायक गोष्ट कळली की इंग्रजी वर्तमानपत्रांकडून या खेळाला प्रसिध्दी दिली जात नाही. फक्त आलिंम्पिकमध्ये असणारे खेळ व क्रिकेट यांनाच क्रीडापानांवर जागा देण्याचे त्यांचे धोरण असल्याचा रोलबॉलला तोटा झाला आहे. खेळ अधिकाधिक खोलवर पोचण्यासाठी त्यामध्ये जास्तीत जास्त उद्योगपती, प्रतिथयश तारेतारका यांना रस निर्माण होणे गरजेचे आहे. परंतु ते ज्यांचे वाचक असतात अशा इंग्रजी वर्तमानपत्रांची मात्र या खेळाबाबत उदासीनता असल्याने त्यांच्यापर्यंत हा खेळ पुरेसा पोचतच नाही. शिवाय लीगबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली असता बहुतांश पत्रकारांचा सगळा रस लीगच्या तपशिलांपेक्षा या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू कोण आणि त्याला किती रकमेचे 'डील' मिळाले यातच होता. सुदैवाने मराठी माध्यमांना मात्र याबाबतीत चांगला अनुभव असून बहुतांश मराठी वृत्तपत्रे नियमितपणे रोलबॉलचे वृत्त देतात. मराठी भूमीत, मराठी माणसाकडून जन्माला आलेला खेळ अशी आपुलकीची भावना याला कारणीभूत असू शकेल.

नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या कप्तानांसोबत आदेश बांदेकर
रोलबॉल संदर्भात महाराष्ट्रात एक अतिशय चांगली घटना घडली आहे. 'होम मिनिस्टर' मुळे घराघरात (शब्दशः!) पोचलेले आदेश बांदेकर यांनी रोलबॉल संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. बरेचदा मान्यवर व्यक्ती नावापुरत्या अध्यक्ष असतात. बांदेकरांनी ही भूमिका गांभीर्याने घेतली असून ते या खेळाच्या सर्व अंगामध्ये स्वतः बारकाईने लक्ष घालतात. लीगच्या चारही दिवसांमध्ये त्यांचा मुक्काम पुण्यातच असतो. सामने चालू असताना प्रेक्षक म्हणून कसा अनुभव आहे हे प्रेक्षागृहातून बघण्यापासून ते सामन्यानंतर सहभागी संघातील प्रत्येक खेळाडूची विचारपूस करेपर्यंत तसेच नवनवीन ठिकाणी रोलबॉलचा प्रसार, प्रशिक्षण करण्याचे प्रयत्नांवरही ते लक्ष ठेवतात. याबद्दल त्यांच्याशी सामन्यांच्या ठिकाणीच संवाद साधला असता रोलबॉलबद्दलचा जिव्हाळा दिसून आला. "मला हा खेळ खूप आवडला. राजू दाभाडे किती झोकून देऊन काम करत आहेत हे पाहून मला वाटलं आपलाही यात सहभाग असलाच पाहिजे. माझी स्वत:ची समाजामध्ये असलेली ओळख या आपल्या मातीतल्या खेळाच्या प्रसाराच्या कामी आली तर आनंदच आहे. अधिकाधिक मान्यवर व्यक्तींचे  लक्ष खेळाकडे वेधून घेण्याचा माझा प्रयत्न आहे.", असं त्यांनी सांगितलं. 

सामन्यानंतरचा पारितोषिक वितरण समारंभ
केसरी टूर्सच्या झेलम चौबळ याही रोलबॉल सामना पाहण्यासाठी रविवारी उपस्थित होत्या. या स्पर्धेतला रोलबॉलचा मुंबई संघ त्यांच्या मालकीचा आहे. अशाच मोठ्या व्यावसायिकांना या खेळाकडे अधिकाधिक प्रमाणात वळवल्यास खेळाचा विस्तार वेगाने होईल याबद्दल आयोजकांना विश्वास वाटतो. राजाश्रयाबरोबर लोकाश्रय मिळाला तर 'महा रोलबॉल लीग' हे 'महाराष्ट्र रोलबॉल लीग' न राहता खऱ्या अर्थाने 'महालीग' होईल.  प्रेक्षक म्हणून रोलबॉलला देणे प्रोत्साहन देणे ही आपलीही तितकीच मोठी जबाबदारी आहे.
 - प्रसाद फाटक
(रोलबॉलचे जनक राजू दाभाडे यांची सविस्तर मुलाखत येत आहे लवकरच .... )


mahamtb.com वर पूर्वप्रकाशित :   http://mahamtb.com//Encyc/2017/6/28/Roll-ball-is-waiting-for-encouragement-and-feedback-Article-.html

'निर्मिती : दो आँखें बारह हाथ' : एक 'क्लासिक' बनताना



चांगला दिग्दर्शक कला आणि तंत्र या दोन्ही गोष्टींवर हुकूमत असणारा असतो. मूल्यशिक्षण देण्याची जबादारी चित्रपटांनी घ्यावी का नाही हा नेहमी वादाचा मुद्दा असतो. पण कला आणि तंत्र या दोन्ही गोष्टींना मानवी मूल्यांचीही प्रभावी जोड दिली तर चित्रपट कालातील होतो यात शंका नाही. व्ही. शांताराम हे तंत्र, कला आणि मानवी मूल्यं या तिन्हींची प्रभावी गुंफण करणारे दिग्दर्शक होते . म्हणूनच त्यांची  गणना भारतीय चित्रपट इतिहासातल्या महान दिग्दर्शकांमध्ये होते.

कुंकू, माणूस, शेजारी, डॉ. कोटणीस की अमर कहानी आदि चित्रपटांमधून बंधुता, सहृदयता आदि मूल्यं आणि सामाजिक प्रश्न यांची अनोखी सांगड घालून व्ही. शांताराम यांनी आदर्श उदाहरणं घालून दिली. विश्राम बेडेकर, ग.दि. माडगूळकर अशा एकाहून एक सरस पटकथाकारांनी त्यांच्या चित्रपटांचा पाया रचला आणि शांतारामबापूंनी त्यावर उत्तमोत्तम वस्तू उभ्या केल्या.

ज्या चित्रपटाने पुढे इतिहास घडवला, राष्ट्रीय पुरस्कारासोबतच जो बर्लिन चित्रपट महोत्सव आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्येही गौरवला गेला त्या व्ही.शांताराम दिग्दर्शित 'दो आँखें बारह हाथ' चित्रपटाची निर्मितीकथा तपशीलवार सांगतं.  भालजी पेंढारकरांचे सुपुत्र, फिल्म्स डिव्हिजनच्या अनेक माहितीपटांचे दिग्दर्शक, रारंगढांग सारख्या 'सिनेमॅटिक' कादंबरीचे लेखक प्रभाकर पेंढारकर यांनी 'दो आँखें बारह हाथ' चित्रपटाचा प्रवास पटकथेपासून ते शेवटच्या स्क्रिनिंग 'याची देही ...' अनुभवला. त्यांच्याच शब्दात हे पुस्तक आकार घेतं.


'दो आँखें बारह हाथ' हा चित्रपट १९५७ सालचा. स्वातंत्र्य मिळून दहा वर्षे लोटली होती. स्वातंत्र्यलढ्याच्या पाठीमागे प्रेरणा म्हणून उभी असलेली मूल्यं, त्यावेळचा रोमँटिसिझम या गोष्टी काहीशा विरळ व्हायला सुरुवात झाली होती. अशा काळामध्येही सहृदयता, चांगुलपणावरचा विश्वास यांचा शांताराम बापूंवरचा प्रभाग अभंग होता. परिस्थितीने माणूस वाईट बनत असला तरी विश्वासाची फुंकर त्यावर घातली तर त्याच्यावरची राख दूर होऊन आतमधल्या चांगुलपणाला साद घालता येऊ शकते आणि पुन्हा त्याला सन्मानाने 'माणूस' बनाययला मदत होऊ शकते अशा संकल्पनेवर आधारित चित्रपटाची जुळवाजुळव करायला सुरुवात त्यांनी केली. एका जेलरने खरोखरच एकट्यानेच कैद्यांसोबत राहून त्यांना सुधारण्यास मदत केल्याचा अनोखा प्रयोग स्वतंत्र भारतात घडला होता. त्या घटनेचा अभ्यास करून त्यात चित्रपटाला उपयुक्त ठरेल असे बदल करून गदिमांनी पटकथा लिहून काढली होती व ती शांतारामबापूंच्या 'राजकमल' स्टुडिओमध्ये पोचली होती. प्रभाकर पेंढारकर तेव्हा स्टुडिओमध्ये अगदीच नवखे होते. पण त्यांचे अक्षर चांगले असल्यामुळे बापूंनी अनपेक्षितपणे त्यांना पटकथेची 'फेअर कॉपी' लिहून काढायला सांगितली आणि पेंढारकरांचा चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेत चंचुप्रवेश झाला.

या तपशिलांनी सुरु होणाऱ्या पुस्तकात मग हळूहळू स्टुडिओमधले चित्रीकरण, आऊटडोअर चित्रणासाठी कोल्हापूरकडे प्रस्थान, तिथल्या चित्रीकरणाचे तपशील देतदेत मग पेंढारकर एकेक रंग भरत जातात. चित्रपटातल्या पहिल्यापासून ते शेवटपर्यंतच्या सर्व प्रसंगातले संवाद या पुस्तकात आहेत. तसेच काही महत्वाच्या प्रसंगातले कॅमेरा angles, ते तसे घेण्यामागचा शांतारामबापूंचा विचार हेही उलगडून सांगितले आहे. पटकथेत असणाऱ्या दोनच ओळी शांतारामबापूंनी आपल्या दृष्टीने आणि कला-दिग्दर्शकाच्या सहाय्याने कशा फुलवल्या हे वाचणं खूप रंजक आहे.


निर्मितीकथा सांगता सांगता पेंढारकर शांतारामबापूंचे अनेक पैलू उलगडत जातात. चेहऱ्यावर फारशी प्रतिक्रिया उमटू न देणारे पण सगळीकडे अत्यंत बारीक लक्ष असणारे, अत्यंत नीटनेटके, शिस्तबद्ध, आदल्या दिवशी चित्रीकरणाला कितीही वेळ झाला तरीही दुसऱ्या दिवशी तितकेच फ्रेश असणारे असे शांतारामबापू ..... त्यांच्यातला दिग्दर्शक कायम जागा असे. या सजगतेची प्रचिती देणारा - अनपेक्षित पावसात प्रसंगावधान राखून गाण्याचे चित्रीकरण करण्याचा प्रसंग तर पेंढारकरांनी फारच बहारदार पद्धतीने शब्दबद्ध केला आहे.

शांतारामबापू तंत्राच्या बाबतीत कायमच काळाच्या पुढे होते १९४६ सालीच त्यांनी सैरंध्री हा बोलपट रंगीत चित्रित केला होता. त्या काळात रंगीत फिल्म डेव्हलपमेंटचे तंत्र  भारतात उपलब्ध नसताना त्यांनी इंग्लंडला जाऊन ते काम करून घेतले होते.  १९५७ सालापर्यंत हळूहळू रंगीत चित्रपट यायला सुरुवात झाली होती. खुद्द बापूंचाच 'झनक झनक पायल बाजे' हा रंगीत चित्रपट येऊन गेला होता. तरीही त्यांनी रंगांच्या मोहात न पडता 'दो आँखे ...' कृष्णधवलच चित्रित का केला ? त्याचेही उत्तर या पुस्तकात आहे, आणि त्यांनी ते तसे केले कारण त्यांना तंत्राची अचूक जाण होती. या चित्रपटासाठी अत्याधुनिक कॅमेरा वापरण्यामागचा आग्रह, त्यामागचा अभ्यास, त्यात चित्रीकरणाला अनुकूल असे बदल करण्याची गरज ओळखणे या बद्दलचे पुस्तकातले तपशील अभ्यासूंनी वाचलेच पाहिजेत असे आहेत. अशा गोष्टींचे documentation होणे हे अनन्यसाधारण महत्वाचे असते. प्रभाकर पेंढारकरांनी हे सगळे पुस्तकात टिपून ठेवल्यामुळे या पुस्तकाला संदर्भग्रंथांचे मूल्य प्राप्त झाले आहे.

हे पुस्तक आणखी एका कारणाने महत्वाचे आहे. या पुस्तकातून केवळ 'दो आँखें .. ' चीच माहिती मिळते असे नाही तर एकूणच सीन आणि शॉट मधला फरक काय, शॉट डिव्हिजन कसे असते, पार्श्वसंगीताची भूमिका काय असते, ध्वनिमुद्रक किती मेहनत घेतो, असतं पटकथा कुठे संपते आणि दिग्दर्शक कुठे सुरु होतो याबद्दल खूपच छान माहिती यामध्ये आलेली असल्याने सर्वसामान्य वाचकांना 'फ़िल्ममेकिंग' ची तोंडओळख यातून नक्कीच होऊ शकते.

या सर्व दृष्टीने पुस्तक महत्वाचं आहेच, पण ते सगळं लक्षात येतं ते हे पुस्तक वाचल्यानंतर.... मला हे पुस्तक 'अक्षरधारा'मध्ये पाहताक्षणीच घ्यावंसं वाटलं त्याचं कारण म्हणजे याची मांडणी ! पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनच बाळ ठाकूर यांची अप्रतिम स्केचेस सुरु होतात आणि ती शेवटच्या पानापर्यंत आपल्याला सोबत करतात... व्ही शांताराम, गदिमा, वसंत देसाई यांच्या रेखाचित्रांपासून ते चित्रपटातल्या  प्रसंगांच्या इलस्ट्रेशन्स पर्यंत एकाहून एक सरस स्केचेसमुळे अगदी समृद्ध झालंय पुस्तक. इतकं, की ते विकत घेऊन न वाचता आपल्या बुक-शेल्फमध्ये ठेवलं तरी बुकशेल्फची श्रीमंती द्विगुणित होईल ! सोबत चित्रीकरणाच्या वेळी घेतलेली उत्तम स्थिरचित्रे (Stills) देखील आहेत. पण त्यावेळी घेतलेल्या अशा स्थिरचित्रांची संख्या कमी असल्यामुळे की काय कुणास ठाऊक पण पुस्तकामध्ये चित्रपटातल्या दृश्यांची (बहुदा स्क्रीनचे फोटो घेऊन  वापरलेली) भर घालण्यात आली आहे. मोठ्या आकाराच्या पानांवर ही कमी resolution ची छायाचित्रे छापल्यामुळे ती अस्पष्ट दिसतात, एवढी एकमेव त्रुटी या पुस्तकात जाणवते. ती वगळता संपूर्ण पुस्तक म्हणजे 'कलेक्टर्स आयटम' झाले आहे हे निःसंशय झाली आहेत. एवढी एकमेव त्रुटी या पुस्तकात जाणवते. ती वगळता संपूर्ण पुस्तक म्हणजे 'कलेक्टर्स आयटम' झाले आहे हे निःसंशय !!


निर्मिती : दो आँखें बारह हाथ'

लेखक : प्रभाकर पेंढारकर

प्रकाशक: मौज प्रकाशन

पहिली आवृत्ती (२०१३)

पृष्ठे : १३५ , किंमत २५०

संघविचारांतून सामाजिक बांधिलकी जपणारे वेल्ह्याचे वसतिगृह



रविवारची प्रसन्न सकाळ. तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासाच्या वेल्हे येथील मुलांच्या वसतिगृहाच्या परिसरात लगबग सुरू होती... आयोजक मंडळी माइक, खुर्च्या, स्टेज व्यवस्थेपासून ते न्याहारीच्या तयारीपर्यंत व्यवस्था लावण्यात मग्न... वसतिगृहापाठीमागेच धीर देत उभा असलेला खंबीर तोरणा किल्ला ! पुणे, सातारा, बारामती वगैरे ठिकाणाहून आलेले हितचिंतक, कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबीय यांचे स्वागत करण्यासाठी मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी फेटा बांधलेली आणि सुरवार-कुडता घातलेली शाळकरी मुले स्वागतासाठी सज्ज होती. निमित्त होते ते न्यासातर्फे बांधण्यात येत असलेल्या ग्रामविकासोन्मुख नूतन वास्तूचे भूमिपूजन.
अत्यंत उत्साहात सुरु झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशींच्या हस्ते भूमिपूजन, नंतर प्रास्ताविक व प्रसंगानुरूप वैयक्तिक पद्य सादर झाले व त्यानंतर भैयाजींचे 'सेवाकार्य' या अनुषंगाने छोटेखानी भाषण झाले. ‘प्रत्येक वेळेस सरकारी मदतीची अपेक्षा धरून निष्क्रिय बसण्यापेक्षा स्वतःहून पुढे होऊन कामाला लागणे कसे आवश्यक आहे’ हे त्यातले मुख्य सूत्र होते. “समाजाच्या उत्थानासाठी कार्य करायचे हा ध्यास घेऊन अनेक संघ स्वयंसेवक उभे राहिले. स्वयंवसेवकांचे गोत्र असते ते ‘डॉ हेडगेवार’ ! या गोत्रातील मंडळी जेव्हा सामाजिक कार्यात उतरतात तेव्हा ‘डॉ हेडगेवार’ या नावासोबत येणारी प्रतिष्ठा त्या संस्थेस प्राप्त होत असते. त्यामुळे दोन जबाबदाऱ्या येतात. एक म्हणजे समाजाचा विश्वास संपादन करणे आणि दुसरी म्हणजे समाजाची गरज लक्षात घेऊन काम करणे. उपेक्षित जीवन जगणारा भटका-विमुक्त वर्ग, दुर्गम भागात राहणारा वनवासी वर्ग आणि अपमानित जीवन जगणारा दलित वर्ग या सर्वांच्या उन्नतीचा विचार आपण करत नाही तोपर्यंत आपल्या मातृभूमीला परमवैभव प्राप्त होऊ शकत नाही" असे प्रतिपादन त्यांनी केले.
न्यासाचे वेल्ह्यातील काम तीस वर्षे जुने आहे पुण्यापासून अवघ्या ५० कि.मी. अंतरावर असणाऱ्या गावी मूलभूत सोयीसुविधांची वानवा होती. परंतु भैयाजींनी भाषणात म्हटल्याप्रमाणे फक्त सरकारी मदतीची वाट पाहत न बसता १९८६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांच्यातील विचारमंथनातून शिक्षण व स्वावलंबन या गोष्टी प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवून 'तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासा'ची स्थापना झाली. तोरणा, राजगडाच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या गावांमध्ये चौथी किंवा जेमतेम सातवीपर्यंत शाळा. त्यामुळे त्यापुढे जाऊन मुले शिकत नसत. मग त्यांच्यासाठी वसतिगृह उभारण्याची योजना झाली (वेल्हे गाव तालुक्याचे असल्याने इथल्या जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती त्यातल्या त्यात चांगली आहे. शिवाय आता विद्या प्रतिष्ठानची बारावी पर्यंतची शाळादेखील आहे). मग गावांमध्ये जाऊन वसतिगृहाविषयी माहिती देऊन गावकऱ्यांना आपल्या मुलांना पाठवण्यासाठी राजी करण्याचे कठीण काम येथील कार्यकर्त्यांना करावे लागले. या सगळ्यामागे वसतिगृहाचे व्यवस्थापक श्री. रमेश आंबेकर यांचे विलक्षण कष्ट आणि समर्पण यांचा महत्वाचा वाटा आहे. रमेशजी मूळचे खेड तालुक्याचे. संघप्रचारक म्हणून काही काळ काम केल्याने वैचारिक बैठक पक्की. चारचौघांप्रमाणे नोकरी न करता त्यांनी स्वतःहून वसतिगृहाच्या कामाची जबाबदारी स्वीकारली आणि कुटुंबासह या गावी येऊन पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. मुलांकडून कुठलेही शुल्क आकारले न जाणारे हे वसतिगृह त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आज अतिशय व्यवस्थित चाललेले आहे एवढेच नाही तर इथले सत्कार्य वर्धिष्णू आहे.
कार्यक्रमाच्या वेळी दाखवलेल्या ध्वनिचित्रफितीमुळे न्यासाच्या कामाबद्दल अनेक चांगल्या गोष्टी कळल्या. न्यासाच्या पुढाकारातून या भागात आज बचतगट सुरु झाले आहेत. संपूर्ण पावसाळ्यात तुफान पाऊस कोसळत असूनही उन्हाळ्याचे चार महिने इथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असायचे त्यावर तोडगा म्हणून जलसंधारणाची कामे सुरु झाली आहेत. तोरणा-राजगड या स्वराज्याच्या मानबिंदूंची होणारी हेळसांड थांबवणे तसेच इथले गैरप्रकार रोखणे यासाठी दुर्गसंवर्धन समिती स्थापन झाली आहे. वसतिगृहातून शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांना पदवीपर्यंत शिक्षणासाठी मदतही केली गेली आहे. अशा विद्यार्थ्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेता घेता त्या त्या गावी विद्यार्थी विस्तारक म्हणूनही काम केले, एवढेच नाही तर एक मुलगा शिक्षण संपल्यानंतर घरची परिस्थिती कठीण असूनही संघाचा प्रचारकही निघाला. त्यानंतर माहिती दाखवली गेली ती न्यासाच्या पुढाकाराने व कॉग्निझंट कंपनीच्या मदतीने सुरु झालेल्या भट्टी, केळद, पासली, कुंबळे इत्यादी दुर्गम गावांमधील विद्यार्थिनींसाठीच्या कॅबसेवेबद्दल. ते पाहिले आणि अतिशय आनंद झाला. मन आपोआप सहा-सात वर्षांमागे गेले आणि या कामासाठीच्या सर्वेक्षणात मीही सहभागी होतो त्यावेळच्या आठवणी ताज्या झाल्या.
माझा मित्र भूपेश महाले या वसतिगृहावर  येऊन मुलांचा नियमितपणे अभ्यास घ्यायचा. वसतिगृहामुळे दुर्गम भागातल्या मुलांच्या शिक्षणाला चालना मिळाली असली तरी त्याच गावच्या मुलींच्या शिक्षणात तेच अडथळे होते. त्यामुळे त्यांच्यासाठी एखादी कॅब/बस सुरु केली तर त्या शाळेपर्यंत जातील तरी, अशा कल्पना त्याला सुचली. त्यासाठी कुठल्या गावी किती मुली आहेत, शिकणाऱ्या किती, कुणाच्या पालकांची मुलींना पाठवायची इच्छा आहे याचे आम्ही सर्वेक्षण केले होते व GPS वापरून कॅबसाठी अंतरासहित नकाशा तयार केला होता. रमेशजींचा सर्व गावांमध्ये दांडगा संपर्क. ज्या क्षणी तेच या कामात लक्ष घालत आहेत असे घरोघरच्या मंडळींना कळायचे तेव्हा त्यांच्या - विशेषतः स्त्रियांच्या - चेहऱ्यावर क्षणार्धात जे समाधान आणि विश्वास दिसायचे ते मी आजही विसरू शकत नाही. त्यावर्षी ती योजना काही सुरु होऊ शकली नव्हती. आज ती कॅबसेवा सुरु असल्याचे पाहून खूप आनंद होत होता.
इथे उल्लेख केलेल्या मंडळींशिवाय अनेकांचे हात या कार्याला लागलेले आहेत. त्या सर्वांची नावे विस्तारभयास्तव देणे शक्य नाही पण संघ प्रेरणेतून किती उत्तम कार्य उभे राहू शकते हे बघून भारावल्यासारखे होत होते. आता या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून इथे दुसरी इमारत उभी राहत आहे. विविध प्रकारच्या शिक्षणाचे केंद्र इथे सुरु करण्याची योजना आहे. वेल्डिंग, फिटिंग, इलेक्ट्रिशियन इ. चे ITI च्या धर्तीवरील प्रशिक्षण, याभागात मुबलकपणे उपलब्ध असलेल्या बांबू, हिरडा व अन्य वनस्पतींपासून उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे. त्याचसोबत एका अनोख्या विषयाला हात घालण्यात येणार आहे. इथली अनेक गावे शिवाजी महाराजांनी वसवली आहेत, त्यामुळे त्याकाळात इथे पाण्याची चांगली व्यवस्था लावून दिलेली असल्याचे काही पुरावे अलीकडे सापडत आहेत. या नव्या केंद्राच्या माध्यमातून त्यविषयीही सखोल अभ्यास करण्याचा मानस आहे. साहजिकच अपेक्षा आहे ती आर्थिक व अन्य स्वरूपातील मदतीची. त्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत न्यासाच्या कार्याची महती पोहोचावी यासाठीच भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर लोकांना आमंत्रण दिले गेले होते आणि त्याला अनेक हितचिंतकांनी उपस्थित राहून प्रतिसादही चांगला दिला. फक्त खंत याचीच वाटते की त्या गर्दीत तरुणांचे प्रमाण ज्येष्ठ नागरिकांपेक्षा खूप कमी होते.
या लेखाच्या निमित्ताने वाचकांना पुन्हा एकदा आवाहन आहे की नवीन इमारतीच्या उभारणीसाठी अधिकाधिक मदत करावी. याशिवाय वसतिगृहावरील विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी सोडवण्यासाठी महिन्यातील काही दिवस आपण नक्की देऊ शकतो.
जाता जाता एका सुंदर पद्यातल्या चार ओळी उद्धृत कराव्याश्या वाटत आहेत -
 
कोटि आँखो से निरंतर आज आसू बह रहे हैं  |
आज अनगिन बंधू दुःसह यातनाएं सह रहे हैं |
दुख हरे सुख दे सभी को एक यह आचार है |
शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है ||
अधिक माहितीसाठी संपर्क
अध्यक्ष : उमेश देशपांडे - ९८२२०८०२१४
सचिव : मंदार अत्रे - ९४२२००८०६८
सहसचिव : रमेश आंबेकर - ९४२१०५१८२२

मा. एकनाथजींनी सांगितलेली कथा विवेकानंद शिलास्मारकाची



स्वामी विवेकानंद म्हणजे ऊर्जा, चैतन्य, विचार यांचे तेजस्वी प्रकटीकरण. पूर्वेच्या वंगभूमीत जन्मलेला, वाढलेला हा तरुण या राष्ट्राच्या शोधासाठी घराबाहेर पडला, निरीक्षण, संवाद, अभ्यास, चिंतन करत करत देश पालथा घातला आणि सरतेशेवटी भारताच्या दक्षिणतम टोकावर जाऊन त्यांनी सर्व अनुभवांचे मनन केले तेव्हा त्यातून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याचे उद्दिष्ट गवसले. अशा ऐतिहासिक ठिकाणी साठ वर्षांनी एका समर्पित कार्यकर्त्याच्या पुढाकाराने 'देशाचे गौरवस्थान' असा लौकिक मिळवेल असे भव्य शिलास्मारक उभे राहिले. त्या स्मारकाच्या जन्माची थक्क करणारी गाथा म्हणजे प्रस्तुत पुस्तक !

एकनाथजी रानडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय स्तरावरील पूर्णवेळ कार्यकर्ते. १९५७ ते ६३ या कालावधीत त्यांनी सरकार्यवाह हे संघातील क्र. दोनचे पदही भूषविले होते. ते संघकार्यात प्रामुख्याने उत्तर व पूर्व भारतात व्यस्त असताना सुदूर दक्षिणेत वेगळ्याच घटना घडत होत्या. ज्या खडकावर स्वामी विवेकांदांनी ३ दिवस ध्यान केले आणि त्यानंतर त्यांना आपल्यासमोरच्या उद्दिष्टाची निश्चित जाणीव झाली तो खडक  वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. स्थानिक मंडळींनी या शीलेचे महत्व जाणून तिथे विवेकानंदांचे स्मारक उभारण्यासाठी हालचाल सुरु केल्याचे कळताच स्थानिक ख्रिश्चन मंडळींनी अचानक हा खडक सेंट झेवियर्सचा खडक आहे असे जाहीर करून तिथे ख्रिस्ताची खूण म्हणून क्रूस लावला. या शीलेवर शंकराची वाट पाहणाऱ्या पार्वतीचे पाऊल उमटलेले आहे अशी श्रद्धा असल्यामुळे तसेच विवेकांदांच्या आयुष्यातली प्रेरणादायी घटना म्हणूनही हिंदूंच्या दृष्टीने ही शीला अनन्यसाधारण महत्वाची असल्याने त्यांना ही शिरजोरी रुचणे शक्यच नव्हते. त्यातूनच मग क्रूस उखडून तिथे विवेकानंदांबद्दल माहिती देणारा शिलालेख बसवणे, ख्रिश्चनांनी तो काढून पुन्हा क्रूस बसवणे असले प्रकार सुरु झाले. तेव्हा स्थानिक स्मारक राज्य समितीच्या मंडळींनी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींकडे स्मारकाच्या कामाची तड लावण्यासाठी ‘एकनाथजी रानडे यांची मदत मिळू शकेल का’ अशी विचारणा केली. गुरुजींनी होकार दिल्यामुळे एकनाथजी या कामाकडे वळले. त्यांना स्थानिक परिस्थितीबद्दल काहीच कल्पना नव्हती, परंतु मागच्याच वर्षी (१९६२) विवेकानंदांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विवेकानंदांच्या प्रचंड विचारधनाचे सार ‘Rousing Call to Nation’ या नावाने (जे ‘हिंदुतेजा, जाग रे !’ या नावाने मराठीतही प्रसिद्ध आहे) सुटसुटीत स्वरुपात संकलित केले असल्याने ते स्वामीजींच्या विचारांशी अतिशय जवळून परिचित व प्रेरितही झाले होते. त्यामुळे पुढच्या कामासाठी वेगळ्या प्रेरणेसाठी अन्य कशाचीच आवश्यकता नव्हती. त्या दिवसापासूनच सुरू झाला एका जगड्व्याळ कामाचा विलक्षण प्रवास .... हिंदू-ख्रिश्चन वादात अतिशय बोटचेपी भूमिका घेतलेल्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री भक्तवत्सलम् यांना राजी करण्यासापासूनच सुरुवात करायची होती. त्यांना वळवून घेण्यासाठी एकनाथजींनी केलेले भगीरथ प्रयत्न, क्लृप्त्या, वैचारिक देवाणघेवाण ही कुठल्याही सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी कार्यकर्त्यासाठी एक आख्खा अभ्यासक्रमाचा विषय आहे. पाठोपाठ राष्ट्रीय पातळीवरचे नेते, दहा दिशांना तोंडे असणारी नानाविध पक्षाची मंडळी यांना अनुकूल करून घेणे, कन्याकुमारीच्या मंदीर व्यवस्थापनापासून ते राजकीय विरोधकांपर्यंत अनेकांना सांभाळत ऐनवेळेला उपटलेल्या वादांवर मात करत त्यांनी स्मारकाचा मुद्दा ज्या जिद्दीने पुढे नेला ते वाचून अक्षरशः स्तिमित व्हायला होते. त्यासाठी हे पुस्तक मुळातूनच वाचण्याला पर्याय नाही.

खरंतर एकनाथजींचे निवेदन म्हणून हे पुस्तक आपल्यासमोर असले तरी त्याला कदाचित सर्वसामान्यपणे पुस्तकांना लागणारे निकष लावता येणार नाहीत. कारण हे आहे त्यांचे अनुभव, चिंतन, मार्गदर्शन यांच्या जाहीर प्रकटनाचे संकलन.  विवेकानंद स्मारक समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले आयुष्य राष्ट्रसेवेसाठी देण्यासाठी बाहेर पडणाऱ्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या – ज्यांना ‘जीवनव्रती’ असे संबोधले जाते - पहिल्या फळीसमोर केलेल्या १० व्याख्यानांचे हे एकत्रीकरण आहे. स्मारकाचा इतिहास काय, त्यामागचा विचार काय आणि पुढे काय कार्य करायचे आहे या सर्व गोष्टी सुस्पष्टपणे चित्र उभे राहण्यासाठी ही व्याख्याने दिली गेली होती. सुनिश्चित उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काम केलेले असल्यामुळे एकनाथजींच्या विचारांमध्ये कमालीची सुसूत्रता होती, ज्याचे प्रतिबिंब या भाषणांमध्ये उमटले आहे. स्वामीजींच्या कार्याचा गौरव करणारे स्मारक होणे जितके महत्वाचे आहेच पण त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्यासाठी लोकांना उद्युक्त करणे त्याहूनही जास्त महत्वाचे आहे याबद्दल त्यांच्या मनात कोणताही संदेह नव्हता. म्हणूनच केवळ राजकीय व्यक्तींना राजी करणे, आर्थिक मदत घेणे एवढ्यापुरते हे काम सीमित न करता देशभरातून सर्व राज्यांतून प्रत्येकाकडून अवघा १ रुपया एवढेच निधीसंकलन केले गेले. त्यामुळे स्वामी विवेकानंद बंगालची अस्मिता म्हणून मर्यादित न राहता गावोगावी, घराघरात पोचले. पुस्तकाच्या पूर्वार्धात या सर्वाचे विस्तृत विवेचन आहे. तर उत्तरार्ध हा स्मारकउभारणीनंतर कायस्वरूपी संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश, त्यासाठी कार्यकर्ते घडवण्याची गरज व आपल्या उज्ज्वल परंपरेची आठवण करून देत त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा अशा स्वरूपाचा आहे, त्यामुळे उत्तरार्धात घटनांचा तपशील अगदी कमी असून वैचारिकतेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे.

शेवटी परिशिष्टाच्या विभागात अतिशय महत्वाचे असे ३ तपशीलवार संवाद आहेत. १) स्मारक निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात देशाचे सांस्कृतिक मंत्री असणारे हुमायून कबीर यांच्याशी एक्नाथजींचा संवाद २) तामिळनाडूचे तेव्हाचे मुख्यमंत्री भक्तवत्सलम यांच्यात परवानगी मिळवण्याच्या दृष्टीने झालेले संभाषण ३) स्मारकाची परवानगी मिळाल्यानंतर अधिक तपशिलासंदर्भात एकनाथजी व भक्तवत्सलम यांच्यात झालेला संवाद (एकनाथजींच्या कामाची पद्धत इतकी विलक्षण होती की हा संवाद त्यांनी लिखित स्वरुपात नोंदवून स्थानिक जिल्हाधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घेतला आहे (त्याने भक्तवत्सलम यांना तो मजकूर दाखवून पडताळूनही घेतला होता), त्यामुळे या संवादाला आता दस्तावेजाचे स्वरूप आले आहे).

विवेकानंदांइतकेच एकनाथजींच्यामोरही नतमस्तक व्हायला लावणारे हे पुस्तक आहे. कुठल्याही कार्याचा कार्यवाह कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणजे एकनाथजी. जिद्द, चिकाटी, कष्टाची तयारी, नियोजन हे तर सर्व महत्वाचे गुण त्याच्या अंगी असायला हवेतच, पण त्याच्यात असायलाच हवा असा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे 'संवादकौशल्य'. परस्पर विवादाचे मुद्दे बाजूला ठेवूनही राष्ट्रकार्यासाठी अनेक विचारधारांच्या लोकांना एकत्र आणता येऊ शकते हे त्यांनी फार नेमके जाणले होते. कुणी कुठल्याही विचारधारेचा असला तरी त्याचा पृष्ठभाग थोडासा खरवडला तर त्याच्यातले हिंदुत्व, राष्ट्रीयत्व जागे करता येऊ शकते हा त्यांचा दृढविश्वास. याच विश्वासातून त्यांनी दिल्लीश्वरांपासून ते तमिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळघमच्या करुणानिधींपर्यंत, बंगालच्या ज्योती बसूंसारख्या कम्युनिस्ट मंडळींपासून नागालँडचे मुख्यमंत्री व जनतेपर्यंत सर्वांना या कामाशी जोडून घेतले. तब्बल सव्वातीनशे खासदारांच्या स्मारकाला पाठिंबा देणाऱ्या स्वाक्षऱ्या घेतल्या ! सर्वसमावेशकतेचे यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरे कुठले असू शकते ?

या सर्व घडामोडींमध्ये एकनाथजींना काय काय कष्ट करावे लागले असतील ? प्रत्येकाच्या कलाने घेणे, त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, विचारांची दिशा, हळवे कोपरे जोखत-जोखत स्मारक उभारणीचे महत्व सर्वांच्या गळी उतरवणे, त्यांच्या सह्या घेणे एवढेच काय पण पत्रकारांनाही हे सर्व पटवून देऊन त्यांच्याकडून स्मारकाला अनुकूल लिखाण प्रसवेल याची काळजी घेणे .... एक ना दोन ... अशा वेळेस त्यांच्या मदतीला धावून आलेली गोष्ट म्हणजे पूर्वीपासूनच असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क ! संघ कार्यकर्त्याच्या जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि पायात भिंगरी असावी लागते असे म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २३ वर्षे त्यांच्यावर असणाऱ्या विविध जबाबदाऱ्यांमुळे या गोष्टी एकनाथजींकडे विपुल प्रमाणात होत्या. ते केवळ रा.स्व.संघांचे काम करत होते म्हणूनही अनेकदा स्मारकाला पाठिंबा देणे नाकारले जायचे अशा वेळेस जिभेवर साखर असणे आवश्यक. अनेक संघर्षाच्या प्रसंगात ते हिमालयासारखे शांत उभे राहिले आणि वाद टाळले. कामानिमित्त एकनाथजींनी प्रचंड प्रवास केला. शब्दशः आसेतुहिमाचल देश पिंजून काढला. त्यांनी कुठल्याकुठल्या ठिकाणाचे किती किती वेळा संदर्भ दिलेत याहे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही. या काळातल्या त्यांच्या प्रवासाची तुलना बहुदा फक्त गोळवलकर गुरुजींच्या प्रवासाशीच होऊ शकते (गुरुजी वर्षातून २ वेळा आख्खा भारत पालथा घालत - असा प्रवास जवळपास ३० वर्षं केला होता !)

संघ कार्यकर्ते जातील तिथे एवढी माणसे जोडतात की पुढे जेव्हा एखादी हाक जरी त्या व्यक्तीच्या कानी पडली तरी तो ‘ओ’ दिल्याशिवाय राहत नाही. किंबहुना एकनाथजींवर स्मारकाची जबाबदारी येऊन पडण्याचे कारणच हे होते की त्यांचा दिल्लीत व इतर ठिकाणी मोठमोठ्या माणसांशी खूप चांगला संपर्क होता. यासंदर्भात पुस्तकातले  उदाहरण देतो. स्मारक उभारणीचा विचार अगदी बीजरूपात होता तेव्हाच (१९६३ मध्ये) एकनाथजी रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी माधवानंद यांना भेटून त्यांचे याबद्दलचे विचार जाणून घेण्यासाठी गेले. कारण रामकृष्ण मिशन ही यांनीच स्थापिलेली संस्था. १९५० ते १९६३ च्या काळात कलकत्त्याला असताना एकनाथजी दर १५ दिवसांनी स्वामी माधवानंद यांना भेटायला जात असल्यामुळे त्यांच्यात आधीपासूनच ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्यामुळे या कामासाठी विचारायला जेव्हा एकनाथजी गेले तेव्हा त्यांनी आनंदाने अनुमोदन तर दिलेच पण उलट मिशनचा संपूर्ण पाठिंबा या कार्यात मिळेल अशी ग्वाही देऊन आशीर्वाद देखील दिले. पुढे पूर्वांचालासारख्या ठिकाणी निधीसंकलनाच्या निमित्ताने जेव्हा संपर्क झाला त्यासाठीच्या वातावरणनिर्मितीसाठी तेव्हा रामकृष्ण मिशनने प्रकाशित केलेल्या विवेकानंदांच्या साहित्याचा खूप उपयोगही झाला.

पन्नास वर्षापूर्वीच्या या भव्य जागरण यज्ञातून एक अद्वितीय शिल्प १९७० साली साकारले गेले आणि सोबतच स्थापन झालेल्या विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते आज आपल्या समर्पणातून वनवासी भाग, पूर्वोत्तर राज्यांमधले दुर्गम भाग अशा ठिकाणी शाळा, आरोग्यसेवा अशा सेवाकार्यांच्या माध्यमातून देश जोडण्याचे आणि देश बलशाली करण्याचे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न साकारण्यासाठी झटत आहेत. १२ जानेवारीच्या स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने त्यामागच्या एकनाथजींच्या प्रेरणेची माहिती घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी हे पुस्तक अनन्यसाधारण महत्वाचे आहे.

- विवेकानंद केंद्र प्रकाशन,

- मराठी विभाग,

- पृष्ठे १८४,

- किंमत ५० रू,

- आवृत्ती आठवी.

- प्रसाद फाटक

वसंत सरवटे : एक अव्वल ‘इलस्ट्रेटर’



आपला एखादा सुहृद जेव्हा जग सोडून जातो तेव्हा त्याच्यासोबत व्यतीत केलेल्या प्रसंगांच्या आठवणी आपल्या डोळ्यासमोरून झरझर सरकू लागल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. जेव्हा वसंत सरवटे यांचे निधन झाल्याचे कळले, तेव्हापासून त्यांनी केलेली असंख्य ‘इलस्ट्रेशन्स’ माझ्या डोळ्यासमोर ‘स्लाईड शो’ सारखी सतत माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत. ती चित्रे सुटेपणाने एक ‘कलाकृती’ म्हणून श्रेष्ठतम नसतीलही पण त्या सगळ्यांची बेरीज करून साकार होणारे वसंत सरवटे मात्र नक्कीच श्रेष्ठ होते.

वसंत सरवटे म्हटले की आजही माझ्यासारख्या असंख्य 'पु.ल.'प्रेमींना सर्वप्रथम आठवतात ती त्यांच्या पुस्तकांमधली एकापेक्षा एक अफलातून रेखाटने. खरंतर पुलंची अवघी भाषाच चित्र, ध्वनी, गंध यांनी संपृक्त आहे. त्याला कुठल्याही पार्श्वसंगीत किंवा रेखाटनांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. असे असतानाही त्यांची कित्येक पुस्तके सरवटेंनी आपल्या रेखाटनांनी अशी काही फुलवली आहेत की आता त्या चित्रांशिवाय ती पुस्तके डोळ्यासमोर येऊच शकत नाहीत. खरं म्हणजे पुलंची पुस्तके द.ग.गोडसे, दीनानाथ दलाल यांच्यासारख्या दिग्गज चित्रकारांनी किंवा शि. द. फडणीस यांच्यासारख्या त्यावेळी तुलनेने नव्या चित्रकारांनीही सुरेख सजवली, पण खऱ्या अर्थाने पुलंचे गुळपीठ वसंत सरवटेंशीच जमल्याचे प्रकर्षाने जाणवते. अद्वैत तत्वज्ञान म्हणजे फारसे काही अवघड नसणारे. अद्वैताची माझ्या लेखी असणारी व्याख्या म्हणजे 'पुलंचे शब्दातल्या टपल्या आणि सरवटेंच्या रेखाटनांमधले चिमटे एकत्र येऊन जे काही तयार झाले आहे ते, किंवा भा. रा. भागवतांच्या भाषेतला आणि राम वाईरकरांच्या ब्रशमधला उत्साह एकमेकांत मिसळून जो प्रवाह निर्माण झालाय तो म्हणजे अद्वैत', इतकी सरळ सोपी आहे. एकवेळ पुलंच्या 'गणगोत' मधली व्ही. एन. ओक यांनी अनेक तपशीलवार चितारलेली  विनोबा, बालगंधर्व किंवा ब.मो.पुरंदरेंची चित्रं आपल्या लक्षात राहिली तर ते आपण समजू शकतो पण 'बाळा नो नो रे' मधली सरला वाखणकर, 'पुलं तुम्ही स्वतःला कोण समजता' मधला थेरडा 'बोळके', 'खुर्च्या' मधले नाट्यकलेच्या भवितव्याची चिंता करणारे हिप्पीसदृश 'न-प्रेक्षक', 'विश्व.अश्व.शब्दे'मधला हिडीस प्रकाशक, 'मंगूमामा मंगूमामा' कवितेतले हवा भरेलेले पाडगावकर, ‘आवाज आवाज’ मधली 'कुक' म्हणणारी प्रेमळ आगगाडी, 'बटाट्याची चाळ' मधले ते पत्र्यावरचे मांजर, ‘ललित आत्मपरिचय कसे लिहावे’मधला विद्रोही लेखक कालिका दसनुरे वगैरे अन्य असंख्य मंडळी मजकुरात एकेका ओळीपुरती येऊनही जशीच्या तशी लक्षात राहतात. ही सरवटेंच्या प्रभावाची मोठी पावती असेल !


वसंत सरवटेंची चित्रे पाहता क्षणी सर्वात पट्कन लक्षात येतात ते म्हणजे त्यातले तपशील. खरेतर पुस्तकातली चित्रे ही मुख्यत्वे करून मजकुराला सहाय्यभूत/पूरक ठरावीत इथपतच असली तरी पुरेसे असते, त्यांनी 'पेंटिंग' इतके सविस्तर असण्याची आवश्यकता नसते पण सरवटेंची पुस्तकांमधली रेखाटने अर्कचित्र स्वरुपात येत असली तरीही त्यातले तपशील इतके लक्षणीय असतात की काहीवेळा त्या चित्रे डोळ्यासमोर ठेवून मग लेखकाने मजकूर लिहिलाय की काय अशी शंका येते, हेच सरवटेंच्या कलेचे यश म्हणायला हवे ! सुरुवातीच्या काळामध्ये खरंच असं घडल्याचे त्यांनीच लिहून ठेवले आहे. रघुनाथ तेंडुलकर यांच्या एका दीर्घकथेसाठी चित्रं काढण्याबाबत त्यांनी सरवटेंकडे विचारणा केली. कथेचा आराखडा सांगितला त्यानुसार त्यांना आधी रेखाचित्रे काढायला सांगितली. तपशील हाताशी नसल्यामुळे सरवटेंनी आपल्या आकलनानुसार ती काढल्यानंतर मग रघुनाथरावांनी त्याभोवती पात्रांच्या लकबी वगैरे तपशील भरून काढून कथा पूर्ण केली. या अनोख्या अनुभवामुळे पात्रांचे शारीरिक तपशील हाताशी नसतानाही आपली कल्पनाशक्ती वापरून पात्रं जिवंत करण्याची हातोटी त्यांना साधली.


पुलंच्या साहित्याव्यतिरिक्तदेखील विनोदी वाङ्मयाशी सरवटेंची विशेष गट्टी दिसून येते. दात पुढे डोकावणारे खट्याळ पुलं आणि अक्कडबाज मिशा, हातात हातोडा असूनही अतिशय निरागस भाव चेहऱ्यावर असणारा मिश्किल ठणठणपाळ ही सरवटेंची खऱ्या अर्थाने अजरामर रेखाटने. गंगाधर गाडगीळांच्या 'बंडू' कथा, मंगेश पाडगावकरांचा 'उदासबोध', रमेश मंत्रींचा 'जनू  बांडे', वसंत सबनीसांच्या 'भारूड'इथपासून ते मुकुंद टांकसाळे यांच्या विनोदी कथांपर्यंत सर्वांना सरवटेंनी अधिकच खुमासदार केले आहे.



अर्थात हे सर्व खरे असले तरी फक्त 'व्यंगचित्रकार/अर्कचित्रकार' वसंत सरवटेंची एवढीशीच ओळख नाही. पन्नास वर्षांहून अधिक काळ विशिष्ट दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ करणारे दोन भीष्माचार्य मराठीमध्ये आहेत - एक म्हणजे शि. द. फडणीस (ज्यांनी मोहिनी मासिकाचे दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ आपल्या मिश्किल शैलीत सजवले ) आणि दुसरे आहेत वसंत सरवटे. 'ललित' मासिकाच्या दिवाळी अंकांची विशिष्ट विषयाला वाहिलेली त्यांची  मुखपृष्ठं ही त्यामागचा विचार, त्यातले तपशील या दृष्टीने अभ्यासली जावीत अशी आहेत. ललित मासिकाचे व मॅजेस्टिक प्रकाशनाचे संपादक केशवराव कोठावळे आणि मौज प्रकाशनाचे संपादक श्री. पु. भागवत या व्यासंगी दोघांसोबत सरवटेंनी भरपूर काम केले. मुळातच जागी असलेली कलाजाणिव या दोघांच्या सहवासामुळे अधिक फुलत गेली आणि त्यांच्यातला मुखपृष्ठकार समृद्ध झाला असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच विनोदी पुस्तकांपासून ते पाडगावकरांच्या 'सलाम' सारख्या कवितासंग्रहापर्यन्त आणि श्री. दा. पानवलकरांच्या वेगळ्या वाटेच्या कथासंग्रहा पासून ते नारळीकरांच्या 'व्हायरस' सारख्या विज्ञान कादंबरीपर्यंत विलक्षण वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारांची मुखपृष्ठं त्यांनी कुशलतेने सजवली.



वसंत सरवटेंची 'इलस्ट्रेशन्स' रेखीव व सुबकतेच्या साचेबद्ध व्याख्येत बसणारी कधीच दिसली नाहीत आणि हीच मला त्यांची सर्वात भावणारी गोष्ट आहे. पत्राचे एखाद्या ओळीपुरतेच जे वर्णन पुस्तकात आले आहे त्याचा अर्क रेखाटनात उतरतोच पण त्याव्यतिरिक्त स्वतःच्या विचारातूनही सरवटे त्या पात्रांमध्ये तपशील भरतात, एवढेच नाही तर त्या रेखाटनांमध्ये रंग, रूप, चण वगैरेतल्या अनेक उणिवा अगदी बिनदिक्कतपणे उतरवतात. म्हणूनच मग म्हाताऱ्या ‘बोचकें’ची ची गळ्याखालची लोबंणारी त्वचा, सरला वाखणकरच्या चेहऱ्यावरची मुरमं, संभा नाभाजी कोतमिरेचे फेंगडे दात, कालिका दसनुरेच्या डोक्यावरचं आणि चेहऱ्यावरचं माजलेलं रान, बिऱ्हाड मालकाचे बनियनच्या बाहेर लोबंणारे पोट आणि हातावरचे/कानावरचे/नाकातले केस वगैरे गोष्टींमुळे ती पात्रं एकदम जिवंत होऊन आपल्या शेजार पाजारचीच होऊन जातात. काही थोर चित्रकारांची स्वर्गीय चित्रं पाहताना येणारी दडपून जाण्याची (आणि त्यामुळेच या कलेच्या दुष्प्राप्यतेची) भावना सरवटेंची इलस्ट्रेशन्स पाहताना होत नाही. माझे असे मत आहे की, कलाकार व त्यांची कला हे दोन्ही सामान्य रसिकाला जेवढे प्राप्य (रीचेबल) वाटतात तितकीच  त्यांच्याकडून त्या रसिकाला स्फूर्ती मिळण्याची शक्यता अधिक वाढते.


चित्र : 'खिल्ली'मधून
कुठलाही कलाकार, खेळाडू, लेखक हा जितके जास्त निरीक्षण करतो तितका जास्त तो आपापल्या क्षेत्रात विस्तारात जातो. आपल्याकडे 'निरीक्षण' कमी व 'पाहणे' जास्त असते असे त्यांना प्रकर्षाने वाटायचे. पाश्चात्य व्यंगचित्रे, अर्कचित्रे याचा अभ्यास खूप मोठा असलेल्या सरवटेंनी त्यामुळेच त्यातले मर्म, विचार उलगडून दाखवण्यासाठी 'परकी चलन' हे पुस्तक लिहिले. त्यापुढेही त्यांनी चित्रविचार उलगडून दाखवणारी पुस्तके (‘व्यंगकला-चित्रकला’, ‘व्यंगचित्रे-एक संवाद’ इ.) लिहिली. पुस्तकातील रेखाचित्रांव्यतिरिक्त त्यांनी काढलेल्या अनेक अफलातून व्यंगचित्रांचे मनमुराद हसवणारे  ‘खडा मारायचा झाला तर’, ‘सावधान पुढे वळण आहे’ इ. संग्रहदेखील प्रसिद्ध आहेत. त्यांचे हे काम नवे व्यंगचित्रकारच नव्हे तर नवे रसिक घडवण्याच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचे आहे. वसंत सरवटे यांच्या निधनामुळे चित्रकलेच्या अनेकविध शाखा चालवणारे एक विद्यापीठच कायमचे बंद झाले आहे.



जाता जाता : नुकताच वसंत सरवटेंच्या ‘व्यंगकला-चित्रकला’ या पुस्तकातील लेखाचा संपादित भाग मला वाचायला मिळाला. अजिबात चुकवू नये असा हा लेख. त्यांनी केलेल्या रेखाटनांमागचा विचार, वेगवेगळ्या प्रकृतीच्या रेषा वेगवेगळे भाव कसे व्यक्त करू शकतात याचे विवेचन अशा अतिशय वेधक गोष्टी त्यामध्ये त्यांनी मांडल्या आहेत खाली. त्याचा दुवा देत आहे.


http://www.aksharnama.com/client/article_detail/342

-प्रसाद फाटक

‘बौद्ध - मुस्लिम संबंध : आजच्या संदर्भात’ : ऐतिहासिक संघर्षाचा परामर्श





कालपटलाकडे दृष्टीक्षेप टाकला असता ‘धर्म’ या संकल्पनेबद्दलच्या मतभेदांमधून होणाऱ्या संघर्षाने प्रचंड मोठी मनुष्यहानी घडवून आणल्याचं दिसून येतं. धर्मांची निर्मिती आत्मिक उन्नती, सदाचरण अशा विविध उद्देशांतून झाली खरी पण एखादा धर्म, उपासनापद्धती मानणाऱ्या मनुष्यसमूहांनी ‘आपला धर्म, आपलं आचरण हेच आदर्श' या दृष्टिकोनातून दुसऱ्याला हीन ठरवायला सुरुवात केली. आपली विचारसरणी, जीवनशैली ही दुसऱ्या मनुष्यसमूहावर लादणे आणि ती मान्य नसल्यास त्याला जगण्याचाही अधिकार नाकारणे इथपर्यंत काहींची मजल गेली. आपलं अस्तित्व राखण्यासाठी काही ठिकाणी त्याविरुद्ध मोठी प्रतिक्रियाही उमटत गेली आणि यातूनच सुरू राहिला एक अविरत संघर्ष. त्यामुळेच या संघर्षाचं स्वरूप, संघर्षांच्या मुळाशी असणाऱ्या धार्मिक धारणा यांचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांमधील परस्परसंबंध, त्यांच्यादरम्यान झालेली धर्मयुद्धं यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाला आहे. परंतु भारतीय उपखंड आणि आशियाच्या अन्य भागात मोठ्या प्रमाणात अनुसरलेला गेलेला बौद्धधम्म आणि इस्लाम यांच्यातील संबंधांचा तुलनेने अभ्यास कमी प्रमाणात झाला आहे. अफगाणिस्तानातील बामियानमधील बुद्धमूर्ती फोडण्यात आल्यानंतर अभ्यासक श्रीरंग गोडबोले यांना यासंदर्भात अधिक खोलात अभ्यास करण्याची गरज वाटू लागली आणि त्यातूनच प्रस्तुत पुस्तक आकाराला आलं.





भारतातील बौद्ध धम्माचा ऱ्हास



भारत हा अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक संकल्पनांचे, धारणांचे प्रवाह एकाच वेळी अस्तित्वात असणारी भूमी. अनेक विचारांचे समांतर उभे धागे आणि त्याचवेळी सर्वांना छेदून जाणारे खूप सारे सामायिक आडवे धागे यातून एक गुंतागुंतीचं तरीही मजबूत वस्त्र बनलं आहे. यात अनेक पंथ, उपपंथ आहेत. भगवान बुद्ध यांच्या चिंतन आणि चर्चेतून जन्माला आलेलं आणि आता स्वतंत्रपणे धर्म म्हणून अस्तित्व असलेलं बौद्ध तत्वज्ञान याच महावस्त्राचा एक भाग असलं तरी त्याने भारताबाहेरही खूप मोठ्या भूभागावरच्या जनमानसाला मोहित केलं. पश्चिमेला अफगाणिस्तान, उत्तरेला चीन आणि दक्षिणेला श्रीलंकेपासून ते पूर्वेला इंडोनेशिया पर्यंतचा प्रचंड भूभाग एकेकाळी या तत्त्वज्ञानाने व्यापला होता. भारतात सम्राट अशोकापासून अनेक राज्यांचा तो अधिकृत धर्म होता. नालंदा तक्षशीला सारखी विद्यापीठं बौद्ध तत्वज्ञानाची वृद्धी करणारी केंद्रं होती. असं असतानाही यातल्या बऱ्याचशा भूभागावरून या बौद्धधम्माचं अस्तित्व नष्ट होत गेलं. शांतता, अहिंसा यांचा पुरस्कार करणाऱ्या बौद्धधम्माचा ऱ्हास का झाला? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रतिपादन असं आहे, की इस्लामच्या वावटळीत बौद्धधम्माची पीछेहाट झाली. त्यांच्या या प्रतिपादनाच्या अनुषंगाने अभ्यास करायचा ठरवल्यास या मोठ्या भूभागावरच्या बौद्ध आणि इस्लाम यांच्या संबंधांची चिकित्सा करणं क्रमप्राप्त ठरतं आणि ते काम प्रस्तुत पुस्तक अतिशय खोलात जाऊन करतं. यामध्ये भारतीय उपखंडासोबतच आणि पूर्व आशियातल्या एकेकाळच्या बौद्धबहुल स्थानांचा यात तपशिलाने अभ्यास केलेला आहे.





इ.स.पूर्व २५० पासून लडाखमध्ये बौद्ध परंपरेचा प्रभाव आहे. लडाखमधील बौद्धधम्माचा तिबेटवरही खूप मोठा प्रभाव पडला. या दोन्ही प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर बौद्धविचारांचं आदान-प्रदान होत होतं. पण त्याच सुमारास शेजारच्या काश्मीर राज्यामध्ये हिंदूधर्म आणि बौद्धधम्म यांवर आलेलं इस्लामी आक्रमणाचं सावट इ.स १३३० नंतर लडाखवरही आलं आणि सोळाव्या शतकापर्यंत ते राहिलं. अगदी आत्तापर्यंत बिगरमुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण जास्त होतं पण २००१ च्या जनगणनेत लडाखमधील कारगिल आणि लेह या दोन्ही जिल्ह्यांचा विचार करता मुस्लिम बहुसंख्य झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यातून लडाखमध्ये अनेकदा बौद्ध-मुस्लिम उग्र संघर्ष झालेला आहे. पद्धतशीरपणे वाढवल्या गेलेल्या मुस्लिम लोकसंख्येची परिणती आपोआपच राज्यस्तरीय दबावगट निर्माण होण्यात झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरच्या दुजाभावाचे मूळ धार्मिक प्रेरणा आहे हेही स्पष्ट होतं. आजच्या जम्मू-काश्मीर राज्याचा हा तिसरा महत्वाचा हिस्सा. या राज्याचे सत्ताधारी असणाऱ्या काश्मिरी मुस्लिम शासकांकडून बिगरमुस्लिम भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेलेले आहे, ज्यात बौद्धबहुल लडाखचाही समावेश आहे. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विचार करता जम्मू आणि लडाख महत्वाचे आहेत पण त्यांचं विधिमंडळातील एकूण प्रतिनिधित्वापेक्षाही काश्मीरचे प्रतिनिधी जास्त आहेत. या प्रादेशिक असमतोलामुळे लडाखच्या बौद्ध जनतेमध्ये फार जुनी नाराजी आहे. मुस्लिमबहुल काश्मीरमुळे आपलीही फरफट होते या भावनेतून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा अशी मागणीही केली जात आहे.





भारताबाहेर बौद्ध धम्मावरचे सावट



जी परिस्थिती भारताची तीच भारताबाहेरही आहे. बांगलादेशातील बौद्धांची अतिशय परिस्थिती दारुण आहे. चितगाव पार्वतीय क्षेत्रात पूर्वापार बौद्धांचे प्राबल्य होते. भारताची फाळणी होणार हे कळताच चकमा बौद्धांच्या शिष्टमंडळाने निःसंदिग्धपणे भारतात येण्याची भूमिका घेतली परंतु केवळ या भागातील कर्णफुली नदी हा पूर्व पाकिस्तानसाठी एकमेव जलऊर्जास्रोत आहे या एकमेव कारणाखाली लोकसंख्येच्या प्रमाणाचे सर्व निकष बाजूला धाब्यावर बसून हा प्रदेश पूर्व पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आला आणि तिथल्या बौद्धांचं नष्टचर्य सुरू झालं. १९५० मध्येच त्यांच्यावरचे आणि हिंदूंवरचे अत्याचार एवढे वाढले की पाच लाख लोकांना भारतात निर्वासित म्हणून यावं लागलं. इंग्रजांच्या काळात इथल्या बौद्धांचे स्थान अबाधित राखण्यासाठी ब्रिटिशांनी त्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलं होतं ते सगळे कायदे पूर्व पाकिस्तान सरकारने रद्द करत नेले. पूर्व बंगालच्या अन्य प्रांतातून मुस्लिम लोकसंख्या जाणीवपूर्वक चितगाव प्रांतात आणून वसवली गेली. बौद्धांच्या जमिनी बळकावल्या गेल्या. इतकंच नाही तर भारताची मदत घेऊन स्वतंत्र बांगलादेश निर्मितीत मोठा वाटा उचलणाऱ्या मुजीब-उर-रेहमानच्या काळातही अवामी लीगच्या सशस्त्र दलातील बांगलादेशी मुस्लिमांनी कृतघ्नपणे बौद्धांवर अत्याचार केले. १९८० ते ८६ दरम्यानच्या बांगलादेशी मुस्लिमांच्या क्रौर्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. त्यांनी बौद्धविहारांचा विध्वंस केला,. बौद्ध अनाथालायला लावलेल्या आगीत अनेक बालकं होरपळून मरण पावली. १९८० ते १९९३ या काळात तब्बल ५४,००० चकमा बौद्ध निर्वासित म्हणून भारताच्या आश्रयाला आले.





लडाख, चितगाव या प्रांतांशिवाय पुस्तकात थायलंडमध्ये डोकं वर काढणारा मुस्लिम फुटीरतावाद, म्यानमारमधील रोहिंग्यांचा प्रश्न यांचाही पुस्तकात समावेश आहे. हे पुस्तक २००९ मध्ये प्रकाशित झालं आहे तेव्हाच रोहिंग्यांच्या प्रश्नाची झळ बसू लागलेली होती आणि आता त्या प्रश्नाने धारण केलेलं उग्र रूप आणि भारतासमोर उभे केलेले प्रश्न पाहता या पुस्तकात करून दिलेली धोक्याची जाणीव किती महत्वाची होती हे लक्षात येतं.





छोटं पुस्तक, मोठा आवाका



उण्यापुऱ्या दीडशे पानांच्या या पुस्तकात चार प्रमुख भूभागांमध्ये बौद्धधम्म व इस्लाम कसे रुजले, वाढले, लढले याचा इतिहास, संघर्षाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राजवटींचा आढावा, या दोन्ही धर्मांच्या धार्मिक संघटनांच्या भूमिका, दोन्ही धर्माच्या अनुयायांची इतिहास आणि वर्तमान या दोन्ही काळातील आकडेवारी असा विस्तृत परामर्श घेतला गेलेला आहे. त्यालाच जोड मिळाली आहे ती पुस्तकाच्या सुरुवातीला येणाऱ्या बौद्ध आणि इस्लामी पारिभाषिक शब्दांच्या सूचींची. दोन्ही धर्मांमधल्या महत्वाच्या संकल्पना जाणून घ्यायला यामुळे मदत होते. पुस्तकाच्या शेवटी असणारी साठहून अधिक संदर्भग्रंथांची यादी बघताना हे पुस्तकही एक संदर्भग्रंथ म्हणून महत्वाचं आहे हे जाणवतं.





दोन अतिशय भिन्न पार्श्वभूमीतून आलेल्या धर्मांमध्ये एकवाक्यता नसणं तसं स्वाभाविकच, परंतु त्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये वितुष्ट येणं आणि त्यातून एका धर्मियांकडून दुसऱ्या धर्मियांचं पद्धतशीरपणे उच्चाटन करणे हे धोकादायक आहे. यासाठीच दोन्ही धर्मांच्या काही मूलभूत धारणा पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात दिल्या आहेत. इस्लामची एकेश्वरवादावर, ईश्वराच्या अमूर्त असण्यावरची श्रद्धा, मूर्तीपूजा आणि पर्यायाने मूर्तीपूजकांना असणारा विरोध (आणि त्यांना श्रद्धाहीन ठरवणं) , दार-उल-हर्ब (युद्धाचा प्रदेश)चे दार-उल-इस्लाम (इस्लामचा प्रदेश)मध्ये रुपांतर करण्यासाठी श्रद्धाहीनांविरुद्ध निरंतर जिहाद पुकारणे अशी शिकवणूक या गोष्टी लक्षात घेतल्या तर ‘मनुष्याचे मोठेपण किंवा लहानपण विशिष्ट ईश्वर अथवा प्रेषितावरील श्रद्धेवर अवलंबून नसून कर्मावर अवलंबून असते’ असे मानणाऱ्या तसेच ‘धम्मग्रंथ दैवीप्रेरणेमुळे अस्तित्वात आले’ असे न मानणाऱ्या बौद्धधम्माविरुद्ध इस्लामच्या अनुयायांनी लढा का उभारला हे लक्षात येते.





इस्लामच्या अभ्यासाचा अभाव



दुर्दैवाने बौद्धधम्मावरच्या या दुष्टचक्राचा बाबासाहेब आंबेडकर वगळता कुणाही बौद्ध अभ्यासकाने मुळापासून अभ्यास केला नाही याबद्दल गोडबोले निराशा व्यक्त करतात. बांगलादेशामधील बौद्धांच्या वंशविच्छेदानंतरही एखादा अपवाद वगळता भारतातील बौद्ध नेत्यांनी मूग गिळून बसणे हे उदाहरण पुरेसे बोलके आहे (अलीकडे ऐकू येत असणारे ‘भीम - मीम (MIM)’ एकतेचे नारे ऐकतो तेव्हा गोडबोलेंचं निरीक्षणच अधोरेखित होतं).



पुस्तक संपताना येणारं गोडबोलेंचं भाष्य विचारप्रवण करणारं आहे. ते म्हणतात, “मुस्लिमांच्या मानस आणि व्यवहारावर इस्लामी तत्वज्ञानाचा पगडा असल्यामुळे बौद्ध-मुस्लिम संबंधांचा अन्वयार्थ लावण्यासाठी इस्लामी धर्मशास्त्र समजून घेणे अनिवार्य आहे. पूर्वी अफगाणिस्तान, पूर्व इराण, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान इ. ठिकाणी बौद्धधम्म प्रचलित होता. इस्लामच्या अनुयायांनी तेथे बौद्धधम्माचा नायनाट केल्यामुळे आज तेथे बौद्ध-मुस्लिम संबंधांचा वर्तमान संदर्भात विचार करणे शक्य नाही. लडाख, चितगाव, थायलंड, म्यानमार या भागातील बौद्धांनी इस्लाम समजून घेतला नाही, त्यानुसार स्वतःची अस्मिता आणि अस्तित्व टिकवण्यासाठी वेळीच उपाय योजले नाहीत तर काही दशकांनंतर तेथेही बौद्ध-मुस्लिम संबंधांचा विचार भूतकाळाच्या संदर्भात करावा लागेल”





****

बौद्ध - मुस्लिम संबंध : आजच्या संदर्भात

लेखक : डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले

प्रकाशक : तक्षशिला प्रबोधिनी, गडचिरोली

आवृत्ती : पहिली (बुद्ध पौर्णिमा, ९ मे २००९)

पृष्ठसंख्या : १४४

मूल्य : ५० रू.