पहिलटकरीण
मुंबईच्या विमानतळावरचे सुरुवातीचे काही तास ते Newark वरचे कस्टम चेक पार करून होईपर्यंतचे वीसेक तास मी पहिलटकरणीसारखा उत्सुक, भांबावलेला, धडधडणारा आणि आतुर असा एकाचवेळी सगळेकाही होतो ... पण २ गोष्टींमुळे मी जरासा relax झालो. विमानतळावरच ओळख झालेले संतोष कुलकर्णी. त्यांनी छान गप्पा मारत ("काळजी करू नको, मी आहे ना !") आणि तिकडचे अनुभव सांगत आपलेसे केले आणि दुसरी गोष्ट म्हणजे T2 हे टर्मिनस. या टर्मिनलने इतके गुंतवून ठेवले की काही काळ मी स्वतःला विसरलो. Newark विमानतळाच्या तोंडात मारेल अशी अद्वितीय कलाकृती आहे ही ... खरेतर अनेक कलाकृतींचा समुच्चय आहे T2. एक प्रचंड मोठे कलादालनाच जणू ... आपण म्हैसूरचा राजवाडा, उदयपूरचे महाल जसे आवर्जून बघायला जातो तशी हे एक पर्यटनस्थळ व्हायला हवे... पण सगळे सेक्युरिटी चेकच्या आत असल्यामुळे ते अशक्य आहे.
|
(T2 छायाचित्रे : आंतरजालावरून साभार) |
*******************************************
ड्राय कोकोनट सॅण्डविच
विमान म्हटले की हवासुंदऱ्या आल्याच असे मला तोपर्यंत वाटत होते. अगदी सुंदर नसतील तरी स्त्रिया असाव्यात ही अपेक्षा फार नाही. पण विमान उडल्यावर कळले इथे तीनही फिरंगी बाप्ये आहेत !! तसे गरीब होते बिचारे, पण म्हणून काय त्यांना गोड मानायचे ? एक लालगोरे काका तर लुक्सवरून 'थेरडा' या गटात मोडत होते. ते संपूर्ण प्रवासभर धाप लागल्यासारखी तोंडाची हालचाल करत होते ... मला तर सारखे त्यांना "शिवाय ना डीबी अंकल, तुम्ही किती वयोवृद्ध आहात !!" असे म्हणायचा मोह होत होता...
बाहेर कुट्ट अंधार होता. माझ्या डाव्या बाजूला विंडो सीटमध्ये खोचलेली एक थ्री फोर्थ आणि त्या थ्री फोर्थमध्ये रुतलेला पेंगुळलेला अण्णा होता. तो त्याच्या सीटची मर्यादा लांघून माझ्या सीट मध्येही अतिक्रमण करत होता. तो जागा असायच्या काळात आपले पर्वतप्राय पोट ओलांडून फक्त बुटाची लेस बांधणे किंवा सोडणे एवढेच काम करायचा. पाकिस्तानच्या मोहम्मद इरफानला खाली वाकून पुन्हा वर यायला वेळ लागणार नाही एवढा वेळ त्याला सीटमध्ये पूर्ववत व्हायला लागत होता. उजव्या बाजूला यूएसचा पासपोर्ट असणाऱ्या पोक्त भारतीय काकू होत्या. मी smile देण्याचा केलेला प्रयत्न त्यांनी हाणून पाडला होता. त्यामुळे या दोघांशीही संवाद व्हायची शक्यता नव्हतीच. दोघांच्या पहाऱ्यात स्थानबद्धतेत बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सुदैवाने सोबत घेतलेले 'टाटायन' आणि समोरच्या स्क्रीनमध्ये असलेल्या खूप साऱ्या चित्रपटांनी मला तारले.
*******************************************
स्वागत करूया अssध्यsssक्षांचे
८ मार्च २०१५ च्या भल्या पहाटे Uncle Samच्या देशात पाय ठेवला. जगभर अमेरिका गाजवत असलेल्या सत्तेची आणि करत असलेल्या उद्धटणाची पुनश्च ओळख करून देण्याची जबाबदारी इमिग्रेशन ऑफिसरवर असावी. एखादा कर्दनकाळ बॉलर जसा नव्या batsmanची आल्या आल्या विकेट काढण्यापेक्षा उगाचच दोन बाउन्सर टाकून batsmanचा कॉन्फिडन्स हलवायचा प्रयत्न करतो तशी माझ्यासमोरच्या इमिग्रेशन ऑफिसरला हुक्की आली असावी. माझ्या पासपोर्टवरचा सीतामाईच्या चारित्र्यासारखी स्वच्छ इमिग्रेशन हिस्ट्री पाहूनही त्याने उगाचच विचारले "तू यापूर्वी कधी अमेरिकेत आला होतास का ?" मी "नाही" म्हणालो. त्याने परत संशयाने विचारले "आर यू शुअर ?" मला "हो" असे उत्तर देण्याशिवाय काय ऑप्शन होते ? सुदैवाने त्याने "confidant ? लॉक किया जाय ?" असे विचारले नाही. मग मी कशासाठी आलोय ते सांगितले आणि ५ आठवड्यासाठी आलोय असे म्हटल्यावर तो अविश्वासातिरेकाने नाटकी आवाजात म्हणाला "5 weeks ?? NO WAY". तो इतका भोचकपणा का करतोय तेच मला कळले नाही. पण ती जागा आणि ती परिस्थिती अशी असते की आधीच जाम Anxiety असते, शिवाय माझ्यासमोर दोघा-तिघा उतारूंना एक ऑफिसर कुठेतरी घेऊन जाताना दिसला होता त्यामुळे तर माझी आधीच फाटलेली होती. त्यामुळे संयम गमावणे किंवा वैतागून उत्तर देणे हा पर्यायच नव्हता/नसतो. पण इतक्यात माझ्यासमोरच्या त्या ऑफिसरने शिक्का मारून आणि डॉक्टरसारख्या किरट्या अक्षरात परतीची तारीख टाकून मला पासपोर्ट परत दिला आणि मी निःश्वास सोडला आणि पुढे निघालो.
*******************************************
पोस्टमन
Newark विमानतळासाठी ती आणखी एक बिनचेहऱ्याची सकाळ असेल, पण माझ्यासाठी अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लासारखी कुतुहलाची बाब होती. इमिग्रेशन आणि कस्टमवाल्यांशी नमस्कार चमत्कार होऊन मग निवांतपणे ओरलँडोच्या विमानाची वाट पाहत बसलो होतो.. या देशात पाऊल ठेऊन 3 तासपण झाले नव्हते त्यामुळे होम सिकनेस वगैरेचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता.... अचानक मंजुळ कलकलाटाने छताकडे लक्ष गेले... आणि मी निःशब्द झालो... राखाडी रंगाचे इवले पक्षी आपल्या स्वतःच्या हक्काच्या जागेत बागडत होते. ते पक्षी म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून आपल्याला चिरपरिचित असणाऱ्या चिवचिव चिमण्या !! जो पक्षी माझ्या परिसरातून, शहरातून एकाएकी जणू अदृश्य झालाय तो असा मैलोगणती दूरच्या प्रदेशात असा अनपेक्षितपणे प्रकट झाला होता आणि भुर्रर्रकन मला थेट माझ्या देशात, शहरात आणि अगदी घरात घेऊन गेला होता.. मला पहिल्याच दिवशी माझ्या घरची मला इतकी तीव्र आठवण येईल असा मी अजिबात विचार केला नव्हता.... पण तोपर्यंत यःकश्चित वाटणारा एक अतिपरिचित जीव माझ्यासाठी किती महत्वाची गोष्ट करून गेला !!! खरंच, जगात निरुपयोगी किंवा बिनमहत्वाचे काहीच नसते. पण याची जाणीव व्हायला आपल्याला वेळ लागतो ...
*******************************************
उजेड
कितीही शिकलेलो असलो तरी काहीवेळा आपल्या मनात महाबिनडोक विचार यायचे थांबत नाहीत. कारण बरेचदा आपले जग आपण फारच छोटे करून घेतलेले असते. संध्याकाळी Apartment बाहेर चक्कर फिरत असताना पश्चिमेला तेजस्वी शुक्रतारा दिसला... थोड्या वेळाने आकाशात सप्तर्षी दिसले. "च्यायला हे अगदी आपल्या इथल्यासारखेच दिसतात की !" असे मनाशीच म्हणालो आणि दुसऱ्याच क्षणी जागतिक लाज वाटली.
'केल्याने देशाटन येते मनुजा शहाणपण' हे लिहिण्यापूर्वीच रामदासांनी मूर्खांची लक्षणे अभ्यासली होती का, हे कळायला मार्ग नाही.
*******************************************
नितळ
घराभोवतीचा परिसर म्हणजे आपल्या कल्पना तश्या माफक असतात. बऱ्यापैकी स्वच्छ जागा, संध्याकाळी चक्कर मारायला थोडीशी हिरवळ एवढे आपल्याला पुरेसे असते. पण मी माझ्या सोसायटीच्या गेटच्या आत शिरलो आणि माझा डोळ्यावर विश्वासच बसेना. वीकेंड होमचा परिसर म्हणून आपल्या डोळ्यासमोर सुखाची परमावधी असते ते इथे राहत्या अपार्टमेंटभोवती होते.
गडद निळे आकाश, छोटेसे तळे, भरपूर झाडे आणि आकाराने मुंगुसापेक्षा थोड्याश्याच लहान भरतील अश्या गब्दुल्ल्या टुणटुणीत खारुताया (रामरायाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवलेला नसल्याने पाठीवर पट्टा नसलेल्या) हे सगळे रोज सकाळ संध्याकाळ दिसत असेल तर काय बिशाद शीण आणि थकवा येण्याची !
*******************************************
धागे
स्थळ आणि काळाचे धागे एकमेकांना छेदतात तेव्हा मागे अनंत शक्यता दडलेल्या असतात. तुमच्या काळाचा एक अक्षांश स्थळाच्या एका रेखांशाशी एका बिंदूला जुळत असतानाच कुठलेही प्रयोजन नसताना दुसऱ्या एका व्यक्तीच्याही स्थळ-काळाचा संपातबिंदू तेव्हाच तिथेच येतो आणि त्या अनंतपैकी एक शक्यता प्रत्यक्षात येते. आणि त्याने तुम्ही असे स्तंभित होता की घडल्या प्रकाराला ‘नशीब’ म्हणण्याशिवाय गत्यंतरच नसते. ती वेळ मनमुराद अनुभवणे एवढेच तुमच्या हातात असते .... बस्स !!
उदा. माझे रोजच्या वेळेपेक्षा पाउण तास उशीरा निघणे, कित्येक वर्षे कुठ्ल्याही स्वरूपाचा संपर्क नसलेला नकुल कधी नव्हे तो नेमका त्याच दिवशी लेट झाल्यामुळे त्याच वेळी त्या दिशेला यायला निघणे आणि आमच्या देशापासून हजारो मैल दूरवरच्या भूमीवरच्या छोट्याश्या चौकात त्याने मला पाहणे हे सगळे इतके अचानक झाले की त्या सुखद धक्क्यातून सावरायला आम्हाला काही तास जावे लागले !!!
खरे सांगायचे तर त्या आश्चर्यातून मी आजही पूर्णपणे सावरलेलो नाहीये.... आणि नकुलही !
********************************************
किमयागार
एका दिवसात युनिव्हर्सल स्टुडीओचे अर्धे थीम पार्क सुद्धा पाहून होणे शक्य नाही हे मला माहित होते. पण दोन थीम पार्कला जोडणारी ट्रेन ही 'हॉगवर्टस् एक्स्प्रेस' आहे हे कळले तेव्हा दोन थीम पार्कचे महाग तिकीट काढण्यात मी जराही काचकूच केली नाही. एका पार्कमध्ये हुबेहूब किंग्स क्रॉस स्टेशन ! वाटेत जुन्या ट्रंका, पिंजऱ्यातली हेडविगसुद्धा ओलांडत आपण जेव्हा Platform 9 and 3/4 वर प्रवेश करत असतो तेव्हाच्या अंधाऱ्या मार्गिकेत एका वळणावर विशिष्ट कोनात ठेवलेली काच आणि त्यावर ठराविक प्रकारे सोडलेला प्रकाश यांमुळे खरोखरच आपल्यापुढची माणसं अदृश्य होत भिंतीत घुसताना दिसतात तो प्रकार फारच लाजवाब !!! खऱ्याखुऱ्या हॉगवर्टस् एक्स्प्रेसमध्ये बसून दुसऱ्या थीम पार्कमध्ये जात असताना आपल्या compartment च्या virtual खिडकीतून उंच पूल, हेग्रीडची उडती मोटरसायकल, रॉनची उडती कार दिसते आणि कहर म्हणजे वाटेत दिव्यांची गडबड होऊन पोराबाळांना घाबरवून सोडणारे डीमेन्टर्सचे गोठवून टाकणारे अस्तित्व सुद्धा उभे केले आहे.
ट्रेनमधून आपण उतरतो ते दुसऱ्या थीम पार्कात आणि ते असते हॉग्समीड ! हॉगवर्टस् शाळेचे युनिफॉर्मस्, जादुई छड्यांचे दुकान, बटरबीअरचे restaurant आणि प्रचंड किल्ल्यासारखे हॉगवर्टस् स्कूल .... सग्ग्ळी fantasy मूर्तिमंत डोळ्यसमोर उभी !!
मी दुसऱ्या थीम पार्कचा २५% भाग सुद्धा पाहू शकलो नाही पण त्या पार्कच्या तिकिटाचे सगळे पैसे मला Harry च्या अद्भुत विश्वाच्या दर्शनाने केव्हाच वसूल झाले होते...
********************************************
बालंबाल :
"युनिवर्सल लय महाग आहे , घरुनच खायला घेऊन जा" असे रूममेट्सनी बजावल्यामुळे मी भारतातून आणलेला आई-स्पेशल चिवड्याचा ढीग घेऊन गेलो होतो. बराच काळ चिवड्याचा फक्क्या मारूनही पोटाचे समाधान झाल्यासारखे वाटत नव्हते. मग एका फूडस्टॉलमध्ये घुसलो. खरंच महाग होते पदार्थ ! मग त्यातल्या त्यात स्वस्त आणि सेफ एकच पदार्थ होता, फिंगर चिप्स ! तेवढ्यात त्या यादीत त्याचीच वाढीव आवृत्ती दिसली (म्हणजे मला तसे वाटले !) चीज चिप्स. म्हटले साध्या चिप्स पेक्षा हे ट्राय करू. ऑर्डर घेणाऱ्या वयस्कर बाईंना तसे सांगितले. त्यांनी अर्धाच क्षण मला निरखले आणि म्हणाल्या "यात बीफ आहे". मी गडबडलोच ! इतक्या निरुपद्रवी भासणाऱ्या पदार्थात थेट गोमाता (किंवा गोपिता) ? दुसऱ्याच क्षणी मला जाणीव झाली की माझ्या केवळ वर्णावरून हे कुठल्या गावचं पाणी आहे ते ओळखून वेळीच सांगितले होते. मी आपलं "मग मला साधे फिंगर चिप्सच द्या" म्हणालो. त्या हसल्या, "अजून काय पाहिजे, कोक ? पेप्सी? " दोन्हीचा भोक्ता नसल्यामुळे मी म्हणालो "काहीच नको". त्यांचा विश्वासच बसला नाही. "काहीच नको?" तिने परत विचारले. जणू मी कोक शिवाय स्नॅक्स घेत होतो म्हणजे चुन्याशिवाय तंबाखू मागत होतो ! कोण जाणो 'मी तुला गोमांसभक्षणाच्या पातकापासून वाचवले आहे, तर तू आमचा फायदा करून दिला पाहिजेस' अशीही त्यांची सुप्त अपेक्षा असावी. तरी मी निग्रहाने "नको" म्हणालो आणि पैसे देऊन कॉउंटरकडे चालता झालो.
आज पुन्हा एकदा म्हणतो "थँक यू आईआज्जी, मला वेळीच सावध केल्याबद्दल !!"
********************************************
आनंदवर्षा
स्वप्नातच जगायचे असेल तर Disneyland सोडून बाहेर पडू नये.
जगात ३-४ ठिकाणी Disneyland आहेत. पण Orlando हीच ती जागा जिथे हे सुरु झाले ... एका माणसाच्या अफलातून कल्पकतेतून एकाहून एक गोजिरवाणी characters तयार करणाऱ्या या माणसाच्या कल्पनाशक्ती आणि दूरदृष्टीने थक्क व्हावे अशी ही दुनिया... आपल्या सगळ्या काळज्या, चिंता आपसूक आतल्या कप्प्यात जाऊन गुपचूप बसतात कारण समोर होत असते भरभरून उधळण .... रंगांची, हास्याची, लखलाखाटाची,कल्पकतेची, आनंदाची, आयुष्याची ...
पिनोकिओ, मिकी-डोनाल्ड, पीटर pan, छोटी मरमेड, हिमगौरी या सगळ्यांची मोठ्ठी आनंदयात्रा आपापले चित्ररथ घेऊन दिवसातून तीनदा निघते..... आख्ख्या Disneyland ला फेरी मारते. ... हातवारे करतात, फ्लाइंग किस देतात, खिदळतात, नाचतात, डोलतात .... सगळी पात्रे इथे फक्त आणि फक्त खुश असतात ! आपल्या भावना सगळ्यात शेवटच्या माणसापर्यंत जाव्यात म्हणून त्यांचे एक्स्प्रेशन्स खूप 'लाऊड' असतात. पण त्यामुळेच ते जास्त लक्षही वेधून घेतात. कित्ती मस्त जॉब !! नुसते सेलिब्रेट करत राहायचे ....दिवसेंदिवस. पण नंतर नंतर त्यांच्या नाचण्या-खिदळण्याकडे पाहून वाटले, त्यांच्या आयुष्यात, घरात काही विवंचना नसतील का ? पोटात काहीही असो, ओठावरचे हसू फुलवत राहणे हाच तर यांचा जॉब. किती सोप्पा ....किती अवघड !
Disneyland मध्ये प्रत्येक गोष्ट सुंदरच आहे पण डोळ्यांचे पारणे फेडणारी सर्वोच्च गोष्ट म्हणजे रात्री १० वाजता होणारा फायर शो... कितीही उशीर झाला तरी तो पाहिल्याशिवाय निघू नकोस असे मला अद्वैतकडून सांगण्यात आले होते. मी आपला दिवाळी किंवा दसऱ्यासारखी आतिषबाजी असेल अशा अपेक्षेने थांबलो. पण त्यानंतर त्या चौकात जे काही दिसले ते स्वप्नवत होते. चहूबाजूनी असणाऱ्या किल्लासदृश रचनेच्या भिंतींवरून आसमंताच्या ओढीने एकापाठोपाठ झेपावणारे तेजोगोल.... सळसळते, तरीही लयबध्द ! उत्फुल्ल तरीही शिस्तबद्ध ... रांगडे तरीही राजस .... मैदानातल्या सचिनसारखे !!
काहीवेळा आपण कॅमेऱ्याच्या इतके प्रेमात असतो की आपण समोरच्या क्षणाला मोकळ्या हातांनी उराउरी भेटत नाही. आयुष्यातल्या सगळ्यात शहाणपणाच्या निर्णयांपैकी एक निर्णय त्या रात्री मी घेतला होता. समोर दिसतंय ते नजरेनेच लुटून घ्यायचा... त्या दृश्याच्या आणि माझ्या दरम्यान कॅमेरा येऊ न देण्याचा... त्यामुळे जे अनुभवलं ते थेट ...
रूबरू.... रोशनी ...!
********************************************
डिस्कवरी आणि तत्सम channel वर जगभर फिरणारे एकांडे शिलेदार दिसतात तेव्हा मी अचंबित झाल्याशिवाय राहत नाही. आत्तापर्यंतच्या ३० वर्षापर्यंतच्या आयुष्यात माझे शहरच काय घरही सोडून कुठेच न राहिलेल्या मला तर त्याचे अप्रूप/कुतूहल जास्तच वाटते. हे शिलेदार एकटेच फिरतात यांना कधी भीती, असुरक्षितता वाटत नसेल ? एकट्याने फिरण्यात मजा येत नसेल ? माझ्या अमेरीकेच्या वारीमुळे मला यातल्या काहींची उत्तरे मिळाली, तर काहींच्या दुसऱ्या बाजूही कळल्या. सोबतीने फिरण्यात जी मजा येते ती एकट्याने भटकण्यात येत नसेलही पण एकट्याने एक्सप्लोर करण्यात जे थ्रिल आहे त्याची सर सोबतीने फिरण्याला येऊ शकत नाही याची अनुभूती मला अमेरिकेतल्या ५ आठवड्यांच्या वास्तव्याने करून दिली. एकट्याने फिरणे किंवा नवख्या जागी टिकाव धरायला जमू शकणे याबाबत मनात कुठलाही किंतु नसल्यामुळे नव्याने मनाची तयारी करावी लागली नाही. उलट अपरिचित प्रदेशात अवेळी फिरताना जरासे धाडस करायलाही जमले (अर्थात ते धाडस होते याची जाणीव मला नंतर करून देण्यात आली).
Disneyland वरून येताना रात्री ११.३० ची बस पकडायची असल्यामुळे फायर शो संपल्यासंपल्या धावत पळत ११.२० पर्यंत पार्किंग एरियात आलो जिथून बस सुटायची होती… बघतो तर ११.१० ची किंचित लेट झालेली बस तिथून बाहेर पडत होती, जी मला सेन्ट्रल बस stand वर सोडणार होती .… पुन्हा थांबून मला अजून उशीर करायचा नव्हता. त्यामुळे सिग्नलवर किंवा bus stop पासून दोनशे मीटर दूरवर थांबण्यासारखा आभास निर्माण करणाऱ्या पीएमटीला मनोमन स्मरून (माझे शरीर जितपत जोरात धावू शकेल तितपतच वेगाने) मी एक स्प्रिंट मारली आणि चालत्या बसच्या दरवाजाबाहेरून धावता धावता टाटा स्कायच्या 'पूछ्ने में क्या हर्ज है' या tag line ला शिरोधार्य मानून बसच्या सारथ्याचे लक्षवेधून घेणाऱ्या हालचाली, हातवारे, हावभाव वगैरे करत 'मला आत घेणार का' अशा अर्थाची पृच्छा केली. (बसचा दरवाजा बंद असल्यामुळे इथे पुण्यातल्यासारखी मुसंडी मारायची सोय नव्हती) त्याने अखेर माझ्याकडे लक्ष दिले. क्षणभर रोखून पाहिले आणि मग दयाळूपणे दरवाजा उघडून मला बस मध्ये प्रवेश दिला.
Central bus stand ला पोचलो तेव्हा १२ वाजून गेले होते आणि माझी बस शेवटचीच stand मध्ये शिरत होती. यापुढे घरापर्यंत जायची बस नसल्याने तिथून Taxi हा एकच पर्याय होता.त्यामुळे yellow cab ला फोन करून कॅब मागवली. पण वीकेंड असल्याने सगळ्या कॅब्स प्रचंड बिझी असतात. त्यामुळे अर्धा तास होऊन गेला तरी कॅबचा पत्ता नाही. दोनदा फोन करून विचारले तर कॅबच्या कॉलसेंटरवालीने 'अजून थोडा वेळ लागेल' असे सांगितले. पंचाईत अशी होती की तिकडच्या सिक्युरिटी गार्डसनी माझ्या सारख्या ४-५ चुकार प्रवाशांना आधीच stand बाहेर काढले होते. कारण तिथे शेवटच्या बस नंतर थांबायला परवानगीच नव्हती. त्यामुळे बाहेरच्या बाजूला ताटकळत मी, एक वयस्कर आफ्रिकन काकू, तिच्याशी "काय शिंची लेट आहे ही कॅब" छापाची चर्चा करणारी एक पस्तिशीची गौरांगना आणि २-३ तरुण मंडळी आपापल्या कॅब्सची वाट पाहत उभे होतो. शिवाय तिथे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आढळतात तसे एक दोन संशयास्पद गांजेकस देखील घुटमळत होते.
अखेर आफ्रिकन काकूने बोलावलेली कॅब आली. ती कॅब मध्ये बसतानाच त्या गोऱ्या मुलीने कॅब ड्रायव्हरशी बातचीत केली आणि "काकूला सोडून मला घ्यायला येशील का ?" असे विचारले. तोही तयार झाला. काकूला सोडून त्या मडमेला घ्यायला आला... माझी कॅब अजूनही आली नव्हती. त्यामुळे तेव्हाच हालचाल करून मी तिच्या कॅब ड्रायव्हरला विचारले "हिला सोडून मला घ्यायला येतोस का ?". त्याला माझ्या घराच्या विरुद्ध दिशेने तिला सोडायला जायचे होते. तिला सोडून येईपर्यंत मी दुसऱ्या कॅबणे गेलो असतो तर हातचे गिऱ्हाईक गेले असते. तो विचारत पडला.... मग त्यानेच मला ऑफर दिली "तू पण आत्ताच बस कॅबमध्ये. आपण हिला सोडून परत इथे येऊ. मग मी तुझा मीटर टाकतो". अनोळखी ठिकाणी एवढ्या बेरात्री जास्त वेळ थांबण्यात अर्थ नव्हता. मनात म्हटले 'यलो कॅब म्हणजे तशी सेफ असणार. इथे ताटकळण्यापेक्षा कॅब मध्ये बसलो तर ठराविक वेळाने तरी घरी निश्चित पोहोचू' आणि मी त्या मडमेसहवर्तमान (अंतर ठेऊन :P) कॅबमध्ये बसलो.
कॅबवाला गप्पिष्ट होता. त्याने ती कुठे राहते काय करते वगैरे सगळे विचारायला सुरवात केली. ती पण सगळे सांगत होती "मी प्युअर्टो रिकोची आहे. Disneyland मध्येच काम करते. रोज घरी यायला इतकेच वाजतात . इकडे नवऱ्यासोबत राहते" वगैरे वगैरे. इतकेच नाही तर आपला नवरा कालच साधारण आठवडाभरासाठी प्युअर्टो रिकोला गेल्याचेही अक्काने सहज सांगून टाकले. म्हटले असेल अमेरिकन संस्कृतीतला मोकळेपणा. आपल्या इथे रात्री बारानंतर एकटी रिक्षात बसलेली मुलगी आपली इत्यंभूत माहिती रिक्षावाल्याला हसतमुखाने सांगतीये असे चित्र मी फार ताण देऊनही डोळ्यासमोर आणू शकत नव्हतो. कधी एकदा घर येते आहे याची जीव मुठीत धरून वाट पाहण्याचीच शक्यता जास्त !
अखेर कॅब तिच्या घरापाशी पोहोचली. त्याने तिला त्याचे व्हिजिटिंग कार्ड दिले आणि सांगितले "माझी ड्युटी या आठवड्यात याच वेळेस असणार आहे. तू मला फोन केलास आणि मी इथेच असलो तर तुला सोडू शकतो". . कॅब वळवून पुन्हा सेन्ट्रल बस stand च्या दिशेने वळवल्यावर मला म्हणाला. "I have given her card. She will certainly call me tomorrow and later for cab. Her husband is also not here. Who knows , I might get a date one day" असे म्हणून हसला. म्हटले 'च्यायला सगळे पुरुष सारखेच'... फक्त आपल्याकडे जे काही करायचे वाटले ते थेट करायची मानसिकता नसावी आणि इथे तर मस्तपैकी गळ टाकला होता. मासा लागला की नाही देव जाणे. मग त्याने माझ्याबद्दल , कुठून आलास, कशाला आलास किती पैसे मिळतात वगैरे विचारायला सुरुवात केली. मी मात्र काहीतरी जुजबी आणि निरुत्साहाने उत्तरे देऊन त्याच्या धबधब्याला बंध घेतला. शेवटी एकदाचे सेन्ट्रल बस standला आलो आणि त्याने रीतसर मीटर रिसेट केला आणि ठरल्याप्रमाणे पुढे माझ्या अपार्टमेन्टपर्यंत सोडले. पोचेपर्यंत दीड वाजला होता. रूममेट्स भारत वि दक्षिण आफ्रिकेचा २०१५ चा वर्ल्ड कप सामना बघत होते. इनिंग्स ब्रेक झाल्यावर त्यांनी इतका उशीर का झाला वगैरे विचारले. त्यावर मी लांबची राईड कशी करून आलो हे सांगितले तर ते कावलेच. मी 'यलो कॅब होती, चिंता नव्हती' वगैरे समर्थन करायचा प्रयत्न केला तेव्हा कळले की Orlando इतर काही शहरांच्या तुलेनेने सुरक्षित अगदी असले तरी hottest tourist destination असल्यामुळे इथे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना हेरून (प्रामुख्याने नशेबाज लोकांकडून) त्यांच्यावर काही वेळा डल्ला मारला जातो आणि मुख्य म्हणजे फक्त लुटून सोडून देण्याइतके सौजन्य ते नेहमीच दाखवतील असे नाही. कारण इथे सर्रास बंदुका खिशात असतात त्यामुळे अशी Grand मस्ती मी पुन्हा करू नये अशी तंबीही देण्यात आली.
चालायचेच. एकट्याने फिरण्यातही एक वेगळीच मजा असते, थ्रिल असते हे त्या दिवशी जाणवले. कदाचित डिस्कवरीवर दाखवल्या जाणाऱ्या क्रेझी फिरस्त्यांना या थ्रिलचीच नशा चढत असावी...
*******************************************
'जेंटल'मॅन
सगळ्या वीकेंड्सचे प्लान्स अमेरिकेत जाण्यापूर्वीच नक्की करायचा प्रयत्न करूनही एक वीकांत मोकळा उरलाच. मग त्या शनिवारी नवाजुद्दिन सिद्दिकीचा 'बदलापूर' थेटर मध्ये बघायचे ठरले. सगळे रूममेट्स कॅब करून निघालो. तिकीट काढतानाच एक साठीच्या पुढचे काका भारतीय काका भेटले. एकटेच आले होते. आमचे हिंदी ऐकून आमच्या जवळ येऊन जुजबी गप्पा मारायला सुरुवात केली. हळूहळू चालत आम्ही आत जाऊन बसलो. माझा एक रूममेट जीतू म्हणाला , "अंकल अब हमेही आके चिपकेंगे" ... आणि तसेच झाले. थेटर मोकळेच होते. आम्हा चौघांच्या बाजूलाच ते येऊन बसले आणि मग सिनेमा सुरु व्हायच्या आधी , मध्यंतरात त्याच्या गप्पा सुरु झाल्या. प्रश्न सुरु झाले "कुठून आलात, काय करता , कधीपासून आहात, H1 व्हिसा वर आलात का , सगळ्यांचा तोच व्हिसा का ?" वगैरे खूप प्रश्न ... मी महाराष्ट्रातून आलोय म्हटल्यावर विचारले "माझी बायको पण महाराष्ट्रीयच आहे. तुम्ही सगळेच महाराष्ट्रातून आलात का ?" हा कुठून आला, तो कुठून आला वगैरे तपशील विचारत राहिले. मी आपलं 'भेटलेत २ तासांसाठी तर काहीतरी थातुरमातुर उत्तरे देत होतो... सगळे महाराष्ट्रातलेच, सगळ्यांचा एकच व्हिसा वगैरे कष्ट कमी पडणारी उत्तरे देऊन वेळ मारून नेली खरी पण इतक्या सहजी सुटका नव्हती ..
चित्रपट कमी झाल्यावर आम्ही बाहेर पडलो आणि आमची खलबते सुरु झाली की आता Walmart ला कसे जायचे याबद्दल .... तर एकाच्या डोक्यात किडा आला की आत्ता Walmart ला जायला एक कॅब पुन्हा तिथून दुसरी कॅब करावी लागणार (H1 व्हिसावर असले तरी कंजुषी करण्यात अनेक लोक हार मनात नाहीत !) .. त्यापेक्षा काकांनाच विचारूया की 'इकडे जवळ Walmart कुठे असेल तर आम्हाला सोडता का' पण मक्खीचूसला स्वतःला विचारायची हिम्मत नव्हती शेवटी थोडे पुढे गेलेल्या काकांना गाठले आणि हिय्या करून विचारले, तर ते एकदम लगेच तयार झाले.... मग काय , बसलो सगळे त्यांच्या कारमध्ये.
काका भलतेच गप्पिष्ट. बोलता बोलता त्यांच्या बद्दल कायकाय सांगायला लागले आणि लक्षात आले काका बरेच मोठे खिलाडी होते. त्यांचे नाव 'रवी जेन्टल'. ते मूळचे दिल्लीचे पंजाबी गृहस्थ होते. अतिप्राचीन काळीच ते भारतातून अमेरिकेत आले होते. भारतात असल्यापासून त्यांना सिनेमाची प्रचंड आवड ! गुरुदत्तच्या अतिशय सुरुवातीच्या काळात त्याला assist केल्याचाही त्यांचा दावा होता. मग ते स्कॉटलंडला गेले तिथे हौशी पायलट म्हणून काम केले मग त्यात अस्थिरता आली म्हणून अमेरिकेत आले. मग तिथे त्यांनी सुटिंग आणि fashion designing च्या क्षेत्रात स्वतःचा brand सुरु केला आणि तो चांगला नावारूपाला आणला. त्यांच्या Brand ने बिल क्लिंटनचे सूट देखील डिझाईन केले होते....
एवढी रामकहाणी सांगताना ते मधेच म्हणाले, "हमारे घर चलेंगे चाय पीने के लिये ? बाद में मै आपको Walmart ला छोड दूंगा". आता हे फारच होते.. आधीच ते आम्हाला सोडायला तयार झाले ही मोठी गोष्ट होती त्यात आता चहाला चला म्हणत होते. मी नम्रपणे नाही म्हणायचा प्रयत्न केला पण माझ्या डांबरट रूम मेट्सना चहाची तल्लफ टाळावीशी वाटेना.. म्हणून त्यांच्या तोंडातून "नाही अंकल रेहने दो ..." असे काहीच निघेना. शेवटी त्यांनी निर्णायक स्वरात "येणार का ?" विचारले आणि आम्ही त्यांच्याकडे जायला तयार झालो.
अतिशय उच्चभ्रू भागातून आमची गाडी धावत होती. NBA च्या स्टार खेळाडूंचे बंगले बाजूच्या झाडीमधून डोकावत होते. इथेच गर्द झाडीआड टायगर वूड्सचा अजस्र व्हिला लपलेला असल्याचेही काकांनी सांगितले. म्हटले 'च्यायला काका कुठे घेऊन आलेत आपल्याला'.... अखेर त्यांच्या घरी पोचलो आणि दार उघडणाऱ्या काकूंना 'इंडियासे गेस्ट आये हैं म्हणून सांगितले तर त्यांनी अगदी उत्साहाने स्वगत केले. न्यूयॉर्क वरून त्यांच्या भगिनी देखील आल्या होत्या तिथे. आत शिरताच काकांनी सांगितले "ये महाराष्ट्रसे हैं' ... कोकणस्थी गोऱ्या काकूंचे घारे डोळे लुकलुकले. आपुलकीने अस्खलित मराठीत विचारले ,"तुमच्या पैकी मराठी कोण आहे ?" हे मात्र फारच झाले... इतक्या हजारो मैलांवर एक पंजाबी काका भेटतात काय, अमल्या घरी काय घेऊन जातात काय आणि त्या काकू खूप दिवसांनी आपल्या आप्तांना भेटल्यासारखी आपुलकीने चौकशी करतात काय, सगळेच अनपेक्षित !
काकूंनी चहा आणि कुकीज आणून ठेवल्या. चहाचा मोठ्ठा मग हातात ठेवून म्हणाल्या "पिऊन बघा. आम्हाला साखर खूप कमी लागते तुम्ही कमी असेल तर सांगा" आधीच आम्ही आदरातिथ्याने भारावून, काहीसे दबून गेलो होतो. त्यामुळे काकू तुमचा चहा अत्यंत अगोड आहे हे सांगायची इच्छाच झाली नाही... त्यांच्या बोलण्यातला गोडवा पुरेसा होता. मग पुढे भरपूर गप्पा झाल्या. आमच्या apartment जवळच्याच हनुमान मंदिरामध्ये त्या चिन्मय मिशनच्यातर्फे दर रविवारी होणार्या तिथल्या भारतीय लोकांच्या छोट्या संमेलनात येतात (जिथे पूर्वी कधीतरी माझे रूममेट्स गेले होते) . तिथे त्या गेली कितीतरी वर्षे दर संस्कारवर्गासारख्या माध्यमातून शिकवतात असे कळले. काकू आणखी चौकशी करू लागल्या. खरेतर अनावश्यक प्रश्न टाळण्यासाठी मी थेटरमध्येच काकांना 'आम्ही सगळेच महाराष्ट्रातले आहोत. सगळे bachelor आहोत' वगैरे सांगून ठेवले होते. पण इथे तरकाकू अजून खोलात शिरायला लागल्या, मग सांगावे लागले की मी महाराष्ट्रातला , हा MPचा वगैरे वगैरे ... पुढे पुढे तर कहर झाला झाला. त्या काकू पेटल्याच ! अचानक "तुम्हा चौघांसाठी मी चांगली स्थळे बघते. तुमचे नंबर द्या" म्हणून सगळ्यांचे फोन नंबर घेऊ लागल्यावर मात्र आमच्यातल्या सारंगने माझ्याकडे बोट दाखवून 'याचे लग्न झाले आहे' असे जाहीर करून टाकले. त्यामुळे मला त्यांना फोन नंबर यायची वेळ आली नाही !
इकडे काका मात्र गप्पांमधून बाजूला झाले होते. कारण त्यांच्या कितीतरी शे इंची टीव्हीवर ऑस्करचे रेड कार्पेट सुरु झाले होते. अधून मधून ते आम्हाला फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे बघा वगैरे सल्ले देत होते. त्यावर काकू म्हणाल्या "आप उनको कुछ भी देखने के लिये मत बोलिये". काकांनी मात्र मग सांगितले की "तुला वाटते की ते 'तसले' सिनेमे पाहून बिघडतील ? ते चांगले मोठे झाले आहेत. त्यांना या गोष्टी कळतात आता. काहीनाही रे मुलांनो. तुम्ही अजिबात चुकवू नका". काकूंची खरच गम्मत वाटली.
अखेर काकांचा फेवरेट भाग असणारा ऑस्करचा मुख्य सोहळ्याचे वेध लागायला लागले तसे मात्र काका थोडे अस्वस्थ झाले. त्यांना आम्हाला सोडून येऊन पुन्हा टीव्हीसमोर ठाण मांडायचे होते... आम्ही 'ता' वरून ताकभात ओळखून निघालो. मनात एकाच खंत आहे की निघताना मी त्यांच्यासोबत फोटो नाही काढला. आम्ही पुन्हा त्यांच्या गाडीत बसलो काकांनी आम्हाला Walmart पाशी सोडले. सोडताना "सॉरी, ऑस्कर नसते तर तुम्हाला घरीच सोडले असते" म्हणून निघून गेले. त्यांच्या आत्मीयतेने आता आम्हाला गुदमरल्यासारखे झाले होते.Walmart मध्ये फिरताना या अनुभवाबद्दल चर्चा करताना माझे रूममेट्स मात्र फारच भावूक झाले होते. H1 व्हिसावर मोठ्या कालावधीसाठी ते अमेरिकेत आलेले होते. अमेरिकेत त्यांच्या Apartment मध्ये आल्यापासून त्यांच्यातला काहीसा निरुत्साह, होमसिकनेस पाहिला होता. त्यामुळे त्यांना इतके प्रेमाने कोणीतरी आईवडिलांसारखे बोलल्यासारखे वाटले होते आणि भावूक व्हायला झाले होते. पुढे जसजसा जास्त काळ लोटत गेला आणि मला जेव्हा घरची आठवण यायला लागली तेव्हा मला माझ्या रूममेट्सच्या त्यावेळच्या भावनांची उष्णता जास्त जाणवली....
********************************************
डहाळी
स्थलांतर हा माझा अत्यंत कुतूहलाचा विषय आहे.कधी आख्खे खंडच्या खंड स्थलांतरित झाले तर बर्याचदा त्यावरची माणसे ...इच्छा, नशीब, भावना, संधी, संकट यापैकी कोणत्याही एका किंवा अनेक कारणांनी माणूस भूखंड, सागर, सीमा लांघून जातो. आपल्या आकांक्षा, स्वप्ने, नैराश्य, वासना, संस्कृती, भावना, सवयी यांचे डबोले घेऊन जातो. मोठ्या प्रवाहातला छोटासा ओहोळ होतो. बऱ्याचदा शून्याच्याही मागून सुरुवात करतो. पुढे जातो तसे मागचे पाश विरत जातात. दोरखंडाचे सूत होते. मनुष्याने ते हट्टाने मुठीत धरून ठेवलेले असतात पण कुणाला कालांतराने लटक्या उत्साहाने दाखवायला जावे तर नारायणच्या लहान पोराच्या मुठीत गच्च धरलेल्या लाड्वासारखे काळे दिसत असतील .... स्वतःलाही ओळखू येण्यापलीकडचे...
मी अमेरिकेत कुठेही फिरत असलो तरी येणाऱ्या प्रत्येक माणसाला पाहून मला एकच प्रश्न पडायचा. हा कुठून आला असेल इतक्या दूरच्या प्रदेशात? हा नाहीतर याचा आज्जा आला असेल ... तो का आला असेल, मागे काय ठेवून आला असेल ? गुलाम म्हणून आला असेल का मालक म्हणून ? गोरा, काळा, सावळा, पिवळा, मिचमिच्या, भोकऱ्या, खुजा, टंगाड्या कोणीही समोर येवो... पावसाळ्यात जसे एक चिखलाचा, एक सांडपाण्याचा, एक नितळ थेंबांचा, एक रसायनांचा असे सगळे ओहोळ वाहत वाहत एकमेकांशी घुसळण करत, टकरा देत, फुफाटत धावत असतात आणि आपापले रंग-गंध-भवताल नदीला देत देत अखेर स्वतःच एक नदी होऊन जातात .... किनाऱ्यावरून बघणाऱ्यासाठी ते असते फक्त एकशब्दी अस्तित्व ... पाणी !!!
आख्खे जगच अशी नदी आहे पण अमेरिका हा सागर आहे ! Walmart मधून कॅबने घरी जाता जाता माझ्या डोक्यात चक्रे सुरु झाली होती. काका काकूंच्या झकास घरातून बाहेर पडताना कळले होते की त्यांना त्या महिन्यातच अमेरिकेत येऊन तब्बल ५० वर्षे पूर्ण होत होती !! म्हणजे ते काका काकू नव्हते तर आजी-आजोबा होते !! इतक्या वर्षापूर्वी इकडे आले असतील तेव्हा स्वतःचे स्थान निर्माण करायला किती संघर्ष करावा लागला असेल ? घरच्यांशी संपर्क ठेवण्यात किती अडचणी आल्या असतील ? होमसिक झाले नसतील ? सगळे सोडून घरी जावेसे वाटले नसेल ? आता भाषा सोडली तर काय बंध शिल्लक राहिले असतील भारताशी ? त्यांच्या मुलांना तर काही फरक सुद्धा पडत नसेल...... नदी उगम पावते त्या परिसरात आणि समुद्राला मिळते त्या परिसरात इतका फरक असतो की उगमापासची ती नदी हीच यावर विश्वास बसणे अशक्य असते ... मग तिला 'नदी' म्हणावे असे काय असते ? कदाचित त्या प्रवाहाला आणि प्रवासालाच 'नदी' ही संज्ञा प्राप्त होत असेल ....
'नासा' बघून बाहेर पडण्यापूर्वी आतले अत्यंत छोटेखानी म्युझीअम बघितले. तिथे Orlando चा तीन चारशे वर्षांचा इतिहास मांडला होता. अमेरिकेतल्या मूलनवासी रेड इंडिअन्सच्या काही जुन्या ठिकाणांपैकी Orlando एक आहे. तिथला इतिहास पाहून बाहेर पडलो. बाहेर गेटवर एक सिक्युरिटी गार्ड बाई उभी होती.... तिच्याकडे पाहून पहिल्यांदाच मला 'ही कुठून आली असेल इकडे' हा प्रश्न नाही. कारण तिचा वर्ण, डोळे, नाक अगदी खणखणीत आवाजात सांगत होते "मी तर इथलीच आहे, कधीपासूनची .... आमच्यावरच्या अनेक आक्रमणान्मधून - कशी कुणास ठाऊक - तग धरून असलेल्या वंशवृक्षाची एक डहाळी ..... मूलनिवासी रेड इंडिअन .... "
*******************************************
घुमियो चक्कर
आयुष्यात रिक्षावाल्यांचे पुरेसे अनुभव घेतल्यावर आणि Taxi वाल्यांचे किस्से पुरेसे ऐकल्यानंतर या जमातीविषयी मत पुरेसे पूर्वग्रहप्रदूषित झालेले आहे. भविष्यात न्यूयॉर्क मधल्या Taxi वाल्यासारखे पंधरा-वीस अनुभव आले तरच ते बदलण्याची थोडीफार शक्यता आहे.
लेत झालेल्या विमानाने न्यूयॉर्कला उतरलो तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. बर्फाळ वातावरणामुळे हाडफाडू थंडी होती. न्यूयॉर्क आणि परिसरात राहणाऱ्या आमच्या चमूचा भेटायचा प्लान कधीचाच ठरल्यामुळे सगळ्यांना भेटायला फारच अधीर झालो होतो. "एअरपोर्ट वरून आलास की सरळ Taxi मध्ये बस आणि हा पत्ता ड्रायव्हरला सांग. त्याच्याकडे जीपीएस असते. तो बावीसेक डॉलरमध्ये तुला इथे आणून सोडेल" असे चारुताने सांगून ठेवले असल्यामुळे सरळ रांगेतल्या समोरच्या Taxi त शिरलो. पत्ता सांगून टाकला. त्याचा accent मला आणि माझा त्याला झेपेना. त्यातून त्याला पत्ताही झेपेना. त्याने चेहरा कसनुसा केला आणि पत्ता माहित नाही म्हणाला. म्हटले जीपीएस मध्ये टाक. तर तो म्हणे "माझ्याकडे जीपीएस नाही". मला घेऊन घेऊन पुढे जायचे की नाही हा त्याचा निर्णय होत नव्हता आणि इथून बाहेर पडून दुसरी Taxi पकडावी का याबद्दल माझा निर्णय होत नव्हता. बाजारातल्या गर्दीत ठिय्या देऊन बसलेल्या म्हशीप्रमाणे आमची Taxi मागच्या सगळ्यांची कुचंबणा करत होती. शेवटी त्याला म्हटले '"तू चल, मी जीपीएस सुरु करतो मोबाईल वर". मुळात मोबाईल मधले जीपीएस चालू करण्याचे ज्ञान आणि मोबाईलचा स्पीड हे दोन्ही बाजारातल्या त्या म्हशीपेक्षा थोडेसेच जास्त होते. तरीही मी थोड्याच प्रयत्नात यशस्वीपणे जीपीएस चालू केले आणि ड्रायव्हरला म्हणालो "हा घे मोबाईल आणि आणि ते बघून चालव गाडी". तर त्याने मी त्याला खुनासाठी वापरलेला सुरा देऊ केल्यागत हात झटकले. "वी आर नॉट अलाउड टू टच धिस ". उठता बसता Sue करणाऱ्या अमेरिकेन जनतेच्या अनुभवातून आलेला हा नियम असावा. मग मी त्याला प्रॉम्प्ट करणार आणि तो गाडी हाकणार असा प्रवास सुरु झाला. दरम्यान मी चारुताला फोन करून परिस्थिती सांगितली होती. पण आमचा प्रवास हा 'एकापेक्षा एक' मधल्या लक्ष्या आणि सचिन सारखा सुरु होता. बहिरा सांगतोय आणि आंधळा चालवतोय. त्यात ड्रायव्हर साहेबांनी स्वतःचे ज्ञान वापरून हायवे वरून दुसऱ्या रस्त्याला घातली. जीपीएस पाहून स्पष्ट कळत होते की आम्ही मस्तपैकी लांबून निघालोय. मग मी वैतागलो. मी माझ्या accent मध्ये म्हटले 'तू उगीच लांबून का घेतो आहेस' तर तो त्याच्या accent मध्ये मला 'या दिशेने जाणे कसे सोयीचे आहे' हे समजावत होता. 'कानाने बहिरा मुका परी नाही' अशी अवस्था झाली होती.
अनोळखी शहर, मध्यरात्र उलटून गेलेली, पंधरा मिनिटात पार करायचे अंतर अर्धा तास होऊन गेला तरी संपेना म्हणून तिकडे चारुता हवालदिल. मी इकडे जीपीएस मध्ये अर्जुनाच्या एकाग्रतेने डोळे खुपसून बसलेलो. एखादे महत्वाचे वळण त्यात दिसत असतानाच चारुता किंवा अऱ्याचा फोन यायचा आणि जीपीएस वर पडदा पडायचा ! मग "आहे आहे अजून जीव आहे.. सारखा फोन करू नका, जीपीएस बघता येत नाही" असे सांगण्यात काही सेकंद… एकुणात धमाल चालली होती सगळी. पुण्यात जसं नवीन बकरा मिळाला की रिक्षावाला सोमवार, मंगळवार, सदाशिव, नारायण करत शेवटी शेजारच्या गल्लीत आणून सोडतो तसंच त्याचा हा चुलत आते मावस भाऊ सारथी करत असणार याची खात्रीच पटली. मीटरमध्ये बावीस डॉलरचा आकडा कधीच मागे पडला होता, त्यामुळे "एवढं लांबून का नेतो आहेस, फक्त बावीस डॉलरचे अंतर आहे" वगैरे फैरीसुद्धा सारथ्याच्या दिशेने झाडून झाल्या होत्या. शेवटी आता पुढचे वळण घेतले की आपल्याला थेट शनिवारवाडा दिसणार असे वाटत असतानाच अचानक कोपऱ्यावर वाट पाहत उभे असलेले सिद्धार्थ आणि ओंकार दिसले ! पोचलो एकदाचा ! मीटर तिशीतला आकडा दाखवत होता.… आणि एवढ्यात ड्रायव्हरचे ते शब्द कानावर पडले "बावीसच डॉलर दे" बाहेरच्या थंडीने गारठलो नसेन तेवढा ते शब्द ऐकून मी थिजलो. गहिवर दाटून आला. प्रथेप्रमाणे त्याला "वर तीन डॉलरची टीप घे" म्हणून तीस डॉलर हातात ठेवले तर त्याने मला ६ डॉलर परत केले ! मी आता ओक्साबोक्शी रडाय्चाच बाकी होतो. स्माईल देऊन तो निघाला. "अरे चहा तरी घेऊन जा" असे म्हणायचा मोह मी मोठ्या मुश्किलीने आवरला आणि माझी वाट पाहत ताटकळलेल्या दोस्तांची गळाभेट घेतली.
घरात शिरताना चारुताच्या जीव पडलेल्या भांड्याचा प्रचंड आवाज ऐकू आला. तिला एकदम हुश्श झाले होते. उशीर झाला होता खरा, पण मला ना, त्या अपरिचित रस्त्यांवरून, पेंगुळलेल्या बर्फाच्या ढिगाऱ्यांच्या बाजूने जाताना, रस्त्याकडेच्या एखाद्या विचित्र दिसणाऱ्या होमलेस माणसाच्या तोंडून येणाऱ्या वाफा पाहताना का कुणास ठाऊक पण अजिबात असुरक्षित वाटले नाही. न्यूयॉर्कबद्दल आधी बरेच ऐकल्यामुळे असेल कदाचित पण 'ही घाम न येणारी मुंबई आहे' असेच काहीतरी फिलिंग येत होते. त्या दिवशी (आय मीन रात्री) सगळ्यांसोबत वाढदिवस आगाऊच साजरा करताना एक फारच सुरेख चव मनात रेंगाळत होती… …
*******************************************
सख्खं
न्यूयॉर्क मध्ये येतानाच्या रात्री ते मला मुंबईसारखे वाटणे हा एक Romanticism होता पण न्यूयॉर्क सोडून जाताना मला ते अगदी मुंबईसारखे वाटणे हा मात्र Realism होता. त्या दिवशी एअरपोर्ट वर जाताना Taxiतून मी अगदी मनसोक्त खड्डे अनुभवले आहेत… छोटे, मोठे, अर्धे, आख्खे …. अगदीच सख्खे !
अनेक रात्री स्वप्नात पाठमोरी दिसणारी ललना अखेर वळून आपल्याकडे पाहते तेव्हा भागाबाईंची चंपा निघावी तसे वाटले अगदी.
*******************************************
ठसा
माझ्या या छोट्या सफरीत मला वरवरचे का होईना का होईना, वेगवेगळे रंग बघायला मिळाले पण तेवढ्याश्या ट्रेलरवरून अमेरिका नावाच्या चित्रपटाला 'जज' करणे इष्ट नाही. पण एके दिवशी Orlando मधल्या teammate च्या गाडीतून इंडिअन स्टोअर मध्ये निघालो असताना रस्त्याच्या कडेला एका वकिलाच्या जाहिरातीचा बोर्ड दिसला : '
Divorce starts from just 150$'. ते पाहून मला क्षणभर काही सुचलेच नव्हते. इतकी महत्वाची गोष्ट विक्रीमूल्य असलेली वस्तू म्हणून ऑफरसारखी अशी दुकानात मांडली जाऊ शकते ? अजूनही त्यावर काय नक्की काय म्हणायचे हे मला समजत नाही. यापुढे मी पुन्हा कधी अमेरिकेत जाईन किंवा जाणारसुद्धा नाही . माझ्या या ट्रीपच्या अनुभवाहून गेलो तर कदाचित चांगले आणि वाईटसुद्धा अनुभव घेईन. पण सध्या तरी Disneyland चा फायर शो, Times स्क्वेअरची 'लव्ह इज ऑन' स्क्रीनवर झळकणारी स्वतःची प्रतिमा, विनास्पीडब्रेकर रस्ते यांच्या इतकाच हा Advertising बोर्डही माझ्या लेखी अमेरिकची ओळख आहे.
*******************************************
शिवोsहम्
आपल्या देशात, घरात, ऑफिसात आपण किती गोंगाटात असतो ना ? आपल्या इंद्रियांवर सारख्या आदळणाऱ्या हजारो गोष्टी आपल्याला एकटं राहूच देत नाहीत... आणि गम्मत म्हणजे आपण बहुतांश वेळेस ते फारच एन्जॉय करवून घेत असतो. अमेरिकेत गेल्यावर सगळ्यात जास्त गट्टी कुणाशी झाली असेल तर स्वतःशी. इथल्या स्तब्ध रात्री, मौन धारण करून बसलेले दिवस मला खूप अंतर्मुख करत गेले... निर्वाताचा अनुभव देणारी ती ऐलपैल शांतता ! लांबच लांब पसरलेली हिरवीगार कुरणं, छोटेमोठे नितळ तलाव पाहताना मला माझेच विचार ऐकू यायचे... अगदी स्पष्टपणे .... या सगळ्यावर कडी म्हणून की काय अशाच एका नीरव रात्री मी 'डेक्स्टर' मधलं '
हाईड युवर टिअर्स' ऐकलं आणि त्या सुरांनी खूप आतल्या एका खोल विहिरीतल्या निश्चल पाण्याला असा काही स्पर्श केला की हुरहूर, व्याकुळता, समाधान, भरलेपण, भारलेपण असे सगळे तरंग एकदमच उमटत गेले. 'चिदानंद रूप, शिवोsहम् शिवोsहम्' असा काहीतरी इंद्रियांपल्याडचा अनुभव देणारा तो क्षण.... मी कालजयी असतो तर तो क्षण तसाच्या तसा चिमटीत उचलून अंगठीत खडा म्हणून घालून ठेवला असता कायमचा ...
यापूर्वी मी फार कमी वेळा स्वतःच्या एवढ्या जवळ गेलो होतो. या प्रवासाने मला पुन्हा ती संधी दिली.
थँक यू बाप्पा !
थँक यू अमेरिके !