Total Pageviews

Friday, November 26, 2021

२६/११, कसाब आणि मी : प्रश्न, प्रश्न, प्रश्न ...




बरोबर आजच हे ऐकून संपलं. 

लिहायला बसताना मनामध्ये असहाय्यता, विषाद, कृतज्ञता, संताप, वेदना अशा सर्व भावनांची मनात दाटी झाली आहे. ही घटना घडली तेव्हा मी नकळत्या वयाचा नव्हतो. या घटनेचं गांभीर्य तेव्हा लक्षात आलं नव्हतं असं तर अजिबातच नाही. परंतु एकूणच या अप्रिय घटनाक्रमाबद्दल संगतवार माहिती करून घ्यावी आणि त्यामधले बारकावे समजून घ्यावे असं, का कुणास ठाऊक, कधी वाटलंच नाही.

मध्यंतरी Myth of Hindu Terror या पुस्तकावर आधारित एक पुस्तिका मी लिहिली होती, पण त्यामध्ये २६/११ बद्दल काही पडद्यामागच्या प्रशासकीय पातळीवरच्या घडामोडी दिल्या होत्या, त्यामुळे प्रत्यक्ष ताज/सीएसटी वगैरेमध्ये नक्की कधी काय झालं यांच्या तपशिलांबबद्दल मी आजपर्यंत तसा अनभिज्ञच होतो. पण २६/११ च्या कटाचा तपास करणारे मुख्य तपास अधिकारी रमेश महालेंचं हे पुस्तक ऐकल्यावर मात्र त्यातल्या अनेक बारीक तपशिलांनी थिजून जायला झालं. कुणीतरी असंच समुद्रातून येऊन शेकड्यात मुडदे पाडतं आणि ते निस्तरायला पुढचे काही दिवस अनेक जीव खर्ची पडतात याची पुन्हा आठवण येऊन त्यातून येणारी असहाय्यता फार बेकार असते.

२६/११ची घटना ही जशी पाकिस्तानच्या प्रचंड कुटीलतेची आणि भारतीय यंत्रणांच्या प्रचंड बेसावधपणाची गोष्ट आहे, तशीच ती अनेक अडचणींतून मार्ग काढत दाखवलेल्या गेलेल्या अतुलनीय धैर्याचीही गोष्ट आहे. मुख्य घटनेच्या आजूबाजूला बिनचेहऱ्याच्या माणसांनी दाखवलेल्या कमालीच्या परिपक्वतेच्या, चौकसतेच्या नि:स्वार्थी वृत्तीच्या असंख्य हृदयस्पर्शी कहाण्या आहेत. टाइम्स आणि मिररच्या दोन फोटोग्राफरनी फोटो जीव धोक्यात घालून सीएस्टीमधल्या अतिरेक्यांचे, गोळीबाराचे मिळवणे , ज्याच्या टॅक्सीमधून दोन अतिरेकी ताजपाशी गेले आणि त्याने गेटवेजवळच्या पोलिसांना सावध केल्यामुळे बॉम्बमुळे होणारी प्राणहानी वाचणे, ताजमध्ये पाहुण्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या एका मुलीने रात्रभर टेलिफोन ऑपरेटरचे काम करत हॉटेलमधल्या सर्वांना फोन करून खोलीबाहेर येऊ नका असे सांगणे, स्वतःची ड्युटी नसतानाही काही पोलीसांनी आवर्जून कामात सहभागी होऊन मदत करणं, हल्ल्यांसाठी आरोपपत्र दाखवत असताना पोलिसांच्या स्टाफ मधल्या ९८ लोकांनी ९० दिवस साप्ताहिक सुट्टीही न घेता काम करणं,  खटल्याच्या साक्षीसाठी लांबून आलेल्या काही लोकांनी साक्षीदार म्हणून कायद्याने मिळणारा प्रवास भत्ता ‘हे देशासाठीचं काम आहे’ असं म्हणून तो नाकारणं, विविध जातीधर्माच्या, सामाजिक स्तरावरच्या लोकांनी या तपासाला मदत करणं, या घटना वाचताना भावूकही व्हायला होतं.

एकीकडे हे असताना दुसरीकडे ड्युटी संपवून गेल्यानंतर आपल्याच कार्यक्षेत्रात एवढ्या वादळी घटना घडत असल्याचं कळूनही थेट दुसऱ्या दिवशी कामावर हजर झालेला पोलीस अधिकारी, कसाबच्या हातावर गोळी झाडल्याचे श्रेय घेणारा एक पोलिस, हल्ल्यात जखमी झालेला नवरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाही  केवळ टीव्हीवर चकण्याच्या इच्छेपायी आपण ‘दोन बोटींमधून अतिरेकी आल्याचं पाहिलं’ हे खोटं सांगणारी स्त्री असे दिव्य नमुनेही महाले यांना अनुभवास आले.

घटनास्थळी योगायोगाने, दुर्दैवाने उपस्थित असणाऱ्यांच्या कहाण्या चटका लावून जाणाऱ्या आहेत. उशिरा पोचल्याने एकाची सीएसटीवरची ट्रेन सुटली.. हा सीएसटी बाहेर पडला आणि बाहेर येऊन टॅक्सीने आणि नातेवाईकांकडे मुक्कामाला निघाला. त्याच सुमारास कसाब आणि त्याच्या साथीदाराने सीएसटीवर गोळीबार सुरु केला. दुर्दैवाने त्याच टॅक्सीमध्ये आधी बसलेल्या कसाबने बॉम्ब ठेवला होता, ज्याचा काहीवेळातच स्फोट झाला . काही वेळापूर्वी कसाबच्या गोळीबारातून वाचलेल्या त्या मनुष्याच्या कसाबच्याच बॉम्बने चिंधड्या उडाल्या. हे वाचताना तर काय व्यक्त व्हावं हेच सुचत नाही. अतिरक्यांनी ताजचा ताबा घेतलेला असतानाही खालच्या मजल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या एका कर्मचाऱ्याची बायको आणि मुलं वरच्या मजल्यावरच्या खोलीमध्ये होती. अतिरेक्यांनी त्या मजल्यावर लावलेल्या आगीमध्ये भाजून त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा काही काळाने त्यांच्या खोलीमध्ये पोलिसांनी प्रवेश केला होता तेव्हा ते तिघेही एकमेकांना बिलगून मृत्युमुखी पडल्याचं पोलिसांना दिसलं, हे वाचून तर माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं...

रमेश महाले यांचं हे पुस्तक फापटपसारा नसणारं, अतिशय नेमकं आणि कुठेही स्वतःची टिमकी न मिरवणारं आहे. शिवाय उपेंद्र लिमयेच्या खर्जातल्या दमदार आवाजात असल्याने ऐकताना खूपच प्रभावी वाटतं. महाले यांनी निवृत्ती नंतर पुस्तक लिहिलेलं असलं तरी उगाच कुणावर टीका नाही, कटू अनुभव खूप आले असले तरी ते जास्त उगाळलेले नाहीत. २६/११ ला ज्या घटना घडल्या त्यांचे वर्णन, त्याची पार्श्वभूमी आणि पुढे झालेला खटला आणि शिक्षा असा याचा span आहे.

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं महाले यांनी स्वतंत्र प्रकरण कौतुक केलं आहे.  प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्या बेजाबदार वृत्तांकनाचे निवडक नमुने देतानाही महाले यांनी विलक्षण संयमित भाषा वापरली आहे. याशिवाय ऐन तपासादरम्यान उठणाऱ्या अफवांच्या मनस्तापावरही स्वतंत्र प्रकरण आहे. उडत आलेली बातमी कितीही निराधार वाटत असली तिची शहानिशा केल्याशिवाय पोलिसांना पुढे जाता येत नाही याचे पुस्तकातले काही नमुने पोलिसांच्या कामातील आव्हानांची पुरेपूर कल्पना देतात. आपल्या सर्व १०० हून अधिक सहकाऱ्यांना महाले यांनी पुस्तकात नावानिशी श्रेय दिलं आहे हे विशेष..  

नावाप्रमाणेच हे पुस्तक कसाबभोवतीच फिरतं. त्यामुळे कसाबचा इतिहास, कसाब आणि त्याचा जोडीदार यांनी घातलेल्या तांडवाची अतिशय सविस्तर माहित यात आहे, परंतु अन्य आठ जोड्यांनी नक्की काय, कुठे आणि कसं केलं याबद्दलची माहिती मात्र यात नाही, लिओपोल्ड, छबाड हाऊस इथल्या गोळीबाराबद्दल यात माहिती नाही... ती असायलाच हवी होती, असं वाटतं...

२६/११ ने असंख्य प्रश्न निर्माण केले. किंवा आधीपासून असणारे प्रश्न अधोरेखित केले. समुद्री गस्तीमध्ये किती गंभीर चुका आहेत कळलं, हे पोलिसांची स्वसंरक्षण करण्याची यंत्रणा, शस्त्रे किती मागास आहेत हे कळलं.. मुख्य म्हणजे इस्लामिक जिहाद कुठल्या नव्या कार्यपद्धतीनेही किती लेव्हलपर्यंत नुकसान करू शकतो हे आपल्याला त्या दिवशी दिसलं. यातल्या पहिल्या तीन गोष्टींवर उपाययोजनाही झाल्या. पण जिहादी मानसिकततेचं काय करायचं याचं उत्तर आपल्याकडे नाही. दहा अतिरेकी पाकिस्तानातून आले हे ख्ररंच, पण त्यांना प्रशिक्षण देणारा अबू जुंदाल बीडचा होता हे सत्य कसं नजरेआड करणार? देशाची सुरक्षा हा विषय कॉंग्रेस सरकारने कसा पार ऑप्शनला टाकला होता हे कसं विसरणार?

हिंदूंनाच दहशतवादी ठरवण्यासाठी किती मोठी यंत्रणा काम करते आहे, याचा मोठा धडा त्यादिवशी मिळाला. ‘हातात देवीचा धागा बांधून, हिंदू नावांच्या विद्यार्थ्यांची आयकार्ड्स घेऊन हिंदूंवरच आळ येईल अशा प्रकारे आलेले हे अतिरेकी होते’, हे महाले यांनी पुस्तकात आणि नंतर डेव्हिड हेडलीनेही आपल्या साक्षीमध्ये सांगितलं आहे. तुकाराम ओंबळेनी स्वतःच्या पोटात गोळ्या रिचवून नराधम कसाबला पकडलं नसतं तर हिंदूंच्या ताटात काय काय वाढून ठेवलं असतं याची कल्पनाही करवत नाही. सगळं करूनसवरून नामानिराळे राहून हिंदूंना, संघाला दहशतवादी ठरवण्यासाठी मोठी लॉबी आजही कार्यरत आहे. कसाबचा आणि पाकिस्तानचा हात उघडपणे असूनही ‘संघाने हल्ला घडवला’ असं धादांत खोटं लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला दिग्विजय सिंह उपस्थित राहतो, तेव्हा दहशतवादाची, जिहादी मानसिकतेची पाळंमुळं कुठवर पोचली आहेत हे आपल्या लक्षात येतं.. बंगाल आणि केरळ पासून ते अगदी कल्याण, उस्मानाबाद पर्यंत वाढत चाललेली जिहादी मानसिकता खणून काढण्याऐवजी आपलेच देशबांधव तिला गोंजारत आहेत ही गोष्ट ‘२६/११’पासून आपण पुरेसं शिकलेलो नाही हेच अधोरेखित करतीये..

मुंबई पोलिसांचं चित्र आज काय आहे ? दिवसरात्र राबून मुंबई पोलिसांनी अतिशय कौशल्याने आणि तत्परतेने २६/११चा तपास केला होता. एवढं कार्यक्षम पोलिस खातं आज वसुलीसाठी, वैयक्तिक सूडासाठी जुंपलं गेलं आहे, पोलिस अधिकारी फरार किंवा गजाआड आहेत, त्यांचा मुकादम असलेला मंत्री न्यायालयीन कोठडीत आहे.. दुर्दैवाने अशा स्थितीत पुन्हा २६/११ सारखं भयंकर काही घडलंच, तर त्याला सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता आहे ? तेवढा आत्मविश्वास त्यांच्यात शिल्लक उरलाय?



Monday, October 25, 2021

स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव


 

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आयुष्यात अनेक टोकाचे अनुभव घेतलेले व्यक्तिमत्व. जहाल क्रांतिकारक, सुधारक, हिंदुराष्ट्रवादी, कवी, वक्ते, नाटककार असे त्यांचे अनेक पैलू काळाच्या ओघात सर्वांसमोर येत गेले. त्या त्या काळात त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले तशी टोकाची टीकाही झाली. अंदमानच्या तुरुंगातून सुटून येण्यापासून त्यानंतरच्या त्यांच्या भूमिकांमधले बदल अनेकांना पचनी पडले नाहीत. काहींनी अज्ञानातून, काहींनी जाणीवपूर्वक सावरकरांची प्रतिमा मलिन करायला सुरुवात केली. समाजासमोरचे प्रश्न बदलतात, समाजाचं त्या प्रश्नांबद्दलचं आकलन बदलतं तसतसे वादविवाद, मतमतांतरं काळाच्या ओघात बऱ्याचदा सौम्य होत जातात. सावरकरांच्या बाबतीत मात्र असं झालं नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज एकविसाव्या शतकाची वीस वर्षं उलटली तरी त्यांच्यावरचे आरोप, आक्षेप, चिखलफेक कमी होण्याऐवजी या गोष्टी वाढतच चालल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये काहीएक हेतूंनी प्रेरित 'अभ्यासकां'पासून ते बहुतांश काळ सत्ताधारी असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांपर्यंत अनेक मंडळींचा सहभाग आहे. मात्र आरोप करणारा कितीही उथळ, अभ्यासहीन असला तरीही आरोपांना उत्तर मात्र अभ्यासपूर्वकच द्यावे लागते. त्यामुळे सावरकर अभ्यासकांची जबाबदारी आणखीनच वाढते. अशा परिस्थितीत सावरकरांच्या चरित्राचा, त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून त्यांच्यावरील आरोपांचं सप्रमाण खंडन करणारं अक्षय जोग लिखित पुस्तक 'स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव' महत्वाचं ठरतं.

 

दोन गंभीर आरोप

 

सावरकरांवर होणारे दोन आरोप अधिक गंभीर स्वरूपाचे आहेत आणि साहजिकच त्या त्यासंदर्भातली या पुस्तकातली दोन प्रकरणं दीर्घ स्वरूपाची आहेत. पहिला आरोप म्हणजे "सावरकरांनी बिनशर्त माफी मागून अंदमानच्या कारागृहातून सुटका करून घेतली." या घटनेचा सखोल अभ्यास न करता काहीजणांकडून सावरकरांना 'माफीवीर' ठरवले गेले. पुस्तकात 'सावरकरांची क्षमापत्रे' या प्रकरणात अंदमानहून सुटकेचा तपशिलाने उहापोह केला आहे. क्रांतिकारक जेव्हा क्रांतिकार्याला वाहून घ्यायचा निश्चय करतो तेव्हाच तो ते कार्य करताना पावलापावलावर येणाऱ्या मृत्यूच्या स्वागतासाठीही तयार असतो. एकतर क्रांतिमार्गाने इच्छित लक्ष्य करणे किंवा मृत्यू पत्करणे हे दोन पर्याय त्याच्यापुढे असतात. परंतु तुरुंगात खितपत पडल्याने यातलं काहीच साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे तुरुंगातून सुटका करून घेऊन पुन्हा कुठल्यातरी मार्गाने आपले कार्य सुरु ठेवणे या उद्देशाने सावरकरांनी  इंग्रज सरकारला सुटकेसाठी विनंती केली होती. तुरुंगातून अशा प्रकारची विनंती करून बाहेर पडलेल्या अन्य क्रांतिकारकांची उदाहरणेही या प्रकरणात दिली आहेत. सावरकरही स्वतःपुरतेच सुटकेचे प्रयत्न न करता तुरुंगातील इतर सहकाऱ्यांनाही तसे करणे हितावह आहे हे पटवून देत होते. "सरकारने मला न सोडता अंदमानातल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अडकून पडलेल्या राजबंदीवानांस तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल" असेही सावरकर म्हणाले होते, ही गोष्टही हे प्रकरण अधोरेखित करतं. सावरकरांनी अंदमानातून सुटका झाल्यावर सक्रिय राजकारणात भाग घेतला नसला तरी रत्नागिरीतल्या त्यांच्या वास्तव्यात त्यांच्याकडून क्रांतिकार्याला मोठी प्रेरणा मिळाल्याची विविध उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. शिवाय सुटकेनंतरच्या या काळाचा सदुपयोग सावरकरांनी समाजसुधारणांसाठी कसा केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक मोठ्या लोकांनी त्या कार्याची प्रशंसा कशी केली याची दखल घेणारं स्वतंत्र प्रकरणात पुस्तकात आहे.

 

दुसरा आरोप म्हणजे "सावरकरांचा गांधीहत्येत सहभाग होता." त्या अनुषंगाने गांधीहत्येच्या खटल्यातील सावरकरांशी संबंधित साक्षी,युक्तिवाद आणि सावरकरांना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयामागची कारणं पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झालेली असली तरी कालांतराने आलेल्या कपूर आयोगाच्या हवाल्याने सावरकरांवर पुन्हा तसेच आरोप करण्याचा प्रयत्न अनेकांकडून दिला जातो. लेखकाने कपूर आयोगाचे अधिकारक्षेत्र आणि आयोगाकडून त्याचे झालेले सरळसरळ उल्लंघन याबाबतही महत्वाचे विवरण दिले आहे. "सावरकरांविरोधात कोणताही सबळ पुरावा नसून जे दावे केले जात आहेत ते पोकळ असून सावरकरांची सुटका होईल असे सरकारी वकिलानेच खाजगीत मान्य केले" असे अमेरिकन वकिलातीतील अधिकाऱ्याने १९४८साली आपल्या ज्या अहवालात नमूद केले होते तो अलीकडेच प्रकाशात आलेला अहवाल पुस्तकात दिलेला आहे.

 

 

प्रत्येक आक्षेपाच्या खंडनासाठी स्वतंत्र प्रकरण

कोणत्याही घटनेचे मूल्यमापन करण्यासाठी संबंधित कागदपत्रांसोबतच त्या घटनेचे होणारे परिणामही अभ्यासावे लागतात. त्या घटनेत थेटपणे समाविष्ट नसलेल्या परंतु त्याच काळातल्या टप्प्यावर असणाऱ्या व्यक्ती, घटना यांचाही डोळस अभ्यास असावा लागतो. हा अभ्यास पुस्तकात सतत दिसत राहतो. त्यातूनच वरवर संबंधित वाटत नसणाऱ्या घटनांचा अन्वयार्थही लेखकाने लावला आहे. उदा. १९४० पूर्वी सावरकरांनी आवाहन केलं होतं : “अधिकाधिक तरुणांनी सैन्यात भरती व्हावं आणि नंतर बंदुकीची नळी आयत्यावेळी कुठे वळवायची ते आपण ठरवू शकतो”.  त्यानंतर खरोखरच सैन्यभरती वाढली, याचे विविध दाखलेही पुस्तकात दिले आहेत. पुढे इंग्रजांच्या सैन्यात घडून आलेल्या भारतीय नाविकांच्या बंडासारख्या घटनांची पाळंमुळं अशाच जुन्या घटनांमध्ये असतात हे लेखकाने लक्षात आणून दिलं आहे. 

 

उत्तम वैचारिक मांडणी

सावरकरांवरील आरोपांचे खंडन करताना केले गेलेले मुद्देसूद, ससंदर्भ विवेचन आणि संयत मांडणी हे यापुस्तकाचे बलस्थान आहे. विरोधकांचे आरोप/आक्षेप कितीही क्षुल्लक/थिल्लर असले तरीही पुस्तकात त्यांच्यावर हेत्वारोप करणे, त्यांना दूषणं देणे, सावरकरांचे वैचारिक विरोधक असणाऱ्या महापुरुषांना कमीपणा आणण्याचा प्रयत्न करणे असले प्रकार केलेले नाहीत. विरोधकांप्रति पूर्ण आदर राखून नम्र मतभेद नोंदवले आहेत. त्यामुळे उत्तम वैचारिक मांडणी वाचल्याचं समाधान मिळतं. अभ्यासपूर्ण पुस्तकं बरीच असली तरी त्यांपैकी संदर्भग्रंथाचं मूल्य असणारी पुस्तकं कमी असतात. प्रस्तुत पुस्तक अशा मोजक्या पुस्तकांमध्ये गणलं जाईल. यापुढे सावरकरांवर पुन्हा आरोप होतील तेव्हा त्यांचं खंडन करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.

कुठलीही घटना कधीच इतिहासातून सुटी काढून त्यावर टिप्पणी करता येत नाही, त्यासाठी अभ्यास सर्वांगीणच असावा लागतो. व्यक्ती, विचार, घटनाक्रम या सर्व गोष्टींची माहिती असावी लागते. इतिहासाच्या पानांवरच्या दोन ओळींच्या मधलं वाचता यावं लागतं. या सगळ्यांतूनच ऐतिहासिक घटनांचं विश्लेषण व्यवस्थित होऊ शकतं. याचं भान बाळगूनच प्रस्तुत पुस्तकाचं लेखन केलं गेलं आहे. ते वाचकाला उत्तम बौद्धिक खाद्य पुरवतंच, पण त्याचबरोबर अभ्यासकाने आपल्या अभ्यासविषयाकडे कशाप्रकारे पाहावं याचीही नकळत दृष्टी देऊन जातं हे विशेष.

 

पुस्तक : स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव  

लेखक : अक्षय जोग

प्रकाशक : मृत्युंजय प्रकाशन

पृष्ठसंख्या : १७४

मूल्य : २०० रु. 

('महाराष्ट्र टाईम्स'मध्ये १७ मे जानेवारी २०२० रोजी प्रकाशित लेख)

जनांचा प्रवाहो चालला...

मुखपृष्ठ सौजन्य : अमेझॉन

चरैवेति, चरैवेतिहे मनुष्यप्राण्याच्या प्रवासाचे सूत्र आहे. तो चालायचा थांबत नाही. विचार, इच्छा, नशीब, भावना, संकट, संधी, सक्ती यांपैकी कुठल्याही कारणांमुळे तो एकीकडून दुसरीकडे स्थलांतर करत राहतो. जाताना आकांक्षा, स्वप्नं , नैराश्य, वासना, आपल्यासोबत घेऊन जातो. भारतीय लोक याला अपवाद कसे असतील? प्रचंड वैविध्य असणाऱ्या भारतीयांचे स्थलांतर हा खरंतर अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. 'इंडिया मूव्हिंग' या पुस्तकामधून चिन्मय तुंबे यांनी या विषयाचा अतिशय समर्थपणे वेध घेतला आहे.

लेखकाने मांडलेली 'द ग्रेट इंडियन मायग्रेशन वेव्ह' ही संकल्पना हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. देशाच्या एका विशिष्ट भागामधून दुसऱ्या ठराविक भागामध्ये रोजगारानिमित्त वर्षानुवर्षं होत असलेल्या स्थलांतरामध्ये काही निश्चित गुणधर्म दिसतात असं लेखकाचं निरीक्षण आहे. हे स्थलांतर पुरुषबहुल असतं, ते अर्धस्थायी स्वरूपाचं असतं (म्हणजे दीर्घकालीन, परंतु कायमचं नव्हे) आणि त्यामध्ये स्थलांतरितांकडून रोजगाराच्या ठिकाणाहून आपल्या गावी नियमितपणे पैसे पाठवले जातात. उदा. रत्नागिरी जिल्ह्यातून रोजगारासाठी मुंबईला होणारं, तसंच कर्नाटकातल्या उडुपीहून खाद्यव्यवसायानिमित्त देशभर होणारं स्थलांतर शतकाहून अधिक काळ अव्याहतपणे चालू आहे. पुस्तकातलं एक संपूर्ण प्रकरण या 'स्थलांतर लाटे'ला वाहिलेलं असून अन्य प्रकरणांमध्येही या लाटेचा विविध संदर्भांत उल्लेख येत राहतो. त्यामधून देशाच्या इतिहासात या सातत्यपूर्ण स्थलांतर लाटेचं महत्व मोठं आहे हे लेखक दाखवून देतो. अशा स्थलांतरांच्या दोन्ही टोकांना होणारे बदल लेखकाने इतिहास, समाजशास्त्र, संख्याशास्त्र अशा अनेक अंगांनी नोंदवले आहेतच, पण यातूनच देशाच्या विविध भागात निर्माण झालेल्या स्थानिक विरुद्ध परके' अशा स्वरूपाचा संघर्षाचाही परामर्श घेतला आहे.

'इंडिया मूव्हिंग'मधून भारतीयांच्या देशातल्या आणि देशाबाहेरच्या स्थलांतराचा लेखकाने केलेला अभ्यास बहुआयामी आहे. भारतीयांच्या स्थलांतरांमध्ये काळाच्या ओघात होत गेलेले बदल आणि त्यामागे असणारी भौगोलिक आणि पर्यावरणीय कारणं यांचा परामर्श लेखकाने घेतला आहे. मारवाडी, गुजराती, सिंधी इ. समाजांच्या व्यापारी उद्देशाने होणाऱ्या स्थलांतराची वैशिष्ट्यं पुस्तकामध्ये आहेत.  वेस्टइंडिज, सुरिनाम, फिजी येथे  मजूर, नोकर, कारागीर म्हणून नेल्या गेलेल्या भारतीयांच्या इतिहासाचे तपशीलही इथे आहेत.  विद्यार्थी म्हणून युरोप-अमेरिकेत जाणाऱ्या आणि कुशल मनुष्यबळ म्हणून सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्थायिक होणाऱ्या भारतीयांच्या महत्वाकांक्षेचीही चर्चा आहे. स्थलांतरितांमधल्याच निर्वासित (उदा. फाळणीमुळे बाधित) आणि विस्थापित (उदा. धरणग्रस्त) या श्रेणींचाही स्वतंत्रपणे विचार केला गेलेला आहे. लग्नाच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने एवढंच नव्हे तर मानवी तस्करी म्हणूनही होणारे स्त्रियांचे स्थलांतर हा दुर्लक्षित पैलूही चर्चिला आहे. लेखकाची  अर्थशास्त्र अभ्यासक म्हणून असणारी पार्श्वभूमी, परराष्ट्र विभागाअंतर्गत चालणाऱ्या संशोधन प्रकल्पाचा सदस्य म्हणून केलेलं संशोधन, स्वतःच्या डॉक्टरेटसाठी केलेला स्थलांतराचा अभ्यास यामुळे या पुस्तकातील तपशिलांना विश्वासार्हता प्राप्त झाली आहे.

पुस्तक संदर्भसंपृक्त आणि बारीकसारिक आकडेवारीने भरगच्च आहे, तरीही ते रुक्ष अहवालासारखे वाटत नाही हे विशेष! कथनाच्या ओघात येणारे किस्से, रंजक घटना, लेखकाची मिश्किल टिप्पणी यांमुळे हे पुस्तक वाचनीय झालं आहे. स्थलांतराबद्दलच्या काही जुन्या समजुतींकडे पाहण्याची लेखकाची कालसुसंगत दृष्टीही पुस्तकातून दिसते. उदा. बुद्धिवंतांचे भारतातून होणारे स्थलांतर उर्फ 'ब्रेन ड्रेन' हा एकेकाळी चिंतेचा विषय होता, परंतु भारताबाहेर राहूनही अशा लोकांच्या भारतामधल्या विविध प्रकल्प आणि योजनांमध्ये वाढत असलेल्या सहभागामुळे आपल्या देशातही नव्या कल्पना, प्रेरणांचं वारं खेळायला लागलं आहे, असा सकारात्मक दृष्टिकोन लेखक मांडतो.

पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात 'स्थलांतर आणि विकास' यांच्यातल्या परस्परसंबंधांची चिकित्सा केली गेली आहे. गावाकडून शहराकडे होणाऱ्या स्थलांतरामुळे जातिव्यवस्थेची सैलावणारी मिठी, गरिबीमधून सुटका होण्याची शक्यता अशा जमेच्या बाजूंसोबतच बिघडणारं स्वास्थ्य, शहरांवर पडणारा ताण, त्यावरून होणारे राजकारण यांबद्दलही या प्रकरणामध्ये उहापोह केला आहे आणि आपल्या येणाऱ्या काळातल्या स्थलांतराच्या स्वरूपासंबंधी अभ्यासाच्या आधारे आडाखेही बांधलेले आहेत.  एकूणच भारतीयांच्या स्थलांतराच्या अनेक अंगांनी केलेल्या सखोल विश्लेषणामुळे या पुस्तकाला समाजशास्त्रीय दस्तावेजाचं मोल प्राप्त झालं आहे.

 

'इंडिया मूव्हिंग : अ हिस्ट्री ऑफ इंडियन मायग्रेशन

लेखक : चिन्मय तुंबे

प्रकाशक : पेंग्विन रँडम हाऊस इंडिया

पाने : २८५

किंमत : ५९९ रू.


('महाराष्ट्र टाईम्स'मध्ये २ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित लेख)

आयुष्याचे 'धागे' उलगडताना...

 






गांधीजींच्या विचारांचा अभ्यास करताना, त्यांच्या विचारांचा सारांश म्हणून डोळ्यांसमोर उभे राहते ते प्रतीक म्हणजे चरखा. चरख्यावर सूत कातणाऱ्या गांधीजींना पाहून खादीचा आणि पर्यायाने स्वदेशीचा, स्वावलंबनाचा विचार असंख्य भारतीयांचा मनात रुजला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गांधीविचारांचे, खादीचे महत्त्व जनमानसात टिकून राहण्याच्या प्रयत्नांना ज्यांचा ज्यांचा हातभार लागला, त्यापैकी एक रघुनाथ कुलकर्णी. त्यांच्या आयुष्याचा प्रवास खादीसोबतच कसा झाला, हे उलगडणारे आत्मकथन म्हणजे 'खादीशी जुळले नाते'. गांधीविचारांमधून साकारलेल्या वर्ध्याच्या महिलाश्रमात संगीत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शामराव उर्फ अण्णा कुलकर्णी यांचे रघुनाथ कुलकर्णी हे पुत्र. लहानपणापासून त्यांचा गांधीविचारांशी जवळून परिचय झाला. आजूबाजूची ज्येष्ठ मंडळी या विचारांच्या प्रसारासाठी काम करताना पहिल्याने, गांधीविचार आपोआप रुजत गेले. पदवी मिळवल्यानंतर काही काळ शिक्षक म्हणून काम केल्यावर, जेव्हा अशाच एका ज्येष्ठ गांधीवादी व्यक्तीने, भाऊ लेले यांनी आग्रह केल्यामुळे, वर्ध्याची शिक्षकाची नोकरी सोडून मुंबईच्या खादी कमिशनमध्ये ते रुजू झाले.

स्वतः खादी कमिशनमध्ये मोठ्या पदावर असणाऱ्या भाऊ लेलेंचे सहायक म्हणून काम करताना कुलकर्णी यांना खादीच्या व्यावहारिक बाजू कळल्या. कापसापासून ते खादीविक्रीपर्यंतच्या साखळीचे बारकावे लक्षात समजले, जे त्यांना कालांतराने खूप उपयोगी पडले. सेवाग्राम येथे खादीविषयक संशोधनात कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढे त्यांनी खादी कमिशनमध्ये महत्त्वाची पदे भूषवलीच; परंतु नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही विविध संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या. विविध खादीसंस्था, ग्रामसेवा मंडळ, विनोबांचे आचार्यकुल अशा ठिकाणच्या जबाबदाऱ्यांचे तपशील वाचताना खादी, ग्रामविकसन क्षेत्रातल्या त्यांच्या सखोल ज्ञानाची आणि अष्टपैलुत्वाची जाणीव होते. वर्ध्याच्या खादी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये अधीक्षक म्हणून कुलकर्णी यांनी केलेले काम आणि त्यांच्या चमूचे कल्पक संशोधन, हा या आत्मकथनातला लक्षवेधी भाग आहे. 'सेवाग्राम लूम' हा नवीन माग विकसित केल्यामुळे कापडाचे दैनंदिन उत्पादन आधीच्या दीडपट झाले. तंत्रज्ञान बदलले; पण माणसावर विपरीत परिणाम झाला नाही. यंत्राला विरोध नाही; पण मानवाला पर्याय म्हणून यंत्र असू नये, हा गांधीविचार प्रत्यक्षात आणला गेल्याचे कुलकर्णी आवर्जून नोंदवतात. खादीनिर्मितीमध्ये मुरलेल्या मंडळींच्या अनुभवाला कुलकर्णी यांनी तंत्रप्रशिक्षण आणि वाचनातून मिळवलेल्या ज्ञानाची जोड मिळाल्याने, खादी उत्पादनाची भरभराट व्हायला मदत झाली. अर्थात, सर्वच प्रवास सोपा, आल्हाददायक नव्हता. नियमांशी आणि मूल्यांशी प्रतारणा न करण्याच्या स्वभावामुळे, इतरांकडून होणारी अडवणूक आणि कटू अनुभवही कुलकर्णी यांनी नोंदवले आहेत. खादी हे फक्त उत्पादन नसून, ती एक मूल्यव्यवस्था आहे, हा विचार लोप पावून बाजारीकरण झाल्याबद्दल ते विषाद व्यक्त करतात.

अभय बंग यांची विचारप्रवर्तक प्रस्तावना, हे पुस्तकाचे बलस्थान म्हणायला हवे. चरखा, सूतकताई, खादी यांमागे गांधीजींची विचारप्रक्रिया काय होती, आजही खादी कालसुसंगत कशी आहे, याची मुद्देसूद मांडणी बंग यांनी केलेली आहे. सूतकताईकडे गांधीजीनी स्वयंशिस्त, स्वावलंबनापासून ते रोजगार निर्मितीचे साधन इतक्या व्यापक दृष्टीने पाहिले, हे प्रस्तावनेतून लक्षात येते. खादीच का, या अनुषंगाने कुलकर्णी यांच्या आत्मकथनात न आलेले मुद्दे प्रस्तावनेत चर्चिले गेल्याने, ती पुस्तकाला पूरक ठरली आहे. पुस्तकातली एक गोष्ट मात्र खटकते, ती म्हणजे म्हणजे यातला इंग्रजी शब्दांचा अतिरिक्त वापर. ज्या संज्ञा, संकल्पनांसाठी मराठीत आधीपासून रुळलेले शब्द आहेत, त्यांसाठीही पुस्तकात इंग्रजी शब्दच योजलेले आहेत. याशिवाय पुस्तकात कथनाच्या ओघात आलेल्या काही संकल्पना (ताणा, वया, गुणक, अक्षांतर इ.) पुरेशा स्पष्ट होत नाहीत. हे खादीच्या अभ्यासक्रमातले क्रमिक पुस्तक नसून आत्मकथन आहे हे खरे असले, तरी लेखकाचा या क्षेत्रातला दांडगा अनुभव पाहता, पुस्तकाला संदर्भमूल्यही आहे. पुस्तकाच्या शेवटी अशा तांत्रिक बाबी, संकल्पनांची सूची, रेखाचित्रे अथवा छायाचित्रे असती, तर त्याच्या मूल्यात भरच पडली असती.

वैचारिक बांधिलकी पक्की असली, की त्या दिशेने आपोआप मार्ग दिसत जातो, याची प्रचिती देणारे हे आत्मकथन आहे. ते जसे लेखकाचा जीवनप्रवास रेखाटते; तसेच एका विचारसरणीचा व्यावहारिक जगातला प्रवासही सांगते. विचारांना दिशा देणे आणि विचार प्रत्यक्षात उतरवणे, या दोन्ही दृष्टींनी ते उपयुक्त ठरेल.


खादीशी जुळले नाते
लेखक : रघुनाथ कुलकर्णी
प्रकाशक : समकालीन प्रकाशन
पाने : १११, किंमत : १५० रु.

(महाराष्ट्र टाईम्समध्ये २० डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित)


ध्रुव गाठण्याचे ध्येय



इतिहासात डोकावलं की मनुष्याला नवनवीन भूप्रदेशांच्या शोधार्थ नेणारी, नवी क्षितिजं गाठण्याची तीव्र उर्मी खुणावत राहिल्याचं दिसतं. नौकानयनाच्या तंत्राने एकमेकांशी जमिनीने न जोडले गेलेले दूरचे प्रदेशसुद्धा माणसाला गाठणं शक्य होऊ लागलं. तंत्राला धर्मविस्तार, साम्राज्यविस्ताराची जोड मिळाली आणि मध्ययुगात शोधमोहिमांचे युग अवतरले. सर्व खंड पालथे घातल्यानंतर पृथ्वीचे ध्रुव पादाक्रांत करण्याच्या महत्वाकांक्षी मोहिमा आखल्या नसत्या तरच नवल. 'टू द एजेस ऑफ द अर्थ' हे पुस्तक अशा महत्वाच्या मोहिमांचे अनेक पदर उलगडतं.


१९०९ सालच्या तीन साहसी शोधमोहिमा हा या पुस्तकाचा मध्यवर्ती विषय आहे. आजवर कुणीही माणूस पोचला नव्हता अशा पृथ्वीवरच्या दूरस्थ बिंदूंपर्यंत पोचण्यासाठी निघालेल्या या मोहिमा होत्या. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि काराकोरम पर्वतरांगेतले सर्वोच्च शिखर 'के२'. अनुक्रमे अमेरिकेचा रॉबर्ट पिअरी, ग्रेट ब्रिटनचा अर्नेस्ट शॅकल्टन आणि इटलीचा राजकुमार लुईजी आमेडेओ हे या मोहिमांचं नेतृत्व करत होते. पिअरीने आधी तीन वेळा उत्तर ध्रुव गाठण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. १९०९ साली वयाच्या बावन्नाव्या वर्षी त्याने नव्या उमेदीने उत्तर ध्रुवावर स्वारी केली. दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेचा सेनापती शॅकल्टननेही १९०९ पूर्वी रॉबर्ट स्कॉटसोबत दक्षिण ध्रुवीय मोहिमेचा अनुभव घेतला होता. तेव्हा दक्षिण ध्रुव गाठता आला नसला तरी त्यांच्या चमूने सर्वाधिक दक्षिणेकडे जाण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.


या पुस्तकाचा तिसरा नायक इटलीचा ड्यूक आमेडेओ याने दर्यावर्दी आणि गिर्यारोहक अशी दुहेरी ओळख निर्माण केली होती. १९०० सालच्या उत्तर ध्रुवाच्या मोहिमेचा तो नेता होता. अतीव थंडीमुळे दोन बोटं गमवावी लागल्याने तो स्वतः त्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊ शकला नाही तरी त्याचा सोबती कॅप्टन कॅगनीने उत्तरेकडे जाण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. ड्यूकने १८९२पासून गिर्यारोहणाचे धडे गिरवत युरोपमधली गिरिशिखरं सर केली होती. पुढचे आव्हान म्हणून त्याची नजर के२ शिखराकडे वळली. 


या मोहिमांमध्ये सहभागी झालेल्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमतेसोबतच बेभरवशाचं हवामान, मर्यादित अन्नसाठा, साहित्य नेण्यातले अडथळे असे अशा सर्व अंगांनी परीक्षा पाहिली गेली. रूढार्थाने या तिन्हींपैकी फक्त पिअरीचा चमूच पूर्ण यशस्वी झाला (अर्थात त्याने उत्तर ध्रुव खरोखरच गाठला की नाही याबद्दलही वाद उत्पन्न झाले. पुस्तकात त्यांचाही सविस्तर उहापोह आहे). शॅकल्टनच्या मोहिमेवरच्या एका चमूला चुंबकीय दक्षिण ध्रुव शोधता आला, पण स्वतः शॅकल्टन ज्या चमूसोबत पायपीट करत होता त्याला मात्र भौगोलिक दक्षिण ध्रुवापासून काही अंतरापर्यंतच पोहोचता आलं. ड्यूकच्या चमूला देखील खराब हवामानामुळे मोहीम आटोपती घ्यावी लागली. तरी शॅकल्टन, ड्यूक या दोघांनीही नवे विक्रम प्रस्थपित केले. योगायोगाने १९०९ या एकाच साली हे विक्रम प्रस्थापित झाले आणि त्याच वर्षाला केंद्रस्थानी ठेवून लेखक एडवर्ड जे. लार्सन यांनी हे सारे तपशील मांडत प्रस्तुत पुस्तक साकारलं आहे. लार्सन यांनी पिअरी, शॅकल्टन, ड्यूक या तिघांची पार्श्वभूमी, त्यांच्यापुढची आव्हानं, मोहिमांबद्दलचं समाजातलं कुतूहल याबद्दल विस्ताराने लिहिलं आहे. वैयक्तिक महत्वाकांक्षा, त्याला राज्यकर्त्यांच्या साम्राज्यविस्ताराच्या महत्वाकांक्षेची जोड आणि हे सगळं असलं तरीही मोहिमेच्या संशोधकीय उद्दिष्टाकडे दुर्लक्ष होऊ न देणं अशा विविध बाजूंवर हे पुस्तक प्रकाश टाकतं. शॅकल्टनच्या मोहिमेअंतर्गत त्याच्या सहकाऱ्यांनी हिमनद्यांचे प्रवाह, हिमस्फटिकांची रचना, चुंबकीय क्षेत्र यांचा केलेला अभ्यास हे उत्तम उदाहरण आहे. यात १९०९ पूर्वीच्या मोहिमा, ध्रुवीय प्रदेश आणि पर्वतशिखरांविषयीचे तत्कालीन साहित्यातले उल्लेखही आहेत. पिअरीची फ्रेडरिक कूकसोबत उत्तर ध्रुव गाठण्यासाठीची चढाओढ, दोघांनीही प्रतिमानिर्मितीसाठी वापरलेल्या क्लृप्त्या, न्यूयॉर्क टाईम्स आणि न्यूयॉर्क हेराल्ड या प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांनी अनुक्रमे पिअरी आणि कूकची बाजू उचलून धरणे, पिअरीच्या ध्रुवीय स्वारीचे वृत्त 'एक्सलुझिव्हली' देण्यासाठी न्यूयॉर्क टाईम्सने केलेला महागडा करार असे रंजक तपशीलही पुस्तक वाचनीय बनवतात. तत्कालीन कागदपत्रं, वृत्तपत्रं, प्रवाश्यांच्या रोजनिश्या अशा अस्सल संदर्भसाधनांसह साकारलेलं हे पुस्तक प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देण्याच्या माणसाच्या धाडसी वृत्तीचा गौरव करतं.


टू द एजेस ऑफ द अर्थ

लेखक : एडवर्ड जे. लार्सन

प्रकाशक : विल्यम मॉरो

पाने : ३५२,

किंमत : ५९९ रुपये


('महाराष्ट्र टाईम्स'मध्ये १२ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित)


निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा


 

गेली सुमारे तीस वर्षे अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सैन्याची पाठ वळताच कट्टरपंथी तालिबानने अल्पावधीतच अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याची घटना अगदी ताजी आहे. तालिबानसारख्या धर्मांध राजवटीमध्ये असलेले अंध:कारमय भविष्य ओळखून तिथल्या उरल्यासुरल्या हिंदू आणि शिखांनी अफगाणिस्तान सोडला आणि ते भारताच्या आश्रयाला आले. या हिंदू आणि शिखांची सांस्कृतिक नाळ आजही भारताशीच जुळलेली असल्याचे हे द्योतक आहे. ‘कठीण प्रसंगी आपला अंतिम आधार भारतच आहे’ ही त्यांची भावनाच यातून लक्षात येते. अशा लोकांना मोठाच आधार असणारा ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ अर्थात ‘CAA’ किती महत्वाचा आहे हेच यानिमित्ताने  अधोरेखित होत आहे. या कायद्याची आवश्यकता का आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्यामध्ये नक्की कुठल्या तरतुदी आहेत या गोष्टींचा सर्वंकष आढावा घेणारे महत्वाचे पुस्तक म्हणजे ॲडव्होकेट विभावरी बिडवे लिखित ‘निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा’.


कुठल्याही कायद्यातील तरतुदी लक्षात घ्यायच्या झाल्या, तर कायद्याची आवश्यकता का निर्माण झाली यासाठी इतिहासात डोकवावे लागते. त्यामुळेच कायदेशीर तपशिलांमध्ये शिरण्याअगोदर लेखिकेने हा कायदा ज्या सामाजिक परिस्थितीशी संबंधित आहे तिच्या इतिहासाचा वेध घेतला आहे. संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये असलेला हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा प्रभाव काही भूभागांमध्ये कमी होत इस्लामचा प्रभाव वाढत गेला आणि हळूहळू अफगाणिस्तान, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान (जो नंतर बांगलादेश नावाचा स्वतंत्र देश झाला) भारतापासून वेगळे झाले. येथील हिंदू संस्कृतीपासून त्यांनी केवळ नातेच तोडले असे नाही, तर ही संस्कृती मानणाऱ्या अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यांनी धर्माधिष्ठित (थिओक्रेटिक स्टेट) असणे आणि भारताने धर्मनिरपेक्ष असणे ही गोष्टच या देशांची मानसिकता आणि जडणघडण स्पष्ट करते. विभावरी बिडवे यांनी या धर्माधिष्ठित देशांच्या संविधानामधल्या धर्माच्या उल्लेखांच्या आधारेच हे तीनही देश आणि भारत यांच्याधला फरक स्पष्टपणे दाखवला आहे.


इ. स. १९४७ ते १९७१ मध्ये कोट्यवधींच्या संख्येने हिंदू, शीख, बौद्ध इ. अल्पसंख्य भारतामध्ये निर्वासित म्हणून कसे आले याची पुस्तकामध्ये दिलेली आकडेवारी पाहून ‘अल्पसंख्याकांची काळजी घेतली जाईल’ अशा अर्थाच्या आश्वासनांना या तीनही धर्माधिष्ठित देशांनी केव्हाच तिलांजली दिली हे लक्षात येते. १९७१ सालानंतरही बांगलादेशामध्ये झालेले बौद्धांचे हत्याकांड, अगदी आजही पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींना पळवून नेऊन केली जाणारी धर्मांतरे आणि ईशनिंदेच्या (ब्लास्फेमी) कायद्याचा हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांविरुद्ध शस्त्र म्हणून केला जाणारा वापर अशा गोष्टींवर पुस्तकामध्ये प्रकाश टाकला आहे.


गेली अनेक वर्षे धार्मिक अत्याचारांमुळे या तीनही देशांमधून पळून आलेल्या लोकांनी भारतामध्ये आश्रय घेतला आहे. अशा लोकांसाठी कायदे काय आहेत, भारतात आलेल्या अशा लोकांसमोर लोकांसमोर कोणत्या अडचणी असतात, त्यांना भारताचे नागरिकत्व कोणत्या परिस्थितीमध्ये मिळते या गोष्टी पुस्तकात तपशीलाने सांगितल्या आहेत, ज्या CAA बद्दल अधिक स्पष्टता येण्यासाठी महत्वाच्या आहेत. आंतरराष्ट्रीय निर्वासित कायदे, भारताचे नागरिकत्व कायदे, भारताच्या नागरिकत्व कायद्यांमध्ये वेळोवेळी झालेले बदल; निर्वासित, अवैध स्थलांतरित आणि शरणार्थी या संकल्पनांमध्ये असणारे फरक अशा अनेक कायदेशीर गोष्टींचे विस्ताराने विवेचन केले आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेतले असे विवेचन हे या पुस्तकाचे बलस्थान आहे.


CAAवर जे आक्षेप घेतले गेले त्यातला मुख्य आक्षेप अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या मुस्लिमांना नागरिकत्व देण्यासंबंधी आहे. तिथून येणारे मुस्लिम स्थलांतरित हे आर्थिक कारणासाठी आलेले घुसखोर असतात, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अशा घुसखोरांबद्दल लेखिकेने केलेली टिप्पणी महत्वाची आहे. त्या लिहितात : “..सदर नागरिकत्व सुधारणेद्वारे मुस्लिम घुसखोरांना भारताचे नागरिकत्व न देण्याचे कारण तिथे ते बहुसंख्य आहेत, त्यांनीच स्वीकारलेल्या इस्लामी राष्ट्रानुसार आयुष्य जगत आहेत; पण दुसरे महत्वाचे कारण दुर्लक्षित करून चालणार नाही. धर्मनिरपेक्ष भारतामध्ये अशा धर्माधिष्ठित व्यक्तींची वाढलेली संख्या ही भारतातील धर्मनिरपेक्षतेला धोकादायक ठरेल...” “..हा धोका केवळ भारतातील गैरमुस्लिमांना नसेल तर भारतातील संविधानप्रेमी आणि धर्मनिरपेक्षतेचा नारा करणाऱ्या मुस्लिमांनाही त्यांच्यापासून धोका असेल.” १९५१ सालच्या आंतरराष्ट्रीय जिनेव्हा करारामध्ये निर्वासितांबाबत मानवतेची भूमिका घेण्याचा आग्रह धरलेला असला तरीही त्यातल्या एका उपकलमामध्ये ‘देशाच्या सुरक्षेला ज्या अवैध घुसखोरांपासून धोका आहे त्यांना परत पाठवता येईल’ असे म्हटले आहे. भारतामध्ये आलेले असे घुसखोर आसाम तसेच देशाच्या अन्य भागांमध्ये ज्या पद्धतीने घातपाती कारवायांमध्ये सहभागी झाल्याचे उघड झाले आहे. अशांना देशाचे नागरिकत्व देण्याने भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे. म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्यांची परत पाठवणी करण्यामागेही त्यांचा मुंबईतील आझाद मैदानातील दंगलीसारख्या अनेक घटनांमध्ये असलेला सहभाग, हेच कारण आहे.

भारतामधील निर्वासितांचा प्रश्न हा फक्त अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या लोकांपुरता मर्यादित नाही. भारतमध्ये बाहेरून आलेल्या स्थलांतरितांमध्ये तिबेटी, नेपाळी, श्रीलंकेतून आलेले तमीळ, युगांडामधून आलेले भारतीय, भूतानमधून आलेले नेपाळी अशा अनेक प्रकारच्या लोकांचा समावेश आहे. भारतातील या इतर स्थलांतरिताबाबत भारताने वेगवेगळ्या वेळी घेतलेली भूमिका आणि केलेली उपाययोजना यांचीही पुस्तकामध्ये या सर्वांची दखल घेतली आहे हे विशेष. यातील काही प्रकारच्या स्थलांतरितांना काही काळ आश्रय देऊन त्यांच्या सुरक्षिततेची खात्री पटल्यानंतर परत पाठवणी करण्याचीही भारताची भूमिका राहिलेली आहे (उदा. श्रीलंकेतील यादवी समाप्त झाल्यावर अनेक तमीळ तिकडे परत गेले). ही गोष्ट सर्व स्थलांतरितांना एकाच प्रकारे हाताळले जाऊ शकत नाही हे अधोरेखित करते. “CAA कायदा तीन देशांमधून आलेल्या निर्वासितांपुरताच मर्यादित न ठेवता सर्वच देशांमधून आलेल्या स्थलांतरितांना भारताने नागरिकत्व द्यावे” असे म्हटले जाते ते कसे चुकीचे आहे हेच यातून दिसून येते.


अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून धार्मिक अत्याचारामुळे भारतात आलेल्या हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, शीख आणि ख्रिस्ती निर्वासितांना भारताचे नागरिकत्व मिळणे CAA मुळे सुकर झाले आहे आहे. भारतात आधीपासूनच राहात असलेल्या नागरिकांना या कायद्याचा काहीही त्रास नाही. परंतु जाणकार समजल्या जाणाऱ्या व्यक्तींनी “सदर कायदा मुस्लिमविरोधी आहे” असा अप्रचार केल्याने ही परिस्थिती अधिकच चिघळवली आणि देशामध्ये हिंसक आंदोलने झाली. फुटीरतावाद्यांनी दिल्लीमध्ये भयावह दंगलही घडवून आणली. अशा परिस्थितीमध्ये कायद्याबद्दलची नेमकी माहिती प्रादेशिक भाषेमधून देणाऱ्या पुस्तकाची उणीव होती. विभावरी बिडवे यांच्या पुस्तकामुळे मराठीमधली उणीव दूर व्हायला मदत झालेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीने अगदी बारीकसारीक पैलूंचाही या पुस्तकामध्ये उहापोह केला आहे ते वाखाणण्याजोगे आहे. अन्य भारतीय भाषांमध्येही पुस्तकाचे भाषांतर झाल्यास अधिकाधिक लोकांचे CAA संबंधी गैरसमज दूर व्हायला मदत होईल.


 

निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा

लेखिका : विभावरी बिडवे

पृष्ठसंख्या : २२०  

किंमत : २९९ रुपये

प्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स




('सामना'च्या 'उत्सव' पुरवणीमध्ये २४ ऑक्टोबर २०२१ रोजी पूर्वप्रकाशित)




भारताच्या लसीकरणाच्या इतिहासावर प्रकाश

मुखपृष्ठ सौजन्य : सुब्बु पब्लिकेशन्स


गेले दीड वर्ष संपूर्ण जग कोव्हिडच्या विषाणूच्या सावटाखाली आहे. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी लसीचे संशोधन हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. लसीकरण हा मानवाच्या वैद्यकीय प्रगतीमधला अतिशय महत्वाचा टप्पा आहे. लसीकरण तंत्र एडवर्ड जेन्नरकडून १७९८ साली प्रथम विकसित केल्याचे मानले जाते. मात्र 'शीतला' या पुस्तकातून जेन्नरच्या प्रयोगांच्या आधीपासून भारतात होत असणाऱ्या लसीकरणावर प्रकाश टाकला गेला आहे.

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्यासाठी सज्ज असलेली तारा लॉकडाऊनमुळे भारतातच अडकून पडते. कोव्हिड लसीच्या शोधासाठी पाश्चात्य जगताकडे डोळे लावून बसलेल्या ताराचा भारतीय ज्ञानपरंपरेवर अविश्वास आहे. स्वतः आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा सखोल अभ्यास असणारे तिचे आजोबा तिला "जेन्नरच्या आधीपासून भारतात लसीकरण अस्तित्वात आहे" असं सांगून तिचे कुतूहल चाळवतात आणि तिला याबद्दलच्या अभ्यासासाठी उद्युक्त करतात. हळूहळू तिच्यासमोर भारताच्या इतिहासात दडलेली पाने उलगडत जातात.

इंग्रजीत ज्याला 'स्मॉलपॉक्स' म्हणतात त्या आजाराने कित्येक शतके त्याने जगभर थैमान घातले होते. भारतात 'देवीच्या कोपाने झालेला आजार' अशा समजुतीतून या आजाराला 'देवी' असेच संबोधले जायचे हे आपल्याला माहिती असते, पण त्याचवेळी हा आजार होऊ नये यासाठीचे उपायही भारतीयांना ज्ञात होते याबद्दल मात्र आपल्याला कल्पना नसते. बंगाल प्रांतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीसाठी . . १७३२ ते १७६० दरम्यान काम करणाऱ्या डॉ. जॉन हॉवेलने देवीच्या आजाराचा प्रभाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांची नोंद घेतली. "दरवर्षी मे महिन्याच्या सुमारास देवीचा प्रादुर्भाव वाढतो, हे लक्षात घेऊन त्याआधीच काशी, वृंदावन, प्रयाग येथील विद्यालयांमधील जाणकारांचे चमू लसीकरणासाठी बाहेर पडतात. घरोघरी फिरून देवीची लस देताना ते प्रथम व्यक्तीच्या दंडावर बारीक छिद्रांचे वर्तुळ करतात. त्यानंतर आपल्याजवळचा कापसाचा तुकडा काढून त्यावर गंगाजलाचे थेंब टाकून तो तुकडा छिद्रांच्या वर्तुळाकार जखमेवर काही तास दाबलेला राहील अशा अवस्थेत ठेवतात. हा कापूस आदल्या वर्षी देवीच्या रुग्णाच्या फोडांमधल्या द्रवाने भिजवून जतन करून ठेवलेला असतो. लसीकरण चालू असताना लसीकरण करणारी व्यक्ती तोंडाने देवीची प्रार्थना म्हणते. लाखो लसीकरणांमध्ये क्वचितच एखादे लसीकरण अयशस्वी ठरतेअसे हॉवेलने नमूद केले आहे.

भारतीय लोकपरंपरांमध्ये एकेका आजाराशी एकेक देवता जोडली गेली आहे. देवीच्या आजाराशी संबंधित असणारी 'शीतला' ही देवी भारतभर पूजिली जाई. तिची कृपा असावी यासाठी होळीनंतर येणाऱ्या शीतला अष्टमीला तिचा उत्सवही साजरा केला जात असे. 'शीतलाष्ट्कम' स्तोत्रामध्ये देवीच्या आजाराची लक्षणे सांगितली असून शीतलादेवीने आपले त्यांपासून रक्षण करावे अशी प्रार्थना केली आहे. भारतामध्ये शीतलादेवीची मंदिरे आणि चित्रे असल्याचे इंग्रजानी नोंदवले आहे.

आजाराशी संबंधित श्रद्धा आणि आजारावरचा वैद्यकीय तोडगा या दोन्ही गोष्टी भारतात हातात हात घालून जात होत्या. श्रद्धा आणि ज्ञानाची ही वीण समजून घेणे इंग्रजांच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे भारतातले परंपरागत लसीकरण जेन्नरच्या लसीकरणापेक्षा दुय्यम समजले गेले. पाश्चात्त्यांच्या या संदर्भातल्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाची अन्य उदाहरणेही लेखिकेने दाखवून दिली आहेत. भारतातल्या देवीच्या आजाराच्या अनुषंगाने पाश्चात्त्यांनी तसेच सुश्रुत, वाग्भट इत्यादी भारतीय चिकित्सकांनी केलेल्या नोंदींची दखलही हे पुस्तक घेते.

पुस्तकाचे कथानक मराठी कुटुंबात घडणारे असल्याने अनेक मराठी शब्द लिप्यंतर करून पुस्तकात आले आहेत. हा अट्टहास अनाठायी वाटतो. अशा शब्दांचे (अपवाद वगळता) इंग्रजीतून अर्थही दिलेले नाहीत. शिवाय लिप्यंतर करताना झालेल्या स्पेलिंगच्या चुका तसेच मुद्रितशोधनाच्या चुका यांमुळेही रसभंग होतो.

'शीतला' हे पुस्तक कथानकापेक्षा त्यातल्या माहितीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पाश्चात्यांच्या प्रभावामुळे आपल्या पारंपरिक ज्ञानाकडे दुर्लक्ष करणारा अथवा त्याकडे तुच्छतेने पाहणारा वर्ग भारतात उदयास आला आहे. सुदैवाने पारंपरिक ज्ञान विस्मृतीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक जण प्रयत्न करत आहेत. मित्रा देसाईंचा प्रयत्न त्या दृष्टीने स्तुत्य ठरतो.

 

शीतला

लेखिका : मित्रा देसाई

प्रकाशक : सुब्बू पब्लिकेशन

पृष्ठसंख्या : ९७

किंमत : १९९ रु.


('महाराष्ट्र टाईम्स'मध्ये १० जुलै २०२१ रोजी 'दखल इंग्रजी पुस्तकांची' या सदरामध्ये पूर्वप्रकाशित)