Total Pageviews

Monday, October 25, 2021

स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव


 

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आयुष्यात अनेक टोकाचे अनुभव घेतलेले व्यक्तिमत्व. जहाल क्रांतिकारक, सुधारक, हिंदुराष्ट्रवादी, कवी, वक्ते, नाटककार असे त्यांचे अनेक पैलू काळाच्या ओघात सर्वांसमोर येत गेले. त्या त्या काळात त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले तशी टोकाची टीकाही झाली. अंदमानच्या तुरुंगातून सुटून येण्यापासून त्यानंतरच्या त्यांच्या भूमिकांमधले बदल अनेकांना पचनी पडले नाहीत. काहींनी अज्ञानातून, काहींनी जाणीवपूर्वक सावरकरांची प्रतिमा मलिन करायला सुरुवात केली. समाजासमोरचे प्रश्न बदलतात, समाजाचं त्या प्रश्नांबद्दलचं आकलन बदलतं तसतसे वादविवाद, मतमतांतरं काळाच्या ओघात बऱ्याचदा सौम्य होत जातात. सावरकरांच्या बाबतीत मात्र असं झालं नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज एकविसाव्या शतकाची वीस वर्षं उलटली तरी त्यांच्यावरचे आरोप, आक्षेप, चिखलफेक कमी होण्याऐवजी या गोष्टी वाढतच चालल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये काहीएक हेतूंनी प्रेरित 'अभ्यासकां'पासून ते बहुतांश काळ सत्ताधारी असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांपर्यंत अनेक मंडळींचा सहभाग आहे. मात्र आरोप करणारा कितीही उथळ, अभ्यासहीन असला तरीही आरोपांना उत्तर मात्र अभ्यासपूर्वकच द्यावे लागते. त्यामुळे सावरकर अभ्यासकांची जबाबदारी आणखीनच वाढते. अशा परिस्थितीत सावरकरांच्या चरित्राचा, त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून त्यांच्यावरील आरोपांचं सप्रमाण खंडन करणारं अक्षय जोग लिखित पुस्तक 'स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव' महत्वाचं ठरतं.

 

दोन गंभीर आरोप

 

सावरकरांवर होणारे दोन आरोप अधिक गंभीर स्वरूपाचे आहेत आणि साहजिकच त्या त्यासंदर्भातली या पुस्तकातली दोन प्रकरणं दीर्घ स्वरूपाची आहेत. पहिला आरोप म्हणजे "सावरकरांनी बिनशर्त माफी मागून अंदमानच्या कारागृहातून सुटका करून घेतली." या घटनेचा सखोल अभ्यास न करता काहीजणांकडून सावरकरांना 'माफीवीर' ठरवले गेले. पुस्तकात 'सावरकरांची क्षमापत्रे' या प्रकरणात अंदमानहून सुटकेचा तपशिलाने उहापोह केला आहे. क्रांतिकारक जेव्हा क्रांतिकार्याला वाहून घ्यायचा निश्चय करतो तेव्हाच तो ते कार्य करताना पावलापावलावर येणाऱ्या मृत्यूच्या स्वागतासाठीही तयार असतो. एकतर क्रांतिमार्गाने इच्छित लक्ष्य करणे किंवा मृत्यू पत्करणे हे दोन पर्याय त्याच्यापुढे असतात. परंतु तुरुंगात खितपत पडल्याने यातलं काहीच साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे तुरुंगातून सुटका करून घेऊन पुन्हा कुठल्यातरी मार्गाने आपले कार्य सुरु ठेवणे या उद्देशाने सावरकरांनी  इंग्रज सरकारला सुटकेसाठी विनंती केली होती. तुरुंगातून अशा प्रकारची विनंती करून बाहेर पडलेल्या अन्य क्रांतिकारकांची उदाहरणेही या प्रकरणात दिली आहेत. सावरकरही स्वतःपुरतेच सुटकेचे प्रयत्न न करता तुरुंगातील इतर सहकाऱ्यांनाही तसे करणे हितावह आहे हे पटवून देत होते. "सरकारने मला न सोडता अंदमानातल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अडकून पडलेल्या राजबंदीवानांस तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल" असेही सावरकर म्हणाले होते, ही गोष्टही हे प्रकरण अधोरेखित करतं. सावरकरांनी अंदमानातून सुटका झाल्यावर सक्रिय राजकारणात भाग घेतला नसला तरी रत्नागिरीतल्या त्यांच्या वास्तव्यात त्यांच्याकडून क्रांतिकार्याला मोठी प्रेरणा मिळाल्याची विविध उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. शिवाय सुटकेनंतरच्या या काळाचा सदुपयोग सावरकरांनी समाजसुधारणांसाठी कसा केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक मोठ्या लोकांनी त्या कार्याची प्रशंसा कशी केली याची दखल घेणारं स्वतंत्र प्रकरणात पुस्तकात आहे.

 

दुसरा आरोप म्हणजे "सावरकरांचा गांधीहत्येत सहभाग होता." त्या अनुषंगाने गांधीहत्येच्या खटल्यातील सावरकरांशी संबंधित साक्षी,युक्तिवाद आणि सावरकरांना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयामागची कारणं पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झालेली असली तरी कालांतराने आलेल्या कपूर आयोगाच्या हवाल्याने सावरकरांवर पुन्हा तसेच आरोप करण्याचा प्रयत्न अनेकांकडून दिला जातो. लेखकाने कपूर आयोगाचे अधिकारक्षेत्र आणि आयोगाकडून त्याचे झालेले सरळसरळ उल्लंघन याबाबतही महत्वाचे विवरण दिले आहे. "सावरकरांविरोधात कोणताही सबळ पुरावा नसून जे दावे केले जात आहेत ते पोकळ असून सावरकरांची सुटका होईल असे सरकारी वकिलानेच खाजगीत मान्य केले" असे अमेरिकन वकिलातीतील अधिकाऱ्याने १९४८साली आपल्या ज्या अहवालात नमूद केले होते तो अलीकडेच प्रकाशात आलेला अहवाल पुस्तकात दिलेला आहे.

 

 

प्रत्येक आक्षेपाच्या खंडनासाठी स्वतंत्र प्रकरण

कोणत्याही घटनेचे मूल्यमापन करण्यासाठी संबंधित कागदपत्रांसोबतच त्या घटनेचे होणारे परिणामही अभ्यासावे लागतात. त्या घटनेत थेटपणे समाविष्ट नसलेल्या परंतु त्याच काळातल्या टप्प्यावर असणाऱ्या व्यक्ती, घटना यांचाही डोळस अभ्यास असावा लागतो. हा अभ्यास पुस्तकात सतत दिसत राहतो. त्यातूनच वरवर संबंधित वाटत नसणाऱ्या घटनांचा अन्वयार्थही लेखकाने लावला आहे. उदा. १९४० पूर्वी सावरकरांनी आवाहन केलं होतं : “अधिकाधिक तरुणांनी सैन्यात भरती व्हावं आणि नंतर बंदुकीची नळी आयत्यावेळी कुठे वळवायची ते आपण ठरवू शकतो”.  त्यानंतर खरोखरच सैन्यभरती वाढली, याचे विविध दाखलेही पुस्तकात दिले आहेत. पुढे इंग्रजांच्या सैन्यात घडून आलेल्या भारतीय नाविकांच्या बंडासारख्या घटनांची पाळंमुळं अशाच जुन्या घटनांमध्ये असतात हे लेखकाने लक्षात आणून दिलं आहे. 

 

उत्तम वैचारिक मांडणी

सावरकरांवरील आरोपांचे खंडन करताना केले गेलेले मुद्देसूद, ससंदर्भ विवेचन आणि संयत मांडणी हे यापुस्तकाचे बलस्थान आहे. विरोधकांचे आरोप/आक्षेप कितीही क्षुल्लक/थिल्लर असले तरीही पुस्तकात त्यांच्यावर हेत्वारोप करणे, त्यांना दूषणं देणे, सावरकरांचे वैचारिक विरोधक असणाऱ्या महापुरुषांना कमीपणा आणण्याचा प्रयत्न करणे असले प्रकार केलेले नाहीत. विरोधकांप्रति पूर्ण आदर राखून नम्र मतभेद नोंदवले आहेत. त्यामुळे उत्तम वैचारिक मांडणी वाचल्याचं समाधान मिळतं. अभ्यासपूर्ण पुस्तकं बरीच असली तरी त्यांपैकी संदर्भग्रंथाचं मूल्य असणारी पुस्तकं कमी असतात. प्रस्तुत पुस्तक अशा मोजक्या पुस्तकांमध्ये गणलं जाईल. यापुढे सावरकरांवर पुन्हा आरोप होतील तेव्हा त्यांचं खंडन करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.

कुठलीही घटना कधीच इतिहासातून सुटी काढून त्यावर टिप्पणी करता येत नाही, त्यासाठी अभ्यास सर्वांगीणच असावा लागतो. व्यक्ती, विचार, घटनाक्रम या सर्व गोष्टींची माहिती असावी लागते. इतिहासाच्या पानांवरच्या दोन ओळींच्या मधलं वाचता यावं लागतं. या सगळ्यांतूनच ऐतिहासिक घटनांचं विश्लेषण व्यवस्थित होऊ शकतं. याचं भान बाळगूनच प्रस्तुत पुस्तकाचं लेखन केलं गेलं आहे. ते वाचकाला उत्तम बौद्धिक खाद्य पुरवतंच, पण त्याचबरोबर अभ्यासकाने आपल्या अभ्यासविषयाकडे कशाप्रकारे पाहावं याचीही नकळत दृष्टी देऊन जातं हे विशेष.

 

पुस्तक : स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव  

लेखक : अक्षय जोग

प्रकाशक : मृत्युंजय प्रकाशन

पृष्ठसंख्या : १७४

मूल्य : २०० रु. 

('महाराष्ट्र टाईम्स'मध्ये १७ मे जानेवारी २०२० रोजी प्रकाशित लेख)

No comments:

Post a Comment