गेल्या दीड-दोन हजार वर्षांचा विचार करता, इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीचा जगातल्या विविध देशांमधल्या संस्कृतींशी मोठा संघर्ष झाल्याचे दिसून येते. या धर्मांच्या वरवंट्याखाली अनेक संस्कृती लोप पावल्या. या धर्मांच्या आक्रमकतेला सर्वात मोठा प्रतिकार झाला तो भारतामध्ये. धर्माभिमानी हिंदूंनी क्षात्रतेज दाखवून केलेल्या प्रतिकाराने भारताचा हिंदू आत्मा टिकून राहिला हे आपल्याला ज्ञात असते. परंतु, हिंदू धर्माचे अस्तित्व टिकून राहायला कारणीभूत ठरलेल्या दुसर्या मार्गाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. हा दुसरा मार्ग आहे परधर्मात गेलेल्या हिंदूंचे पुनर्हिंदूकरण. आजच्या परिभाषेत सांगायचं तर ‘घरवापसी’! डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्या प्रस्तुत पुस्तकामुळे पूर्वापार चालत आलेल्या परावर्तनाच्या प्रयत्नांबद्दल मोलाची माहिती मिळते.
‘शुद्धी’चा धर्मशास्त्रीय आधार
परधर्मात गेलेल्या व्यक्तीला स्वधर्मात परत घेण्याच्या प्रक्रियेला ‘शुद्धी’ या शब्दाने पूर्वापार संबोधले गेले आहे. पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात डॉ. गोडबोले यांनी ‘शुद्धी’ म्हणजे काय, याचा ऊहापोह केला आहे. मुळात धर्मशास्त्राच्या नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्तीला ‘पतित’ अथवा ‘भ्रष्ट’ असे संबोधले जाई, अशा व्यक्तीला प्रायश्चित्त देऊन त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी आणणे म्हणजे ‘शुद्धी.’ ‘शुद्धी’साठी करावयाची प्रायश्चित्ते आणि संस्कारविधी यांचा विविध स्मृतिग्रंथांमध्ये ऊहापोह केला गेलेला आहे. कालपरत्वे ‘शुद्धी’ या शब्दाची अर्थच्छटा बदलली. इस्लामी आक्रमण सुरू झाल्यावर ‘धर्मांतर’ या गोष्टीचा भारतीयांना परिचय होऊ लागला. बाटवली गेलेली व्यक्ती आता धर्मभ्रष्ट झाली आहे आणि अशा भ्रष्ट झालेल्या व्यक्तीला पुन्हा आपल्यामध्ये सामावून घेणे म्हणजेच ‘शुद्धी’ करणे, अशी संकल्पना रूढ झाली. परधर्मात गेलेल्यांना हिंदू धर्मात सामावून घेण्यासाठी ‘देवलस्मृती’ एक अतिशय महत्त्वाचा आधार आहे. हा ग्रंथ इस्लामच्या आक्रमणाला सुरुवात झाल्याच्या काळातला असल्याने शुद्धीची काळानुरूप निकड त्यामध्ये विचारात घेतली गेलेली आहे. विशेष म्हणजे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णातल्या स्त्री-पुरुषांची शुद्धिप्रक्रिया त्यामध्ये सविस्तर सांगितली गेली आहे.
इस्लामी राजवटीतले शुद्धिकार्य
मुस्लीम जेव्हा भारतामध्ये शासक झाले, तेव्हा हरप्रकारे हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. अनेकांना तलवारीच्या बळावर बाटवले गेले. सुलतानी संकटाविरोधात इथलेच धर्माभिमानी लोक उभे राहिले आणि मुस्लीम झालेल्या आपल्याच बांधवांना परत हिंदू धर्मात आणत राहिले. बाप्पा रावळ, सुखपाल, रावल जगमाल तसेच काश्मीरचे राजे रणबीरसिंहजी अशा राज्यकर्त्यांसोबतच स्वामी विद्यारण्य, चैतन्य महाप्रभू अशा संत महंतांनीही शुद्धीकरणाची परंपरा चालूच ठेवली.
मराठ्यांनी केलेले ‘शुद्धिकार्य’
शुद्धीकरणाची प्रक्रिया राजकीय पाठबळ असेल तर अधिक जोमाने आणि ठामपणे सुरू राहते. शुद्धीकरणाच्या इतिहासामध्ये मराठ्यांनी केलेले कार्य अजोड आहे. त्यावर पुस्तकात स्वतंत्र प्रकरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरनोबत नेताजी पालकर काही कारणाने औरंगजेबाला सामील झाला होता. तिथे त्याला बाटवून मुस्लीम केले गेले आणि ‘महंमद कुलिखान’ हे नवे नाव दिले गेले. परंतु, कालांतराने पश्चात्तापदग्ध होऊन परत आलेल्या नेताजीला महाराजांनी केवळ आपलेसे केले नाही, तर त्याला विधिवत पुन्हा हिंदू करण्यात आले. महाराजांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी तसेच त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनीही परधर्मात गेलेल्यांना हिंदू करून घेतले. ही परंपरा अगदी दुसर्या बाजीरावापर्यंत चालू राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी यांनी तंजावरमध्ये मराठा सत्ता स्थापन केली होती. त्यांच्या पुत्राचे नावही शाहू होते. जेझुईट मिशनर्यांनी अत्याचार करून तंजावरमधल्या अनेक हिंदूंना ख्रिस्ती बनवले होते, त्याला उत्तर म्हणून तंजावरच्या या शाहू महाराजांनी शुद्धीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. धर्मांतरित ख्रिश्चनांची संपत्ती ताब्यात घेऊन पाद्य्रांना बंदीवान बनवण्यात यावे, यापासून सुटका करून घ्यायची असल्यास ख्रिस्ती झालेल्या हिंदूंनी पुन्हा मंदिरात पूजा करावी आणि ख्रिस्ती आचारांचे पालन करणे सोडून द्यावे, असे कडक धोरण त्यांनी अवलंबले.
आधुनिक काळातील शुद्धीकरण
आधुनिक काळामध्ये पुन्हा जोमाने शुद्धिकार्य सुरू करणार्यांमध्ये यातले सर्वात ठळक नाव म्हणजे महर्षी दयानंद सरस्वती. एकोणिसाव्या शतकात त्यांनी धर्मांतरित होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या हजारो हिंदूंचे प्रबोधन करून त्यांना धर्म सोडण्यापासून त्यांनी परावृत्त केले. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका विलक्षण होता की, ख्रिस्ती आणि मुस्लीम हिंदूच नव्हे, तर काही युरोपियन ख्रिस्ती लोकांनीही हिंदू धर्म स्वीकारला होता. ‘आर्य समाज’ या महर्षी दयानंदांनी स्थापन केलेल्या संघटनेच्या माध्यमातून देशभर परधर्मात गेलेल्यांना हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेण्याची चळवळच उभी राहिली. आधुनिक काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे शुद्धीकरणाच्या कार्यामध्ये अग्रणी असल्याचे सर्वश्रुत आहेच. पण, याशिवायही अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वेसुद्धा शुद्धिकार्यासाठी अनुकूल होती. स्वामी विवेकानंद, प्रबोधनकार ठाकरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वेळोवेळी लेख लिहून अथवा भाषणांमधून शुद्धीचे समर्थन केल्याबद्दलचे पुस्तकातले तपशील या कार्याची व्याप्ती आणि स्वीकारार्हता किती मोठी आहे, याची जाणीव करून देतात.
धर्मसुधारणा आणि धर्मनिष्ठा
हिंदू धर्मामध्ये काळानुरूप सुधारणा होत गेल्यानेच हा धर्म प्रवाही राहिला आहे आणि कालसुसंगत बनला आहे. सोळाव्या-सतराव्या शतकात शुद्धीकरणाचे सोपे विधी निर्माण केले गेल्याने परत हिंदू धर्मात येण्याचा मार्ग सुकर कसा झाला, याची उदाहरणे गोडबोले यांनी दिली आहेत. आधुनिक काळातले करवीरपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी म्हणजे शुद्धिकार्याचे दीपस्तंभच! खुद्द शंकराचार्यांनी शुद्धिकार्याला अनुकूलता दर्शवल्याने बाटवलेल्या हिंदूंना धर्मात परत घेण्याच्या कृतीला धार्मिक अधिष्ठान मिळाले. पोर्तुगिजांच्या ख्रिस्ती वरवंट्याखाली दडपल्या गेलेल्या गोव्यासारख्या ठिकाणीदेखील शुद्धीचे कार्य चालू ठेवण्यामध्ये मसुरेकर महाराज यांनी मोठे योगदान दिले. शुद्धिकार्य करत असताना धर्मनिष्ठ हिंदूंनी केलेल्या बलिदानाची परंपराही मोठी आहे. फिरोझशहा तुघलकाच्या कारकिर्दीमध्ये एका ब्राह्मणाच्या देवकार्यामध्ये मुस्लीमही सहभागी होऊ लागले आहेत, हे कळल्यावर त्या ब्राह्मणाला मुस्लीम होण्यास सांगण्यात आले. त्याने त्यास नकार दिल्यावर दरबाराबाहेर चिता रचून त्यात त्याला जाळण्यात आले. इ. स. १३७५च्या आसपासच्या या घटनेतल्या या ब्राह्मणापासून शुद्धिकार्यासाठी बलिदानाची परंपरा सुरू झाली. १९२०च्या दशकामध्ये स्वामी श्रद्धानंदांनी केलेल्या हजारोंच्या केलेल्या शुद्धीकरणामुळे मुस्लीम इतके बिथरले की, अब्दुल रशीद नामक इसमाने चर्चेच्या बहाण्याने येऊन गोळ्या झाडून त्यांचा जीव घेतला.
शुद्धिकार्य-आजच्या संदर्भात
पुस्तकाच्या उपसंहारामध्ये शुद्धीच्या अनुषंगाने डॉ. गोडबोले यांनी मांडलेले विचार चिंतनीय आहेत. ते म्हणतात, “यवन, शक, अंकुश इत्यादी परक्या लोकांना हिंदू समाजाने आत्मसात केले. परंतु, त्या लोकांची विशिष्ट उपासनापद्धती, पवित्र ग्रंथ अथवा धार्मिक नेतृत्व असल्याचा कोणताही पुरावा नाही. स्वतःची उपासना पद्धती तीच ग्राह्य आणि भिन्न उपासना करणार्यांची हत्या किंवा धर्मांतर करणे, असा त्यांचा दुराग्रही विचार असल्याचा पुरावा नाही. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी यांचे वेगळे होते आणि आहे. इथे दुराग्रहाला दैवी अधिष्ठान आहे. या दोन्ही आव्हानांसमोर जगातील बहुतेक संस्कृती टिकू शकल्या नाहीत. परंतु, गेली हजारो वर्षे हिंदू समाजच काय तो आपली परंपरा आणि इतिहास टिकवू शकला. धर्मांतरित केल्या गेलेल्या हिंदूंना परत आपल्या धर्मात आणणार्या महापुरुषांचे कार्य पुढे चालू ठेवणे,” ही आपली जबाबदारी असल्याचेही प्रतिपादन ते करतात. भालचंद्र जोशी यांनी पुस्तकाचा अनुवाद उत्तम केला आहे. फक्त पुस्तकाच्या उत्तरार्धात मुद्रितशोधनाच्या चुका राहून गेल्या आहेत, त्या टाळता आल्या असत्या.
परधर्मात गेलेल्या व्यक्तींसाठी हिंदू धर्माचे दरवाजे कायमचे बंद करून घेण्यात आल्याची उदाहरणे प्रसिद्ध आहेत (उदा. काश्मीर). स्वाभाविकपणे, परधर्मात गेलेल्या व्यक्तीला परत घेण्याच्या बाबतीत हिंदू समाज सरसकटपणे उदासीनच राहिला, असे एक सर्वसाधारण चित्र डोळ्यासमोर येते. प्रस्तुत पुस्तकामुळे हा गैरसमज दूर व्हायला मदत होईल.
पुस्तकाचे नाव : शुद्धी चळवळीचा संक्षिप्त इतिहास - सन ७१२ते १९४७
मूळ लेखक : डॉ. श्रीरंग गोडबोले
अनुवादक : भालचंद्र जोशी
प्रकाशक : भारतीय विचार साधना, पुणे
पृष्ठसंख्या : ९४
मूल्य : ८० रु.
www.mahamtb.comवर १२ जून २०२१ रोजी पूर्वप्रकाशित
https://www.mahamtb.com//Encyc/2021/6/12/Book-Review-of-Shuddhi-Chalval-history-712-to-1947.html
No comments:
Post a Comment