मुखपृष्ठ सौजन्य : https://bhavisa.org |
भारताच्या इतिहासात १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध महत्वाचे
आहे. एकीकडे भारतीयांना यातल्या पराभवामुळे स्वातंत्र्य मिळवण्याचे आव्हान किती मोठे
आहे याची जाणीव झाली, तर दुसरीकडे इंग्रजांनाही भारतीयांनी एकत्र प्रतिकार केला तर
काय होऊ शकते चुणूक मिळाली. हिंदू आणि मुस्लिमांच्या लढण्यामागच्या प्रेरणा वेगळ्या
असल्या तरी ते एकत्र लढले ही गोष्ट इंग्रजांसाठी महत्वाची होती. त्यातूनच त्यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये
अधिकाधिक अंतर पडत जाईल याची काळजी घेतली आणि त्याची फळे काही वर्षांमध्येच दिसू
लागली. परंतु हिंदू-मुस्लिमांमधल्या दुहीचे कारण फक्त इंग्रजच होते का; मुस्लिमांचा
इस्लामी, इंग्रजी आणि हिंदूंच्या सत्तेकडे पहायचा दृष्टिकोन कसा होता; खिलाफत
आंदोलनाचे परिणाम काय झाले यावर डॉ. गिरीश आफळे यांच्या ‘खिलाफत आंदोलन : एक
अभ्यास’ या पुस्तकामधून प्रकाश टाकण्यात आला आहे.
मुस्लिम राजकारणाची सुरुवात
भारतीयांमध्ये वेळोवेळी निर्माण होणाऱ्या
असंतोषाला वाट मिळावी म्हणून ॲलन ह्यूमने काँग्रेसची स्थापना केली. १८५७ च्या पराभवानंतर
नंतर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी फक्त उठाव करून चालणार नाही तर राजकारणाचीही कास
धरायला हवी याची भारतातील राष्ट्रवाद्यांना जाणीव झाली. आधुनिक शिक्षणाची कास
धरलेल्या सुशिक्षित हिंदू नेत्यांची कॉंग्रेसमध्ये बहुसंख्या होती. मुस्लिमांमधला
एक गट कॉंग्रेसकडे ‘हिंदू पक्षाचे राजकारण’ म्हणूनच पाहू लागला आणि स्वतंत्र
मुस्लिम राजकारणाचा प्रवासही तेव्हाच सुरू झाला. मुस्लिमांनी इंग्रजी शिक्षण घेऊन इंग्रजांशी
निष्ठा दाखवावी अशी भूमिका असणारे सर सय्यद अहमद खान आणि त्यांनी स्थापन केलेले मोहमेडन
अँग्लो-इंडियन कॉलेज (आताचे अलिगढ मुस्लिम विद्यापीठ) मुस्लिम राजकारणाच्या
दृष्टीने महत्वाचे ठरले. मोहमेडन कॉलेजच्या थिओडोर बेक नावाच्या कुटील इंग्रज
प्राचार्याने हिंदूंविरुद्ध अपप्रचार सुरू केला. सय्यद अहमद यांनीही कॉंग्रेसच्या
राजकारणाला विरोध सुरु केला. सय्यद अहमद हे द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचे पहिले
उद्गाते होते. “आम्ही वेगळे आहोत” हे दाखवण्याचा मुस्लिमांच्या एका गटाचा प्रयत्न
सुरु झाला आणि त्यांना घेतल्याशिवाय देश म्हणून पुढे जाता येणार नाही या भूमिकेतून
हळूहळू कॉंग्रेसचे राजकारण मुस्लिमांच्या मनधरणीकडून त्यांच्या लांगूलचालनाकडे
झुकू लागले. मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा अधिक प्रतिनिधित्व, त्यांनी
‘वंदेमातरम्’ला विरोध केल्यावर काही कडवी वगळणे अशा प्रकारांमधून मुस्लिमांना खुश
ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले. एवढे करूनही इंग्रजांची फूस मिळून ‘मुस्लिम लीग’ हा
मुस्लिमांचा वेगळा पक्ष स्थापन झालाच.
पहिले महायुद्ध सुरू झाले आणि भारतीय मुस्लिम
पेचात पडले. कारण एकीकडे हिंदू शिरजोर होतील या भूमिकेतून इंग्रजांशी जुळवून
घेण्याची त्यांची भूमिका होती तर दुसरीकडे खलिफाची गादी (खिलाफत) असणाऱ्या
तुर्कस्तानविरोधात इंग्रजांनी आघाडी उघडली होती. मुस्लिमांच्या शिष्टमंडळाने इंग्लंडमध्ये
जाऊन ‘तुर्कस्तानच्या खिलाफतीला धक्का पोचणार नाही’ असे आश्वासन मिळवण्याचा
प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे भारतामध्ये मुस्लिमांना आता अधिक
कडक भूमिका घ्यावी लागणार अशी खिलाफतसमर्थक मुस्लिमांची भावना झाली. हीच भावना भारतामध्ये
खिलाफत चळवळ बळकट करत गेली.
सकल-इस्लामवादाची भुरळ
सकल-इस्लामवाद ('पॅन-इस्लामिझम') या संकल्पनेचा
मुस्लिमांवर पूर्वीपासून खूप मोठा पगडा आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असलेले मुस्लिम
एकमेकांचे भाऊबंद आहेत, अशी मुस्लिमांची धारणा असते. भारतात उभ्या राहिलेल्या
खिलाफत आंदोलनाचाही हाच पाया होता. परंतु सकल-इस्लामवाद प्रत्यक्षात किती भुसभुशीत
आहे हे डॉ. आफळे उदाहरणांसह दाखवून देतात. इतिहासात अरब आणि तुर्क लोकांमध्ये
खिलाफत कुणाकडे असावी हा संघर्ष निरंतर चालत होता, ज्याने सकल-इस्लामवाद हे मृगजळ
आहे हे सिद्ध केले. भारतामध्ये इंग्रजांचे म्हणजेच खलिफाच्या (आणि पर्यायाने
इस्लामच्या) शत्रूचे राज्य असल्याने ही भूमी मुस्लिमांसाठी अनुकूल नाही म्हणून
सुमारे हजारो मुस्लिम ‘हिजरत’ करून इस्लामची भूमीअसणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये तिथल्या
अमिराच्या आमंत्रणावरून गेले. परंतु यामध्ये त्यांची खूप परवड झाली. अन्नपाण्याची
टंचाई, अमिराच्या अधिकाऱ्यांनी केलेले अत्याचार यांमुळे सकल-इस्लामवादाच्या
स्वप्नाला पुन्हा सुरुंग लागला.
गांधीजी आणि खिलाफत
खिलाफत आंदोलनामध्ये आघाडीवर असणारे असणारे अली
बंधू (मोहम्मद अली आणि शौकत अली) ‘मोहमेडन अँग्लो-इंडियन कॉलेज’चे विद्यार्थी होते
हा योगायोग नक्कीच नाही. इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन छेडण्यासाठी मुस्लिमांचाही
पाठिंबा मिळायला हवा या ध्यासापोटी गांधीजींनी अली बंधूंना जवळ करत खिलाफत
आंदोलनाला पाठिंबा दिला आणि ‘एकत्र लढण्याच्या’ हट्टापायी मुस्लिमांच्या अनेक घातक
सवयींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रघातच पडला. गांधीजींनी आपल्या हट्टापायी कॉंग्रेस
आणि एकूणच स्वातंत्र्यलढ्याला खिलाफतीमागे कसे फरफटत नेले याबद्दलही पुस्तकामध्ये
उहापोह केला गेला आहे.
खिलाफत आंदोलनाला पाठिंबा मिळाल्यामुळे
मुस्लिमांना मिळालेले बळ अखेर हिंदूंवरच कसे उलटले याचे भीषण उदाहरण म्हणजे केरळमधील
मोपल्यांनी केलेला नरसंहार. वरवर इंग्रजांविरुद्ध मुस्लिमांना चेतवले जात आहे असे
दृश्य असले तरीही या ‘काफिरांविरुद्ध लढण्याच्या’ संधीचा फायदा घेऊन मोपला
समाजाच्या मुस्लिमांनी हिंदूंवर हल्ले केले. २८००० हिंदूंचे हत्याकांड झाले आणि
४००० हून अधिक हिंदूंना बाटवले गेले. स्त्रियांवर बलात्कार झाले. मुस्लिम लीगने
अत्याचारांवर पांघरूण घातले, अली बंधूंनी काहीही शोक व्यक्त केला नाही आणि “मोपले
आपल्या धर्मासाठी लढले” असे म्हणून गांधीजींनी हिंदू पीडितांच्या जखमांवर मीठ
चोळले. कॉंग्रेसने आपल्या ठरावामधून गुळमुळीतपणे हिंसेचा निषेध केला आणि लगेच
‘मुस्लिमांना भडकावले गेले’, ‘धर्मांतराच्या तीनच घटना घडल्या’ अशी पुस्तीही जोडली.
ॲनी बेझंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र या प्रकारावर खरमरीत टीका केली.
मोपला जिहाद ही अपवादात्मक घटना नव्हती. खिलाफत
चळवळीच्या तीन वर्षांत (१९१९ ते १९२२) भारतात झालेल्या दंगलींची यादीच पुस्तकात
दिली आहे. खिलाफतीला पाठिंबा देताना गोहत्या बंदीची घातली गेलेली अट खिलाफतवादी मुस्लिमांकडून
कधीही पाळली गेली नाही. एवढेच नाही तर भारतावर आक्रमण करून मुस्लिमांना ‘मुक्त’
करण्यासाठी अफगाणिस्तानच्या अमिराला आमंत्रण धाडण्यापर्यंत खिलाफतवाद्यांची मजल
गेली. खुद्द कॉंग्रेसमधील अनेक नेते खिलाफत पाठिंब्याला अनुकूल नसताना गांधीजींनी खिलाफतीला
पाठिंबा देऊन काय साध्य केले हा प्रश्न हे सर्व वाचताना छळत राहतो.
विविध पैलूंवर प्रकाश
सुटसुटीत प्रकरणे, मुद्द्यांना साजेशी
उपशीर्षके, आवश्यक तिथे संदर्भ आणि तळटीपा यांमुळे उत्तम पुस्तक वाचल्याचे समाधान
मिळते. फक्त काही ठिकाणी इंग्रजी संदर्भग्रंथातील भाषांतरित मजकूर दिला आहे,
त्यामध्ये क्लिष्टता आली आहे. पुस्तकाचा आकार फार मोठा नसला तरीही पुस्तकामध्ये
अनेक मुद्द्यांना स्पर्श केला गेला आहे. खिलाफतीशी संबंधित असलेल्या मुस्लिम
संस्था, व्यक्ती यांची माहिती दिली आहे. आंदोलनाला समर्थन देणाऱ्या, संदिग्ध
भूमिका असणाऱ्या व्यक्ती इथे कळतात त्याचप्रमाणे विरोध करणाऱ्या व्यक्तीही कळतात. डॉ.
आंबेडकरांचे या संदर्भातले ठिकठिकाणी उद्धृत केलेले परखड भाष्य त्यांनी केलेल्या इस्लाम
प्रश्नाच्या अचूक निदानाची साक्ष देते.
दूरवरच्या तुर्कस्तानमधल्या खलिफासाठी
भारतामध्ये आंदोलन का उभे राहिले आणि त्यासाठी देशाची एकताही पणाला का लावली गेली हे
जाणण्यासाठी मुस्लिम समाजाच्या धारणा, त्यांची श्रद्धास्थाने, धार्मिक शिकवण तसेच खिलाफत
म्हणजे काय, पूर्वीपासूनच भारताचे खलिफांशी संबंध कसे होते या सर्वांची कल्पना
असणे आवश्यक आहे. पुस्तकामध्ये डॉ. आफळे यांनी हे सर्व उलगडून दाखवले आहे. इंग्रजांनी
हिंदू-मुस्लिम यांच्यात वैरभाव वाढवण्यात पुढाकार घेतला असला तरीही मुळातच या दोन
समाजांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या तणावाचा इंग्रजांनी कसा फायदा घेतला हे
दर्शवणारी इंग्रजांच्याच शब्दांतली उद्धृते पुस्तकामध्ये वाचायला मिळतात.
खिलाफत आंदोलनाने पाकिस्तानसाठी मूलभूत
सिद्धांताचे काम केल्याची जाणीव डॉ. आफळे यांनी या पुस्तकामधून करून दिली आहे. ज्येष्ठ
अभ्यासक डॉ. श्रीरंग गोडबोले यांची प्रस्तावना काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश
टाकते. पुस्तकातील ‘खिलाफत चळवळीतून घ्यायचा बोध’ हे प्रकरण चिंतनीय आहे. एकूणच या
पुस्तकामुळे वाचनाने ‘आज शंभर वर्षांनी खिलाफतीचा अभ्यास कशासाठी करायचा?’ या
प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे आहे.
खिलाफत आंदोलन : एक अभ्यास
लेखक : डॉ. गिरीश आफळे
प्रकाशक : भारतीय विचार साधना, पुणे
पृष्ठसंख्या : १४०
किंमत : १५० रु
(mahamtb.com वर पूर्वप्रकाशित)
No comments:
Post a Comment