मुखपृष्ठ सौजन्य : अमेझॉन |
‘चरैवेति, चरैवेति’ हे मनुष्यप्राण्याच्या प्रवासाचे सूत्र आहे. तो चालायचा थांबत नाही. विचार, इच्छा, नशीब, भावना, संकट, संधी, सक्ती यांपैकी कुठल्याही कारणांमुळे तो एकीकडून दुसरीकडे स्थलांतर करत राहतो. जाताना आकांक्षा, स्वप्नं , नैराश्य, वासना, आपल्यासोबत घेऊन जातो. भारतीय लोक याला अपवाद कसे असतील? प्रचंड वैविध्य असणाऱ्या भारतीयांचे स्थलांतर हा खरंतर अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. 'इंडिया मूव्हिंग' या पुस्तकामधून चिन्मय तुंबे यांनी या विषयाचा अतिशय समर्थपणे वेध घेतला आहे.
लेखकाने मांडलेली 'द ग्रेट इंडियन मायग्रेशन वेव्ह' ही संकल्पना हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. देशाच्या एका विशिष्ट भागामधून दुसऱ्या ठराविक भागामध्ये रोजगारानिमित्त वर्षानुवर्षं
होत असलेल्या स्थलांतरामध्ये
काही निश्चित गुणधर्म दिसतात असं लेखकाचं निरीक्षण आहे. हे स्थलांतर पुरुषबहुल असतं, ते अर्धस्थायी स्वरूपाचं असतं (म्हणजे
दीर्घकालीन, परंतु कायमचं नव्हे) आणि
त्यामध्ये स्थलांतरितांकडून
रोजगाराच्या ठिकाणाहून
आपल्या गावी
नियमितपणे पैसे पाठवले जातात. उदा. रत्नागिरी जिल्ह्यातून रोजगारासाठी मुंबईला होणारं, तसंच कर्नाटकातल्या
उडुपीहून खाद्यव्यवसायानिमित्त देशभर होणारं स्थलांतर शतकाहून अधिक काळ अव्याहतपणे चालू आहे.
पुस्तकातलं एक संपूर्ण प्रकरण या 'स्थलांतर
लाटे'ला वाहिलेलं
असून अन्य प्रकरणांमध्येही या लाटेचा विविध संदर्भांत उल्लेख येत राहतो. त्यामधून
देशाच्या इतिहासात या सातत्यपूर्ण स्थलांतर लाटेचं महत्व मोठं आहे हे लेखक दाखवून देतो. अशा
स्थलांतरांच्या दोन्ही टोकांना होणारे बदल लेखकाने इतिहास, समाजशास्त्र, संख्याशास्त्र अशा अनेक अंगांनी
नोंदवले आहेतच, पण
यातूनच देशाच्या विविध भागात निर्माण झालेल्या ‘स्थानिक विरुद्ध
परके' अशा स्वरूपाचा
संघर्षाचाही परामर्श घेतला आहे.
'इंडिया
मूव्हिंग'मधून
भारतीयांच्या देशातल्या आणि देशाबाहेरच्या स्थलांतराचा लेखकाने केलेला अभ्यास
बहुआयामी आहे. भारतीयांच्या स्थलांतरांमध्ये काळाच्या ओघात होत गेलेले बदल
आणि त्यामागे असणारी भौगोलिक आणि पर्यावरणीय कारणं यांचा परामर्श लेखकाने घेतला
आहे. मारवाडी, गुजराती, सिंधी इ. समाजांच्या व्यापारी उद्देशाने होणाऱ्या स्थलांतराची
वैशिष्ट्यं पुस्तकामध्ये आहेत. वेस्टइंडिज, सुरिनाम, फिजी येथे मजूर, नोकर, कारागीर
म्हणून नेल्या गेलेल्या भारतीयांच्या इतिहासाचे तपशीलही इथे आहेत. विद्यार्थी
म्हणून युरोप-अमेरिकेत
जाणाऱ्या आणि
कुशल मनुष्यबळ म्हणून सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्थायिक होणाऱ्या भारतीयांच्या
महत्वाकांक्षेचीही चर्चा आहे. स्थलांतरितांमधल्याच निर्वासित (उदा. फाळणीमुळे बाधित) आणि
विस्थापित (उदा. धरणग्रस्त) या श्रेणींचाही स्वतंत्रपणे विचार केला गेलेला आहे.
लग्नाच्या निमित्ताने, कामाच्या
निमित्ताने एवढंच नव्हे तर मानवी तस्करी म्हणूनही होणारे स्त्रियांचे स्थलांतर हा
दुर्लक्षित पैलूही चर्चिला आहे. लेखकाची अर्थशास्त्र अभ्यासक म्हणून असणारी पार्श्वभूमी, परराष्ट्र
विभागाअंतर्गत चालणाऱ्या संशोधन प्रकल्पाचा सदस्य म्हणून केलेलं संशोधन, स्वतःच्या डॉक्टरेटसाठी केलेला
स्थलांतराचा अभ्यास यामुळे
या पुस्तकातील तपशिलांना विश्वासार्हता प्राप्त झाली आहे.
पुस्तक संदर्भसंपृक्त आणि बारीकसारिक आकडेवारीने
भरगच्च आहे, तरीही
ते रुक्ष अहवालासारखे वाटत नाही हे विशेष!
कथनाच्या ओघात येणारे किस्से, रंजक
घटना, लेखकाची मिश्किल
टिप्पणी यांमुळे हे पुस्तक वाचनीय झालं आहे. स्थलांतराबद्दलच्या काही जुन्या
समजुतींकडे पाहण्याची लेखकाची कालसुसंगत दृष्टीही पुस्तकातून दिसते.
उदा. बुद्धिवंतांचे भारतातून होणारे स्थलांतर उर्फ 'ब्रेन ड्रेन' हा
एकेकाळी चिंतेचा विषय होता,
परंतु भारताबाहेर राहूनही अशा लोकांच्या भारतामधल्या विविध प्रकल्प आणि
योजनांमध्ये वाढत असलेल्या सहभागामुळे आपल्या देशातही नव्या कल्पना, प्रेरणांचं वारं खेळायला लागलं आहे, असा सकारात्मक दृष्टिकोन लेखक मांडतो.
पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात 'स्थलांतर आणि विकास' यांच्यातल्या परस्परसंबंधांची चिकित्सा
केली गेली आहे. गावाकडून
शहराकडे होणाऱ्या स्थलांतरामुळे जातिव्यवस्थेची सैलावणारी मिठी, गरिबीमधून सुटका होण्याची शक्यता अशा
जमेच्या बाजूंसोबतच बिघडणारं स्वास्थ्य, शहरांवर पडणारा ताण,
त्यावरून होणारे राजकारण यांबद्दलही या प्रकरणामध्ये उहापोह केला आहे आणि आपल्या येणाऱ्या
काळातल्या स्थलांतराच्या स्वरूपासंबंधी अभ्यासाच्या आधारे आडाखेही बांधलेले आहेत. एकूणच भारतीयांच्या
स्थलांतराच्या अनेक अंगांनी केलेल्या सखोल
विश्लेषणामुळे या पुस्तकाला समाजशास्त्रीय दस्तावेजाचं मोल प्राप्त झालं आहे.
'इंडिया
मूव्हिंग : अ
हिस्ट्री ऑफ इंडियन मायग्रेशन’
लेखक : चिन्मय तुंबे
प्रकाशक : पेंग्विन रँडम हाऊस इंडिया
पाने : २८५
किंमत : ५९९ रू.
('महाराष्ट्र टाईम्स'मध्ये २ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित लेख)
No comments:
Post a Comment