मुखपृष्ठ सौजन्य : सुब्बु पब्लिकेशन्स |
गेले दीड वर्ष संपूर्ण जग कोव्हिडच्या विषाणूच्या सावटाखाली आहे. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी लसीचे संशोधन हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. लसीकरण हा मानवाच्या वैद्यकीय प्रगतीमधला अतिशय महत्वाचा टप्पा आहे. लसीकरण तंत्र एडवर्ड जेन्नरकडून १७९८ साली प्रथम विकसित केल्याचे मानले जाते. मात्र 'शीतला' या पुस्तकातून जेन्नरच्या प्रयोगांच्या आधीपासून भारतात होत असणाऱ्या लसीकरणावर प्रकाश टाकला गेला आहे.
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्यासाठी सज्ज असलेली तारा लॉकडाऊनमुळे भारतातच अडकून पडते. कोव्हिड लसीच्या शोधासाठी पाश्चात्य जगताकडे डोळे लावून बसलेल्या ताराचा भारतीय ज्ञानपरंपरेवर अविश्वास आहे. स्वतः आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा सखोल अभ्यास असणारे तिचे आजोबा तिला "जेन्नरच्या आधीपासून भारतात लसीकरण अस्तित्वात आहे" असं सांगून तिचे कुतूहल चाळवतात आणि तिला याबद्दलच्या अभ्यासासाठी उद्युक्त करतात. हळूहळू तिच्यासमोर भारताच्या इतिहासात दडलेली पाने उलगडत जातात.
इंग्रजीत ज्याला 'स्मॉलपॉक्स' म्हणतात त्या आजाराने कित्येक शतके त्याने जगभर थैमान घातले होते. भारतात 'देवीच्या कोपाने झालेला आजार' अशा समजुतीतून या आजाराला 'देवी' असेच संबोधले जायचे हे आपल्याला माहिती असते, पण त्याचवेळी हा आजार होऊ नये यासाठीचे उपायही भारतीयांना ज्ञात होते याबद्दल मात्र आपल्याला कल्पना नसते. बंगाल प्रांतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीसाठी इ. स. १७३२ ते १७६० दरम्यान काम करणाऱ्या डॉ. जॉन हॉवेलने देवीच्या आजाराचा प्रभाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांची नोंद घेतली. "दरवर्षी मे महिन्याच्या सुमारास देवीचा प्रादुर्भाव वाढतो, हे लक्षात घेऊन त्याआधीच काशी, वृंदावन, प्रयाग येथील विद्यालयांमधील जाणकारांचे चमू लसीकरणासाठी बाहेर पडतात. घरोघरी फिरून देवीची लस देताना ते प्रथम व्यक्तीच्या दंडावर बारीक छिद्रांचे वर्तुळ करतात. त्यानंतर
आपल्याजवळचा कापसाचा तुकडा काढून त्यावर गंगाजलाचे थेंब टाकून तो तुकडा छिद्रांच्या वर्तुळाकार जखमेवर काही तास दाबलेला राहील अशा अवस्थेत ठेवतात. हा कापूस आदल्या वर्षी देवीच्या रुग्णाच्या फोडांमधल्या द्रवाने भिजवून जतन करून ठेवलेला असतो. लसीकरण चालू असताना लसीकरण करणारी व्यक्ती तोंडाने देवीची प्रार्थना म्हणते. लाखो लसीकरणांमध्ये क्वचितच एखादे लसीकरण अयशस्वी ठरते” असे हॉवेलने नमूद केले आहे.
भारतीय
लोकपरंपरांमध्ये एकेका आजाराशी एकेक देवता जोडली गेली आहे. देवीच्या आजाराशी संबंधित असणारी 'शीतला' ही देवी भारतभर पूजिली जाई. तिची कृपा असावी यासाठी होळीनंतर येणाऱ्या शीतला अष्टमीला तिचा उत्सवही साजरा केला जात असे. 'शीतलाष्ट्कम' स्तोत्रामध्ये देवीच्या आजाराची लक्षणे सांगितली असून शीतलादेवीने आपले त्यांपासून रक्षण करावे अशी प्रार्थना केली आहे. भारतामध्ये शीतलादेवीची मंदिरे आणि चित्रे असल्याचे इंग्रजानी नोंदवले आहे.
आजाराशी
संबंधित श्रद्धा आणि आजारावरचा वैद्यकीय तोडगा या दोन्ही गोष्टी भारतात हातात हात घालून जात होत्या. श्रद्धा आणि ज्ञानाची ही वीण समजून घेणे इंग्रजांच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे भारतातले परंपरागत लसीकरण जेन्नरच्या लसीकरणापेक्षा दुय्यम समजले गेले. पाश्चात्त्यांच्या या संदर्भातल्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाची अन्य उदाहरणेही लेखिकेने दाखवून दिली आहेत. भारतातल्या देवीच्या आजाराच्या अनुषंगाने पाश्चात्त्यांनी तसेच सुश्रुत, वाग्भट इत्यादी भारतीय चिकित्सकांनी केलेल्या नोंदींची दखलही हे पुस्तक घेते.
पुस्तकाचे
कथानक मराठी कुटुंबात घडणारे असल्याने अनेक मराठी शब्द लिप्यंतर करून पुस्तकात आले आहेत. हा अट्टहास अनाठायी वाटतो. अशा शब्दांचे (अपवाद वगळता) इंग्रजीतून अर्थही दिलेले नाहीत. शिवाय लिप्यंतर करताना झालेल्या स्पेलिंगच्या चुका तसेच मुद्रितशोधनाच्या चुका यांमुळेही रसभंग होतो.
'शीतला' हे पुस्तक कथानकापेक्षा त्यातल्या माहितीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पाश्चात्यांच्या प्रभावामुळे आपल्या पारंपरिक ज्ञानाकडे दुर्लक्ष करणारा अथवा त्याकडे तुच्छतेने पाहणारा वर्ग भारतात उदयास आला आहे. सुदैवाने पारंपरिक ज्ञान विस्मृतीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक जण प्रयत्न करत आहेत. मित्रा देसाईंचा प्रयत्न त्या दृष्टीने स्तुत्य ठरतो.
शीतला
लेखिका : मित्रा देसाई
प्रकाशक : सुब्बू पब्लिकेशन
पृष्ठसंख्या : ९७
किंमत : १९९ रु.
('महाराष्ट्र टाईम्स'मध्ये १० जुलै २०२१ रोजी 'दखल इंग्रजी पुस्तकांची' या सदरामध्ये पूर्वप्रकाशित)
No comments:
Post a Comment