Total Pageviews

Monday, October 25, 2021

ध्रुव गाठण्याचे ध्येय



इतिहासात डोकावलं की मनुष्याला नवनवीन भूप्रदेशांच्या शोधार्थ नेणारी, नवी क्षितिजं गाठण्याची तीव्र उर्मी खुणावत राहिल्याचं दिसतं. नौकानयनाच्या तंत्राने एकमेकांशी जमिनीने न जोडले गेलेले दूरचे प्रदेशसुद्धा माणसाला गाठणं शक्य होऊ लागलं. तंत्राला धर्मविस्तार, साम्राज्यविस्ताराची जोड मिळाली आणि मध्ययुगात शोधमोहिमांचे युग अवतरले. सर्व खंड पालथे घातल्यानंतर पृथ्वीचे ध्रुव पादाक्रांत करण्याच्या महत्वाकांक्षी मोहिमा आखल्या नसत्या तरच नवल. 'टू द एजेस ऑफ द अर्थ' हे पुस्तक अशा महत्वाच्या मोहिमांचे अनेक पदर उलगडतं.


१९०९ सालच्या तीन साहसी शोधमोहिमा हा या पुस्तकाचा मध्यवर्ती विषय आहे. आजवर कुणीही माणूस पोचला नव्हता अशा पृथ्वीवरच्या दूरस्थ बिंदूंपर्यंत पोचण्यासाठी निघालेल्या या मोहिमा होत्या. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि काराकोरम पर्वतरांगेतले सर्वोच्च शिखर 'के२'. अनुक्रमे अमेरिकेचा रॉबर्ट पिअरी, ग्रेट ब्रिटनचा अर्नेस्ट शॅकल्टन आणि इटलीचा राजकुमार लुईजी आमेडेओ हे या मोहिमांचं नेतृत्व करत होते. पिअरीने आधी तीन वेळा उत्तर ध्रुव गाठण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. १९०९ साली वयाच्या बावन्नाव्या वर्षी त्याने नव्या उमेदीने उत्तर ध्रुवावर स्वारी केली. दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेचा सेनापती शॅकल्टननेही १९०९ पूर्वी रॉबर्ट स्कॉटसोबत दक्षिण ध्रुवीय मोहिमेचा अनुभव घेतला होता. तेव्हा दक्षिण ध्रुव गाठता आला नसला तरी त्यांच्या चमूने सर्वाधिक दक्षिणेकडे जाण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.


या पुस्तकाचा तिसरा नायक इटलीचा ड्यूक आमेडेओ याने दर्यावर्दी आणि गिर्यारोहक अशी दुहेरी ओळख निर्माण केली होती. १९०० सालच्या उत्तर ध्रुवाच्या मोहिमेचा तो नेता होता. अतीव थंडीमुळे दोन बोटं गमवावी लागल्याने तो स्वतः त्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊ शकला नाही तरी त्याचा सोबती कॅप्टन कॅगनीने उत्तरेकडे जाण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. ड्यूकने १८९२पासून गिर्यारोहणाचे धडे गिरवत युरोपमधली गिरिशिखरं सर केली होती. पुढचे आव्हान म्हणून त्याची नजर के२ शिखराकडे वळली. 


या मोहिमांमध्ये सहभागी झालेल्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमतेसोबतच बेभरवशाचं हवामान, मर्यादित अन्नसाठा, साहित्य नेण्यातले अडथळे असे अशा सर्व अंगांनी परीक्षा पाहिली गेली. रूढार्थाने या तिन्हींपैकी फक्त पिअरीचा चमूच पूर्ण यशस्वी झाला (अर्थात त्याने उत्तर ध्रुव खरोखरच गाठला की नाही याबद्दलही वाद उत्पन्न झाले. पुस्तकात त्यांचाही सविस्तर उहापोह आहे). शॅकल्टनच्या मोहिमेवरच्या एका चमूला चुंबकीय दक्षिण ध्रुव शोधता आला, पण स्वतः शॅकल्टन ज्या चमूसोबत पायपीट करत होता त्याला मात्र भौगोलिक दक्षिण ध्रुवापासून काही अंतरापर्यंतच पोहोचता आलं. ड्यूकच्या चमूला देखील खराब हवामानामुळे मोहीम आटोपती घ्यावी लागली. तरी शॅकल्टन, ड्यूक या दोघांनीही नवे विक्रम प्रस्थपित केले. योगायोगाने १९०९ या एकाच साली हे विक्रम प्रस्थापित झाले आणि त्याच वर्षाला केंद्रस्थानी ठेवून लेखक एडवर्ड जे. लार्सन यांनी हे सारे तपशील मांडत प्रस्तुत पुस्तक साकारलं आहे. लार्सन यांनी पिअरी, शॅकल्टन, ड्यूक या तिघांची पार्श्वभूमी, त्यांच्यापुढची आव्हानं, मोहिमांबद्दलचं समाजातलं कुतूहल याबद्दल विस्ताराने लिहिलं आहे. वैयक्तिक महत्वाकांक्षा, त्याला राज्यकर्त्यांच्या साम्राज्यविस्ताराच्या महत्वाकांक्षेची जोड आणि हे सगळं असलं तरीही मोहिमेच्या संशोधकीय उद्दिष्टाकडे दुर्लक्ष होऊ न देणं अशा विविध बाजूंवर हे पुस्तक प्रकाश टाकतं. शॅकल्टनच्या मोहिमेअंतर्गत त्याच्या सहकाऱ्यांनी हिमनद्यांचे प्रवाह, हिमस्फटिकांची रचना, चुंबकीय क्षेत्र यांचा केलेला अभ्यास हे उत्तम उदाहरण आहे. यात १९०९ पूर्वीच्या मोहिमा, ध्रुवीय प्रदेश आणि पर्वतशिखरांविषयीचे तत्कालीन साहित्यातले उल्लेखही आहेत. पिअरीची फ्रेडरिक कूकसोबत उत्तर ध्रुव गाठण्यासाठीची चढाओढ, दोघांनीही प्रतिमानिर्मितीसाठी वापरलेल्या क्लृप्त्या, न्यूयॉर्क टाईम्स आणि न्यूयॉर्क हेराल्ड या प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांनी अनुक्रमे पिअरी आणि कूकची बाजू उचलून धरणे, पिअरीच्या ध्रुवीय स्वारीचे वृत्त 'एक्सलुझिव्हली' देण्यासाठी न्यूयॉर्क टाईम्सने केलेला महागडा करार असे रंजक तपशीलही पुस्तक वाचनीय बनवतात. तत्कालीन कागदपत्रं, वृत्तपत्रं, प्रवाश्यांच्या रोजनिश्या अशा अस्सल संदर्भसाधनांसह साकारलेलं हे पुस्तक प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देण्याच्या माणसाच्या धाडसी वृत्तीचा गौरव करतं.


टू द एजेस ऑफ द अर्थ

लेखक : एडवर्ड जे. लार्सन

प्रकाशक : विल्यम मॉरो

पाने : ३५२,

किंमत : ५९९ रुपये


('महाराष्ट्र टाईम्स'मध्ये १२ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित)


No comments:

Post a Comment