Total Pageviews

Saturday, December 31, 2022

२०२२ मधले वाचन आणि लेखन

 


१) क्रेमलिनच्या बुरुजावरून : नरेंद्र सिंदकर

मॉस्को रेडिओच्या मराठी विभागात पंचवीसहून वर्षे काम केलेल्या व्यक्तीच्या नजरेतून दिसलेली रशियन व्यवस्था. 

https://prasadgates.blogspot.com/2022/12/blog-post_31.html

२) स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग : डॉ. गिरीश आफळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांपासून स्वयंसेवकांपर्यंत अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात घेतलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागाबद्दल माहिती 

३) राष्ट्रीय आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : सुधीर जोगळेकर 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संघाच्या स्थापनेच्या योजना डॉ. हेडगेवारांच्या मनात कशी रुजत-फुलत गेली ती प्रक्रिया यामध्ये मोजक्या शब्दांमध्ये खूप नेमकेपणाने मांडली आहे . इंग्रजांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा ते दादरा नगरहवेली स्वातंत्र्यलढा यात संघाचे स्वयंसेवक कसे आणि कधी सहभागी झाली याची थोडक्यात माहिती दिली आहे. 

(स्टोरीटेलवर उपलब्ध आहे)

४) १ जानेवारी १८१८ - कोरेगाम भीमा लढाईचे सत्य : रोहन जमादार

कोरेगाव-भीमाची लढाई जातीय उद्देशाने लढलेली नव्हती हे ऐतिहासिक नोंदी आणि कोरेगाव-भीमाच्या जयस्तंभावरच्या शिलालेखाच्या माहितीसह उलगडून सांगणारे पुस्तक

https://prasadgates.blogspot.com/2022/06/blog-post_13.html

५) दत्तोपंत म्हसकर - संघसमर्पित जीवन

मावळ तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घट्ट रोवणाऱ्या ज्येष्ठ प्रचारकांचे अल्पचरित्र आणि आठवणी 

६) द्रष्टा कलासाधक : उदयन इंदूरकर

भीम बेटका गुहांमधील आदिमानवाच्या अस्तित्वाचा पुरावा जगासमोर आणणारे, लुप्त सरस्वती नदीचा शोध आणि त्याद्वारे आर्य आक्रमण सिद्धांत खोडून काढणारे पुरातत्वशास्त्रज्ञ ऋषितुल्य हरिभाऊ वाकणकर यांचे अल्पचरित्र

७) मुस्लिम मनाचा कानोसा : हमीद दलवाई

मुस्लिमांवर प्रभाव असणाऱ्या आणि त्यांचे धार्मिक/राजकीय नेतृत्व करणाऱ्यांमध्ये जाऊन, त्यांच्याशी बोलूसंवाद साधून त्यांच्या मनाचा जुनाट आणि कट्टर विचारांकडे असणारा कल तपासून तो शब्दबद्ध करण्याचा धाडसी प्रयत्न. 

(किंडलवर उपलब्ध आहे)

८) अश्रू ईशान्येचे - मिशन मणिपूर : पुरुषोत्तम रानडे

देशापासून मानाने पूर्णपणे तुटलेल्या ईशान्य भारताच्या टोकातल्या गावामध्ये जाऊन त्यांच्यात भारताबद्दल आपुलकीचे बी पेरणाऱ्या अचाट आणि अफाट भैयाजी काणे यांच्यावरचे पुस्तक

या पुस्तकावर मी केलेले फेसबुक लाइव्ह : https://www.facebook.com/100001635303337/videos/371182194888362/

९) The Bera Bond : Sundeep Bhutoria

राजस्थानातील बेरा या खेड्यामध्ये एकमेकांच्या आसपास सहजपणे वावरणाऱ्या मनुष्य आणि बिबट्यांचे सहअस्तित्व कॅमेराबद्ध करणारे कॉफीटेबल बुक

https://prasadgates.blogspot.com/2022/07/the-bera-bond.html

१०) प्राचीन भारतीय विद्यापीठे : श्वेता काजळे

तक्षशीला, नालंदा इत्यादी प्राचीन विद्यापीठांमधील शिक्षण परंपरेचा इतिहास उलगडून दाखवणारे पुस्तक

https://prasadgates.blogspot.com/2022/06/blog-post_55.html

११) जावे किंगफिशर्सच्या गावा : पराग नलावडे

किंगफिशर पक्ष्याच्या भारतात आढळणाऱ्या सर्वच्या सर्व (१२) प्रजातींना कॅमेऱ्यात टिपणाऱ्या निसर्गप्रेमी व्यक्तीच्या अनुभवांची टिपणे

https://prasadgates.blogspot.com/2022/06/blog-post_66.html

१२) परिसांचा संग : गिरीश प्रभुणे

भटक्या विमुक्तांसाठी मोठे कार्य उभे करणाऱ्या गिरीश प्रभुणे यांना आयुष्याच्या वाटचालीत भेटलेल्यांची हृद्य व्यक्तिचरित्रं असणारे पुस्तक. नागपूरच्या तरुण भारतमधून प्रकाशित होणाऱ्या 'ऊन-सावली' या सदराचे संकलन

१३) वार्ता ईशान्य भारताची : सुनील किटकरू

ईशान्य भारताची संस्कृती, तेथील समस्या, त्या समस्यांवर उपाय शोधणारे वेडे पीर आणि ईशान्येच्या समाजाच्या उत्थानासाठी झटणाऱ्या संस्थांची माहिती सांगणारे पुस्तक

https://prasadgates.blogspot.com/2022/12/blog-post_24.html

१४) हिंदुस्थानातील संस्थानांचे विलीनीकरण कसे झाले : सुधाकर डोईफोडे

संस्थानांचे विलीनीकरणाचा रोमहर्षक इतिहास 

https://prasadgates.blogspot.com/2022/12/blog-post.html

१५) असत्यमेव जयते : अभिजित जोग

भारताच्या इतिहासकथनामध्ये जाणीवपूर्वक पेरलेल्या गेलेल्या असत्यामागचे सत्य उलगडणारे पुस्तक. यामध्ये आर्य आक्रमण, अहिंसेमुळेच स्वातंत्र्य मिळाले, सूफींची 'सहिष्णुता' आदी भूलथापांचा सप्रमाण समाचार घेतला आहे. 

https://prasadgates.blogspot.com/2022/07/blog-post.html

१६) How to be a writer : Ruskin Bond

नवलेखकांसाठी टिप्स 

१७) Reborn : Santhi Krishna आणि १७) Story of a reversion : O Sruthi 

अनुक्रमे ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मांच्या भ्रमजालामध्ये ओढल्या गेलेल्या युवतींचे खळबळजनक अनुभव. सुदैवाने योग्य वेळी 'आर्ष विद्या समाज' या संस्थेचे आचार्य मनोजजी यांनी केलेल्या समुपदेशनाने सर्व शंका नष्ट होऊन दोघी सनातन धर्माकडे परत आल्या,  सनातन धर्माच्या प्रसारार्थ स्वत:ला वाहून घेतले

१९) सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महर्षी दयानंद : श्रीपाद जोशी

वैदिक धर्माच्या मूळ शिकवणुकीवर श्रद्धा कायम ठेवून परंपरांमधून पसरलेल्या कुप्रथांविरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या असामान्य योद्ध्याचे चरित्र. 

(सविस्तर लेख लवकरच)

२०) प्रामाणिकही, सुंदरही : करुणा गोखले

अनुवाद करत असताना मूळ संहितेशी प्रामाणिक राहून त्यातले सौंदर्य कसे जपता येईल याची चर्चा करणारे, तांत्रिकता उलगडून दाखवत महत्वाच्या टिप्स देणारे पुस्तक 

२१) मृत्युंजयी वीर : संदीप कवीश्वर 

देश आणि धर्मासाठी प्राणांची आहुती दिलेल्या ईशान्य भारतातील मृत्युंजयी वीरांची माहिती देणारी पुस्तिका. या भागामध्ये कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम अशा संघटनांचे कार्यकर्ते तसेच तसेच ईश्यान्येतील स्वाभिमानी जनजातीय व्यक्ती तेथील चर्चप्रेरित फुटीरतावाद्यांच्या डोळ्यात खुपत असतात. त्यातूनच झालेल्या खुनी हल्ल्यांत झालेल्या बलिदानाच्या कहाण्या चटका लावणाऱ्या आहेत. 

२२) मेघदूत : डॉ. विजया देव

मेघदूताचे सौंदर्य उलगडून दाखवणारे पुस्तक. मेघदूतातील स्त्रीवर्णन, त्यांची आभूषणे, मेघदूतातील  जीवसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी, कालिदासाच्या उपमा, मेघाचा प्रवास, असे अनेकविध पैलू स्वतंत्र प्रकरणातून फार छान उलगडले आहेत. 

२३) Een wolk wordt woord : Evert Schnieder

मेघदूताचा डच पद्यानुवाद आणि त्या सोबत युरोपीय वाचकांना डोळ्यासमोर ठेवून भारताची संस्कृती, कालिदासाची प्रतिभा इ. वर दिलेली रंजक माहिती देणारे, विविध पेंटिंग्ज, स्केचेस आणि फोटोंनी सजलेले देखणे पुस्तक


*ऑडिओबुक्स*

(सर्व पुस्तके स्टोरीटेलवर आहेत)


२४) रहस्य नागांचे : अमिश

इंटरेस्टिंग कथानकाचा सातभिकार अनुवाद

२५) ड्रीमर्स अँड डूअर्स : डॉ. सतिलाल पाटील

पुणे ते सिंगापूर बाईक सफरीचे खुसखुशीत, प्रसन्न प्रवासवर्णन. परतीच्या प्रवासात घडलेल्या घटनेमुळे पुस्तकाचा तोपर्यंतचा बाज पूर्णपणे बदलून जातो आणि विचार करायला लावतो. 

२६) सूर्योपासना : निखिल कुलकर्णी

सूर्यनमस्कारांचे तंत्र, फायदे अतिशय ओघवत्या भाषेत उलगडून दाखवत, आजच्या काळातील परिभाषेत मांडणी करणारे पुस्तक

२७) फाळणी : युगांतापूर्वीचा काळोख : वि. ग. कानिटकर

एका वेदनादायी घटनेचे 'मेकिंग' सविस्तर उलगडून दाखवणारे, अस्वस्थ करून सोडणारे पुस्तक

२८) अडोल्फ हिटलरची प्रेमकहाणी : वि. ग. कानिटकर 

हिटलर आणि त्याची प्रेयसी यांच्यातील जगावेगळ्या प्रेमाची इतिहासात विसरली गेलेली पाने 

२९) हिटलरचे महायुद्ध : वि. ग. कानिटकर 

हे पुस्तक म्हणजे मला नाझी भस्मासुराचा उदयास्तची संक्षिप्त आवृत्ती वाटले. तसेच अभ्यासपूर्ण, माहितीने खचाखच भरलेले आणि कंटाळवाणे 

३०) डॉ. हेडगेवार : ना. ह. पालकर

सामान्य भासणाऱ्या पण असामान्य कार्य केलेल्या व्यक्तिमत्वातील उत्कटता सांगणारे चरित्र. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रुजण्या-बहरण्याची प्रक्रिया नाना पालकरांनी फारच सुरेख उलगडून दाखवली आहे. राहुल सोलापूरकर यांचे अभिवाचन निव्वळ अप्रतिम!

३१) रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले : डॉ. एस. व्ही. भावे

लंका ते अयोध्या या रामप्रवासमार्गाचा स्वत:च्या विमानामधून शोध घेणाऱ्या हौशी पण अभ्यासू डॉक्टरचे अनुभव. १९९१-९२ मध्ये भावे यांनी धनुषकोडी येथील समुद्रात होडीतून उतरून तिथे रामसेतू प्रत्यक्ष असल्याची खात्री करून घेतली होती. 

(पुस्तक इथून खरेदी करता येईल : https://tinyurl.com/44as5nw9)

३२) पत्रापत्री : दिलीप प्रभावळकर

माधवराव आणि या दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून उलगड गेलेल्या खुमासदार घडमोडी, टिपिकल प्रभावळकर शैलीततल्या मिश्कील टिप्पण्यांसह.. 

खूप दिवसांनी विनोदी साहित्य अनुभवले

३३) माझी काटेमुंढरीची शाळा : गो. ना. मुनघाटे

काटेमुंढरीची नावाच्या अतिशय दुर्गम गावात, वनवासी बांधवांमध्ये काम केलेल्या तळमळीच्या शिक्षकाचे अनुभव. 

****

वाचलेल्या पुस्तकांचा यावर्षी एका वेगळ्या माध्यमात उपयोग करून पाहिला. 'एकनाथजी रानडे यांनी विवेकानंद शिलास्मारकासाठी केलेले कार्य' या विषयावर power point च्या सहाय्याने जवळपास ५० मिनिटांचे सादरीकरण केले. 'व्हर्चुअल कट्टा' या ग्रुपसाठी अजून त्याचे  रेकॉर्डिंग यूट्यूबवर उपलब्ध झालेले नाही. झाले तर मी share करेनच. 

****


जे वाचले त्यातल्या काही पुस्तकांवर लिहिले त्यांची लिंक वर दिलीच आहे. उरलेल्यावर अल्पस्वल्प का होईना, लिहिण्याचा प्रयत्न करेन. 

या वर्षी लिहिलेले दोन लेख अतीव समाधान देऊन गेले. 

१) डच नजरेतून मेघदूत

संस्कृत मधल्या 'मेघदूत' या काव्याचे डच भाषेत अनुवाद करणारे 'एव्हर्ट श्नायडर' यांचे पुस्तक आणि मुलाखत यांच्यावर आधारित दीर्घ लेख साप्ताहिक सकाळ दिवाळी अंकासाठी लिहिला. यानिमित्ताने एका लोकप्रिय दिवाळी अंकामध्ये स्थान मिळवता आले. 

२) बाबाविषयी ...

अतीव आवडते लेखक अनिल अवचट यावर्षी आपल्याला सोडून गेले. त्यांच्यावर लिहिलेला हा लेख अनेकांना भावला याचे विशेष समाधान आहे

https://prasadgates.blogspot.com/2022/12/blog-post_1.html


यावर्षी लिखाणाच्या आणखी एका प्रांतात धडपड सुरू केली आहे. डोक्यात plans तर खूप शिजत असतात, पण ते सर्वांसमोर कधी येतील (किंवा येतील तरी की नाही!) याबद्दल या घडीला मी काहीच सांगू शकत नाही. शिवाय २०२१ मध्ये केलेले बरेच लिखाण अजूनही प्रकाशात येण्याची वाट पाहात आहे. ते पुढच्या वर्षी (तरी) येईल या आशेवर आहे.  


बघू, २०२३ काय घेऊन येतंय ते.. 

बाबाविषयी ...

 

अनेक वाचकांचा वाचनप्रवास हा सर्वसाधारणपणे मन रिझवणाऱ्या, चार घटका मनोरंजन करणाऱ्या आणि अलंकारिक भाषा असणाऱ्या पुस्तकांपासून सुरू होतो. तो तसा असण्यात गैर काहीच नसून ती बरीचशी स्वाभाविक गोष्ट असते. मीही याला अपवाद नव्हतो. पण महाविद्यालयात असताना 'धागे उभे आडवे' हे पुस्तक वाचले आणि त्या पुस्तकाने मला आतून हलवले. आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या पण आपल्याला कधीही दिसलेल्या प्रश्नांचे अनिल अवचटांनी असे काही ताणेबाणे गुंफले होते की त्यात गुरफटून, गुदमरून गेल्यासारखे झाले. लिखाणाला सत्याचा पाया असेल तर अकृत्रिम भाषाही किती परिणामकारक ठरू शकते याचा प्रत्यय आला. हातमाग, हळद व्यवसायांमधले पिचून गेलेले कामगार; वेश्या, देवदासी अशा समाजाच्या खालच्या पायरीवरील माणसांची विदारक शब्दचित्रे त्यांनी आपल्या अनलंकृत भाषेत रेखाटली होती. त्या पुस्तकाच्या वाचनामुळे अवचटांच्या साध्या सोप्या भाषेनेही मनात वेगळे स्थान निर्माण केले. ती लेखनशैली कुणाचेही अनुकरण न करता त्यांच्यात आलेली होती. एका मनस्वी माणसाचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात आणि जगण्यातही दिसायचे.

 

अभिनिवेशापासून दूर

आपल्याला हवे ते मनापासून लिहिणे आणि ते आहे तसे लोकांना आवडणे ही फार कठीण गोष्ट आहे. 'मी मला वाटेल ते लिहितो' असे म्हणणारे लेखक बघता बघता व्यावसायिक गणितांप्रमाणे लिहू लागल्याची अनेक उदाहरणे असताना अनिल अवचट मात्र कायम स्वतःला योग्य वाटेल त्या विषयावर लिहित राहिले, याचे मुख्य कारण त्यांनी कधीही मला लेखक म्हणून मान्यता मिळवायची आहे' या भावनेने लिहिले नाही. अलीकडेच -साहित्य संमेलना'चे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांचे लिखाण त्या लायकीचे नाही अशी शेरेबाजी झाली तेव्हाही मला लेखक समजू नका आणि माझ्या लिखाणाला साहित्य समजू नका असे सहज म्हणण्याइतके त्यांचे जगणे अभिनिवेशविरहित होते.

अनिल अवचटांची ही वृत्ती त्यांच्या जगाकडे डोळे उघडे ठेवून बघण्याच्या सवयीतून आली होती. ही सवय त्यांना कशी लागली याबद्दल त्यांच्यास्वतःविषयी या पुस्तकातून कळते. स्वतःविषयी हे मला मराठीतल्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक वाटते. अनिल अवचटांमधला माणूस कसा घडत गेला हे या पुस्तकामधून जाणून घेतले की, त्यांच्यातला लेखक कसा घडला हे आपल्याला नीट समजू शकते. ओतूरसारख्या छोट्या गावामध्ये गेलेले बालपण, नववीपासून शिक्षणासाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात आल्यानंतरचे भांबावलेपण, त्यातून आत्मविश्वासाला गेलेले तडे, वैद्यकीय महाविद्यालयातले शिकवून जाणारे अनुभव, श्रद्धा-अंधश्रद्धांचा गुंता, आपल्या मित्रांच्या साथीने चळवळीमध्ये उतरणे, कौटुंबिक तणावाचे प्रसंग आणि या सगळ्या टप्प्यांमधून जात स्वतः एक कुटुंबवत्सल पिता होणे असा आपल्या जडणघडणीचा आलेख त्यांनी मांडला आहे. आपल्या अडखळण्या-सावरण्यासह त्यांनी ज्या प्रांजळपणे आपला प्रवास रेखाटला आहे, ते वाचणे विलोभनीय आहे. स्वतःकडेही त्रयस्थपणे, अलिप्तपणे कसे पाहावे याचा स्वतःविषयी हा वस्तुपाठ आहे. हे पुस्तक जसे त्यांचा माणूस म्हणून प्रवास उलगडते, तसेच ‘माझ्या लिखाणाची गोष्ट’ हे त्यांचा लेखक म्हणून प्रवास उलगडते. अनिल अवचटांबद्दल विस्ताराने जाणून घ्यायचे असेल तर ही दोन्ही पुस्तके वाचायलाच हवीत.

 

सामाजिक प्रश्नांवर क्ष-किरण

ज्या लेखनप्रकारामुळे अनिल अवचटांचे नाव सुपरिचित झाले ती म्हणजे रिपोर्ताज. ऐन तारुण्यात बिहारला केलेला प्रवास आणि तिथले दैन्य, गरिबी, शोषण पाहून आलेल्या अस्वस्थतेतून त्यांनी एक लेखमाला लिहिली आणि त्यातूनच पुढे त्यांचे ‘पूर्णिया’ हे पुस्तक जन्माला आले. समस्या आहे त्या ठिकाणाला भेट देणे, संबंधितांशी संवाद साधणे आणि त्याचे सविस्तर वृत्त तयार करणे, या गोष्टी कुठलाही पत्रकार करतोच, पण अवचटांच्या रिपोर्ताज स्वरूपाच्या लिखाणाने लोकांचे लक्ष वेधून घेतले याचे कारण त्यांनी त्यासाठी दिलेला वेळ आणि आपल्या निरीक्षणांची त्यांनी केलेली मांडणी. सुरुवातीच्या काळामध्ये अवचटांनी पत्रकारिता करताना तात्कालिक विषयांवर लिहिले आणि समस्यांना वाचाही फोडली, पण ज्या समस्या दीर्घकालीन आहेत त्यांच्यावर लिहिण्यासाठी विशेष प्रयत्न केले, एखाद्या ठिकाणी पुन्हा पुन्हा भेटी दिल्या, संबंधितांचा विश्वास संपादन करून समस्यांचे मूळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. जिथे समस्याग्रस्त लोक सविस्तर बोलत नसत तिथे डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले. लोकांची घरे, त्यांचे कपडे इथपासून ते त्यांच्या चेहऱ्यावर हलकेच तरळून जाणारे भाव किंवा त्यांनी केलेली अल्पशब्दी टिप्पणी यांचीही मनात नोंद घेतली आणि ती आपल्या लेखामध्ये मांडली. सोपी शब्दरचना आणि छोटी छोटी वाक्ये यांमुळे वाचक त्यांच्या लिखाणाच्या अधिक जवळ जाऊ शकले असे मला वाटते.

आत्मीय अलिप्तता हे मला अवचटांच्या रिपोर्ताजचे वैशिष्ट्य वाटते. समस्यांना भिडताना त्यांच्यातल्या माणसाने समस्याग्रस्तांकडे आत्मीयतेने बघितले, पण त्याबद्दल लिहिताना मात्र त्यांच्यातल्या लेखकाने उमाळे, कढ न आणता फक्त निरीक्षणे आणि काही टिप्पण्या नोंदवल्या आणि बाकीचे वाचकांवर सोडले. त्यांच्या लेखणीत एक मोकळेपणा मला कायम जाणवतो. विषयाच्या अनुषंगाने लिहिताना अकारण खोटा 'पॉलिटिकल करेक्टनेस' न बाळगता संबंधित जातींचे ते स्पष्ट उल्लेख करत, तसेच एखाद्या समाजघटकाच्या चुकीच्या धारणांवर टिप्पणीही करत असत (एका जातिसंमेलनावर त्यांनी लिहिलेला वृतांत मला याठिकाणी विशेषकरून आठवतो आहे).

 

 

रिपोर्ताज हा लेखनप्रकार प्रकार मराठीत आणण्याचे श्रेय अनिल अवचटांना दिले जाते. गंमत म्हणजे रिपोर्ताज नावाचे काही जगाच्या पाठीवर आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती. मला जे दिसले ते मी लिहित गेलो, त्या साहित्यप्रकाराला विशिष्ट नाव आहे हे इतरांनी सांगितले तेव्हा मला कळले हेही अवचट प्रांजळपणे सांगत असत. साधना, मनोहर, माणूस, किर्लोस्कर अशा नियतकालिकांमध्ये लिहिलेल्या लेखांमधून अनिल अवचटांनी पांढरपेशा वाचकांना संपूर्ण अपरिचित विश्वाचे दर्शन घडवले आणि अंतर्बाह्य हादरवले. त्यांच्या लिखाणामुळे असंख्य पिचलेल्या, पिडलेल्या मूक श्वासांना आवाज मिळाला. हे लेख पुढे ‘माणसं’, ‘वाघ्या मुरळी’, ‘प्रश्न आणि प्रश्न’, ‘धागे उभे आडवे’ या पुस्तकांच्या स्वरुपात प्रसिद्ध झाले. ते वाचून अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. विशेष म्हणजे कष्टकरी वर्गातल्या लोकांना अवचटांच्या लेखामुळे इतरांच्या कष्टांचीही जाणीव झाली. हमालांवरचा लेख वाचल्यानंतर धान्याची पोती वाहणाऱ्या हमालाने मिरच्यांची पोती वाहणाऱ्या लोकांचे हाल काय असतात हे प्रथमच कळल्याची कबुली दिली.

 

संवेदनशील लेखक, कृतिशील कार्यकर्ता

एकेकाळी ‘युक्रांद’सारख्या संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून कार्य केलेल्या आणि पुढे ‘आपल्याला हे झेपणारे नाही’ असे प्रामाणिकपणे मान्य करून त्यातून बाजूला झालेल्या अनिल अवचटांनी आपल्यातल्या कार्यकर्त्याला ग्लानी मात्र येऊ दिली नाही. लेखणीच्या माध्यमातून तो कार्यकर्ता प्रकट होतच राहिला. ‘आणखी काही प्रश्न’ हे त्यांचे शेवटचे ठरलेले पुस्तकही याचीच साक्ष देते. इतरांना न दिसलेल्या गोष्टी ते बरोब्बर टिपत असत. पुण्याबद्दल लिहिता बोलताना काही ठराविक पेठाच लोकांच्या अभिमानाच्या अथवा चेष्टेच्या आणि टीकेच्या विषय ठरतात, पण अनिल अवचटांनी पुण्यावर लिहिले तेव्हा मात्र पूर्व भागातल्या पेठांमधल्या जीवनाचे चित्र रेखाटले आणि तिथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कारागिरांच्या कामाचे कौतुक केले.

अंमली पदार्थांच्या नादी लागून चांगल्या घरांमधले तरूणही आयुष्यातून उठत असलेले पाहून अनिल अवचटांनी लिखाण सुरू केले त्याचेच पुढे ‘गर्द’ हे पुस्तक झाले. सुनीताबाई आणि पुलंच्या प्रोत्साहनातून आणि आर्थिक सहाय्यातून आपली पत्नी डॉ. सुनंदा यांच्यासोबत त्यांनी पुण्यामध्ये ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले आणि शेकडो लोकांना गर्तेतून बाहेर काढले. ‘मुक्तांगण एक दिवस बंद करावे लागेल, अशा निर्व्यसनी स्थितीत समाज येईल’ असे त्यांचे स्वप्न असताना प्रत्यक्षात मात्र व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढलेले पाहून ते व्यथित होत असत. “पूर्वी लोक दारू पीत नसत असे नाही, पण तेव्हा दारूला प्रतिष्ठा नव्हती. आता मात्र चांगल्या घरांमध्येही दारू पिण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे” हे ते व्यथित अंतःकरणाने बोलून दाखवत असत. त्यातून समाजाच्या स्वास्थ्याविषयी तळमळ असणारा कार्यकर्ताच डोकावतो.

 

समृद्ध लेखनप्रवास

सतत कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये वावरणाऱ्या काही जणांच्या रोजच्या वागण्यातही जगाबद्दलचा कडवटपणा अकारण डोकावताना दिसतो. सतत संघर्षाच्या भूमिकेत राहणेच त्यांच्या अंगवळणी पडून गेलेले असते. तरूण वयात अनिल अवचटांची जडणघडण ज्या वैचारिक वर्तुळामध्ये झाली त्यामध्येही अशा लोकांची कमतरता नाही. पण अनिल अवचट मात्र त्यांच्यात वेगळे ठरले. त्यांच्यातला लेखक आणि संवेदनशील माणूस नुसताच टिपे गाळत राहिला नाही. तो फुलत, बहरत गेला. श्रेष्ठ गायकाला जशा दोन सुरांच्या मधल्या जागा दिसतात आणि त्यांचा विस्तार तो करत जातो, तशा अवचटांना रोजच्या जगण्यातल्या असंख्य सुंदर जागा दिसू लागल्या. माणसांमधल्या चांगल्या जागा त्यांनी शब्दांत उतरवल्या, त्यातून उत्तम व्यक्तिचित्रे उभी राहिली. निसर्गामधल्या सुंदर जागांनी त्यांना खुणावले, तेव्हा त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. कधी त्यातून ‘सृष्टीत... गोष्टीत’, ‘वनात .... जनात’ सारखे खेळकर बालसाहित्य निर्माण झाले, तर कधी ‘बहर शिशिराचे सारखे’ छायाचित्रांचे पुस्तक झाले. आपल्या जगण्यातला आनंद त्यांनी कधी ‘जगण्यातील काही’ सारख्या ललित लेखसंग्रहातून तर कधी ‘मस्त मस्त उतार’ सारख्या कवितासंग्रहातून मांडला. आपल्या जे जे आवडले ते दुसऱ्याला सांगण्याच्या ऊर्मीतून ते शेवटपर्यंत लिहित राहिले.

ज्या अंगभूत कुतूहलाने अनिल अवचट सामाजिक समस्यांच्या अंतरंगात डोकावले, त्याच कुतूहलाने त्यांनी शब्दांच्या, कॅमेऱ्याच्या, कुंचल्याच्या, सुरांच्या माध्यमातून भवतालाची गळाभेट घेतली. आयुष्याच्या उत्तरार्धातही एखाद्या लहान मुलाच्या औत्सुक्याने ते जगाकडे बघत राहिले. सतत नवीन काहीतरी शिकत राहिले. बासरी, ओरिगामी, लाकूडकाम... कितीतरी गोष्टींमध्ये त्यांनी मन रमवले. कर्करोगाने पत्नी सुनंदा यांना ओढून नेल्यानंतर बसलेल्या हादऱ्यातून त्यांना या छंदांनीच सावरले. उतारवयामध्ये अवचटांना शरीरातल्या घडामोडींविषयी कुतूहल वाटू लागले आणि त्यातून केलेल्या शोधाशोधीतून ‘कुतुहलापोटी’ नावाचे पुस्तक साकारले!

 

लोभस व्यक्तिमत्व

अनिल अवचटांचे लिखाण जसजसे वाचत गेलो तसतसा त्यांच्याबद्दल आदर वाढत गेलाच, पण त्यांच्याबद्दलच्या आदराचे आपलेपणामध्ये रूपांतर व्हायला कारणीभूत ठरले ते त्यांचे बोलणे.. जाहीर कार्यक्रम, मुलाखती यांमधले अनिल अवचटांचे बोलणे ऐकताना नेहमी कुटुंबातले प्रेमळ आजोबा बोलत आहेत असे वाटायचे. आपल्या घरातल्या लहानग्यांना त्यांच्याकडे निर्धास्तपणे सोपवावे असे त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व होते. शांतपणे, कुठलेही बोजड शब्द वापरता ते बोलायचे. बोलण्याच्या ओघात ते किंचित लांबलेल्या सुरात 'हंss' असे म्हणायचे ते ऐकायला अतिशय गोड वाटायचे. एक विलक्षण आश्वासक सूर त्यामध्ये जाणवायचा.

एकदा आमच्या घरापाशी राहणाऱ्या एका साहित्यप्रेमी गृहस्थांनी आपल्या घराच्या गच्चीमध्ये अनिल अवचटांशी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण बोलता बोलता त्याचे गप्पांमध्ये कधी रुपांतर झाले कळलेच नाही. बोलता बोलता अनिल अवचट एकीकडे हातांनी कधी रुमालाचा उंदीर करत होते, तर कधी कागद दुमडून ओरिगामीमधले हंसाचे रूप साकारत होते. त्यांचे ओरिगामीमधले कौशल्य नुसत्या हौशी पातळीवरचे नव्हते. ओरिगामीमध्ये आधीपासूनच असणाऱ्या शेकडो कलाकृती शिकता शिकता नव्या कलाकृती घडवण्याएवढे प्रभुत्व त्यांनी मिळवले होते. त्यांनी ओरिगामी गणपती सुद्धा आम्हाला दाखवला!

त्यांचे बोलणे त्यांच्या लिखाणासारखेच होते. अगदी मनापासून, कुठलाही आव न आणता.. त्यांना कुठल्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहजपणे ‘ए बाबा’ का म्हणू शकते, हे त्या दिवशी मला अगदी ‘याची देहीं..’ अनुभवायला मिळाले. हळूहळू बाबाचे बोलणे कमी होत गेले... मग त्याने बासरी काढली आणि तिन्हीसांजेचे शेंदरी अवकाश सुरांनी भारून टाकले. जातिवंत हापूस आंबा पिकत जातो तसा अधिकाधिक मधुर होत जातो, तो एकवेळ सुरकुतेल पण किडत, सडत नाही... बाबा तसाच पक्व भासला होता त्या संध्याकाळी..  

परवा कुणाच्या ध्यानीमनी नसताना बाबा आपल्या सर्वांना सोडून गेला खरा, पण जाताना तो त्याच्या जगण्यातले टवटवीत सूर आपल्याला गुणगुणण्यासाठी मागे सोडून गेला आहे याचा विसर पडू नये.


(https://www.mahamtb.com//Encyc/2022/1/29/artcle-on-tribute-to-anil-avchat.html येथे पूर्वप्रकाशित)