Total Pageviews

Thursday, February 14, 2013

समांतर

लहानपणी नवख्या लोणच्याची चव पाहणं हा एक सोहळा असायचादुपारी आईची नजर चुकवून बरणीचे झाकण  हळूच उघडायचे...  लोणच्याची फोड जिभेवर टेकवायची... पाठोपाठ लोणच्यातल्या साखरेला बाजूला सारत करकरीत फोडींची आंबट जर्द चव करवती सारखी सरसरत शेवटच्या दाढेपर्यंत जायची आणि न आलेल्या अक्कल दाढेच्या मोकळ्या परिसरात विरघळून जायचीआहाहा ! 'अनुभूती' शिवाय त्याला दुसरा शब्द नाहीपण मोठा झालो तसतशी एक जाणीव व्हायला लागलीताज्या लोणच्याची चव हवीहवीशी असते हे खरे, पण खाल्ल्यानंतरही त्यातल्या साखरेची गोडी जेवणानंतर खूपवेळ रेंगाळत ठेवणारे मुरलेले लोणचेच जास्त समाधान देतेत्यामुळेच लोणचे ताजे ताजे खाण्यापेक्षा मुरल्यावर काही काळाने जास्त भावते, हे जाणवले.  'शाळा' आणि 'दुनियादारी' चे पण असेच आहे. अनुक्रमे शाळेत आणि कॉलेज मध्ये असतानाच ही पुस्तके वाचली तर आवडणार नाहीत असे नाही, पण त्यांची खरी मजा ही ते-ते कालखंड अनुभवून पुढे गेल्यानंतर वाचण्यात जास्त आहे. त्यातला गोडवा अधिक आहे, कारण अनुभव जास्त मुरलेले आहेत.


मिलिंद बोकिलांची 'शाळामी दहावी नंतर - वर्षांनी कॉलेजात असताना पहिल्यांदा वाचली आणि सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' सुद्धा कॉलेज संपल्यानंतर वर्षभराने पहिल्यांदा वाचलीवाचता वाचता माझ्यात आणि माझ्या आठवणीमध्ये पूल कधी बांधले गेले कळले सुद्धा नाही. दोन्ही अनुभव अगदी 'क्लोज टू माय हार्ट' म्हणावेत असे आहेत. दोन्ही वाचताना आलेला nostalgia  केवळ अशक्य !  
शाळेत असतानाएका अर्थाने हुकुमशाहीच म्हणावे अशा व्यवस्थेत वावरतानाआपण सतत शिस्तीच्या त्या पोलादी भिंतींमधून  एखादी फट दिसते का हे शोधत असतोआठवी-नववीत येताना सतत कसली तरी बंडखोरी करायला हात-पाय शिवशिवत असतात. प्रत्येकाच्या मनात आपल्या आजूबाजूच्यांना इम्प्रेस करण्याची सुप्त इच्छा  असतेच असते. फरक इतकाच की नाकासमोर चालणारी पोरं फक्त इमले रचत बसतात आणि वांड कार्टी बरं-वाईट काही ना काही करून दाखवतात. थोडक्यात काय, तर बंडखोरी, लाईन मारणे, धुडगूस घालणे, खच्चून शिव्या घालणे या गोष्टी आपण स्वतः केलेल्या तरी असतात किंवा आजूबाजूच्यांना करताना पाहताना कळत  कळत त्याला संमती तरी दिलेली असते. म्हणजे काय, तर पोरगा सुऱ्या तरी असतो नाहीतर जोशी तरी....    
शाळेत शिकत असताना 'शाळा'वाचलं तरी पौगंडावस्थेच्या एवढ्या सगळ्या छटा जाणवत राहण्याइतका समजूतदारपणा आपल्याकडे असतो कुठे ? म्हणूनच जोशीचं स्वतःशी संवाद  साधणं, सगळ्यामध्ये असूनही कशातच नसणं, सुऱ्याची मानसिकता या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो ते खऱ्या अर्थाने अधिक  कळत्या-जाणत्या वयातच शाळा सोडल्यानंतर 'शाळा' जास्त उमगत जातं ते याच कारणांमुळे.

पुढे कॉलेजमध्ये शिकताना बंधनं अर्थातच कमी होत जातात आणि त्या मोकळ्या वातावरणात श्वास घेणं अगदी विलक्षण वाटायला लागतं. भावनांना आवर घालणं शाळेत असताना जितकं सक्तीचं असतं तितकं ते आता वाटत नाही. शाळेतलं 'लाईन मारणंइथे अधिक धीट होऊन प्रेमाकडे झुकू पाहतं. शाळेतल्या लुटूपुटू मारामारीचं आणि खुन्नसचं 'grandeur' इथे वाढलेलं जाणवतं. अशा वातावरणात  घडणारी 'दुनियादारीकॉलेजमध्ये असतानाच वाचली तर आवडेलच पण कॉलेज सोडल्यानंतर काही काळाने मागे वळून बघतानाकॉलेजमध्ये असतानाचे आपले विचार, आपल्या भावना हे सर्व किती बालिश होते  आणि आपली स्वप्नं किती ठिसूळ होती हे जेव्हा लक्षात येते तेव्हा 'दुनियादारीवाचली तर ती आपल्याला जास्त भावते.  


दुनियादारी पहिल्यांदा वाचली तेव्हा अक्षरशः अधाशासारखी संपवली होती
'शाळा' वाचताना आलेला nostalgia  पुन्हा एकदा मळभ यावे तसा साचून आला होता. श्रेयसचा एकटेपणा, चिमटीत येतायेता सुटून जाणारे प्रेम, दिग्याचं सावरणं - विखुरणं, अश्वत्थाम्यासारखा भळभळणारा एम.के., तो पूर्णपणे आपला होऊ कधीही शकत नाही हे माहित असूनही त्याला अंतर  देणारी स्वराली यांचा असा काही गोफ सु.शिं.नी विणलाय की त्यात गुरफटायला होतं. कॉलेज मधल्या दंगामस्तीच्या आणि nostalgia च्या खूप पुढे जात,  नियती, आयुष्य, तिढे, अडकणं-निसटणं हे सारं सु.शि. आपल्याला कधी डून तर कधी थेट सांगून जातात... 


सामाजिक भान असणारे लिखाण करणारे मिलिंद बोकील आणि तथाकथित 'लोकप्रियते'चा शिक्का असणारे सुहास शिरवळकर यांच्या कलाकृती मी एकाच तागडीत तोलतोय हे काहींना आवडणार नाहीकारण 'शाळा' ला आणीबाणीची पार्श्वभूमी असल्यामुळे अर्थातच ऐतिहासिक, सामाजिक अंगाने 'शाळा'ची खोली अधिक आहे आणि त्यादृष्टीने 'दुनियादारी'ला असली कोणतीही विशिष्ट पार्श्वभूमी नाही. परंतु तरीही  'दुनियादारी' वाचल्यानंतर आलेल्या भारलेपणातून मी जेव्हा थोडा भानावर आलो तेव्हा मला 'शाळाआणि 'दुनियादारीविलक्षण समांतर भासल्या. मनाला भिडणं, हळवं करणं, 'पुन्हा ते दिवस कधीच येणार नाहीत हीबोच लावणं हे अनुभव या दोन्ही कलाकृती देतात आणि  संपताना विलक्षण हुरहूर लावून जातात.  

'शाळामधला जोशी आजूबाजूला यार-दोस्ताचं कोंडाळं असूनही 'रंगुनी रंगात साऱ्यारंग माझा वेगळा'  असा काहीसा आहे. तो स्वतःशी संवाद करणारा आहे, विलक्षण संवेदनशील आहे. शिरोडकरचं आकर्षण  हेच त्याला प्रेम वाटतंय. मात्र त्याचं नक्की निदान  करण्याइतकं त्याचं वय झालेलं नाहीये पण गोष्ट संपताना त्याच्या मनातला अंकुर चिरडला गेलायजोशीचं एकटेपण सतत अधोरेखित होतंय. आणि तिकडे 'दुनियादारीमधला श्रेयस हा जणू जोशीचाच आत्मा घेऊन आलाय. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी जोशीपेक्षा पूर्णपणे वेगळी (आणि मोडकळलेली) आहे, पण तोही विलक्षण संवेदनशील आहेआजूबाजूला दिग्या, श्रीउन्मेष सग्गळे सग्गळे आहेतपण सगळ्यांमध्ये असूनही तो कोणाचाच नाहीये. त्याच्या प्रवासात  त्याच्यासह असणारी माणसं कितीही जवळची वाटली तरी ते फक्त सहप्रवासी आहेतआपले स्टेशन आले की उतरून जाणारे. प्रवास सुरु करताना आणि संपतान श्रेयससुद्धा जोशी सारखाच संपूर्ण एकाकी झालाय. श्रेयसलाही आकर्षण वाटतंय - मिनू आणि शिरीन दोघींबद्दल. पण नक्की कुणावर प्रेम  आहे आणि नुसते आकर्षण कोणाचे वाटते आहे याबद्दल   (जोशीपेक्षा वयाने मोठा असल्याकारणाने कदाचित खूप  जास्त विचार करत असल्यामुळे) गोंधळलेला आहे. आणि सरतेशेवटी त्याच्याही नशिबी त्याचं उमेदीतलं प्रेम नाहीये.

'शाळा' मध्ये सुऱ्या आहे तर 'दुनियादारी' मध्ये दिग्या. हे दोघेही लौकिकार्थाने मवाली, उपद्रवी वगैरे वगैरे वर्गात येतात. पण तरीही सरळमार्गी असणाऱ्या  जोशी आणि श्रेयसने त्यांना आपलं मानलंय. सुऱ्या-दिग्यालाही हळवं होता येतंव्हायला  आवडतं. प्रेम व्यक्त करायची त्यांची पद्धत रांगडी आहे पण सच्ची आहे. त्यात आड-पडदा नाहीगोष्ट संपतानाचं  दोघांचही अपयशी ठरणं, असहाय होणंमोडून पडणं मला हलवून गेलं.

शाळा आणि दुनियादारी या दोन्ही कलाकृतींमध्ये दिसत राहणारी स्वप्नं आपापल्या ठिकाणी कितीही प्रामाणिक आणि सच्ची असली तरी ती त्या-त्या पात्रांच्या आयुष्यातल्या अश्या नवथर आणि भावनाप्रधान टप्प्यांवर निर्माण झालेली आहेत की ती आपोआपच कचकड्याची ठरणारी आहेतमोडून पडणारी आहेत आणि म्हणूनच माझ्यासाठी दोन्ही पुस्तके वाचून संपतानाचे रितेपण सारख्याच खोलीचे आहे आणि डोळ्यात जमा होणारे थेंब सारख्याच उष्णतेचे आहेत ... 

Saturday, July 7, 2012

वावटळ

मराठीमध्ये सिनेमे दुर्लक्षित राहणे हे फुटपाथच्या कडेला असलेला बेघर माणूस दुर्लक्षित राहण्याइतकेच सवयीचे आणि किरकोळीतले झाले आहे. रोज मरे त्याला कोण रडे ? त्यातल्या त्यात पुण्यात मराठी सिनेमे बरेच तग धरतात असे म्हणायला हवे. विशेष म्हणजे काही सिनेमे नुसते
तगच धरतात असे नाही तर हिंदी सिनेमाच्या बाबतीत इतिहासजमा  झालेल्या 'जुबिल्या' साजरे करतात. हे धक्कादायकच म्हटले पाहिजे. मग असे असताना गोल्डन जुबिली नंतरही चालू राहिलेला एक सिनेमा वास्तविकपणे किती चर्चिला गेला पाहिजे किंवा त्याचे टी.व्ही. राइट्स हातोहात खपले
पाहिजेत, पण 'वावटळ' बाबत यातले काहीच घडलेले नाही. ५० आठवडे (त्यातले जवळपास ४० पेक्षा
जास्त आठवडे 'प्रभात' ला) चालल्यानंतर या सिनेमाने अखेर निरोप घेतला आणि काही दिवसांनी पुन्हा एक-दोन आठवड्यासाठी अवतीर्ण झाला. असे कुठल्या सिनेमाच्या बाबतीत घडले असावे असे वाटत नाही. एवढे घडूनही मला हा सिनेमा पाहिलेला एकही इसम सापडलेला नाही. मी नेहमीच्या सवयीने तो पहिल्याच आठवड्यात पाहून टाकला होता. पण माझी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यात कोणालाही या सिनेमाविषयी माहिती / उत्सुकता दिसली नाही. एकच मित्र होता जो म्हणत होता "हो रे, 'वावटळ' बघायला हवा" (५० आठवडे त्याचे हेच विध्यर्थी विधान  चालू  राहिले) मला तर सारखे वाटते की हा सिनेमा थिएटर मालकांनी स्वतःच्या पदराला खार लावून समाजकार्य म्हणून ६०व्या आठवड्यापर्यंत चालवला असावा. बरेच महिने आश्चर्य व्यक्त करण्यात घालवल्यावर अलीकडे मात्र मला वाटले की या सुपरहिट दुर्लक्षित ('पवित्र पापी' सारखं वाटतंय नं हे ?) सिनेमा बद्दल आपणच लिहावे.  भविष्यात चुकून एखाद्याला अनायासे सिनेमा बघायला मिळाला तर निदान "शिंचा हा कुठला सिनेमा ?" म्हणून तो उठून तरी जाणार नाही. असो. नमनालाच घडाभर तेल ओतले खरे,
आता मला आवडलेल्या या सिनेमाचे कथानक सांगतो. 


चित्रपटाच्या सुरुवातीलाच राजस्थान सीमेवरच्या एका गावात कमांडो कारवाईत घरात घुसून तिथल्या पुरुषांना ठार केले जाते. हे पुरुष म्हणजे पाकिस्तानी अतिरेकी आहेत आणि त्यांनी या गावात येऊन गावातल्या एका घरात वस्ती केली आहे.  पण त्यांच्या सोबत एक स्त्री (तेजस्विनी पंडित) देखील  जणू काही त्यांचीच कुटुंब सदस्य असल्याप्रमाणे  तिच्या लहान बाळासोबत राहात असल्याने गावातल्या लोकांना काही संशय आलेला नसतो. पण मध्यरात्रीच्या अचानक झालेल्या धुमश्चक्रीमुळे
गावकरीपण हबकले आहेत. ते कमांडो पथकाचा प्रमुख K5ला (अशोक समर्थ) सांगतात, की या स्त्रीला घेऊन जा कारण ही या गावची नाही. अतिश्रमाने थकलेली आहे ती स्त्री कशीबशी चार पावले
टाकून बेशुद्ध होते. K5 तिला गाडीत घालतो. आणि BSF (सीमा सुरक्षा दल) च्या तळावर, घेऊन
जातो आणि त्या स्त्रीला BSF च्या कमांडर चौहानच्या (विनय आपटे) ताब्यात देतो. या ठिकाणी या K5चे काम संपणे अपेक्षित आहे. कारण कमांडोचे काम गुप्त कारवाया करून अतिरेक्यांना कंठस्नान  घालणे आणि BSF मदत करणे असले तरी BSF ऑफिसरच्या इतर आज्ञा पाळण्यास तो बांधील नाही. त्यामुळे तो सरळ तिथून निघून आपल्या खोलीत निघून जातो.  

पण त्याच्यासमोर वेगळेच ताट वाढून ठेवलेले आहे.

ती स्त्री आपली पार्श्वभूमी काही केल्या चौहानला सांगत नाही.... किंबहुना ती तोंड उघडायलाच तयार  नाहीये..... ती बराच मोठा काळ कसल्यातरी 'शॉक' मध्ये आहे... तिची तब्येत कशी आहे हे पाहायला K5 तिला ठेवलेल्या खोलीत येतो. त्याला पाहून तिला आठवते की 'हाच आपली सुटका करणारा आहे' आणि ती कृतज्ञता व्यक्त करते. पण तो निघून गेल्यावर मात्र पुन्हा मूग गिळून गप्प बसते. चौहानच्या लक्षात येते की तिचा पुरुष जमातीवरचा विश्वास संपूर्णपणे उडाला आहे आणि K5 हा हिच्यासाठी देवदूत असल्यामुळे हिचा फक्त त्याच्यावर विश्वास आहे. तिला बोलते करायचे तर याला समोर उभे करणे गरजेचे आहे. म्हणून तो K5 ला गळ घालतो "कृपया या स्त्रीच्या भल्यासाठी मला मदत कर" पण K5 सांगतो "सर, आम्हाला अशा भावनिक गोष्टीत अडकण्याची परवानगी नाही.मला तुम्ही अशा कुठल्याही गोष्टीत अडकवून नका. आणि एकदा जर का मी यात लक्ष घालायचे ठरवले तर मग तुम्ही काहीही झाले तरी मला यातून बाहेर काढू शकणार नाही..... तुम्हाला फार जड जाईल ते...." कमांडोंना असेच प्रशिक्षण दिलेले असते की कोणत्याही भावनांना बळी पडणे त्यांना शक्यच  होऊ नये .... कोणी ओळख काढून देखील त्यांना असल्या गोष्टीत गुंतवू नये म्हणून त्यांची ओळख देखील इतकी गुप्त असते की अशोक समर्थ केवळ K5 या गुप्त नावाने ओळखला जात असतो... हे सारे असूनही चौहान K5 ला दादापुता करून तिच्यासमोर उभं करतो ते तिच्याकडून तिची आणि
पर्यायाने तिच्या सोबतच्या अतिरेक्यांची माहिती काढून घेण्यासाठी ..... त्यामागचे कारण स्पष्ट असते. चौहानला काहीही करून अतिरेक्यांची माहिती त्याच्या वरिष्ठांपर्यंत पोचवणे भाग असते.
त्यामुळे तो तिची काळजी करतोय असा कितीही भाव दाखवत असला तरी तिच्या वैयक्तिक 
पूर्वायुष्यात काय झाले याच्याची त्याला फारसे काही देणे घेणे नसते.

तिच्यावर गुदरलेल्या भीषण परिस्थितीची कल्पना आपल्याला येते तिने सांगितलेल्या  माहितीतून. लग्नानंतर नवऱ्यासोबत मुंबईला फिरायला  जुईली मानकर नावाच्या या तरुणीचं  आलेल्या हिंदू - मुस्लीम दंगलीत अडकणं, मुस्लीम टोळीच्या म्होरक्याने तिला पळवून नेणं, तिला एका godown मध्ये डांबून ठेऊन तिच्यावर
वारंवार बलात्कार करणं, त्यातूनच तिला मूल होणं, अतिरेक्यांच्या टोळीचं तिला तान्ह्या बाळासह
राजस्थान सीमेवर घेऊन जाऊन निर्दयीपणे वाट तुडवायला लावणं, यामध्ये तिचं आयुष्य  वावटळीतल्या पाचोळ्यासारखं दिशाहीन भोवंडत राहतं.

तिथून सुटका झाली तरी तिची परवड थांबलेली  नसते.

लष्करामार्फत मजल दरमजल करत सून सापडल्याचा संदेश जेव्हा तिच्या सासरी पोचवला जातो आणि तिला पोचवायची व्यवस्था करत आहोत असे कळवले जाते तेव्हा तिच्या वरच्या संकटा विषयी आणि त्यातून तिला झालेल्या अपत्याविषयी  कळल्याने त्यांचे चक्क  'No Thanks' वाले पत्र येते. इतकेच नव्हे तर इतकेच नव्हे तर आमदार असणारे तिचे सासरे आपले सगळे वजन वापरून  आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत संधान बांधून जुईलीची पाठवणी परस्पर महिला आधारगृहात करायचे आदेश काढायला लावतात. K5 ला हे कळते तेव्हा तो अतिशय व्यथित होतो. केवळ
अतिरेक्यांचे धागोदोरे शोधण्यापुरतेच तिला (आणि तिच्याकडून माहिती काढण्यासाठी पर्यायाने K5 ला) वापरून घेतल्याबद्दल विनय आपटेला सुनवायलाही कमी करत नाही. आणि आधी त्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आता त्याला या प्रकरणातून बाहेर काढणे चौहानला अवघड झालेले असते. चौहान "वरिष्ठांपुढे माझे हात बांधलेले आहेत" असे उत्तर देऊन जुईलीला मदत करण्यासाठी असमर्थ
असल्याचे सांगतो. शिवाय सुट्टीसाठी कोल्हापूरला घरी निघालेल्या K5लाच जुईलीला दिल्लीमधील
महिला आधारगृहामध्ये पोचवून मगच महाराष्ट्रात जाण्याची विनंती करतो पुन्हा एकदा हे भावनिक
प्रकरण गळ्यात येऊन पडल्याने K5 अस्वस्थ होतो. शेवटी एक कर्तव्य म्हणून जुईलीला घेऊन रेल्वे स्टेशनवर येतो, पण तिला दिल्लीला पोहोचते करण्याऐवजी सरळ मुंबईच्या गाडीत चढतो आणि तिला घेऊन थेट सावंतवाडीला तिच्या सासरी येऊन धडकतो.



सुनेला दरवाजात उभे राहिलेले पाहून सासरचे लोक स्तंभित होतात. जुईलीचे आयुष्य रुळावर आणण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून, K5 तिच्या सासऱ्यांना तिला पुन्हा विनंती करतो पण अपेक्षेप्रमाणे तेही हात झटकतात. आता मात्र K5 संतापतो आणि सासऱ्यांना बरेच काही सुनावतो. तिचा काहीही दोष नसताना तिने किती आणि का सहन करायचे असा प्रश्न विचारतो. सासरे निरुत्तर
होतात. पण आता काहीच होऊ शकणार नसते. जुईलीच्या नवऱ्याचे दुसरे लग्न ठरलेले असते. आता जुईलीला तिच्या बाळाशिवाय खऱ्या अर्थाने स्वतःचे अस कोणीही उरलेले नसते.... परिस्थिती
ओळखून जुईली बाहेर पडते. जुईलीला सासर परत मिळवून द्यायचे अशा निश्चयाने आलेला K5 सुद्धा नाईलाजाने जड पावलांनी निघतो.... बाहेर पडता पडता अशोक समर्थ थबकतो, काही एक विचार
करतो आणि सावकाशपणे आणि विचारतो "घरी माझी आई आहे, स्वतःची थोडी शेती आहे. माझ्याशी लग्न करशील?" ती काहीच बोलत नाही पण तरीही मूकपणे त्याच्यासोबत चालू लागते आणि सिनेमा संपतो .....
  
अनंत सामंतांच्या ‘K5’ या कादंबरीवरचा हा सिनेमा. एक स्त्री काहीही संबंध नसताना,  चूक नसताना कशी होरपळते आणि तिची सदोदित परवडच कशी होत जाते याचे हे व्यथित करणारे
चित्रण. कुठेही melodramatic न होऊ देता केलेली संयत हाताळणी हे या सिनेमाचे बलस्थान. त्याचे श्रेय दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांना द्यायला हवे. विशेषतः शेवटचे  K5 चे सासऱ्याची कानउघडणी करण्याचे दृश्य तर आक्रस्ताळे आणि melodramatic होऊ शकले असते, पण अशोक समर्थचा मुळातलाच खर्जातला जबरदस्त प्रभावी आवाज आणि काहीही झाले तरी K5 हा घरात
आलेला आगंतुक आहे याचे दिग्दर्शकाने ठेवलेले भान यामुळे संपूर्ण प्रसंगाचा 'टोन' खालचा ठेऊन देखील K5 चे बोलणे अतिशय प्रभावी ठरते. 

संपूर्ण सिनेमामध्ये बलात्कारी अतिरेकी (मुकेश तिवारी) वगळता इतर कोणतेही पात्र थेट वाईट किंवा खलनायकी म्हणून येत नाही. चांगला आणि वाईट या रंगाच्या मधली असणारी, पात्रांना 'ग्रे' शेडमध्ये वागवणारी तात्कालिक परिस्थिती किंवा नियती ही देखील अनेक वेळा प्रभावी ठरत असते
हेच यातून जाणवत राहते. याची दोन उदाहरणे आहेत. पहिले उदाहरण पुन्हा वर उल्लेखलेल्या प्रसंगाचेच द्यावे लागेल. तोपर्यंत जुईलीची सुधारगृहात पाठवणीची  व्यवस्था करून तिला नाकारणारे  सासरचे लोक हे आपल्या दृष्टीने दुष्ट-निर्दयी वगैरे झालेले असतात. पण शेवटच्या प्रसंगात मात्र
त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आणि पूर्वग्रह काहीसा बदलतो. एका स्त्रीची वेदना 
जाणवून अकृत्रिमपणे हळवी होणारी जुईलीची सासू आणि बोलण्याची इच्छा असूनही पुढे येऊन न बोलता केवळ मूकपणे आणि अस्वस्थपणे जुईलीकडे पाहणारा तिचा नवरा यांना पाहिले की ते परिस्थितीला शरण जाणारे, अप्रिय सत्याला उंबऱ्याबाहेर ठेवून सोयीस्कर आडोसा शोधणारे मर्त्य मानव वाटायला लागतात. 
एखाद्या पात्राला सरसकट वाईट न ठरवता त्यावर प्रेक्षकाला फेरविचार करायला भाग पाडणारं दुसरे उदाहरण कमांडर चौहान. BSF च्या Headquarters मधून K5 जुईलीला घेऊन पोहोचवण्यास निघतो तेव्हा वाटेत त्यांना गाठून निरोप  द्यायला चौहान स्वतः येतो. सुरुवातीपासून कर्तव्य कठोर असणारा,  अतिरेक्यांचा माग काढेपर्यंत जुईलीशी आपुलकीने वागून नंतर मात्र तिला तिच्या सासरी नेऊन सोडण्याची जबाबदारी घेण्याऐवजी सरळ "वरिष्ठांच्या आदेशानुसार तिला महिला आधारगृहात पाठवायला लागेल" असे सांगून हात झटकणारा 'कमांडर' चौहान या ठिकाणी जुईलीच्या बाळासाठी खेळणी भेट देताना आणि एखाद्या बापासारखा हळवा होऊन जुईलीला निरोप देताना डोळ्याच्या कडा पुसताना दिसतो. हा प्रसंग खरोखरच touching झाला आहे. माझ्या मते संपूर्ण चित्रपटातला हा सर्वोत्कृष्ट प्रसंग आहे.

अभिनयाच्या बाबतीत अशोक समर्थ नेहमीप्रमाणेच दमदार आहे. तगड्या व्यक्तिमत्वाचा, थंड रक्ताचा, मिळालेल्या प्रशिक्षणानुसार कोणत्याही भावनिक गुंत्यात न अडकणारा, पण अखेरीस जुईलीची फरफट पाहून अस्वस्थ होऊन तिला तिचे पूर्वायुष्य परत मिळवून देण्यासाठी सूत्र हातात घेऊ पाहणारा कमांडो त्याने सुरेख साकारलाय. विनय आपटे आणि अशोक समर्थ या
दोघांमधल्या शाब्दिक चकमकी लक्षात राहण्यासारख्या झाल्या आहेत आणि या दोन्ही अभिनेत्यांची  क्षमता पूर्णपणे दाखवून देणाऱ्या असल्यामुळे समाधान देणाऱ्या आहेत. फक्त विनय आपटेचे सुटलेले  पोट पाहून मात्र हा असा पेटू माणूस BSF मध्ये ऑफिसर कसा असेल असा प्रश्न मला छळत
होता. तेजस्विनी पंडितला 'सिंधुताई सपकाळ' सोबतच याही सिनेमामध्ये हेवा वाटावा अशी भूमिका मिळाली आहे. अतिरेक्यांच्या कळपासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फरफटत
जाणारी, त्यांच्याकडून वारंवार उपभोगली गेल्याने दगडासारखी सुन्न-बधीर झालेली आणि तरीही बाळावर माया करणारी स्त्री तिने समर्थपणे रंगवली आहे. जुईलीला कित्येक महिने एका godown मध्ये बंदिस्त करून तिला कायम अर्धनग्नच ठेवणारा, तिच्यावर वारंवार बलात्कार करणारा विकृत उलट्या काळजाचा नराधम मुकेश तिवारीने जबरदस्त साकारला आहे. सुऱ्याच्या धारदार पात्याने 
जुईलीचे तळपाय उकरण्याचा प्रसंग शहारे आणतो. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही, पण मी एके ठिकाणी वाचलेल्या परीक्षणानुसार मूळ कादंबरीत तिच्यावरच्या अत्याचाराची याहून भयानक वर्णने आहेत. कदाचित मराठी प्रेक्षकाची प्रकृती-प्रवृत्ती आणि मर्यादा लक्षात घेऊन दिग्दर्शक शिवाजी पाटील
यांनी हे प्रसंग थोडक्यात उरकले असावेत. दंगलीचे दृश्य देखील सपक वाटते. अर्थात या त्रुटी माफक आहेत. सुरुवातीला दाखवलेली कमांडो कारवाई दमदार आहे. संपूर्ण चित्रपट प्रभावीपणे
उभा करण्यामध्ये छायाचित्रणाचादेखील वाटा आहे. मराठीत सिनेमा मध्ये यापूर्वी न आढळलेली
राजस्थानची रखरखीत पार्श्वभूमी, जुईलीच्या आयुष्यातल्या रखरखटाशी कळत नकळत खूप सुसंगत
ठरते.

सतत भोगत आलेली आणि वारा नेईल त्या दिशेला भेलकांडत राहणारी यातली स्त्री मला फक्त  कथानकापुरती मर्यादित वाटलीच नाही. कुठल्याही अप्रिय घटनेची परिणती अंतिमतः स्त्रीला दोषी
ठरवण्यात किंवा तिचे हक्क (अनेकदा जगण्याचा हक्कही) नाकारण्यात होते हे आदिकालापासून चालत आलेले आणि अजूनही रोज दिसत असलेले वास्तव मला या सिनेमातून पुन्हा अधोरेखित
झाल्यासारखे वाटले. थिएटर बाहेर पडत असताना अस्वस्थतेसोबतच एक चांगला सिनेमा पाहिल्याचे समाधान देखील वाटत होते. हा सिनेमा जर कधी पहायची संधी मिळाली तर आवर्जून बघा... आणि कसा वाटला ते मला नक्की कळवा.

Friday, December 23, 2011

अभिनव(निर्माण)परीक्षा ! (भाग २ )


मनसेच्या परीक्षांचा 'दै. सुकाळ'चा वृत्तांत वाचल्यापासून प्रश्नपत्रिका आणि निकाल याबद्दल मला विलक्षण उत्सुकता लागून राहिली होती. भेळवाल्याकडे ५ डिसेम्बर नंतरचे कागद न मिळाल्यामुळे मी निराश झालो होतो हे तुम्हाला सांगितलेच आहे. पुढचे काही दिवस तसेच गेले. आठवडाभराने पुन्हा भेळवाल्याकडे चक्कर मारली पण काही उपयोग झाला नाही. आता मात्र मला राहवेना.  मी अगदीच मनावर घेतली ही गोष्ट आणि एके दिवशी संध्याकाळी थेट 'दै. सुकाळ'चे कार्यालय गाठले. कार्यालय छोटेच होते. तिथे जाऊन थेट संपादक श्री. पिंपळकर यांनाच गाठले. आपल्या वर्तमानपत्राचा वाचक अस्तित्वात आहे आणि तो उत्सुकतेने पुढच्या बातमीसाठी आपल्याकडे आला आहे हे पाहून त्यांना हर्षवायू व्हायचाच बाकी होता. त्यांनी मला हाताला धरून बाहेर बागेत नेले. तिथे त्यांच्या एका शिपायाने शेकोटीची तयारी करून ठेवली होती आणि काटक्या ,लाकडे कमी असल्यामुळे 'दै' सुकाळ'चे काही अंक 'अग्नये स्वाहा' करण्यासाठी तयार ठेवले होते (निकालाचा वृत्तांत असणारा अंक इतका स्फोटक आहे की शेकोटीला रॉकेलची गरज नाही - इति श्री. पिंपळकर). श्री. पिंपळकरांनी त्यातले काही पेपर घाईघाईने उपसले आणि 'दै.सुकाळ' चा  २० तारखेचा अंक माझ्या हातात ठेवला.

दै. सुकाळ
विशेष प्रतिनिधीकडून : ता. २० डिसेम्बर

४ डिसेम्बर रोजी पार पडलेल्या मनसेच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेबद्दल बरीच गुप्तता पाळली गेली होती आणि उमेदवारांनाही त्याबद्दल कुठेही अवाक्षर न उच्चारण्याची तंबी देण्यात आली होती हे आम्ही आपणास सांगितले आहेच. परंतु आमच्या वार्ताहराने शोधपत्रकारिता करून अखेर प्रश्नपत्रिका आणि एका परीक्षार्थीने लिहिलेली उत्तरपत्रिका शिताफीने हस्तगत केली. त्यापैकी काही वेचक प्रश्न आणि चित्तवेधक उत्तरे इथे देत आहोत.

काही प्रश्न महापालिकेच्या कामकाजाबाबत विचारण्यात आले होते
प्र. 'तहकूब'  ही संकल्पना  उदाहरणासह स्पष्ट करा
उ. आपला वकूब ओळखून केलेला तह म्हणजे 'तहकूब' उदा. उल्हासनगर मध्ये मनसेने शिवसेनेशी केलेली दोस्ती.

प्र. गणसंख्या म्हणजे काय आणि त्याच्या अभावी कामकाजावर काय परिणाम होतो ?
उ. गेल्या आठवड्यात आपल्या वार्डातल्या वाहतूक नवनिर्माण सेनेच्या फलक अनावरण प्रसंगी ठेवलेल्या भाषणाला पुरेसा प्रेक्षकगण हजर नसल्यामुळे तो कार्यक्रम १५ मिनिटात आवरता घेतला होता

राज ठाकरेंना चित्रपटात विशेष इंटरेस्ट असल्यामुळे त्यासंबंधीही  काही प्रश्न होते  

प्र. 'गांधी' चित्रपटाची २ वैशिष्ट्ये लिहा
उ.  (१)  हा चित्रपट महात्मा गांधींवर आहे
(२) 'चार दिवस सासूचे'मध्ये दाखवलेल्या 'सासू ते आजेसासू' या प्रवासाइतकाच 'तरुण कस्तुरबा ते वृद्ध कस्तुरबा' हा प्रवास त्या नटीने समर्थपणे उभा केला आहे.
(वरील उत्तरामुळे प्रस्तुत परीक्षार्थी पुरुष नसून स्त्री असा प्रस्तुत प्रतिनिधीचा देखील गैरसमज झाला होता. परंतु आधी चौकशीअंती हे कळले की तो पुरुषच आहे, त्याच्या घरी आई, बहीण व पत्नी अशा ३ स्त्रिया आहेत, LCD TV आहे आणि  अचानकपणे जाणीपूर्वक घराबाहेर पडून त्याने पक्षकार्य सुरु केले आहे)

प्र. लोकांच्या अडीअडचणीला धावून/लोंबून जाणाऱ्या spiderman चे खरे नाव काय असते ?
उ. इथे नावाचा घोळ होऊन ‘पीटर पार्कर' ऐवजी 'शिरीष पारकर' असे लिहिले होते.    

काही प्रश्न ‘मनसे’संबंधी देखील होते:    

प्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना कधी व का झाली ?
उ. राजसाहेब शिवसेनेतून बाहेर पडल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली कारण विठ्ठलाला बडव्यांनी घेरले होते

प्र.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनेवेळी उद्दिष्टे काय होती ?
उ. शेतकऱ्याला जीन्स T shirt मध्ये tractor वर बसवणे, यू.पी. / बिहारींना विरोध करणे, रेल्वे मध्ये स्त्रियांच्या डब्यात छेड छाड रोखण्यासाठी मनसैनिकांचे  पथक ठेवणे.

काही प्रश्न सांस्कृतिकदेखील होते. 

प्र. तुमचा आवडता सण कोणता आणि त्यातून तुम्ही महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन कसे घडवता ते थोडक्यात लिहा.
उ. दसरा हा माझा आवडता सण आहे . त्या दिवशी रावण दहनाच्या वेळेस महाराष्ट्र-शत्रूंचे (आणि राज साहेबांच्या शत्रूंचे ) फोटो रावणाचे एकेक तोंड म्हणून लावतो. उदा. अबू आझमी, कृपाशंकर, अमिताभ बच्चन, संजय निरूपम इ. (पुढच्या वर्षी अजितदादाचा पण लावणारे.... आमच्या साहेबांचे बापजादे काढतो काय ?)

खरेतर असे बरेच प्रश्न विचारण्यात आले होते परंतु जागेअभावी नमुन्यादाखल केवळ निवडक प्रश्न या उत्तरेच आम्ही इथे देऊ शकत आहोत. अशा रीतीने आम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे आम्ही प्रश्नपत्रिका सदर केलीच आहे पण त्याच बरोबर परीक्षेच्या निकालाची बित्तमबातमी देखील मिळवली आहे.  

४ डिसेम्बरला  पार पडलेल्या 'मनसे'च्या उमेदवार परीक्षेच्या निकालांनंतर उमेदवारांच्या मुलाखती होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांचा (आणि त्याबरोबरच तुम्हा वाचकांचा) जीव टांगणीला लागल्याचे जाणवत आहे. बरेच दिवस झाले तरी अजून निकाल जाहीर होत नसल्याचे पाहून हळूहळू कुजबुजीला सुरुवात झाली आहे, आणि म्हणूनच ‘दै.सुकाळ’ने नक्की पडद्यामागे काय चालू आहे ('वाचकांचे प्रबोधन हेच आमचे धन' या आमच्या तत्वाला जागून)  याचा सुगावा घेण्याचे ठरवले. अधिक खोलात जाऊन तपास केला असता बऱ्याच धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या आहेत. परीक्षांचे निकाल केव्हाच तयार आहेत आणि निकालावरून असे वाटते आहे की राज ठाकरेंना या निवडणुकीत बहुतांश प्रभाग 'ऑप्शन' ला टाकावे लागतील. अनेक लोकांना पास होण्यातही अपयश आले आहे.  मुंबईमध्ये तर काही विद्यमान नगरसेवकांना काठावर देखील पास होता आलेले नाही. त्यामुळे आता या 'विद्यार्थ्यां'ना ATKT ची परवानगी द्यावी अशी मागणी दबक्या आवाजात केली जाऊ लागली आहे.  सर्वात धक्कादायक निकाल तर मनसेच्या मुंबईतल्या एका शक्तिशाली नेत्याचा लागला आहे. आपण पास होऊन पहिले येऊ अशा भ्रमात असणाऱ्या या नेत्याला तर चक्क नापास व्हावे लागले आहे.  याची कुणकुण प्रस्तुत प्रतिनिधीला लागताच त्याने या नेत्याला गाठले. सर्वप्रथम त्याने हे वृत्त सपशेल खोटे असल्याचे सांगितले. पण जेव्हा प्रस्तुत प्रतिनिधीने त्याचा पेपर पुढ्यात ठेवला तेव्हा मात्र त्याचा पवित्रा अचानक बदलला आणि अत्यंत उद्विग्न अवस्थेत त्याने 'दै. सुकाळ' कडे आपले मन मोकळे केले. जे घडले ते असे :
परीक्षेच्या केवळ २ दिवस आधी बिहारी सामोसेवाल्यांच्या  विरोधातल्या आंदोलनात तोडफोड करताना या नेत्याच्या हात petromax ची बत्ती पडून भाजला .... त्यामुळे परीक्षेला कसे बसणार, असा प्रश्न उभा राहिला. तेव्हा त्याने 'रायटर' ची विनंती केली आणि ती मिळालीसुद्धा. प्रत्यक्ष परीक्षेत उपयुक्त ठरेल अशा एका जाणकार रायटरची या नेत्याने स्वतःच setting लावून निवड केली ("पक्षाच्या आदेशावरूनच केलेल्या आंदोलनात मला दुखापत झाली. मग परीक्षेत उत्तरे लिहून काढण्यासोबत उत्तरे सुचवण्यासाठीही रायटरची 'थोडीशी' मदत घेतली तर बिघडले कुठे" - इति  नेता) आणि प्रत्यक्ष परीक्षेत रायटरची मदत  (लेखणी आणि डोके दोन्ही प्रकारे)  घेऊन पेपर संपवला आणि निश्चिंत मनाने घरी गेला. पण निकालाची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. शेवटी आपली ओळख वापरून त्याने स्वत: लिहिलेला पेपर मिळवला, आणि बघतो तर काय , महाशय नापास झाले होते. अक्षरशः deposite जप्त व्हावे इतके कमी मार्क मिळाले होते. न येणारी उत्तरे सांगणे दूरच, पण नेतामहाशयांनी  सांगितलेली उत्तरेसुद्धा रायटरने चुकवली किंवा लिहिलीच नाहीत. प्रस्तुत प्रतिनिधीने बराच वेळ खोदून खोदून विचारूनही रायटर कोण याचा थांगपत्ता या नेत्याने लागू दिला नाही. परंतु अखेरीस मात्र त्यांच्या मनातली खदखद बाहेर आलीच. "माझेच चुकले. याला रायटर म्हणून घेणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. या राजूने तिकडे खुद्द अण्णांचा ब्लॉग लिहिताना घोळ घातला. जिथे अण्णांनी सांगितलेले जसेच्या तसे लिहिले जाते याची ग्यारंटी नाही, तिथे मी सांगितलेले लिहिले जाईलच याचा भरवसा कोणी कसा द्यावा ?? काहीतरी करायला पाहिजे " असे हा नेता मुठी वळत म्हणाला.

अशाप्रकारे निकालाचे घोळात घोळ असल्यामुळे खरा निकाल जाहीर होईलच याचा भरवसा नाही. परंतु  'दै. सुकाळ'च्या वाचकांपर्यंत सत्य अखेर पोहोचलेच आहे. तेव्हा यथावकाश निकाल काहीही जाहीर झाला तरीही खरा निकाल काय आहे ते आपल्या ध्यानात राहिलंच. 


सगळा मजकूर मी एका दमात वाचून काढला आणि 'दै. सुकाळ'च्या प्रबोधनाच्या ध्यासाने भारावून गेलो. श्री. पिंपळकरांसारखे प्रबोधनमहर्षी आणि जीव धोक्यात घालून त्यांच्या प्रबोधन कार्यात वाट उचलणारे धाडसी वार्ताहर आपल्या पुण्यात आहेत हे आपले अहोभाग्यच. कृतज्ञतेने सद्गदित होऊन माझ्या डोळ्यात पाणी आले.  अखेर काही मिनिटांनी साक्षात श्री. पिंपळकरांनी पाठीवरून मायेने हात फिरवून मला सावरले आणि तेही सद्गदित होऊन आत निघून गेले . प्रबोधनाचा अतुल्य नमुना असणारे ते वार्तापत्र कायमचे घरात जपून ठेवावे म्हणून मी इकडे तिकडे ते वर्तमानपत्र शोधू लागलो आणि हाय रे कर्मा ! समोरची शेकोटी धडाडून पेटलेली दिसली. शिपायाने वाढती थंडी असह्य होऊन त्या अंकाचीच आहुती वाहून ती शेकोटी पेटवली होती. ज्या पुण्यात श्री. पिंपळकरांसारखे प्रबोधनमहर्षी आहेत त्याच पुण्यात त्यांच्या शिपायाइतके कोरडे , निर्विकार पाषाणही आहेत हे पाहून मला अतीव दु:ख झाले.  मनसेच्या निकालाचे 'आतले'  वृत्त देणारा शेवटचा अंक आता इच्छा असूनही मी तुम्हाला दाखवू शकत नाही .....  क्षमस्व !




Thursday, December 22, 2011

अभिनव(निर्माण)परीक्षा !

नुकताच मनसेच्या उमेदवार परीक्षांचा सोहळा पार पडला. त्याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती. परंतु अनेक मराठी पेपरांमधून या विषयीचे म्हणावे तसे सविस्तर 'Coverage' घेतले गेले नाही म्हणून मी थोडा नाखूषच होतो. असे असताना अचानक एके दिवशी 'बालगंधर्व'च्या मागच्या पुलावर खात असलेली भेळ संपल्यावर सहज म्हणून खालचा कागद वाचला तर त्यामध्ये या परीक्षांचे सविस्तर वृत्त दिसले. कुतूहलाने पेपरचे नाव वाचले आणि बातमीच्या विश्वासार्हते विषयीच्या सगळ्या शंका फिटल्या.   'दै. सुकाळ' (ओंकारेश्वर, मोतीबाग, रमणबाग या पट्ट्यातले सर्वाधिक खपाचे एकमेव निर्भीड दैनिक)  मधल्या मजकुरा विषयी शंका घेणे वेडेपणाच ठरला असता.  परीक्षा पार पडल्याचे वृत्त छापून आल्यापासून केवळ  एका आठवड्यात पेपर  भेळवाल्याकडे  (व्हाया रद्दीवाला) पोचला म्हणून काही नतद्रष्ट हसतीलाही, परंतु प्रत्येक पुणेकराच्या प्रबोधनाचा वसा हाती घेतलेल्या श्री. म. वि. पिंपळकर यांचाच हा पेपर असून श्री. पिंपळकर न खपलेल्या पेपरची जाणीवपूर्वक लवकरात लवकर रद्दी घालून रद्दीवाले व भेळवाले यांच्या पर्यंत सर्व बातम्या फार शिळ्या होण्याच्या आत पोचवून त्यांचे प्रबोधनच घडवत असतात हे त्या कुत्सित नतद्रष्टांना कसे कळावे.
असो. दै. सुकाळ' मधले वृत्त जसेच्या तसे देत आहे. तुमचेही प्रबोधन होईलच.

 'दै. सुकाळ'
ठिकठिकाणच्या विशेष
प्रतिनिधींकडून : ता - ४ डिसेम्बर

संपूर्ण राजकीय विश्वात उत्सुकतेचा विषय बनून राहिलेल्या 'मनसे'च्या उमेदवार परीक्षा अखेर येऊन ठेपल्या आहेत.  खरेतर राज ठाकरे यांनी परीक्षांची घोषणा केल्यापासून ठिकठिकाणच्या इच्छुकांचे दणाणलेले धाबे गेले बरेच दिवस ऐकू येत होते. पण 'आले साहेबांच्या मना तेथे कोणाचे चालेना' या उक्तीनुसार इच्छुक नाइलाजाने तयारीला लागले होते. अभ्यास, ट्रेनिंग वगैरे ला सुरुवात केली होती. ठिकठिकाणच्या मधुशालांमधील संख्या रोडावून रात्रशाळांची आणि रात्रकॉलेजेसची  उपस्थिती वाढली होती. काही ठिकाणी इच्छुकांच्या आग्रहावरून मराठी, विज्ञान, गणित अशा निरुपयोगी विषयांचे अभ्यासक्रम वगळून 'नागरिकशास्त्र' या अनुसूचित जमातीत मोडणाऱ्या विषयाचे ३-३ पेपर अभ्यासक्रमात 'लावले' गेले असल्याचे सुखद दृश्य दिसत होते. बस, लोकल मध्ये याच विषयाचा बोलबाला होता. इतकेच काय तर सक्काळी सक्काळी रेल्वेलाईनच्या कडेने देखील आम 'पब्लिक' नेहमीप्रमाणे निरीक्षणात किंवा शिळोप्याच्या गप्पांमध्ये गुंग न होता पालिकेच्या सर्वसाधारण सभा असल्यागत गंभीरपणे चर्चा करत असल्याचे दिसून येत होते.

मनसेच्या मुंबई उपनगरातील एका प्रभाग अध्यक्षाने 'कौन बनेगा उमेदवार' असा 'गेम शो' आयोजित केला होता. (पहिला येणाऱ्यास पालिका सभागृहात एक आठवडा पट्टेवाल्याचे काम (इंटर्नशिप !!!) करण्याची आणि त्यानिमित्ताने  पालिकेचा कारभार, विरोधकांचे सभात्याग, घोषणाबाजी इत्यादीचा समक्ष अनुभव घेण्याची संधी !!).  पुण्यातल्या एका पदाधिकाऱ्याने तर एक पाऊल आणखी पुढे टाकत केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण याचा अभिनव अनुभव देण्यासाठी ३ दिवसांचा 'पालिका कामकाज Crash Course ' तयार केला होता. (प्रस्तुत नगरसेवकाचे महिलांसाठी Driving , पुरुषांसाठी Cooking , म्हाताऱ्या माणसांसाठी हास्ययोग, ट्राफिक पोलिसांना शिट्ट्या फुंकण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी प्राणायाम वर्ग इ. अनेक प्रशिक्षण वर्ग विलक्षण लोकप्रिय झाल्याचे वाचकांच्या लक्षात असेलच). या  Crash Courseचा हेतू कौतुकास्पद होता. परंतु
त्या पदाधिकाऱ्याच्या प्रभागातल्या प्रशिक्षण देण्यासाठी नेमलेल्या 'कार्यकर्त्यां'नी पालिकेचे कामकाज कसे चालवावे याचा Crash Course शिकवण्या ऐवजी गैरसमजुतीने पालिकेचे कामकाज कसे Crash करावे याचाच Course शिकवला (ज्यामध्ये राजदंड पळवून कमीत कमी श्रम करून भालाफेकीसारखा जास्तीत जास्त दूरवर पोचवणे,  सभापतींचा चष्मा सफाईने पळवून मंजुरीसाठी त्यांच्यासमोर आलेल्या प्रस्तावावर सह्या करण्याची गोची करून ठेवणे, मनसे नगरसेवकाने लक्षवेधी सूचना मांडल्यास ढोल वाजवल्यागत बाके कशी वाजवावीत वगैरे महत्वाच्या प्रशिक्षणावर भर दिला गेला होता. )

जसजसा परीक्षेचा दिवस जवळ येत गेला तसेतसे अनेक विद्यमान नगरसेवक परीक्षा (आणि नंतर येणारी नामुष्की) टाळण्यासाठी प्रयत्न करत होते. एकाने तर थेट 'कृष्णकुंज'वर जाऊन राजसाहेबांना मस्का मारण्याइतके धाडसही केले. परंतु 'गरज पडल्यास मीही परीक्षा देईन' असे बाणेदार उत्तर साहेबांनी दिल्यामुळे प्रस्तुत नगरसेवकाला निराशा (आणि ' नक्की कुणाला गरज पडली तर ?' हा बाणेदार प्रश्न) मनात घेऊनच परतावे लागले होते असे त्याच्या संपर्क-प्रमुखाने नाव न छापण्याच्या अटीवर 'दै. सुकाळ' ला सांगितले.


एकुणातच संदिग्धता आणि उत्साह यांच्या संमिश्र वातावरणात अखेर आज परीक्षा येऊन ठेपल्या आहेत.

या परीक्षेचे सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात.

 मी उत्सुकतेने भेळवाल्याकडे आणखी एक भेळ मागितली आणि कशीबशी संपवून कागद वाचला तर ती 'दै. सुकाळ'ची दशक्रिया वृत्तविशेष पुरवणी ('ओंकारेश्वर प्रसन्न' ) निघाली. छ्या , मी तर निराश झालो आणि तितक्यात  मला माझा भोटपणा लक्षात आला - 'पुढची भेळ बरोबर पुढच्या दिवशीच्या पेपरमध्ये बांधून कशी काय मिळेल'  असा प्रश्न स्वतःलाच विचारला आणि निमूटपणे भेळवाल्याचे कागद चाळू लागलो.
भेळवाल्याने चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पहिले (आणि 'लगे हाथ' माझ्या कपाळावर विशिष्ट अक्षरे दिसत आहेत का, हेही पाहून घेतले ). शेवटी मी म्हणालो "दादा , पेपर हवाय एक जरा .... हा मिळाला " आणि मी लगोलग तो कागद उपसला कारण तो 'दै. सुकाळ'चा ५ तारखेचा कागद होता.  मी उत्सुकतेने स्वतःचे प्रबोधन पुढे सुरु ठेवले.

 'दै. सुकाळ'
ठिकठिकाणच्या विशेष
प्रतिनिधींकडून : ता - ५ डिसेम्बर

'मनसे'च्या बहुप्रतीक्षित उमेदवार परीक्षा आज सर्व केंद्रात विलक्षण उत्साहात पार पडल्या. दुपारी पेपर संपल्याची घंटा वाजताच शेकडो केंद्रांवरून सुटलेल्या निःश्वासांनी वातावरण भारून गेले होते. (यामध्ये निःश्वास किती आणि सुस्कारे किती याची आकडेवारी उपलब्ध नाही. पण निकालानंतर ते कळेलच) आजचा दिवस एकूणच अनेकविध घडामोडींनी आणि मोडतोडीने भरलेला पहावयास मिळाला. मुंबईच्या एका  उपनगरातील केंद्रावर देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका हिंदीत असल्याचे आढळून आल्याने एकाच खळबळ माजली.  परीक्षार्थींना आपण मनसैनिक असल्याची खडबडून जाणीव झाली आणि प्रचंड गदारोळ सुरु झाला. अनायसे परीक्षेसाठी सगळ्यांनी बॉल पेन आणलेलेच असल्याने त्याची शाई काढून पर्यवेक्षकालाच काळे फासण्यात आले आणि पेपरला पुरवण्या जोडण्यासाठी पर्यवेक्षकाने आणलेल्या Stapler चे त्याच्यावरच प्रयोग करण्यात येऊन सगळ्या प्रश्नपत्रिका त्याच्या shirt ला खालच्या बाजूला शेपटीसारख्या staple करण्यात आल्या. "या प्रकारचे महाराष्ट्र विरोधी कारस्थान आम्ही खपवून घेणार नसून यामागे उत्तर भारतीय नेत्यांचा हात आहे... ते भैय्यांना हळूच मनसे मध्ये प्रवेश करण्यासाठी पाठवून पक्ष खिळखिळा करण्याचा कट करत आहेत. म्हणूनच या हिंदी भाषिकांना मनसेत घुसण्यापासून रोखण्यासाठी ही परीक्षा आम्ही बंद पडत असून, आमच्या या जाज्ज्वल्य हिंदीविरोधी भूमिकेमुळे राज साहेबांनी आम्हाला उमेदवारी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत" असे या धुमश्चक्रीत  आघाडीवर असलेल्या एका परीक्षार्थीने दै. सुकाळच्या प्रतिनिधीस सांगितले.   

जसा अनेक ठिकाणी हा परीक्षा सोहळा उत्साहात पार पडला तसा काही ठिकाणी तो पा ssss र पडला असल्याचेही दिसून आले. एका केंद्रावर पेपर चालू असताना कॉपी चालू असल्याची कुणकुण लागताच ती रोखण्यासाठी 'राष्ट्रवादी'चे एक पथक केंद्रापाशी पोचले असता त्याअगोदरच तिथे पोचलेल्या शिवसैनिकांनी कॉपीबहाद्दरांना चौदावे रत्न दाखवले असल्याचे त्यांना दिसून आले. आपले काम परस्परच झाले म्हणून खुश व्हायचे कि आपला मुद्दा चोरला म्हणून दुःख करायचे असे बुचकळ्यातले भाव त्यांच्या राष्ट्रवादी चेहऱ्यावर दिसून येत होते.  दरम्यान या कॉपीविरोधी हिंसक आंदोलनाबाबत छेडले असता शिवसैनिकांच्या पथकाचे प्रमुख रामभाऊ ढेकळे यांनी  आवेशात सांगितले की , "कॉपी करणे बेकायदा आहे. हा कायदा मोडणाऱ्यांना शासन करण्यासाठी आम्हाला कायदा मोडावा लागला तरी .... तरी...(प्रयासाने शब्द आठवत)  बहात्तर", इतक्यात बाजूला उभ्या असलेल्या शाखाप्रमुख नाना तुरटे यांनी श्री. ढेकळेंना सावरत 'बेहत्तर' म्हणून वेळ निभावून नेली आणि आवेशात सूत्रे हातात घेतली. "हे कॉपी-कृत्य म्हणजे फसवणूक आहे याची या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना जाणीव करून देण्यासाठीच आम्ही त्यांना धडा शिकवला आहे. अर्थात जे स्वतःच शिवसेनाप्रमुखांची कॉपी करतात त्यांच्या पक्षाकडून काय अपेक्षा करणार म्हणा ! जय हिंद जय महाराष्ट्र !!"

पुण्यात सदाशिव पेठेतल्या एका केंद्रावर ३५ परीक्षार्थींची नावनोंदणी असूनही प्रत्यक्ष पेपरला कोणीही हजार न राहिल्याची आश्चर्यजनक घटना घडली. या विषयी आमच्या प्रतिनिधीने अधिक शोध घेतला असता पुढील माहिती कळली - त्या भागातल्या काही इच्छुकांनी नावनोंदणी केल्यावर 'पेपर कशा स्वरूपाचा असेल, पेपर द्यायला कुठे यावे लागेल' पृच्छा केली असता नोंदणी करणाऱ्याने बाहेरच्या लाकडी फळ्याकडे बोट दाखवले. 'परीक्षाकेंद्रावर पोचल्यावर कळेल परीक्षा काय आहे. उगाचच वायफळ चौकशा करू नयेत - हुकुमावरून' अशी सूचना होती. परंतु कुणा नतद्रष्टाने 'परीक्षाकेंद्रावर'  मधला 'प' खोडून टाकला असल्याने 'रीक्षाकेंद्रावर' असा शब्द शिल्लक राहिला होता. त्यामुळे सगळे इच्छुक परीक्षेच्या दिवशी सरळ रिक्षा stand वर गेले , (मागच्या महिन्यातले आंदोलन डोक्यात ताजेच असल्याने) रिक्षाचालकांना चोप दिला आणि हीच आपली परीक्षा (Theory ऐवजी Practical !!) होती असे समजून निर्धास्त होऊन घरी परतले. (रिक्षावाल्यांना बडवतानाचा फोटो पुरावा म्हणून स्वतःच्या मोबाईल मध्ये काढून घ्यायला ते विसरले नाहीत).


अशा रीतीने आजचा परीक्षेचा दिवस अतिशय धामधुमीचा गेला. अनेक इच्छुक महत्वाची कामे आटपून किंवा टाळून परीक्षेला हजर राहिली होती. काही जण कामावरून सुट्टी घेऊन तर काही जण आजारी असतानाही परीक्षा द्यायला आले होते  मुंबईत तर एक तरुण स्वतःचे लग्न आटोपून तसाच बायकोसह परीक्षेला आला होता ("नाते जुळण्याची संपली आज प्रतीक्षा, सीमाच्या साथीने देतो संसाराची 'मनसे' परीक्षा" - असा चतुर उखाणादेखील त्याने आमच्या प्रतिनिधीच्या आग्रहावरून घेतला). परीक्षेविषयी इच्छुकांची तळमळ पाहून खुद्द राज ठाकरे देखील भारावून गेले असून त्यांनी सर्वांना निकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


दरम्यान आजच्या पेपरमध्ये पालिकेच्या कामकाजाव्यतिरिक्त साहित्य-संस्कृती संबंधीचे प्रश्नदेखील विचारण्यात येणार होते असे कळते. परंतु पेपरमध्ये नक्की काय प्रश्न होते हे अजूनही कळलेले नसून त्याविषयी बरीच गुप्तता पाळली जात आहे.  परंतु वाचक प्रबोधनाचा वसा हाती घेतलेला 'दै. सुकाळ' हे पेपर मिळवण्यासाठी कटिबद्ध असून लवकरच ते २-३ दिवसातच उपलब्ध होतील असे आम्ही खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. 


इथे बातमी संपली . मालिका महत्वाच्या टप्प्यावर असताना अचानक एपिसोड संपतो आणि आपल्याला उत्कंठा तशीच ताणून धरावी लागते, तशी माझी गत  झाली.  आता मात्र मी इरेला पेटलो. उरले सुरले सगळे पेपर  भेळवाल्याच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत उपसले पण यापुढे मात्र एकही कामाचा चिठोरा मिळाला नाही. श्या : !!! मनसेचे पेपर कसे होते आणि निकाल लागला हे मात्र आता कधी कळेल कुणास ठाऊक .