Total Pageviews

Friday, December 23, 2011

अभिनव(निर्माण)परीक्षा ! (भाग २ )


मनसेच्या परीक्षांचा 'दै. सुकाळ'चा वृत्तांत वाचल्यापासून प्रश्नपत्रिका आणि निकाल याबद्दल मला विलक्षण उत्सुकता लागून राहिली होती. भेळवाल्याकडे ५ डिसेम्बर नंतरचे कागद न मिळाल्यामुळे मी निराश झालो होतो हे तुम्हाला सांगितलेच आहे. पुढचे काही दिवस तसेच गेले. आठवडाभराने पुन्हा भेळवाल्याकडे चक्कर मारली पण काही उपयोग झाला नाही. आता मात्र मला राहवेना.  मी अगदीच मनावर घेतली ही गोष्ट आणि एके दिवशी संध्याकाळी थेट 'दै. सुकाळ'चे कार्यालय गाठले. कार्यालय छोटेच होते. तिथे जाऊन थेट संपादक श्री. पिंपळकर यांनाच गाठले. आपल्या वर्तमानपत्राचा वाचक अस्तित्वात आहे आणि तो उत्सुकतेने पुढच्या बातमीसाठी आपल्याकडे आला आहे हे पाहून त्यांना हर्षवायू व्हायचाच बाकी होता. त्यांनी मला हाताला धरून बाहेर बागेत नेले. तिथे त्यांच्या एका शिपायाने शेकोटीची तयारी करून ठेवली होती आणि काटक्या ,लाकडे कमी असल्यामुळे 'दै' सुकाळ'चे काही अंक 'अग्नये स्वाहा' करण्यासाठी तयार ठेवले होते (निकालाचा वृत्तांत असणारा अंक इतका स्फोटक आहे की शेकोटीला रॉकेलची गरज नाही - इति श्री. पिंपळकर). श्री. पिंपळकरांनी त्यातले काही पेपर घाईघाईने उपसले आणि 'दै.सुकाळ' चा  २० तारखेचा अंक माझ्या हातात ठेवला.

दै. सुकाळ
विशेष प्रतिनिधीकडून : ता. २० डिसेम्बर

४ डिसेम्बर रोजी पार पडलेल्या मनसेच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेबद्दल बरीच गुप्तता पाळली गेली होती आणि उमेदवारांनाही त्याबद्दल कुठेही अवाक्षर न उच्चारण्याची तंबी देण्यात आली होती हे आम्ही आपणास सांगितले आहेच. परंतु आमच्या वार्ताहराने शोधपत्रकारिता करून अखेर प्रश्नपत्रिका आणि एका परीक्षार्थीने लिहिलेली उत्तरपत्रिका शिताफीने हस्तगत केली. त्यापैकी काही वेचक प्रश्न आणि चित्तवेधक उत्तरे इथे देत आहोत.

काही प्रश्न महापालिकेच्या कामकाजाबाबत विचारण्यात आले होते
प्र. 'तहकूब'  ही संकल्पना  उदाहरणासह स्पष्ट करा
उ. आपला वकूब ओळखून केलेला तह म्हणजे 'तहकूब' उदा. उल्हासनगर मध्ये मनसेने शिवसेनेशी केलेली दोस्ती.

प्र. गणसंख्या म्हणजे काय आणि त्याच्या अभावी कामकाजावर काय परिणाम होतो ?
उ. गेल्या आठवड्यात आपल्या वार्डातल्या वाहतूक नवनिर्माण सेनेच्या फलक अनावरण प्रसंगी ठेवलेल्या भाषणाला पुरेसा प्रेक्षकगण हजर नसल्यामुळे तो कार्यक्रम १५ मिनिटात आवरता घेतला होता

राज ठाकरेंना चित्रपटात विशेष इंटरेस्ट असल्यामुळे त्यासंबंधीही  काही प्रश्न होते  

प्र. 'गांधी' चित्रपटाची २ वैशिष्ट्ये लिहा
उ.  (१)  हा चित्रपट महात्मा गांधींवर आहे
(२) 'चार दिवस सासूचे'मध्ये दाखवलेल्या 'सासू ते आजेसासू' या प्रवासाइतकाच 'तरुण कस्तुरबा ते वृद्ध कस्तुरबा' हा प्रवास त्या नटीने समर्थपणे उभा केला आहे.
(वरील उत्तरामुळे प्रस्तुत परीक्षार्थी पुरुष नसून स्त्री असा प्रस्तुत प्रतिनिधीचा देखील गैरसमज झाला होता. परंतु आधी चौकशीअंती हे कळले की तो पुरुषच आहे, त्याच्या घरी आई, बहीण व पत्नी अशा ३ स्त्रिया आहेत, LCD TV आहे आणि  अचानकपणे जाणीपूर्वक घराबाहेर पडून त्याने पक्षकार्य सुरु केले आहे)

प्र. लोकांच्या अडीअडचणीला धावून/लोंबून जाणाऱ्या spiderman चे खरे नाव काय असते ?
उ. इथे नावाचा घोळ होऊन ‘पीटर पार्कर' ऐवजी 'शिरीष पारकर' असे लिहिले होते.    

काही प्रश्न ‘मनसे’संबंधी देखील होते:    

प्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना कधी व का झाली ?
उ. राजसाहेब शिवसेनेतून बाहेर पडल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली कारण विठ्ठलाला बडव्यांनी घेरले होते

प्र.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनेवेळी उद्दिष्टे काय होती ?
उ. शेतकऱ्याला जीन्स T shirt मध्ये tractor वर बसवणे, यू.पी. / बिहारींना विरोध करणे, रेल्वे मध्ये स्त्रियांच्या डब्यात छेड छाड रोखण्यासाठी मनसैनिकांचे  पथक ठेवणे.

काही प्रश्न सांस्कृतिकदेखील होते. 

प्र. तुमचा आवडता सण कोणता आणि त्यातून तुम्ही महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन कसे घडवता ते थोडक्यात लिहा.
उ. दसरा हा माझा आवडता सण आहे . त्या दिवशी रावण दहनाच्या वेळेस महाराष्ट्र-शत्रूंचे (आणि राज साहेबांच्या शत्रूंचे ) फोटो रावणाचे एकेक तोंड म्हणून लावतो. उदा. अबू आझमी, कृपाशंकर, अमिताभ बच्चन, संजय निरूपम इ. (पुढच्या वर्षी अजितदादाचा पण लावणारे.... आमच्या साहेबांचे बापजादे काढतो काय ?)

खरेतर असे बरेच प्रश्न विचारण्यात आले होते परंतु जागेअभावी नमुन्यादाखल केवळ निवडक प्रश्न या उत्तरेच आम्ही इथे देऊ शकत आहोत. अशा रीतीने आम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे आम्ही प्रश्नपत्रिका सदर केलीच आहे पण त्याच बरोबर परीक्षेच्या निकालाची बित्तमबातमी देखील मिळवली आहे.  

४ डिसेम्बरला  पार पडलेल्या 'मनसे'च्या उमेदवार परीक्षेच्या निकालांनंतर उमेदवारांच्या मुलाखती होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांचा (आणि त्याबरोबरच तुम्हा वाचकांचा) जीव टांगणीला लागल्याचे जाणवत आहे. बरेच दिवस झाले तरी अजून निकाल जाहीर होत नसल्याचे पाहून हळूहळू कुजबुजीला सुरुवात झाली आहे, आणि म्हणूनच ‘दै.सुकाळ’ने नक्की पडद्यामागे काय चालू आहे ('वाचकांचे प्रबोधन हेच आमचे धन' या आमच्या तत्वाला जागून)  याचा सुगावा घेण्याचे ठरवले. अधिक खोलात जाऊन तपास केला असता बऱ्याच धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या आहेत. परीक्षांचे निकाल केव्हाच तयार आहेत आणि निकालावरून असे वाटते आहे की राज ठाकरेंना या निवडणुकीत बहुतांश प्रभाग 'ऑप्शन' ला टाकावे लागतील. अनेक लोकांना पास होण्यातही अपयश आले आहे.  मुंबईमध्ये तर काही विद्यमान नगरसेवकांना काठावर देखील पास होता आलेले नाही. त्यामुळे आता या 'विद्यार्थ्यां'ना ATKT ची परवानगी द्यावी अशी मागणी दबक्या आवाजात केली जाऊ लागली आहे.  सर्वात धक्कादायक निकाल तर मनसेच्या मुंबईतल्या एका शक्तिशाली नेत्याचा लागला आहे. आपण पास होऊन पहिले येऊ अशा भ्रमात असणाऱ्या या नेत्याला तर चक्क नापास व्हावे लागले आहे.  याची कुणकुण प्रस्तुत प्रतिनिधीला लागताच त्याने या नेत्याला गाठले. सर्वप्रथम त्याने हे वृत्त सपशेल खोटे असल्याचे सांगितले. पण जेव्हा प्रस्तुत प्रतिनिधीने त्याचा पेपर पुढ्यात ठेवला तेव्हा मात्र त्याचा पवित्रा अचानक बदलला आणि अत्यंत उद्विग्न अवस्थेत त्याने 'दै. सुकाळ' कडे आपले मन मोकळे केले. जे घडले ते असे :
परीक्षेच्या केवळ २ दिवस आधी बिहारी सामोसेवाल्यांच्या  विरोधातल्या आंदोलनात तोडफोड करताना या नेत्याच्या हात petromax ची बत्ती पडून भाजला .... त्यामुळे परीक्षेला कसे बसणार, असा प्रश्न उभा राहिला. तेव्हा त्याने 'रायटर' ची विनंती केली आणि ती मिळालीसुद्धा. प्रत्यक्ष परीक्षेत उपयुक्त ठरेल अशा एका जाणकार रायटरची या नेत्याने स्वतःच setting लावून निवड केली ("पक्षाच्या आदेशावरूनच केलेल्या आंदोलनात मला दुखापत झाली. मग परीक्षेत उत्तरे लिहून काढण्यासोबत उत्तरे सुचवण्यासाठीही रायटरची 'थोडीशी' मदत घेतली तर बिघडले कुठे" - इति  नेता) आणि प्रत्यक्ष परीक्षेत रायटरची मदत  (लेखणी आणि डोके दोन्ही प्रकारे)  घेऊन पेपर संपवला आणि निश्चिंत मनाने घरी गेला. पण निकालाची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. शेवटी आपली ओळख वापरून त्याने स्वत: लिहिलेला पेपर मिळवला, आणि बघतो तर काय , महाशय नापास झाले होते. अक्षरशः deposite जप्त व्हावे इतके कमी मार्क मिळाले होते. न येणारी उत्तरे सांगणे दूरच, पण नेतामहाशयांनी  सांगितलेली उत्तरेसुद्धा रायटरने चुकवली किंवा लिहिलीच नाहीत. प्रस्तुत प्रतिनिधीने बराच वेळ खोदून खोदून विचारूनही रायटर कोण याचा थांगपत्ता या नेत्याने लागू दिला नाही. परंतु अखेरीस मात्र त्यांच्या मनातली खदखद बाहेर आलीच. "माझेच चुकले. याला रायटर म्हणून घेणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. या राजूने तिकडे खुद्द अण्णांचा ब्लॉग लिहिताना घोळ घातला. जिथे अण्णांनी सांगितलेले जसेच्या तसे लिहिले जाते याची ग्यारंटी नाही, तिथे मी सांगितलेले लिहिले जाईलच याचा भरवसा कोणी कसा द्यावा ?? काहीतरी करायला पाहिजे " असे हा नेता मुठी वळत म्हणाला.

अशाप्रकारे निकालाचे घोळात घोळ असल्यामुळे खरा निकाल जाहीर होईलच याचा भरवसा नाही. परंतु  'दै. सुकाळ'च्या वाचकांपर्यंत सत्य अखेर पोहोचलेच आहे. तेव्हा यथावकाश निकाल काहीही जाहीर झाला तरीही खरा निकाल काय आहे ते आपल्या ध्यानात राहिलंच. 


सगळा मजकूर मी एका दमात वाचून काढला आणि 'दै. सुकाळ'च्या प्रबोधनाच्या ध्यासाने भारावून गेलो. श्री. पिंपळकरांसारखे प्रबोधनमहर्षी आणि जीव धोक्यात घालून त्यांच्या प्रबोधन कार्यात वाट उचलणारे धाडसी वार्ताहर आपल्या पुण्यात आहेत हे आपले अहोभाग्यच. कृतज्ञतेने सद्गदित होऊन माझ्या डोळ्यात पाणी आले.  अखेर काही मिनिटांनी साक्षात श्री. पिंपळकरांनी पाठीवरून मायेने हात फिरवून मला सावरले आणि तेही सद्गदित होऊन आत निघून गेले . प्रबोधनाचा अतुल्य नमुना असणारे ते वार्तापत्र कायमचे घरात जपून ठेवावे म्हणून मी इकडे तिकडे ते वर्तमानपत्र शोधू लागलो आणि हाय रे कर्मा ! समोरची शेकोटी धडाडून पेटलेली दिसली. शिपायाने वाढती थंडी असह्य होऊन त्या अंकाचीच आहुती वाहून ती शेकोटी पेटवली होती. ज्या पुण्यात श्री. पिंपळकरांसारखे प्रबोधनमहर्षी आहेत त्याच पुण्यात त्यांच्या शिपायाइतके कोरडे , निर्विकार पाषाणही आहेत हे पाहून मला अतीव दु:ख झाले.  मनसेच्या निकालाचे 'आतले'  वृत्त देणारा शेवटचा अंक आता इच्छा असूनही मी तुम्हाला दाखवू शकत नाही .....  क्षमस्व !




Thursday, December 22, 2011

अभिनव(निर्माण)परीक्षा !

नुकताच मनसेच्या उमेदवार परीक्षांचा सोहळा पार पडला. त्याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती. परंतु अनेक मराठी पेपरांमधून या विषयीचे म्हणावे तसे सविस्तर 'Coverage' घेतले गेले नाही म्हणून मी थोडा नाखूषच होतो. असे असताना अचानक एके दिवशी 'बालगंधर्व'च्या मागच्या पुलावर खात असलेली भेळ संपल्यावर सहज म्हणून खालचा कागद वाचला तर त्यामध्ये या परीक्षांचे सविस्तर वृत्त दिसले. कुतूहलाने पेपरचे नाव वाचले आणि बातमीच्या विश्वासार्हते विषयीच्या सगळ्या शंका फिटल्या.   'दै. सुकाळ' (ओंकारेश्वर, मोतीबाग, रमणबाग या पट्ट्यातले सर्वाधिक खपाचे एकमेव निर्भीड दैनिक)  मधल्या मजकुरा विषयी शंका घेणे वेडेपणाच ठरला असता.  परीक्षा पार पडल्याचे वृत्त छापून आल्यापासून केवळ  एका आठवड्यात पेपर  भेळवाल्याकडे  (व्हाया रद्दीवाला) पोचला म्हणून काही नतद्रष्ट हसतीलाही, परंतु प्रत्येक पुणेकराच्या प्रबोधनाचा वसा हाती घेतलेल्या श्री. म. वि. पिंपळकर यांचाच हा पेपर असून श्री. पिंपळकर न खपलेल्या पेपरची जाणीवपूर्वक लवकरात लवकर रद्दी घालून रद्दीवाले व भेळवाले यांच्या पर्यंत सर्व बातम्या फार शिळ्या होण्याच्या आत पोचवून त्यांचे प्रबोधनच घडवत असतात हे त्या कुत्सित नतद्रष्टांना कसे कळावे.
असो. दै. सुकाळ' मधले वृत्त जसेच्या तसे देत आहे. तुमचेही प्रबोधन होईलच.

 'दै. सुकाळ'
ठिकठिकाणच्या विशेष
प्रतिनिधींकडून : ता - ४ डिसेम्बर

संपूर्ण राजकीय विश्वात उत्सुकतेचा विषय बनून राहिलेल्या 'मनसे'च्या उमेदवार परीक्षा अखेर येऊन ठेपल्या आहेत.  खरेतर राज ठाकरे यांनी परीक्षांची घोषणा केल्यापासून ठिकठिकाणच्या इच्छुकांचे दणाणलेले धाबे गेले बरेच दिवस ऐकू येत होते. पण 'आले साहेबांच्या मना तेथे कोणाचे चालेना' या उक्तीनुसार इच्छुक नाइलाजाने तयारीला लागले होते. अभ्यास, ट्रेनिंग वगैरे ला सुरुवात केली होती. ठिकठिकाणच्या मधुशालांमधील संख्या रोडावून रात्रशाळांची आणि रात्रकॉलेजेसची  उपस्थिती वाढली होती. काही ठिकाणी इच्छुकांच्या आग्रहावरून मराठी, विज्ञान, गणित अशा निरुपयोगी विषयांचे अभ्यासक्रम वगळून 'नागरिकशास्त्र' या अनुसूचित जमातीत मोडणाऱ्या विषयाचे ३-३ पेपर अभ्यासक्रमात 'लावले' गेले असल्याचे सुखद दृश्य दिसत होते. बस, लोकल मध्ये याच विषयाचा बोलबाला होता. इतकेच काय तर सक्काळी सक्काळी रेल्वेलाईनच्या कडेने देखील आम 'पब्लिक' नेहमीप्रमाणे निरीक्षणात किंवा शिळोप्याच्या गप्पांमध्ये गुंग न होता पालिकेच्या सर्वसाधारण सभा असल्यागत गंभीरपणे चर्चा करत असल्याचे दिसून येत होते.

मनसेच्या मुंबई उपनगरातील एका प्रभाग अध्यक्षाने 'कौन बनेगा उमेदवार' असा 'गेम शो' आयोजित केला होता. (पहिला येणाऱ्यास पालिका सभागृहात एक आठवडा पट्टेवाल्याचे काम (इंटर्नशिप !!!) करण्याची आणि त्यानिमित्ताने  पालिकेचा कारभार, विरोधकांचे सभात्याग, घोषणाबाजी इत्यादीचा समक्ष अनुभव घेण्याची संधी !!).  पुण्यातल्या एका पदाधिकाऱ्याने तर एक पाऊल आणखी पुढे टाकत केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण याचा अभिनव अनुभव देण्यासाठी ३ दिवसांचा 'पालिका कामकाज Crash Course ' तयार केला होता. (प्रस्तुत नगरसेवकाचे महिलांसाठी Driving , पुरुषांसाठी Cooking , म्हाताऱ्या माणसांसाठी हास्ययोग, ट्राफिक पोलिसांना शिट्ट्या फुंकण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी प्राणायाम वर्ग इ. अनेक प्रशिक्षण वर्ग विलक्षण लोकप्रिय झाल्याचे वाचकांच्या लक्षात असेलच). या  Crash Courseचा हेतू कौतुकास्पद होता. परंतु
त्या पदाधिकाऱ्याच्या प्रभागातल्या प्रशिक्षण देण्यासाठी नेमलेल्या 'कार्यकर्त्यां'नी पालिकेचे कामकाज कसे चालवावे याचा Crash Course शिकवण्या ऐवजी गैरसमजुतीने पालिकेचे कामकाज कसे Crash करावे याचाच Course शिकवला (ज्यामध्ये राजदंड पळवून कमीत कमी श्रम करून भालाफेकीसारखा जास्तीत जास्त दूरवर पोचवणे,  सभापतींचा चष्मा सफाईने पळवून मंजुरीसाठी त्यांच्यासमोर आलेल्या प्रस्तावावर सह्या करण्याची गोची करून ठेवणे, मनसे नगरसेवकाने लक्षवेधी सूचना मांडल्यास ढोल वाजवल्यागत बाके कशी वाजवावीत वगैरे महत्वाच्या प्रशिक्षणावर भर दिला गेला होता. )

जसजसा परीक्षेचा दिवस जवळ येत गेला तसेतसे अनेक विद्यमान नगरसेवक परीक्षा (आणि नंतर येणारी नामुष्की) टाळण्यासाठी प्रयत्न करत होते. एकाने तर थेट 'कृष्णकुंज'वर जाऊन राजसाहेबांना मस्का मारण्याइतके धाडसही केले. परंतु 'गरज पडल्यास मीही परीक्षा देईन' असे बाणेदार उत्तर साहेबांनी दिल्यामुळे प्रस्तुत नगरसेवकाला निराशा (आणि ' नक्की कुणाला गरज पडली तर ?' हा बाणेदार प्रश्न) मनात घेऊनच परतावे लागले होते असे त्याच्या संपर्क-प्रमुखाने नाव न छापण्याच्या अटीवर 'दै. सुकाळ' ला सांगितले.


एकुणातच संदिग्धता आणि उत्साह यांच्या संमिश्र वातावरणात अखेर आज परीक्षा येऊन ठेपल्या आहेत.

या परीक्षेचे सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात.

 मी उत्सुकतेने भेळवाल्याकडे आणखी एक भेळ मागितली आणि कशीबशी संपवून कागद वाचला तर ती 'दै. सुकाळ'ची दशक्रिया वृत्तविशेष पुरवणी ('ओंकारेश्वर प्रसन्न' ) निघाली. छ्या , मी तर निराश झालो आणि तितक्यात  मला माझा भोटपणा लक्षात आला - 'पुढची भेळ बरोबर पुढच्या दिवशीच्या पेपरमध्ये बांधून कशी काय मिळेल'  असा प्रश्न स्वतःलाच विचारला आणि निमूटपणे भेळवाल्याचे कागद चाळू लागलो.
भेळवाल्याने चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पहिले (आणि 'लगे हाथ' माझ्या कपाळावर विशिष्ट अक्षरे दिसत आहेत का, हेही पाहून घेतले ). शेवटी मी म्हणालो "दादा , पेपर हवाय एक जरा .... हा मिळाला " आणि मी लगोलग तो कागद उपसला कारण तो 'दै. सुकाळ'चा ५ तारखेचा कागद होता.  मी उत्सुकतेने स्वतःचे प्रबोधन पुढे सुरु ठेवले.

 'दै. सुकाळ'
ठिकठिकाणच्या विशेष
प्रतिनिधींकडून : ता - ५ डिसेम्बर

'मनसे'च्या बहुप्रतीक्षित उमेदवार परीक्षा आज सर्व केंद्रात विलक्षण उत्साहात पार पडल्या. दुपारी पेपर संपल्याची घंटा वाजताच शेकडो केंद्रांवरून सुटलेल्या निःश्वासांनी वातावरण भारून गेले होते. (यामध्ये निःश्वास किती आणि सुस्कारे किती याची आकडेवारी उपलब्ध नाही. पण निकालानंतर ते कळेलच) आजचा दिवस एकूणच अनेकविध घडामोडींनी आणि मोडतोडीने भरलेला पहावयास मिळाला. मुंबईच्या एका  उपनगरातील केंद्रावर देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका हिंदीत असल्याचे आढळून आल्याने एकाच खळबळ माजली.  परीक्षार्थींना आपण मनसैनिक असल्याची खडबडून जाणीव झाली आणि प्रचंड गदारोळ सुरु झाला. अनायसे परीक्षेसाठी सगळ्यांनी बॉल पेन आणलेलेच असल्याने त्याची शाई काढून पर्यवेक्षकालाच काळे फासण्यात आले आणि पेपरला पुरवण्या जोडण्यासाठी पर्यवेक्षकाने आणलेल्या Stapler चे त्याच्यावरच प्रयोग करण्यात येऊन सगळ्या प्रश्नपत्रिका त्याच्या shirt ला खालच्या बाजूला शेपटीसारख्या staple करण्यात आल्या. "या प्रकारचे महाराष्ट्र विरोधी कारस्थान आम्ही खपवून घेणार नसून यामागे उत्तर भारतीय नेत्यांचा हात आहे... ते भैय्यांना हळूच मनसे मध्ये प्रवेश करण्यासाठी पाठवून पक्ष खिळखिळा करण्याचा कट करत आहेत. म्हणूनच या हिंदी भाषिकांना मनसेत घुसण्यापासून रोखण्यासाठी ही परीक्षा आम्ही बंद पडत असून, आमच्या या जाज्ज्वल्य हिंदीविरोधी भूमिकेमुळे राज साहेबांनी आम्हाला उमेदवारी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत" असे या धुमश्चक्रीत  आघाडीवर असलेल्या एका परीक्षार्थीने दै. सुकाळच्या प्रतिनिधीस सांगितले.   

जसा अनेक ठिकाणी हा परीक्षा सोहळा उत्साहात पार पडला तसा काही ठिकाणी तो पा ssss र पडला असल्याचेही दिसून आले. एका केंद्रावर पेपर चालू असताना कॉपी चालू असल्याची कुणकुण लागताच ती रोखण्यासाठी 'राष्ट्रवादी'चे एक पथक केंद्रापाशी पोचले असता त्याअगोदरच तिथे पोचलेल्या शिवसैनिकांनी कॉपीबहाद्दरांना चौदावे रत्न दाखवले असल्याचे त्यांना दिसून आले. आपले काम परस्परच झाले म्हणून खुश व्हायचे कि आपला मुद्दा चोरला म्हणून दुःख करायचे असे बुचकळ्यातले भाव त्यांच्या राष्ट्रवादी चेहऱ्यावर दिसून येत होते.  दरम्यान या कॉपीविरोधी हिंसक आंदोलनाबाबत छेडले असता शिवसैनिकांच्या पथकाचे प्रमुख रामभाऊ ढेकळे यांनी  आवेशात सांगितले की , "कॉपी करणे बेकायदा आहे. हा कायदा मोडणाऱ्यांना शासन करण्यासाठी आम्हाला कायदा मोडावा लागला तरी .... तरी...(प्रयासाने शब्द आठवत)  बहात्तर", इतक्यात बाजूला उभ्या असलेल्या शाखाप्रमुख नाना तुरटे यांनी श्री. ढेकळेंना सावरत 'बेहत्तर' म्हणून वेळ निभावून नेली आणि आवेशात सूत्रे हातात घेतली. "हे कॉपी-कृत्य म्हणजे फसवणूक आहे याची या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना जाणीव करून देण्यासाठीच आम्ही त्यांना धडा शिकवला आहे. अर्थात जे स्वतःच शिवसेनाप्रमुखांची कॉपी करतात त्यांच्या पक्षाकडून काय अपेक्षा करणार म्हणा ! जय हिंद जय महाराष्ट्र !!"

पुण्यात सदाशिव पेठेतल्या एका केंद्रावर ३५ परीक्षार्थींची नावनोंदणी असूनही प्रत्यक्ष पेपरला कोणीही हजार न राहिल्याची आश्चर्यजनक घटना घडली. या विषयी आमच्या प्रतिनिधीने अधिक शोध घेतला असता पुढील माहिती कळली - त्या भागातल्या काही इच्छुकांनी नावनोंदणी केल्यावर 'पेपर कशा स्वरूपाचा असेल, पेपर द्यायला कुठे यावे लागेल' पृच्छा केली असता नोंदणी करणाऱ्याने बाहेरच्या लाकडी फळ्याकडे बोट दाखवले. 'परीक्षाकेंद्रावर पोचल्यावर कळेल परीक्षा काय आहे. उगाचच वायफळ चौकशा करू नयेत - हुकुमावरून' अशी सूचना होती. परंतु कुणा नतद्रष्टाने 'परीक्षाकेंद्रावर'  मधला 'प' खोडून टाकला असल्याने 'रीक्षाकेंद्रावर' असा शब्द शिल्लक राहिला होता. त्यामुळे सगळे इच्छुक परीक्षेच्या दिवशी सरळ रिक्षा stand वर गेले , (मागच्या महिन्यातले आंदोलन डोक्यात ताजेच असल्याने) रिक्षाचालकांना चोप दिला आणि हीच आपली परीक्षा (Theory ऐवजी Practical !!) होती असे समजून निर्धास्त होऊन घरी परतले. (रिक्षावाल्यांना बडवतानाचा फोटो पुरावा म्हणून स्वतःच्या मोबाईल मध्ये काढून घ्यायला ते विसरले नाहीत).


अशा रीतीने आजचा परीक्षेचा दिवस अतिशय धामधुमीचा गेला. अनेक इच्छुक महत्वाची कामे आटपून किंवा टाळून परीक्षेला हजर राहिली होती. काही जण कामावरून सुट्टी घेऊन तर काही जण आजारी असतानाही परीक्षा द्यायला आले होते  मुंबईत तर एक तरुण स्वतःचे लग्न आटोपून तसाच बायकोसह परीक्षेला आला होता ("नाते जुळण्याची संपली आज प्रतीक्षा, सीमाच्या साथीने देतो संसाराची 'मनसे' परीक्षा" - असा चतुर उखाणादेखील त्याने आमच्या प्रतिनिधीच्या आग्रहावरून घेतला). परीक्षेविषयी इच्छुकांची तळमळ पाहून खुद्द राज ठाकरे देखील भारावून गेले असून त्यांनी सर्वांना निकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


दरम्यान आजच्या पेपरमध्ये पालिकेच्या कामकाजाव्यतिरिक्त साहित्य-संस्कृती संबंधीचे प्रश्नदेखील विचारण्यात येणार होते असे कळते. परंतु पेपरमध्ये नक्की काय प्रश्न होते हे अजूनही कळलेले नसून त्याविषयी बरीच गुप्तता पाळली जात आहे.  परंतु वाचक प्रबोधनाचा वसा हाती घेतलेला 'दै. सुकाळ' हे पेपर मिळवण्यासाठी कटिबद्ध असून लवकरच ते २-३ दिवसातच उपलब्ध होतील असे आम्ही खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. 


इथे बातमी संपली . मालिका महत्वाच्या टप्प्यावर असताना अचानक एपिसोड संपतो आणि आपल्याला उत्कंठा तशीच ताणून धरावी लागते, तशी माझी गत  झाली.  आता मात्र मी इरेला पेटलो. उरले सुरले सगळे पेपर  भेळवाल्याच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत उपसले पण यापुढे मात्र एकही कामाचा चिठोरा मिळाला नाही. श्या : !!! मनसेचे पेपर कसे होते आणि निकाल लागला हे मात्र आता कधी कळेल कुणास ठाऊक .





Wednesday, June 29, 2011

बांध




त्या दिवशी मी नेहमीसारखाच माझ्या कोशात सुरवंटासारखा बसलो होतो... किंवा असे म्हणा की मी माझ्या बिळात उंदरासारखा  बसलो होतो. बाहेर दरवाज्याची बेल वाजली आणि आईने दरवाजा उघडला. बाहेर कोणीतरी नेहमीसारखेच मागणारे हात आहेत इतपत अंदाज आला होता. नेहमीचेच असते हे. सारखे कोणी ना कोणी हात पसरून दाराबाहेर उभे असते. त्यांचे कष्टी तोंड पाहून त्यांचा हिरमोड करावासा वाटत नाही म्हणून काहीतरी पाच पंचवीस रुपये हातावर टेकवून बोळवण करायची. पण सारखेच कोणीतरी आले तर देणे कसे शक्य आहे ? मग समोरच्याच्या चेहऱ्यावरच्या निर्ढावलेपणाच्या प्रमाणावरून पवित्र घ्यायचा. समोरचा उगीचच कष्टी भाव चेहऱ्यावर दाखवत नसेल तर सरळ निर्विकारपणे "नाही" सांगायचे. किंवा मग समोरचा अगदीच चेहरा कसनुसा करत असेल तर "आत्ता आम्ही काही देऊ शकत नाही... आमचेच आम्हाला भागत नाही... महागाई किती वाढलीये" वगैरे टेप वाजवायची आणि दरवाजा लावून घ्यायचा.

आज यापैकी काय करायचे याचा विचार करत असताना आईने मला बाहेर बोलावले. बाहेर एक मूळचा गोरा पण खस्ता खाल्ल्यासारखा रापलेला चेहरा असलेला एक चाळीशीचा गृहस्थ उभा होता आणि बरोबर एक मुलगा पण होता १०-१२ वर्षांचा. तो हिंदीमध्ये बोलू लागला आणि प्रकाश पडला की हा काश्मिरी आहे. त्याचे आडनाव भट्ट होते. तो सांगायला लागला "आम्ही पिंपरी जवळच्या काळेवाडी इथल्या कॅम्प मध्ये राहतो..." आणि अचानक मला प्रकरण गंभीर असल्याचे जाणवायला लागले. तो बोलतच होता.... "हम काश्मिरी पंडित है, लेकीन हमारा काश्मीरमें जीना बहोत मुश्कील हो गया है. एक एक करके हमे काश्मीर छोडना पडा". इथपर्यंत मी कसेतरी ऐकत होतो इतक्यात त्याने माझ्या घराकडे वरपासून खालपर्यंत पहिले आणि ते वाक्य टाकले "साब हमारा भी आप जैसा खुदका घर था.. वहां  पे बडे बडे बाग थे, खुदका गालीचोंका कारोबार था  .. लेकीन साब, सब कुछ छोडके हमे वहां से भागना पडा....." आणि अगदी याच क्षणाला कुठेतरी आत मध्ये एक प्रचंड घण बसला - अगदी घनघोर ! ते जे काही होते ते माझ्या सहनशक्तीच्या पार पलीकडचे होते. आनंदात स्वतःच्या बागेत बागडत असताना अचानक कोणीतरी येऊन भोसकावे तसे काहीतरी घडले होते. घाव गहिरा बसला होता आणि माझ्या गोड गोबऱ्या जगाभोवतीची भिंत क्षणार्धात जमीनदोस्त झाली होती .... त्या धुराळ्याने गुदमरून जाऊन अचानक डोळ्यातून पाणी झरू लागले.... झरू लागले कसले, चांगले फुफाटत वाहायला लागले ...     

त्या क्षणाला मी उभा असलेल्या उंबऱ्यापाठीमागे भरभक्कम भिंत उभी होती जी मला जन्मापासून या क्षणापर्यंत अगदी अंजारून गोंजारून सुरक्षित ठेवत होती आणि...आणि उंबऱ्यापलीकडच्या जगात हे दोघे वादळात तंबू उडून गेल्यासारखे असहाय्यपणे उभे होते. एके काळी माझ्यासारखेच निर्धास्त असणाऱ्या या दोघांना आणि त्यांच्यासारख्या अगणित हिंदू पंडितांना काश्मिरातल्या मुस्लीम अतिरेक्यांनी त्यांच्या कागडीच्या उबेतून हिसडून गारढोण वादळात हाकलून दिलेले होते. उद्या मी साखरझोपेत असताना कोणी मला काहीही बरोबर घेऊ न देता नेसत्या वस्त्रांनिशी घराबाहेर हाकलून दिले तर ?? मला कल्पनाही करवेना. मी त्या दोघांसमोरच रडायला लागलो .... अगदी ओक्साबोक्शी.... माझ्या रडण्याने तो माणूस पण कावराबावरा झाला आणि तोही रडू लागला.....फारच चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाली. तो रडत रडतच काहीतरी सांगत होता... मला पायातले बळच गेल्यासारखे वाटायला लागले. मी सरळ आत निघून आलो, आणि काय सांगू, रडू आवरेचना. हुंदक्यांवर हुंदके... मलाच कळत नव्हते हे काय होतंय. या आधी कधीच असं झालं नव्हतं. मला फक्त स्वतःच्या दुःखावर कढ काढणे  माहित होते. मग मी आज दुसऱ्याचे ऐकून एवढा का रडतोय ?  कदाचित असेही असेल की मी फार दिवसात-वर्षांत रडलो नव्हतो, कसलेतरी दुःख आत साचले होते आणि आज फुग्याला टाचणी लागल्यावर बांध फुटला होता. असं होतं बऱ्याचदा. आपली दुःखं आतल्या आत कुठेतरी दबून राहतात आणि मग असले काही निमित्त मिळाले की मिळेल त्या वाटेने बाहेर येतात..... पण छे ! माझी कसली आलीयेत दुःखं ? काड्यापेटीत मावतील इतपत जेमतेम माझी दुःखं... मला कुठे कोणी यांच्यासारखं सर्वस्व सोडायला लावून हाकलून दिलं होतं ? केवळ हिंदू आहे म्हणून माझ्या डोक्यावर यांच्यासारखी तलवार कुठे लटकत होती ? नाही नाही ... हे काहीतरी फार गहिरे होते... मला रडता रडता काहीच कळेनासे झाले होते... एवढा हमसून हमसून मी आधी कधी रडल्याचे आठवतसुद्धा नव्हते. त्या माणसाच्या केवळ चार-दोन वाक्यांमुळे मला पांगळा झाल्यासारखं वाटत होतं.
आई बाहेर त्या माणसाशी थोडावेळ तशीच बोलत राहिली. थोड्यावेळाने मी सावरलो आणि बाहेर येऊन त्याच्याशी बोललो, त्याला पाणी दिले. तो सांगत होता की "आम्ही भीक मागत नाही, आम्ही इकडे गालिचे विणून विकतो आणि थोडेफार पैसे मिळवतो.... आम्हाला पैसे नकोत. जुने कपडे किंवा बूट असतील तर द्याल का ?" नाही म्हणणे शक्यच नव्हते. आपणा पांढरपेशांची एक गोष्ट विशेष असते बरंका...  आपल्या वापरत नसणारे कपडे-वस्तू गरजूंना दिले की आपल्याला 'समाजसेवा' केल्याचा आनंद मिळतो. एकदा अशी समाजसेवा केली की पुढची समाजसेवा करेपर्यंतच्या काळात (म्हणजे नवे कपडे जुने आणि नव्या वस्तू निरुपयोगी होईपर्यंतच्या काळात)  आपण आपल्या डोळ्यावर कातडे ओढून घ्यायला मोकळे. मी पण अशीच समाजसेवा केली - झेपेल इतपत.  जाताना त्याने आभार मानले आणि "काळेवाडीला आमच्या कॅम्पला भेट द्या" म्हणाला आणि मुलाला घेऊन (बहुदा आणखी एका दारात उभं राहण्यासाठी) निघून गेला.

त्या काही मिनिटांमध्ये उठलेले प्रश्नाचे मोहोळ अजून शांत झालेले नाहीये.
ते लोक हिंदू म्हणून जन्माला आले हा त्यांचा दोष आहे का ? की मग काश्मीरचे लचके पडल्यानंतर ५० वर्षे होऊन गेली, तरीही ते मुसलमान झाले नाहीत हा त्यांचा गुन्हा आहे?
काश्मीर आणि पाकिस्तानात लाखो हिंदूंच्या कत्तली करून आणि एवढ्या देशोधडीला लावल्यानंतरसुद्धा तिकडच्या मुसलमानांच्या राहणीमानात काय फरक पडला ? अजूनही तिकडचे मुसलमान नागरिक शस्त्रांच्या नंग्या नाचाला बळी पडतच आहेत ना ?  
एरवी उठता बसता अल्पसंख्याकांच्या नावाने ऊर बडवणाऱ्या secular नरपुंगावांपैकी एकही माईचा लाल काश्मिरातल्या अल्पसंख्य हिंदूंबद्दल अवाक्षर का उच्चारत नाही ? 

यातल्या एकही प्रश्नाचे उत्तर मला मिळालेले नाहीये अजून.... मिळेल अशी आशाही वाटत नाहीये.... एवढे मात्र खरे त्या एका प्रसंगाने मला आतून हादरवले, ढवळून काढले. यापूर्वी कधीही ना अनुभवलेली अस्वस्थता आणि अस्थिरता जाणवून दिली.  आपण इकडे किती सुरक्षित (आणि त्यामुळेच अनभिज्ञ आणि बेफिकीर)  आहोत याचा साक्षात्कार झाला. We should not take our life for granted हे चांगलेच कळून चुकले. आणि त्याचबरोबर कुठेतरी समाधान वाटले - त्यांची वेदना मलाही तेवढीच सलली म्हणून, आपण अजूनही पूर्णपणे दगड झालेलो नाहीये याची जाणीव झाली म्हणून, खूप खूप दिवसांनी मला मोकळं होण्याचं निमित्त मिळालं म्हणून आणि त्या पाण्याने माझी नजर आणखी साफ झाली म्हणूनही !!
   



Tuesday, May 31, 2011

चिरतरुण आजोबा !!




कुकुल्या वयात असताना काही वाटा आपोआप सुरूच होतात ... म्हणजे त्या न कळत्या वयामध्ये "या वाटेवरून चालायला सुरुवात करायची की नाही" वगैरे प्रश्न पडतच नसतात आपल्याला !  चालणे असो, बोलणे, वाचणे असो - स्वतःहून या वाटांवरून पुढे जायला सुरुवात करतो.  वाचन  वगळता बाकीच्या मुलभूत गोष्टी आपल्या  आपोआप चालूच राहतात  ठेवतो.  (मी 'वाचणे'  असे न लिहिता मुद्दामून 'वाचन' लिहिले आहे.अगदीच नाईलाज म्हणून काही गोष्टी डोळ्याखालून घालणे - यात वाणसामानाच्या यादीपासून अभ्यासाच्या  पुस्तकापर्यंत बऱ्याच अपरिहार्य  गोष्टी आल्या -  म्हणजे 'वाचणे'  झाले, आणि मनापासून एखाद्या गोष्टीत रस वाटून ती वाचून संपवणे म्हणजे "वाचन" ). लहानपणी एखादी गोष्ट म्हणजे 'गोष्ट'च असते - 'कथा' वगैरे नसते.  लहानपणी प्रत्येकजण हटकून 'गोष्टीची पुस्तकं' वाचत असतो तशी मी पण खूप वाचली आणि सुदैवाने पुढे  इतकी छान छान पुस्तकं वाचायला मिळाली, की नकळत चालू लागलेल्या वाटेवर ती सावल्या देणारी झाडंच बनून गेली ..

   भा. रा. भागवत असेच केव्हातरी फास्टर फेणेच्या मागून दबकत दबकत आले आणि अक्षरशः गारुड केले.  वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपला कोणीतरी हिरो  असतो - खरा किंवा काल्पनिक -  आणि बऱ्याचदा  आपला हिरो काल्पनिक आहे हे मानायला मन तयारच नसते ! पाचवीत असताना पहिल्यांदा फास्टर फेणेचे पुस्तक नजरेला पडले. त्याआधी कधीतरी एका दादाने फा.फे. बद्दल पुरेशी उत्सुकता पेरून ठेवली होतीच.  आईकडे हट्ट करून समोर दिसणाऱ्या सहा  पुस्तकांपैकी कशीबशी दोन झोळीत पडून घेतली 'फास्टर फेणे डिटेक्टीव'  आणि 'प्रतापगडावर 'फास्टर फेणे' . बास्स ! मला माझा हिरो मिळाला .... मग तो खरा आहे की काल्पनिक याच्याशी मला घेणे देणे नव्हते. तो खूप जवळचा वाटत होता. तो जे बोलत होता ते कुठेच पुस्तकी वाटत नव्हते.  तो जे धावरे धाडस करत होता ते त्या वयातल्या कोणत्याही मुलाला मनापासून करावेसे वाटते तसलेच होते.  आणि मुख्य म्हणजे त्याची 'कर्मभूमी'  'माझं पुणं' होती. मला आठवतंय जसा जसा फास्टर फेणेच्या गोष्टी वाचत गेलो तसा तसा त्यात वर्णन केली गेलेली पुण्यातली ठिकाणं डोळ्यासमोर उभी राहू लागली. .. मग कसब्यात गेलो की फा. फे. च्या मामांचा वाडा अमुक एका ठिकाणी असेल असे चित्र रंगवू लागलो.  रेसकोर्सपाशी गेलो की डोळे विद्याभवन शाळा शोधायला लागले, बंडगार्डनपाशी गेलो की फा. फे. ने पर्णकुटीपाशी वेड्याशी केलेला सामना दिसायला लागला ...  जेव्हा मी पहिल्यांदा पाताळेश्वर पाहायला गेलो तेव्हा माझे डोळे मागची अंधारी गुहा आणि त्यातल्या चीनी हेरासाठी भिरभिरत होते .... एक ना दोन .....  आणि हे वेड पुण्यापुरतेच मर्यादित राहिले नाही .... ट्रेनने खंडाळ्याचा घाट ओलांडताना 'नक्की कोणत्या बोगद्यापाशी फा. फे. ने ढाण्या  वाघाला मालगाडीत अडकवले असेल'  याचीसुद्धा मनाशी खूणगाठ बांधली होती मी !   'डोळ्यांची निरांजने करून ओवाळणे' म्हणजे काय हे मला फा. फे ची पुस्तकं वाचत असतानाच्या भावना आठवल्या की कळते ( मला माहित आहे की मी लिहिलेले हे शब्द फार पुस्तकी किंवा नाटकी आहेत, पण या घडीला मला दुसरे शब्द आठवत नाहीयेत .. खरंच !).

आणि हा फास्टर फेणे जसा शब्दात आहे तसा तंतोतंत उभा केला तो राम वाईरकरांच्या अफलातून चित्रांनी.  सुरुवातीच्या पुस्तकांमध्ये फा.फे. हा एका काटकुळ्या sketches च्या स्वरुपात होता. जसजशी पुस्तकं येत गेली तसतसा तो अधिक सुस्पष्ट आणि ठाशीव होत गेला.... एकुणात काय तर फास्टर फेणेचा प्रभाव फार जबरदस्त होता... इतका, की त्याची बरीच वर्षे 'out of print'  पुस्तके मी कॉलेज मध्ये असताना  जेव्हा नव्याने प्रकाशित झाली , तेव्हा माझ्याकडे नसणारी उरलेली सगळी पुस्तकं घेऊन अक्खा २० पुस्तकांचा सेट पूर्ण केला !! 


    अर्थात 'फास्टर फेणे'  चे गारुड हे भा.रा. भागवतांच्या झपाट-लेखणीचे आहे हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. मुख्यत्वेकरून मराठी मुलांसाठी लिहिलेला असला तरी त्यात हलके फुलके इंग्लिश शब्द चपखलपणे पेरलेले आहेत. त्यामुले आजही ही पुस्तकं कालबाह्य वाटत नाहीत. शिवाय सगळ्या गोष्टी अक्षरशः खिळवून ठेवणाऱ्या आहेत. या सगळ्यामुळे भा. रां. चे  पुस्तक दिसले की वाचायला लागलो.  त्यांची अनुवादित आणि रुपांतरीत पुस्तकं सुद्धा तितकीच मंत्रमुग्ध करणारी  आहेत. आपण ती वाचतो तेव्हा ती मूळची मराठीत नाहीत यावर विश्वास बसत नाही. Alice in Wonderland चे 'नवलनगरीत जाई'  हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण. जगातल्या तमाम बंडखोरांचा 'हिरो' असणारा शरवूडच्या जंगलातला Robin Hood अणि त्याचे यारदोस्त त्यांनी अश्या चटकदार मराठीत रंगवलेत की Robin Hood आपल्याच गावातला कोणीतरी वाटतो ("शिंग वाजता Robin करिता शरवूड जंगल भंगेल - गडी लोटतील रंगेल" अश्या ओळीनेच पुस्तक सुरु होते ते संपेपर्यंत खली ठेववत नहीं). सर्वात अविस्मरणीय रुपांतरीत पुस्तक म्हणजे Charles Dickens च्या The Christmas Carol चा मराठी अवतार - 'भटांच्या वाड्यातील भुतावळ'. मूळच्या पुस्तकातल्या christmas ची यात दिवाळी होते. कंजूष चिटको शेठजी आणि नरकचतुर्दशीच्या आदल्या  एका रात्रीत त्याला वठणीवर आणणारी धमाल भुते ....  भा. रा. एका मराठमोळ्या खेड्याचे वातावरण असे काही उभे करतात की गोष्ट एकदम या मातीतली होऊन जाते ! हे पुस्तक मिळाले तर कधीही सोडू नका.

 भा.रा.भागवतांनी अक्षरशः शेकड्याने पुस्तकं लिहिली आणि इंग्लिश मधून भाषांतरित, रुपांतरीत, अनुवादित केली.  ज्यूल्स  व्हर्न ची जवळपास २५ -३० , H G Wales ची काही, Arthur Conan Doyle चा Sherlock Holmes अशी कितीतरी. खऱ्या अर्थाने ते बालसाहित्यातले भीष्माचार्य होते. परदेशात बालसाहित्यालासुद्धा एक वलय असतं. तसं दुर्दैवाने आपल्याकडे नसल्यामुळे एवढे मोठे भा.रा. आज फारसे माहित असावेत असे वाटत नाही. नेटवर शोधल्यावर काही तुरळक forums वगळता फारसे हाती लागत नाही (ब्लॉग साठी वापरलेला फोटो नेटवर कसा काय मिळाला याचेच मला आश्चर्य वाटते आहे). Harry Potter च्या चित्तथरारक कादंबऱ्या वाचताना  प्रकर्षाने जाणवते की आज भा. रा. भागवत असायला पाहिजे होते. या अफलातून कादंबऱ्या तितक्याच ताकदीने मराठी मध्ये आणायला भा. रा. भागवत यांच्या इतका समर्थ (आणि मुख्य म्हणजे मुलांचे विश्व जाणून घेऊन लिहिणारा)  दुसरा अनुवादक  आहे असं वाटत नाही. 

 खरेतर भा.रा. भागवतांनी मोठ्यांसाठीचे साहित्यसुद्धा लिहिले. विज्ञानकथा लिहिल्या. 'हाजीबाबाच्या गोष्टी' सारखे इराणच्या सुल्तानशाहीच्या पार्श्वभूमीवरचे पुस्तक लिहिले. पेरू देशातली इनका संस्कृति नष्ट करणार्या पिझारो या spanish आक्रमकावरचे  'पिझारोचे थैमान' लिहिले. भरपूर विनोदी कथा लिहिल्या. छगन नावाचे गमतीदार पात्रसुद्धा निर्माण केले (राम कोलारकर संपादित 'निवडक मराठी विनोद कथां'चे  २० खंड प्रकाशित झालेत त्यातल्या जवळपास प्रत्येक खंडात भा.रा. भागवतांची एक ना एक कथा आहेच). एवढे असले तरी ते मनापासून रमले लहान मुलांमध्येच. 

मुलांसाठी छान छान साहित्य सादर करावे यासाठी भा.रां.ची कायम धडपड चालायची. १९४० च्या दशकात सुमारास त्यांनी 'बालमित्र' नावाचे मासिक सुरु केले. मुलांनी केवळ जादूच्या गोष्टीमध्ये रमून न जाता चटपटीत,प्रसंगावधानी आणि आजच्या भाषेत 'dashing' बनावे अशी त्यांची खूप इच्छा असायची. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बाजाच्या गोष्टी,
वैज्ञानिक कुतूहल शमवणाऱ्या गोष्टी, साहसकथा, संस्कारक्षम कथा अशा अनेक प्रकारांनी अंक सजवला. त्यावेळच्या मोठ्या लेखकांकडून लिखाण करून घेतले. बऱ्याचदा स्वतः वेगवेगळ्या टोपणनावांनी  एकाच अंकात गोष्टी, लेख लिहिले. परवडत नसूनही पदराला खार लावून , नाना खटपटी करत मासिक चालू ठेवले.(सुदैवाने अलीकडेच 'निवडक बालमित्र' नावाचे ७ भाग प्रकाशित झाले आहेत. ते पाहून हे अंक किती सुंदर असायचे याची कल्पना येते.) बाल - कुमार गटातल्या मुलांची नस त्यांना बरोब्बर सापडली होती.... त्यामुळेच तुडतुडीत फास्टर फेणे, पुस्तकातला किडा असूनही वेळप्रसंगी विजू-मोना या छोट्या दोस्तांना घेऊन साहसात उडी घेणारा बिपीन बुकलवार, थापाड्या तरीही निरागस असणारा नंदू नवाथे अशी वेगवेगळ्या जातकुळीची (आणि तरीही सारखीच वाचनीय असणारी) पात्रे कायमच जवळची वाटत राहतात. भा.रा.भागवतांच्या पुस्तकांमधे साहस हे समान सूत्र असले तरी पार्श्वभूमी वेगळी असते.त्यामुळे वाचताना दरवेळेस आपण वेगळ्या विश्वात जातो. मग 'भुताळी जहाज' मध्ये आपण एका गूढ धुक्यात गुंतत जातो तर 'ब्रह्मदेशातला खजिना' मध्ये १८५० च्या आसपास च्या काळातली अनोखी शोधकथा अनुभवता येते. 'जयदीपची जंगलयात्रा' मध्ये जयदीप बरोबरच आपणसुद्धा ब्राझीलच्या जंगलात हरवतो तर 'तैमूरलंगचा भाला' मध्ये १९४२ च्या लढ्यामध्ये भगतराम या क्रांतिकारकासोबत लता आणि किरण या भावंडांनी बेभान होऊन केलेलं साहस अनुभवतो.... भा.रा.भागवतांची पुस्तके जितकी वाचावी तितकी कमीच आहेत  !!! प्रत्येकाबद्दल लिहायला लागलो तर वेळ पुरायचा नाही. सुदैवाने माझ्या संग्रहात त्यांची पन्नासेक पुस्तके आहेत . अजूनही प्रदर्शनात त्यांचे पुस्तक दिसले की मी ते घेतोच.


ब्लॉग सुरु केल्यापासून ठरवले होते भा.रा. भागवतांवर नक्की लिहायचे आणि लिहायचं लिहायचं म्हणता म्हणता आजचा दिवस उजाडला तो पण एकदम perfect . बरोब्बर १०१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ३१ मे १९१० ला इंदोरला भा.रा.भागवतांचा जन्म झाला होता.....त्यांच्या लिखाणाचा काळ लक्षात घेतला तर त्यांचे बरेचसे लिखाण १९६० नंतर म्हणजे  वयाच्या पन्नाशी - साठी नंतर झालेलं आहे. एवढे असूनही ते अगदी ताजे आणि चटकदार आहे. त्यांच्या मृत्यूची तारीख मला आठवत नाही. आणि मला त्याची गरज पण वाटत नाही. माझ्यासाठी ते चिरतरुण असणारे  आणि आजसुद्धा पुस्तकांच्या पानापानातून मिश्किलपणे भेटत राहणारे जानी दोस्त आहेत. 

 

 मी काही पुस्तकांची नावे देतोय जी मी केव्हाची शोधतोय. सध्या यातली बरीचशी आउट ऑफ प्रिंट आहेत. ही ब्लॉग पोस्ट वाचणाऱ्या कोणाच्या पुस्तकाच्या कपाटात यातले एखादे पुस्तक असेल तर मला नक्की कळवा
१) भाराभर गवत - भा.रां.चे आत्मचरित्र
२) घड्याळाचे गुपित - बिपीन बुकलवारची  साहसकथा
३) दीपमाळेचे  रहस्य
४) जयदीपची जंगलयात्रा
५) समुद्र सैतान
६) कॅप्टन किडचा खजिना

ता.क. : इकडे तिकडे भटकताना आजूबाजूच्या लोकांच्या सतराशे साठ प्रकारच्या T - Shirts वर नेहमी परदेशी characters (Dennis, मिकी - डोनाल्ड इत्यादी )  आणि व्यक्तिमत्वं (Che Guevara, Kurt Cobain इत्यादी ) दिसत असतात.  म्हटले - एवढे सगळेजण  T -Shirt वर झळकत आहेत मग आपला मराठमोळा फास्टर फेणे का नाही !! त्यामुळे मी लवकरच फास्टर फेणेचे चित्र असणारा  T -Shirt प्रिंट करून घेणारे - Sweat Shirt  प्रिंट करून घेतो तसा.... तमाम फास्टर फेणे fans ना यामध्ये सहभागी करून घ्यायला मला आवडेल  !!


Tuesday, February 8, 2011

वेडा



कधी खुदकन , कधी गडगडून , स्वतःशीच हसतो पुलंचा joke आठवून
लोक मला वेडा म्हणतात .....
कधी बेभान होउन घेतो निसर्ग डोळ्यात साठवून
लोक मला वेडा म्हणतात .....
कधी गीत ऐकतो देहभान हरपून
लोक मला वेडा म्हणतात .....
कधी दैन्य पाहून आसपासचे ह्रदय जाते करपून
लोक मला वेडा म्हणतात .....
कधी जीव गलबलतो आप्तांचे प्रेम पाहून
लोक मला वेडा म्हणतात .....
कधी आठवणीने मित्रांच्या , जातात अश्रू वाहून
लोक मला वेडा म्हणतात .....
रोज रोज टी व्ही वर रक्तपात पाहून मला शिसारी येते
लोक मला वेडा म्हणतात .....
माथं भड़कतं , वाटतं "कसे तोडतात क्षणात नाते ?"
लोक मला वेडा म्हणतात .....
आता मला कळून चुकलंय ,
आजच्या जगात चालायचं असतं झापडं लावून
भावनांनी केलाच प्रयत्न मनात शिरायचा,
तर घ्यायच्या दारं खिडक्या लावून ........

म्हणून मी आजकाल
सरळ 'लायनीत' चालतो ,
मान खाली घालून काम करतो
हसत नाही, रडत नाही,
हादरत नाही, गहिवरत तर नाहीच नाही ........
कारण....
मीसुद्धा बहुदा
इतर 'शहाण्यां'मध्येच सामील झालोय !!

Friday, January 14, 2011

कुंपणांचे जग


छोट्याश्या मुठी एवढे जग , आणि मी त्यात एखादी असीम - अनिर्बंध गोष्ट अस्तित्वात आहे का याचा शोध घेतोय. किती वेडा आहे मी !! माझे जग, माझी पृथ्वी सीमेने घेरलेली तर चीज आहे . सगळीकडे मर्यादा .. देशाला 'बॉर्डर'ची , गावाला वेशीची तर समाजाला रूढी - परंपरांची लक्ष्मणरेषा .. आणि प्रत्येक व्यक्तीला शिष्टाचाराच्या दिखाऊ सामाजुतींनी अभेद्य बनलेल्या मनाच्या भक्कम भिंती ... सगळ्या व्यक्ती , चीजवस्तू, संकल्पना - एका वर्तुळाच्या घेऱ्याच्या आत ... एका वर्तुळात असंख्य वर्तुळे ...

एवढे मोठ्ठे असीम आकाश, पण माझ्या घरावरून बघितलं तेव्हा त्याला क्षितिजाचं कुंपण दिसलं. आकाश मर्यादित असल्याचा भ्रम झाला . सहज म्हणून चालत दूर गेलो, तेव्हा आकाशातल्या पोकळीमधले माझ्या घरावरून न दिसणारे तारे दिसू लागले. मला आनंद झाला. "म्हणजे आकाश सीमित नाही तर !!! मग मगाशी भ्रम का झाला?" थोड्या वेळ विचार केल्यावर लक्षात आलं की हा आपल्या भोवतीच्या वर्तुळाचा परिणाम . आम्हाला सवयच लागली आहे - सीमारेषांची, बंधनांची.... त्यामुळे विचारांनाही झापडे लागली आहेत. जगात मर्यादा, सीमा यांना एवढे महत्व का आले आहे ? भौतिक सीमा हे तर याचे सर्वात मोठे उदाहरण. कालपर्यंत एकाच आईच्या अंग-खांद्यावर खेळणारी मुलं दुसऱ्या दिवशी आईचं शरीर अर्धं-अर्धं वाटून घेतात. त्यांच्यासाठी ती बोर्डर असते , पण आईसाठी ती चारत जाणारी जखम असते. ४७ साली माझ्या आईच्या शरीरावर किती मोठा ओरखडा ओढला गेला आणि एका दिवसात मधली यःकश्चित रेषा दोन्ही बाजूंची मनं दुभंगून गेली. खरच, सीमारेषेत एवढी पाशवी ताकद असते मला माहीतच नव्हतं !!!

भौतिक सीमा परवडल्या एकवेळ, इतक्या असंख्य सीमा माझ्या समाजात आहेत. खोट्या रुढींच्या, फसव्या परंपरांच्या, भोंगळ जातीपातीच्या आणि शेवाळलेल्या विचारांच्या .... असल्या सीमा ओलांडायला सुद्धा दसऱ्याची वाट बघायची ? अशाने सीमोल्लंघन कधी व्हायचेच नाही. फार कशाला , स्त्री जेव्हा पुरुषाच्या पावलात पाउल मिसळून चालू पाहते तेव्हा  'मर्यादा' या शब्दाची आठवण पुरुष जातीला फार प्रकर्षाने होते. 'संयम , शालीनता , शील हीच स्त्रीची मर्यादा ' वगैरे वाक्ये बरी पडतात तोंडावर फेकायला ...

या सीमेला एक लहान भावंड आहे. 'कुंपण' त्याचे नाव. सगळ्यात पीडादायक ! मनाच्या सीमा आकसल्या की ते झालं 'कुंपण'. एकवेळ सीमेच्या आत सद्गुण, परोपकार औषधाला तरी असतात, पण कुंपणाआड असतो फक्त स्वार्थ आणि अल्पसंतुष्टता. कुंपणाचं फार मोठं पीक आलंय आजकालच्या राजकारणात. असली जागा आसनासाठी फार सोईची. शेताच्या आतली आणि बाहेरची, दोन्ही जागा नजरेच्या टप्प्यात राहतात. वाऱ्याच्या दिशेने  टोपी फिरवणारे नेते लोक यातले तज्ञ. फायद्याच्या कुरणात पटकन उडी मारून जाता येतं. 'सलाम' कविता संग्रहात पाडगावकरांनी 'कुंपण-प्रशस्ती' गायली आहे.
 "शहाणे कुंपणावर बसतात, पण आपली माणसे पेरून ठेवतात शेतात |
आणि काही शेताबाहेर . माणसे हेरूनही ठेवतात कुंपणावर बसून |
शहाणे, कुंपण आणि परमेश्वर यांचा थांग लागत नाही ||"

खरंच ! आजच्या तथाकथित शहाण्यांची धाव सरड्यासारखी कुंपणा पर्यंतच आहे. अशी कुंपणे, ज्यांनी शेतच नाही तर अक्खा समाज गिळला आहे. ती मला तोडायची आहेत. सीमांच्या पलीकडे जायचे आहे. असीमता अनुभवायची आहे - मनाची, विचारांची. पण आहे का हे शक्य? अख्ख्या पृथ्वीला गिळू पाहणारा समुद्र - पण त्याला सुद्धा किनाऱ्याने बंदिवान करून टाकले आहे. असीमातेच्या शोधासाठी मग मी बाहेरच पडलो पृथ्वी वरून. विश्वाचा एक तुकडा - जो माझ्या अस्तित्वाच्या कणाकणात आहे तो - सुद्धा धुंडाळला, पण व्यर्थ !

शेवटी मी पृथ्वी कडे वळलो. जवळ येऊन बघतो तर काय !  'असीम' ' अमर्याद' अशा कित्येक गोष्टींनी मला पृथ्वी चमचमताना  दिसली... काय काय होते हे असीमतेला कवटाळणारे ? पृथ्वीवर होते आईचे  पिल्लांवरचे प्रेम - कोणत्याही बंधनापुरते मर्यादित नसणारे, पृथ्वीवर होती माझ्या बांधवांची परमेश्वरावरची अपार भक्ती, पृथ्वीवर होती सैनिकांची आणि देशभक्तांची मातृभूवरची गाढ निष्ठा, पृथ्वीवर होती समाजसेवकांची संपूर्ण समर्पणाची भावना ..... आणखीही खूप काही... या सर्वांची तुलना करणारा तराजू कुठे आहे? या सर्वांना अडवणारी तटबंदी कुठे आहे? या सर्वांनी झुगारली आहेत सीमांची बंधने, मर्यादेच्या बेड्या. माझे जग कुंपणाचे आहे खरे, पण मला आज समाधान वाटत आहे कि त्याचा एक छोटासा  का होईना, पण असा एकतरी कोपरा जिवंत आहे, ज्याला आभाळा शिवाय कशाचीच सीमा नाही....!!!