Total Pageviews

Thursday, June 15, 2017

सुदर्शनचे दिवस

नाट्यप्रयोगांबद्दल लिहिण्यापूर्वी पुण्यातल्या प्रायोगिक नाटकांची पांढरी असणाऱ्या 'सुदर्शन रंगमंचा'बद्दल लिहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. म्हणून आज त्याबद्दलच ...

पहिल्यांदा पाहिल्यावर सुदर्शन रंगमंच ही खूप unusual जागा वाटली होती. म्हणजे त्याला रंगमंच म्हणावं असं आतमध्ये गेल्यावरही वाटत नव्हतं. कारण आतापर्यंत मी पाहिलेल्या कुठ्ल्याच नाट्यगृहासारखं यात काहीच नव्हतं. एखाद्या सोसायटीच्या दरवाजासारखं गेट. मग पुढे गेल्यावर लाकडी बाकडे टाकून बसलेला/ली एक पुरुष/स्त्री, असतो (सोयीसाठी तो पुरुष असतो असं समजूया) जो प्रयोगाचं 'देणगीमूल्य' स्वीकारून आपल्याला 'सुदर्शन रंगमंच' लिहिलेलं जेवणाच्या कुपनसारखं छोटं चौरसाकृती तिकीट देतो. त्यावर नाट्यप्रयोगाचं नाव नसतं. (सर्वात आधी मी इथे ४० रू मध्ये प्रयोग पहिले आहेत. मग पन्नास झालं नंतर अजून वाढलं असावं. सध्या किती आहे कल्पना नाही). ७ चा प्रयोग असला की साधारणपणे ६ ला तिकीट विक्री चालू होते. तिकीट काढायचं आणि जास्त वेळ नसेल तर हॉलच्या गेटमधून बाहेर येऊन डावीकडे वळून पन्नासेक पावलांवरच्या खाऊच्या दुकानात जायचं. तिथे मिळणाऱ्या पॅटीस, घारगे वगैरे जाम भारी पदार्थांपैकी काहितरी एक चट्कन घेऊन शबनममध्ये टाकून पुन्हा सुदर्शनच्या गेटमध्ये शिरायचं. प्रयोगाला थोडासा वेळ असेल तर मात्र तिकीट घेतल्यावर बाहेर पडून उजवीकडची प्राचीन डेअरी काही सेकंद कुतूहलाने न्याहायची (नाना फडणवीस इथेच पिशवी घ्यायला यायचे म्हणतात !!) आणि मग ती ओलांडून अहिल्यादेवी शाळेसमोरच्या रसवंतीगृहात जाऊन रस प्यायचा… परत येऊन गेटच्या दोन्ही बाजूचे नोटीस बोर्ड न्याहाळत बसायचे. डावीकडच्या बोर्डवर सुदर्शनला होऊन गेलेल्या काही प्रयोगांचे फोटो असतात. उजवीकडच्या बोर्डवर सुदर्शनला होणाऱ्या एखाद्या आगामी प्रयोगाची जाहिरात असते… त्याच्या बाजूला पुण्यातल्या कुठल्याकुठल्या कॉलेजातील नाट्यमहोत्सव, सुदर्शनलाच होणारी एखादी कार्यशाळा किंवा तळमजल्यावरच्या दालनात होऊ घातलेलं प्रदर्शन, भरतला होणारा एखादा वेगळा नाट्यप्रयोग वगैरे खूप खच्चून भरलेला खजिना असतो… या बोर्ड्सच्याच रांगेत एक छोटासा लाकडी फळा आहे. त्यावर आपण जो नाट्यप्रयोग बघायला आलोय त्याचे तपशील रंगींत खडूने लिहिलेले दिसतात… जगात सगळीकडे पोस्टर्स, पत्रकं, जाहिरातफलक, फ्लेक्स असताना त्यांचं कुठलंही दडपण तो फळा अजिबात घेत नाही हे मला जाम आवडतं… बोर्ड न्याहाळताना आजूबाजूच्या गर्दीकडे नजर टाकत राहायची… अधूनमधून काही दुचाकीस्वार मोझेसप्रमाणे तो जनसागर दुभंगत तिकीटवाल्याच्या पलीकडे जाऊन तिकडच्या पार्किंग लॉटमध्ये जाऊन विरघळतो… (एकदा डॉ मोहन आगाशे आपली ‘स्पिरिट’ मोपेड घेऊन गर्दीतल्या कुणालाही धक्का न देण्याचं स्पिरिट दाखवत पलीकडे गेल्याचं पाहून जाम गंमत वाटली होती)...

सुदर्शनच्या तिकीटविक्रीची एक गंमत म्हणजे ती तिकिटं संपेपर्यंत चालत नसून जागा संपेपर्यंत चालू असते ! म्हणजे असं की एखादा चांगला प्रयोग असेल तर तिकीटविक्री चालू झाल्यावर अर्ध्या तासात बरीच तिकिटं संपतात. मग तिकीटवाल्याची थोडी चलबिचल होते. अगदी प्रयोगाच्या तोंडावर आपण धावतपळत पोचलो आणि तिकीट मागितलं तर तिकीटदाता आपल्याला थांबायला सांगतो. ऑलरेडी जवळपास सगळे प्रेक्षक जिना चढून हॉलमध्ये जाऊन बसलेले असतात. मग हॉल मध्ये आणि हॉलमधून आतबाहेरही धावपळ करणाऱ्या थेटरग्रुपमधल्याच एखाद्या नारायणाला खालून हाळी दिली जाते. तो वरून डोकावून सांगतो, अजून ५ जण बसू शकतात. मग तिकीटदाता आपल्या झोळीत तिकीट टाकतो. नवखा असलेल्याला हा जागेवर आधारित तिकीटविक्रीचा प्रयोग नवा असतो पण जिना चढून हॉलमध्ये गेल्यावर त्याला त्याचं उत्तर मिळू शकतं.

वर जाताना अचानक आजूबाजूची गर्दी विनाकारण धीरगंभीर होत जाते… गप्पा दबक्या आवाजात रूपांतरित होत जातात. (नाटक संपल्यावर किंवा दोन अंकी असेल तर मध्यंतरात तर बहुतांश मंडळी मला ‘नाट्यकलेच्या भवितव्याची चिंता' असणाऱ्या ‘न-प्रेक्षकां’सारखीच भासायला लागतात !!!), वर गेल्यावर आधी चपला स्टॅंडवर ठेवायच्या आणि 'हॉल' मध्ये जायचं .... आत गेल्यावर कळतं याला हॉल म्हणणंही धाडसाचं आहे. ही एक ताणलेली खोली आहे. समोर केवळ लाकडी लेव्हल्सचा एक platform म्हणजे इथला रंगमंच. हा रंगमंच नेहमीच्या स्टेज पेक्षा अगदीच छोटा आहे. त्यामुळे नेपथ्य निवडक ठेवणं अत्यावश्यक असतं (‘प्रायोगिक’मध्ये फार पसाऱ्याला परवानगीही नसावी). रंगमंचापुढे मोकळ्या जागेत सतरंजी टाकून ३०-४० जण मांडी दाटीवाटीने घालून बसतील इतपत सोय केलेली. लोक (म्हणजे मुख्यत्वे तरुण मंडळी) मांड्यांचे जितके वेगवेगळे कोन करून सरकासरकी, स्थलांतर वगैरे adjustment करायला तयार तितकी खाली तिकिटाच्या आशेवर असणाऱ्या नाट्यरसिकाला ते मिळण्याची शक्यता जास्त !

सतरंजीपाठीमागे चाळीसेक खुर्च्या. खुर्च्यांवर ज्येष्ठ, पोक्त, जाणकार इ. मंडळींचा राबता. मग त्यात लेखक, दिग्दर्शक, कलाकार वगैरे कुणीही पुणेरी मान्यवर सापडू शकतो. त्या खुर्च्यांमध्येच कुठेतरी कृष्णविवरात sound/light सांभाळणारे शिलेदार ('पौष्टिक जीवन' मधल्या पोष्टल कर्मचाऱ्याप्रमाणेच हेही सबंध कधीही दिसत नाहीत. प्रयोगानंतर शेवटी सर्व कलाकार तंत्रज्ञांची ओळख करून दिली जाते तेव्हा जरा उजेड असल्यामुळे आणि हे शिलेदार उभे राहिल्यामुळे दोनपंचमांश वगैरे दिसू शकतात). 'फोकस' मध्ये न येताही नाट्यकलेवरच्या निष्ठेमुळे काम करत राहण्याचं कौतुक वाटतं. ‘थिएटर’ अगदी छोटं असल्यामुळे मंचावरचा शब्दन् शब्द सर्व कोपऱ्यात ऐकू येऊ शकतो, पण म्हणून इथे ध्वनी यंत्रणेत अजिबात तडजोड नाही… अतिशय चांगल्या दर्जाची यंत्रणा इथे आहे. लाईट्समधलं आपल्याला फारसं काही कळत नाही पण आजपर्यंत लाईट्सनी कधी रसभन्ग केल्याचं आठवत नाही म्हणजे तीही व्यवस्था चोख असावी.

अर्थात या सगळ्या गोष्टी सहाय्यभूत असल्या तरी सर्वांना उत्सुकता असते ती नाट्यानुभवाची. आणि एवढं नक्की सांगेन की इथला अनुभव दीर्घकाळ लक्षात राहण्यासारखा असतो. गुडुप्प अंधार आणि मिट्ट काळोख यांच्यात उत्सुकतेने श्वास रोखून वाट पाहत बसायचं (एवढ्या शांततेत शबनममध्ये हात घालून पिशवीचा चुर्रर्र चुर्रर्र आवाज न होता घारग्याचा तुकडा तोंडात टाकणं म्हणजे खायचं काम नसतं !!! ) सतरंजीवरची जागा पटकावली असेल तर मंचावर परफॉर्म करणाऱ्यांपासून आपण अवघ्या काही हातांच्या अंतरावर असतो….. त्यांचे हावभाव आणि आवाजच काय पण त्यांचे श्वासही टिपता येतात इतका निकट अनुभव असतो तो…. मंच आणि प्रेक्षागार यांच्यातला पडदा गळून पाडणारा… इंग्रजीत ज्याला ‘इंटिमेट थिएटर’ म्हणतात असा हा सुदर्शन रंगमंच. अत्यंत अविस्मरणीय नाटकांपासून ते अत्यंत टुकार प्रयोगांपर्यंत कित्येक आविष्कार मी इथे पाहिलेत ( सुरुवातीला तर मी पाहायचो त्यातली एकाआड एक नाटकं वाईट निघायची... मी काळाच्या कितीही अंतराने बघत असलो तरीही !!! त्यानंतर काहीकाळ एकाआड एक नाटकं skip करावी असं वाटायला लागलं होतं मला ).... प्रायोगिक रंगभूमीला मुंबईत ‘छबिलदास’ हे हक्काचं स्थान होतं तसं ते पुण्यातही (कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता) मिळवून दिल्याबद्दल सुदर्शनच्या शुभांगी दामले यांचे नाट्यरसिक कायमच ऋणी राहतील… आता पुण्यात हिराबागेजवळ ज्योत्स्ना भोळे सभागृह आणि दांडेकर पुलाजवळ साने गुरुजी सभागृह देखील झाल्यामुळे प्रायोगिक नाटकांची खूपच चांगली सोय झाली आहे… तरीदेखील ‘सुदर्शन’ च्या आपलेपणाची ओढ अजूनही कमी झालेली नाहीये...

Tuesday, April 25, 2017

अभिनेता






"........ और मेरे लिये वो हर एक शख्स भगवान की तरह है, जो जरुरतमंदोंकी मदद करता है । आपको मेरा प्रणाम भाईसाहब !!" तो बुलंद आवाज सेटवर घुमला. एक सेकंदभर चिडिच्चुप शांतता पसरली.

"कट ईsssट", डायरेक्टरची आरोळी आली आणि पाठोपाठ आलेल्या पॅकअपच्या आज्ञेमुळे सेटवर स्पॉटबॉईजची आवरावरीसाठी एकच धावपळ सुरू झाली. 'तो' अभिनेता अभिनयासाठी डोळ्यात आणलेले उत्स्फूर्त अश्रू पुसत त्याच्या सेक्रेटरीला जवळ बोलवून म्हणाला, "पुढची १५ मिनिटे मला कुठलाही डिस्टर्बन्स नकोय.... डायरेक्टर आला तरीही...." आणि तडक आपल्या व्हॅनिटी व्हॅनकडे रवाना झाला. डायरेक्टर बिचारा "फँटॅस्टिक सर !" एवढे दोन शब्द उच्चारण्यासाठी व्हॅन बाहेर ताटकळत थांबला.



'त्या' अभिनेत्याला काही घेणंदेणं नव्हतं. एवढ्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने असले लाळघोटे - स्पॉटबॉयपासून डायरेक्टरपर्यंत आणि पब्लिकपासून प्रोड्युसर पर्यंत - कित्येक पाहिले होते. 'कोण कुठले कालचे आर्टिस्ट, मला फँटॅस्टिक म्हणतात लेकाचे…. आणि वर सल्ले मागतात. अरे इतकी वर्षं अभिनय जगलोय मी.... कुणीही न शिकवता... स्वतः शिका की अभ्यास करून. येतात फुकटचा गायडन्स मागायाला. आणि कसले हे डायलॉग !! मदद काय अन् भगवान काय ... !! रबिश ... ' मनातल्या मनात तो तोफ डागत होता. त्याचही तसं बरोबरच होतं म्हणा. चाळीसेक वर्षांपूर्वी तो मुंबापुरीत आला होता तेव्हा कुणीही नव्हता. स्वतःच्या कष्टांनी यशाच्या पायऱ्या चढत आज सिनेसृष्टीचं सर्वस्व बनला होता. अलीकडे काळाची पावलं बरोबर ओळखून हिरोचे रोल स्वीकारणं बंद करून अधिकाधिक सकस चरित्र भूमिका स्वीकारू लागला होता... थोडक्यात 'हिरो नंबर वन' राहिलेला नसला तरी 'अभिनेता नंबर वन' तो अजूनही होता. फक्त डोकं आभाळाला लागल्यामुळे जमिनीवरून पाय सुटले होते. उमेदीच्या काळात त्याला कुणीही मदत न केल्याचा राग अजूनही त्याच्या मनात होता. 'जे काही मी मिळवलं होतं ते कुणाच्याही मदतीशिवाय... मग बाकीच्यांना ते मिळवण्यात काय अडचण आहे' असा त्याचा सोपा युक्तिवाद होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती वाईट असणाऱ्या लोकांबद्दल त्याच्या मनात अढीच होती. 'पैशांची मदत केली की ते फुकटे बनतात. त्यांना कामं करायला सांगा... एक जण तयार व्हायचा नाही.... ' असं तो कडवटपणे म्हणायचा. 'सामाजिक बांधिलकी' वगैरे शब्द त्याच्या डिक्शनरीत नव्हते. लोणी खायचं माहिती होतं, लोणी घुसळून देणारे हात कुणाचे आहेत याच्याशी त्याला काहीही घेणंदेणं नव्हतं. आपल्यासारखा अभिनेता अजून जन्माला आलेला नाही यावर त्याचा ठाम विश्वास होता. थोडक्यात, त्याच्या दृष्टीने तो अभिनयकलेवर उपकार म्हणूनच जन्मला होता. त्याचं नाव .... जाऊदे नावात काय आहे.. नाव हवंच असेल तर समजा 'अमुककुमार' ....



बरोबर १५ मिनिटांनी तो व्हॅनिटीच्या बाहेर आला. अलोट गर्दीकडे उपकार म्हणून कटाक्ष टाकून आपल्या पॉश कारमध्ये बसून निघूनही गेला. दिवसभराचा शीण आलेला असूनही रअंतरी बेडवर पडल्यापडल्या लगेच झोप लागली नाही त्याला. कोणतीतरी अदृश्य गोष्ट त्याला बराच वेळ झोपूच देत नव्हती.


दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच लोकेशन, तोच सेट, तीच पब्लिकची गर्दी. फक्त शूटिंग संपवून निघताना मात्र वेगळाच प्रकार घडला. बाजूच्या गर्दीतून एक पोरगा सुसाट आला आणि कारकडे चालत निघालेल्या त्या अभिनेत्याला विनवू लागला,"साहेब, साहेब मदत करा नं प्लीज, खूप गरज आहे हो...." हे शब्द ऐकले मात्र तो अभिनेता त्याच्या अंगावर फिस्कारलाच.... पोरगा एकदम गांगरला. त्याचे डोळे सपाट्याने भरत चालले.. वरचे ओठ खालच्या दातात रुतवत त्याने हुंदका दाबला आणि पुढच्याच क्षणी स्वतःचेच गालफाड फोडत मागे झाला आणि बघ्यांच्या गर्दीत विरघळून गेला. इकडे अमुककुमारला कारमध्ये बसताना कसलीतरी अनामिक भावना होत होती. तो मुलगा त्याला कुणीतरी वेगळाच भासला होता. त्याच्या डोळ्यातले अश्रू आपल्या ओरडण्यामुळे आलेले वाटत नव्हते. कसल्यातरी अनामिक दुःखाचे कढ त्याच्या डोळ्यात दाटले होते. 'डोळे !! आत्ता लक्षात आलं काल आपल्याला काय छळत होतं रात्री. हिरवट आणि राखाडी रंगाचे अद्भुत मिश्रण असणारे ते डोळे ! बाजूच्या गर्दीत काल दिसलेल्या याच डोळ्यांनी आपला रात्रभर पिच्छा पुरवला होता. आता आपल्या लक्षात येतंय की आज त्या नजरेत एक आशा होती... सिग्नलवरच्या भिकाऱ्यासारखी लाचारी नव्हती. आपण आपलं त्याला नेहमीच्याच सवयीप्रमाणे हाकलून लावलं होत. छे ! हे काही बरोबर केलं नाही आपण......' आज त्या अभिनयसम्राटाला प्रथमच कुणाविषयीतरी सहानुभूती वाटत होती !


तिसऱ्या दिवशी त्याची नजर त्या मुलाला स्वतःहूनच गर्दीमध्ये धुंडाळतहोती... दिसला ! तो दिसलाच !! गर्दीत अजिबात गडबड, रेटारेटी न करता तो शांतपणे उभा होता. शूटिंग संपलं आणि अभिनेत्याने आपल्या असिस्टंटला बोलवून त्या पोराला घेऊन यायला सांगितलं. मुलगा आला. याने आपल्या खिशातून आपला शुभ्र रुमाल काढला. असिस्टंटकडून पेन घेऊन त्या रुमालावर रुबाबात सही केली आणि रुमाल त्या मुलाला देत म्हणाला, "जा, आईला दाखव. म्हणावं मी स्वतःबोलवून दिली आहे सही. रुमाल विकायचा म्हटलंस तरीही हज्जारो रुपये मिळतील तुला" 

"साहेब, स्वर्गात आवाज पोचवेल असा फोन आहे का तुमच्याकडे?", मुलगा अतिशय थंड पण प्रभावी आवाजात म्हणाला. 
अमुककुमार चरकला. आईवेगळ्या मुलाच्या आवाजात एक वेगळाच शांतपणा होता. खूपकाही सोसूनही ठामपणे उभा असल्यासारखा. आता त्याला त्या मुलाबद्दल विलक्षण कुतूहल वाटायला लागलं. तो त्याला घेऊन थेट व्हॅनिटीमध्ये गेला. बाहेरची गर्दी तशीच चरफडत राहिली. व्हॅनिटीमध्ये गेल्यावर त्याने प्रथमच आपादमस्तक न्याहाळलं. वयाने जेमतेम चौदा-पंधरा वर्षांचा असेल. शरीराने काटकुळा. दिसायला तसा सावळाच होता. त्यावर ते भेदक डोळे अत्यंत विजोड वाटत होते. केस विस्कटलेले. कपडे जुने वाटत असलेतरी स्वच्छ होते. पायात चपला नव्हत्या. कदाचित झोपडपट्टीतच राहात असावा. अमुककुमारने त्याचा लाडका प्रश्न विचारला,"माझे पिक्चर फार आवडतात का तुला ? किती आणि कुठले कुठले पाहिलेस आत्तापर्यंत ?"


मुलगा गोरामोरा झाला. मान खाली घालून तो म्हणाला, "माफ करा साहेब, आत्तापर्यंत तुमचा एकही पिक्चर पहिला नाहीये." त्याला एकदम शॉकच बसला. त्याच्या अहंकारावर जबरदस्त वार झाला होता. 

"मग इथे काय करतोयस?" त्याने करड्या आवाजात विचारले.

"माफ करा साहेब, पण पिक्चर बघायला वेळ कुठे आहे इकडे. सकाळी पेपर टाकतो, त्यानंतर दिवसभर एका छोट्या हॉटेलमध्ये काम करतो. मग रात्रशाळेत शिकायला जातो." घरचा खर्चच भागायची मारामार आहे तिथे पिक्चर कुठून बघणार ? आई नेहमी म्हणायची," जे मिळवायचे ते कष्टाने मिळव. काटकसरीने खर्च कर, आपली ऐपत नाहीये चैन करण्याची."

"मग तुला माझ्याबद्दल माहिती कशी काय मिळाली?"

"साहेब घरी एक खूप जुना छोटासा टीव्ही आहे. माझ्या वडिलांनी खूप कष्टांनी पैसे गोळा करून आणला होता. पुढे एके दिवशी ते बेपत्ताच झाले घरातून. शेजारचे म्हणतात दारूच्या नशेत असताना कुठल्यातरी गाडीने उडवलं असेल. आई मागच्या वर्षी गेल्यापासून मीच करतो माझ्या आजीचं. साहेब, माझी आजी म्हणजे जुन्या काळाची प्रसिद्ध हिरॉईन 'चंदाराणी'. दिवस फिरलं की काय होतं बघा. आज एका झोपडीत, एका अंथरुणावर दिवस काढते आहे. मला दिवसभर टीव्ही बघायला मिळत नसला तरी माझी आजी आवडीने तुमचे पिक्चर बघतबसते. 'हा खरा अभिनय' वगैरे पुटपुटत असते तुमचे काम बघताना. "तुम्हाला एकदातरी भेटायला हवंअसं म्हणत असते. ऐकता ऐकता त्या नटश्रेष्ठाच्या अंगावर मूठभर मांस चढलं. त्याचा 'अहं' दोन पायऱ्या आणखी वर चढला.


मुलगा बोलतच होता, "साहेब, परवा माझ्या आजीचा वाढदिवस. देव न करो पण हा तिचा शेवटचा वाढदिवस ठरू शकतो. मला तिला समाधानानं जगाचा निरोप घेताना बघायचंय. तिला काहीतरी भेट द्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत. साहेब, तुम्ही एकदा तिला भेटायला याल का ? एका मित्राने सांगितलं तुमचं शूटिंग इकडे सुरु आहे म्हणून आलो विनंती करायला. आलात तर फार ..." पण त्याचं वाक्य पूर्ण झालंच नाही. पुढचे शब्द अश्रूंच्या लोटात पार वाहून गेले ...समोर बसलेला तो 'नटसम्राट' ते पाहून अगदी गलबलून गेला. पिक्चरमधल्या एखाद्या भावुक सीनसाठी ग्लिसरीनशिवाय अश्रू त्याने कैकवेळा काढले होते, पण एखाद्याचं दुःख पाहून त्याचे डोळे प्रथमच आर्द्र झाले होते. त्याचा हात पाकिटाकडे गेला, हे पाहून तो मुलगा निर्धाराने म्हणाला, " नाही साहेब, पैसे नकोत. एकदा आजीला दर्शन दिलंत तरी उपकार होतील. आई म्हणायची फुकटच्या पैशांनी लाचारी येते. बघा साहेब. इच्छा झाली तर मला सांगा उद्या. मी नेईन तुम्हाला घरी." असे म्हणून तो उठला, व्हॅनिटीचं दार खटपट करून उघडून निघूनही गेला ! इकडे तो अभिनेता अगदी मूक झाला होता. इतके दिवस काचेपलीकडचं दृश्य दिसावं पण आवाज ऐकू येऊ नये असं झालं होतं त्याचं आज पहिल्यांदाच एका वंचिताची आर्त हाक त्याच्या कानावर पडली. होती त्याने त्या मुलाच्या घरी जाण्याचा निश्चय केला.




********



 "आज्जी, ए आज्जी.... घरी कोण आलंय बघ तरी." मुलाने खच्चून आरोळी ठोकली. आजी जाड भिंगाच्या चष्म्यातून एका पुराणकालीन टीव्हीवर अमुककुमारचाच जुना देमारपट बघत बसली होती. पुन्हा एकदा त्याचा अहंकार कुरवाळला गेला. टीव्हीचा आवाज फुल्ल होता. तरीही त्यातलं आजीला ऐकू कितपत येत होतं शंकाच होती. पण अमुककुमारची तक्रार नव्हती. कारण एकदा त्याने इथे यायचं ठरवलं म्हटल्यावर तिथे असेल ते असेल तसे स्वीकारायची त्याने तयारी केली होती. काळ शूटिंग संपल्यावर त्याने बाहेर ताटकळत उभ्या असलेल्यात्या मुलाला आपण त्याच्या घरी येत असल्याचं कळवलं होतं. फक्त बोभाटा नको म्हणून त्याने सोबत स्वतःची कार / व्हॅनिटी वगैरे घेतली नव्हती. कुणी ओळखू नये म्हणून मेकअपमनच्या मदतीने खोटी मिशी आणि अस्ताव्यस्त पसरलेली दाढी चिकटवून, डोक्यावरची टोपी डोळ्यांपर्यंत ओढून मेकअपमनच्याच गाडीतून तो इकडे आला होता.कुठल्याही अपेक्षेशिवाय कुणाला तरी केलेल्या मदतीचं वेगळंच सुख त्याला आज मिळत होतं .


मुलाने आजीचं लक्ष वेधून घेतल्यावर अभिनेत्याने आपली गॉगल-टोपी काढून, दाढी-मिशी उतरवली. आजी त्याच्याकडे पाहून थक्कच झाली.चष्म्याआडचे डोळे लुकलुकले, ओठ थरथरले. "बघ मी म्हणालो होतो ना तुला भेटायला त्यांना घेऊन येईन म्हणून. दे बरं मला माझं बक्षीस. आजीने त्या भारलेल्या अवस्थेतच आपल्या गळ्यातल्या धाग्याला असलेली एक चावी काढून त्या मुलाला दिली आणि अचानक एक झटका देऊन जमिनीवर कोसळली. पोरगा बावरला. तो घाईघाईत म्हणाला., "साहेब, आजी बेशुद्ध पडली आहे. आता डॉक्टरला बोलावण्यावाचून इलाज नाहीये. डॉक्टर पैशांशिवायव्हिजिटला यायला तयार होत नाहीत. या पलंगाखालच्या आजीच्या ट्रंकमध्ये आहेत थोडेसे पैसे आजीचे. इतके दिवस आज्जी म्हणायची, 'मी मेल्यावर घेऊन टाक ट्रंकमध्ये जे काही आहे ते'. पण आता इलाज नाही. ते पैसे आता काढले नाहीत तर तिच्या जिवाचं काही बरंवाईट व्हायचं." बोलता बोलता त्याने ट्रंकचं दांडगं कुलूप उघडलं. आतल्या पिशवीत डोकावून पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. "साहेब मी आलोच डॉक्टरांना घेऊन ?"असे म्हणून घराबाहेर पडलासुद्धा !



हे सगळं इतकं वेगाने झालं होतं की अमुककुमारला आणि त्याच्या मेकअपमनला काही सुधरलंच नव्हतं.मग त्यांनी म्हातारीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपून तिला थोडंसं सावधकेलं. अर्थात अजूनही अजूनही ती माणसात आल्यासारखी वाटतनव्हती. तिला उचलून त्या पलंगावर निजवून दोघेही मुलाची वाट बघतबसले होते. डॉक्टर आल्यावर त्यांनी आपल्याला ओळखू नये म्हणूनत्या अभिनेत्याने पुन्हा एकदा आपला गेटअप चेहऱ्यावर आणिडोक्यावर चढवला होता. त्याला आता त्या मुलाची काळजी वाटायला लागली होती. 'पैसे देऊनसुद्धा डॉक्टरने यायला नकार दिला असेल का? आपलं चुकलंच आपणच जायला पाहिजे होतं सोबत. इथे कुणाची मदत मागावी का? पण इथलं आपल्याला काहीच माहित नाही' तो चुळबुळत तसाच बसून राहिला.इतक्यात बाहेरून एक बाई ठणाणा करत आली अन् याच झोपडीत शिरली. झोपडीत शिरताच एका टोपीवाल्याला आणि सोबत एका लहाखुऱ्या निर्विकार माणसाला पाहून ती जरा वरमली. 

"तुम्ही पाव्हणे दिसताय?" तिने विचारले. 
"अं ? हं .... हो... म्हणजे या मुलाची अलीकडेच ओळख झाली तर ... तो म्हणाला की घरी चला, आजीला मदत करायला" अमुककुमार मूळचा आवाज शक्य तितका लपवत म्हणाला. 
"अगं बाईआजींना पुन्हा काय झालं?"
"बघा ना... काय अवस्था. एकेकाळची एवढी हिरोईन, आणि काय ही आजची अवस्था ! त्याच्या आवाजात सहानुभूती होती. 

ती बाई चकित झाली. म्हणाली "हिरॉईन ? हां हां हां ... आजींना भ्रम होतो कधीतरी. दिवसभर टीव्ही बघितल्याचा परिणाम, दुसरं काय ? बिच्चाऱ्या....वेळ तरी कसा जाणार म्हणा." अभिनेत्याला कळेना मुलानं असं सांगितलं म्हणून. 'कदाचित पोरानं उत्साहाच्या भरात सांगितलं असेल. जाऊदे. आजीची मला भेटायची इच्छा तर पूर्ण झाली ना!

"पण मी म्हणते, हा कार्टा परत गेला कुठे ?" बाईच्या गडगडाटीआवाजाने तो भानावर आला "चार दिवसांपासून आमच्या संतोषचे कपडे मागून घेतलेत, वाढदिवस आहे म्हणून. एरवी फिरत असतो कळकट कपड्यात. मी बाहेर गेले होते. परत येताना कळलं हा पठ्ठ्या घरी आलाय म्हणून तडक इकडे आले. तर हा परत गायब."  

तो पुन्हा चक्रावला. 'म्हणजे ते स्वच्छ कपडे त्याचे नाहीत? जाऊदे. बिचारा इतका गरीब आहे की, उधार मागावे लागत असतील.....' असा विचार मनाशी करून तो त्या बाईला म्हणाला, “जाऊदे हो. आईवडिलांच्या सावलीशिवाय होरपळतंय पोर. एकट्याच्या कमाईवर किती रेटणार ? शेवटी आजीच्या ट्रंकेते पैसे काढावे लागले. डॉक्टरांना बोलवायचे म्हणून." त्याच्या तोंडून उत्स्फूर्तपणे डायलॉग बाहेर पडत होते. 

बाईने चेहरा चमत्कारिक केला, "अहो बोलताय काय ? तुम्हाला काहीच माहित नाही या मुलाबद्दल? आईवडील दोघे मजुरी करतात म्हणून कसंबसं भागतंय कुटुंबाचं. हा मुडदा तर साक्षात कली आहे. बघावं तेव्हा पैशाकडे डोळा. शाळासुद्धा सोडून दिलीये. बाजूच्या नाक्यावरच्या उनाडपोरांच्या संगतीत असतो. सोळा वर्षांचाही नाही झाला अजून पण पत्त्यांचा जुगार खेळायला शिकलाय."  
तो अवाक् होऊन ऐकत होता. बाईचा पट्टा सुरूच होता. "ट्रंक उघडली म्हणता ? इतके दिवस बापासमोर आजीला चावी मागायची हिम्मत नव्हती.आई बाप गावी गेल्यावर मेल्यानं डाव साधला. आजीला खूप आमिषं दाखवली. इतके दिवस त्याही घट्ट होत्या. नातवाचे प्रताप ओळखून होत्या. मग आजच पोराला चावी कशी दिली? देवा देवा देवा .... आतलं डबोलं पळवलं का काय ? आणि माझ्या संतोषचे कपडेपण लांबवले वाटतं .... मुडद्या, कुठं फेडशील रे ही पापं!!! हरामखोरा ssss “ आणि तिची ती शिव्यांची लाखोली सुरूच राहिली. 

मेकअपमन अजूनही मख्खासारखा उभा होता. श्रेष्ठतम अभिनेत्याचा चेहरा खर्र्कन उतरला होता ... गेल्या काही वेळातल्या घडामोडींनी पार सर्द होऊन गेला होता. त्या मुलावरच्या विश्वासाच्या पायावची वीट न् वीट खिळखिळी झाली होती.'म्हणजे, इतक्या दिवसांचा त्याचा तो भावुक, व्याकुळ चेहरा ? त्याचीती आर्जवं, त्याच्या डोळ्यातून येणारं ते खळखळतं पाणी ? ते विलक्षण मॅच्युअर बोलणं ? ते सगळं ढोंग होतं ? छे छे .. हा तर त्याचा अभिनय. मलाही नाही बरं जमला तो या तोडीचा अभिनय इतक्या वर्षांत ..... !!' एकाएकी तो मट्कन खालीच बसला... इतका मोठा अभिनेताअभिनेता नंबर वन ... छे छे , अगदी अभिनयातली पहिली दहा स्थाने व्यापून बसलेला नटसम्राट तो, पण आज स्वतःच्या डोळ्यांदेखत त्यानेआपल्या डोक्यावरचा सर्वश्रेष्ठतेचा मुकुट पळवून नेताना त्या मुलाला बघितलं होतं. त्याच्यावर मात करणारा 'तमुककुमार' पंधरा वर्षांपूर्वीच जन्माला आला होता तर !!!

Thursday, April 6, 2017

स्वप्निल



'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या वृत्तीचा स्वप्निलला तिटकारा होता. खास करून स्वतःकडे अपेक्षेपेक्षा कमी असूनही त्यामध्ये संतुष्ट असणारी माणसं बघून त्याचं माथं भडकायचं. 'इतके संतुष्ट कसे राहता तुम्ही?'  तो मनातल्या मनात खेकसायचा. मी तुमच्यासारखा आहे का? माझ्यापाशी जे नाही ते मला कधीच नको इतकी क्षुद्र वृत्ती नाही माझी. माणसापाशी हवं ते सर्व असलं तर बिघडलं कुठे ?’ असं त्याला खडसावून विचारावंसं वाटायचं. पण जीभ कचरायची...
काय कारण ?
 
छे छे, ते सोडून विचारा.. 

कारण असा प्रश्न त्याने एखाद्या 'असंतुष्टा'ला विचारला असता तर स्वप्निलवर प्रतिप्रश्नाचा वार झाला असता : "का हो ? तुमच्याकडे असं काय नाही जे मिळवायला तुम्ही जीवाचा कारखाना करताय ?" स्वप्निलला या प्रश्नाची खूप भीती वाटायची. का बरं ? त्याच्याकडे काय नव्हतं ? पैसा? अं हं ! गर्भश्रीमंतीत वाढलेला नसला तरी पैशांची चणचण वगैरे नव्हतीच कधी. मग आईवडिलांचं छत्र लहानपणीच .....? तेही कारण नाही, दोघांचीही तब्येत अगदी धडधाकट. त्यांच्या लहानपणापासूनच्या संस्कारांमुळेच तो 'सुसंस्कृत नागरिक' बनला होता. .... बरं मग बुद्धिमत्ता ? शंकाच नको ... पहिल्या पाचच्या बाहेर कधी पडलाच नाही इंजिनिअर होईपर्यंत. रंगरूपाच्या बाबतीत तर लाखात एक होता. विशेष गोष्ट म्हणजे त्याचे निळेशार डोळे ! म्हणूनच कीर्तनकाराच्या तोंडी देवाचं नाव यावं तितक्या सहजतेने त्याच्या आईच्या ओठांवर स्वप्निलहे नाव आलं होतं. मग प्रकृतीचं कारण ? तिकडेही काळजी वाटावी असं काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यात येणारं सर्दी-पडसं सोडलं तर काहीही धाड भरलेली नव्हती. म्हणजे तुमच्या-आमच्या दृष्टीने त्याच्या आयुष्यात वजाबाकीपेक्षा बेरीजच जास्त होती... पण तुमच्या-आमच्या दृष्टीनेच बरं का ! त्याच्या दृष्टीने नाही ! स्वप्निलचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे.... ऐकून हसायला येईल तुम्हाला, पण तो प्रॉब्लेम म्हणजे स्वप्निलला स्वप्नंच पडत नाहीत. शू: sss !! म्हटलं ना हसू नका म्हणून ... स्वप्निल भडकेल ! त्याचा यक्षप्रश्न तुम्ही हसण्यावारी नेता ? एखाद्याला स्वप्नं पडत नाहीत ही तुमच्या आमच्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे, त्याच्यासाठी नाही. त्याने फारच मनावर घेतलंय ... अगदी शांत झोप लागते, पण स्वप्नंच पडत नाहीत म्हणून तो कासावीस झालाय !!!

याची सुरुवात लहानपणीच झाली. केव्हातरी गप्पा मारता मारता एक मित्र आपल्याला पडलेलं स्वप्न किती छान होतं, त्यात तो कसा सरबतात पोहत होता, चॉकलेटच्या लादीवर झोपताना कशी मजा आली वगैरे सांगत होता. ते ऐकून स्वप्निल बुचकळ्यात पडला. 'स्वप्न असतं तरी कसं?' या विचाराने बेचैन झाला. तो सारखा सगळ्यांना विचारायचा,"तुला स्वप्न पडतं का? काय दिसतं त्यात? स्वप्न खरं होतं का?" मलाही विचारलं होतं तेव्हा मला ते खूप विचित्र वाटलं होतं. आमची दोस्ती दूरच राहो, धड ओळखही नव्हती. त्याच्या आईबाबांनाही तो लहानपणी अक्षरश: भंडावून सोडायचा..... "सगळ्यांना स्वप्नं पडतात, मलाच का नाही ? नक्की काय होतं तेव्हा?" त्याच्या या शंकाचं निरसन व्हायचं नाही तेव्हा तो एकदम घसरायचाच, "स्वप्निलचा अर्थ माहितीये ना ? मग माझं नाव कशाला ठेवलंत ते ? 'नाव मोठं लक्षण खोटं' ही म्हण माझ्यावरूनच पडलेली असावी". दररोज सगळीकडे सांगायला/लिहायला लागणारं स्वतःचं नाव त्याला खूप टोचायचं. आई-वडील बिचारे प्रश्नांच्या वावटळीत भिरभिरून जायचे. एकच आशा होती, स्वप्निल मोठा झाल्यावर समजूतदार होईल...
स्वप्निल मोठा झाल्यावर तो समजूतदार झाला खरा, पण ते 'स्वप्न' सोडून बाकी सर्व गोष्टींमध्ये! स्वप्नाबद्दल कुणी काही बोललं, किंवा कुणी लिहिलेला लेख वगैरे वाचला, की स्वप्निल अक्षरश हिंस्र व्हायचा, मग त्याची आई मला बोलवून घ्यायची, "सुनील, तूच ये बाबा... तुझंच ऐकतो तो, तूच समजावून सांग". मग मी त्याला माणसात आणायचं काम करायचो. हळूहळू तो या प्रश्नावर उपाय शोधायच्या मागे लागला. सल्ले घेऊ लागला. पण शेकडा नव्याण्णव तर त्याची समस्या ऐकूनच हतबुद्ध व्हायचे, असमर्थता दाखवायचे... उरलेले  एक टक्का आधी रस दाखवायचे पण मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाणारी स्वप्निलची प्रश्नमालिका पाहून तेही पांढरे निशाण दाखवायचे.

हे सगळं परवापरवापर्यंत तेवढं सिरीयस वाटलं नव्हतं. पण त्याने एका संमोहन तज्ज्ञाला गाठलं, तेव्हा मात्र गांभीर्याने विचार करायला लावणारी घटना घडली. आम्ही डॉक्टर गवाणकरांकडे गेलो होतो. स्वप्निलने आपले प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टर विचारात पडले. त्यांनी काहीएक मनाशी ठरवलं आणि बोलायला सुरुवात केली, "हे पहा, स्वप्न हे अजूनही पूर्णपणे न उलगडलेलं एक कोडंच आहे. आजचं विज्ञान अजूनही या प्रश्नाच्या गाभ्यापर्यंत पोचण्यात यशस्वी झालेलं नाहीये. तेव्हा तुम्हाला...." हे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची जीभ अडखळली... कारण ती त्यांच्याच दातांमध्ये अडकली होती! संतापाने लालबुंद झालेल्या स्वप्निलची वळलेली मूठ त्या तडाख्याला कारणीभूत होती. त्याने दुसरा दणका देण्याआधीच मी त्याला कसेबसे आवरले आणि बाहेर घेऊन गेलो. त्याला कसंबसं शांत केलं आणि दिलगिरी व्यक्त करण्यासाठी पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलो. तोपर्यंत त्या अनपेक्षित अनुभवातून ते सावरत होते. आश्चर्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर संतापाचा लवलेशही नव्हता ... यापूर्वी याहून अधिक दुर्धर प्रसंगातून कदाचित ते गेले असल्याने ते सरावले असावेत. ते म्हणाले

"अशी केस मी यापूर्वी कधीही अनुभवलेली नाही. कदाचित हा प्रकार म्हणजे...."

"थांबा डॉक्टर..." मी त्यांना मध्येच थांबवलं. "हे तुम्ही मला नंतर सांगाल का प्लीज ? I am sorry पण सध्या मला स्वप्निलला सावरणे गरजेचे आहे. त्यासाठी माझे स्वप्निलसोबत असणे जास्त गरजेचे आहे" असे म्हणून मी तिथून सटकलोसुद्धा ...

आता मात्र माझ्यासमोर एकाच पर्याय होता, तो म्हणजे स्वप्निलला गुरुजींकडे नेणे ! तसं म्हटलं तर गुरुजी म्हणजे माझे आध्यात्मिक गुरू... पण इतर बुवा-बाबांपेक्षा खूप वेगळे. सदैव सकारात्मक माणूस. जेव्हा जेव्हा आयुष्यात ताणतणाव असह्य होतात तेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधतो. ते उगाच जडजंबाल शब्दांचं ओझं आपल्या डोक्यावर ठेवत नाहीत. साधं सोपंच बोलतात. त्यांच्या शब्दांत, स्वरांत एक विलक्षण ऊर्जा आहे आणि त्यांच्या बोलण्यातून ते ती ऊर्जा जणू आपल्याला देत आहेत असंच वाटत राहतं. सध्या स्वप्निलला त्यांच्याकडे घेऊन जाणं प्रकर्षाने गरजेचं आहे असं मला वाटायला लागलं आहे. त्यांच्या बोलण्याने स्वप्निलच्या मनातल्या अंधारत चाललेल्या कोपऱ्यांवर काही किरण पडतील याची मला आशा वाटते आहे

***************
२५ जून
बुधवार १९९६

आज सकाळी एकदाचे गुरुजींना भेटलो. स्वप्निलला पहिल्यांदा सांगितले तेव्हा तो तयारच नव्हता. तो म्हणाला, "माझा बुवाबाजीवर अजिबात विश्वास नाही". मग मी त्याला समजावलं, "गुरुजी म्हणजे तुझ्या कल्पनेतले जटाधारी साधू किंवा कुणी भक्त संप्रदाय असणारे मठाधिपती नाहीत. ते वेदपाठशाळेत शिकवतात. अध्यात्माचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. वेद-उपनिषदं यांच्यामध्ये सांगितलेल्या ऊर्जा संचय आणि ऊर्जा हस्तांतरण या संकल्पनांचे त्यांना सखोल ज्ञान आहे. आज आपण मॅनेजमेंटमध्ये 'Power of Positive Thinking' वगैरे खूप फंडे ऐकतो, पण या सगळ्या गोष्टींचे महत्व आपल्या संस्कृतीने पहिल्यापासूनच जाणले आहे. आत्तापर्यंत तू एवढ्या तज्ज्ञ लोकांना भेटलास ना काहीतरी वाट दिसावी म्हणून ? आता तू एकदा येऊन तरी बघ गुरुजींकडे". खरंतर मला स्वप्निलच्या डोक्यातून स्वप्नांचं खूळ काढून टाकायचं होतं. गुरुजींकडे अगदी पूर्ण समस्येचं समाधान जरी नसेल तरी ते स्वप्निलच्या विचारांना दिशा देतील याची मला खात्री होती. मी स्वप्निलला गुरुजींच्या घरी घेऊन गेलो.

गुरुजींना स्वप्निलने पाहिलं. नेहमीप्रमाणेच अतिशय साधा म्हणजे धोतर आणि सदरा असा - वेष आणि कपाळावर उभं गंध होतं. डोक्यावर जटा किंवा गळ्यात रुद्राक्षाचे सर्प नाहीत अतिशय तेजस्वी चेहरा आणि मुखावर विलसत असणारं हसू. स्वप्निलचे पूर्वग्रह गळून पडले. मी गुरुजींना आधीच भेटून स्वप्निलबद्दल कल्पना दिली होतीच. तरीही त्यांनी स्वप्निलकडून शांत चित्ताने पुन्हा त्याची व्यथा जाणून घेतली. त्याचे बोलून झाल्यावर त्यांनी शांत स्वरात बोलायला सुरुवात केली.
"मित्रा, तुझी इच्छा मला जगावेगळीच दिसते. मी पैशांचे लोभी पाहिलेत, ज्ञानप्राप्तीची प्रखर इच्छा असणारे पाहिलेत, पण स्वप्नांची आस धरणारा तू पहिलाच! तुझं नाव स्वप्निल ना?"

"हो". स्वप्निलच्या आवाजात कंप होता. त्याला अलीकडे स्वतःचे नाव उच्चारताना किंवा ऐकतानासुद्धा करवत फिरवल्यासारखं व्हायचं. कुणालाच - अगदी स्वतःलासुद्धा - हे नाव आठवू नये असं त्याला वाटायचं. 

"हं:! विधात्याचा खेळसुद्धा चमत्कारिक आहे. ज्याला स्वतःच्या नावाचा अर्थसुद्धा पुरेसा उमगू शकणार नाही त्याच्या आईवडिलांना त्याने ते नाव ठेवण्याची बुद्धी दिली. पण हे आता घडून गेलेलं आहे. पुढचं मात्र तुझ्याच हातात आहे. विचित्र नशीब आहे हे तर खरंच पण हे लक्षात घे की जीव जन्माला येताच अधिक-उण्याचा पट घेऊन येतो. जे अधिक आहे ते वाढीस लाव, त्याचा चांगला उपयोग कर. पण उण्याचं थोडं वेगळं आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे मुद्दामहून विधात्याने ठेवलेली उणीव, जी तुम्ही स्वतःहून सुधारण्याचा प्रयत्न करावा. यातूनच तुमचा उत्कर्ष होतो. स्वतःतल्या या उणीवेवर मात करण्यासाठी तुम्ही जिद्द जागवता ती आयुष्यात पावलोपावली मदत करते. दुसऱ्या प्रकारची उणीव हे तुमच्या प्रकृतीचं अभिन्न आणि अपरिवर्तनीय अंग असते. ती तुम्हाला जगात एकमेवाद्वितीय स्थान देते. जसे एखाद्याचे गुण अनेकदा अद्वितीय असतात तसे एखाद्याचे काही दोषही जगातल्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा वेगळे असतात. या प्रकारचे दोष दुरुस्त करणे सामान्य माणसाच्या हातात नसते. कोणती उणीव निराकरण करण्याजोगी आहे आणि कोणती उणीव अपरिहार्य आहे हे कळणे फार महत्वाचे असते. एकदा का या दोन्हीतला फरक कळला की स्व-उत्कर्षाचा मार्ग सापडतो. शक्य ते दोष सुधारून आणि अपरिवर्तनीय दोष अडथळ्यांच्या शर्यतीतल्या अडसरांप्रमाणे टाळून पुढे गेलं तर या दोषांचा आपल्याला काही त्रास होत नाही. माझ्यामते तुझी समस्या दुसऱ्या प्रकारातली आहे. तेव्हा तू ती स्वीकारलीस तर ....

समोर बसलेला स्वप्निल हळूहळू लाल होत होता. पण त्याने स्वतःवर ताबा ठेवत विचारलं, “पण हा सुनील म्हणाला होता की सकारात्मक विचारांच्या ऊर्जेमुळे यात बदल शक्य आहे. ही ऊर्जा वापरण्याचं तंत्र मला सांगितलंत तर मी समस्येवर विजय मिळवीन याची मला खात्री आहे.

गुरुजी हसले, ”तुझी उर्जा कोणत्याही टोकापर्यंत ताणली जाऊ शकते हे मला जाणवतंय. तुझा हट्ट खूप तीव्र आहे आणि पूर्ण ताकदीनिशी जोर लावण्याची धमक तुझ्यात आहे हे तुझ्या सान्निध्यात आल्यापासून आणि तुझे बोलणे ऐकल्यापासूनच मला जाणवत होतं. तरी तुला मी एकदा वाट बदलण्याचा सल्ला दिला. पण या इच्छेपोटी स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही तू कमी करणार नाहीस हे लक्षात येतंय माझ्या. ठीक आहे एवढा दृढ विश्वास तू जर positively वापरलास तर तुझं उद्दिष्ट तुझ्या जवळ येईल.असं म्हणून त्यांनी चित्त एकाग्र केलं. हात स्वप्निलच्या डोक्यावर ठेवला. स्वप्निलला थोडं थरथरल्यासारखं वाटलं. काही मिनिटांनी गुरुजींनी हात उचलला. ते म्हणाले, “माझ्याकडून मी माझ्या कुवतीप्रमाणे केलंय. यापुढचं तुझ्याच हातात आहे, दररोज पहाटे  एकाग्रचित्ताने अर्धा तास ओंकारध्यान करायला विसरू नकोस, तुझ्यातली सुप्त ऊर्जा त्यामुळे जागृत व्हायला मदत होईल”. 

आम्ही दोघेही गुरुजींच्या घराबाहेर पडलो. पडता पडता गुरुजींनी स्वप्निलला उद्देशून म्हटलेलं वाक्य कानावर पडलं, “हा मार्ग तू स्वखुशीनं स्वीकारला आहेस. त्यामुळे वाटेत येणारे पेचही तुझे सोबतीच होतील. त्यांच्या सोबतीची तयारी कर. न जाणो कदाचित अशी वेळही येईल की आधीचीच परिस्थिती बरी होती असं तुला वाटू शकेल.पण स्वतःच्याच तंद्रीत बाहेर पडणाऱ्या स्वप्निलला ते कितपत कळलं कुणास ठाऊक !

***************
बुधवार
३० ऑक्टोबर २००२

 “Hello, अरे सुनील .एक खुशखबर !! मला स्वप्न पडलं अगदी इतरांना पडतं तसं !!! एखाद्या पिक्चरसारखं वाटलं रे एकदम ... गुरुजींची कृपा.... तू आजच्या आज निघून ये. सुट्टी काढून ये .... अरे कसलं स्वप्न म्हणून काय विचारतोस ? सगळं इकडे आल्यावर सांगतो... वाट बघतोय तुझी..... बाय !!!खलास, फोन कट् ! मी डोळ्यांच्या खाचा रुंदावत घड्याळ बघितलं.... रात्रीचे सव्वातीन वाजले होते. मग हळूहळू कवितेचा अन्वय लागावा तसा डोक्यात प्रकाश पडू लागला. स्वप्निलला स्वप्न पडलं ! आज त्याचं नाव सार्थ झालं ! त्या नादात त्याने ओव्हरएक्साईट होऊन एवढ्या घोर रात्री फोन केला... अगदी हक्काने. त्याचा आग्रह मोडणं मला अशक्य होतं ... जणू आपण बाप झाल्याची वार्ता द्यावी तशा उत्साहात त्याने स्वप्न पडल्याची सुवार्ता मला दिली होती. आनंद, विस्मय, उत्सुकता अशा संमिश्र भावना घेऊनच मी पुन्हा झोपी गेलो.

सकाळी लवकर उठून आवरून ट्रेन गाठली. प्रवासात निवांतपणे विचार केला. स्वप्निलच्या तपश्चर्येला फळ यायला ६ वर्षं लागली होती. गुरुजींच्या भेटीनंतर बरंच काही घडलं होतं. माझी बदली झाल्याने मला दूर जावं लागलं. मध्ये फक्त एकदा स्वप्निलच्या लग्नात आमची भेट झाली होती. गुरुजींच्या भेटीनंतर आणि त्यांच्या आश्वासक शब्दांमुळे स्वप्निलचं चित्त खूप स्थिर आणि शांत झालं होतं. त्याच्यातला आत्मविश्वास पुन्हा जागा होऊ लागला होता. आयुष्याला दिशा मिळाली. लग्नाबिग्नाचे विचार करणं शक्य झालं. शिवाय लाकूड कटाई, प्लायवूड च्या family business मध्ये तो नव्या दमाने उतरला होता. त्याने जाणीवपूर्वक अनेक निराधार व गरजू  हातांना काम मिळवून दिलं होतं. या सगळ्याच्या जोडीला नियमितपणे ओंकारसाधना होतीच. आपले जुने लक्ष्य तो विसरला नव्हता. फक्त जाळणाऱ्या वणव्याचं रुपांतर आता शांत तेवणाऱ्या समईमध्ये झालं होतं. नियमितपणे गुरुजींची भेट घेतल्याचा हा परिणाम. त्यांच्या आश्वासक स्वरांत खूप बळ आहे हे मी अनुभवलं होतंच पण आता ते त्यालाही अनुभवास येऊ लागलं होतं.

 ***************

गुरुवार
३१ ऑक्टोबर २००२


आज स्वप्निलकडून परतलो. खूप समाधान वाटतंय मित्राला आनंदात पाहून. स्वप्निलला तर डोंगराएवढा आनंद झाला होता. त्याला गमतीशीर स्वप्न पडलं होतं. तो एका नावेत बसून चालला होता. पण ती नाव रिकामी होती. त्याला मनोमन वाटलं ही नाव भरलेली असायला हवी. दुसऱ्याच क्षणी नाव भरून गेली .... माणसांनी, पैशांनी, वस्तूंनी ... एवढी की त्या भाराने सगळे तळाकडे खेचले जाऊ लागले आणि स्वप्निल खडबडून जागा झाला. पण दुसऱ्या सेकंदाला त्याची भीती छू झाली आणि त्याजागी हसू उमटलं. पहिल्यांदा त्याने बायकोला जागं केलं. मग मला फोन लावला. सकाळी सकाळी गुर्जींची भेट घेऊन त्यांना वंदन केलं. गुरुजींनी आशीर्वाद देऊन म्हटलं, ”तुझ्या सकारात्मक विचारांचा आणि एकाग्रतेचा हा यशस्वी आविष्कार आहे. पण लक्षात ठेव, तटस्थपणे स्वप्नं बघ. स्वप्नांमध्ये फार काही शोधण्याचा आणि अर्थ लावत बसण्याचा उपद्व्याप करू नकोस. ते एक मृगजळ आहे.नंतर तो जेव्हा मला भेटला तेव्हा त्याने मला चक्क ट्रीट दिली. काय खुळा आहे हा ! परतीच्या प्रवासात मला खूप समाधान वाटत होतं.

***************

शनिवार
२० मार्च २००४


फुंकरीसारख्या भासणाऱ्या झुळकीचं पाहता पाहता वावटळीत रुपांतर झालं आहे. स्वप्निलच्या काळजीने माझी झोप उडाली आहे. काय करावं ? त्याला फोन करून धीर द्यावा का ? का माझ्या फोनमुळे तो आणखीनच अस्वस्थ होईल ? अरे हे काय ? त्याचाच फोन येतोय ! बापरे, माझाच घसा कोरडा पडलाय. आता कुठलं ताट वाढून ठेवलंय त्याच्यासमोर कोण जाणे.

“Hello”

“Hello, Hello... सुनील, Hello .... काहीतरी कर न अरे, ते स्वप्न माझा पाठलाग करतंय. प्लीज तू तरी काहीतरी कर ना... मी काहीही केलं तरी ते माझा पाठलागच करतंय ...  दिवसासुद्धा विश्रांतीसाठी थोडा आडवा झालो तरी तेच !! प्लीज तू काहीतरी कर....स्वप्निलचा आवाज भयानक कापरा  होता. शांत हो पाहू”, मी समजावणीच्या सुरात म्हणालो. आधी डोक्यातून negative विचार काढून टाक. आणि तू गुरुजींना का नाही भेटत ? ते काहीतरी मार्गदर्शन नक्कीच करतील”. 
त्यांच्यापुढे कोणत्या तोंडाने जाऊ रे? त्यांनी पदोपदी सांगूनही मी स्वप्नांचा अर्थ लावण्याचा खटाटोप सोडला नाही. कळत-नकळत तेच करत राहिलो आणि माझ्या सुखी आयुष्यात माती कालवली. काहीतरी कर ना प्लीज.... आत्ताचं स्वप्न तर फार भयानक होतं. आत्ताही ते माझ्या डोळ्यासमोर आहे... दोन हातांनी कुऱ्हाड परजली आहे .... अगदी कोवळे हात आहेत ते. आणि ... आणि एका मोठ्या पिंपळावर ते घाव घालत आहेत. झाड किंकाळ्या फोडतंय... खूप दुःखी आहे ते .... नाही रे ..... मस्तकात कळ येतीये नुसती... आई गं !! ते बघ ते झाड उखडलं गेलंय .... उन्मळून पडलंय.... आजूबाजूची कोवळी रोपटी चेपत ... चिरडत ... आ: .....

स्वप्निल, स्वप्निल ..... सावर स्वतःला... स्वप्निल .... अरे... खलास, फोन कट् .... बापरे त्याला माझी फार गरज आहे. उद्या सकाळी निघालंच पाहिजे....

 ***************





रविवार
२१ मार्च २००४

आख्खा प्रवासभर मी चिंतेने व्याकूळ होतो. गेल्या वर्षभरातल्या आठवणी पाठोपाठ लाटांसारख्या आदळत होत्या मनावर .. स्वप्निलच्या स्वप्नयात्रेची स्वप्नवत सुरुवात होऊन वर्ष लोटलं होतं. गुरुजींनी टाळायला सांगितलेली गोष्टच त्याच्या डोक्यात वळवळत राहिली होती. फावल्या वेळात तो आपली स्वप्नं आठवत राहायचा. अचानक त्याने एके दिवशी बातम्यांमध्ये पाहिले की मुंबईत एका माथेफिरू ट्रक ड्रायव्हरने भरधाव ट्रक चालवून एक-दोन नव्हे तर तब्बल १४ माणसे चिरडली. शेवटी मांसाच्या चिखलात रुतूनच त्याचा ट्रक थांबला. पुढचे तपशील ऐकण्यापूर्वीच स्वप्निलच्या डोक्यात ठिणगी.  तिने त्याचं स्वास्थ्य,सौख्य भस्मसात करायला सुरुवात केली होती.... हळूहळू , पण निश्चितपणे .... काही रात्रींपूर्वीच त्याने स्वप्न बघितलं होतं. एका कोपऱ्यात प्रचंड संख्येने मुंग्या जमा झालेल्या आहेत. अचानक वरून एक रासवट पाय आला आणि त्याने त्या मुंग्यांना चिरडून टाकले. ते स्वप्न टीव्हीवरच्या बातमीशी जुळत आहे असे त्याला वाटायला लागलं. या घटनेत स्वप्निलचे एक परिचित गृहस्थ जबर जखमी झाले होते. स्वप्निलने हाय खाल्ली. कृष्णपक्षातल्या चंद्रकोरीसारखा तो झिजायला लागला.

पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडलं. एक मुलगा आपल्या संघातर्फे कबड्डी खेळण्यात दंग आहे. प्रतिस्पर्ध्याच्या भागात चढाई करण्याची त्याची पाळी आहे. मध्यरेषेला वाकून नमस्कार करून त्याने प्रतिपक्षाच्या भागात मुसंडी मारली आणि असं काही आक्रमण चढवलं की समोर असलेल्या पाचपैकी तिघांना एकाच फटक्यात बाद केलं. ते हबकल्याचं पाहून तो जास्तच आत्मविश्वासाने परतू लागला..... पण ... त्यांनी त्याच्यावर वाघासारखी झडप घालून त्याला खाली पाडलं. तो तोंडावर आदळला. तरीही त्याने हात खेचून मध्यरेषेला लावण्याचा प्रयत्न खूप केला. पण काही उपयोग झाला नाही. तो बादच झाला. स्वप्न पडून गेल्यावर तिसऱ्याच दिवशी त्याला बातमी कळली, सैन्यात असणारा त्याचा चुलतभाऊ पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेवर मारला गेला. अतिरेक्यांचा पाकव्याप्त काश्मिरातील तळ उद्ध्वस्त करण्यासाठी झालेल्या गुप्त कारवाईत तो सहभागी होता. तळावर झालेल्या चकमकीत सर्व अतिरेकी नष्ट झाले असे समजून परत निघत असताना शिल्लक असलेल्या त्यांच्यातल्याच एका चिलटाने झाडलेल्या फैरींमुळे स्वप्निलचा चुलतभाऊ गंभीर जखमी झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला आपल्या हद्दीत आणण्यापूर्वीच त्याने प्राण सोडले होते... स्वप्निलला खोक पडल्यासारखं झालं. मनाला कसलीतरी खोलवर जखम झाली. सगळ्या गोष्टीतून त्याचं लक्ष उडायला लागलं. त्याच्या आईवडिलांनी समजावून पाहिलं, बायकोने शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या ३ वर्षांच्या छोट्या मुलाने समीरने - भेदरून बाबाला बिलगत "बाबा काय होतंय तुला.. माझ्याशी खेळत का नाहीस?" असं निरागसपणे विचारून झालं. पण हा कुणाला काही सांगेचना...  ते स्वप्न पाहून जेमतेम आठवडा उलटला असेल, आणि ती काळरात्र उगवली. 

बाहेर पावसाचं मंत्रपठण चालू होत. कुणालाही न दचकवता. एकही वीज चमकत नव्हती, पण सर्वत्र एक गूढ अंधार कोंदटला होता. इतक्यात ... एक वीज कानाचे पडदे भेदून जाणारा आवाज करत ढगांच्या फटीतून झेपावली एका जुनाट झाडाकडे.... निमिषार्धात झाडाची राख झाली.... झाडाला लपेटून असणाऱ्या वेलीनेही मृत्यूला कवटाळले होते ...
शॉक बसावा तसा स्वप्निल खडबडून जागा झाला. म्हणजे ? ते स्वप्न होतं ? त्याच्या घशाला भयानक कोरड पडली होती. बायको आणि मुलगा त्याची अवस्था पाहून कावरेबावरे झाले होते. ती रात्र सर्वांनीच टक्क उघड्या डोळ्यांनीच काढली..
सकाळी जड पावलांनीच स्वप्निलने आवराआवर करायला सुरवात केली. इतक्यात फोन खणखणला. त्याने फोन उचलला आणि तापलेल्या शिशासारखी ती बातमी त्याच्या कानात ओतली गेली. अमरनाथ यात्रेसाठी निघालेल्या त्याच्या आई-वडिलांच्या बसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन बस कापरासारखी पेटली होती. अमरनाथला पोचण्यापूर्वीच त्यांनी वैकुंठाचा रस्ता पकडला होता.  

स्वप्निलच्या आयष्यातले उरलेसुरले रंगही उडून गेले. लाकूडकटाई आणि प्लायवूडचा उद्योगही डळमळू लागला. मालकाची अवस्था पाहून कामगारांच्या पायातले बळही सरत चालले. म्हणूनच त्याला सांत्वनासाठी फोन करण्याच्या विचारात असतानाच त्याचा काल फोन आला आणि नव्या स्वप्नाची वार्ता घणासारखी डोक्यात घालून गेला.
शेवटी एकदाचा प्रवास संपला आणि स्वप्निलकडे पोचलो. माझ्या मिठीत शिरून तो हमसूनहमसून रडायला लागला.... त्याचे रडणे थांबेचना.... शेवटी त्याला घेऊन फिरायला किनाऱ्यावर गेलो. त्याला म्हटलं, "अरे तुझ्या पॉसिटीव्ह थिंकिंगचं काय झालं ? चांगले विचार कर ना जरा ..."

त्याचं बोलणं ऐकून मी जास्तच काळजीत पडलो. माझी ताकदच गेल्यासारखी वाटतीये रे ... ही स्वप्नं सावलीपेक्षाही जास्त सोबत करतात. परवाच्या स्वप्नाने तर माझी सगळी ऊर्जाच काढून टाकल्यासारखं वाटायला लागलंय. हवा गेलेल्या चाकासारखी माझी अवस्था झालीये.. पुढे सरकणेच शक्य नाहीये. त्या झाडात मला.... मला माझाच चेहरा दिसतोय. 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' ही म्हणच सारखी डोक्यात येतीये. कुऱ्हाड पेलणारे हात म्हणजे माझ्या समीरचेच असणार. हो.. . नक्कीच ... स्वप्नात दिसणारे हात अगदी कोवळे आहेत. समीरच माझा एक दिवस घात करणार .... माझा कुणावरच विश्वास नाही... माझा अंत अटळ आहे.. आज ना उद्या ... पण एकदम शुअर आहे माझा शेवट ... नाही... माझंच रक्त माझ्यावरच ... .." असं काहीतरी मोठ्यांदा बरळत तो एकदम धावू लागला. मी कसंबसं त्याला गाठून आवरलं. चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. घरी नेऊन झोपायला लावलं. उद्या त्याला सगळं संगतवार सांगितलं तरच त्याला ते पटेल...

*********
सोमवार
२२ मार्च २००४

स्वप्निल आज जरा सावरल्यासारखा वाटलं. मी त्याला समजावलं होतं, "स्वप्नांचा विचार डोक्यातून काढून टाक. स्वप्नं पडत नव्हती तेव्हा भुकेचं दुःख आणि आता पडत आहेत तर त्याचं अपचन, अशी तुझी अवस्था झालीये... त्यापेक्षा तुझ्या हिमतीवर तू तुझं स्वप्न खोटं पाडून दाखव. तरंच तुझी या आवर्तातून सुटका होईल. समीरवर एवढे दृढ संस्कार कर की त्याचे हात वाईट गोष्टींसाठी एकत्र न येता तुला नमस्कार करण्यासाठी एकत्र येतील. मला खात्री आहे, ही जबाबदारी तू नक्की पेलू शकशील. नियतीला खोटं पाडण्याची संधी तू सोडू नकोस" असा हेवी डोस त्याला दिला तेव्हा कुठे तो जरा सावरला. पण त्याच्या नजरेतलं शून्य अगदी अनंताला गिळू पाहणारं भासत होतं. तो मधूनमधून पुटपुटत होता, "मी स्वप्न खोटं ठरवणार ... अगदी नक्की.... हे स्वप्न मी सत्यात उतरू देणार नाही ... "
 *********

बुधवार
२४ मार्च २००४

आज डायरी लिहिताना हात कापतोय ... डोळ्यांतले अश्रू टपकून डायरीचं पान ओलं होतंय... स्वप्निलच्या स्वप्नांचा जीवघेणा प्रवास कायमचा थांबलाय..  त्याची गाडी रुळावर आणण्याच्या माझ्या विश्वासाच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत.... त्याच्या आयुष्याची गाडी खोल दरीत कोसळली आहे.... स्वप्न चुकीचं ठरवण्यासाठी त्याने नियतीला फसवण्याचा प्रयत्न केला.... असफल प्रयत्न ... 

आज सकाळी मी त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी घेऊन गेलो. कुरकुरत का होईना, तो तयार झाला ... मी स्वतःसुद्धा त्याच्या कामात रस घेतोय असं दाखवलं. उगाचच दोन-चार गोष्टींबद्दल माहिती विचारली. ती त्याने व्यवस्थित सांगितली. कामगार मंडळींनाही जरा बरं वाटलं. तो सावरल्यासारखा वाटत होता. माझ्या इथे येण्याने तुझ्यात फरक पडलेला दिसतोय. मला आता निघायला हवं. अजून सुट्टी घेणं शक्य नाहीये मला. पण तू प्लीज जिद्द सोडू नकोस. आयुष्याची लढाई तू जिंकून दाखवशील याची मला खात्री आहे. बाय बाय !"

मी निघताना तो एकच वाक्य म्हणाला, "मी स्वप्न खोटं ठरवेन." त्याच्या स्वरात कसा कुणास ठाऊक पण एक टणकपणा आला होता. मला सोडायला तो स्टेशनपर्यंत आला नाही. सॉरी, मला जरा काम आहे. तू जाशील का एकटाच ?” म्हणाला.

मी स्टेशनकडे रवाना झालो. गाडीला वेळ असला तरी तिकिटासाठी गर्दी असते म्हणून लवकरच निघालो होतो. स्टेशनवर जाऊन पाहिलं तर अजिबात गर्दी नाही !! अगदी ५ मिनिटात तिकीट मिळालं. अजून गाडीला सव्वा तास वेळ होता. platform आल्यावर कळलं की गाडी किमान तासभर उशिरा आहे  वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते. प्लॅटफॉर्मवर बसल्याबसल्या सगळ्या घडामोडींचा विचार करत बसलो. स्वप्निलने एवढ्या कठीण काळात गुरुजींची भेट घेऊन सल्ला घ्यायला हवा होता. पण सुरुवातीला गुरुजींनी सल्ला देऊनही त्याने स्वप्नांचे अर्थ लावणे सोडले नसल्याने पुढेपुढे त्याला त्यांच्याशी स्वतःहून संपर्क करावासाच वाटत नव्हता. त्याची स्वतःचीच तयारी नसल्याने मी स्वतःही गुरुजींना काही बोललो नव्हतो पण त्यांच्याशी निदान फोनवर तरी याबद्दल सविस्तर बोललंच पाहिजे असं मला वाटायला लागलं होतं. त्याच विचारांत मी गढून गेलो असताना मोबाईल वाजला म्हणून मी कुणाचा आहे ते न पाहताच उचलला ... पहिल्यांदा नुसते हुंदक्यावर हुंदके ...... मग कसाबसा आवाज उमटला.
 
"भाऊजी, प्लीज असाल तिथून परत फिरा.... स्वप्निल ... स्वप्निलने .... आ .. आत्महत्येचा प्रयत्न केलाय...." माझ्या कानात बॉम्ब फुटल्याचा मला भास झाला. डोकंच गरगरायला लागलं. कसंबसं भान ठेऊन स्वप्निलच्या घरी परतलो.... पण ... तिथे पोचेपर्यंत खेळ खलास झाला होता .... स्वप्निलला चादरीने झाकून जमिनीवर ठेवण्यात आलं होतं ... चादर रक्ताने माखलेली होती... माझं डोकंच बंद पडलं होतं .... स्वप्निलची बायको हमसाहमशी रडत होती... आपल्या जिवलग मित्राला एकदा पाहण्याची माझी इच्छा अनावर झाली आणि नकळत माझ्या हाताची यंत्रवत हालचाल झाली आणि त्याच्या डोक्यावरची चादर मी दूर केली. माझ्या मणक्यातून एक अनामिक वीज दौडत गेली. स्वप्निलची मान अर्ध्याहून अधिक चिरली गेली होती... कलिंगडासारखी ...

माझे तर पायच लटपटले. मी मट्कन बसलोच.... तशाच अवस्थेत ५-१० मिनिटं गेली... तिथे असलेल्या काही कामगार मंडळींकडून एक एक तपशील कळला : मी स्वप्निलच्या कामाच्या ठिकाणाहून निघाल्यानंतर स्वप्निलने कामात बराच रस दाखवला. "बघू, मला काम जमतंय का वूडकटिंगचं" असं कामगारांना विचारून पाहिलं. पण कुणीच त्याला कामाला हात लावू देईना. "बस साहेब, आज आरामात काम बघा फक्त. शेवटी महाशयांनी शक्कल लढवली... जीवघेणी ..

लंच टाइमला सगळे कामगार काम थांबवून निघून गेले. फक्त सुदामा नावाचा एक कामगार मात्र जाईना. त्याच कटिंगचं काम चालूच होतं . स्वप्निल प्रचंड अस्वस्थ झाला. त्याने सुदामाला जेवायला जाण्यासाठी सुचवून पाहिलं पण तो म्हणाला," साहेब अगदी थोडंच राहिलंय, तेवढं आटपून मग निवांत जेवण करतो".... स्वप्निल अस्वस्थ झाला. त्याच्या कपाळावर घाम तरळू लागला. अचानक म्हणाला, "सुदामा अरे तुझ्या पाठीमागे काय आहे ?" सुदामा कटरवरचा हात तसाच ठेवून पाठीमागे वळून पाहू लागला, मात्र स्वप्निलने क्षणार्धात वाकून आपली मान त्या कटरसमोर ठेवली. पाठीमागे पाहणाऱ्या सुदामाला प्लायवूड अचानक एवढं बदबदीत का वाटतंय म्हणून त्याने तोंड पुढे केलं तेव्हा स्वप्निलचं मस्तक धडावेगळं व्हायचंच बाकी होतं....."

सगळी कहाणी ऐकून माझं मन अक्षरशः विदीर्ण होऊन गेलं होतं. स्वप्निलच्या बायकोचं सांत्वन नक्की कशा शब्दात करावं हे न कळल्याने मी तिथेच घुटमळलो. इतक्यात माझ्या हातात एका कामगाराने एक चुरगळलेला कागद ठेवला. त्यावर परिचित तिरकस अक्षरात  लिहिलं होतं : 'माझ्या मृत्यूची जबाबदारी फक्त माझ्यावरच आहे, अन्य कुणाहीवर नाही. मला माझ्या कृतीतून सिद्ध करायचं आहे, की माझं स्वप्न खोटं होतं. कुणा  कोवळ्या हातांनी माझा जीव घेण्यापूर्वी मीच मृत्यूला मिठी मारतोय. मरता मरता नियतीवर विजय मिळवायचाय मला......' पुढे आणखीही काही होतं पण मला चिठ्ठी वाचता वाचताच घेरी आली... आणि पुढचे मी पूर्ण वाचूच शकलो नाही ... 

कुणीतरी तोंडावर पाणी मारल्यामुळे मी शुद्धीवर आलो. ग्लासभर पाणी प्यायल्यावर मला तरतरी आली. मग कळलं की स्वप्निलची बॉडी पोस्टमॉर्टेम साठी न्यावी लागणार होती.... आणखी एक विदारक आणि वेळखाऊ प्रक्रिया ! आता मला एकच लक्ष्य दिसायला लागलं होतं, ते म्हणजे आमचे गुरुजी ! स्वप्निलच्या बायकोची भेटही न घेता मी तडक गुरुजींकडे गेलो.

गुरुजींच्या घरी गेलो आणि उगीचच वाटलं, गुरुजी माझीच वाट पाहत असावेत. 
स्वप्निलच्या मृत्यूची वार्ता ऐकून गुरुजींच्या कपाळावर क्षणभर आठ्या पडल्या. त्यांना सगळं काही जमेल तसं कथन केलं . स्वप्निलला पडणाऱ्या झाडाच्या स्वप्नाबद्दल आणि चिट्ठीतल्या मजकूराबद्दल सांगितलं तेव्हा त्यांच्या ओठाच्या कोपऱ्यात एक स्मित चमकल्यासारखं वाटलं. मी तापलोच. एवढा झुरुन त्याचा अंत होण्यापेक्षा तुम्ही त्याला स्वप्नाची दीक्षा दिलीच नसती तर ?"
 
चेहऱ्यावरची शांतता ढळू न देता गुरुजींनी सुरुवात केली. "झुरत तर तो पहिल्यापासूनच होता. आहे त्यात माणूस कधीच सुखी नसतो. एखादी गोष्ट नसेल तर 'का नाही' म्हणून आणि असेल तर 'मनासारखी वापरता येत नाही' म्हणून. स्वप्निलशी पहिल्यांदा बोलतानाच जाणवलं होतं, हा माणूस वेगळ्याच मातीचा बनलेला आहे. त्याची उर्मी दाबली तर तो मातीच्या भुईनळ्यासारखा फुटेल. त्याने स्वप्नं खेचून आणताना एक चूक केली - सांगूनसुद्धा ! स्वप्नांचे अर्थ लावत बसला. स्वप्न आणि सत्यातली सीमारेषा त्याने स्वतःच्या हाताने पुसली. उत्तरोत्तर तो स्वप्नांमध्ये आणि स्वतःमध्येसुद्धा गुंतत गेला. नियतीला मुठीत पकडण्याच्या विचाराने पछाडला गेला. स्वप्नांचा अर्थ खोटा ठरवण्यासाठी त्याने स्वतःचाच बळी दिला. एकच गोष्ट चांगली - त्याच्या दृष्टिकोनातून - की जाता जाता तो समाधानाने गेला .... स्वप्न खोटं पाडल्याचं समाधान ...... "

"
म्हणजे गुरुजी, त्याने मरता मरता नियतीचा कौल धुळीला मिळवला, खरं ना ?"

गुरुजी सौम्यसे हसले. "अज्ञानात सुख असतं. स्वप्निलचं मरतानाचं सुख असंच होतं. स्वप्नांचा त्याने लावलेलाच अर्थ बरोबर होता हे त्याला कसं कळलं ? अरे, स्वप्नांचं थोडंसं ढगांच्या नक्षीसारखं असतं. तुम्ही शोधाल ते आकार दिसतात त्यात. तसं बघायला गेलो तर स्वप्नांचे अर्थ जगातल्या कुठल्या ना कुठल्या घटनेशी जुळतातच ! फक्त आपल्याला ती घटना कळली तरंच घटना खरी, आणि आपल्याला ती कळलीच नाही तर ? ते स्वप्न खोटं ? नसते अर्थ लावायला सांगितलेत कुणी ? जागेपणी आपल्याला कितीतरी घटनांचे, त्यामागच्या सूत्रांचे अर्थ लावायचे असतात. त्यांच्यापासून अराम पडावा म्हणून तर निद्रेची निर्मिती झाली आहे. त्या सुप्तावस्थेचेही अर्थ लावून 'संदर्भासह स्पष्टीकरण' देत बसाल तर जागृतावस्था आणि सुप्तावस्थेचं प्रयोजनच खोटं पाडाल.... आणि जर अर्थच लावायचा झाला तर दुसऱ्या बाजूने विचार करता स्वप्निलचं शेवटचं स्वप्न खरं ठरतंय असा निष्कर्ष काढला तर? ज्या गरजू लोकांना काम देऊन स्वप्निलने त्यांचं आयुष्य नव्याने रुजवलं होतं असे कामगार म्हणजे वृक्षाच्या आसपासची छोटी रोपटी ... उगवू पाहणारी, वाढू पाहणारी. पण स्वप्निलच्या मृत्यूने त्यांचं उभारी धरणारं आयुष्य चिरडलं गेलंय ... पुन्हा त्यांच्या भुकेल्या पोटातून भविष्याची चिंता जन्म घेईल. स्वप्निल म्हणजे त्यांना सावली देणारं झाड. कोवळ्या हातांचं म्हणशील तर त्या श्रमिक कामगारांचंच उदाहरण देईन. त्यांच्या हातात अजून पुरेसं बळ आलंच नव्हतं. किती थोडा काळ झाला होता त्यांना कामावर रुजू होऊन. दुर्दैवाने स्वप्निलचा मृत्यू ओढवला तेव्हा करवती चक्राच्या एका बाजूला स्वप्निलची मान होती आणि दुसऱ्या बाजूला एका मजुराचे एका अर्थाने कोवळे हात, स्वप्नातले ... तुला आठवतं सुनील, स्वप्निलचं पहिलं स्वप्न ? बोटीचं? त्याचा अर्थ लावू ? अर्थच लावायचा झाला तर तेच त्याचं भविष्य आरशासारखा दाखवणारं होतं. मोकळी नाव म्हणजे त्याचं स्वप्नरहित आयुष्य. अगदी मजेत चालली होती नाव. पण तीव्र इच्छेचं ओझं त्याला पेलवेना. नावेंतला भार म्हणजे स्वप्निलची स्वप्नं . नाव बुडालीच शेवटी .... प्रवाश्याला घेऊनच... नियती तुमच्यासमोर फासे टाकत असते. त्यावर जे दान पडलं असेल तशी तुमच्या आयुष्याची सोंगटी हलवायची. पडलेल्या फाश्यांवरच्या आकड्यांची बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार करत नाही ते अर्थ लावत बसलात ना, तर आयुष्याचं गणित चुकलंच म्हणून समजा... "

मी उठून मुकाट्याने मान खाली घालून बाहेर पडलो... स्वप्निलला स्वप्नांपलीकडच्या जगात पोचवण्यासाठीच्या मर्त्य जगातल्या काही शेवटच्या क्रिया अन् कर्म करण्यासाठी ...