Total Pageviews

Thursday, June 15, 2017

सुदर्शनचे दिवस

नाट्यप्रयोगांबद्दल लिहिण्यापूर्वी पुण्यातल्या प्रायोगिक नाटकांची पांढरी असणाऱ्या 'सुदर्शन रंगमंचा'बद्दल लिहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. म्हणून आज त्याबद्दलच ...

पहिल्यांदा पाहिल्यावर सुदर्शन रंगमंच ही खूप unusual जागा वाटली होती. म्हणजे त्याला रंगमंच म्हणावं असं आतमध्ये गेल्यावरही वाटत नव्हतं. कारण आतापर्यंत मी पाहिलेल्या कुठ्ल्याच नाट्यगृहासारखं यात काहीच नव्हतं. एखाद्या सोसायटीच्या दरवाजासारखं गेट. मग पुढे गेल्यावर लाकडी बाकडे टाकून बसलेला/ली एक पुरुष/स्त्री, असतो (सोयीसाठी तो पुरुष असतो असं समजूया) जो प्रयोगाचं 'देणगीमूल्य' स्वीकारून आपल्याला 'सुदर्शन रंगमंच' लिहिलेलं जेवणाच्या कुपनसारखं छोटं चौरसाकृती तिकीट देतो. त्यावर नाट्यप्रयोगाचं नाव नसतं. (सर्वात आधी मी इथे ४० रू मध्ये प्रयोग पहिले आहेत. मग पन्नास झालं नंतर अजून वाढलं असावं. सध्या किती आहे कल्पना नाही). ७ चा प्रयोग असला की साधारणपणे ६ ला तिकीट विक्री चालू होते. तिकीट काढायचं आणि जास्त वेळ नसेल तर हॉलच्या गेटमधून बाहेर येऊन डावीकडे वळून पन्नासेक पावलांवरच्या खाऊच्या दुकानात जायचं. तिथे मिळणाऱ्या पॅटीस, घारगे वगैरे जाम भारी पदार्थांपैकी काहितरी एक चट्कन घेऊन शबनममध्ये टाकून पुन्हा सुदर्शनच्या गेटमध्ये शिरायचं. प्रयोगाला थोडासा वेळ असेल तर मात्र तिकीट घेतल्यावर बाहेर पडून उजवीकडची प्राचीन डेअरी काही सेकंद कुतूहलाने न्याहायची (नाना फडणवीस इथेच पिशवी घ्यायला यायचे म्हणतात !!) आणि मग ती ओलांडून अहिल्यादेवी शाळेसमोरच्या रसवंतीगृहात जाऊन रस प्यायचा… परत येऊन गेटच्या दोन्ही बाजूचे नोटीस बोर्ड न्याहाळत बसायचे. डावीकडच्या बोर्डवर सुदर्शनला होऊन गेलेल्या काही प्रयोगांचे फोटो असतात. उजवीकडच्या बोर्डवर सुदर्शनला होणाऱ्या एखाद्या आगामी प्रयोगाची जाहिरात असते… त्याच्या बाजूला पुण्यातल्या कुठल्याकुठल्या कॉलेजातील नाट्यमहोत्सव, सुदर्शनलाच होणारी एखादी कार्यशाळा किंवा तळमजल्यावरच्या दालनात होऊ घातलेलं प्रदर्शन, भरतला होणारा एखादा वेगळा नाट्यप्रयोग वगैरे खूप खच्चून भरलेला खजिना असतो… या बोर्ड्सच्याच रांगेत एक छोटासा लाकडी फळा आहे. त्यावर आपण जो नाट्यप्रयोग बघायला आलोय त्याचे तपशील रंगींत खडूने लिहिलेले दिसतात… जगात सगळीकडे पोस्टर्स, पत्रकं, जाहिरातफलक, फ्लेक्स असताना त्यांचं कुठलंही दडपण तो फळा अजिबात घेत नाही हे मला जाम आवडतं… बोर्ड न्याहाळताना आजूबाजूच्या गर्दीकडे नजर टाकत राहायची… अधूनमधून काही दुचाकीस्वार मोझेसप्रमाणे तो जनसागर दुभंगत तिकीटवाल्याच्या पलीकडे जाऊन तिकडच्या पार्किंग लॉटमध्ये जाऊन विरघळतो… (एकदा डॉ मोहन आगाशे आपली ‘स्पिरिट’ मोपेड घेऊन गर्दीतल्या कुणालाही धक्का न देण्याचं स्पिरिट दाखवत पलीकडे गेल्याचं पाहून जाम गंमत वाटली होती)...

सुदर्शनच्या तिकीटविक्रीची एक गंमत म्हणजे ती तिकिटं संपेपर्यंत चालत नसून जागा संपेपर्यंत चालू असते ! म्हणजे असं की एखादा चांगला प्रयोग असेल तर तिकीटविक्री चालू झाल्यावर अर्ध्या तासात बरीच तिकिटं संपतात. मग तिकीटवाल्याची थोडी चलबिचल होते. अगदी प्रयोगाच्या तोंडावर आपण धावतपळत पोचलो आणि तिकीट मागितलं तर तिकीटदाता आपल्याला थांबायला सांगतो. ऑलरेडी जवळपास सगळे प्रेक्षक जिना चढून हॉलमध्ये जाऊन बसलेले असतात. मग हॉल मध्ये आणि हॉलमधून आतबाहेरही धावपळ करणाऱ्या थेटरग्रुपमधल्याच एखाद्या नारायणाला खालून हाळी दिली जाते. तो वरून डोकावून सांगतो, अजून ५ जण बसू शकतात. मग तिकीटदाता आपल्या झोळीत तिकीट टाकतो. नवखा असलेल्याला हा जागेवर आधारित तिकीटविक्रीचा प्रयोग नवा असतो पण जिना चढून हॉलमध्ये गेल्यावर त्याला त्याचं उत्तर मिळू शकतं.

वर जाताना अचानक आजूबाजूची गर्दी विनाकारण धीरगंभीर होत जाते… गप्पा दबक्या आवाजात रूपांतरित होत जातात. (नाटक संपल्यावर किंवा दोन अंकी असेल तर मध्यंतरात तर बहुतांश मंडळी मला ‘नाट्यकलेच्या भवितव्याची चिंता' असणाऱ्या ‘न-प्रेक्षकां’सारखीच भासायला लागतात !!!), वर गेल्यावर आधी चपला स्टॅंडवर ठेवायच्या आणि 'हॉल' मध्ये जायचं .... आत गेल्यावर कळतं याला हॉल म्हणणंही धाडसाचं आहे. ही एक ताणलेली खोली आहे. समोर केवळ लाकडी लेव्हल्सचा एक platform म्हणजे इथला रंगमंच. हा रंगमंच नेहमीच्या स्टेज पेक्षा अगदीच छोटा आहे. त्यामुळे नेपथ्य निवडक ठेवणं अत्यावश्यक असतं (‘प्रायोगिक’मध्ये फार पसाऱ्याला परवानगीही नसावी). रंगमंचापुढे मोकळ्या जागेत सतरंजी टाकून ३०-४० जण मांडी दाटीवाटीने घालून बसतील इतपत सोय केलेली. लोक (म्हणजे मुख्यत्वे तरुण मंडळी) मांड्यांचे जितके वेगवेगळे कोन करून सरकासरकी, स्थलांतर वगैरे adjustment करायला तयार तितकी खाली तिकिटाच्या आशेवर असणाऱ्या नाट्यरसिकाला ते मिळण्याची शक्यता जास्त !

सतरंजीपाठीमागे चाळीसेक खुर्च्या. खुर्च्यांवर ज्येष्ठ, पोक्त, जाणकार इ. मंडळींचा राबता. मग त्यात लेखक, दिग्दर्शक, कलाकार वगैरे कुणीही पुणेरी मान्यवर सापडू शकतो. त्या खुर्च्यांमध्येच कुठेतरी कृष्णविवरात sound/light सांभाळणारे शिलेदार ('पौष्टिक जीवन' मधल्या पोष्टल कर्मचाऱ्याप्रमाणेच हेही सबंध कधीही दिसत नाहीत. प्रयोगानंतर शेवटी सर्व कलाकार तंत्रज्ञांची ओळख करून दिली जाते तेव्हा जरा उजेड असल्यामुळे आणि हे शिलेदार उभे राहिल्यामुळे दोनपंचमांश वगैरे दिसू शकतात). 'फोकस' मध्ये न येताही नाट्यकलेवरच्या निष्ठेमुळे काम करत राहण्याचं कौतुक वाटतं. ‘थिएटर’ अगदी छोटं असल्यामुळे मंचावरचा शब्दन् शब्द सर्व कोपऱ्यात ऐकू येऊ शकतो, पण म्हणून इथे ध्वनी यंत्रणेत अजिबात तडजोड नाही… अतिशय चांगल्या दर्जाची यंत्रणा इथे आहे. लाईट्समधलं आपल्याला फारसं काही कळत नाही पण आजपर्यंत लाईट्सनी कधी रसभन्ग केल्याचं आठवत नाही म्हणजे तीही व्यवस्था चोख असावी.

अर्थात या सगळ्या गोष्टी सहाय्यभूत असल्या तरी सर्वांना उत्सुकता असते ती नाट्यानुभवाची. आणि एवढं नक्की सांगेन की इथला अनुभव दीर्घकाळ लक्षात राहण्यासारखा असतो. गुडुप्प अंधार आणि मिट्ट काळोख यांच्यात उत्सुकतेने श्वास रोखून वाट पाहत बसायचं (एवढ्या शांततेत शबनममध्ये हात घालून पिशवीचा चुर्रर्र चुर्रर्र आवाज न होता घारग्याचा तुकडा तोंडात टाकणं म्हणजे खायचं काम नसतं !!! ) सतरंजीवरची जागा पटकावली असेल तर मंचावर परफॉर्म करणाऱ्यांपासून आपण अवघ्या काही हातांच्या अंतरावर असतो….. त्यांचे हावभाव आणि आवाजच काय पण त्यांचे श्वासही टिपता येतात इतका निकट अनुभव असतो तो…. मंच आणि प्रेक्षागार यांच्यातला पडदा गळून पाडणारा… इंग्रजीत ज्याला ‘इंटिमेट थिएटर’ म्हणतात असा हा सुदर्शन रंगमंच. अत्यंत अविस्मरणीय नाटकांपासून ते अत्यंत टुकार प्रयोगांपर्यंत कित्येक आविष्कार मी इथे पाहिलेत ( सुरुवातीला तर मी पाहायचो त्यातली एकाआड एक नाटकं वाईट निघायची... मी काळाच्या कितीही अंतराने बघत असलो तरीही !!! त्यानंतर काहीकाळ एकाआड एक नाटकं skip करावी असं वाटायला लागलं होतं मला ).... प्रायोगिक रंगभूमीला मुंबईत ‘छबिलदास’ हे हक्काचं स्थान होतं तसं ते पुण्यातही (कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता) मिळवून दिल्याबद्दल सुदर्शनच्या शुभांगी दामले यांचे नाट्यरसिक कायमच ऋणी राहतील… आता पुण्यात हिराबागेजवळ ज्योत्स्ना भोळे सभागृह आणि दांडेकर पुलाजवळ साने गुरुजी सभागृह देखील झाल्यामुळे प्रायोगिक नाटकांची खूपच चांगली सोय झाली आहे… तरीदेखील ‘सुदर्शन’ च्या आपलेपणाची ओढ अजूनही कमी झालेली नाहीये...