Total Pageviews

Saturday, July 9, 2022

‘असत्यमेव जयते...?’ : न सांगितला गेलेला इतिहास



"विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला 'आवरण' म्हणतात आणि असत्य बिंबवणाऱ्या कार्याला 'विक्षेप' असे म्हटले जाते." असे प्रख्यात कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांच्या 'आवरण' या कादंबरीच्या सुरुवातीलाच नमूद केले आहे. आधुनिक काळातील भारतीय समाजमनाच्या जडणघडणीकडे नजर टाकली असता अशा 'विक्षेपां'नी भारतीय समाजमन गढूळ करून टाकल्याचे दिसून येते. संतापजनक गोष्ट ही आहे की गेली अनेक वर्षे सुनियोजित संस्थात्मक प्रयत्नांमधून असत्याची रंगसफेदी चालू आहे. हे आवरण दूर करण्यासाठी ऐतिहासिक तथ्यांची सप्रमाण मांडणी करून ती धीटपणे लोकांसमोर ठेवण्याची गरज आहे. भारतीय इतिहासावरची असत्याची पुटे पुसून टाकण्याचा असाच एक प्रभावी प्रयत्न म्हणजे अभिजित जोग यांचे 'असत्यमेव जयते..?'  हे पुस्तक. सव्वाचारशे पानांचे हे पुस्तक म्हणजे हिंदूंना, भारताला कमी लेखण्यासाठी केलेल्या गेलेल्या कुटील प्रयत्नांचा ठाम तरीही संयत भाषेत केलेला पंचनामा आहे. 

 

आर्य आक्रमणाचा सिध्दांत

भारताच्या इतिहासासंबंधी कृत्रिमरित्या निर्माण केल्या गेलेल्या प्रश्नांबद्दल विस्ताराने सांगणारी एकूण सात प्रकरणे या पुस्तकामध्ये आहेत. त्यापैकी पहिले प्रकरण म्हणजे भारतामध्ये धगधगत ठेवल्या गेलेल्या अनेक वादांचे मूळ असणारा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत’. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आर्य आक्रमक पश्चिमेकडून भारतात आले आणि त्यांनी येथील मूलनिवासी द्रविड लोकांना दक्षिणेकडे हाकलून दिलेहा सिद्धांत पद्धतशीरपणे फक्त भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या गळी उतरवला गेला आणि एकदा हा सिद्धांत प्रस्थापित झाल्यावर मग त्याचा पदर धरूनच उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय, हिंदी विरुद्ध तमिळ, आक्रमक उच्चवर्णीय विरुद्ध मूलनिवासी बहुजन असे अनेक नवनवीन वाद जन्माला घातले गेले. त्यांचे अनेक दुष्परिणाम आपला देश आजपर्यंत भोगतो आहे आणि हे वाद सोडवण्यामध्ये आपला प्रचंड वेळ आणि शक्ती खर्च करत आहे. 

या आर्य आक्रमण सिद्धांताचा विस्तृत वेध घेताना लेखकाने त्याचे अनेक पैलू अगदी विस्ताराने उलगडून दाखवले आहेत. आपल्या गोऱ्या कांतीची, तथाकथित सुसंस्कृतता आणि वंशश्रेष्ठत्वाची घमेंड मिरवणाऱ्या युरोपीय साम्राज्यवाद्यांना आम्हाला तुमच्यावर राज्य करण्याचा हक्क आहेहे बिंबवण्यासाठी विशिष्ट सैद्धांतिक भूमिकेच्या गरजेतून आर्य आक्रमण सिद्धांतमांडला गेला होता. यासाठी आधार घेतला गेला होता, भारतापासून युरोपपर्यंतच्या प्रमुख भाषांमध्ये असलेल्या काही मूलभूत साम्याचा. आज या भाषा इंडो-युरोपियनभाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भाषांमध्ये संस्कृतपासून आलेले अनेक शब्द आहेत. लेखक म्हणतो इंग्रजांसमोर उभा राहिलेला प्रश्न मोठा अवघड होता. संस्कृत आणि इतर भारतीय भाषांचे ग्रीक, लॅटिनसकट युरोपीय भाषांशी असणारे साधर्म्य नाकारता येत नाही, पण त्याचबरोबर युरोपीय भाषांशी नाते असलेली प्रगत भाषा गुलामगिरीसाठी जन्म झालेल्या भारतीय लोकांनी विकसित केली हे मान्य करणे तर अशक्यच. या अवघड प्रश्नांवर त्यांनी एकदम सोपे उत्तर काढले, ते म्हणजे आर्यन इन्व्हेजन थेअरी’. या थेअरीनुसार पश्चिमेकडून आलेल्या गोऱ्या आर्यांनी भारतातील मागासलेल्या काळ्या मूलनिवासी लोकांचा पराभव करून वेदांची व वेदिक धर्माची निर्मिती केली. पराभूत मूलनिवासी लोकांनी आपली संस्कृती आणि भाषा सोडून आक्रमक आर्यांची भाषा आपलीशी केली आणि त्यातून इंडो-युरोपियन भाषा समूहात मोडणाऱ्या आधुनिक भारतीय भाषांची निर्मिती झाली.” 

जर्मन विद्वान मॅक्समुलर याने आर्य आक्रमणाचा काळ कुठलाही ठोस पुरावा नसताना इ.स.पू. १५०० असा तर ऋग्वेद निर्मितीचा काळ इ.स.पू. १२०० असा ठरवला. ऋग्वेदात उल्लेख असलेली सरस्वती नावाची कुठली नदी अस्तित्वात नव्हतीच असे सांगण्यात येऊ लागले. अर्थात जसजसे शास्त्र विकसित होत गेले तसतसे अनेक ठिकाणी उत्खनन होऊ लागले. त्यातून आक्रमणया शब्दाला वजन येऊ शकेल असे काही मिळेना. मग आर्य आक्रमणऐवजी आर्य स्थलांतरअसा शब्दप्रयोग सुरू झाला. पण आर्य बाहेरचेचया सिद्धांताला चिकटूनच राहायचे ठरले होते. भारत हे एक राष्ट्र आहे यावर कदापिही विश्वास नसणाऱ्या डाव्यांनी हे सगळे उचलून धरले नसते तरच नवल. 

विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीने मात्र आर्य आक्रमणाच्या ठिसूळ सिद्धांताला कसा सुरुंग लागत गेला याचे लेखकाने केलेले विवेचन अत्यंत वेधक आहे. जेनेटिक्स, भाषाशास्त्र अशा ज्ञानशाखांमधील नवनवीन संशोधन या सिद्धांताच्या फोलपणावर प्रकाश पाडू लागले’. इ.स.पू. २०००च्या सुमारास लुप्त झालेल्या सरस्वतीचे अस्तित्व कृत्रिम उपग्रहांच्या सहाय्याने शोधता आले. ज्या अर्थी सरस्वती इतक्या पूर्वी अस्तित्वात होती त्या अर्थी ऋग्वेद निर्मिती त्याही आधीची, त्यामुळे आर्य इ.स.पू १५००मध्ये भारतात आले आणि मग वेद्निर्मिती झाली हा दावा पोकळ ठरतो. दुर्दैव हे की आजही भारताचे हितशत्रू आर्य आक्रमण सिद्धांताचाच प्रसार करतात. 

 

पाच शतकांचा तिखट प्रतिकार

पुस्तकातील दुसरे प्रकरण आहे पराभूत आहे जगती पुत्र भारताचा?’. यामध्ये इसवीसनपूर्व काळापासून अगदी इंग्रज येईपर्यंत भारतावर झालेल्या आक्रमणांचा लेखाजोखाच मांडला आहे. भारतावरचे पहिले ज्ञात आक्रमण इ.स.पू. ८१० मध्ये असिरीयन राणी सेमिरॅमिस हिचे होते. परंतु तेव्हापासून भारतामध्ये परकीय आक्रमकांना अनेकदा धूळ चारली गेली. अलेक्झांडरसारखा महापराक्रमी सम्राट भारतात संपूर्ण पराभूत झाला नसला तरीही फारसा यशस्वीही होऊ शकला नाही. पोरससोबतच्या लढाईनंतर भारतात बस्तान न बसवता तो निघूनच गेला. पुढेही शक, कुशाण, हुणांनी आक्रमणे केली ते एकतर पराभूत होऊन परत गेले किंवा भारतीय संस्कृतीच्या प्रवाहात विरघळून गेले. इसवी सनाच्या सातव्या शतकाममधील इस्लाम धर्माच्या स्थापनेनंतर अरबांच्या पाशवी आणि प्रबळ आक्रमणापुढे आजूबाजूच्या प्रदेशांतील ज्यू, ख्रिश्चन आणि ख्रिस्ती संस्कृती पाचोळ्यासारख्या उडून गेल्या. इस्लामी सत्तेच्या उद्याच्या या कालखंडात मुस्लिमांच्या पहिल्या दोन खलिफांच्या आशीर्वादाने आपल्या सेनापतींना भारत पादाक्रांत करायला आले, परंतु त्यामध्ये त्यांचे दारूण पराभव झाले. इ.स ७१२ मध्ये मोहम्मद बिन कासीम याने केलेले आक्रमण हे भारतावरचे पहिले यशस्वी इस्लामी आक्रमण. त्यानंतर भारत परचक्रापुढे पराभूत होत गेला असे आपल्याला सांगितले जाते. परंतु सत्य हे आहे की, इ.स. १२०३ पर्यंत इस्लामी आक्रमकांना भारतामध्ये बस्तान बसवताच आले नाही. यासाठी कारणीभूत असणाऱ्या अनेक भीमपराक्रमी हिंदू राजांविषयी या पुस्तकात उत्तम माहिती दिली आहे. नागभट्ट, बाप्पा रावळ, राजा रत्नपाल, जयपाल, भीमपाल, विद्याधर, पृथ्वीराज, नरसिंहदेव, हमीरसिंह, राणा कुंभ, लाचित बडफुकन, असे एकाहून एक वरचढ नरशार्दूल इस्लामी आक्रमकांना धूळ चारत राहिले. विशेष गोष्ट म्हणजे नायकीदेवी, कुर्मादेवी, कर्णावती, रामप्यारी अशा स्त्रियांनीही आक्रमकांशी यशस्वी लढे दिले! पराक्रमी स्त्रियांची पुस्तकामधली उदाहरणे वाचून अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. डाव्या इतिहाकारांचा एक लाडका सिद्धांत असतो, तो म्हणजे भारतातील उच्च जातींच्या जाचाला कंटाळेललेल्या बहुजन समाजाने मुस्लिम धर्मातील बंधुभावाच्या शिकवणीमुळे प्रभावित होऊन मुस्लिम अकरामाकांचे स्वागत केले’. परंतु हा सिद्धांत लेखक सोदाहरण खोडून काढतो. इ.स. १०३४ मध्ये बहराईचच्या लढाईमध्ये तुर्कांना धूळ चारणारा भीमपराक्रमी सुहेलदेव मागास समजल्या गेलेल्या पासी समाजातील होता, एवढेच नव्हे तर त्याने बहुजन समाजातील तब्बल एकवीस राजे एकत्र आणले होते. कामरूपचा राजा पृथू याने वनवासी जमातींच्या सैन्यासह नालंदा विद्यापीठाचा विध्वंस करून आलेल्या बख्तियार खिलजीला पळवून लावले. इस्लामी आक्रमणाला येथील सर्व जातीजमातींनी धर्मनिष्ठा प्रकट करत कसा तिखट प्रतिकार केला याची ही तेजस्वी उदाहरणे आहेत.  

या प्रखर प्रतिकाराचा परिणाम असा झाला की, सुरुवातीच्या सव्वाशे-दीडशे वर्षांमध्ये अरबस्तान, उत्तर आफ्रिका, स्पेन-पोर्तुगाल, इराण, मध्य आशिया एवढा प्रचंड भूभाग व्यापणाऱ्या इस्लामला भारतामध्ये लक्षणीय आणि चिरस्थायी सामरिक यश मिळवायला तब्बल साडेपाचशे वर्षे जावी लागली. भारतासाठी एवढे महान कार्य करणाऱ्यांबद्दल प्रकरणाच्या कृतज्ञता व्यक्त करताना लेखक म्हणतो आपल्या प्राचीन संस्कृतीचा प्रवाह खंडित होऊ नये यासाठी पिढ्यानपिढ्यांनी किती कठोर संघर्ष केला याची जाणीव ठेवली तरच आपण हा प्रवाह यापुढेही असाच अखंड ठेवू शकू” 

नकारविकृती

नकार विकृती : जे सोयीचं नाही ते घडलंच नाहीया तिसऱ्या प्रकरणामध्ये इतिहासात घडलेल्या वंशविच्छेद, जातीय संहार, कत्तली, संघटीत विध्वंस यासारख्या अमानवी अत्याचाराच्या आठवणी जर संबंधित गटांना गैरसोयीच्या, हानिकारक ठरत असतील तर त्या घडल्याच नाहीत असे प्रतिपादन करून त्यांचे इतिहासातील अस्तित्व नाकारणेअशा वृत्तीवर प्रकाश टाकला आहे. या वृत्तीलाच लेखकाने नकारविकृतीकिंवा निगेशनिझमसंबोधले आहे. ज्यूंचा नाझींनी केलेला नरसंहार आणि इस्लामी आक्रमकांनी हिंदूंचा शतकानुशतके केलेला संहार आणि शोषण हे जागतिक इतिहासातले दोन काळे अध्याय. परंतु त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातला दुटप्पीपणा या प्रकरणामध्ये अधोरेखित केला आहे. जर्मनीमध्येही ज्यूंचे हत्याकांड अतिरंजित केले आहेअसे म्हणणारे काही गट असले तरी त्यांचा आवाज अतिशय क्षीण आहे. उलट सरकारदरबारी या पापाची कबुली दिली जाऊन तसे पुन्हा होऊ नये यासाठी ज्यू हत्याकांडांची भीषणता अधोरेखित करणारी स्मारके, संग्रहालये उभारली आहेत. भारतात मात्र सामाजिक सलोखा बिघडेलया सबबीखाली भूतकाळातल्या अप्रिय गोष्टींकडे कानाडोळा केला गेला. स्वातंत्र्योत्तर काळात कॉंग्रेसने सुनियोजित पद्धतीने नकारविकृती कशी रुजवली, त्याला इस्लामवादी, साम्यवादी यांची साथ कशी लाभली याचे लेखकाने विवेचन केले आहे, ते वाचताना संताप, वेदना, हताशपणा यांचे सावट मनावर पसरते. 

प्रतिमानिर्मिती

पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणात सम्राट अशोक आणि अकबर बादशहा यांच्या प्रतिमानिर्मितीसाठी झालेल्या प्रयत्नांचा वेध घेण्यात आला आहे. अहिंसेचे प्रतीक सम्राट अशोक, सर्वधर्मसमभावाचे प्रतीक सम्राट अकबर आणि या दोन्ही मूल्यांचा संगम ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे असे आधुनिक भारताचे भाग्यविधाते, अनभिषिक्त सम्राट नेहरू यांचा उदोउदो आणि प्रतिमा निर्मितीचे काम मोठ्या प्रमाणत सुरू झालेअसा आरोप लेखक करतो. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कलिंग युद्धातील संहार बघून त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि अहिंसेचे तत्व जगू लागला असे सांगितले गेले. परंतु  कलिंग युद्धाआधीच दोन वर्षे अशोकाने बौद्धधर्म स्वीकारलेला असल्याने तो बौद्ध झाल्यानंतर अहिंसक झालाहा दावा खरा नसल्याचे लेखक नमूद करतो. अकबर सहिष्णू होता हे ठसवण्यासाठी त्याने आयुष्याच्या पूर्वार्धात केलेली अमानुष हत्याकांडे, मंदिरांची नासधूस यावर पांघरूण घातले गेले, हे लेखक अधोरेखित करतो. 

सूफी पंथ : शांततेचा आभास

पाचव्या प्रकरणाचे शीर्षक आहे सूफी.. यू टू?’ भारतामधील इस्लामचे सहिष्णू चित्र रंगवण्याचा सगळ्यात मोठा कुंचला सूफी पंथहा आहे. इस्लाममधील एकेश्वरवादाशी फारकत घेत अद्वैत तत्वज्ञानाशी साधर्म्य सांगणारा हा पंथ आहे हे खरे आहे. परंतु इस्लामशी द्रोह केल्याबद्द्ल सुरुवातीच्या काळामध्ये सूफी संताना असे काही झटके दिले गेले की, त्यानंतर सूफी पंथियांनी आपला तोंडवळा इस्लामच्या रूढ चेहऱ्यापेक्षा वेगळा ठेवूनही अंत:करणात आक्रमक आणि विस्तारवादी इस्लामच जोपासला. इस्लाममध्ये वर्ज्य असणाऱ्या संगीत, नृत्य या गोष्टी जोपासणाऱ्या सूफी पंथाने भारतातील अनेक हिंदूंवरही प्रभाव पाडला होता. परंतु असा प्रभाव पाडणाऱ्या सूफी संतांची हिंदूधर्म, परंपरा, लोक यांच्याबद्दलची मते किती विषारी होती हे खुद्द त्या सूफी संतांच्याच तोंडून आलेल्या उद्गारांच्या सहाय्यानेच लेखकाने दाखवून दिले आहे. उदा. निजामुद्दीन अवलिया म्हणतो, “पाखंडी लोकांना (हिंदूंना) मृत्यूनंतर शिक्षा भोगावी लागेल”, ख्वाजा मोईनुद्दिन चिश्ती हा महंमद घोरीसोबत जिहादमध्ये सामील होण्यासाठी भारतात आला होता. अजमेरची सगळी मंदिरे जमीनदोस्त करण्याची त्याने शपथ घेतली होती. अमीर खुस्रो हा भारतीय काविमनावर मोठा पगडा असलेला सूफी संतकवी. १३०३ साली चितोडवर विजय मिळवताना खिजर खानाने केलेल्या ३०००० हिंदूंच्या कत्तलीबाद्द्ल त्याने अल्लाचे आभार मानले होते. पाचव्या प्रकरणातली अशी अनेक उदाहरणे वाचून सूफी संतांबद्दल तिरस्कार निर्माण झाला नाही तरच नवल. 

सहाव्या प्रकरणात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताचे सांस्कृतिक आणि आर्थिक मागासलेपण नक्की कशा स्वरूपाचे होते, त्याची कारणे कोणती, ते कसे लादले गेले याचे विवेचन केले आहे. काळाच्या ओघात भारतीय समाजात रुजलेल्या वाईट प्रथांना लेखकाने स्पष्ट शब्दांत अव्हेरले आहेच, पण त्याचबरोबर बालहत्या, सतीसारख्या अमानुष प्रथांमधला तथ्याचा भाग किती आणि वाढवून सांगितलेल्या गोष्टी किती याचीही चर्चा केली आहे. अधिक खोलात शिरल्यावर हे दिसून येते की इंग्रजाच्या राजवटीमध्ये मिशनऱ्यांनी धर्मप्रसारासाठी येथील जमीन भुसभुशीत करण्यासाठी राज्यकर्त्यांच्या संगनमताने हिंदू धर्माला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. सतराव्या आणि  अठराव्या शतकात भारताबद्दल अनेक चांगल्या गोष्टी लिहून ठेवणाऱ्या इंग्रजांनी पुढे एकोणिसाव्या शतकात धर्मप्रसाराचे उद्दिष्ट ठेवल्यावर मात्र अचानक भारतातल्या प्रथांबद्दल आरडाओरडा सुरू करणे रंगवणे हा एका षड्यंत्राचाच भाग होता, हे लेखक दाखवून देतो. 

रणावीण स्वातंत्र्य देशा मिळाले?

चरखा चालवून सूत नक्की मिळतं, पण स्वातंत्र्य ?’ या शीर्षकाचे सातवे प्रकरण म्हणजे फक्त अहिंसेच्या मार्गानेच देशाला स्वातंत्र्य मिळालेया वर्षानुवर्षे केल्या गेलेल्या अपप्रचाराचा पंचनामा आहे. त्यासाठी लेखकाने विविध क्रांतिकारकांची कामगिरी, आझाद हिंद सेनेची देदिप्यमान कामगिरी, १९४५ साली झालेले नाविकांचे आणि अन्य सैन्यदलांचे बंड अशा महत्वाच्या घटनांचे पैलू उलगडून  स्वातंत्र्यलढ्यावर झालेल्या त्यांच्या सखोल परिणामांवर भाष्य केले आहे. यातून दे दी हमे आझादी, बिना खड्ग बिना ढालहा प्रचार किती असत्य आहे हेच दिसून येते. लेखक गांधीजींच्या चांगल्या गुणांचे त्यांना श्रेय नाकारत नाही, पण गांधीजींच्या मुस्लिम अनुनयाचे परिणाम किती खोल झाले हेही दाखवून देतो. 

पुनरावृत्ती टाळण्यासाठी...

ही सगळी चर्चा आताकशाला हे शेवटचे प्रकरण म्हणजे हे या पुस्तक लेखनामागची भूमिका कोणती, याचे विस्तृत विवेचन आहे. कुठलीही समस्या सोडवण्यासाठी सर्वप्रथम समस्या आहेहे मान्य करणे आवश्यक असते, तरच तिच्यावर उत्तर मिळू शकते हे सांगताना लेखक म्हणतो “... कधी तरी सच का सामनाकरावाच लागतो. सत्याला सामोरं जाऊन त्याच्याशी निगडित प्रश्नांचा आणि भावनांचा निचरा केला नाही तर गाडलेली भुते कधीतरी आपल्यासमोर येऊन उभी राहतातच.पण एखाद्या समाजाला दुखवायचे नाही, या सबबीखाली भारताच्या इतिहासात अशा अनेक समस्या, चुकांना सतरंजीखाली ढकलण्यात आले. या सगळ्याची पुनरावृत्ती भविष्यात टाळायची असेल तर सत्य सर्वांसमोर सांगितले जायलाच हवे हे लेखक आग्रहाने सांगतो. 

असत्याचाच नेहमी विजय होतोअशी निराशेची भावना भारतीयांमध्ये उद्भवू द्यायची नसेल तर ऐतिहासिक सत्य झाकण्यासाठी केलेले प्रयत्न हाणून पाडले गेले पाहिजेत. त्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय महत्वाचे आहे. समकालीन नोंदी, इतिहासप्रसिद्ध व्यक्तींची निरीक्षणे, विश्वासार्ह ग्रंथांमधील उद्धृते यांच्या आधारे केलेली पुस्तकाची मांडणी यांमुळे प्रस्तुत पुस्तकाला संदर्भग्रंथाचे महत्व प्राप्त झाले आहे. पानांचा उत्तम दर्जा, सुस्पष्ट आणि निर्दोष छपाई यामुळे हे पुस्तक केवळ वाचनीयच नाही तर संग्राह्यही झाले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठही बोलके आहे. भारतीयांच्या डोळ्यांवर वर्षानुवर्षे बांधलेली अज्ञानाची पट्टीच त्यात दाखवली आहे. ही अज्ञानाची, आत्मविस्मृतीची पट्टी दूर करण्यासाठी असत्यमेव जयते..?’ सारखी पुस्तके अधिकाधिक प्रमाणात यायला हवीत. 

 

असत्यमेव जयते...?’

लेखक : अभिजित जोग

प्रकाशक : भीष्म प्रकाशन

पृष्ठसंख्या : ४३५

किंमत : ५९९ रु.

******

(जुलै महिन्याच्या 'हिंदुबोध' मासिकामध्ये पूर्वप्रकाशित लेख.

हा लेख संक्षिप्त स्वरुपात 'मुंबई तरुण भारत'मध्ये १० जुलै २०२२ रोजी प्रकाशित झाला : 

https://www.mahamtb.com/Encyc/2022/7/9/Artical-on-Asatyamev-Jayate.html)