Total Pageviews

Wednesday, May 15, 2013

'गृहित'क मोडताना

गेल्या वर्षीच्या चित्रपटांमध्ये मला बर्फी, वासेपूर, तुकाराम, काकस्पर्श खूप आवडले, पण काळजात घर केलं ते 'इंग्लिश विंग्लिश'नेच. मला वाटते इंग्लिश विंग्लिश हा ’अपने हाथोंसे बनाया हुवा गाजर का हलवा’, ’वडील गेल्यानंतर आईने केलेले काबाडकष्ट’ असला कोणताही मेलोड्रामा न दाखवता देखील आईचा आणि गृहिणीचा केलेला गौरवच आहे. नुकताच 'मातृदिन' साजरा झाला. तर त्या निमित्ताने आज याच चित्रपटबद्दल लिहितोय...







इंग्लिश विंग्लिशबद्दल प्रोमो पाहिल्यापासूनच उत्सुकता होती. एक तर श्रीदेवी परत येत होती आणि विषय इंटरेस्टिंग वाटत होता. त्यामुळे रिलीज झाल्याझाल्या लगेच थिएटर गाठलेच …
बहुतांश वेळेस साधारणपणे सिनेमा सुरू झाल्या नंतर पहिल्या १० - १५ मिनिटात आपोआप मन 'सिग्नल' देते की सिनेमा चांगला असणारे की नाही. तसा इंग्लिश विंग्लिश पहिल्या दहा मिनिटातच पकड घेतोय हे जाणवायला लागले.

चित्रपट सुरु होतो तो सकाळच्या चिरपरिचित दृश्यांनी. गजर झालाय, गृहिणी शशी गोडबोले (श्रीदेवी) उठून तडक कामाला लागलीये …. नवरा निवांतपणे अंथरुणात लोळून मग उठतोय…  पेपर वर पहिला हक्क त्याचा. पेपर वाचता वाचता आपसूक चहाचा कप त्याच्या हातात दिला जातोय. त्यातच घरातल्या कच्च्या बच्च्यांची आवरा आवर चालू आहेच. या सगळ्यामध्ये तिची प्रचंड धावपळ होते. अखेर मुलं, नवरा घराबाहेर पडल्यावर तिला वेळ मिळतो तो स्वतःच्या छंदासाठी , आनंदासाठी. ऑर्डरप्रमाणे लाडू बनवून देणे, हे खरेतर एक कामच, पण शशीला ते काम वाटत नाही. कारण ते तिच्या कार्यक्षेत्रातलं आहे  - स्वयंपाकघरातलं ! शशी सुगरण आहे. दुसऱ्यांना खायला करून घालणे तिला मनापासून आवडते. चार घरच्या लोकांना लाडू खूप आवडले हे सांगायला ती उत्साहाने फसफसत नवऱ्याला फोन करते तेव्हा तो तुटकपणे "कामात आहे नंतर बोलू" असे सांगून त्या उत्साहावर माती टाकतो.… तेव्हा जाणवते की इथे कणसूर लागतोय.  घरच्यांसाठी एवढं सगळं करूनही शशीची मैफल म्हणावी तशी रंगत नाहीये. कारण या आणि पुढच्या काही प्रसंगातून दिसते की तिला गृहित धरले जात आहे, नवऱ्याकडून , मुलांकडून. आणि त्याचबरोबर तिच्या मोडक्या इंग्रजीची पण वेळोवेळी टिंगल होतीये….

पुढे भाचीच्या लग्नासाठी शशी अमेरिकेत जाते आणि तिथे केवळ इंग्रजी येत नाही म्हणून चारचौघात अपमानित होण्याची वेळ ओढवते तेव्हा मात्र ती नेटाने पण कोणाच्याही नकळत spoken english कोर्स करून इंग्रजी शिकते. ऐन परीक्षेच्या वेळेस मात्र कितीही तीव्र इच्छा असली तरीही भाचीच्या लग्नातल्या गडबडीमुळे परीक्षेला जाऊच शकत नाही. पण योगायोगाने लग्नाच्या समारंभात इंग्रजी  संधी तिच्याकडे चालून येते आणि ती त्याचे सोने करते आणि गंमत म्हणजे त्या समारंभाला उपस्थित असणारे तिचे इंग्रजीचे गुरुजी तिला परीक्षा पास झाल्याचे प्रशस्तीपत्रक सुद्धा देतात.

चित्रपटाची गोष्ट सांगायची झाली तर ती इतकी साधी सोप्पी आहे. पण पडद्यावर ज्या कौशल्याने ती विणली आहे आणि सुंदर त्यात रंग भरले आहेत की आपल्याला ती अगदी खोल जाऊन बसते.

लेखक-दिग्दर्शिका गौरी शिंदेला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. चित्रपट सुरु होतो आणि पहिल्या दहा मिनिटात ती गोष्ट केवळ शशीची नाहीच हे अगदी जाणवायला लागते. ही तर तुमच्या माझ्या आईची, काकूची, मावशीची गोष्ट वाटायला लागते. तपशील वेगळे पण गोष्ट हीच. एका गृहिणीला गृहीत धरले जाणे हे तुमच्या माझ्या आयुष्यात इतके नित्याचे झाले आहे की ते एरवी आपण जाणूनच घेऊ शकत नाही. पण जेव्हा एखादी गौरी शिंदे एक आरसा धरून आपल्याला ते दाखवून देते तेव्हा मात्र कडकडून जाणवते, आपले या ’गृहीत धरण्य”कडे किती सातत्याने दुर्लक्ष होते ते.  

चित्रपटाचा आलेख खूप छान आहे. सुरुवातीला अगदी छोटेसे असणारे शशीचे जग, अमेरिकेत आल्यावर अचानक मोठ्या अवकाशात आल्यावर सुरुवातीचे भांबावून जाणे, इंग्रजीच्या शिक्षकाने तिचा enterpreneur म्हणून गौरव केल्यामुळे तिच्यामध्ये येणारा आत्मविश्वास, मुलगा धडपडतो तेव्हा आपण आपले कर्तव्य बजावले नाही म्हणून निराश होऊन इंग्रजीची शिकवणी सोडून देणे, पुन्हा एकदा जिद्दीने परीक्षेची तयारी आणि लग्नाच्या ऐन गडबडीत लाडू वाया गेलेले पाहून हे जणू आपल्यातल्या गृहिणीच्या आणि मुख्य म्हणजे सुगरणीच्या स्वाभिमानाला ललकारले जाणे आहे असे मानून पदर खोचून मेहनतीने सगळे लाडू पुन्हा करणे हे सगळे फार सुरेख साकारले आहे. इतर कितीही गोष्टी आवडीच्या असल्या आणि त्या मनापासून कराव्याश्या वाटत असल्या तरी कोणत्याही गृहिणीला स्वयंपाकघर हे खरे कार्यक्षेत्र आणि आपल्या आप्तांचे समाधानी चेहरे ही खरी कमाई वाटते, अशी अस्सल भारतीय मानसिकता अगदी तंतोतंत टिपली अहे.

संपूर्ण चित्रपटात खास दिग्दर्शकीय स्पर्श असलेल्या कित्येक जागा आहेत. त्यातल्या थोड्या सांगतो :

चित्रपटाच्या सुरुवातीलाच नवरा चहा पिताना पेपर वाचतोय असा प्रसंग आहे. अमेरिकेत गेल्यावर एका निवांत क्षणी शशी पेपर वाचत असते इतक्यात नवऱ्याचे फर्मान येते , "चहा ss " आणि तो तिकडे येउन तिच्याकडून पेपर घेतो… स्थळ बदलले, काम नाही !!

नवरा शशीला गृहीत धरत असला तरी तो वाईट नाहीये. त्याचेही तिच्यावर प्रेम आहे. जेव्हा खूप दिवसांनी तो अमेरिकत तिला भेटतो आणि तिला जवळ घेणार तितक्यात मुलगा कुरकुरत येतो " आई sss झोप येत नाहीये" आणि थेट तिच्या कुशीत शिरतो. संपली जवळीक. "स्त्री अल्पकाळची पत्नी आणि अनंत काळची माता असते" हे आत्यंतिक घिसे पिटे वाक्य, पण त्याचा अर्थ पाच सेकंदात समोर उलगडतो तो असा.…

पुढे लग्नाच्या सगळ्या गडबडीत शशी आवरण्यासाठी खोलीत येते तेव्हा तिला दिवाणावर एक सुंदरशी साडी ठेवलेली दिसते. नवऱ्याने आणलेली खास … संपला शॉट ! अगदी हळुवार …

चित्रपटाच्या अगदी शेवटी शशी सगळ्यांना एक एक लाडू वाढत पुढे जात असते नवऱ्याच्या ताटात मात्र एक लाडू जास्त वाढते …. विशेष काळजी :)

याशिवाय एक कॅमेरा angle खासच आठवतोय. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये शशीने पुन्हा लाडू वळायला घेतलेत, तिची अमेरिकेतली भाची प्रामाणिकपणे लाडू वळण्यात मदत करतीये, तेव्हा दोघींच्या हातांवर रोखलेला कॅमेरा : भाची प्लास्टिकचे ग्लोव्हज घालून 'हायजीनिक' पणे लाडू वळतीये आणि बाजूला  शशीच्या लाडू वळणाऱ्या हातात काहीच नाहीये - अध्याहृत गोडवा तेवढा आहे.

यातली तीन पात्रं मला विशेष आणि त्यांचे शशीशी असणारे नाते मला फार आवडले.
पहिलं पात्र : सुलभा देशपांडेंनी साकारलेली गोड सासू. थोडीशी मिश्किल. सून फोनवर चौकशी करते, 'तुम्हालाच काम करावं लागतंय' म्हणते तेव्हा त्या म्हणतात "बिनधास्त राहा तिकडे… मला काही कामं करावी लागत नाहीत, मी कामं करवून घेते. म्हातारी झाल्याचा हाच तर फायदा आहे ". रोजच्या व्यापातून सुनेला सुद्धा मोठ्ठा ब्रेक हवा हे त्यांनाही जाणवतंय. कारण त्या स्वतः देखील याच रगाड्यातून पूर्वी गेलेल्या असणारेत…

दुसरं  पात्र : शशीचा फ्रेंच सहाध्यायी. भाषा, देश, संस्कृती सगळे काही वेगळे असताना शशीकडे आकर्षित झालेला, शशीला सुद्धा प्रथमच ती सुंदर आहे हे शब्दातून जाणवून देणारा पण तरीही संयमी, शांत, मर्यादेत राहणारा मित्र … कित्येक वेळा शशी त्याच्याशी तावातावाने किंवा उत्साहाने नकळत हिंदीतच बोलते तेव्हा तिचे भाव टिपणारा समंजस मित्र. आणि शेवटी शशीच्या भाचीच्या लग्नाच्या वेळी शशीला भाषा समजली नाही तरी भाव समजतील याची खात्री ठेऊन फ्रेंच मधेच बोलणारा मनस्वी मित्र ….  खूप भिडणारं पात्र.

तिसरं पात्र : शशीची धाकटी भाची … शशीच्या कुटुंबाची सदस्य नसल्यामुळे असेल कदाचित पण  शशीला गृहीत धरले जाणे तिला जाणवते आहे. ठरलेल्या चौकटीबाहेर जाऊन शशी स्वतःच्या हिमतीवर इंग्रजी शिकते आहे याला तिचा पूर्ण पाठिंबा आहे. "जन्मभर लाडू बनवणे यातच तुझे इतिकर्तव्य नाहीये" असे ठामपणे मावशीला सांगणारी आणि मावशीला घरच्या कार्यामुळे परीक्षा देत येणार नाही हे कळल्यामुळे मनापासून दु:खी होणारी भाची खरेतर शशीची मैत्रीणच आहे. फ्रेंच मित्राला शशी आवडते हे कळल्यावर ती मैत्रीच्या नात्याने विचारते सुद्धा "तुला तो आवडतो का" त्यावर शशीचे उत्तर फार छान आहे "मला प्रेमाची आवश्यकता नाहीये , आवश्यकता आहे ती सन्मानाची". किती साधं पण किती नेमकं उत्तर !

कथेची मांडणी आणि त्यातले बारकावे हे यातले प्रमुख घटक असले तरी चित्रपटाला चार चांद लावलेत ते दोन गोष्टींनी. पहिली म्हणजे श्रीदेवीचा अविस्मरणीय अभिनय. चित्रपट येण्यापूर्वीच तिचा comeback म्हणून मला फार उत्सुकता होती. ती तिने फोल ठरवली नाही.    विचित्र थरथरत्या आवाजाच्या उणीवेवर तिने सूक्ष्म हावभावांनी आणि डोळ्यांनी सहज मात केली आहे. तिच्या पिढीच्या कुठल्या अभिनेत्रीला (माधुरी वगैरे)  ही भूमिका निभावता आली असती असे वाटतच नाही. त्यामुळे तिला १ ० ० पैकी  १ ० ० गुण.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेवाद्वितीय अमित त्रिवेदीचे संगीत. हा माणूस अजब रसायन आहे. अनुराग कश्यप सोबत काम करतो तेव्हा त्या चित्रपटामधला सगळा अत्रंगीपणा याच्या संगीतात उतरतो. आणि इथे इंग्लिश विंग्लिश सारखा करताना त्याला साजेशी अशी 'जियारा धाकधूक होय…' आणि 'नवराई माझी…' सारखी सुंदर गाणी देतो

 (धाकधूक…  या गाण्यामध्ये मुलांना सोडून दूरदेशी जायचे या कल्पनेने आई हळवी झालीये

 'घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलांपाशी'  अशी काहीशी कातर अवस्था अमित त्रिवेदीच्या संगीतातून आणि गायक म्हणून गळ्यातूनसुद्धा तंतोतंत उतरली आहे ….)   एकुणात काय तर हा चित्रपट मला अंतर्बाह्य आवडून गेला. अनेक चित्रपट आवडतात. पण मोजकेच असे असतात हे मनाच्या कप्प्यात जाऊन बसतात. त्यातलाच हा एक… एका समीक्षकाने याला अडीच 'स्टार' दिले होते, एकाने म्हटले होते " 'इंग्रजी न येणे म्हणजे उणीव आणि ते आले म्हणजे काही विशेष होणे' अशी मानसिकता यात का आहे" मला वाटते या दोघांनाही या चित्रपटाचा आत्माच समजलेला नाहीये. असो. एकाच गोष्टीबद्दल लोकांची मते वेगवेगळी असू शकतात. मला चित्रपट भावला कारण मी रोज घरात, आसपास पाहत असलेल्याच गोष्टी यात आलेल्या आहेत. प्रेम करणारी आई आहे, गृहीत धरणारे पण वाईट नसणारे कुटुंबीय आहेत, एक आपलीशी वाटणारी कुटुंब संस्था आहे.  मातीतला चित्रपट म्हणजे असते काय दुसरे ? झोपडपट्टी, शेतकऱ्यांचे हाल, अंधार, दारिद्र्य, शोषितांचे दु:ख दाखवले म्हणजेच मातीतला चित्रपट होतो असे थोडेच आहे ? अपूर संसार, सलाम बॉम्बे जेवढे या मातीतले होते तेवढेच घरोंदा, छोटीसी बात आणि अभिमान पण होते. आणि ८० % चित्रीकरण देशाबाहेर होऊनसुद्धा 'इंग्लिश विंग्लिश'  सुद्धा तितकाच अस्सल 'मातीतला' आहे. चित्रपट बघून परतलो तेव्हा माझा आईकडे पाहायचा दृष्टीकोन जास्त व्यापक झाला एवढे नक्की. पहिला नसल्यास नक्की पहा.  तुमचाही नक्की होईल. आई, सून, बायको, बहीण, मावशी या सगळ्या भूमिका एकाच वेळेस वठवणारी त्यामधली गृहिणी ही फक्त चित्रपटातली नव्हे तर खऱ्या आयुष्यातलीही नायिका (खरेतर unsung heroine) आहे, हे या निमित्ताने अधोरेखित झाले हे फार महत्वाचे आहे. धन्यवाद गौरी शिंदे !!!!

Thursday, May 2, 2013

गुरुवार

वार : गुरुवार
स्थळ : गजानन महाराजांचे देऊळ
वेळ : रात्री पावणे आठची

मोठ्ठ्या गेटमधून मी देवळाच्या आवारात प्रवेश करतो. देवळाच्या मोठ्ठ्या परिसरातल्या डावीकडच्या बागेकडे नजर जाते. कच्च्याबच्च्यांनी फुलून गेलेली. एक छोटासा ३-४ वर्षाचा मुलगा झोपाळ्यावर बसतोय आईच्या मदतीने. आई त्याला सावकाश बेताबेताने झोका देतीये. पोटात आतून कोणीतरी गुदगुल्या करतंय अशी गमतीदार भावना मुलाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतीये. त्याच्या शेजारच्या झोपाळ्यावरची ८-९ वर्षाची एक ताई मात्र दणाणून झोका घेतीये. बेभान वेगाने तिच्या चिमुकल्या वेण्या रानोमाळ उडतायत. घड्याळाच्या लंबकासारखे तिचे पाय झुलत आहेत. आभाळातून खाली यायचा अवकाश, दोन्ही पाय खाली येत खालच्या जमिनीला दणका देऊन झोपाळ्याला पुढे भिरकावत आहेत. झोपाळ्याच्या बाजूला सी - सॉ अविरत कुरकुरतोय. एका बाजूच्या पोराचा मधेच अंदाज चुकल्याने खाली सी - सॉची एक बाजू खाली आदळतीये, पण त्यामुळे पुठ्ठ्याला येणाऱ्या झिणझिण्या त्याच्या खेळण्याच्या आनंदात क्षणाचाही व्यत्यय आणू शकत नाहीयेत.
या सगळ्याकडे पाहताना हरवून जायची माझी खूप इच्छा असते, पण अजून देवळात जायचे बाकी असल्यामुळे बागेत बसायचा मोह आवरतो आणि देवळाच्या दिशेने जातो.
आत शिरण्यापूर्वीच देवळातल्या आरतीची तयारी जाणवायला लागते. आत जाण्यापूर्वी चप्पल काढण्यासाठी थांबतो. देवळाच्या बाजूला लोखंडाचे २-३ भीमसेनी चप्पल stand आहेत. देवळाच्या आत-बाहेरच्या यच्चयावत भक्तगणांच्या चपला बूट stand च्या बाजूला दशदिशांना विखुरलेले आहेत. एखाद्या बेशिस्त जेवणाऱ्याने अन्न चिवडून ताटाभोवती खरकटे सांडून ठेवावे तसे ते चपलांचे दृश्य मला ओंगळवाणे वाटते. ओठावर आलेली शिवी केवळ मंदिरात आलोय म्हणून गिळून टाकतो. स्वतःच्या चपला stand वरती ठेवतो तेव्हा माझ्या आधी काही शहाण्या लोकांचे चप्पल जोड आधीच तिथे सिंहासनावर बसल्याच्या ऐटीत तिथे आसनस्थ झालेले पाहून किंचित बरे वाटते आणि मंदिरात मी प्रवेश करतो.
आत पाऊल ठेवताच संगमरवराचा थंडगार स्पर्श एक शिरीशिरी उठवून देतो. दोन पावलावरच घंटेच्या खाली एक बारकू, हाताला न येणाऱ्या कैरीकडे बघावे तसा आशाळभूतपणे बघत उभा असतो. मी सरळ पुढे होऊन त्याच्या बखोटीत हात खुपसून त्याला उचलतो. कोणी उचललंय हे वळून पाहण्याची तसदी न घेता तो खुशीत येउन घंटेचे दोन-तीन घनघोर टोल देतो आणि अंग झटकून उडी मारून पसार होतो. मला समोर गाभाऱ्यातले दृश्य स्पष्ट दिसत असते. गडद निळे वस्त्र नुकतेच नेसलेले गजानन महाराज अधिकच तेजस्वी भासतात. गाभाऱ्याच्या बाहेर उजव्या हाताला तार सप्तकात भजन चालू असते. तश्या आवाजातही पेटीवाल्या बुवांच्या मांडीवर डोके ठेऊन त्यांची छोटुली नात शांतपणे कशी काय झोपलीये याचे मला नवल वाटते. बुवांच्या साथीला एक तरणा तबलजी आहे. गाभाऱ्याच्या सरळ रेषेत उभं राहून डोळे मिटून नमस्कार करणाऱ्या एका शेलाट्या मुलीकडे हळूच नजर फेकताना त्याच्या काळजाचा ठोका चुकत असला तरीही भजनी ठेका त्याने शिताफीने सांभाळून घेतलाय.
एव्हाना आरतीची तयारी पूर्ण झालीये जमा आहे. बागेत खेळणाऱ्या मुलांचे आई-बाबा, बाकीचे भक्तगण यांनी देऊळ शिगोशिग भरून गेले आहे. अगदी दाटी-वाटी झालीये म्हणा ना. पण या गजबजाटातही एक आदब आहे, शिस्त आहे.
निरांजन लावले जाते, पाठोपाठ एकेक करून कापूर, धूप वगैरेच्या वासाने गाभारा भरून वाहू लागतो. आरतीला प्रारंभ होतो आणि आरतीच्या मंगलचरणांनी संपूर्ण देऊळ भरून जाते. गेटबाहेर रेंगाळणारे चुकार लोक आरतीच्या आवाजाने लगबगीने देवळात येतात. देवळातल्या घंटेचा घणत्कार, गाभाऱ्यातून छोट्या घंटेची किणकिण, आरतीचे स्वर आणि उदबत्ती - कापूराच्या धुराने चोंदलेला गाभारा यामुळे अर्धेअधिक भक्त गण ट्रान्समध्ये पोचलेले असतात. आरत्यांची एकावर एक कमान चढत जाते. एकेक देव, एकेक महाराज अश्या सगळ्यांची दखल घेत आरत्या म्हणता म्हणता मी युगे अठ्ठावीस उभा आहे असा भास मला व्हायला लागतो. शेवटी एकदाचे 'घालीन लोटांगण' सुरु होते आणि पाठीच्या कण्याचा अक्ष करून त्या भोवती सगळे गिरकी घेऊ लागतात. आखडलेले पाय गिरकी घेता घेता मोकळे होतात. बाजूला नजर जाते तर एक सर्वांची गिरकी संपली तरी एक छोटा मुलगा मनाचे समाधान होईपर्यंत स्वतःभोवती भिंगरीसारखा गरगरत राहतो. मला हसू आवरत नाही. मंत्रपुष्पांजली फलश्रुती वगैरे सोपस्कार पार पडतात आणि काहीही सूचना न मिळताही सगळे जण दर्शनासाठी गाभाऱ्या बाहेर रांग लाऊन उभे राहतात. रांगेत भरपूर वेळ सरकत अखेर गाभाऱ्यात पोचतो तेव्हा सवयीने चटकन हात खिशात जातो. खिशातली चावली-पावली दान-पेटीच्या फटीतून आत सोडतो तेव्हा ढिगाऱ्यावर पडताना येतो तसा बद्दकन आवाज येतो….
गर्दी असली तरी वातावरण खूप प्रसन्न असते... महाप्रसादासाठी जय्यत तयारी झालेली असते… तरीही तिथे जास्त वेळ न थांबता मला बाहेर पडायचे असते. आवाराबाहेर बाहेर येतो आणि पावले चटाचट वळतात ती जेमतेम दोनेकशे पावलावर असलेल्या दत्त मंदिराकडे.
मंदिरापाशी येतो आणि जणू दुसऱ्या दुनियेत आल्यासारखे वाटायला लागते. महाराजांच्या देवळासारखी बाग, गर्दी, महाप्रसाद भरपूर उजेड यातले काहीच इथे नसते. बाजूची वाट, मंदिराचे आवार आणि खुद्द मंदिरातही अक्षरशः शुकशुकाट असतो. नाही म्हणायला चार दोन लोक असतात, पण त्यांचे वावरणेसुद्धा एकंदर शांततेला बाधा येऊ नये असे दबकूनच असते. देवळातल्या वातावरणावरची शांततेची साय उगीचच बाजूला होईल काय अशी भीती त्यांना वाटत असावी. बाहेरच्या रातकिड्यांची मैफल अगदी स्पष्ट ऐकू येत असते. देवळापाशी जातो आणि बाजूच्या दराने आत प्रवेश करायला जातो तेव्हा लक्षात येते नेहमीप्रमाणेच या बाजूचे दार बंद अहे. प्रवेशासाठी फक्त समोरचे दार उघडे अस्ते. तिथून आत जातो आणि घंटा वाजवतो - पण जर जपूनच. तेवढ्यानेसुद्धा मंदिरातली शांतता डहुळते. पुढे गाभाऱ्यापाशी जातो तिथेही सगळे कडेकोट बंद. अगदी गाभाऱ्याचा जाळीचा दरवाजा सुद्धा लावून घेतलेला असतो. पुजारी नाही की तीर्थ-प्रसाद नाही. एक बापुडवाणी उदबत्ती तेवढी नेटाने जळत असते. दत्त महाराज आपले एकटेच उभे असतात दरवाज्याच्या जाळीतून माझ्याकडे बघत. मी पुढे होतो पुन्हा एकदा खिशातली चवली-पावली काढतो. जाळीच्या दरवाज्यातून महत्प्रयासाने दोन बोटे आत प्रवेश मिळवतात आणि दरवाज्यालाच आतून टांगलेल्या दानपेटीत चिमटीतली नाणी सोडतात. पेटीत खणखणाट होतो. 'दत्त महाराजांची झोळी रिकामीच दिसतीये' असा विचार मनाला चाटून जातो.
एव्हाना देवळातले ते तिघे चौघेही निघून गेलेले असतात. गाभाऱ्यात लावलेल्या 'दिगंबरा दिगंबरा' या जपाच्या ध्वनिमुद्रिकेच्या अतिमंद आवाजामुळे देवळाच्या नीरव शांततेत काडीचीही बाधा येत नसते.
प्रदक्षिणा घालताना स्वतःशीच विचार करायला लागतो : गजानन महाराजांच्या देवळातले मोकळे ढाकळे वातावरणही मला आवडते. त्या देवळाला दारंच नाहीत. तिकडे सगळं कसं मोकळं ढाकळं, येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ. तरीही मला इकडे यावंसं का वाटतं ? दत्तदर्शन हे तर निमित्त आहेच, पण त्या पलीकडेसुद्धा इकडे आवर्जून यावं असं खेचून घेणारं इकडच्या निश्चल शांततेत काहीतरी आहे... इकडे आल्यावर स्वत:शी गप्पा मारायला मिळतात.... भरपूर प्रश्न विचारायला मिळतात... स्वतःबद्दल, भोवतालाबद्दल, अगदी या हाकेच्या अंतरावरच्या दोन मंदिरांबद्दलसुद्धा. उत्तरं मिळतातच असे नाही… उलट काही प्रश्न तर मला सतत टोचत राहतात.
तिकडे खुलेपणा, इकडे मात्र देवबाप्पा कडेकोट बंदोबस्तात … का ?
तिकडे फरसबंदी पटांगण, इकडे थोडके खडबडीत आवार… का ??
तिकडे लोक लांबून लांबून येणार, इकडे ढुंकूनही बघणार नाहीत … का ??
तिकडे लखलखाट, इकडे मोजून दोन दिवे …. का ??
तिकडे एवढी वर्दळ, इकडे सामसूम … का ?? गजानन महाराज म्हणजे दत्ताचाच अवतार ना ? मग अवताराच्या दर्शनासाठी झुंबड, आणि खुद्द देव-दर्शनाला मात्र शुकशुकाट …. का ???
नाही मिळत उत्तरं. मी निमुटपणे मंदिराबाहेर पडतो. सव्वानऊ होऊन गेलेले असतात. मंदिर एखाद्या समाधीस्थ साधूसारखे वाटत असते.… एकाएकी वाटून जाते, साक्षात दोन श्रद्धास्थानांमध्ये एवढा दुजाभाव करणारा मनुष्यप्राणी माणसा-माणसांमध्ये भेदभाव करत असेल तर त्यात नवल ते कसले….
घराच्या वाटेला लागता लागता मंदिरामागचा थोरला औदुंबर दिसतो. दत्ताला
त्याची तरी सोबत आहे हे पाहून मनोमन बरे वाटते…