Total Pageviews

Sunday, July 9, 2023

कोसलाबद्दल...

छायाचित्र सौजन्य : अमेझॉन


ज्या पुस्तकावरून होणाऱ्या अनेक घनघोर 'पुस्तकप्रेमी' लढाया बघितल्या ते 'कोसला' स्टोरीटेलवर ऐकून पूर्ण झालं.

खरंतर ज्याबद्दल खूप चर्वण झालेलं असतं ते वाचण्याची उत्सुकता नाहीशी झालेली असते. माझंही काहीसं तसंच झाल्याने आजवर हे पुस्तक वाचण्यासाठी (तेही बाकीची प्राधान्याने वाचायची पुस्तकं सोडून) हातात घ्यावंसं वाटलं नव्हतं. पण स्टोरीटेलवर ते दिसलं तेव्हा म्हटलं ऐकून बघू. 

गिरीश कुलकर्णीने अभिवाचन छान केलं आहे, फक्त ते खूपच सावकाश आहे. त्यामुळे 1.3x वेगात ऐकल्यावर जास्त चांगला परिणाम जाणवतो.

सर्वप्रथम कोसला ऐकताना डोक्यात आलेले काही विचार मांडतो. 

१) पुस्तक खूप ताजं वाटलं.  साठ वर्षं जुनं अजिबातच वाटलं नाही. त्याची भाषा, त्यातले कॉलेज जीवनाचे, स्थळांचे संदर्भ मला एकदम कालनिरपेक्ष वाटले. भाषेत इंग्रजी शब्दांचाही बऱ्यापैकी वापर आहे. शिवाय भाषेची धाटणी अशी आहे की त्या काळात अशी अनलंकृत भाषा वाचायची सवयच नसेल लोकांना. 

२) फारसं ठाशीव कथानक नसलेली, एखाद्या डायरीतल्या महत्वाच्या आणि बिनमहत्वाच्या नोंदी वाटाव्यात अशी ही कादंबरी आहे. समीक्षक तिच्याबद्दल काय म्हणतात ते सोडून दिलं तरी आजवर हिच्या  पंचवीस वगैरे आवृत्या आल्या आहेत, हे पाहता  सर्वसामान्य वाचकाला (यात शहरी/ग्रामीण भेदही करण्यात हशील नाही) ही फारच भावलेली असणार. याचाच अर्थ खूप लोकांना ही स्वत:शी रिलेट होणारी कथा वाटली असणार हे उघड आहे. त्यामुळेच अर्पणपत्रिकेत 'शंभरातील नव्व्याण्णवां'चा उल्लेख का आला असेल हे लक्षात यावं. त्यामुळे ही किरकोळीत काढावी अशी कादंबरी नक्कीच नाही

३) योग्य वेळी योग्य प्रकाशक भेटणं फारच नशिबाचा भाग असला पाहिजे. कोसलाच्या स्वरूपाचे लेखन कुणी लिहिलंच नसेल असं मला वाटत नाही. पण ती व्यक्ती ज्या प्रकाशकाला भेटली तिला कादंबरीत काहीच विशेष न वाटल्याने/ न पचल्याने ती नाकारली गेली असं पुष्कळ लोकांच्या बाबतीत झालेलं असू शकतं. नेमाडे त्या बाबतीत भाग्यवान!

मला कोसला ग्रेट वाटली का? 

नाही. 

मला कोसला आवडली का? 

हो, आवडली... 

पण...

चौथ्या प्रकरणापर्यंतच. 

पांडुरंग सांगवीकरची निवेदनशैली, त्याच्या वाक्यांमधला, वागण्यामधला तुटकपणा, मध्येच बंदुकीच्या गोळीसारखी सट्कन येणारी टिप्पणी,  रँडम वाटता वाटता चमकदार काहीतरी सांगून जाणारी मार्मिक  निरीक्षणं या सगळ्यात एंगेजिंग वाटावं असं काहीतरी आहे..  कॉलेजच्याच पहिल्या वर्षी चमकूनही फार मोठं काहीही कारण न घडता शेवटच्या वर्षापर्यंत सूर हरवत जाणारा पांडुरंग विचारीही आहे आणि विक्षिप्तही आहे. कशातही तो फार अडकू शकत नाही... म्हणूनच त्याला शेवट पर्यंत सूर सापडत नसेल का? शंभरातील अगदी नव्व्याण्णव असे असतील? फार नाही वाटत हे प्रमाण? हू नोज! पण या भागात flashes of brilliance बरेच आहेत. मनूच्या मृत्यूनंतरच्या आपल्या मनस्थितीचं पांडुरंगने केलेलं वर्णन फारच सुरेख जमून आलंय. त्याचा सैरभैरपणा, मृत्यूबद्दल त्याने केलेलं चिंतन हे एखाद्या तत्वचिंतकाने केलेलं वाटावं इतकं गहिरं आहे.. याशिवाय पांडुरंग आणि त्याचा मित्र सतीश यांच्यातले भटकंती दरम्यानचे संवादही अर्थगर्भ आहेत.

पांडुरंग गावाकडे परततो त्यानंतरचा भाग मात्र रटाळ आहे. त्याच्यासारख्याच लौकिकार्थाने 'शहरात जाऊन अपयशी ठरलेले' असा शिक्का बसलेल्या आणि गावात रिकामटेकडे बसणाऱ्या लोकांचा ग्रुप जमतो हे चित्रही प्रातिनिधिक असू शकेल. पण हा भाग फारच लांबला आहे आणि एका टप्प्यानंतर त्याने काही व्हॅल्यू ऍड होते आहे असंही वाटलं नाही. शिवाय तोपर्यंत पुस्तकाचा जो प्रभाव निर्माण झाला होता तो त्यामुळे पातळ होऊन गेला. (त्यातला कंटाळाच नेमाडेंना अधोरेखित करायचा होता म्हणून नेमाडेंनी स्वतःही तसेच कंटाळवाणे लिहिले का, हे माहित नाही) 

असो.  'कोसला आवडली नाही' म्हणणाऱ्यांची तशी प्रतिक्रिया का आहे हे मी अगदीच समजू शकतो. त्यामुळे न आवडलेल्यांशी आपले काही भांडण नाही. किंबहुना कोसलावर कोणतीही एकच बाजू घेऊन वादविवाद करण्यातही रस नाहीये. पण ज्यांनी कोसला वाचली नाहीये आणि कादंबरी म्हणजे अमुकच फॉरमॅट असायला हवा अशी कल्पना डोक्यात आहे त्यांनी एकदा हाही प्रकार वाचून बघायला हवा असं मी म्हणेन. आवडणं / न आवडणं पुढचं पुढे..