Total Pageviews

Sunday, December 9, 2018

छायेतला प्रकाश


छायाचित्र सौजन्य : www.portoalegre.travel.com

सेहवाग बॅटिंगला आला की बघणाऱ्याची नजर ठरायची नाही. आपण फक्त आ वासून बघत राहायचं. पण सेहवाग किती धडाकेबाज खेळत असला तरी मी कित्येकदा असं पाहिलेलं आहे की भारताचा स्कोअर सेहवागच्या स्कोअरच्या दुप्पट असायचा. कारण कुणाच्याही नकळत त्याच्याइतक्याच आक्रमकपणे पण त्याच्याहून कमी रिस्क घेत दुसऱ्या एन्डच्या बॅट्समनने हाणलेलं असायचं. तो असायचा गौतम गंभीर. गंभीरकडे द्रविडचं तंत्र नव्हतं, लक्ष्मणची नजाकत नव्हती, सचिनसारखा ओघ नव्हता. म्हणूनच कदाचित आयुष्यभर तो कुणाच्यातरी परफॉरमॅन्सच्या छायेत राहिलेला.. बॅट्समनच्याच नाही तरी दुर्दैवाने बॉलरच्याही..
अशा फेजमधून द्रविडही अनेक वर्षं जात होता. २००३च्या ऍडलेड टेस्टनंतर मात्र त्याला सिरियसली घेण्यापासून लोकांना पर्याय उरला नाही .
गंभीरचं तेवढं तंत्रही नव्हतं आणि नशीबही.

२००७च्या T20 वर्ल्डकपला त्याच्या ७५ रन्स नंतर दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या फक्त ३० होती. बॅट्समनच्या बाजूला काहीच्या काही कललेल्या या क्रिकेट नामक खेळात इरफान पठाण नेमका बॉलिंगसाठी मॅन ऑफ द मॅच घेऊन गेला. २००८च्या CB Seriesमध्ये सर्वाधिक धावा केल्या, पण मॅन ऑफ द सिरीज घेऊन गेला इशांत शर्मा! पुढे त्याच वर्षी भारतातल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये त्याने पुन्हा एकदा धावांची टांकसाळ उघडली. पहिल्या तीन टेस्ट मॅचमध्येच त्याने एक डबल सेंच्युरी आणि एक सेंच्युरी झळकावून टाकली होती. चौथ्या मॅचला त्याने pair score केली असती तरी मॅन ऑफ द सिरीज त्याच्याच गळ्यात पडणार होतं. पण तिसऱ्या matchमध्ये त्याला रन काढताना कोपर बाहेर काढून पळायची अवदसा आठवली. पिचवर उभ्या असलेल्या वॉटसनच्या छातीत कोपर ढोसलं म्हणून त्याने पुढची मॅच गमावली. चौथी मॅच संपल्यावर 'मॅन ऑफ द सिरीज' अलगदपणे इशांत शर्माच्या गळ्यात पडलं.
हाच जशास तसं उत्तर देण्याचा गंभीरचा स्वभाव मैदानात कायम दिसत आला.. आणि तोच अनेकदा त्याच्या मार्गातला अडथळाही ठरला. त्याने अनेकांशी पंगे घेतले. ज्या विराट कोहलीसोबत त्याने वनडेमध्ये कितीतरी मोठमोठ्या पार्टनरशिप्स केल्या त्याच्यासोबत तो आयपीलच्या आखाड्यात वेड्यासारखा भांडला (तो कोहलीशी भांडला की कोहली त्याच्याशी हा वादाचा मुद्दा आहे :D दोघेही पीकपाण्याच्या गप्पा मारत नव्हते एवढं नक्की!). बहुदा धोनीसोबतही त्याचं पुढेपुढे फारसं जमेनासं झालं नसावं. टीममधून बाहेर फेकला गेल्यावर रणजी खेळत असताना दिल्लीच्या कोचसोबत उभा दावा मांडला. इतकं घडलं तरी मला गंभीर का आवडत राहिला ?

एकाच शब्दात उत्तर देतो : जिद्द.

हा एकमेव गुण आहे जो तुम्हाला अंगभूत गुणवत्ता, घोटवून आत्मसात तंत्र या गोष्टींच्याही पुढे घेऊन जाऊ शकतो. केवळ प्रचंड गट्सच्या जोरावर सेहवाग-द्रविड-सचिन-गांगुली-लक्ष्मण या Fab Five च्या खांद्याला खांदा लावून ताठ मानेने उभा राहू शकला गंभीर. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हा माणूस कित्येकदा सेहवागच्या वेगाने रन्स काढायचा. त्या दोघांची पार्टनरशिप आदर्श नवराबायकोच्या पार्टनरशिप इतकीच नजाकतदार असायची. एरवी धावायला कंटाळा करणारा सेहवाग समोर गंभीर असला की कसला सुसाट पळायचा.. उगाच नाही ही भारताची highest scoring opening pair... T20ट्वेन्टीचा प्रादुर्भाव आजच्या इतका झाला नव्हता त्या काळी - २००९ मध्ये - न्यूझीलंडमधल्या वनडेत आपल्याला जिंकायला २०५ च्या आसपास रन्स करायच्या होत्या. या पठ्ठ्यांनी २२-२३ ओव्हर्समध्ये विषय संपवला होता! २००८ ते २०१० या काळात खोऱ्याने रन्स ओढणाऱ्या गंभीरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की सेहवागने त्याला त्याची बॅट दिल्यापासून तो एवढ्या रन्स करायला लागला आहे!!

बॅट सेहवागची असली तरी जिगर गंभीरचीच होती. मॅच जिंकण्याइतकीच मॅच वाचवणेही कला आहे हे विस्मृतीत गेलेल्या काळात या माणसाने घड्याळाकडेच नाही तर कॅलेंडरकडे नजर ठेवून लक्ष्मणच्या साथीने टेस्ट मॅच वाचवली होती. गंभीरची बॅटिंग म्हणजे एखादं सुंदर काव्य कधीच नव्हती, पण पण नेपियरच्या त्या मॅचमध्ये मान खाली घालून जी अथक खर्डेघाशी केली तिचं मोल एखाद्या खंडकाव्यापेक्षाही मोठं आणि मानाचं होतं. याच गुणामुळे गंभीर माझ्या मनात खूप मोठा झाला. T20च्या आहारी जाऊन जिंकणे आणि हारणे अशा बायनरी निकालांची सवय/आवड लागलेली असते त्यांना तासंतास दळून केलेली draw किंवा शेवटच्या बॉलपर्यंत विकेट वाचवून केलेली draw यांची गोडी नाही कळायची.. येथे पाहिजे जातीचे!

सलग पाच टेस्टमध्ये शतकं, सलग ११ टेस्टमध्ये अर्धशतकं एवढा पराक्रम गाजवूनही त्याच्या कारकिर्दीतला सर्वोत्तम क्षण बाकी होता.. आणि तो त्याने गाजवला अशा वेळी, जेव्हा अख्खं जग बघत होतं... ! २०११ वर्ल्ड कप फायनल.. सचिन-सेहवाग सारखे महारथी तंबूत असताना डोक्यावर बर्फ ठेवून खेळ करत याने विजय नजरेच्या टप्प्प्यात आणून ठेवला. फक्त ३ रन्स अगोदर एक चुकीचा शॉट मारला आणि आपल्या खेळीच्या अमरत्वावर बोळा फिरवला. एवढ्या अनन्यसाधारण महत्वाच्या खेळीला कॉमेंटेटर्सच्या पॅनलने किरकोळीत काढलं आणि खूप उशिरा मैदानात येऊन काही नेत्रदीपक शॉट मारलेल्या धोनीला 'मॅन ऑफ द मॅच' देऊन टाकलं. एवढं आंधळेपणाने दिलेलं 'मॅन ऑफ द मॅच' मी तरी पाहिलेलं नाही. नंतर मांजरेकर तोंड वर करून सांगत होता की हे 'मॅन ऑफ द मॅच' धोनीच्या संपूर्ण वर्ल्डकपमधल्या कामगिरीचा गौरव म्हणून दिलेलं आहे.. मी मनात म्हटलं,"अरे चिकारभोट, त्याच्या वर्ल्ड कपमधल्या हुशारीचं कौतुक म्हणून त्याला अख्खा वर्ल्ड कप मिळाला आहे... त्याने जरा stylish शॉट मारले म्हणून गंभीरच्या ९७ रन्स किरकोळीत काढायच्या?" शतक हे शतक असतं हे त्या दिवशी गंभीरलाही चांगलंच कळून चुकलं असेल....

नंतर मात्र गंभीरकडे सातत्य राहिलं नाही. २०१४च्या इंग्लंड दौऱ्यावर त्याने सोन्यासारखी संधी घालवली. तरीही २०१६ मध्ये तो पुन्हा २-३ मॅच पुरता आला हे नशीबच म्हणायला हवं. पण या सगळ्या काळात आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत राहिला. मला स्वतःला आयपीएल अजिबात आवडत नसलं तरी त्यातली स्पर्धात्मकता खूप वरच्या दर्जाची आहे. आणि मुख्य म्हणजे आयपीएल प्रचंड क्रूर आहे. तुम्ही ३-४ मॅच जरी धड खेळला नाहीत तर मालक डायरेक्ट ढुंगणावर लाथ घालतो.. इथे रोहित शर्मासारखं बीसीसीआयचा लडदुल्या जावई असून चालत नाही. अशा 'बाप नाहीतर श्राद्ध दाखव' वातावरणातही गंभीरची कमान चढती राहिली हे त्याच्या लढाऊ वृत्तीचं आणखी एक द्योतक.
एवढी चांगली कामगिरी करूनही अखेर यावर्षी तो KKRला नकोसा झालाच. ही कदाचित त्याच्या डोक्यातली शेवटची घंटा असावी. काही वर्षांपूर्वी तो निराशेपोटी निवृत्तीचा विचार करणाऱ्या गंभीरने स्वतःला पुन्हा एवढं प्रेरित केलं हीच कमालीची गोष्ट आहे.. अगदी निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो दिल्लीला काल रणजीची शेवटची मॅच खेळला तिथेही त्याने सेंचुरी ठोकलीये!

गेल्या वर्षभरात माझ्या विश्वाचा भाग होऊन राहिलेले खूप खेळाडू निवृत्त झाले आहेत. नेहरा झाला, कैफ झाला, मला मनापासून आवडणारा स्विंग किंग प्रवीणकुमारही झाला.. काही लिहिता आलं नाही. परवा ड्वेन ब्राव्हो निवृत्त झाला तेव्हा तर खूप प्रकर्षाने लिहावंसं वाटत होतं पण तेही राहून गेलं.. आता गंभीरने बॅट म्यान केल्यावर मात्र लिहिणं भागच होतं... वेल डन गंभीर ... तू इतरांच्या छायेत राहिला असलास तरी स्वयंप्रकाशित होतास एवढं नक्की!
ता. क :
अजूनही माझ्या विश्वातले तीन जण शिल्लक आहेत. धोनी कसाबसा वनडेत तरी टिकून आहे. हरभजन ऑफिशियली निवृत्त नाही तरी कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतोय.. म्हणजे संपल्यातच जमा आहे... युवराज मात्र अजून अजूनही रणजी खेळतोय. कुठून एवढं मोटिव्हेशन आणतो कळत नाही. but you can sense his end is near.. पण ज्या दिवशी तो रिटायर होईल त्या दिवशी शब्दांत काही मांडणं जमेलच याची खात्री वाटत नाही..