Total Pageviews

Friday, October 4, 2013

मस्त पड म्हणा

सकाळी साखरझोपेतून उठून कामावर जायचे जीवावर आलेला माझा मित्र विवेक कुलकर्णी कुसुमाग्रजांच्या 'फक्त लढ म्हणा'च्या चालीवर म्हणाला - 'डोक्यावरती पांघरूण घेऊन फक्त झोप म्हणा'. मग मी विचार केला की याचा पूर्ण विस्तार करूया … आणि दुपार पर्यंत विडंबन तयार सुद्धा झाले !

(आधी विडंबन-कविता आणि खाली कुसुमाग्रजांची मूळ कविता देखील संदर्भासाठी दिली आहे)
विडंबन - मस्त पड म्हणा

पार्श्वभूमी : गणपती मिरवणुकीत अचकट विचकट नाचणे हा प्रकार फार वाढलाय, त्यात परवाच्या विसर्जनाला मरणाचा पाऊस पडला. कल्पना करा अशी एक मिरवणूक संपवून एका मोठ्या मंडळाचा एक छोटा कार्यकर्ता मंडळाच्या अध्याक्षाकडे आलाय
‘ओळखलत का भाऊ मला?’ - पावसात आला कोणी,
बापडा होता फार दमलेला, केसांवरती पाणी
दम खात बसला कसनुसा हसला बोलला वरती पाहून
'गणपती बाप्पा पाहुणे आले, गेले मांडवात राहून
डी जे वरती पोरं आपली चारचौघात नाचली
मोकळ्या तोंडी जातील कशी, खैनी सुद्धा पोचली
भिंत रचली, गाणी वाजली, नाचून सारे मेले
उस्ताद तुम्ही हातावरती चिंचोके हो ठेवले
पोरांना या घेऊन संगे काढता पाय घेतो आहे
भरल्या चपला पुसतो आहे चिखलगाळ काढतो आहे’  
पिशवीकडे हात जाताच हसत हसत उठला       
‘ 'चपटी' नको भाऊ मला जरा थकवा वाटला
झाला काटा ढिला तरी पडला नाही फणा
"डोक्यावरती पांघरूण घेऊन मस्त पड" म्हणा’ 

मूळ कविता : फक्त लढ म्हणा

ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर
बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण
पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या
हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला
घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी
भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे
हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती
हात ठेउन, फक् लढ म्हणा’!

Tuesday, September 24, 2013

इन्व्हेस्टमेंट : आपण आपल्या मुलांना नक्की काय देत आहोत ?

जो साहित्यिक, कलाकार, दिग्दर्शक जितका सातत्याने काळासोबत बदलत राहतो आणि कालसुसंगत कलाकृती घडवत राहतो (मागणी तसा पुरवठा नव्हे)  तो कधीच शिळा किंवा कालबाह्य होत नाही आणि खऱ्या अर्थाने काळाच्या कसोटीवर उतरतो. रत्नाकर मतकरी हे याचे ठळक उदाहरण. त्यांच्या कथा,नाटके कायमच वैविध्यपूर्ण आणि कालसुसंगत राहिलेली आहेत.  त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा देखील अगदी आजचा विषय मांडतो आणि त्यामुळेच एक अस्वथ करणारा अनुभव देतो.
 

'इन्व्हेस्टमेंट' या मतकरींच्याच कथेवर आधारित हा सिनेमा आहे.  आत्तापर्यंत मराठी सिनेमातून दिसत आलेल्या कुटुंबांपेक्षा एक फार वेगळे कुटुंब याच्या केंद्रस्थानी आहे. बारा-तेरा वर्षाचा सोहेल हा आशिष आणि प्राची यांचे एकुलते एक अपत्य. आई वडील दोघेही भरघोस उत्पन्न असणारे, त्यामुळे मुलाला काही कमी पडू देण्याकडे त्यांचे सदोदित लक्ष. विशेषतः आईला मुलाचा कोणताही हट्ट पूर्ण केलाच पाहिजे असे ठामपणे वाटते. तिच्या मते आत्ता मुलाचे पुरवलेले हट्ट आणि त्यासाठी केलेला खर्च ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, जी तिला काही वर्षांनी कैक पटींनी 'रिटर्न्स' देईल. या 'रिटर्न्स' च्या लोभामुळेच काहीही करून मुलाला राजकारणी बनवायचेच या विचाराने ती पछाडलेली आहे.  आशिषची आई त्याच्या घरी राहत नसली तरी जवळच राहते आणि अधून मधून ती घरी येते तेव्हा नातवाला तिच्या पद्धतीने वळण लावायचा प्रयत्न करत असते, पण नातवाला आजीविषयी माया नाहीये उलट 'काय शिंची कटकट आहे' अशीच त्याची भावना आहे. हे सगळे कुटुंब पाहून सुरुवातीपासूनच जाणवायला लागते की हे सर्वार्थाने आजच्या काळातले नागरी कुटुंब आहे. एवढेच नव्हे तर आजी - नातवाच्या आजतागायत दाखवल्या गेलेल्या प्रेमळ नात्याला इथे संपूर्ण फाटा देण्यात आलेला आहे.

   
घरच्यांकडून लाडावलेला सोहेल अत्यंत बेफिकीर बनलेला आहे. शिवाय 'जे हवे आहे ते काहीही करून मिळवायचेच'  या आईच्या शिकवणी पासून त्याने नको त्या अर्थाने प्रेरणा घेतली आहे. या अशा पार्श्वभूमीवर त्याच्याकडून आगळीक घडते आणि 'किस' द्यायला नकार दिलेल्या मैत्रिणीचा - दीपा गांगण हिचा - संतापाच्या भरात त्याच्याकडून जीव घेतला जातो.  यातून पुढे अनेक धक्कादायक गोष्टी घडत जातात. मुलाच्या प्रेमाने अंध झालेल्या पालकांकडून - विशेषतः आईकडून - मुलाची पाठराखण तर होतेच पण त्याहून वाईट म्हणजे त्याच्या कडून काही विशेष घडले ते गंभीर आहे मान्य करायला देखील ती तयार नसतेपुढे अनेक अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी घडत जातात आणि आपल्याला खिन्न करूनच सिनेमा संपतो ….

     
चित्रपट अनेक गोष्टींना कळत नकळत स्पर्श करतो. अनेक बाबतीत तो खूप वेगळा आहे. पैशाच्या लालसेने आंधळे झालेल्या पालकांकडून मुलांकडे कोणता वारसा हस्तांतरित केला जातोय याचे गडद चित्र अक्ख्या सिनेमा मध्ये दिसते. साधारणपणे आई प्रेमळ, संस्कारी आणि वडील कडक अशा पारंपारिक पात्ररचनेला सिनेमा धक्का देतो. आत्तापर्यंत बहुधा कधीही दिसलेली, 'आणखी खूप मोट्ठे' होण्याच्या विचारांनी पछाडलेली आई इथे आहे. मूल्याबिल्यांची चिंता करता ती मुलाला पदोपदी डिफेंड करते आणि त्यासाठी हतबुद्ध करणारे स्पष्टीकरण देत राहते. दुसरीकडे थोडीशी सद्सदविवेकबुद्धी शाबूत असणारे, बायकोचे विचार फारसे पटत नसणारे पण अंतिमतः छोट्या फायद्यासाठी तिकडे कानाडोळा करणारे वडील यात आहेत.  छोट्या छोट्या प्रसंगातून ऐहिक सुखसोयींभोवती फिरणारे भावविश्व आणि त्यात कसलीही बाधा येताना दिसली तरी प्रचंड आदळ आपट करणाऱ्या आजच्या नागरी मुलांचे प्रातिनिधिक रूप घेऊन यातला सोहेल येतो. त्याचे कळत्या वयातले सतत MTV सारखे channel बघणे, बंदुका-बॉम्ब असल्या गोष्टींनी भरलेले व्हिडीओ गेम्स खेळणे सिनेमा मध्ये पुन्हा पुन्हा डोकावते आणि ते पाहिले की त्याच्यामधला हट्टीपणा, हिंस्त्रपणा याचा कार्यकारणभाव आपोआप लागतो. या सगळ्या गोष्टींमुळे अस्वस्थ असणारी पण यात काहीही बदल करता येउ शकणारी हताश आजी ही जुनी पिढी आजच्या पिढीच्या लेखी किती अडगळीसमान बनत चालली आहे याचेच जणू प्रतिक बनून येते.

   
सामाजिक भाष्याचा आणखी एक कोन चित्रपटाला आहे तो म्हणजे उच्चभ्रू आणि तथाकथित पांढरपेश्यांची आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने खालच्या स्तरावर असलेल्यांकडे असलेली तुच्छतेची नजर.  बळी गेलेल्या मुलीच्या वडिलांचे राहणीमान, त्यांचे कारकून असणे याची सतत हेटाळणी सोहेलची आई करत राहते. जवळच्या डोंगरावरच्या  आदिवासींसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याकडे पहायची नजर देखील अशीच हेटाळणीयुक्त.  स्वतःच्या कोषाबाहेर जे काही आहे त्याच्याशी थोडीही attachment नसण्याची वृत्ती ही खरोखरच आज पावलोपावली दिसते त्याचेच हे प्रतिबिंब.  थोडक्यात काय तर आजच्या काळाचे, वृत्तींचे अप्रिय पण सत्य दर्शन हा सिनेमा दाखवून देतो त्याबद्दल मतकरींचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.

 
आता थोडे मला जाणवलेल्या उणीवांबद्दल आणि पडलेल्या प्रश्नांबद्दल

  
एक : कथेच्या विषयामध्ये मध्ये एवढा कालसुसंगत असणारा सिनेमा हाताळणीमध्ये जुन्या किंवा पारंपारिक वळणाचा दिसतो. उदा. मंत्र्याशी फोनवर बोलताना नामवंत वकिल त्याला मिळणाऱ्या 'फायद्या' चा उघडपणे उल्लेख करतो हे दृश्य. 'system विरुद्ध हिरो' लढ्याचे चित्रण करणाऱ्या सनी देओलच्या कुठल्याही सिनेमातले वाटावे इतके ढोबळ दृश्य आहे हे ! तसेच खटला संपल्यानंतर त्यातल्या व्यक्तींचे पुढे काय झाले हे सांगणे सुद्धा बाळबोधपणाचे वाटते.  वास्तविक आर्थिकदृष्ट्या सबळ असणारा वर्ग केवळ पैशाच्या जोरावर पीडित आणि दुर्बळ वर्गाला भाल्याबुऱ्याची चाड बाळगता कसा नामोहरम करतो याचे उद्वेगजनक दर्शन खटल्याच्या सुनावणी आणि निकालाने आपल्याला घडलेलेच असते आणि बळी गेलेल्या मुलीच्या कुटुंबियांचे उध्वस्त होणे आपल्याला जाणवलेलेच असते. त्यामुळे त्यानंतर मुलीच्या वडिलांचे किंवा आईचे काय हाल झाले हा तपशील पडद्यावर दाखवण्यातून काहीही वेगळे साध्य होत नाही.  या व्यतिरिक्त खटल्यामध्ये साक्ष देणारा प्रत्यक्षदर्शी सोहम सिनेमाच्या अगदी शेवटी तिरस्काराने सोहेलच्या वडिलांवर थुंकतो असे भलतेच Cliched दृश्य आहे. आत्तापर्यंत शेकडो सिनेमा मध्ये दिसलेले (आठवा : नटरंग)   हे दृश्य इथे टाळता नसते का आले ?

 
दोन : सोहेलने नक्की काय केले हे जेव्हा वकील त्याच्याकडून काढून घेतो तेव्हाचा प्रसंग convincing वाटत नाही. खरे म्हणजे शिक्षेच्या विचारांनी घाबरलेला मुलगा ओळखही नसलेल्या वकिलासमोर इतक्या सहजपणे मोकळा होणे अजिबात संभवत नाही. पण इथे सोहेल काही मिनिटातच सगळे काही सांगतो. हा प्रसंग तपशिलात रंगवायला हवा होता.

 
तीन : सोहेलची आई सारखी 'सोहेलला आपण politician बनवायचे' असे म्हणताना दाखवली आहे. कोषात असणारऱ्या उच्चभ्रू आणि सो-कॉल्ड पांढरपेशा समाजामध्ये सर्वदूरपणे आढळणारे राजकारणाविषयीचे कमालीचे नकारात्मक भाव पाहता आपल्या मुलाला राजकारणात पाठवण्यासाठी कुठली उच्चभ्रू आई खरच आसुसलेली असे वाट्त नाही.  उलट अशा वर्गात मुलाला engineer / MBA बनवून खाजगी कंपनीत लट्ठ नोकरी मिळवणे एवढेच उद्दिष्ट दिसते

 
चार : युक्तिवादाच्या वेळी कोर्टात सोहेलचा वकील 'गांगण यांच्यासारख्या खालच्या स्तरावरच्या लोकांकडून आपल्याला खाली खेचले जाते' अश्या अर्थाचे विधान करतो. इतका नामवंत वकील असे थेट वर्गभेद दर्शवणारे पोलिटिकली इन्करेक्ट स्टेटमेंट करेल ? आणि केलेच तर त्यावर कोर्ट आक्षेप घेणार नाही का ?

   
असो. पण हे मुद्दे एकूण सिनेमाचा आवाका आणि विषय मांडणीच्या धाडसापुढे छोटे आहेत. कलाकारांच्या अचूक निवडीमुळे सिनेमा अधिक प्रभावीपणे पोहोचतो. तुषार दळवी(सोहेलचे वडील) , सुप्रिया विनोद (सोहेलची आई), संजय मोने (वकील) आणि सुलभा देशपांडे (आजी)  यांच्या अभिनय कौशल्याविषयी आपण जाणतोच. पण विशेष उल्लेख करावा लागेल तो बालकलाकार प्रहर्ष नाईक(सोहेल) आणि संदीप पाठक (श्री. गांगण) यांचा. प्रहर्ष नाईकने त्याची भूमिका कमालीच्या समंजसपणे केली आहे. हट्टीपणा, तुसडेपणा, कुठल्याही गोष्टीसाठी हटून बसणे, आपली मैत्रीण गायब झाल्याची बातमी कानावर आल्यानंतरचे गांगरून जाणे सगळे त्याने अगदी चपखलपणे दाखवले आहे.  बऱ्याचदा विनोदी भूमिकांमध्ये चमकणाऱ्या संदीप पाठकने अवघ्या देहबोलीतून एका बापाची उद्विग्नता, वेदना, भावाविवशता प्रकट केली आहे. भाग्यश्री पाने यांची सौ. गांगण देखील लक्षवेधी आहे.

   
प्रेक्षकशरण व्यावसायिकतेला जागून सिनेमाचा त्यांना आवडेल असा सुखांत करणे आणि त्यांचे झोपेचे सोंग 'डिस्टर्ब' करणे, त्या नादात मूळ कथानकामागचा गंभीर विचार मिळमिळीत आणि प्रभावहीन करणे (दुनियादारी आणि पोपट ही अलीकडची ठळक उदाहरणे) हा टिपिकल बॉलीवूडी कित्ता गिरवल्याबद्दल रत्नाकर मतकरींना आणि निर्मात्यांनाही धन्यवाद द्यायला हवेत.  मुलांना नको त्या वयात नको त्या गोष्टींचे एक्स्पोजर देणाऱ्या, भविष्य सुखाचे व्हावे म्हणून कोणतेही वाकडे मार्ग अनुसरणाऱ्या पालकांना आपण नक्की काय संस्कार त्यांच्याकडे संक्रमित करतोय याचे भान नसणे यातूनच मतकरींसमोर कथेची आणि सिनेमाची निर्मिती झाली आहे हे नक्की आणि याचे गांभीर्य जाणवण्यासाठी सिनेमाचा खिन्न करणारा अंत होणेच गरजेचे होते.  असे वेगळे काही मांडू पाहणारे प्रयोग प्रेक्षक या नात्याने आपण उचलून धरायलाच हवेत…  अन्यथा मातलेले पॉपकॉर्नपट आहेतच बाजारात