Total Pageviews

Sunday, January 30, 2022

नाते रक्ताचे, रक्तापलीकडले ....

छायाचित्र सौजन्य : bhavisa.org



तीन तरुणांच्या शरीरामधून निघणारे रक्त एका बाटलीमध्ये जमा होऊन ते लगेच दुसऱ्या बाजूने त्यांच्या वृद्ध आईच्या शरीरात जात आहे, हा 'अमर अकबर अँथनी' चित्रपटामधला अत्यंत गाजलेला प्रसंग. अलीकडच्या काळात तो चेष्टेचा विषय ठरला असला तरीही, हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा तो पडद्यावर बघताना प्रेक्षकांच्या भावनांना हात घालणारा ठरला होता. तांत्रिक चुका बाजूला सारून त्याकडे पाहिले तर रक्तदानामुळे एका व्यक्तीचा जीव तर वाचतोच, पण त्याचबरोबर नातेही जोडले जाते, हे त्या प्रसंगामध्ये प्रभावीपणे अधोरेखित केले गेले होते. आज रक्तदानाशी संबंधित तंत्रज्ञानाने खूप मोठा पल्ला गाठला आहे, रक्तदानाबद्दल समाजामध्ये मोठी जागरूकता घडून आली आहे. पण रक्तदानाच्या माध्यमातून रक्तदाता आणि गरजू या दोघांचे नाते जोडणाऱ्या रक्तपेढीचे महत्व मात्र आजही समाजापर्यंत म्हणावे तितके पोहोचलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये महेंद्र वाघ यांच्या ‘ऋणानुबंध रक्ताचे’ या पुस्तकाने ‘रक्तदान’ या विषयाचे असंख्य पैलू लोकांसमोर आणण्याचे महत्वाचे काम केले आहे. 

रक्तदात्याने रक्तदान केल्यापासून रुग्णाला रक्त चढवले जाईपर्यंतची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि जोखमीची असते. रक्तदान – रक्तसाठवण – रक्तजुळवणी – रक्तसंक्रमण अशी ही मोठी साखळी असते. एखाद्या टप्प्यात झालेली थोडीशी हलगर्जीही रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. ही जबाबदारी कशी पार पाडली जाते, याची शास्त्रीय माहिती या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला “रक्ताची गरज आहे” असे म्हटले जाते तेव्हा प्रत्यक्षात त्या व्यक्तीला रक्तामधल्या लाल रक्तपेशी, रक्तबिंबिका (प्लेटलेट्स), रक्तरस (प्लाझ्मा) आणि क्रायो प्रेसिपिटेट यापैकी एखाद्या घटकाची गरज असते. या घटकांचे महत्व, रक्तगटांचे प्रकार, रक्तपेढीमध्ये वापरली जाणारी आधुनिक उपकरणे यांची माहिती महेंद्र वाघ यांनी सर्वसामान्य वाचकांना कळेल अशा सोप्या शब्दांमध्ये उलगडून सांगितली आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेतून १९८३ साली पुण्यामध्ये ‘जनकल्याण रक्तपेढी’ची स्थापना झाली. डॉ. शरद जोशी, वैद्य दादा खडीवाले, डॉ. दिलीप वाणी आप्पासाहेब वज्रम, डॉ. अविनाश वाचासुंदर हे सर्वजण काया-वाचा-मनाने रक्तपेढीचे कार्य वृद्धिंगत केले. सामाजिक भान आणि व्यावसायिक शिस्त यांचा उत्तम मिलाफ साधत रक्तपेढीने रुजवलेल्या कार्यसंस्कृतीची पुस्तकाच्या पानापानामधून प्रचिती येते. प्रशिक्षण, प्रबोधन, समुपदेशन या आघाड्यांवर जनकल्याण रक्तपेढीचे कार्य अतिशय काटेकोर नियोजनबद्ध आहे. 

रक्तसाठवणुकीसाठी, पृथक्करणासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे हे तर रक्तपेढीचे प्राथमिक कर्तव्य असतेच. पण त्याच बरोबर वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असूनही रक्तपेढीच्या कार्याची पुरेशी कल्पना नसणाऱ्यांना प्रशिक्षण देणे, स्वेच्छा रक्तदानाचे महत्वच माहित नसणाऱ्या समाजासाठी विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन करणे, रक्तदाते आणि रक्ताची गरज असणारे रुग्ण व त्यांचे आप्त यांचे समुपदेशन करणे असे व्यापक कार्य रक्तपेढी करत असते. यातूनच कुठल्याही रक्तदान शिबिराशिवाय रक्तपेढीमध्ये येऊन नियमितपणे रक्तदान करणारे रक्तपेढीला मिळाले आहेत. त्यामुळे आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये रक्ताच्या अनुपलब्धतेचा सामना करण्याची वेळ येत नाही. 

आपल्या बहुपेडी कामामधून जनकल्याण रक्तपेढीने जी परिसंस्था उभी केली, तिचे लोभसवाणे दर्शन महेंद्र वाघ यांनी घडवले आहे. चौफेर नजर ठेवून असणाऱ्या रक्तपेढी संचालकांपासून रक्तपेढीमध्ये स्वच्छतेचे, स्वयंपाकाचे करणाऱ्या प्रेमळ मावशींपर्यंत आणि स्वागत कक्षामध्ये आल्यागेल्याला कुशलतेने हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून  ते रुग्णालयांमध्ये रक्तपिशव्या तत्परतेने नेऊन पोचवण्याचे काम करणाऱ्या कुशल ‘रक्तदूतां’पर्यंत सर्वांची इथे जिव्हाळ्याने दखल घेतली आहे. यातील प्रत्येकाचे काम प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एखाद्याच्या अस्तित्वाची जोडले गेलेले असते, याची सतत जागी असणारी जाणीव हा ‘जनकल्याण रक्तपेढी’ या परिसंस्थेचा संस्कार आहे. 

गरजूंना व्यावसायिक रुपात रक्त विकले जाण्याचा काळ जाऊन ‘विनामोबदला रक्तदान’ ही संकल्पना समाजात रुजली आहे. ‘रक्तदान ही स्वेच्छेने आणि निरपेक्ष भावनेने करण्याची गोष्ट आहे’, हा संस्कार समाजामध्ये रुजवण्यामध्ये जनकल्याण रक्तपेढीचाही मोठा वाटा आहे. आज आर्थिक फायद्यासाठी रक्त विकण्यावर बंदी आलेली आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या साखळीमुळे असंख्य गरजूंचे प्राण वाचले आहेत. 

व्यावसायिक गणिताच्या पुढे जाऊन एक व्रत म्हणून कार्य करण्याचा उद्देश असल्याने जनकल्याण रक्तपेढी वेगळी ठरते. रक्तपेढीची कार्यसंस्कृती, पारदर्शकता पाहून तिथल्या कार्याशी स्वतःला जोडून घेणारी माणसे ही रक्तपेढीची खरी कमाई आहे. निवृत्तीनंतर कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तिथे येऊन काम करणारे मराठेकाका, कुलकर्णीकाका, खाडेकरकाका यांच्या कार्यमग्नेतेचे एकीकडे  आपल्याला प्रेरणा देते; तर दुसरीकडे शारीरिक कमरता असूनही आपल्या मर्यादेत शंभर टक्के समर्पणवृत्तीने काम करणाऱ्या राजेशची कहाणी आपल्याला चटका लावून जाते. 

‘ऋणानुबंध रक्ताचे’ या पुस्तकाचा मोठा भाग जनकल्याण रक्तपेढीच्या कार्याने व्यापलेला असला असला, तरीही हे केवळ त्या रक्तपेढीची गौरवगाथा सांगणारे पुस्तक नाही. सतत धावपळीच्या क्षेत्रात कार्यरत राहूनही जगाकडे डोळसपणे पाहणाऱ्या कार्यकर्त्या लेखकाने केलेल्या या नोंदी आहेत. त्यांना चिंतनाची जोड आहे. रक्तदानाच्या विश्वामधली भावनिक स्पंदने त्यामध्ये अतिशय संवेदनशीलतेने टिपलेली आहेत. चांगल्या कामासाठी निरपेक्ष भावनेने समाजाबद्दल त्यामध्ये जशी कृतज्ञता दर्शवली आहे, तशी रक्तदान चळवळीमध्ये शिरलेल्या कुप्रथा आणि स्वार्थी वृत्ती यांच्याबद्दल वाचकांना सावधही केले आहे. 

रक्तपेढीतल्या विज्ञान-तंत्रज्ञानापासून रक्तपेढी क्षेत्रातल्या रोजगार संधींपर्यंत, रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेपासून रक्तपेढीच्या कार्याशी जोडल्या गेलेल्या करणाऱ्या कवी, लेखक, कलाकारांच्या संवेदनशीलतेपर्यंत अनेक गोष्टींची पुस्तकामध्ये आवर्जून दाखल घेतली आहे. रक्तदान जागृतीसाठी लिहिलेले गीत आणि जनकल्याण रक्तपेढीला पुलंनी दिलेल्या काल्पनिक भेटीमधले त्यांचे (अर्थातच काल्पनिक) खुसखुशीत भाषण, हे दोन्ही खास जमून आले आहे. सागर नेने यांच्या अत्यंत अर्थपूर्ण मुखपृष्ठामुळे पुस्तकाच्या श्रीमंतीमध्ये भर पडली आहे. अनेक हृद्य अनुभवांची पखरण, निवेदनाच्या ओघामध्ये सहजतेने येणाऱ्या काव्यपंक्ती, संपूर्ण निवेदनामध्ये असलेला भावनिक ओलावा यामुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे.


ऋणानुबंध रक्ताचे

लेखक : महेंद्र वाघ

प्रकाशक : भारतीय विचार साधना

पृष्ठसंख्या : २६३

किमत : २५०


***

ब्लॉगवर टाकलेला हा लेख या पुस्तकावर लिहिलेला मूळचा संपूर्ण लेख आहे. हा लेख 'सामना'च्या उत्सव पुरवणीमध्ये ३० जानेवारी २०२२ रोजी संक्षिप्त स्वरुपात प्रसिद्ध झाला.

लेखाची लिंक : https://www.saamana.com/book-review-by-prasad-phatak/ 

ई-पेपर कात्रण : 



बाबाविषयी...

छायाचित्र सौजन्य : अनिल अवचट यांचे फेसबुक पेज


अनेक वाचकांचा वाचनप्रवास हा सर्वसाधारणपणे मन रिझवणाऱ्या, चार घटका मनोरंजन करणाऱ्या आणि अलंकारिक भाषा असणाऱ्या पुस्तकांपासून सुरू होतो. तो तसा असण्यात गैर काहीच नसून ती बरीचशी स्वाभाविक गोष्ट असते. मीही याला अपवाद नव्हतो. पण महाविद्यालयात असताना 'धागे उभे आडवे' हे पुस्तक वाचले आणि त्या पुस्तकाने मला आतून हलवले. आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या पण आपल्याला कधीही न दिसलेल्या प्रश्नांचे अनिल अवचटांनी असे काही ताणेबाणे गुंफले होते की त्यात गुरफटून, गुदमरून गेल्यासारखे झाले. लिखाणाला सत्याचा पाया असेल तर अकृत्रिम भाषाही किती परिणामकारक ठरू शकते याचा प्रत्यय आला. हातमाग, हळद व्यवसायांमधले पिचून गेलेले कामगार; वेश्या, देवदासी अशा समाजाच्या खालच्या पायरीवरील माणसांची विदारक शब्दचित्रे त्यांनी आपल्या अनलंकृत भाषेत रेखाटली होती. त्या पुस्तकाच्या वाचनामुळे अवचटांच्या साध्या सोप्या भाषेनेही मनात वेगळे स्थान निर्माण केले. ती लेखनशैली कुणाचेही अनुकरण न करता त्यांच्यात आलेली होती. एका मनस्वी माणसाचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात आणि जगण्यातही दिसायचे. 


अभिनिवेशापासून दूर

आपल्याला हवे ते मनापासून लिहिणे आणि ते आहे तसे लोकांना आवडणे ही फार कठीण गोष्ट आहे. 'मी मला वाटेल ते लिहितो' असे म्हणणारे लेखक बघता बघता व्यावसायिक गणितांप्रमाणे लिहू लागल्याची अनेक उदाहरणे असताना अनिल अवचट मात्र कायम स्वतःला योग्य वाटेल त्या विषयावर लिहित राहिले, याचे मुख्य कारण त्यांनी कधीही ‘मला लेखक म्हणून मान्यता मिळवायची आहे' या भावनेने लिहिले नाही. अलीकडेच ‘ई-साहित्य संमेलना'चे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले तेव्हा “त्यांचे लिखाण त्या लायकीचे नाही” अशी शेरेबाजी झाली तेव्हाही “मला लेखक समजू नका आणि माझ्या लिखाणाला साहित्य समजू नका” असे सहज म्हणण्याइतके त्यांचे जगणे अभिनिवेशविरहित होते. 

अनिल अवचटांची ही वृत्ती त्यांच्या जगाकडे डोळे उघडे ठेवून बघण्याच्या सवयीतून आली होती. ही सवय त्यांना कशी लागली याबद्दल त्यांच्या ‘स्वतःविषयी’ या पुस्तकातून कळते. ‘स्वतःविषयी’ हे मला मराठीतल्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक वाटते. अनिल अवचटांमधला माणूस कसा घडत गेला हे या पुस्तकामधून जाणून घेतले की, त्यांच्यातला लेखक कसा घडला हे आपल्याला नीट समजू शकते. ओतूरसारख्या छोट्या गावामध्ये गेलेले बालपण, नववीपासून शिक्षणासाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात आल्यानंतरचे भांबावलेपण, त्यातून आत्मविश्वासाला गेलेले तडे, वैद्यकीय महाविद्यालयातले शिकवून जाणारे अनुभव, श्रद्धा-अंधश्रद्धांचा गुंता, आपल्या मित्रांच्या साथीने चळवळीमध्ये उतरणे, कौटुंबिक तणावाचे प्रसंग आणि या सगळ्या टप्प्यांमधून जात स्वतः एक कुटुंबवत्सल पिता होणे असा आपल्या जडणघडणीचा आलेख त्यांनी मांडला आहे. आपल्या अडखळण्या-सावरण्यासह त्यांनी ज्या प्रांजळपणे आपला प्रवास रेखाटला आहे, ते वाचणे विलोभनीय आहे. स्वतःकडेही त्रयस्थपणे, अलिप्तपणे कसे पाहावे याचा ‘स्वतःविषयी’ हा वस्तुपाठ आहे. हे पुस्तक जसे त्यांचा माणूस म्हणून प्रवास उलगडते, तसेच ‘माझ्या लिखाणाची गोष्ट’ हे त्यांचा लेखक म्हणून प्रवास उलगडते. अनिल अवचटांबद्दल विस्ताराने जाणून घ्यायचे असेल तर ही दोन्ही पुस्तके वाचायलाच हवीत.


सामाजिक प्रश्नांवर क्ष-किरण

ज्या लेखनप्रकारामुळे अनिल अवचटांचे नाव सुपरिचित झाले ती म्हणजे ‘रिपोर्ताज’. ऐन तारुण्यात बिहारला केलेला प्रवास आणि तिथले दैन्य, गरिबी, शोषण पाहून आलेल्या अस्वस्थतेतून त्यांनी एक लेखमाला लिहिली आणि त्यातूनच पुढे त्यांचे ‘पूर्णिया’ हे पुस्तक जन्माला आले. समस्या आहे त्या ठिकाणाला भेट देणे, संबंधितांशी संवाद साधणे आणि त्याचे सविस्तर वृत्त तयार करणे, या गोष्टी कुठलाही पत्रकार करतोच, पण अवचटांच्या रिपोर्ताज स्वरूपाच्या लिखाणाने लोकांचे लक्ष वेधून घेतले याचे कारण त्यांनी त्यासाठी दिलेला वेळ आणि आपल्या निरीक्षणांची त्यांनी केलेली मांडणी. सुरुवातीच्या काळामध्ये अवचटांनी पत्रकारिता करताना तात्कालिक विषयांवर लिहिले आणि समस्यांना वाचाही फोडली, पण ज्या समस्या दीर्घकालीन आहेत त्यांच्यावर लिहिण्यासाठी विशेष प्रयत्न केले, एखाद्या ठिकाणी पुन्हा पुन्हा भेटी दिल्या, संबंधितांचा विश्वास संपादन करून समस्यांचे मूळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. जिथे समस्याग्रस्त लोक सविस्तर बोलत नसत तिथे डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले. लोकांची घरे, त्यांचे कपडे इथपासून ते त्यांच्या चेहऱ्यावर हलकेच तरळून जाणारे भाव किंवा त्यांनी केलेली अल्पशब्दी टिप्पणी यांचीही मनात नोंद घेतली आणि ती आपल्या लेखामध्ये मांडली. सोपी शब्दरचना आणि छोटी छोटी वाक्ये यांमुळे वाचक त्यांच्या लिखाणाच्या अधिक जवळ जाऊ शकले असे मला वाटते.

आत्मीय अलिप्तता हे मला अवचटांच्या रिपोर्ताजचे वैशिष्ट्य वाटते. समस्यांना भिडताना त्यांच्यातल्या माणसाने समस्याग्रस्तांकडे आत्मीयतेने बघितले, पण त्याबद्दल लिहिताना मात्र त्यांच्यातल्या लेखकाने उमाळे, कढ न आणता फक्त निरीक्षणे आणि काही टिप्पण्या नोंदवल्या आणि बाकीचे वाचकांवर सोडले. त्यांच्या लेखणीत एक मोकळेपणा मला कायम जाणवतो. विषयाच्या अनुषंगाने लिहिताना अकारण खोटा 'पॉलिटिकल करेक्टनेस' न बाळगता संबंधित जातींचे ते स्पष्ट उल्लेख करत, तसेच एखाद्या समाजघटकाच्या चुकीच्या धारणांवर टिप्पणीही करत असत (एका जातिसंमेलनावर त्यांनी लिहिलेला वृतांत मला याठिकाणी विशेषकरून आठवतो आहे). 

रिपोर्ताज हा लेखनप्रकार प्रकार मराठीत आणण्याचे श्रेय अनिल अवचटांना दिले जाते. गंमत म्हणजे रिपोर्ताज नावाचे काही जगाच्या पाठीवर आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती. ‘मला जे दिसले ते मी लिहित गेलो, त्या साहित्यप्रकाराला विशिष्ट नाव आहे हे इतरांनी सांगितले तेव्हा मला कळले’ हेही अवचट प्रांजळपणे सांगत असत. साधना, मनोहर, माणूस, किर्लोस्कर अशा नियतकालिकांमध्ये लिहिलेल्या लेखांमधून अनिल अवचटांनी पांढरपेशा वाचकांना संपूर्ण अपरिचित विश्वाचे दर्शन घडवले आणि अंतर्बाह्य हादरवले. त्यांच्या लिखाणामुळे असंख्य पिचलेल्या, पिडलेल्या मूक श्वासांना आवाज मिळाला. हे लेख पुढे ‘माणसं’, ‘वाघ्या मुरळी’, ‘प्रश्न आणि प्रश्न’, ‘धागे उभे आडवे’ या पुस्तकांच्या स्वरुपात प्रसिद्ध झाले. ते वाचून अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. विशेष म्हणजे कष्टकरी वर्गातल्या लोकांना अवचटांच्या लेखामुळे इतरांच्या कष्टांचीही जाणीव झाली. हमालांवरचा लेख वाचल्यानंतर धान्याची पोती वाहणाऱ्या हमालाने मिरच्यांची पोती वाहणाऱ्या लोकांचे हाल काय असतात हे प्रथमच कळल्याची कबुली दिली. 


संवेदनशील लेखक, कृतिशील कार्यकर्ता

एकेकाळी ‘युक्रांद’सारख्या संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून कार्य केलेल्या आणि पुढे ‘आपल्याला हे झेपणारे नाही’ असे प्रामाणिकपणे मान्य करून त्यातून बाजूला झालेल्या अनिल अवचटांनी आपल्यातल्या कार्यकर्त्याला ग्लानी मात्र येऊ दिली नाही. लेखणीच्या माध्यमातून तो कार्यकर्ता प्रकट होतच राहिला. ‘आणखी काही प्रश्न’ हे त्यांचे शेवटचे ठरलेले पुस्तकही याचीच साक्ष देते. इतरांना न दिसलेल्या गोष्टी ते बरोब्बर टिपत असत. पुण्याबद्दल लिहिता बोलताना काही ठराविक पेठाच लोकांच्या अभिमानाच्या अथवा चेष्टेच्या आणि टीकेच्या विषय ठरतात, पण अनिल अवचटांनी पुण्यावर लिहिले तेव्हा मात्र पूर्व भागातल्या पेठांमधल्या जीवनाचे चित्र रेखाटले आणि तिथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कारागिरांच्या कामाचे कौतुक केले.

अंमली पदार्थांच्या नादी लागून चांगल्या घरांमधले तरूणही आयुष्यातून उठत असलेले पाहून अनिल अवचटांनी लिखाण सुरू केले त्याचेच पुढे ‘गर्द’ हे पुस्तक झाले. सुनीताबाई आणि पुलंच्या प्रोत्साहनातून आणि आर्थिक सहाय्यातून आपली पत्नी डॉ. सुनंदा यांच्यासोबत त्यांनी पुण्यामध्ये ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले आणि शेकडो लोकांना गर्तेतून बाहेर काढले. ‘मुक्तांगण एक दिवस बंद करावे लागेल, अशा निर्व्यसनी स्थितीत समाज येईल’ असे त्यांचे स्वप्न असताना प्रत्यक्षात मात्र व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढलेले पाहून ते व्यथित होत असत. “पूर्वी लोक दारू पीत नसत असे नाही, पण तेव्हा दारूला प्रतिष्ठा नव्हती. आता मात्र चांगल्या घरांमध्येही दारू पिण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे” हे ते व्यथित अंतःकरणाने बोलून दाखवत असत. त्यातून समाजाच्या स्वास्थ्याविषयी तळमळ असणारा कार्यकर्ताच डोकावतो.


समृद्ध लेखनप्रवास

सतत कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये वावरणाऱ्या काही जणांच्या रोजच्या वागण्यातही जगाबद्दलचा कडवटपणा अकारण डोकावताना दिसतो. सतत संघर्षाच्या भूमिकेत राहणेच त्यांच्या अंगवळणी पडून गेलेले असते. तरूण वयात अनिल अवचटांची जडणघडण ज्या वैचारिक वर्तुळामध्ये झाली त्यामध्येही अशा लोकांची कमतरता नाही. पण अनिल अवचट मात्र त्यांच्यात वेगळे ठरले. त्यांच्यातला लेखक आणि संवेदनशील माणूस नुसताच टिपे गाळत राहिला नाही. तो फुलत, बहरत गेला. श्रेष्ठ गायकाला जशा दोन सुरांच्या मधल्या जागा दिसतात आणि त्यांचा विस्तार तो करत जातो, तशा अवचटांना रोजच्या जगण्यातल्या असंख्य सुंदर जागा दिसू लागल्या. माणसांमधल्या चांगल्या जागा त्यांनी शब्दांत उतरवल्या, त्यातून उत्तम व्यक्तिचित्रे उभी राहिली. निसर्गामधल्या सुंदर जागांनी त्यांना खुणावले, तेव्हा त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. कधी त्यातून ‘सृष्टीत... गोष्टीत’, ‘वनात .... जनात’ सारखे खेळकर बालसाहित्य निर्माण झाले, तर कधी ‘बहर शिशिराचे सारखे’ छायाचित्रांचे पुस्तक झाले. आपल्या जगण्यातला आनंद त्यांनी कधी ‘जगण्यातील काही’ सारख्या ललित लेखसंग्रहातून तर कधी ‘मस्त मस्त उतार’ सारख्या कवितासंग्रहातून मांडला. आपल्या जे जे आवडले ते दुसऱ्याला सांगण्याच्या ऊर्मीतून ते शेवटपर्यंत लिहित राहिले. 

ज्या अंगभूत कुतूहलाने अनिल अवचट सामाजिक समस्यांच्या अंतरंगात डोकावले, त्याच कुतूहलाने त्यांनी शब्दांच्या, कॅमेऱ्याच्या, कुंचल्याच्या, सुरांच्या माध्यमातून भवतालाची गळाभेट घेतली. आयुष्याच्या उत्तरार्धातही एखाद्या लहान मुलाच्या औत्सुक्याने ते जगाकडे बघत राहिले. सतत नवीन काहीतरी शिकत राहिले. बासरी, ओरिगामी, लाकूडकाम... कितीतरी गोष्टींमध्ये त्यांनी मन रमवले. कर्करोगाने पत्नी सुनंदा यांना ओढून नेल्यानंतर बसलेल्या हादऱ्यातून त्यांना या छंदांनीच सावरले. उतारवयामध्ये अवचटांना शरीरातल्या घडामोडींविषयी कुतूहल वाटू लागले आणि त्यातून केलेल्या शोधाशोधीतून ‘कुतुहलापोटी’ नावाचे पुस्तक साकारले!


लोभस व्यक्तिमत्व

अनिल अवचटांचे लिखाण जसजसे वाचत गेलो तसतसा त्यांच्याबद्दल आदर वाढत गेलाच, पण त्यांच्याबद्दलच्या आदराचे आपलेपणामध्ये रूपांतर व्हायला कारणीभूत ठरले ते त्यांचे बोलणे.. जाहीर कार्यक्रम, मुलाखती यांमधले अनिल अवचटांचे बोलणे ऐकताना नेहमी कुटुंबातले प्रेमळ आजोबा बोलत आहेत असे वाटायचे. आपल्या घरातल्या लहानग्यांना त्यांच्याकडे निर्धास्तपणे सोपवावे असे त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व होते. शांतपणे, कुठलेही बोजड शब्द न वापरता ते बोलायचे. बोलण्याच्या ओघात ते किंचित लांबलेल्या सुरात 'हंss' असे म्हणायचे ते ऐकायला अतिशय गोड वाटायचे. एक विलक्षण आश्वासक सूर त्यामध्ये जाणवायचा. 

एकदा आमच्या घरापाशी राहणाऱ्या एका साहित्यप्रेमी गृहस्थांनी आपल्या घराच्या गच्चीमध्ये अनिल अवचटांशी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण बोलता बोलता त्याचे गप्पांमध्ये कधी रुपांतर झाले कळलेच नाही. बोलता बोलता अनिल अवचट एकीकडे हातांनी कधी रुमालाचा उंदीर करत होते, तर कधी कागद दुमडून ओरिगामीमधले हंसाचे रूप साकारत होते. त्यांचे ओरिगामीमधले कौशल्य नुसत्या हौशी पातळीवरचे नव्हते. ओरिगामीमध्ये आधीपासूनच असणाऱ्या शेकडो कलाकृती शिकता शिकता नव्या कलाकृती घडवण्याएवढे प्रभुत्व त्यांनी मिळवले होते. त्यांनी ओरिगामी गणपती सुद्धा आम्हाला दाखवला! 

त्यांचे बोलणे त्यांच्या लिखाणासारखेच होते. अगदी मनापासून, कुठलाही आव न आणता.. त्यांना कुठल्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहजपणे ‘ए बाबा’ का म्हणू शकते, हे त्या दिवशी मला अगदी ‘याची देहीं..’ अनुभवायला मिळाले. हळूहळू बाबाचे बोलणे कमी होत गेले... मग त्याने बासरी काढली आणि तिन्हीसांजेचे शेंदरी अवकाश सुरांनी भारून टाकले. जातिवंत हापूस आंबा पिकत जातो तसा अधिकाधिक मधुर होत जातो, तो एकवेळ सुरकुतेल पण किडत, सडत नाही... बाबा तसाच पक्व भासला होता त्या संध्याकाळी..  

परवा कुणाच्या ध्यानीमनी नसताना बाबा आपल्या सर्वांना सोडून गेला खरा, पण जाताना तो त्याच्या जगण्यातले टवटवीत सूर आपल्याला गुणगुणण्यासाठी मागे सोडून गेला आहे याचा विसर पडू नये. 

*****

३० जानेवारी २०२२ रोजी 'मुंबई तरूण भारत'मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख.

लेखाची लिंक : https://www.mahamtb.com/Encyc/2022/1/29/artcle-on-tribute-to-anil-avchat.html

ई-पेपर कात्रण :




लोह बी घडले, परीसचि झाले...

छायचित्र सौजन्य : दत्ता जोशी


पौगंडावस्थेमधून बाहेर पडून तारुण्याच्या खुल्या आसमंताकडे जाणार्‍या वाटेवर चालणार्‍या व्यक्तीला शरीर आणि मनामध्ये घडून येणारे बदल असंख्य भलीबुरी स्वप्ने दाखवत असतात. त्यामध्ये गुंतून जात असताना वाटेवरच्या नाजूक वळणांवरून पाऊल कधी घसरेल याची शाश्वती नसते. बंधमुक्ततेसाठीच्या आसुसलेपणाचे रुपांतर स्वैरपणामध्ये होऊ नये, यासाठी या वयामध्ये गरज असते ती योग्य दिशादर्शनाची.

या वयोगटामधल्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींना दिशादर्शन करत त्यांच्यातील अंगभूत ऊर्जेला विधायकतेकडे वळवणारी आणि ‘राष्ट्र प्रथम’ हा संस्कार रुजवणारी संघटना म्हणजे ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद.’ या संघटनेने गेल्या ७२ वर्षांमध्ये अक्षरशः लाखो कार्यकर्ते घडवले आहेत. महाविद्यालयीन कालखंडात मिळालेली ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या संस्कारांची शिदोरी घेऊन वैयक्तिक आयुष्यात वाटचाल करणार्‍या २८ व्यक्तींच्या कर्तृत्वाची ओळख दत्ता जोशी यांनी आपल्या ‘तुम्ही बी घडा ना’ या पुस्तकामधून करून दिली आहे.

महाविद्यालयीन जीवनात परिषदेमध्ये  दायित्व घेऊन कार्य केलेल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी संवाद साधून त्यामधून हे पुस्तक साकारले आहे. यातले अनेक जण परिषदेचे ‘पूर्णवेळ कार्यकर्ता’ असण्याचा अनुभव घेऊन तावून-सुलाखून निघालेले आहेत. आरक्षणाचा लाभ घेऊन सरकारी नोकरी न करता ‘दलित उद्योजकता’ या विषयात कार्य करणारे ‘दलित चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक मिलिंद कांबळे; समाजसेवी संस्थांना (एनजीओ) कागदपत्रांची पूर्तता, निधी उभारणी, नियोजन यासंदर्भात मार्गदर्शन करणार्‍या ‘सेवावर्धिनी’ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी, ईशान्य भारतापासून युरोपपर्यंत ‘मदर्स ऑन व्हील्स’ या उपक्रमाद्वारे मातृशक्तीचा जागर करणार्‍या माधुरी काळे-सहस्रबुद्धे, अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमधून वर येऊन आज बांधकाम आणि पुनर्विकास क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करणारे शिवाजी दहीबावकर अशा अनेक माजी पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी सांगितलेले अनुभव खूप काही शिकवून जाणारे आहेत.


आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम करण्याचा परिषदेमध्ये घेतलेला अनुभव या सर्वांना प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कसा उपयोगी पडला, हे वाचणे रोचक आहे. ‘निसर्ग वारी’ या संकल्पनेतून पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त वारीसाठी झटणारे प्रशांत अवचट यांची या संदर्भातली टिप्पणी ही परिषदेच्या कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक अनुभव म्हणता येईल, अशी आहे. ते म्हणतात, “पाण्यात बुडणार्‍याला वाचवायचे कसे याचे प्रशिक्षण परिषदेने दिलेले नव्हते. पण, आणीबाणीच्या परिस्थितीत डोके शांत ठेवून बचावाची योजना कशी आखायची, गडबडीतही अन्य नियोजन कसे करायचे आणि अमलात कसे आणायचे, हे मात्र परिषदेने शिकवले होते. हीच मनाची कणखरता घेऊन कुठे दाज्या पावरा नंदुरबारच्या वनवासी भागामध्ये धरणग्रस्तांसाठी कार्य करतात, कुठे डॉ. कदम, डॉ. चाकूरकर आणि डॉ. बेद्रे अत्यल्प मोबदला घेऊन रुग्णसेवा करतात, कुठे डॉ. गिरीश कुलकर्णी थेट वेश्यावस्तीमध्ये शिरून वेश्यांच्या पुनर्वसनाचे, वेश्यांच्या मुलांच्या विकासाचे कार्य करतात. कुठे सुरेश चव्हाणके प्रतिकूल परिस्थितीत ‘सुदर्शन’ ही वृत्तवाहिनी उभी करून हिंदुत्वविरोधी संपुआ सरकारच्या दडपशाहीला खंबीरपणे तोंड देतात.”

प्रशासकीय अधिकारी अजित जोशी यांनी परिषदेच्या विविध उपक्रमांमधून रुजणार्‍या सामाजिक जाणिवांबद्दल महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात, “कामामध्ये लोकाभिमुखता आवश्यक असते आणि त्यासाठी सामाजिक भान महत्त्वाचे असते. सामाजिक कार्याचा स्पर्श असणारी मुले या व्यवस्थेत खूप परिणामकारक निर्णय घेऊ लागतात. सामाजिक भान येण्यासाठी अन्य मुलांना जो वेळ लागतो, तो यांना लागत नाही. परिषदेसारख्या संघटनेशी विद्यार्थीदशेत जोडला गेलो, त्याचा मोठा फायदा मला माझ्या कामात झाला. त्यातून मी अधिकाधिक लोकोपयोगी कामे करू शकलो. अशाच संस्कारांचा फायदा अनेक कार्यकर्त्यांना स्वतः सामाजिक संस्था उभी करून समाजकार्य करताना झाला.” डॉ. प्रसाद आणि हर्षदा देवधर यांचे ‘भगीरथ ग्रामविकसन प्रतिष्ठान’, सुनील गोवारदीपे यांची ‘नॅचरल एज्युकेशन फॉर इकोलॉजिकल डेव्हलपमेंट’ या सामाजिक संस्थांच्या कार्याचे पुस्तकामध्ये दिलेले तपशील यादृष्टीने अभ्यासावेत, असे आहेत.


परिषदेचे काम करताना आंदोलने करण्याची वेळही अनेकदा येते. अन्यायकारक शुल्कवाढीविरोधात केलेले आंदोलन असो वा मुलींच्या स्वच्छतागृहांसाठी केलेली आंदोलने असो, परिषदेच्या आंदोलनांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. परिषदेची आंदोलने फक्त महाविद्यायीन परिघापुरती मर्यादित राहिली नाहीत. काश्मीरमधील हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल जागृतीसाठी केलेले ‘चलो काश्मीर’ आंदोलन असो, रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन असो वा आसाममधील विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा असो, परिषद राष्ट्रीय प्रश्नांवरच्या आंदोलनातही कायमच सक्रिय राहिलेली आहे. या आंदोलनांनी आपल्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा उचलल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी पुस्तकामध्ये आवर्जून सांगितले आहे.

आंदोलनांचा मार्ग पत्करावा लागला, तरीही व्यवस्थेविरुद्धचा कायमस्वरूपी विखार रुजू न देणे, राष्ट्रभान न गमावणे, हे कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य परिषदेला डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांपेक्षा वेगळे बनवते. सतत संघर्षाचा पवित्रा न ठेवता ‘युथ फॉर डेव्हलपमेंट’, ‘प्रतिभा संगम’, श्रमदान शिबिरे असे विधायक कार्यक्रम परिषदेकडून आखले जातात. त्यामुळेच परिषदेमधला सक्रिय सहभाग थांबल्यानंतर वैयक्तिक आयुष्यातही याचा कसा सकारात्मक प्रभाव पडतो, त्याची अनेक उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतात. ‘ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन’चे अध्यक्ष या नात्याने धनंजय चंद्रात्रे यांनी एकही आंदोलन न करता, रेल्वे आणि प्रवाशांची अडवणूक न करता अनेक न्याय्य मागण्या मान्य करून घ्यायचा स्वागतार्ह पायंडा पाडला हे याचे उत्तम उदाहरण!

परिषदेमधली सर्वसमावेशकता या पुस्तकामध्येही प्रतिबिंबित झाली आहे. सधन कुटुंबापासून ते अगदी वनवासी पाड्यांपर्यंतच्या भिन्न सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असणार्‍या कार्यकर्त्यांची पुस्तकामध्ये आवर्जून दखल घेतली आहे. परिषदेचे सक्रिय कार्य थांबवल्यानंतर या कार्यकर्त्यांनी पुढील आयुष्यामध्ये ज्या कार्यक्षेत्रांमध्ये ठसा उमटवला, त्यामध्येही मोठे वैविध्य आहे.दत्ता जोशी यांनी आतापर्यंत मराठी माणसांमध्ये उद्योजकता रुजावी यासाठी महाराष्ट्रातल्या 900 हून अधिक उद्योजकांच्या यशोगाथा 25 पुस्तकांमधून शब्दबद्ध करून ‘प्रेरक लेखक’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. स्वत: ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केलेले असल्याने त्यांना परिषदेच्या कार्यपद्धतीचा जवळून परिचय आहे. परिषदेच्या माजी कार्यकर्त्यांच्या अनुभवांचे नेमके शब्दांकन, आवश्यक तिथे स्वतःच्या आकलनाची भर घालणे, कार्यकर्त्यांचे परिषदेमधले अनुभव आणि त्यांची नंतरची वाटचाल यांची स्वतःच्या निवेदनातून केलेली नेमकी सांधेजोड यामुळे पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे. ही कार्यकर्त्याने सांगितलेल्या मुद्द्यांना ठळक करणारी प्रत्येक प्रकरणामधली ‘परिषदेने मला काय दिले’ ही चौकट लक्षवेधी आहे. राष्ट्रउभारणीमध्ये अमूल्य योगदान देणार्‍या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची पंच्याहत्तरी दृष्टिपथात येत असताना विविध अंगांनी तिचा सविस्तर लेखाजोखा मांडला जाईल, तेव्हा ‘तुम्ही बी घडा ना’ हे पुस्तक त्याला पूरकच ठरेल.


‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना’ हे पद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिषदेमध्ये नेहमी गायले जाते. त्यामध्ये ‘परिसाच्या संगे लोह बी घडले, लोह बिघडले सुवर्णचि झाले’ अशी एक ओळ आहे. आपल्याकडे आलेला वारसा कुठल्या ना विधायक मार्गाने इतरांना देणार्‍या आणि त्यातून प्रेरणेची गंगोत्री वाहती ठेवणार्‍या परिषदेच्या संस्कारांबद्दल पुस्तकामधून जाणून घेतल्यावर पद्याच्या ओळीमध्ये थोडासा बदल करून ‘परिसाच्या संगे लोह बी घडले, लोह बी घडले परीसचि झाले’ असे म्हणावेसे वाटते...

 

पुस्तकाचे नाव : तुम्ही बी घडा ना

लेखक : दत्ता जोशी

प्रकाशक : पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान

पृष्ठसंख्या : २५५

मूल्य : ३००रु.

(पुस्तकासाठी संपर्क :

पीयूष - ९४२०३४२४२४)


'मुंबई तरुण भारत'मध्ये २५ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित झालेला लेख

लिंक : https://www.mahamtb.com/Encyc/2021/12/25/Book-review-of-Tumhi-bi-ghada-na-.html

ई-पेपर कात्रण :