Total Pageviews

Monday, August 15, 2016

Mr & Mrs

गोष्ट आहे एकेकाळी छोटा पडदा गाजवलेल्या पण एका काम नसलेल्या अमित जयंत या अभिनेत्याची. १० वर्षापूर्वी कुणीतरी केलेल्या  अभिनयक्षमतेच्या कौतुकावर आजही मिशीला तूप लावून फिरतोय. अजूनही ताठा भरपूर. एकदा चान्स मिळाला तर 'छा जाउंगा' वगैरे प्रौढी मिरवतोय. मालाला आता उठाव नाही हे मानायला राजी नाहीये. रोजच्या घरखर्चासाठी देखील बँक मध्ये नोकरी बायकोवर अवलंबून. तिच्याशी खटके उडणे, वादावादी नित्याचीच झालेले. बायकोशी बँकेतल्या सहकाऱ्याशी असणारी मैत्री डोळ्यात खुपत आहे. अशातच एक निर्माता मित्र अश्विन घरी येतो तेव्हा त्याच्या "कसं चाललंय ?" या प्रश्नाला उत्तर देताना अमित म्हणतो "बायकोपासून घटस्फोट घ्यावासा वाटतोय". धंद्यात तरबेज असलेला अश्विन त्याला ऑफर देतो "मी तुझा घटस्फोट विकत घेतो. आपण एक मस्त reality  show करू. तू बायकोशी संबंध बिघडवत न्यायचे. आपण घरात सगळीकडे छुपे कॅमेरे लावू. तुझ्या कानात इयरपीस लावून त्यावर मी तुला सूचना देणार. बघ तुझा २ महिन्यात घटस्फोट होतो की नाही. show तर कमालीचा हिट होणार राखी सावंतचे लग्न लोकांनी चवीने पाहिले तुझा घटस्फोट का नाही बघणार !!" आणि बदल्यात ऑफर देतो 'प्रत्येक एपिसोडचे ४ लाख रुपये'.

पैशाची हाव सुटलेला आणि बायकोला वैतागलेला अमित ऑफर स्वीकारतो आणि सुरु होतो नातेसंबंध उद्ध्वस्त करणारा reality show !!!  स्क्रिप्टेड भांडण करण्यासाठी / गैरसमज पसरवण्यासाठी बऱ्याच गोष्टी plant करूनसुद्धा बायकोच्या त्याच्यावर असणाऱ्या विश्वासामुळे ते प्रयत्न फोल ठरतात. आपण काय करून बसलो आहोत हे त्याला कारण तोपर्यंत तो निर्माता आणि channel चे फक्त माकड बनून गेलेला असतो. << ज्यांना नाटक पहायचे आहे त्यांच्यासाठी यापुढचा मजकूर Spoiler असू शकतो --->  अमित नकाराचा प्रयत्न करू पाहतो तेव्हा त्याच्या बायकोच्या मित्राला गळाला लावून अश्विन अजून मोठा गेम खेळतो. reality शो अजून चमचमीत व्हावा म्हणून बायकोच्या पर्स मध्ये condom plant करून अमितला तिच्या चारित्र्याचे वाभाडे काढायला भाग पाडतो. या सगळ्याने मोडून पडलेली बायको, या सर्व गोष्टी पूर्वनियोजित आहेत हे माहित असूनही अश्विनच्या हातातले खेळणे बनून सगळे काही निमूटपणे बघणाऱ्या अमितला सोडून घराबाहेर पडते. ती बाहेर पडत असताना कानातल्या इयरपीस मधून “घटस्फोटाच्या कागदावर सही घे ... तरच हा शो पूर्ण होईल” असे बोम्बल्णाऱ्या अश्विनकडे दुर्लक्ष करत हताश झालेला अमित इयरपीस काढून ठेवतो.... आणि नाटक संपते .... <--- Spoiler संपला >

निलेश-असलम या जोडगोळीने लिहिलेल्या नाटकाची कल्पना अभिनव आहे. घटस्फोटाचा reality शो ही कल्पना तर मला अजिबात अतिरंजित वाटली नाही. सध्या emotional अत्याचार किंवा बिग बॉस वगैरे (scripted असूनही वास्तवाचा आभास निर्माण करणाऱ्या) शोज मधून इतरांच्या आयुष्यातली लफडी जिभल्या चाटत बघणारे प्रेक्षक आपणच असतो. नाटकात जोडप्याच्या घरात लावलेले छुपे कॅमेरे जे दृश्य टिपत आहेत ते आपल्याला प्रेक्षागृहात लावलेल्या LCD स्क्रीन वर देखील दिसत असते त्यामुळे प्रयोगाला वेगळाच उठाव येतो आणि आपण त्या reality शो चा भाग झाल्यासारखे वाटते.  नाटकाचा शेवट हा सुखांत न केल्याबद्दल लेखक दिग्दर्शकाचे विशेष कौतुक. reality शो मध्ये अनेक प्रायोजकांची नावे / लोगो दिसत राहावेत यासाठी अमितला कराव्या लागणाऱ्या कसरती आपली करमणूक करतात खरी पण त्याला असणारी प्रत्येक गोष्टीच्या विकाऊपणाची किनार अस्वस्थ देखील करते. सगळ्यात कहर होतो तो अमित बायकोची पर्स उघडतो तेव्हा. “तुझ्या पर्स मध्ये condom ?” असे तो उद्विग्न होऊन विचारतो तेव्हा कानातल्या ईयपीस मध्ये अश्विन ओरडतो “brandचे नाव घे...” काहीही विरोध करण्याच्या अवस्थेत नसलेल्या अमितच्या तोंडातून पुन्हा सुधारित वाक्य उमटते – “तुझ्या पर्समध्ये कोहिनूर condom ?” एरवी अत्यंत हास्यस्फोटक होईल असा हा प्रसंग या ठिकाणी पाह्त्ना मात्र अख्खे आयुष्य बाजारू करायला निघालेल्या वृत्तीची आणि त्याला कारणीभूत ठरणाऱ्या ‘गिऱ्हाईका’ची अक्षरशः घृणा येते !

नाटकाला दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवने दिलेली treatment मुद्दामुनच reality show सारखी भडक आणि लाऊड आहे. नाटक गंभीर विषयावरचे असले तरीही नाटकात हशे मिळवणाऱ्या जागा भरपूर आहेत त्यामुळे पूर्वार्ध बर्यापैकी हलकाफुलका आहे.  मधुरा वेलणकरने समरसून केलेली भूमिका अभिनयाच्या आघाडीवरची सगळ्यात जमेची बाजू. विवेक गोरेने उभा केलेला अश्विन देखील चोख. मधुराच्या मित्राच्या छोट्या पण महत्वाच्या भूमिकेत माझा मित्र अक्षय शिंपीने केलेले काम सुद्धा मस्त ! त्याला अजून मोठ्या लांबीच्या भूमिका मिळाल्या तर मजा येईल. राहता राहिला अमित जयंत अर्थात चिन्मय मांडलेकर. सदैव कपाळावर आठ्या पाडून अभिनय करणारा तिरसट तारू चिन्मय आपण बराच काळ बघत आलोय. "त्याला भूमिका तशाच मिळाल्या आहेत" असे असे वाटून वेगवेगळ्या छटा असणारा रोल एखादा तरी त्याला मिळण्याची मी वाट बघत होतो. अखेर तो इथे मिळालाय आणि त्याने सिद्ध केलंय की  …… तो किती अपूर्ण अभिनेता आहे. Slapstick कॉमेडी पासून ते भावनांच्या उद्रेक पर्यंत सगळया छटा असणाऱ्या भूमिकेची अतिशय कृत्रिम अभिनयाने त्याने पार वाट लावली आहे. अश्विनला नकार देण्याच्या प्रसंगातले त्याचे भावपूर्ण स्वगत त्याने इतक्या अतिरिक्त वाकड्या तिकड्या चेहऱ्याने म्हटले आहे की बघवत नाही. म्हणजे marcel marceau ने ते बघितले असते तर स्वतःचे mimes बंद करून याचे शिष्यत्व पत्करले असते. विलक्षण बोलका चेहरा, विनोदाची उत्तम जाण पण तरीही संयत अभिनय करण्याची क्षमता असणारा सुमित राघवन या नाटकात असता तर काय बहार आली असती. (दुसरे एक नाव आठवते ते म्हणजे जितेंद्र जोशीचे – मला तर अनेक छटा असणारी कुठलीही भूमिका दिसली की तिथे जितेंद्र जोशीच फिट्ट बसेल असेच वाटते).

नाटकात आणखी एक खटकलेली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा ठेहराव नाही. अनेक वेळेस यातली पात्रे इतकी चटकन - आधीच programmed असल्यासारखी – react होतात की त्यामागे काही विचार आहेत का नाही असाच प्रश्न पडतो. मोठ्ठ्या pauses बद्दल विक्रम गोखलेंची बऱ्याचदा चेष्टा होते पण या नाटकाचा प्रयोग पाहताना pauses महत्वाचे आणि प्रभावी अंग असते हे फार जाणवते !
असो. एकुणात नाटक अगदी आजच्या काळाचे आहे. आता याचे शेवटचे काही प्रयोग होणारा आहेत. संधी मिळाली तर नक्की बघा !!

(८ ऑगस्ट २०१६) 

टांग टिंग पिंगा



 ************||  श्री सं.ली.भं प्रसन्न ||********
(मोरुच्या मावशीशी सम्बंधित सर्वांची क्षमा मागून ...)

टांग टिंग पिंगा गं, टांग टिंग पिंगा
टांग टिंग पिंगा गं, टुम्…

सवती मत्सर सोडून करती, धम्माsssल दंगा
टांग टिंग पिंगा गं, टांग टिंग पिंगा
टांग टिंग पिंगा गं, टुम्
तथ्याच्या नाडीवाचून, भपक्याsssचा लेंगा
टांग टिंग पिंगा गं, टांग टिंग पिंगा
टांग टिंग पिंगा गं, टुम्
काशीबाईच्या भावनांशी, भन्साळीचा पंगा
टांग टिंग पिंगा गं, टांग टिंग पिंगा
टांग टिंग पिंगा गं, टुम् …
धंद्याच्या झाडाला, कलेsssच्या शेंगा
टांग टिंग पिंगा गं, टांग टिंग पिंगा
टांग टिंग पिंगा गं, टुम् …
'लिबर्टी'ची 'नाईन्टी' झोकून, कसेsssही झिंगा
टांग टिंग पिंगा गं, टांग टिंग पिंगा
टांग टिंग पिंगा गं, टुम्…


(१९ नोव्हेंबर २०१६ची पोस्ट)

मुंबई-पुणे-मुंबई २ : अपेक्षित अपेक्षाभंग !

पहिल्या भागापेक्षा वरची पातळी गाठणे दुसऱ्या भागाला बहुतांश वेळेस जमतच नाही. त्यामुळे sequel बघताना मी अत्यंत माफक लेव्हलच्या अपेक्षा ठेवतो. त्यामुळे या भागाबद्दलचा माझा अंदाज बरोबरच ठरला.
पहिल्या भागाचे वेगळेपण होते ते त्याच्या संकल्पनेत. कथा जवळपास शून्य असताना फक्त संवाद, अभिनय (आणि लोकेशन्सचा अतिशय खुबीने वापर) यांच्या बळावर चित्रपट मस्त जमला होता. दुसऱ्या भागात एखादी नवी चमकदार कल्पना असणार नाही हे प्रोमोवरून लक्षात आले होतेच. हा मराठी ' हम आपके है कौन आहे' कि काय अशी भीती वाटत होती. सुदैवाने तसे काही इथे नाही. पहिल्या भागाशी धागे जोडणारे भरपूर संदर्भ देत दुसरा भाग पहिल्याशी संवादातून छान जोडून घेतला आहे. (हे कथानक पहिल्या भागानंतरच्या लगेचच्याच काळात घडत असूनही मुक्ताचे केस तेवढ्यात दुप्पट वगैरे वाढलेले दिसतात ते कसे ते मात्र विचारायचे नाही). प्रोमोमध्ये लग्न पुण्यात की मुंबईत यावरच्या नातेवाईकांच्या चर्चा दाखवून एखाद्या कदाचित येऊ शकणाऱ्या conflict बद्दल थोडीशी उत्सुकता वाढवली होती ते सगळे संवाद इथेही आहेत पण प्रत्यक्षात त्याचे पुढे काहीच होत नाही. साखरपुडा बहुतेक चंद्रावर पार पडतो आणि लग्न सुद्धा (एकदाचे !) पुण्यात होणार आहे हे शेवटी काही नातेवाईकांनी प्रेक्षकांना लग्न पुण्यात आहे हे कळावे म्हणून मारलेल्या dialog मधून ("तुमच्या पुण्यातले वाडे म्हणजे अगदी ....!!" वगैरे) कळते. असे असताना प्रोमोमध्ये यावर एवढा जोर का दिला होता कळले नाही. असो.
पहिल्या भागात उल्लेखलेला अर्णव इथे गौरी समोर दत्त म्हणून पुन्हा उभा राहिल्यामुळे गौतम-गौरीच्या प्रेमकथेला 'ट्वीस्ट' आला आहे. अर्णवचे चुका माफ करून पुन्हा गौरीच्या आयुष्यात येणे (आणि पुन्हा गळ टाकून बसणे !) आणि त्याच वेळेस तिला गौतम मधल्या खटकू लागलेल्या गोष्टी यामुळे झालेली तिची द्विधा मनस्थितीच मग चित्रपटाला पुढे घेऊन जाते. कुठल्याही मुलीच्या/मुलाच्या आयुष्यात येऊ शकणारा हा संभ्रम मला त्याहून निर्माण होणाऱ्या शक्यतांमुळे इंटरेस्टिंग वाटला. पण दुर्दैवाने पुढे तो जास्त फुलवला गेलेला नाही. लग्नाला पक्के होऊन काही काळ बाकी असताना "मला आपल्या लग्नाबाबत अजून विचार करायला हवा. माझे नक्की होत नाहीये" असे सांगणारी गौरी एकटी बसून शांतपणे विचार न करताना दिसतच नाही. तिला जर तिचे विचार त्याच्या सतत आजूबाजूला असण्यामुळे इन्फ़्लुएन्स होऊ द्यायचे नसतील ती त्याच्यासोबत फिराबिरायला का जाते हेच कळत नाही. बरं, याचे इतके प्रयत्न चालू असताना त्याचा (आणि त्याच्या घरच्यांचा) चांगुलपणा इतका बदाबदा वाहत असतो तरी तिचे मत त्याच्याविषयी अनुकूलसुद्धा होत नाही. विचार तर काडीचा करत नाही आणि सारखे आपले एकच पालुपद "माझे नक्की होत नाहीये".
एवढेच असते.
चित्रपटाची लांबी १५ मिनिटांनी कमी असती तरीही मी या सिनेमाला above average म्हटले असते. (मध्यंतरानंतरच्या प्रशांत दामले आणि स्वप्नील जोशीच्या प्रसंगामुळे तर माझ्या आशा चांगल्याच पल्लवित झाल्या होत्या) पण पुढे पुढे सिनेमा इतका ओढत नेलाय (त्यात एक राजश्री किंवा K Jo टाईप "band बाजा वरात घोडी" असले काहीतरी शब्द असलेले गाणे घुसवले आहे ते तर इतके पकाऊ आहे की शेवटाकडे डोळे लावून बसलेल्या म्हाताऱ्याला यमराजाने "थांब हां, एवढी कापूसकोंड्याची गोष्ट संपू दे मग जाऊ" असे म्हटल्यावर म्हाताऱ्याची जी अवस्था होईल तसे माझे झाले होते. अविनाश-विश्वजीतच्या कारकीर्दीतले सर्वात भंगार गाणे असेल हे). शेवटी बरीच भवती न भवती होऊन, गौतमच्या चांगुलपणाचे पाट वाहून त्यात चिंब झालेली गौरी एकदाची बोहल्यावर चढते तेव्हा मी निश्वास टाकला आणि थेटरबाहेर धावलो (मी आयुष्यात पहिल्यांदाच शेवटची श्रेयनामावली न पाहता बाहेर पडलो असेन).
चित्रपट वाईट आहे असे मी म्हणणार नाही. अधेमध्ये काही खरच चमकदार प्रसंग / संवाद आहेत (स्व.जो. मुक्ताला हॉटेलमध्ये 'अर्णवचा फोन होता का?" विचारतो तो प्रसंग), प्रशांत दामलेचा धांसू अभिनय आहे (इतका की हाच सगळा पिक्चर खाणार असेच मला वाटायला लागले). मुक्ताचा चांगला आणि स्व.जो.चा सुसह्य अभिनयसुद्धा plus point. पण तेवढे पुरेसे नाही. एका सुरात बोलणारी आजी (सुहास जोशी), शेवटी अचानक उपटलेला गौरीच्या की गौतमच्या वडिलांचा मोठा भाऊ आणि अश्या बराचश्या गण्या-गम्प्यांचा चित्रपट पुढे/मागे/वर/गर्तेत नेण्याच्या दृष्टीने काडीचाही उपयोग नाहीये. (तो मोठा काका तर निर्माते मंडळींपैकी कोणीतरी असावा आणि त्याने कॅमेऱ्यासमोर येण्याचा कंडू शमवून घेतला असावा असा मला संशय आहे.) संवादाच्या दर्जात अजिबात सातत्य नाही. काही अगदी झकास आणि काही अगदी गटणेसारखे बेगडी. (मुळात पहिल्या भागात इतकी झकास कामगिरी केलेल्या पराग कुलकर्णीलाच दुसऱ्या भागातही पटकथा-संवाद लिहायला संधी न देता अश्विनी शेंडेला का दिली हे राजवाडेच जाणे). मुक्ताच्या घरी अगदी मुक्त वातावरण आहे म्हणून तिला शोभत नसतानाही बळंच short कपडे घालायला लावण्यामागे (आणि ती केवळ ती fashion designer असल्यामुळे ऑफिसमध्ये तिला तिच्या लहान बहिणीपेक्षाही छोटा ड्रेस घालायला देण्यामागे) पिक्चरच्या costume designer आणि दिग्दर्शकाचा विचार काय होता हेही समजू शकले नाही.
चित्रपटात केलेल्या branding / जाहिरातींबद्दल लिहायचे तर मला इथे आणखी एक पुरवणी जोडावी लागेल. त्यातल्या त्यात रेड लेबलची जाहिरात कथेच्या ओघात खपूनही जाते पण प्रभात तूप वगैरेची घुसखोरी मात्र असह्य होते.
असो. एक चांगला होऊ शकणारा चित्रपट मध्यम दर्जापर्यंतच पोचायला नको होता असे वाटते. तरीही तो थेटरवर चांगला चालतोय यात आनंद आहेच. 'प्रेम रतन धन पायो' सारखा तुपकट सिनेमा (प्रभात तूप घातलेला !!) हिट होण्यापेक्षा मुंपुमु २ हिट होणे कधीही चांगले !!

'बेहद्द नाममात्र घोडा' अर्थात 'कुबेरा ss स्पीकिंग ss !!



'बेहद्द नाममात्र घोडा' अश्या भीषण नावाची अरुण कोलटकरांची एक कविता आहे. शीर्षकाचा अर्थ समजणे दूरची गोष्ट पण हे तीन शब्द कधी एकत्र येऊ शकतात अशी कल्पनाही मी पामर करू शकत नाही. त्यामुळे हा शब्दसमुच्चय पुन्हा कधी आयुष्यात येईल असे खरच वाटले नव्हते ... पण आज लोकसत्ता मध्ये कुबेरांचा माफी अल्पाक्षरी माफीनामा वाचला आणि याला काय म्हणावे याचा विचार करत असताना अचानक हा 'बेहद्द'च अचानक डोळ्यासमोर आला...
खरेतर माफीनामा वाचून डोक्यात बराच कल्लोळ चालू आहे. उण्यापुऱ्या २५ शब्दांच्या मागे अनेक ठळक घडामोडी आणि सूक्ष्म अर्थच्छटा आहेत. आणि ते सगळे एकत्र डोक्यात पिंगा घालत असल्यामुळे सारे काही योग्य त्या क्रमाने शांतपणे इ-कागदावर उतरवणे थोडे आव्हानात्मक वाटते आहे.... प्रयत्न करतो.
राजू परुळेकरला अनेक वर्षे माझ्या ध्यानात येणारही नाही एवढ्या बारकाईने टिपत गेलो आणि शेवटी त्याचा (दुरून दिसणारा का होईना) आलेख मी लेखातून मांडला. गिरीश कुबेरांना मी राजू इतके दीर्घकाळ आणि तपशीलवार टिपले नसले तरी या माफीच्या निमित्ताने विचार करता त्यांच्या लोकसत्ताचे संपादक झाल्यापासून इतक्या गोष्टी आठवत आहेत की माझे मलाच आश्चर्य वाटते आहे.
जशी देशाला गांधी परिवारमुक्त कॉंग्रेसची देशाला गरज आहे तशी लोकसत्ताला गांधीभक्तीमुक्त संपादकाची 'लोकसत्ता'ला गरज होती, कुमार केतकरच्या तावडीतून सुटका होऊन लोकसत्ता कुबेरांच्या हाती पडला तो एक सुदिनच होता. कुबेरांबद्द्ल पत्रकार म्हणून फारशी माहिती नव्हती. पण अर्थकारण कळणारा आणि आखाती देशातले तेलकारण उमजून असणारा लेखक म्हणून त्यांची 'एका तेलियाने' वगैरे पुस्तकामुळे ओळख झाली होती. समाजाला डोस देणाऱ्या आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा व्यासंग असल्याचा समज असणाऱ्या अनेक संपादकांची अर्थसाक्षरता ही तोळामासाच असते. त्या तुलनेत अर्थज्ञानी संपादक म्हणून कुबेर वाचायला मिळणे ही एक चांगली गोष्ट होती.
सुरुवातीच्या काळातच (२०११च्या सुमारास) बंगाल निवडणुकीत कम्युनिस्टांवरच्या ममता बानर्जीच्या ऐतिहासिक विजयानंतरच्या 'दांभिक गेले, कर्कश आले' सारख्या अग्रलेखातून केलेले अचूक विश्लेषण फारच प्रभावी वाटले होते. डाव्यांच्या ढोंगीपणावर बोट ठेवताना ममताच्या आक्रस्ताळ्या नेतृत्वशैलीतल्या उणीवासुद्धा बरोबर दाखवून दिल्या होत्या. अर्थकारणातल्या खाचाखोचांचे सखोल ज्ञान असल्यामुळे भावनिक/धार्मिक मुद्द्याला अर्थशास्त्रीय आणि भू-राजकीय angle कसा असतो याचा परिपाठच त्यांचे काही अग्रलेख देतात. त्यांच्यातली मुख्य आवडणारी गोष्ट म्हणजे सगळ्यांना सारखेच ठोकणे. डावे, उजवे, अधले-मधले यांच्यावर यांच्यावर ते सारखेच तुटून पडतात. कॉग्रेस, नेहरू-गांधी यांच्या प्रेमात शिगोशिग बुडालेल्या कुमार केतकरच्या अग्रलेखामुळे पिवळ्या पडलेल्या लोकसत्तेच्या संपादकीयांना तुकतुकी आल्यासारखी वाटली. मुख्य म्हणजे मला भावनिकदृष्ट्या न पटणाऱ्या त्यांच्या मुद्द्यांनादेखील व्यावहारिकतेची किनार जाणवायची/जाणवते. त्यामुळेच त्यांचे काही अग्रलेख पटले नाहीत तरी अग्रलेख वाचणे मी थांबवले नाही.
त्यांचे धाडसी लिखाण अनेक ठिकाणी कौतुक करावे असे असते. पंडित नेहरू यांच्या काळापासून काहीशा डाव्या असणाऱ्या अर्थनीती ऐवजी उजवी अर्थनीती असणे यात गैर काहीच नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भांडवलशाहीचे न लाजता त्यांनी समर्थन केलेच शिवाय पूर्वापार असणाऱ्या 'गरिबी म्हणजे सज्जनता आणि श्रीमंती म्हणजे पाप' अशा भाबड्या समजुतीने नुकसानच कसे केले आणि पैसे कमावण्यात गैर काहीच नाही हा त्यांचा अनेकदा सूर असतो. उगीच ढोंगीपणाने समाजवादी, पुरोगामी वगैरे विचार अग्रलेखातून बिम्बवणाऱ्या आणि प्रत्यक्षात वृत्तपत्राच्या मालकशेठच्या ताटाखालचे मांजर असणाऱ्या इतर काही संपादकांपेक्षा अशी वेगळी भूमिका ही नजरेत भरण्याजोगी होती. त्यांच्या लिखाणाचे समर्थन करत मी फेसबुकवरच्या दोस्त लोकांशी वादसुद्धा घातले आहेत ...
पण अनेकदा अशा संपादकांना कुठे थांबावे हे कळत नाही. संपादकाचा 'संपादकराव' होतो जनमताच्या विरुद्ध विचार व्यक्त करण्याची झिंग, स्वतःच्या लेखणीच्या प्रेमात बुडून जाणे आणि तथाकथित निर्भिडतेची पट्टी सतत कपाळावर बांधून फिरायचा सोस यामुळे अनेकांचे होते तेच यांचे व्हायला लागले. परखडतेत तुसडेपणा येऊ लागला. एखाद्याला शेलक्या शब्दात किरकोळीत काढणे किंवा उठसूट सगळ्यांना फाट्यावर मारणे असला वास त्या अग्रलेखांना येऊ लागला. एकंदरीत सगळा समाज कायम उत्सवी मानसिकतेत किंवा उन्मादात असताना अनेकदा त्याला त्यामागचे संभाव्य धोके सांगून वेळीच कान टोचणे आणि जमिनीवर आणणे हे जबाबदार संपादकाचे कर्तव्य नक्कीच असते. पण कुबेरांच्या लिखाणाचे कान टोचण्यापेक्षा टोचून टोचून लिहिणे हेच व्यवच्छेदक लक्षण बनत चालले आहे. त्यांच्या लिखाणात दोन कौतुकाचे शब्दही दिसेनासे झालेत. छिद्रान्वेषी वृत्ती वाढली आहे. काहीतरी निमित्त काढून सतत राजकारणी, समाजकारणी, साहित्यिक यांना हिणवत राहायचे, कसलीही तर्कटे लढवून आपल्या मुद्द्यांना समर्थन देत राहायचे. अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून हा तुच्छतापूर्ण स्वर प्रकर्षाने जाणवायला लागला. आंदोलन घडत असताना एक भारावलेपण होते. तो एक बुडबुडा होता आणि तो यथावकाश फुटलाही. त्या दृष्टीने त्यांचे त्यावेळचे लेख पुढच्या धोक्याचा इशारा देणारे होतेही पण त्याचवेळी अग्रलेखात कधीही एवढे लोक आंदोलनाला पाठिंबा का देत आहेत, त्यामागची मानसिकता काय असेल याचे विश्लेषण दिसले नाही. ते दोन चार महिने फक्त आणि फक्त नेत्यांपासून, आंदोलकापर्यंत आणि VIP पासून ते सामान्य माणसाला हिणवण्यात गेले.
पुढेपुढेही यातल्या बऱ्याच गोष्टी लिखाणात डोकावत राहिल्या. वारू चौखूर उधळले. अश्वमेधाचा बेहद्द अश्वच जणू.... याकुब मेमनच्या फाशीच्या अग्रलेखाने लोकसत्तेच्या नाही तर बहुतेक पत्रकारीतेच्याच इतिहासातली सर्वात खालची पातळी गाठली असावी. जी न्यायव्यवस्था न्यायाधीशाच्या समोर पलायन करून पुन्हा पकडल्या गेलेल्या गुन्हेगारालासुद्धा सुनावणीत 'तो आपल्या डाव्या हाताच्या बेडीत होता की उजव्या हाताच्या हे पोलीस नक्की सिद्ध करू न शकल्या'ने 'बेनिफिट ऑफ डाउट'वर सोडून देण्याइतकी दयाळू आहे, त्या न्यायववस्थेने (दहा-दहा वेळा अपिलाची संधी मिळाल्यानंतर) सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला किरकोळीत काढण्यापर्यंत कुबेरांची मजल गेली. याकुबच्या शिक्षेने झालेल्या जी एक समाधानाची लाट दिसली तीत कुबेरांना 'एक शोकांत उन्माद' दिसला... तो माफीचा साक्षीदार होता अशा आशयाची धादांत खोटी माहिती द्यायचीही लाज वाटली नाही. याकुबच्या बापाने व्यथित होऊन पाकिस्तानात सर्वांदेखत याकुबला कानाखाली मारल्याचे तपशीलवार माहित असणाऱ्या कुबेरांना वीस वर्षे खटला चालू असताना त्याच्या मदतीला जायची बुद्धी का झाली नाही ? त्या क्षणी कुबेर मला देशद्रोही वगैरे वाटले नाहीत पण 'जनभावनेच्या आहारी जाणे धोक्याचे असून त्यामुळे बुद्धीवरतीची काजळी धरते' या लाडक्या सिद्धांताच्या पूर्णपणे आहारी जाऊन, मुद्दामुनच जनभावानेच्या विरुद्ध लिहिण्याची कंड शमवू पाहणारा cynic माणूस वाटला...
तेव्हापासून हा माणूस मनातून प्रचंड उतरला. पुढे पुढे लिखाणात काही संतापजनक विधाने आढळली की आधीचे काही प्रमाद आठवू लागले. 'बळीराजाची बोगस बोंब' हा जवळपास सर्व शेतकऱ्यांनी धिक्कारलेला आणि कित्येक ठिकाणी जाहीरपणे जाळला गेलेला अग्रलेख. 'हस्तिदंती मनोऱ्यातली पत्रकारिता' म्हणून त्यावर जळजळीत टीका झाली होती. (दुर्दैवाने तो वाचायचा राहून गेला, त्यामुळे भाष्य करू शकत नाही पण या ठिकाणी त्या अग्रलेखाची आठवण येतेच). मग अचानक आठवला एक अगदी वेगळा संदर्भ. तीनचार वर्षापूर्वी ब्लॉगविश्वावर नजर टाकणारे एक सदर लोकसत्तातून यायचे. ते कोणीतरी लेखक 'अभिनवगुप्त' या टोपणनावाने लिहायचा. त्यातही बऱ्याचदा वेगवेगळ्या ब्लॉगवर टीका असायची. हेरंब ओक नावाच्या ब्लॉगरच्या ब्लॉगचे ('काय वाटेल ते' या नावाचा तो ब्लॉग होता बहुधा) अभिनवगुप्तने वाभाडे काढले होते... त्यातही हेरंब ओकचा ब्लॉग अतिशय लोकप्रिय का आहे याचे कुठलेही विश्लेषण करण्याची इच्छा नव्हती - जणूकाही खूपजण वाचतात म्हणजे मग ती लोकभावना तुसडेपणाने झटकून टाकण्यातच आपली 'निर्भीडता' सिद्ध होते अशी अभिनवगुप्ताला खात्री असावी. लोक जर त्यावरून हेरंब आणि अभिनवगुप्त यांच्यात बरेच इमेल युद्ध रंगले होते. हेरंब हे छातीठोकपणे म्हणत होता की अभिनवगुप्त म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून गिरीश कुबेरच होते. पण हेरंबच्या इ-पत्रांना कधीही समाधानकारक उत्तर दिले नव्हते/देता आले नव्हते (ही माहिती मला हेरंबचा ब्लॉग चाळतानाच मिळाली...मी इथे फक्त मधले काही बिंदू जोडायचा प्रयत्न केलाय). (पुढेे कळलं की अभिनवगुप्त वेगळी व्यक्ती होती, पण कुबेरांना या प्रकाराची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी कुठेही उत्तर द्यायची जबाबदारी घेतली नाही..) 
माझा मित्र अमेय म्हणतो त्याप्रमाणे २ + २ चे उत्तर हे 'पाच ' असे देणार... का ? कारण 'लोक' त्याचे उत्तर 'चार' असे देतात !!
एवढे असूनही त्यांचे अग्रलेख मी अजूनही का वाचतो वाचतो याचे निश्चित उत्तर मलाच देता येणार नाही. कदाचित त्यातल्या cynicism मधून अधून मधून डोकावणारे जागलेपण मला महत्वाचे वाटत असावे. अशातच मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात मराठी भाषा दिन आणि एकूणच दिनाच्या निमित्ताने एक अग्रलेख आला आणि माझे डोकेच गेले. 'कुणीतरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल विक्री कौशल्याची खटपट करत अभिमान गीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो ...' असे निर्भिडतेचे खजिनदार असलेल्या कुबेराने कौशल इनामदारचे नाव न घेता लिहिले...!!! त्यांना ते गीत आवडले नाही असे म्हणायचा पूर्ण अधिकार आहे पण त्यांनी कौशलच्या मेहनतीला असे किरकोळीत काढणे हा घृणास्पद प्रकार आहे. इतका तुसडेपणा येतो कुठून ? आपण स्वयंभू असल्याची भावना पत्रकारात/संपादकात घटत रुजणे अटळ असते का ? याच्या प्रकाशित साहित्याला रिकामटेकड्या तेलवाल्याची पुस्तक विकायची खटपट म्हणायचे का ? घोडा बेलगाम उधळल्याचेच लक्षण हे !! या प्रकाराने पुन्हा माझ्या दुष्टबुद्धीला विस्मृतीत गेलेला संदर्भ आठवला : एका अग्रलेखात महोदयांनी कुठल्याश्या संदर्भात लिहिताना काहीही कारण नसताना प्रवीण दवणेंच्या काव्यप्रतिभेविषयी अतिशय हिणकस भाष्य केले होते (आणि स्वतः मात्र वर लिहिल्याप्रमाणे खटपट-झटपट असली यमके किंवा 'सडक्यातले किडके', 'हटाववादी हुच्चपणा', 'हकनाक हनमंताप्पा' असले पोरकट अनुप्रास वापरून अग्रेलखांची शीर्षके आणि मजकूर चटपटीत करणार !!!)...
अशात १७ मार्च आला... 'असंतांचे संत' हा प्रामुख्याने मदर तेरेसावर आणि सोबतच इतरही धार्मिक गुरूंवर घणाघात करणारा अग्रलेख ! वास्तविक मदर तेरेसाच्या ढोंगी समाजसेवेमागच्या धर्मांतराच्या प्रेरणा नि:संदिग्धपणे मांडणारा अग्रलेख... ज्या धाडसीपणा बद्दल कौतुक वाटायचे ती हिम्मत या लिखाणामागे नक्कीच आहे.... पण अरेच्या !!! काल १८ मार्चला मी हे काय बघितले !! महाराष्ट्राने काय बघितले ! जगाने काय बघितले !!! वाघाने 'म्याव' केले ? हिमालय मेवाड्मिक्स आईसक्रीम बनला ? वडवानल विडी पेटवायला वापरला ?? निडरतेचे दुसरे नाव असणारा संपादक आज दुसऱ्याला नावे ठेवण्याऐवजी 'लोकभावने'ने हळहळला ?
लक्षात घ्या, एरवी कोणताही पुचाटपंपू संपादक अग्रलेखात 'आम्ही सरकारचा निषेध करतो'वगैरे भाषा वापरतो आणि कधीतरी बातमीत नावे व फोटो छापण्यात चुका झाल्या तर संपादक 'आम्ही दिलगीर आहोत -संपादक' असे संपूर्ण वृत्तपत्राच्या वतीने माफीपत्र छापतो. पण कुबेरांच्या माफीनाम्याततला मजकूर ''मी' दिलगीर आहे' असा आहे. आवेशाच्या शिडाला भगदाड पडले आहे. हा 'बेहद्द घोडा' आज मालकानेच घोडा लावल्यामुळे 'नाममात्र' ठरला आहे आता यावर 'निर्भीडतेची नाहीशी नांगी' असा एक आवेशपूर्ण अग्रलेख लिहायला कुबेर आपले शब्दांचे धन वापरतील का ?
आता कुबेरांचा धगधगत्या अंगाराचे कासवछाप अगरबत्तीत रुपांतर झाल्याची हळहळ-कम-आनंद बाजूला ठेवायचा तर जास्त गंभीर चित्र दिसते. इतके दिवस त्यांनी बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानांच्या कासोट्याला यथेच्छ - काहीवेळा तो गरजेचाही होता - हात घातला. न्यायव्यवस्थेपासून ते संगीतकारांपर्यंत सगळ्यांची वस्त्रे फेडली, त्याबद्दल अर्थातच त्यांना निषेधाचे खलिते, शिव्याशाप वगैरे पोचले असणार .... पण ती 'जनभावना' असल्याने त्यांची कदर करायची महाशयांना गरज वाटली नसणार... असे असताना, जगद्वंद्य मदरच्या भक्तांच्या बापुड्या भावनांबद्दल अचानक एका दिवसात कुबेरांना गहिवर कसा आला ? त्या भक्तांची ताकद आणि ओळख कुठपर्यंत जात असेल ? पाश्चात्य चर्चेस आपल्या इथल्या अनेक मिडिया houses ना भरपूर फंडिंग करतात असे ऐकले होते, तीच का ही 'प्रभू'भक्तीची ताकद ? गेल्या काही काळात इंडिअन एक्स्प्रेसची भूमिका अतिशय उद्विग्न करणारी झाली आहे (याकुबच्या फाशीच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यात मोठ्या font मध्ये 'And they hanged Yakub' अशी संतापाचा स्फोट करवणारी हेडलाईन होती - जणूकाही जंगलराज असणाऱ्या रानटी व्यवस्थेने कट करून त्याला भर चौकात टांगले असा आभास निर्माण करणारी ...) 'लोकसत्ता' हे जवळपास स्वायत्त म्हणावे असे प्रकाशन वाटत असले तरी ते एक्स्प्रेस ग्रुपचाच भाग आहे. त्यामुळे कशावरून कुबेरांवर आलेला दबाव या एक्स्प्रेसच्या सगळ्या पार्श्वभूमीतून आलेला नसेल ? त्याहून वाईट म्हणजे हा अग्रलेखच मागे घेतला आहे (वेबसाईटवरून हटवण्यात आला आहे). आता यापुढे त्यांची credibility काय राहील ? कुबेर कोणाचीही अक्कल काढायला गेले किंवा कुणालाही अग्रलेखातून धारधारपणे सुनावले तरी ते किती फुसके असेल ! "ओ पावर नाही पंचनामा करायची तर फालतू चौकशा कशाला करता" असे कोणीही मलुष्टे त्यांना जाता येता सुनावू शकतो ..
या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होतीये ती पुलंच्या 'अघळपघळ' या पुस्तकातल्या 'प्रा. विश्व. अश्व. शब्दे' या अतीव धमाल लेखाची. दुर्बोध पांडित्य आणि पोकळ विद्वत्तेला अफलातून टपल्या मारणारा हा लेख. गाढ व्यासंगाचा आव आणणारे समीक्षक-कम-प्राध्यापक शब्दे या स्युडो-सूर्याची आणि त्यांच्या आजूबाजूला लाळ घोटणाऱ्या विद्वानांची अर्थात स्युडो-ग्रहमंडळाची ही गोष्ट. सार्त्र, काफ्का, कामू वगैरे नावे तोंडी लावत
जडजंबाल चर्चा करणारे आणि या अभिजनांसमोर पांडित्य ताणणारे प्रा. शब्दे सर्वात शेवटी लीन दीन याचक होऊन टेबलावर तंगड्या ठेवून बसलेल्या प्रकाशक उर्फ वायुमंडलापुढे जाऊन त्याच्या तळपायावरची कुरुपे निरखत उभे राहतात !!!! शेवटी माणूस गुलाम पैशाचा .......
जाऊ दे... माझ्या मना बन दगड ! ज्यांच्या ज्यांच्या पायाची धूळ मस्तकाला लावायची आस होती त्यांचे त्यांचे मातीचे पाय दिसून यायचा काळ आलाय.... कुबेरांसारख्या अर्ध्यामुर्ध्याच्या नि:स्पृह्तेची काय कथा !
(१९ मार्च २०१६ची पोस्ट)

एकला बको रे !

आयबीएन लोकमतवर गब्बरसिंगच्या जागी एके हंगल आले आहेत, हे एव्हाना ते चॅनेल बघणे सोडलेल्या लोकांच्या लक्षात आलेच असेल.
तर या हंगलचाचांनी महाराष्ट्र दिनी मुलाखतीला (जिला बोलावणे तुम्ही कितीही कल्पनाविस्फोट केला तरी तुम्हाला सुचणार नाही अशा) एका पूर्वाश्रमीच्या मराठी असलेल्या आणि मावळते सावकार रघुरामशेठच्या 'सेक्स अपील' वर भाळलेल्या चकमक पुरंध्रीला बोलावले होते. (नुकतेच मराठी सिनेमाला prime time मिळण्यासाठी सरकारने केलेल्या निर्णयाला मावशींनी 'हुकूमशाही' म्हणून आपले मराठीप्रेम व्यक्त केले होते त्याबद्दलचे हे बक्षीस असावे).
आहाहा काय ते स्वच्छ सुबक मराठी !!
तब्बल पंधरा टक्के मराठी शब्द...
जणू पोह्यावर नायलॉनची सूक्ष्म शेव पखरावी तशी इंग्रजीवर मराठी भूर्भुरवलेली... (नमक स्वाद अनुसार !). ..
हंगलचाचा म्हैसुरपाकासारख्या तुपकट आणि उत्कट चेहऱ्याने (म्हणजे नेहमीसारखेच) ती मौक्तिके टिपत होते.
एकूणच
मराठी भाषा सुरक्षित हातात असल्याची खात्री त्या दिवशी पटली.

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आता परवाच ऑलिम्पिकसंदर्भात व्यक्त केलेल्या अतिशय उत्साहवर्धक मतांमुळे त्या तिलोत्तमेला चाचाजी पुन्हा चॅनेलवर मुलाखतीसाठी बोलावणार असून 'भारतीय क्रीडाक्षेत्राची झेप - सुपर मारिओ ते रिओ' ते या विषयावर ती आपली अभ्यासपूर्ण मते मांडणार असल्याचे कळते.
आपले क्रीडाक्षेत्रदेखील खंबीर हातात असल्याची खात्रीच होत आहे....
टीप :
हंगलचाचांचे नाव ओळ्खणाऱ्यांयापैकी भाग्यवान विजेत्यास साजूक तुपातला मुगाचा एक किलो हलवा
आणि
रंभेचे नाव ओळ्खणाऱ्यास तिने लिहिलेल्या 'वी आर गोईंग आउट बरं का रे मॅकमिलन' हे प्रवासवर्णन आणि 'लीव्ह माय पदर, लीव्ह माय पदर' हे बंडखोर आत्मचरित्र बक्षीस मिळेल

(१० ऑगस्ट २०१६ ची पोस्ट)

Raman Raghav 1.5

It was engaging enough to keep me interested till the end. It has given a certain sense and context to otherwise motiveless killings by original Raman Raghav. It asks a question - is the killing for personal interest by misusing the enormus power given by the uniform is any lesser a crime than mindess killing by a psychopath ? Aren't they complementing each other ?
Music is perfect, the locations are dark, unusual and haunting, Nawaz is too good as usual , Vicky Kushal not so (doesn't look cop from any angle - neither in body language nor in dialogue delivery)
In spite of all of the above it isn't exactly 2.0. It feels like something is less there.... don't exactly know what..... Actually it has all the usual Kashyap elements in place - Darkness, Violence, Lust, Gray areas, Unusual Humor, Creepiness, all the between the lines...but still ....May be because nothing is radically new here....Sense of Deja Vu right from the poster (Remeber Shaitan's poster ? A movie completely from Kashyap school of cinema). Is this style becoming too predictable ? (despite the predictability, Ramanna's scenes with his sister are chilling, i must confess).
Maybe i should wait for his next few movies to conclude anything.

शिल्लक Panther

मला आठवते आहे तेव्हापासून रामदास आठवले फक्त मंत्रीपद मागतानाच दिसत आलेले आहेत. पक्षाचा एकच खासदार (म्हणजे ते स्वतःच) असूनही थेट कॅबिनेट मंत्रीपद मागण्यात कुठलाही संकोच/लाज न वाटणारा माणूस... आणि ते मिळाले नाही व पुढच्या वेळीस निवडणुकीत पराभव घडवून आणला गेला म्हणून कॉन्र्ग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडली , एवढेच नव्हते तर भाजपची लाट असल्याने मंत्रीपदाची आशा होती म्हणून एकेकाळच्या हाडवैरी भाजप/शिवसेनेसोबत गेलो असे आडपडदा न ठेवता सरळसोटपणे सांगणारा हा माणूस. त्याच्या विचार/कृती/बोलणे यात काडीमात्रही खोली असेल शंकाही येऊ शकत नाही. मग हा माणूस अजूनही या जगड्व्याळ system मध्ये टिकून कसा असा एक चिरंतन प्रश्न....
नानू सरंजामेसारखे कपडे, थुकरट चारोळ्या, धृतराष्ट्रासारखी उर्ध्वदिशेला असणारी नजर, ढेकरेच्या आवाजातले बोलणे ही बहुतांश पांढरपेशांना असणारी रामदास आठवले यांची ओळख. त्यामुळे आठवले म्हटले की पहिला सूर लागतो तो चेष्टेचाच. शिवाय या अवताराला असणारी निळ्या झेंड्यांची प्रभावळ, उठता बसता कुठलीही गोष्ट बाबासाहेबंपार्यंत पोचवायची सवय वगैरे गोष्टीमुळे कुचेष्टेला एक श्रेष्ठ-कनिष्ठतेचेही अस्तर....
कालपरवापर्यंत रामदास आठवलेंकडे पाहण्यासाठी पाहण्याकडे माझ्याकडेही एकच चष्मा होता. नाणे जमिनीवर पडले असेल की त्यःची एकच बाजू दिसत असते. पण हवेत उसळलेल्या नाण्याकडे जरा नजर वर करून पहायची इच्छा दाखवली तर छाप्यापलीकडचा काटाही दिसून येतोच. आठवले या माणसाबद्दल अलीकडे फेसबुकच्या कृपेने काही गोष्ट वाचनात आल्या. ते वाचून असे वाटले की आपण आत्तापर्यंत किती मर्यादित नजरेतून बघत होतो. हेही लक्षात आले की कुणी कितीही चेष्टा केली तरी बाबासाहेबांच्या स्वप्नातल्या रिपब्लिकन पक्षाच्या ज्या शेकडो चिंध्या झाल्या आहेत त्यात किमान रुमालाच्या आकाराचा म्हणावा असा गट एकट्या रामदास आठवलेंचा रिपाई(आटवले गट) हा पक्ष आहे. सहा महिन्याच्या वयात वडील जग सोडून गेल्यावर प्रचंड खस्ता खाऊन वाढवलेला हा माणूस.. दलित panther या वादळी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अर्जुन डांगळे, नामदेव ढसाळ इ प्रभृतींसोब्त एकेकाळी आख्खा महाराष्ट्र हलवून सोडलेला आहे. अजूनही सतत कार्यकर्त्यांमध्ये असणारा हा माणूस आहे. प्रत्येक जिल्ह्यात याचा गेली तीसेक वर्षे सातत्याने संपर्क आहे. एकदा का होईना पण लोकांनी संसदेत निवडून दिले एवढी ताकद अजूनही त्यांच्यात आहे. माझ्या एका पत्रकार मित्राचे निरीक्षण असे

ही आहे की दलित अस्मितेवर आयुष्यभर राजकारण करूनही ब्राह्मणांबद्दल विखार (जो इतर रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये आणि आतातर सर्व ब्रिगेडी मंडळींमध्ये असतो) तो यांच्यात नाहीये. शिवाय ते उठता बसता इतर रिपब्लिकन (आणि अन्यही कुठल्याही नेत्यांबद्दल टीका/कुरापती वगैरे भानगडी कधी दिसत नाहीत. हा माणूस मंत्रीपदाचा भुकेला आहे हे त्याने कधीही लपवून ठेवलेले नाही. त्या दुर्ष्टीने तो स्वार्थी असेलही पण ताकाला जाऊन भांडे लपवणारा (आणि कार्यकर्त्यांसाठी मंत्री व्हायचंय, विचारसरणीच्या लढ्यासाठी सत्ता हवीये, सत्तेसाठी लाचार होणार नाही/स्वाभिमान/वाघ सिंह शेळीच्या उपमा देत भुंकत राहणे वगैरे भंपकपणा करणारा ) भामटा वाटत नाही. (ढाण्यावाघाची गम्मत म्हणजे आपला बोलण्याच्या जोशातला एक वाग्बाण एवढेच. त्याला अर्थ/खोली वगैरे (नेहमीप्रमाणेच) नाही !)
एकुणात आठवलेंबद्दल मी अलीकडे सहिष्णू झालोय एवढे मात्र खरे.
यापुढे मी आठवले स्पेशल चारोळ्या किंवा त्यांच्या झगमग कपड्याची किंवा त्यांच्याकडच्या एकूणच गाम्भीर्याच्या अभावाची रेवडी उडवणे सोडून देईन असे अजिबात नाही, पण त्याचवेळी हा माणूस कवाडे-गवई-ढसाळांच्या काळापासून ते आनंदराज आंबेडकर-बापूसाहेब भोसले वगैरे बाबासाहेबांच्या वारशाच्या गफ्फा करणाऱ्या आजकालच्या दीडदमडीच्या नेतुकल्यांच्या काळातही रेस मध्ये आहे, एवढेच नव्हे तर (येनकेन प्रकारे का असेना) विनमध्ये येऊ शकणारा एकमेव घोडा आहे एवढे भान नक्कीच ठेवेन
ता.क. : रामदास आठवलेंवर अजून प्रकाश टाकणारा हा लेख नक्की वाचा :

http://www.livemint.com/Politics/zgbWKrkpLlJvVXJcoqA31O/Ramdas-Athawale-poet-painter-exDalit-Panther.html

 (९ जुलै २०१६ ची पोस्ट)